गट्टी ..

ताप आला होता मधे दोन दिवस. हे म्हणजे ’दुष्काळात तेराव्या महिन्या’सारखे झाले होते. कधी नाही ते देवाला जरा रागे भरावे वाटले, की बाबारे आधि जे काय दुखवून ठेवलेस त्याबद्दल नाहीये नं माझी तक्रार, अभी और नही मंगताहे भाई… पुरे कर की आता वगैरे!!!

सतत काहितरी शोधावे वाटत होते, काय ते ही समजेना. विचार केल्यावर लक्षात आलं काहितरी वाचायला हवय आपल्याला… त्यासाठीची ही शोधाशोध आहे.  वाचायचे काय , समोर पाउलो कोएलो होता खरा पण ते काही वाचावे वाटेना. अचानक आठवलं आपण भारतातून बरीच पुस्तकं पाठवली होती खरी, ती गेली कुठे ? जरा चौकशी केली ’अहोंकडे’ आणि सापडली ती पुस्तकं. अहोंना म्हटलं सरळ की आधिच का नाही दिली मला माझी पुस्तकं,  गेले सहा महिने मी अगदी घराबाहेरही पडत नाहीये. काहीच करता येत नाहीये, साध्या साध्या हालचालींवरही अनंत बंधनं आहेत… तरिही मला ’बोअर’ होतय , मी दमलेय असा उच्चार नाही करावासा वाटत . मला वाचत असलं की बरं वाटतं , त्याने वेदना संपतात असे नसले तरी!!!

त्या पुस्तकांमधून दुर्गाबाई भागवतांच ’पैस’ घेतलं हातात. खरं सांगू तर मी दुर्गाबाई भागवत अजून वाचलेल्या नाहीत, का? माहित नाही… एक आदरयुक्त दरारा वाटत आलाय कायम त्यांच्या व्यक्तीमत्त्वाबद्दल. हे त्यांचं आणलेलं पहिलं पुस्तकं. ते निवडण्याची प्रक्रियाही अगदी वेगळी, हॅंडमेड पेपरचं कव्हर पाहिलं, त्याचा स्पर्श हाताला जाणवला आणि मग पुस्तक पुन्हा ठेवलंच नाही. अजिबात न चाळता घेतलेलं बहुधा हे पहिलं पुस्तक!!

दुर्गाबाईंच लिखाण वाचलेलं नसलं तरी अनोळखी नव्हतंच…. आपल्या गोंधळलेल्या अवस्थेत शरण जाण्याच्या हक्काच्या जागांमधे जशी अमृता प्रीतम वाटते तश्याच दुर्गाबाई आहेत हे स्पष्टच होते , पण त्यांच्याशी गट्टी जमायची राहिलेली होती .

’स्वच्छंद’ हा पहिलाच लेख वाचायला सुरूवात केली . अपेक्षेप्रमाणे पहिल्याच वाक्याने पकड घेतली. वाचायला लागले आणि वाचतच गेले. असं खूप कमी वेळा होतं नाही, की वाचताना आपलं असं वेगळं अस्तित्व जाणवेनासं होतं. आपली संवेदना ही फक्त त्या शब्दांभोवतीच गुंफली जाते. ते शब्द, ती अक्षरं इतकीच जाणिव उरते…

वाचता वाचता एका ठिकाणी तर थबकलेच मी ….

दुर्गाबाईंनी लिहीलं होतं ….

” मी अंथरूणाला खिळलेली असताना जीव उबगला होता. तास, दिवस, महिने, ऋतू व वर्षे त्यात त्या निरानंद तऱ्हेने फार मंदमंद अशी उलटत होती. प्रत्येक दिवस आपले पाऊल माझ्यावर रोवून मगच नाहिसा होत होता, आणि आपल्यासारख्याच जड निष्ठुर दुसऱ्या दिवसाला, ” तुही ये ” म्हणून साद घालित होता. कंटाळा क्षणाक्षणातून ठिबकत होता . जीवनाधार दिवसेंदिवस क्षीण होत होता.”

