नवी नजर आणि स्वर्गाचा रंग !!!

मराठी किंवा हिंदी भाषेव्यतिरिक्त इतर भाषांचे चित्रपट मी पहावे असे काही ठरवून झाले नाही, माझा सगळा कारभार ’सहजच’ या सदरात मोडणारा :) .  त्यात या दोन भाषांव्यतिरिक्त इंग्लिश सिनीमे पहाणे म्हणजे ते हिंदीत डब झालेले किंवा सबटायटल्स असलेले असेच आत्ता पर्यंत जणू ठरलेले होते. उगाच कान ताणताणून संवाद ऐकायचे कशाला, हा मुळचा आळशी स्वभावाला धरून असणारा प्रश्न पडायचा आणि मी इतर भाषिक चित्रपटांच्या वाटेला जायचे नाही.त्यामूळे पाहिलेल्या इंग्लिश चित्रपटांची यादी तशी लहानशीच होती / आहे !!

गेल्या सुट्टीत भारतातून येताना विश्वास पाटलांचं ’नॉट गॉन विद द विंड ’ पुस्तक सोबत आणलं…. इतकं अभ्यासपुर्ण नजरेने चित्रपटांकडे पहाता येतं हे नव्याने समजलं !! गणेश मतकरींचा ’आपला सिनेमास्कोप ’ हा ब्लॉगही असाच सिनेमा कसा पहावा हे शिकवणारा. आमचा आनंद पत्रेही त्याच्या सिनेमा कॅन्वासवर अधून मधून रंग भरत असतो :) … कोणे एके काळी हेरंब आणि विद्याधरही लिहीत असत, असे वाक्य इथे टाकण्याचा मोह आवरता घेतेय (वाक्य टाकून झाल्यावर ;) ) !!!

थोडक्यात काय आजकाल मी साहेबाच्या चित्रपटांपासून फारकत घेतल्यासारखी वागत नाही. अधेमधे एखादा चित्रपट पाहून टाकते :)

तर याच नव्या दालनात एक लोभस दालन अचानक उघडलं माझ्यासाठी…. ’माजिद माजिदी’ नावाचं !!! एखाद्या प्रवासाला निघावं, वाट ठरलेली नसावी पण नेमक्या स्थळी जाऊन पोहोचावं असं काहिसं झालं या ठिकाणी !! माजिदीचा ’बरान’ पाहिला आणि लक्षात आलं हे वेगळं रसायन आहे…. हे झेपेल, आवडेल आपल्याला !!!

मी माजिदीबद्दल लिहावं किंवा एकूणात एखाद्या चित्रपटाबद्दल लिहावं असा काही माझा अभ्यास नाही हे माझं मत होतं, अजूनही आहे तरिही आज एक नोंद करावी वाटली म्हणून ही पोस्ट!!!

The Color of Paradise “  …. Rang -e- Khoda … नावाचा सिनेमा पाहिला आणि पोस्ट लिहायला घेतली … हे परिक्षण नाही हे आधि नमूद करायला हवे …. हे आहे एक भारावलेपण !!

मोहम्मद हा आठ वर्षाचा मुलगा… जो पाहू शकत नाही !! तो तेहेरानच्या एका शाळेत शिकतोय . ब्रेल लिपीत भराभर लिहू वाचू शकणारा मोहम्मद हा चुणचूणीत मुलगा आहे. शहर आणि त्या अनूषंगाने येणारे टेपरेकॉर्डर, मोबाईल फोन हे बारकावे लहानश्या प्रसंगातून सामोरे येतात. शाळेला सुट्टी लागलीये, सगळ्या मुलांचे पालक येऊन मुलांना घेऊन गेलेत…. मोहम्मद एकटा आपल्या वडिलांची वाट पहातोय ….. तितक्यात बाजूच्या झाडांमधे पक्ष्याचं एक पिल्लू घरट्यातून खाली पडलय…. त्या पिल्लाला लहानसा मोहम्मद ज्या आत्मियतेने घरट्यात परत ठेवतो ते फक्त पहात रहावे. गंमत म्हणजे डोळ्यांनी सिनेमा पहाताना आपली नजर मोहम्मदच्या त्या पक्ष्यावर अलवार फिरणाऱ्या बोटांबरोबर फिरते. घरटं मोडू नये म्हणून अलगद्पणे घरट्याला तो चाचपडत शोधतो तेव्हा त्याची धडपड मनात उतरते.

