फुलपाखरू….. (भाग १)

सगळी कामं चटाचट आवरती घेऊन रमा निघाली, दाराला कुलूप लावताना एकीकडे पिल्लूला सुचना देत होती ती… डबा नीट संपव, टिचरचं ऐक…. शाळा सुटली की तिथेच थांब , मी येतेच आहे घ्यायला….पिल्लूला त्याच्या शाळेच्या बसमधे चढवून रमा चटकन सरिता मॅडमच्या घरी पोहोचली.

मॅडम तिची वाटच पहात होत्या…. रमा जरा विसावली क्षणभर. मॅडमनी दोघींसाठी चहा मागवला आणि रमाच्या हातात एक पत्ता दिला.  पुढचे पंधरा दिवस रमाला जायचे होते तिथे. उशीर करून तसेही चालणार नव्हतेच…. पिल्लूची शाळा संपायच्या आत रमाला पुन्हा परतायचे होते.

रोजचे हे हक्काचे तीन तास रमाचे असायचे. या नव्या शहरात सुरूवातीचे काही दिवस रमाला अगदी कठीण गेले… नवी जागा, पिल्लू लहान , ही अडचण नं ती समस्या पण रमा रुळली तिथे… आणि अभयची साथ होतीच तिला. पिल्लू आता शाळेत मस्त एंजॉय करत होते :) … हे रमाचे नव्हे पिल्लूचे मत होते त्यामूळे रमा मात्र सुखावली होती ….. पिल्लूच्या शाळेत एंजॉय करण्याने रमा तिच्या आवडत्या समाजसेवेकडे वळली होती पुन्हा.

सरिता मॅडमची संस्था एक प्रकारे आधारगट चालवत होती, मात्र हे काम जरा वेगळे होते. एकटे रहाणारे वृद्ध किंवा वृद्ध जोडप्यांना काही वेळ देणे आणि तो ही त्यांच्या रहात्या घरातच हे या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट्य होते. तिथे जाउन त्यांच्याशी गप्पा मारणे, त्यांची औषधं आणून देणे, त्यांच्यासाठी पुस्तक वाचणे, त्यांना बॅंकांमधे वगैरे नेणे असली जिकीरीची कामंही त्यात असतं कधी कधी, ही सगळी कामं रमा आणि तिच्या नुकत्याच झालेल्या मैत्रीणी आनंदाने करत.

मॅडमने दिलेला पत्ता वाचताना रमा चमकली क्षणभर…. ’श्रीकृष्ण नगर’ ….ऐकलेले आहे हे नाव तिने याआधि खात्रीने…. कुठे पण?? तसे खूप नाविन्य नाहीये नावात म्हणजे याच गावाचा असेल संदर्भ कश्यावरून…..या शहरात आल्यानंतर खरं तर अधे मधे ते नाव तिच्या मनात डोकवून जायचे…. आज अवचित तेच नाव सामोरे आले अनं रमा गोंधळली.  अर्थात दवडण्यासाठी वेळ होताच कुठे तिच्याकडे… तिने पत्ता पर्स मधे कोंबला आणि गाडी वळवली…. एक अनामिक हुरहूर मनात दाटली तिच्या . आयुष्य रमाला याचसाठी कायम आवडायचे… सकाळी उठताना आपण कामाची यादी करू भलेही पण त्यातली होणार कुठली कुठली हे आपण ठरवूनही भागत नाही :) …आयूष्याचं unpredictable असणं अत्यंत मोहक असतं असं तिला कायम वाटायचं…. गाडीच्या वेगाबरोबर तिचे विचार आज धावत नव्हते तसे, आणि ते धावले असतेही तरी तिने त्यांना रोखून धरले होते……

श्रीकृष्ण नगरच्या पाटीपाशी थांबून तिने पत्ता पुन्हा एकदा वाचला….

पत्त्यातलं घर एक सुरेख बंगली होती…. इथल्या काकुंकडे रमाला यायचं होतं आता, वयाने सत्तरीच्या पुढच्या या काकू खरं तर ऑस्ट्रेलियात त्यांच्या मुलाकडे रहातात. सध्या महिनाभरासाठी एकट्याच भारतात आल्या आहेत ही सरिता मॅडमने दिलेली माहिती रमा आठवत होती. घाईत आपण त्यांचे नाव वाचलेच नाही या विचाराने रमा स्वत:शीच हसली…. यात नवे काय होते म्हणा, हे असे घोळ घालणं रमासाठी कायम होतं…. नावं न विचारणे आणि चुकून विचारलेत तर विचारल्याच्या पुढच्या क्षणी ते विसरण्याचा तिचा हातखंडा होता.

