आजची पोस्ट आहे खास माझ्या बालदोस्तांसाठी……..
आज मी माझ्या मुलांना सांगितलेली होळीची गोष्ट आज सगळ्या बालदोस्तांसाठी इथे टाकतेय. तेव्हा ही पोस्ट ज्यांना वाचता येते त्या मुलांसाठी आहे आणि ज्या मुलांना वाचता येत नाही त्यांच्या आई-बाबांसाठी…(त्यांनी ही मुलांना वाचून दाखवावी म्हणून…..) .
तर, बालदोस्तांनो, फार पुर्वी हिरण्यकश्यपु नावाचा एक राजा होता. तो अतिशय पराक्रमी होता, त्याने स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळही जिंकलेले होते. ब्रम्हदेवाने त्याला वर दिलेला होता की त्याला दिवसा किंवा रात्री, घरात वा घराबाहेर, पृथ्वीवर वा आकाशात, मनुष्य वा प्राण्याकडून , आणि अस्त्र वा शस्त्राने मृत्यु येणार नाही. त्यामूळे तो अतिशय गर्विष्ठ झालेला होता. त्याचे सोडून अन्य कोणत्याही देवाचे नाव घेतलेले त्याला आवडायचे नाही. या हिरण्यकश्यपूचा मुलगा होता प्रल्हाद. तो भगवान विष्णूंचा भक्त होता. तो सदैव देवाच्या नामस्मरणात मग्न असे, ही गोष्ट हिरण्यकश्यपूला अजिबात आवडत नसे.
सुरूवातीला त्याने प्रल्हादाला रागावून पाहिले, मारून पाहिले पण प्रल्हादाने काही देवाचे नाव घेणे बंद केले नाही. मग एक दिवस तर हिरण्यकश्यपू फारच रागावला, त्याने त्याच्या सैनिकांना सांगितले की प्रल्हादाला उंच डोंगरावरून ढकलून द्या…… सैनिकांनी तसे केलेही पण प्रल्हाद देवाचे नाव घेत राहिला, आणि भगवान विष्णूंनी त्याचे रक्षण केले. असेच प्रल्हादाला अनेक शिक्षा दिल्या गेल्या पण दरवेळी देवाने त्याचे रक्षण केले. लोक त्याला ’भक्त प्रल्हाद’ म्हणत असत.
या हिरण्यकश्यपू राजाची एक बहिण होती तिचे नाव होते ’होलीका’. या होलीकेला एक वर मिळालेला होता , तो असा की तिला आगीपासून कुठलेही भय नाही. मग हिरण्यकश्यपू आणि होलिकाने असे ठरवले की ’होलीका’ प्रल्हादाला मांडीत घेउन जळत्या आगीत बसेल आणि त्या आगीमधे ’भक्त प्रल्हाद’ जळून खाक होइल……. पण याहीवेळेस भक्त प्रल्हादाच्या भक्तीचा आणि श्रद्धेचा विजय झाला आणि त्या आगीत ’होलीका’ जळून गेली आणि प्रल्हाद सुरक्षित राहिला. (या हिरण्यकश्यपूचा पुढे विष्णूने नरसिंहाचा अवतार घेउन वध केला!!!)
याच ’होलीका’ च्या नावावरून आजच्या दिवसाचे नाव आहे ’होळी’….. या दिवशी संध्याकाळी जी आग पेटवली जाते त्यात सगळ्या वाईटाचा अंत होतो आणि जे जे पवित्र ते वाचते असे मानले जाते. फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला हा ’होलिकोत्सव’ साजरा केला जातो.
याच दिवसाची आणखीन एक कथा अशी की याच दिवशी श्रीकृष्णाने पुतना नावाच्या राक्षसिणीला मारले होते. आणि लोकांनी तिची ’होळी’ केली होती. संपुर्ण भारतात हा सण मोठ्या प्रमाणावर साजरा होता.
महाराष्ट्रात होळीच्या आगीत नारळ भाजला जातो आणि या आगीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. होळीला शिमगा असेही म्हटले जाते. पौर्णिमेनंतर पाच दिवसानी येते रंगपंचमी. वेगवेगळ्या रंगांची उधळण करून हा रंगीबेरंगी सण साजरा केला जातो.
होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीची रक्षा कपाळाला लावून धुळवड केली जाते. ही रक्षा आपलेही दुष्ट शक्तीपासून रक्षण करते असे मानले जाते.
तेव्हा आजच्या या होळीत आपण आपल्यातल्या दुर्गूंणांना आगीत टाकून देउ या, आणि ्होळीचा आशिर्वाद घेउन उद्यापासून एक नवी सुरूवात करूया!!!
तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून, ईशान आणि गौरीकडून होळीच्या अनेक अनेक रंगीबेरंगी शुभेच्छा!!!!!!
आणि हो, संध्याकाळी होळीजवळ जाल तर जरा जपूनच, आईचा हात सोडू नका……आणि बाकिच्या अनेक ब्लॉग्स मधल्या मावशी काकांनी त्यांच्या (म्हणजे आम्हा सगळ्यांच्या) लहानपणीच्या होळीच्या आठवणी नमुद केलेल्या आहेत त्या वाचायला विसरू नका हं!!!!
हा आहे आजचा आमचा होळीचा प्रसाद…… 
आज संध्याकाळी होळी पेटल्यावर जोरात बोंब ठोकायला विसरू नका, आज सबकुछ माफ असते, एरवी कराल तर आई रागावेल…..
होळी रे होळी…………………
