मायलेकं :)

“आई झोपलीयेस का ? “

“काय गं ? झोपले नाहीये … पडलेय थोडा वेळ ….. “

“मी पण पडू का इथे माझ्या बाळाला घेऊन ?? “

” हो… ये.. फक्त बडबड करू नकोस…. झोपू दे त्या बाळालाही…”

” बघता बघता तीन महिन्यांच झालं बघ आई माझं बाळं “

” हं  … झोपा आता …”

“हो हो !! अगं झोप येतेच आहे बाळाला पण झोपायचं म्हणून नाही त्याला… झोपायचं हं पिल्लू आता ’आजीशेजारी’ :)  “

(तुझ्यावरच गेलय तुझं बाळ हे अगदी ओठांवर आलेलं वाक्य आईने गिळून टाकलं !! )

” आई अगं याचं स्किन बघ कसं गुलाबी गुलाबी दिसतय !! “

” त्याचं स्किन गुलाबी दिसलं तर दिसू दे आणि आम्हाला तू जरा वेळ झोपू दे !! “

“अगं दिसू काय दे ??? बघ की जरा उठून … “

“अगं लहान मुलांच स्किन गुलाबीच असतं … “

“माझं पण होतं का लहानपणी गुलाबी स्किन ?? “

” हो होतं “

“बघ माझं बाळ माझ्यासारखंच आहे :)

…………

…………

(शेजारी अगदी शांतता पाहून आईला वाटलं झोपलं की काय बाळ ?? … पहाते तर तिची मुलगी आणि बाळ गायब !!)

“अगं कुठे गेलीयेस त्या बाळाला घेऊन ?? “

“कुठे नाही बाळाला टॉयलेटमधे आणलं होतं …”

“टॉयलेट ??? तुझा आवाज बेडरूममधून येतोय … “

“अगं हो बाळं आहे टॉयलेटमधे, मी बेडरूममधेच आहे “

( तीन महिन्यांच बाळ टॉयलेटमधे ??? एकटं ??? आईला प्रश्नच पडला तसा …. पण आईने ठरवले होते की या मायलेकरांमधे आपण पडायचे नाही… घालू दे काय गोंधळ घालायचा ते !! )

(एकदाचं ते टॉयलेटमधलं बाळ आणि त्याची आई परत आली… आता यांचे कपडे बदलणं , पावडर लावणे, सोबत झालेच तर अखंड बडबड करणे वगैरे सव्यापसव्य चालेल या विचाराने त्या बाळाच्या आईच्या आईने अगदी डोळे मिटले…. मनात विचार केला हे ’प्रकरण काही थोडक्यात आटोपणारं नाही, नको आता यांची लामण पहायला !!’ … तसंही या गदारोळात डोळ्याला डोळा लागणं मुश्किलही नही नामूमकिन आहे !! )

“आई ssssssss  गं  !!!”

“कायेsssss   गं ???? “

“अगं ओरडतीयेस कशाला ?? तूला नाही हाक मारली “

“म्हणजे इथे तुझी दुसरी कोण आई आहे मग.. तूच बेंबीच्या देठापासून ओरडलीस नं आईssss गं म्हणून ?? “

” अगं ते ’हाक’ मारायचं आईssss गं नव्हतं…. ते आपल्याला ’दुख’ झालं की ओरडतो नं आपण ते वालं होतं “

(बाळाच्या आईच्या भाषेतला बदल पहाता ती तिच्या खऱ्या वयात म्हणजे वर्षे पाचच्या भाषेकडे झुकायला लागली होती :) )

” हे वालं नं ते वालं …. दुख नाही आणि दु:ख असतं ते !! सॅड वाटलय का तूला, तसं सांगत जा गं बाई …. काय झालं आणि सॅड वाटायला ??? “

“अगं बाळाचं स्किन बघ !!! “

“सांगितलं नं एकदा असू दे ते स्किन गुलाबी म्हणून “

“अगं ते नाही …. बाळाचं स्किन बघ पुर्ण फाटलय पाठीकडे :(

“स्किन फाट्लं ????? फाटलं का एकदाचं …. बघू …. “

(खरच की गुलाबी टेडी बेअर बाळाच्या पाठीला चांगलीच चीर गेली होती .)