मोहम्मदचे वडील (हाशेम ) येतात , ते मात्र त्याला परत नेण्यास उत्सूक नाहीत …. शाळा मोहम्मदला ठेवून घ्यायला तयार नाही… तिथे सुरू होतो मोहम्मदचा घरचा प्रवास. वाटेत बसने, घोड्याने होणारा प्रवास अखेर एका निसर्गरम्य प्रदेशात येतो…. बसमधल्या खिडकीतून मुठीत हवा पकडू पहाणारा मोहम्मद अत्यंत निरागस दिसतो. या प्रवासात जाणवते मोहम्मदचे निसर्गाशी असलेले नाते…. पाण्याच्या प्रवाहातल्या गोट्यांमधे त्याला अक्षरं सापडतात. पक्षी त्याला साद घालतात… डोळ्यांनी पाहू न शकणारा मोहम्मद निसर्गाशी मनमूराद संवाद साधतो.

मोहम्मदचं गाव, घर , त्याच्या विलक्षण सुंदर दिसणाऱ्या लहानश्या बहिणी (हानये आणि बहारें ) , त्याची कष्टाळू आजी सगळच अतिशय मोहक आहे. गावातल्या शाळेत डोळस मुलगा चुका करत वाचतोय एक धडा, आणि मोहम्मदने मात्र ब्रेललिपीत तोच धडा न चुकता खणखणीत वाचलाय…. त्यावेळेस शिक्षकाच्या चेहेऱ्यावरचे झरझर बदलणारे भाव पहाण्याजोगे. शिक्षकाबरोबरच आपण आधिच मोहम्मदच्या हुशारीच्या, जिवंतपणाच्या प्रेमात पडलेलो असतो. त्याच्या नजरेने जग पहायला लागलेलो असतो.

मोहम्मदच्या आजीची त्याच्यावर असलेली माया ठायीठायी दिसते…. तिचे सुरकुतलेले हात मोहम्मदला जगातले सगळ्यात सुंदर हात वाटतात. नातवासाठी राबणारे ते हात खरोखरीच खूप सुंदर आहेत. पुढे ही आजी जेव्हा घरातून निघून जाते तेव्हा रस्त्यात पाण्याबाहेर पडलेल्या तडफडणाऱ्या मासोळीला उचलून पुन्हा पाण्यात टाकते. हा प्रसंग चटकन विसरला जाणारा नाही…. सुरूवातीच्या एका प्रसंगात मोहम्मद चिमणीच्या पिल्लाचे प्राण वाचवतो आणि त्याची प्राणप्रिय आजी इथे तसाच एक जीव वाचवते…. त्या दोघांचं ते घट्ट नातं पहाताना paradise या शब्दाची महती समजते.

चित्रपटात एक महत्त्वाची किनार अजून आहे….

मोहम्मदच्या वडिलांना , हाशेमला दुसरं लग्न करायचं आहे …. त्यांना मात्र हा मुलगा ही या लग्नातली अडचण वाटतेय. एका साध्या कामगाराची  ’मुलगा ’ आणि  ’वैयक्तिक स्वार्थ ’ यातली घुसमट साध्या साध्या प्रसंगातून आणि वाक्यातून पुरेपुर उतरलीये. लग्नाची वेळ जवळ येते म्हणून मोहम्मदला दुसऱ्या गावातल्या एका सुताराकडे त्याचे वडिल सुतारकाम शिकायला पाठवतात. हा सुतार स्वत:ही अंध आहे. या सुताराला मोहम्मद सांगतो , “देवाचं माझ्यावर प्रेम नाही नाहितर त्याने मला डोळे दिले नसते का ?? ” एका लहानश्या मुलाचे ते प्रश्न, समज अस्वस्थ करून टाकतात. हाशेमच्या नजरेत वारंवार दिसणारी स्वत:बद्दलची ’दया’ आणि मोहम्मदचा राग करण्याबद्दल स्वत:ची वाटणारी लाज आणि चिड जाणवतात अगदी!!

