अस्वस्थता येते…. येते म्हणजे ’येते आपली ’ …. बिनबुलाया मेहेमान आहे ती…. कारण न विचारता, न सांगता हजर होते…. ’घालवल्याशिवाय’ जात नाही सहसा!!! कोळ्याच्या जाळ्यासारखी आपल्याला वेढणारी ….. आपल्या आत असते न बाहेरही, काहीच रमवू शकत नाही मग!!! थकायला होतं…. घाबरायला होतं… अस्वस्थ होतं!!!
समोर कोणी विचारणारं , आपल्या अस्वस्थतेत अस्वस्थ होणारं माणूस काळजीने विचारतं , काय झालय??? … आपल्याचकडे नसणारी उत्तरं देता येत नसतात!!! कागदाची फिरकी असते नं, ती अशी उंचावरून खाली सोडली की गोलाकार भिरभिरत जमिनीवर येते , तसं हलकं होतं मन , त्याच्या फिरकीला भिरभिरायला भरभक्कम कारण लागत नाही !! आपल्या मनाची अशी बेछूट भिरभिरलेली फिरकी आपल्याला उचलून आणताना मात्र जड वाटते बरेचदा …. पेलेनासं होतं कधी कधी सारं!!! ’आधार’ हवा हवा वाटतो….
आपल्यात अनेक बाबतीत सुधारणेला वाव आहे , किती बडबड करतो आपण, नेमकं हवय काय आपल्याला…. ’ सुख बोचतं ’ अशा यादीत आपणही आहोत का ???
सपशेल हार मानायची वेळ …. आपलं ओझ कुणाच्या खांद्यावर द्यायची वेळ …..मनात काहीतरी उमटतं…
बूडत ही भव के सागर में,
बहियाँ पकरि समुझाए रे , फकिरवा!
आणि मग येते त्या फकिराची आठवण !!! समजते लगेच, आता हा उचलणार आपले ओझे…. जिगसॉ पझल चे विखुरलेले भाग हा रचणार आता सुबक!! शांत बसावे पुन्हा आपण , अनेकदा याच्या समोर बसून समाधि लावतो तसेच ….तो बोलू लागतो… त्याला काही सांगावं लागत नाही, ’काय कशी काय वाट चुकलीस ? ’ तो मुळीच विचारत नाही…. वाट सापडेनाशी झाल्याशिवाय मी येणार नाही तो जाणून आहे जसा!!!
पानी बिच मीन पियासी,
मोंही सुन सुन आवै हाँसी ;
घर में वस्तु नजर नहिं आवत ,
बन बन फिरत उदासी ;
आतमज्ञानविना जग झूठा ,
क्या मथूरा क्या कासी ?
आत्मज्ञान
… अरे बाबा ते मिळवता आले असते तर तुझं दार ठोठावलं असतं का रे ?? आणि हा पहा कसा म्हणतोय, ” मोंही सुन सुन आवै हाँसी ” !! कबिराला देता येतो हा अधिकार…. हस बाबा तू हवा तर माझ्यावर, पण तारून ने मला !!! तो मग एक एक शब्द हलका हलका उच्चारत आपल्याला थोपटतो…. एका दमात काही सांगायची त्याला घाई नाहीये, बरं तो सांगेलही त्याची आहे ती क्षमता… आपल्याला झेपायला हवं नं पण!!! एक दिशाही नकोय उपदेशाची… कबिरा तू सांगत रहा मी ऐकतेय…..
मला अनेक व्यथा नं ताप आहेत… खूप नाही पण काही मोजक्या , तुझ्याचकडे करता येतील अशा तक्रारीही आहेत….
मुसा खेवट नाव बिलइया,
मींडक सोवै साप पहरइया ;
सगळेच शब्द नाही कळत पण हे जे काय आहे ते उलटसुलट आहे…. झोपलेल्या बेड्काला साप राखतोय….विरोधाभास सारा!! हो अशाच अर्थाच्या तर असतात नं तक्रारी, सगळं तिरपांगडं असतं रे !! मार्ग दाखव रे….
बोलना का कहिये रे भाई,
बोलत बोलत तत्त नसाई ;
बोलत बोलत बढै बिकारा,
बिनबोल्या क्यूँ होइ बिचारा ?