“आई स्किन फाटून आतून कापूस बाहेर आलाय बघ “

“हं दिसला… “

“आता काय करायचं गं ’मम्मा’ ??? “

(चिमुकली आई प्रचंड केविलवाणी झाली होती !! )

“आता काही नाही… सुई दोरा घ्यायचा आणि शिवायचं ते बाळं “

” हा सगळा कसूर दादाचा आहे, त्याला कितीदा सांगितलेय की टॉयबॉक्समधे माझ्या बाळांच्या अंगावर त्या रिमोटच्या कार टाकत जाऊ नकोस… त्यांचे ऍंटीना माझ्या बाळांना ’फाडतात’ “

(छोट्या आईच्या तक्रारीत तथ्य होतं … ;) )

“मी सांगते हं दादाला…”

“तू कशाला मीच बघते बेत त्याचा , बाळ माझं फाटलय “

(छोट्या आईच्या डोळ्यात टपोरे थेंब आणि त्या थेंबांआड निग्रह होता …. बरोबरच आहे लेकरांवर बेतलं की आई रणरागिणीचा अवतार घेणारच … )

” कुठेय तो दादा ??? “

” हॉलमधे गेलाय… व्हिडिओ गेम खेळणार म्हटला होता थोडा वेळ “

“ए दादाsssss ….. गेम खेळतोयेस तू ??? “

(दादाचं काही खरं नाही आता !! )

“दादा sssss … मला का नाही बोलावलंस रे.. जा कट्टी !! “

(व्हिडिओ गेमने सध्या बाळाच्या काळजीवर मात केलेली होती ….. :) हातातलं गुलाबी स्किनचं बाळ त्या आईने स्वत:च्या आईकडे हवेतून भिरकावलं आणि ओरडली …)

“मम्मा कॅच ..  तू सांभाळ आता बाळाला थोडा वेळ “

:) :)

(बाळाला असं उडायला शिकवून चिमणी आई स्वत:ही उडाली होती !!  )

खऱ्या आईला खुदकन हसू आलं…. मगाचा आजीचा ’रोल’ बदलून आता आईला ’टेलरचा’ रोल मिळाला होता !!

तीने झोपेला राम राम ठोकला आणि सुई दोरा हातात घेतला…. त्या बाळाच्या फाटलेल्या स्किनला शिवायला सुई टोचली खरी पण कुठल्याही बाळाला अश्या वेदना झाल्या की आईला होणारा त्रास झाल्याशिवाय राहिला नाही !! ती सुई बाळाबरोबरच आईच्या मनाला टोचून गेली….

आईच्या लेकीने त्या टेडीरूपी बाळात प्राणप्रतिष्ठा केलेली होती !!

आईने ते बाळं हळूवार शिवून टाकलं… उगाचच आणि नकळत त्याला जोजावलं !!

ते ’टेडीरूपी’ बाळ कायम रहाणार नव्हतं… हा प्रसंग आईची मुलगी विसरणार होती तरिही आपण काय धरू पहातोय हे आईला समजत नव्हतं …. एक एक धागा, एक एक शिवण प्रेमाची विश्वासाची असावी का ?? की मुलांबाबत काहिही उसवलं तरी ,बिनसलं तरी ते जोडण्याचं सामर्थ्य आई पडताळून पहात होती … असेल काहितरी किंवा काहीच नसेलही , आईला सवय आहे असं विचार करत बसण्याची  !!