मोहम्मदची आजी जग सोडून जाते तेव्हा तिच्यासमोर क्षणभर एक दिव्य प्रकाश चमकतो…. आईच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरत मोहम्मदचे वडिल त्याला परत आणायला पोहोचतात. येताना एका प्रचंड वेगाने वहाणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाजवळ ते येतात. प्रवाहावरचा लाकडी पुल ओलांडताना अचानक तो पुल खचतो आणि मोहम्मद त्या पाण्यात पडतो. त्यानंतरचे त्याच्या वडलांच्या चेहेऱ्यावरचे भाव  अतिशय सुंदर उमटले आहेत. एका क्षणासाठी थबकलेले , ही आपली मोहम्मदपासून सुटका आहे का अश्या विचारात पडलेले वडिल पुढच्या क्षणी प्रवाहात वेगाने वहाणाऱ्या मोहम्मदच्या मदतीला धावतात. चेहेऱ्यावरची ती अगतिकता स्पष्टच सांगते वडलांच्या मनातलं मोहम्मदबद्दलचं प्रेम…. अक्षरश: खिळवणारा क्षण …..

प्रवाहाच्या प्रचंड वेगापुढे हाशेम आणि मोहम्मद हारतात ….. बऱ्याच वेळाने हाशेम शुद्धीत येतो , समुद्रकिनारी  काही अंतरावर त्याला मोहम्मद निश्चल पडलेला दिसतो….. त्याची हालचाल बंद आहे आणि तितक्यात पक्ष्यांचे आवाज येताहेत… आपल्याकडे, कॅमेऱ्याकडे हाशेमची पाठ आहे , त्याच्या कुशीत मोहम्मद विसावलाय…. मोहम्मदचा हात, त्याची बोटं आपल्या दिशेला आहेत…. पक्ष्यांच्या त्या आवाजाला मोहम्मद पहातोय , त्याची बोटं हलताहेत…. एक सुरेख सोनेरी प्रकाश त्याच्या हातावर चमकतोय ….. The Color of Paradise , निसर्गाच्या इतका जवळ असणारा मोहम्मद आता नंदनवनातल्या पक्ष्यांशी बोलतोय!!!

.

.

आपण स्तब्ध… शांत !!!

का आवडला हा सिनेमा इतका की पोस्ट लिहावी वाटली ???

मला वाटतं माजिदीचं अत्यंत साधेपणाने कथा सांगणं हे महत्त्वाचं कारण आहे !! आपली आजी लहानपणी परिची कथा सांगते नं, खूप आवाज नसतो त्यात…. आजीच्या उबेत विसावलेले आपण आणि हळूवार कानावर येणारा तिचा आवाज ….. त्या आवाजाची आठवण माजिदी करून देतो आपल्याला आणि जिंकतो !!! उगाच मोठमोठे संवाद नाहीत, रडारडी नाही… हाणामारी तर नाहीच नाही….. मोहम्मद नकोसा वाटण्याचा , आणि त्याचबरोबर या नकोश्या वाटण्याबद्दल अपराधीपणाने मन पोखरलं जाण्याचा त्याच्या वडलांचा संयत अभिनय असो की मोहम्मदला दुर नेलं तेव्हा मला त्याची नाही पण तुझी काळजी वाटतेय हे त्राग्याने स्वत:च्या मुलाला सांगणारी त्याची आजी असो , अभिनय जेव्हा अभिनय वाटत नाही तिथे आपण गुंतत जातो. लहानश्या प्रसंगातून मोठी कथा सांगण्याची या दिग्दर्शकाची हातोटी खरच वाखाणण्याजोगी आहे.

मोहम्मदला दिसत नाहीये तरिही तो खूप काही पहातो त्याच्या हाताने, कानांनी !!! आपण ते सगळं अनूभवू शकतो अगदी त्याच्याबरोबर… परंतू त्याचवेळेस सभोवतालचा हिरवागार सुरेख परिसर, फुलांचे, झाडांचे, पानांचे , पक्ष्यांचे , आकाशाचे अप्रतिम रंग पडदा व्यापून मनात उतरतात. Paradise ’नंदनवन ’ हा शब्द लागू पडतो इथे. फुलांपासून बनवलेल्या रंगाचे धागे , अनेकरंगी गालिच्यांची आठवण करून देतात. इराणचे गालिचे इतके सुरेख का असतात हे पटतं !!