दारावरच्या पाटीवरचं आडनाव पाहून मात्र रमाची खात्री पटली आजचा दिवस काही वेगळा दिसतोय…. तोच भाग आणि तेच नाव, किती वर्षांपुर्वी ऐकलेलं…. कितीही विसराळू म्हटलं तरी काही नावं कोरलेली असतात की काय अश्या विचारातच रमाने दार वाजवलं. तसेही काही आडनावं काही भागात अत्यंत कॉमन असतात , आपण उगा गुंते घालायचे नाहीत असा विचार तिच्या मनात आला…..

या घरात आणि या काकूंकडे आपलं पटेल याची खात्री तिला पहिल्या काही मिनिटातच पटली . स्वच्छ , नीटसपणा आणि साधं पण कल्पकतेने सजवलेलं घरं ही रमाची अत्यंत आवडती बाब, आणि या घरात नेमकं तेच रमाला खूप आवडलं. कामवाल्या बाईकडून घर आवरून घेणं हे एक मोठं काम असतं वगैरे मुद्दे आले आणि तिचं काकूंशी जमून गेलं…. दोन गप्पिष्ट बायका एकत्र आल्या होत्या…

पुढचे तीन चार दिवस भराभर गेले….

त्यांना काय हवेय काय नकोय वगैरे रमा जाणून घेत होती.दोघींच एकमेकींशी ’जमलं’ मनापासून… काही घरात रमाला जमवून घ्यावं लागत असे , इथे अलगद सुर जुळत होते. ’रमा’ तुझं नाव मला कायम आवडायचं … काकू सहज तिला सांगत होत्या. त्यांच्या बालपणीचे किस्से ऐकत, त्यांच्या औषधांची यादी समजावत घड्याळाचा काटा रोज चटाचट पुढे सरकत होता. ” ’चहाचा कप’ आणि गप्पा  ” हे काकूंनी त्यांच्या गप्पांच नाव ठेवलं होतं….

“रमा,  गेल्या कित्येक वर्षात इतकं बोलले नव्हते गं मी, काका होते नं तेव्हा त्यांच्याशी खूप गप्पा व्हायच्या माझ्या , तुझी ती सरिता ओळखते नं मला…. तिला मी म्हटलं होतं तुझ्याकडची बडबडी मुलगी पाठव , तिने लगेच तुझे नाव सुचवले…. मला ’रमा’ नाव आवडतेच आणि, माझ्या फार आठवणी आहेत या नावाशी निगडित….. ” काकूंच्या बोलण्याचा ओघ सुरूच असे.

रमादेखील असं खळखळून किती दिवसानी हसली होती. काकूंच्या बोलण्यात बरेचदा उल्लेख व्हायचा, ’लहान आहेस गं पोरी अजून … ” … रमाला मजा वाटायची तेव्हा. लग्न झाल्यापासून  ती अचानक खूप मोठी झाल्यासारखे वाटवणारे दडपण ती विसरून जायची मग. रमाच्या मनातलं फुलपाखरू मोकळं वाटायचं तिला तेव्हा….

’फुलपाखरू’ … नाजुकसं, सुंदरसं…. रमाने गुपचूप ठेवलेलं होतं त्याला मनात लपवून…. बाहेर काहिही चालू दे , मनात मात्र राज्य त्या फुलपाखराचंच….. :)

रमाला या चहाच्या कपाबरोबरच्या गप्पा खूप आवडल्या होत्या. तिची खूप लहानशी स्वप्न होती नेहेमी,  त्यातलं एक म्हणजे अश्या गप्पा मारणारी सासू… अभयच्या आईला असली स्वप्नाळू कल्पना ऐकवणं जरा अवघडंच होतं.  रमा एका वेगळ्या पातळीवर विचार करणारी आणि अभयची आई एका वेगळ्या… दोघींचे सुर इतर अनेक सासू सुनांसारखे वेगळे असले आणि त्यांच्यात वाद नसले तरी रमाची लहानशी स्वप्न मात्र तिला नेटाने मागे सारावी लागली होती. “सुनेने सुनेसारखेच वागायचे ” हा नियम ऐकून ऐकून रमा नित्य नेमाने गोंधळत जायची….. सुनेकडे फुलपाखरू नसावं बहुतेक , हळुहळू रमाला वाटायला लागलं मग!!! फुलपाखराला बरणीत कोंबलं होतं जणू… मलूल पडलेलं असायचं ते तिथे….. सगळं सुख असलं तरी मोकळ्या हवेत उडणाऱ्या, रंगांची, ताजेपणाची सय व्हायची फुलपाखराला, त्या जिवाची घुसमट व्हायची !!!

