आईने मुलीच्या, ” गोष्ट सांग ना ” या हट्टासाठी सांगितलेली एक गोष्ट… नेहेमीची गोष्ट नको , नवी सांग या जोडहट्टासाठी आईने स्वत:च बालपण शोधलं आणि त्यातली जी गोष्ट पटकन आठवली ती सुरू केली सांगायला ……
दोन मित्र असतात. एका जंगलातून ते जात असतात…. जाता जाता त्यांना उशीर होतो. गप्पागोष्टी करत मित्र पुढे जाताहेत….. अचानक त्यांना एका अस्वलाचा आवाज येतो….. पहिला मित्र चटकन झाडावर चढतो, दुसऱ्या मित्राला काही झाडावर चढता येत नाही….. तो पहिल्या मित्राकडे आशेने पहातो पण पहिला मित्र काही त्याच्या मदतीला धावून येत नाही…. तो स्वत:चा जीव वाचवत झाडावर थांबतो.
दुसऱ्या मित्राची होते आता पंचाईत…. जीव तर वाचवायला हवं, अस्वल जवळ जवळ येत आहे….. तितक्यात त्याला सुचते एक युक्ती…. तो चटकन जमिनीवर आडवा होतो, श्वास रोखून धरतो…. अस्वल जवळ येतं त्याच्या… त्याच्या भोवती गोल फिरतं….. अस्वलाला वाटतं हा माणूस काही जिवंत नाही…. मग अस्वल थोडं घूटमळून तिथून निघून जातं……
दुसरा मित्र खुश होतो कारण त्याचा जीव वाचतो… त्याची युक्ती छान असते अगदी!!!
उगा आईच्या मनात एक विचार डोकावतो आपण एक झाड आणि समोर कोवळं कोवळं एक रोप
आई इथे थांबते जरा ….. पुढची गोष्ट सांगायचीच असते आईला की मग पहिला मित्र दुसऱ्याला विचारतो की ’अस्वलाने तुझ्या कानात काय सांगितले ? ’
तितक्यात समोरची पाच वर्षाची लेक विचारते , “मम्मा गोष्ट छान आहे ही, पण या स्टोरीचं moral काय ? “
शाळेतली शिक्षीकेने सांगितलेली गोष्ट संपली की ’Moral of the story ” ऐकायची सवय लागलेली लेक या गोष्टीचा ’बोध’ शोधू लागते.
आई आपलं जुनं ऐकलेलं आणि त्यावर स्वत:चा विचार करता येइल का याचा विचारही न केलेलं moral सांगते, की जाता जाता किनई त्या अस्वलाने दुसऱ्या मित्राच्या कानात सांगितले की संकटात आपली मदत न करणाऱ्यांशी मैत्री करू नये.
गप्प बसावं नं इथे आईने पण तसं होत नाही, आईने पहिल्यांदा ही गोष्ट ऐकली त्याला मोठा काळ लोटलेला असतो , आयुष्यात मैत्रीचे अनेक भले बुरे अनूभव गाठीशी बांधलेली आई मनात उगाच सकारात्मक-नकारात्मक तुलना करते.
भले अनूभव असले तरी बुरेच आठवून ठेवण्याची मोठ्या माणसांची त्रासदायक खोड आईलाही असते. आई मग पुन्हा बोलते, नाहीच करू स्वार्थ्यांशी मैत्री, मैत्रीच्या व्याख्येत न बसणारे दुरच ठेवावे…. आईने संकटात मदत केलेली असते, किंवा संकटात मदत घेतलेली असते…. पहिल्या प्रकारात लोकं जाणिव ठेवत नाहीत हा त्रास तर दुसऱ्या प्रकारात लोकं मदत तर करतात पण नंतर त्रास देतात असा काहिसा अनूभव ….. उगा मनस्ताप देतात लोक…वगैरे वगैरे!!
.
.
.
समोर जीवन नुकतचं उमजून जगायला लागलेलं छोटसं रोपटं हलके हलके डोलतं . खुदकन हसतं आणि म्हणतं, ’नो मम्मा असं नको करूया आपण मॉरल
“
समोरून ठसक्यात मग वाक्य येतं …..
“आपण असं करूया की जेव्हा आपण आपल्या फ्रेंड सोबत असतो आणि त्या फ्रेंडला झाडावर चढता येत नाही तेव्हा आपण आधि त्याला झाडावर चढायला हेल्प करायची आणि मगच आपण चढायचं… आपल्याला येतच असतं नं चढायला मग आपण पटकन चढू शकू !!! “
रोपट्याला हेच moral आवडलय असं रोपटं जाहीर करतं !!!