संत मिले कछू कहिये कहिये ,
मिलै असंत मुष्टि करि रहिये ;
ग्यानी सूँ बोल्या हितकारी ,
मूरिख सूँ बोल्या झष मारी ;
कहै कबीर आधा घट डोलै ,
भरया होइ तो मूषा न बोलै!!
किती सहज आहे हे…. संतासमोर असाल तर बोला नक्की मात्र असंत असेल समोर तर उगी रहा!!! जमणार कितपत शंका आहे मात्र
.. जरा प्रयासाने जमवलं नं पण तर मनस्ताप संपलाच सारा!!!
कबीराच्या पुस्तकाची पानं उलगडत जायची आहेत… क्रम न ठरवता… इथे क्रम नसणं आणि तरीही आधाराची हमी वाटणं किती महत्त्वाचं आहे नं!!! कुठलंही पान उघडा , कबीर खंबीर उभा आहे समजावयाला…. आयूष्याच्या पुस्तकाची किती पान आपण उलटलीत यावर आपलं शहाणपण ठरतं नाही, गोंधळायला होतंच ….. हा मात्र ’ मस्तमौला ’ स्वत:च्याच धुंदीत गातोय…. एका अनाहत नादात स्वत:ही रमतोय आणि जगाला रमवतोय!!! ’बळ ’ मिळतं या सावलीत!!!
तू आहेस बाबा अमर … आमची तितकी कुवत नाही… मर्त्य असू दे आम्हाला!!!
हरि मरिहै तो हमहू मरिहैं
हरि न मरै , हम काहेकू मरिहैं ?
आहे किनई मुद्दा बिनतोड…. ही वल्ली बिनतोडच आहे…. ’अवाक’ होऊ दे मला… थक्क होऊ दे!! आजकाल खुपसे थक्क होणे होत नाही…. माझे ज्ञान वाढले भलतेच असे काहीही नाही तरीही पूर्वीसारखं हरखून जाणं फारसं जमत नाही!! ही हार की जीत कोणाला माहित रे!!! ’हार’ असावी कदाचित…. नवनवं काही मन शोधत असतं मात्र…. त्याला आवडतं चकित व्हायला!!!
तू बाळगतोस ते सामर्थ्य…. गेल्यावेळी वाचल्या होत्या की मी या ओळी… तरीही त्याच पुन्हा वाचताना ’बोध’ होतो !!!
दरियाव की लहर दरियाव है जी,
दरियाव और लहर में भिन्न कोयम ?
उठे तो नीर है, बैठे तो नीर है ,
कहो जो दुसरा किस तरह होयम ?
उसीका फेरके नाम लहर धरा,
लहर के कहे क्या नीर खोयम ?
जक्त ही फेर जब जक्त परब्रम्ह में,
ज्ञान कर देख कबीर गोयम .
नावं बदला, जागा बदला… तरिही एक आहे सारं!! असचं ’तादात्म्य ’ पावायला होतं कबीराशी…. ’तादात्म्य ’ कधी वापरेन हा शब्द वाटलंच नव्हतं!!! इथे तोच येतोय पण मनात….
किती वाचलं , किती समजलं , किती उमगलं
…. शंका येतच नाहीत मनात….. चुळबुळणा-या मनाला कान पकडून एका जागी निवांत बसवण्याइतपतं समर्थ आपण आहोत असं वाटतं!!! पुढचे निदान काही दिवस तरी बेटं सरळ चालेल असं वाटतय…. आणि कबीर कुठे जातोय मला सोडून… तो सखा आहेच सोबत!!!
मै कहता तू जागत रहियो , तू जाता है सोई रे ,
मै कहता निरमोही रहियो, तू जाता है मोहि रे !!
नाईलाज आहे रे कबीरा, ’मोह ’ कमी केले जाऊ शकतील पण निर्मोह व्हायचा नाही त्यामुळे तुला पुन्हा पुन्हा गाठावे लागते बघ!!!
सध्या तूला अलविदा म्हणते… पुन्हा भेटेनच… आणि काय लिहू, तू जाणतोच सारे!! पुन्हा डोळे मिटायला लागतील , तेव्हा ” जागत रहियो ” असं दटावून घ्यायला तुझ्याचकडे येणार मी!!!