” रमा तुझ्या बालपणाबद्दल सांग गं, कुठली आहेस तू?? “  काकूंचा अचानक आलेला प्रश्न होता खरं तर हा !! त्यांच्या आधारगटाचा तसा  अलिखीत नियम होता की जिथे जाल तिथली माहिती विचारायची नाही आणि सहसा आपल्याबद्दल फारसे काही सांगायचे नाही. आज त्या नियमाला मुरड घालून रमाने गप्पा मारल्या….  तिच्या कॉलेजचे नाव काकूंनी परत विचारले, आणि त्या मंदश्या हसल्या. रमा अभयबद्दल, पिल्लूबद्दल भरभरून बोलत राहिली. ती घरी जायला निघाली तेव्हा काकूंनी तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि तिला आशिर्वाद दिला. तिच्या पाठीवर त्यांची बोटं हळूवार फिरली…. त्यांच्या मायेनं भारलेल्या अनपेक्षित कृतीने रमा सुखावली. आज काकू बोलल्या नाहीत फारश्या, उलट मन लावून आपलं बोलणं ऐकत होत्या असं वाटलं तिला.

पंधरा दिवस चटकन संपले … काकूंचा निरोप घेणं रमाला जड गेलं. शेवटच्या दिवशी काकूंनी आग्रह केला म्हणून अभय आणि पिल्लूही त्यांना भेटायला आले. तिघांनी वाकून काकूंना नमस्कार केला. किती बोललं गेलं असलं तरी गप्पा कितीतरी मारायच्या राहिल्याच होत्या, काकूंबद्दल अजून किती जाणून घ्यायचे होते, त्या गप्पा पुढच्या भेटीत असे दोघींनी ठरवले :)

पुढच्या दिवशी काकूंचा मुलगा, सुन आणि नात येणार होते. ते सगळेच परत त्यांच्या मुक्कामी परतणार होते.

रमाला आता एखाद दोन दिवस सुट्टी आणि मग पुढच्या काकू किंवा काका-काकूंकडे जायचे होते. :)

……………………

 

फुलपाखरू भाग २ इथे आहे !!

10 Responses to फुलपाखरू….. (भाग १)

    • क्रमश: ला साथीदारीण नाही रे, म्हणजे नको रे :) …. आपणच लिहीलेले आपल्यालाच वाचावे लागते आधि ;)

      पुढचा भाग टाकते हं ;)

  1. लेख नेहमीपेक्षा अगदी वेगळ्या धाटणीचा आहे. पण नेहमीप्रमाणेच अतिशय अप्रतिम मांडणी आहे. खरच अगदी खिळवून ठेवले होते आणि शेवटी क्रमशः आहे ह्याचा विसरच पडला होता. :)
    पुढची पोस्त लवकर टाका ….. नेहमीप्रमाणे लेखाच्या प्रतीक्षेत :)

  2. सकाळी उठताना आपण कामाची यादी करू भलेही पण त्यातली होणार कुठली कुठली हे आपण ठरवूनही भागत नाही …आयूष्याचं unpredictable असणं अत्यंत मोहक असतं असं तिला कायम वाटायचं….

    अगदी पटले आणि आवडलेही ………… तन्वी अशीच लिहित राहा..

  3. मस्त …. क्रमशः हा लेखकाचा हक्कच असतो …. लिंक तुटल्या सारखी वाटते पण गोष्टी बद्दल एक कुतूहल पण जागृत राहतं. आता उद्या परत भेट द्यावीच लागेल ना….

    • प्रतिक्रीयेसाठी आभार आणि ब्लॉगवर स्वागत :)
      दुसरा भाग टाकलाय खरं तर कालच, पण वर्डप्रेसने काहिसा घोळ केलाय…. दिसताना पहिला भागच आधि दिसतोय , आणि त्यामूळे माझ्यासहित सगळ्यांचा गोंधळ उडालेला दिसतोय :)

  4. या मुव्हिंगच्या गोंधळात सुटलेले आज वाचतेय सगळे…. त्यामुळे कथेचा दुसरा भागही लगेच वाचायला मिळाला हा फायदा! सुरवात छान झालीये…. आता लगेच पुढल्या पानावर पोचते.. :)

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s