हा संपुर्ण चित्रपटच एखाद्या कुशल हाताने विणलेल्या रंगीबेरंगी गालिच्यासारखा आहे…. मोहम्मदच्या नजरेने म्हणजे त्याच्या हाताने पाहिल्यासारखा तो आपल्याला तितकाच तरल , हळूवार जाणवतो ….  “दिसतो  ” !!!  भावभावनांचा गालिचा !!! ही नजर नक्कीच मिळवण्याजोगी….. त्याने स्वर्गाचे, नंदनवनाचे रंग पहायला हरकत नाही!!

माजिद माजिदीच्या चित्रपटांच्या, दिग्दर्शनाच्या प्रेमात पडलेय मी सध्या …. एक नवी नजर मिळतेय, एका जुन्या ओळखीच्या माध्यमाची एक नवी ओळख होतेय …. तसेही कोणाला नकोय सांगा बरं वाऱ्याची अलगद, मंद झुळूक , पकडता न येणारी तरी जाणवणारी आणि मोहात पाडणारी … !!! :)

(फोटो जालावरून साभार !! )

जगातल्या सगळ्यात उंच इमारतीच्या १२४व्या मजल्यावरून…..

गेल्या पोस्टमधे म्हटलं होतं की नव्या वर्षाची सुरूवात बुर्ज खलिफाच्या १२४व्या मजल्यावरून करायचा बेत आम्हाला बुकिंग न मिळाल्यामूळे पुढे ढकलावा लागला होता, तो अखेर ६ तारखेला पुर्ण केला आम्ही !!!

बु्र्ज खलिफाच्या नावासोबत दिलेल्या विकीमातेच्या लिंकवर त्याबद्दल बरीचशी माहिती आहेच. तशीच माहिती मागे देवेंद्रने त्याच्या ब्लॉगवर इथे लिहीली होती.

दुबईत गेल्यानंतर दुरवरून दिसणाऱ्या या इमारतीबाबत कायम कुतूहल वाटत होते. त्यात तिचे आधिचे ’बुर्ज दुबई’ हे नाव बदलून ’बुर्ज खलिफा’ होण्यामागे, अबूधाबीच्या खलिफाने ( राज्यकर्त्याने )या इमारतीसाठीचे कर्ज फेडण्यासाठी दुबईला केलेली आर्थिक मदत हे कारण आहे समजल्यावर तर आता ही इमारत दुबईत असली तर अबूधाबीचा मात्र तिच्याशी संबंध आहे असे वाटले :)

अबूधाबीतून सकाळी निघाल्यावर तासाभरात दुबई मॉलमधे पोहचता येतं. तिथलं aquarium आणि Under water zoo पाहिल्यावर , दुबई मॉलच्याच दुसऱ्या बाजूला असणाऱ्या बुर्ज खलिफाच्या प्रवेशद्वाराशी आम्ही पोहोचलो.

बुर्ज खलिफाची दिशा दाखवणारा बोर्ड

:)

At the Top या प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर जिथे तिथे बुर्ज खलिफाच्या प्रतिकृती आहेत. मला खरच उत्सूकता होती ती एका मिनिटात १२४ मजले चढून जाणाऱ्या जगातल्या सगळ्यात वेगवान लिफ्टमधे चढण्याची. तिथपर्यंत पोहोचताना UAE बद्दल माहिती देणारे स्लाईड्स ही एक सुरेख सोबत होती !!!

आम्ही लिफ्टसाठी थांबलेलो असताना एकीकडे बुर्ज खलिफाची संपुर्ण माहिती दाखवली जात होती. त्यात काढलेले काही फोटो….

हे काही सगळे फोटो नाहियेत अर्थात कारण माझे फोटो काढून होइपर्यंत लिफ्ट आली.

जगातली सगळ्यात वेगवान लिफ्ट समोर आहे :)

लिफ्टमधल्या एका मिनिटात सगळ्यांच्या कानाचे दडे (ज्याला चिरंजीवांनी कानाचे धडे असे नामकरण केले :) ) बसले वगैरे चर्चा सुरू होती… माझ्याबाबत असे काही झाले नाही चक्क…. आपण अखंड बोलत असलो तर कानाचे दडे बसत नसावे असा (जावई)शोध मला लागला त्यादिवशी … आणि तासनतास न थांबता बोलू शकणाऱ्या व्यक्तीला एक मिनीट सलग बोलणं काय कठीण यावर घरच्यांच एकमत झालं :)