जुन्या मॉरलपेक्षा नवं खूप सकारात्मक असतं….. असणारच , जुनी गोष्ट सांगणारा / री नक्कीच कोणितरी मोठी व्यक्ती असणार नं , आईसारखी वयाने मोठी झालेली जराशी …. टक्के टोणपे पचवलेली …. आयूष्याच्या स्वच्छ सुंदर आरसपानी पाण्यात काही गढूळ ओघळ नाईलाजाने सहन करणारी !!!
आईला क्षणभर गंमत वाटते…. आपण लहानपणी समोर दिलेलं मॉरल न स्विकारता स्वत: शोधलं असतं तर असेच शोधले असते का हा नवा गुंता येतो मनात
खरेखूरे जंगल लोप पावले ,त्याजागी आलेल्या सिमेंटच्या जंगलातही असतीलच नं चढता न येणारी माणसं !!! कधी आपण पहिला मित्र असणार कधी दुसरा, हे होतच रहाणार……
मॉरल बदललेलं पिल्लू लागतं नव्या कामांना …. सळसळता उत्साह एक आईच्या अवतीभोवती बागडत असतो. मोठ्या झाडावर हलके हलके डोलणारी वेल जशी एक… उंच झेपावू पहाणारी, सदैव वर नजर असणारी ……
तिच्या अस्तित्वातली उर्जा जून्या झाडाला देऊ करणारी!!! एक हलकसं हसू नकळत आणि अगदी सहज देणारी उर्जा !!
जीवन खूप सुंदर असावं , त्यात कुठलंही संकट येत नसावं ….. मैत्रीचा धरलेला हात घट्ट असावा, आलच समजा अस्वल तर आपला मित्र आपली किंवा आपण मित्राची मदत करावी असं सहज सोपं तत्त्वज्ञान असणारी……
आईला एक ’बोध’ देणारी आईची लेक उद्या नवी कुठली गोष्ट असणार या विचारात मग्न होते एकीकडे ……
आईचं मन मोठं खोडसाळ….. तिच्या समोरचं निरागस आयूष्य मोठं होत असच आपल्यासारखं नकळत नकाराकडे झुकेल की काय अशी शंका आईच्या मनात ?? जंगल तर आहेच की अवतीभोवती ….. जंगलातल्या प्राण्यांचे गूण असलेली माणसाचा मुखवटा घातलेली वृत्ती आलीच ओघाने…. कसा जपावा हा अखंड उर्जेचा स्त्रोत ??? आई प्रश्नांची मालिका स्वत:च गुंफते आणि स्वत:च तिच्यात गुरफटते….
जीवनाने नवा मार्ग स्विकारलेला असतो… ते वाढणारंच असतं…. हिरवी हिरवी नवी पानं जुन्या वठलेल्या झाडालाही आणण्याची ताकद ऋतूत असतेच…. आपणही तर आयूष्यात चांगूलपणावर विश्वास ठेवतोच…. आईच मनं अजून अजून विचारात
पिल्लू कुठूनतरी सहज झेपावतं आईकडे …. आईला मग ते आरश्यासमोर नेतं … काहिबाही बडबडतं, आईचीच नक्कल करतं , ठामपणे पुन्हा एक दावा करतं , ” मी मोठी होऊन फक्त माझ्या आईसारखीच होणार ”
त्या कोवळ्या मिठीतली ताकद सगळे विचार थोपवतात ….. आपलं पिल्लू नवा विचार करू शकतय, हे नवं रोपटं रूजू पहातय या विचाराने आई सुखावते .
खतं-पाण्याची जबाबदारी टाळून चालणार नाही , ऊनवाऱ्याची सवय व्हायलाच हवी… वाढ पुर्ण झालीच पाहिजे…. आई पिल्लाकडे पहाते आणि स्वत:लाच बजावते.
आईमधल्या क्षणिक नकाराचाही पार पार निचरा होतो….
आयूष्य नकारासाठी नसतेच मुळी आणि याचा विसर पडू न देण्यासाठीच समोर आपल्या पिल्लांच्या रूपातलं सृजन साकार होत असतं, असा नवा ’बोध’ … अहं अहं बोध नव्हे ’Moral’ आईला मिळतं
आई आज पिल्लाच्या कुशीत विसावते ….. झाडावर चढणं विसरलेल्या आईला पिल्लाने आज मदत केलेली असते
उद्या कोणती ’नवी’ गोष्ट आणि नवं Moral या विचारात मग त्या दोघीही रमतात ……………………….