मागे ’ विसाव्याच्या वळणावर ’ भेटला होतास… आज तुझ्याकडे वळून विसावलेय!!! हे असेच होत रहाणार , की हे व्हावे असे मलाही वाटते
… काहिही असो,
कहै कबीर ताको भय नाहीं , निर्भय पद परसावै!!! ![]()
आणि काय हवे!!!!!
मनाच्या पडद्यावर येणाऱ्या वेगवेगळ्या रंगापासून सुंदर चित्र तयार करणं, नि त्याचा नीट अर्थ लावणं कुणी तुझ्या पासून शिकावं तायडे!
“एक खुशबू आती थी ..
एक खुशबू आती थी …
मैं भटकता जाता था,
रेशमीसी माया थी…
और मैं तकता जाता था.
जब तेरी गली आया,
सच तभी नजर आया.
जब तेरी गली आया,
सच तभी नजर आया.
मुझमेही वोह खुशबू थी,
जिसे तुने मिलवाया !!”
तुझी, मागची थीम सॉंगची पोस्ट वाचून मन असंच सैरा-वैरा पळायला लागलं होतं. नाना विचार येत होते मनात, जे सगळेच त्या ‘थीम सॉंग’ च्या कल्पनेसोबत जुळत होते. त्या सगळ्या विचारांना, कमेंटी मध्ये गुंफणं शेवटपर्यंत जमलंच नाही मला.
असो, कबीर चे दोहे वाचले नाहीत कधी. वाचले तरी, ह्या पामराला किती कळतील तो हि एक प्रश्नच आहे.
पण तुझ्या पोस्ट वाचून वरच्याच ओळी आठवल्या. मी असाच भटकलो, कि, असलीच गाणी ऐकतो, नि परत स्थिर होतो.
हा. कधी कधी तरीही ऐकत नाही बघ मन …
पण किती सोप्पय ना आपल्यासाठी हा पोरखेळ तायडे. मनाला हवं तसं पळू द्यायचं, जिकडे जाईल तिकडे. आणि त्याला शांत करायची वेळ आलीच कि तुझ्याकडे जसे कबीराचे दोहे, माझ्याकडे जसे गाणे, तसे प्रत्येकाकडे काहीना ना काही असतेच. मग त्याच काहीतरीला धरून मनाला परत जागेवर आणायचं. त्याला शांत करायचं. म्हणजे त्याला परत पळवण्यासाठी तयार. काय करणार? एकाच जागी त्याला बसवून ठेवणं जमत कुठे आपल्याला. त्याला पळवायचा नि त्याचा सोबत पळायचा, मोह होतोच. पण खरी कमाल तर कबीराची. निरमोही राहून स्वतःच्या मनाला स्थिर तर तो ठेवतोच, पण आपल्या पळणाऱ्या मनाला तो त्याच्या मागे पळवत पळवत कधी शांत करतो कळत सुद्धा नाही. हो ना?
पोस्ट नेहमीप्रमाणे सॉलिड!
कबीरचे दोहे शोधायला हवेत आता.
ही प्रतिक्रिया, “लाईक” ह्या सदरात गृहीत धरावी
खरेच आणखी काय ते हवे !!!
मोठ्या खुबीने उलगडला आहेस हा ’ अस्वस्थ प्रवास… ’ खुपसा मिळताजुळताही आहेच.
लिखते रहो… शायद मनवा सुलझ जाय !!!
पोस्ट अवतरली आणि नुसत हेडिंग वाचून कबीर आठवला… असाच….!
खरंच कबीर फार कळत नाही पण मनाला अत्युच भावतो… “मन लागो यार फकिरी में” ऐकतांना निरामय शांतता मिळते न, मग अवखळ मन आणि त्याबरोबर तनही आपोआप बालक्रीडा शांत करत शहाण्यासारख वागत…
‘तादात्म्य’ सारखा शब्द लिहिताना तुझ्या हाती कबीरच अवतरला असावा अशी दाट शंका येते मला! बाकी सीता म्हणाली होती तस, रामाचा आठव काढता काढता तिचा रामच झाला असता, तसा तुझ्यात कबीरछटा दिसतीये!