आता मात्र मी काही बोलणार नाहीये…. फकस्त फोटो…. खरं सांगते उंचीला घाबरणाऱ्या माझ्यासारख्या व्यक्तीला असं १२४ व्या मजल्यावरून खाली वाकायला लावणं सोप्प नाहीये… पण तिथे असणं हा एकूण प्रचंड अविस्मरणीय अनूभव होता…. प्रचंड शांतता, आणि दुरवर दिसणारं दुबई शहर….. नजर पार क्षितीजावर न्या, कोणतीही इमारत , अडथळा थांबवणार नाही तूम्हाला….निसर्गाने उधळलेले असिमीत रंग आणि त्यात एरवी उंच वाटणाऱ्या मानवनिर्मीत इमारतींची रांग…. रस्ते, त्यावर असलेले अजून रस्ते, आणि लहानश्या दिसणाऱ्या गाड्या … मजा आली सगळं पहाताना !!!

’विमानात बसलेल्या माणसाला वर आकाशातून खाली पहाण्यात काय नाविन्य ’ असं माझ्या शेजारी उभं राहून बोलणाऱ्या पंजाबी बाईला ढकलून द्यावं वाटलं होतं मला क्षणभर… तिला समजावून सांगावं की अगं बये विमान  आकाशात थांबत का तूला एखादी गोष्ट पुन्हा पहावी वाटली तर, अनेक मुद्दे मांडावे वाटले पण समोर दिसणारं मानवाने उभारलेलं आकाशाला गवसणी घालणारं आश्चर्य बाकि काही सुचू देत नव्हतं !!!

पहिला फोटो

सावली :)

रस्ते पे रस्ता, रस्ते पे गाडी … :)

मधे खाली वर गिरक्या घेणारा मेट्रोचा ट्रॅक ..

वर उरलेले ७६ मजले…. यात म्हणे शाहरूख खान आणि अमिताभ बच्चनचे फ्लॅट्स आहेत !!

सोन्याच्या नाण्यावर बुर्ज खलिफाचे चित्र मिळण्याचे ATM :)

डोळ्याचं पारणं फिटेपर्यंत क्षितीज न्याह्याळल्यानंतर , दुर दिसणाऱ्या अरबी समुद्राला मनसोक्त पाहिल्यानंतर ….. इच्छा असेल तर गगनभरारीच नव्हे तर आकाशाला गवसणी घालणं शक्य आहे हे भान मनात आल्यानंतर….. दिव्य असा एक , किंवा शब्दात बांधणं शक्य नाही असा अनूभव घेतल्यानंतर सुरू झाला परतीचा प्रवास …… :)

14 :04 ला १२४ व्या मजल्यावर असणारी लिफ्ट…

14 :05 ला Ground Floor ला पोहोचलेली होती :)

परत येताना जागोजागी बुर्ज खलिफाबद्दल माहिती देणारे बोर्ड आणि प्रतिकृती होत्या. सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे या बांधकामात असणाऱ्या  अगदी मजूर, कामगारांपासून ते ईंजिनीयर पर्यंत सगळ्यांचे जागोजागी नावासह लावलेले फोटो !!

अनेक बाबींमधे जगात ’सगळ्यात पहिल्यांदा ’ आणि ’सगळ्यात उंच ’ असे बिरूद मिळवणाऱ्या या इमारतीतला सुंदर अनूभव देखील मनात आठवणींच्या राज्यात वरचं स्थान पटकावणार हे नक्कीये.

बुर्ज खलिफाचं रात्रीचं मोहक रूप ….

आमच्या देवेंद्रने दवबिंदू या त्याच्या ब्लॉगवर २०१० मधे बुर्ज खलिफाबद्दल ’सहजच’ वर पोस्ट येइल असं भाकित केलं होतं…. ते खरं करताना मात्र २०१२ उजाडावं लागलं :)

पोस्ट लिहावी असा मोह झाला होता एकदा, त्यात माहिती वगैरे टाकावी…. पण अशी अप्रतिम उंची गाठणं हे सामर्थ्य माझ्या शब्दात नाहीये… तेव्हा तुर्तास फोटोच… और कुछ नही !!! बाकि लिंका दिलेल्या आहेतच…. उधर मिलेंगी बरीच माहिती !!! माझं म्हणणं एकच, जिथून एकाच वेळी मानवनिर्मीत आश्चर्य खुजे वाटावेत आणि त्याचक्षणी मानवाच्या ताकदीला सलाम करावासा वाटावा अश्या ठिकाणी मी तास दिड तास  होते :)