अगदी अगदी ओळखीचे वाटले हे…. नेमके आणि थेट , हेच तर म्हणायचेय नं मला…. प्रत्येक दिवस त्याचं ’घेणं’ असल्यासारखी दुखण्याची वसूली केल्याशिवाय काही उलटत नाही.  :( ….. जोडली गेले मी अक्षरश: इथे त्या वाक्यांशी ….

” पण याही दिवसांना भेदून त्यांच्या वाकोल्या बंद पाडणारी फाल्गुनाची अखेरच्या वाऱ्याची एक झुळूक दक्षिणेकडून एक दिवस आली. मला ती चक्क भासली. संस्कृतातल्या दक्षिणानिलाला मी हसत असे. पण उन्हाळ्याच्या तप्त वातावरणात , पान नी पान स्तब्ध उभे असताना, ही मंदशीतळ झुळूक आली आणि ती सरळ माझ्या अधरात शिरली. केवळ भावनावेगानेच स्पंदन पावणारा अधर आता आपोआपच फुलल्यासारखा भरला ; त्यात जोराने रक्त वाहू लागले. काही क्षणांचाच हा अनूभव; पण सुख सुख म्हणजे काय असे मला कोणी विचारले तर वाऱ्याची झुळूक हळूवारपणे अधराला अनाहूत स्पर्श करते नि त्यात खेळते ते खरे सुख असे मी सांगेन. “

ओळख पटतं होती इथे या वाक्यांशी. खरच येते अशी एक मंद झुळूक की त्यानंतर सुख वेगळं शोधावं लागत नाही. माझ्याच मागच्या पोस्टची आठवण झाली मला…

पण हे सगळं इतक्यावर थांबत नव्हतं, माझ्यासाठीची खरी गंमत तर पुढे होती …..

दुर्गाबाई सांगत होत्या,

 ” तेव्हापासून मला आकाश बदललेले दिसले. वसंत येत होता. आता मला बिछान्यावरूनच खूप दुर न्याहाळता येऊ लागले. जग मला आता दूर लोटीत नव्हते; ते मला आपल्या विशाल मिठीत फार हळुवारपणे सामावून घेत होते. आता घर, आंगण, दिसेल ते झाड, पान , पाखरे, उन , पाऊस, वारे, धूळ, किडे, सारे काही मला रिझवणारे वाटू लागले. मी रोज सृष्टीचा अभ्यास करू लागले. आता कितीतरी चमत्कार आमच्या अंगणातच घडू लागले. मी बरी होऊ लागले. कुठलेही बरेवाईट दृष्य मौजेने न्याहाळू लागले. पैसे व शक्ती खर्च केल्याशिवाय मी रिझत होते, शिकत होते. “

या वाक्यावाक्यासरशी अंगावर शहारा येत होता.

अगदी हीच मोजकी वाक्यं माझ्या गेल्या संपुर्ण पोस्टचा , त्यामागे माझ्या असलेल्या विचाराचा आशय अलगद नेमकेपणानं समजावताहेत , सगळा सगळा सार उलगडताहेत . अचानक ’गट्टी’ जमली माझी दुर्गाबाईंशी. आजीने मायेनं डॊक्यावरून हात फिरवून सांगावे की बाळा काही चुकत नाहीये तुझे , जसा विचार करतेय आयूष्याचा तो बरोबर जमतोय. आपला प्रवास योग्य दिशेने नेण्यासाठी जसा हात धरलाय मोठ्यांनी…. आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून वाटचाल होतेय आपली….

मग ओरडले , ’आईशप्पथ , दुर्गाबाई u too!! ’ …. जरा भानात येत पुन्हा म्हणाले ,” बावळट आहेस तन्वे… अगं त्यांना कुठली u too विचारते आहेस …. त्या आहेतच. असणारच… आश्चर्य हे आहे की तन्वे u too!!!!! ” … आजारपणाचा असा विचार त्यांनी करणं यात नवल नव्हतेच, पण आकाशायेव्हढ्या त्या व्यक्तीमत्त्वाकडे अत्यंत आदराने पहाणाऱ्या कोणा एका माझ्यासारख्या ’किंचित” व्यक्तीनेही तोच तसाच विचार केला !! निदान एका विचारापुरतंच असलेलं ते साम्य किती बळ देतय आता मला….