कदाचित आयूष्याच्या गांभीर्यावरचा हा पिल्लूसा ’उतारा’ आपल्याकडे आहे, असे वेगवेगळे रोल आपण करू शकतो की नाही याबाबत जग साशंक असलं तरी ते आपल्याइतके चांगले कोणीही करू शकत नाही असा विश्वास बाळगणारी मुलं आपल्याभोवती आहेत हे सोप्पंसं सत्य लक्षात ठेवावं आणि आनंदी व्हावं इतकंच !! :)

अनायसे आज ’World Daughters Day’ आहे आणि माझ्याकडे अशी एक चिमूकली आई आहे म्हणून ’मोठी आई’ खुश आहे !! :)

चिमण्या आईच्या चोचीतल्या गोष्टी विसरू नये म्हणुन ही एक पोस्ट !! :)

ता.क. समस्त आई-बाबांना आणि त्यांच्या चिमण्यांनाही अनेक अनेक शुभेच्छा!! :)

(याविषयी आधि लिहीलेली पोस्ट ’लेकीच्या माहेरासाठी’ इथे आहे .)

About these ads

19 thoughts on “मायलेकं :)

  1. सुंदर !! शब्दच नाहीत..

    रच्याक, सुरुवातीच्या दोन-तीन ओळीत मला सिनियर आई आणि ज्यु. आईचा संवाद वाटला :)) नंतर कळलं कि ज्यु आई आणि ज्यु ज्यु आई ही प्रमुख पात्रं आहेत :)

    • ज्यु ज्यु आई अफाट आहे रे बाबा… अ-फा-ट आईची फाटणारी बाळं :) … आमच्याकडे गुलाबी, पिवळी, चट्टेरीपट्टेरी ,वाघोबा, माकडं अशी अनेक प्रकारची बाळ्ं आहेत :)

      तूला सांगते ते तीन महिन्यांच बाळ टॉयलेटमधे ऐकून हसू की रडु समजेना मला :)

  2. >>ता.क. समस्त आयांना आणि त्यांच्या चिमण्यांनाही अनेक अनेक शुभेच्छा!! :)
    फक्त आयांनाच? बापांनी काय घोडं मारलंय? बाप पण तितकाच जवळचा असतो मुली साठी. आई कडे लाड आणि बापा बरोबर मस्ती. मुलाला मारण्यासाठी बापाचा हात पुढे मागे पहात नाही पण तोच हात मुलीच्या पाठीवर मायेने फिरत असतो. जितके अश्रू तिच्या डोळ्यात उभे राहतात त्या पेक्षा त्याची झळ बापाला अधिक असते. मुलगी सासरी गेल्यावर फोन वरून “कशी आहेस? सुखी आहेस ना?” हा दाटलेला स्वर फक्त एक बाप आणि मुलगीच जाणू शकते. कधी बघितलंय लग्न झाल्यावर बापाने मुलाला विचारलय “काय रे सुखी आहेस ना?”
    असो, लेख नेहेमी प्रमाणे मस्त. असाच एक गमतीदार अनुभव इथे वाचा: http://anuvina.wordpress.com/2012/04/13/%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0-%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0/

    • सविताताई अगं ज्यु ज्यु आईची बडबड अखंड सुरू असते , बरेचदा तर त्यातल्या कितीतरी गो्ष्टी लक्षात ठेवायच्या असं ठरवून मी विसरून जाते…. हे असे काही प्रसंग तेव्हाच्या तेव्हा लिहून ठेवले की हाती लागतात :)

      नक्की लिहीन पण अजून….

  3. खूप मस्त लिहिलंय :)
    माझी बहिण लहान असताना हे असच असायचं आमच्याही घरात.
    फक्त तीच बाळ cadbury दिली नाही म्हणून रडायचं ;)
    मग “आजोबा” cadbury आणून द्यायचे
    आणि त्यानंतर “आई”च्या लक्षात यायचं कि बाळाला दातच नाहीयेत. मग ते cadbury कस खाणार? म्हणून मग तीच cadbury खाऊन टाकायची :द
    अचानक जुन्या गोष्टी आठवल्या.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s