अजून एक आठवण, पियू च्या ह्या पोस्टवर, कबीरावर अनाडी/समजूतदार अशांची बरीच गहन/मज्जा-चर्चा वाचायला मिळेल (प्रत्येकाने आपापल्या ‘परीने’ कष्ट उपसले त्यावेळेस)!
https://profiles.google.com/110216589422121776948/buzz/65D5A5qcjhy
……
<<नाईलाज आहे रे कबीरा, ’मोह ’ कमी केले जाऊ शकतील पण निर्मोह व्हायचा नाही त्यामूळे तूला पुन्हा पुन्हा गाठावे लागते बघ!!!
काय बोलू आता तन्वी…किती छान मांडलेस ग तन्वी…
<<वाट सापडेनाशी झाल्याशिवाय मी येणार नाही तो जाणून आहे जसा!!!
नक्की आठवत नाही )..
…( काय गोंधळ केला आहे या बाईने
)…
मागे एकदा "आपण सारे अर्जुन" वाचताना असेच काहीतरी वाटले होते…म्हणजे मला तर खुपदा वाटते कि तो धनंजय खरेच खूप नशीबवान होता कि त्याला कृष्ण भेटला…
आपण सारे म्हणजे ना पैलतीलावर ना ऐलतीरावर( बहुतेक तुझेच वाक्य आहे हे
असाच मग आपल्याला कबीर, विवेकानंद यांचा आधार घ्यावा लागतो ना…
सकाळी आल्याआल्या तुझी हि पोस्ट पहिली आणि काहीच कळले नाही
आता परत एकदा घेऊन बसले आहे आणि एक एक गुंता सोडवण्याचा प्रयत्न करत आहे….
"पानी बिच मीन पियासी,
मोंही सुन सुन आवै हाँसी ;
घर में वस्तु नजर नहिं आवत ,
बन बन फिरत उदासी ;
आतमज्ञानविना जग झूठा ,
क्या मथूरा क्या कासी ?"
आयुष्यातली सगळ्यात कटू सत्ये कबीराने इतकी छान सांगितली आहेत कि बस…
एकदा का हे कळले आणि मान्य केले कि झाले…मला नाही वाटत कि परत एकदा कबीर शोधावा लागेल….
पण काय करणार?आदत से मजबूर जो है हम…
आपण आपले जाणार, धडका खाणार..असे का झाले याचा विचार…कबीर, विवेकानंद आपल्याला आपल्या मार्गावर आणून सोडणार…आणि आपण तयार पुन्हा दुसरीकडे धडका खाण्यासाठी…
कबीर आहेच परत सावरायला…
आता मात्र "कबीर" शोधायलाच हवा आहे….मागे एकदा "विवेकानंद" घेऊन बसले होते..फार काही कळले नाही पण तरी अजून एकदा प्रयत्न करून बघायला हवा आहे नक्कीच…
आज बहुदा सगळ्यांच्याच कमेंट “लाईक” सदरात येणार आहेत…
आपल्याला कबीर कळतो अस वाटत तेव्हा आपण स्वत:ला थोडेसे कळलेले असतो – निदान त्या क्षणापुरते तरी!
+१
अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर “This is not my cupa tea”.. पण तरीही पोस्ट वाचल्यानंतर हा सगळा प्रकार (दोहे वगैरे) वाचला पाहिजे असं नक्की वाटायला लागलंय. तुझ्या कडे काही लिंक्स/पिडीएफ्स असतील तर पाठव मला..
अजून एक… यापुढे आता कधीच मी “मस्त पोस्ट, सुंदर पोस्ट” वगैरे वगैरे काही लिहिणार नाहीये.. कारण ते अध्याहृत असतं
)
तन्वी,
नवीनच दार उघडलेस! कबीराचा ठाव कस घ्यावा? दरवेळी आणखी नवा अर्थ घावतो. आपण जागे पाहिजे मात्र
सुंदर विवेचन. अतिवास म्हणतो तेही बरोबर आहे.. आणि वैभवचा्ही ’जवाब नही.’
मी कबीराचा फॅन आहे हे सत्य असलं तरी माझी समज यथातथाच.. बर्याच ओव्यांचे अर्थ आत्ता तू लिहिल्यावर कळताहेत..
very good