तळटिपा :

गेल्या एक दोन पोस्ट जरी मी प्रवासवर्णनं लिहीत असले तरी आम्ही भारताबाहेर रहाणारे कसे ग्रेट वगैरे काहिही किंतू माझ्या मनात नाही बरं !! हे उगाच शहाणे करावे सकल जना , आणि जे मला भावले ते पोहोचवण्याचा मार्ग आहे म्हणून इथे येतेय !! (हे झाले नव्याने ब्लॉग्स वाचणाऱ्यांसाठी )

घाबरू नका, वाळवंटातले आश्चर्य यावर आश्चर्य आणि वैताग वाटावा इतपत मी पिडणार नाहीये बरं ;) ( हे जुन्या जाणत्यांसाठी ) :)

Al – Ain zoo आणि नव्या वर्षाची सुरूवात!!

नव्या वर्षाची सुरूवात, आई-बाबा इथे अबूधाबीत आलेले ….. मग ठरवलं काहितरी वेगळं करायचं . बुर्ज खलिफाच्या १२४ व्या मजल्यावरून दुबई शहराचं दर्शन करावं असं ठरवलं पण तोच विचार माझ्याआधि अनेकांनी केलेला असावा बहूधा :) . मला काही ते बुकिंग मिळालं नाही. मग राहिलं ते अगदी जवळच्या अल -ऐन (Al Ain) या एमिरातीतलं Zoo . मुळात वाळवंटात असे अनेक प्राणी कसे ठेवतात याचे कुतूहल होतेच. मग सर्वानूमते , म्हणजे घरात खरच लहान असलेले बालक आणि माझ्यासारखे वय वाढूनही स्वत:तलं लहान मुल जिवंत ठेवलेल्या मोठ्यांच्या मते प्राणीसंग्रहालय फायनल झाले!!! :)

जबेल हाफीत (Jabel Hafeet ) पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेले ९८८ एकर जमिनीतले हे प्राणीसंग्रहालय पहायला जाताना मला मुलांइतकाच उत्साह वाटत असताना एक जाणवलं की बाल्य आपल्याला सोडून कुठेही जात नाही, लहानपणी राणीच्या बागेत जाताना असेच काही भाव मनात ठेवून मी गेले असावे!! :)

नेहेमीप्रमाणे गाडीत आधि ’Petrol Full ’ केले गेले, म्हणजे रस्ता चुकला तरी घाबरायला होत नाही मला, आणि नवऱ्याला रस्ते चुकवायची आयती संधी मिळते :)

प्रवासाच्या पहिल्या पंधरा – वीस मिनिटात Camel Race Track असा बोर्ड दिसला आणि त्या पाठोपाठ शर्यतीसाठी तयारी करत असलेले उंट आणि अरब!!

गाडीचा हॉर्न वाजला की पळण्याचा वेग वाढवणारे उंट पहाणे हा सर्वस्वी नवा अनूभव होता.

तिथून जरा पुढे गेल्यावर आणि एक आश्चर्य आमची वाट पहात होते. आपल्याकडे शेळ्या- मेंढ्या जसे कुंपणात दिसतात तसे जागोजागी उंट दिसत होते. त्यात जवळपास काळा रंग असलेला एक उंट मात्र पहिल्यांदा पहायला मिळाला.

रस्ता एकीकडे वेगवेगळ्या थरात वाळू असलेला वाळवंटाचा आणि एकीकडे प्रचंड हिरवीगार वनराई राखून ’वाळवंट ’ या शब्दाला छेद देणारा…. अल- ऐन शहर कायम आठवेल ते तिथल्या हिरवळीने नटलेल्या सौंदर्यासाठी. मला माझे नासिक क्षणभर आठवून गेले :)

रस्त्यात आलेला एक राऊंड अबाऊट पाहून zoo आता जवळपास आहे याची खात्री पटली आणि नवऱ्याने चक्क रस्ता चुकवला नाही हे जाणवले :)

आणि मग समोर आले ते प्राणीसंग्रहालय :) …. आता मात्र माझं लिखाणाची फारशी गरज भासणार नाही, कारण फोटोच पुरेसे बोलके आहेत, अर्थात अधून मधून बोलल्याशिवाय मला चैन पडायचे नाहीच हा भाग निराळा ….. :)

Zoo Entrance

हरीण

Chilean Flamingo

Arabian Oryx

Arabian Gazelle

Nubian Ibex

Leptien’s Spiny tailed Lizard

African Wild Dog

आता मात्र तो प्राणी दिसणार होता ज्याला पहाण्याची मला मोठी उत्सूकता होती!!