आता मात्र दुर्गाबाई तुमच्याशी गट्टी पक्कीच पक्की .

मला आता एकूणातच डरनेका नही- डगमगनेका तर नहीच नही….. गट्टी करत हात कोणाचा धरलाय शेवटी ??  :)

About these ads

23 thoughts on “गट्टी ..

  • आहे किनई मी भोळी भाबडी ;) :) :) , काळजी घेतेय रे ….
   सुहास अरे आनंदाला दिलेलं उत्तर बघ….

   खरं तर पोस्ट टाकली कारण श्री.हेरंबरावांचा न्याय, ’पोस्टा टाकून माजावे , डिलीटून नाही’ :)

  • गंमत सांगू सचिन माझ्या मागच्या पोस्टला आधि मी ’काखेत कळसा’ हेच नाव दिले होते :)

   >>>स्वत:ला समजतय पण कुणीतरी जरा धक्का द्यायची गरज असते आणि आज्जी नेहमीच असते यासाठी …. बर्रोब्बर!! :)

  • अगदीच मोजायचं आजारपण तर सात महिने सलग चाललय :) … अगं पण वाचनाला बरीच सवड मिळतेय, हा त्यातल्या त्यात मोठा फायदा :)

   >>लवकर बरी हो बघू तू आता! :) :) .. आज्ञा शिरसावंद्य :)

 1. >> एक आदरयुक्त दरारा वाटत आलाय कायम त्यांच्या व्यक्तीमत्त्वाबद्दल.

  अगदी अगदी अगदी.. या दरार्‍यामुळे म्हण किंवा आपल्याला कळणार नाही/आवडणार नाही या भीतीने मी काहीच वाचलं नाहीये त्यांचं :(

  • अरे वाच नक्की हेरंबा….

   म्हणजे गंमत काय होते सांगू, दुर्गाबाई अश्या मस्त गट्टी करतात ….. आणि त्या समजल्या की न्युनगंड कमी होतो , उगाच आपण मोठे किंवा समंजस वगैरे झालोय की काय अशी सुखद भावना निर्माण होते :) ;)

 2. ताई, खरं सांगू, मी पण अजून दुर्गाबाई तितक्याशा वाचलेल्या नाहीत… का माहित नाही, पण त्यांचं लिखाण झेपेल एवढी मॅच्युरिटी आपल्याला नाहीच अशी पक्की खात्री आहे अजून… त्यात मी किती बावळट आहे बघ, मी पहिलंच आणलं ते प्रतिभा रानडेंचं ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी… अक्षरशः बाऊन्सर गेलं मला… मग तर खात्रीच झाली माझी की थोडं थांबायला हवं मी… तुझी पोस्ट नेहमीसारखीच खूप गोड… काळजी घे… (मी किती दिवसांनी तुझ्या ब्लॉगवर कमेंट करतीये… :( मलाच खटकतंय… )

  • >>>का माहित नाही, पण त्यांचं लिखाण झेपेल एवढी मॅच्युरिटी आपल्याला नाहीच अशी पक्की खात्री आहे अजून… … या विचाराची किती जणं सापडताहेत बघ :) … जरा जरा वेळाने वाचून बघ (माझ्यासारखीच लबाडी म्हणजे ;) ) अचानक झेपलं लिहीलेलं त्यांनी की खुश व्हायचं. आली आपल्याला समज असं समजायचं :)

   >>(मी किती दिवसांनी तुझ्या ब्लॉगवर कमेंट करतीये… :( मलाच खटकतंय… ) … या वाक्याबद्द्लचे फटके माझ्याकडे पेंडिंग ठेवते, तू भेटलीस की व्याजासहित देते :) .. वेडाबाई आहेस खरी!!!

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s