ह्या पठ्ठ्याने मात्र कोणाचीही दखल न घेता मस्त ताणून दिली होती…. :)

African Lion

प्राणीसंग्रहालयात पिंजऱ्यात बंद प्राण्यांना  भेटायला ’मोकाट’ सुटलेला मनूष्य ’प्राणी’ येऊन गेल्याचा पुरावा झाडावर सापडला :(

वठलेल्या लाकडांची सजावट :)

African Spurred Tortoise

सुसरबाई तुझी पाठ मऊ :)

बिबळ्या महाराजांना काही फोटो काढू द्यायची इच्छा नसावी, ते तरातरा फिरत होते :)

Jaguar !! आणि हो याला नसेल फोटो काढून घ्यायचा , मी हार मानतेय होय, सापडला किनई कॅमेऱ्यात :)

पुढे होते Bengal Tiger !!! यांनी काही कोणाला शेवटपर्यंत दर्शन दिले नाही. :)

कबूतरांचे घरटे बांधणे सुरू…..आम्हालापण Zoo मधे रहायचं पण आमचं आमचं घर बांधून :)

White Rhino

ओळखलं नं मला :)

हा मला Happy New Year म्हणतोय :)

प्राणीसंग्रहालयात वेळोवेळी होणारा थंडगार पाण्याचा आल्हाददायक वर्षाव :)

Hedgehogs या निशाचर प्राण्याला मराठीत काय म्हणतात हे कोडं मी सोडवत असताना ’साळिंद्र’ हे उत्तर तात्काळ देऊन ’इथे टाळी घेतली ती नवऱ्याने’ असं म्हणण्यास मला भाग पाडलं :)

ह्याचं नाव काही माहित नाही!!!

सौंदर्य :)

कोण म्हणतं वाळवंट रखरखीत असतं??? :)

तहान ….

लांडगा आला रे आला :)

Mongoose

रंगीबेरंगी :)

मला विलक्षण आवडलेला फोटो, अर्थात हा अजून स्पष्ट यायला हवा होता!!!

Beauty in Desert :)

या zoo मधे प्राण्यांची घेतली जाणारी काळजी, प्राणीसंग्रहालयातलं प्रसन्न वातावरण निश्चित आवडणारं. एक संपुर्ण दिवस इथे सहज घालवला जाऊ शकतो…. बाजूलाच मुलांना खेळायला असलेली विस्तृत हिरवळ, आणि खेळण्यांची उपलब्धता पहाता वारंवार इथे यावेसे वाटले तर चूक नाही !!!!

Bird Show मधे falcon या UAE च्या राष्ट्रीय पक्ष्याबद्दल अधिक माहिती मिळते. हा शो पहाता आला नाही याची खंत अल ऐन सोडताना आम्हाला वाटत होती!!!

जवळपास पाच तासांची अथक भटकंती आणि अनेक वर्षानी पाहिलेले प्राणीसंग्रहालय….. घरून करून नेलेले पोळी भाजीचे साधेच जेवण पण सगळं कुटूंब एकत्र…. खूप खूप धमाल!!! एकूणात एक अविस्मरणीय सुरूवात एका ’नव्या वर्षाची’ :)

मातीतून सोने उभे करणारे अरब, आणि सोन्याची माती करणारे आपण भारतीय ही अटळ तूलना नेहेमीप्रमाणे मनात येते तशी ती इथेही आलीच!!! :(

तर मंडळी….. आमची तर नव्या वर्षाची सुरूवात मस्त झालीये, तुम्हा सगळ्यांची झाली असेल अशी आशा आहे. :)

येणारे हे नवे वर्ष ब्लॉगच्या सगळ्या वाचकांसाठी आणि त्यांच्या कुटूंबियांसठी सुख , समृद्धी आणि समाधान घेऊन येवो अश्या मनापासून सदिच्छा !!! :)