डायरीची काही पानं…..

भारतातून सुट्टी संपवून येइन नं मी , मग सामान घेइन हळूहळू आवरायला. इथून नेलेल्या वस्तू जागच्या जागी ठेवायच्या आणि तिथून आणलेल्या वस्तूंसाठी नवी जागा करायची. दरवेळेचा त्रागा एकीकडे मनात , किती सामान आणतो आपण उगाच…. हल्ली सगळं सगळीकडे मिळतं….

सगळं सामान लावताना सोबत आणलेला एक बॉक्स दिसेल बघ मला…. नीट बंद केलेला…. तो दिसेल आणि मला एक मज्जा आठवेल… मी लगेच ठरवेन की तूला फोन करेन तेव्हा न विसरता सांगायची ती मज्जा, अगं झालं काय आम्हाला नं सामान चेक करताना विचारलं की काय आहे या बॉक्समधे…. मी म्हटलं की ’पापड’ आहेत….. पण बॉक्स असा नेता येणार नाही म्हणाली ती विमानतळावरची बाई… मी करवादलेच, कित्ती सांगाव या आईला नको देऊस पापडलापड पण ऐकतच नाही ….. तिथे नं एक कुलकर्णी आडनावाचे मॅनेजर होते, ते म्हणाले चालतो असा बॉक्स, आणि गेलं एकदाचं सामान आत :) …. विमानात चढताना कुलकर्णी होते तिथेच, मला म्हणाले गं सरळ की अहो तुमची काय आमची काय आया सगळ्या सारख्याच…. :)

तो बॉक्स उघडेन मी आणि कानात तूझा आवाज येइल ,” ताई इथल्या पावसात सर्दावले असतील गं पापड, उन्हात टाक ते ” …. एक एक पापड मी स्वतंत्र मांडते , मनात विचार येतो एकाच हाताने घडवलेले आणि वेगळं अस्तित्व असलेले पापड …. अलवार हात फिरतो माझा, तूझा हात लागलेला असतो नं त्या पापडांना …..

माहेरपण संपलं याची वारंवार जाणिव होते सारखी आणि मी स्वयंपाकघर गाठते ….. तिखट-मसाल्याचा डबा उघडते आणि पुन्हा कानात शब्द येतात , ” ताई तिखटाचा रंग फक्त लालभडक आहे हं, चवीला फारसे तिखट नाही ते …… मसाला बघ यावेळेस जरा बदल केलाय ….. आवडला की कळव, मग पुढल्या वर्षी तसाच करेन !!! ” ….

हे असं वारंवार घडतं नं, मग मला तू खूप आठवतेस …..

कुलकर्णीं भेटले नं कधी पुन्हा विमानतळावर तर त्यांना विचारायला हवय एकदा, “तुमची पण आई अशीच सतत बोलते का हो तुमच्या कानात :)

हळूहळू अशी सातत्याने येणारी आठवण आणि ओलावणारे डोळे यांची वारंवारता कमी होते…. मी ’ माझ्या घरात’ रमायला लागते …. तूला अधेमधे फोन करते, पण त्यात तुझ्यामाझ्यापेक्षा बाकिच्यांबद्दलच बोलत रहाते….. कधीतरी वाटतं तूला किती गृहित धरते गं मी …..

अशीच एकटी असते घरात नं सहज स्वत:कडे बघते , गंमत आहे आई माहितीये का… तू अगं कुठेच दूर नसतेस …. मलाच एक रहस्य समजतं , मी कुठे जाणार तुझ्यापासून दुर…. म्हणजे अगं बघ नं, मी जिथे, तिथे तू असणारचं नं…. मी आहेच काय वेगळं, मुळात माझी सुरूवातच तू नं :)

………………………………………………………………………………………………………………………………………………………………….

तूम्हाला बोलावणं म्हणजे नं दिव्य असतं आजकाल…. मला कळत नाही गं एक,  की तू कधीपासून अशी टिपीकल वगैरे झालीस ? , काय तर म्हणे अगं मुलीच्या घरी खूपदा येऊ नये… काहितरीच…. म्हणजे आम्हाला वाढवलस असं एकदम बिन्धास्त आणि आता स्वत: काकूबाई ….. चालणारच नाही, माझ्याकडॆ आहे नं हुकूमी एक्का, तो पटवतो तूला बरोबर ….. त्याने दिली धमकी , असं वागणार असाल तर मी ही तुम्हाला सासूबाई वगैरे म्हणायला लागेन…. त्याचं बरं ऐकतेस गं …. म्हणे त्याच्यासारखा दुसरा कोणी असूच शकत नाही ….

आले खरे तुम्ही पण टिकायला नको तूम्हाला … पुन्हा तेच पालूपद , खूप राहू नये मुलीकडे …. येडचॅप झालीयेस माय तू आजकाल .. फूल्लऑन विचित्र .. साठी नाही आली अजून तुझी पण ऐक माझं, म्हातारी झालीस तू !!!

सांगायला कशाला लागायला हवय तुम्हाला, की एरवी नं मला आठवण येते तुमची…. जा मग जाणार नं जा… उद्या जाणार ते आज जा!!!

मी कशाला फोन करू पोहोचले का सुखरूप वगैरे …

आणि हो ते आवळ्याच्या सुपारीच ताट आहे नं… उन्हाच्या दिशेला तोंड करून ठेवलेलं , तेच ज्यात मला आवडते म्हणून धावत पळत सुपारी करून ठेवलीस ते, ते नं जाता येताना रस्त्यात येतय हो…. अडचण होतेय मला त्याची …. तूझी घाई घाई आठवते मला ते दिसलं की , हे करून ठेवते, ते करून ठेवते ….. नको ठेवू ते, तू रहा त्यापेक्षा …….

ती लोणच्याची बरणी दिसते मला, तुझ्या लाडक्या जावयाचं लाडकं लोणचं केलस नं तू…. ” सात – आठ दिवसात मुरेल लोणचं, तोवर रोज हलव फक्त बरणीला …. वाटलं तर आणि लिंब पिळून टाक त्यात ” ….. लागलीस बघ माझ्या कानात बोलायला तू …..करते काय मी, हलवून ठेवते बरणी… तसंही मला कुठे खायचय ते लोणचं ….. मी खाणारच नाही जा !!!

कपडे ठेवायला जावं नं कपाटात , तर तो रिकामा कप्पा दिसतो मला… तूम्ही येण्यापुर्वी रिकामा करून ठेवलेला …. त्यात पुन्हा कपडे भरणं सोप्प नसतं गं…. तो कप्पाच काय, संपुर्ण घर रिकाम रिकामं वाटतं मला….

बाबांनी रामरक्षा म्हणताना लावलेल्या उदबत्तीची रक्षा भरून ठेवते मी…. अगं ती फार महत्त्वाची असते गं…. जरा काही खूट वाजलं, मन धास्तावलं नं की ती रक्षा साऱ्या घराला लावते मी !!!

म्हणजे नाही म्हणायला समजावते मी स्वत:ला … कसं आहे नं आई, मला माझ्यात तू आणि बाबा कायम सापडता अगं…. कोणाला सांगत नाही मी…. कशाला सांगायचं, सगळं सांगितलंच पाहिजे असा काही नियम नसतो नं…. आता खी खी हसू नका तू आणि बाबा ….. आठवतय मला ,”सगळं सगळ्यांना सांगू नये ” हे अनेकदा तुम्ही बजावता मला…. जाऊ दे !!!

पण महत्त्वाचं काय की, लेकीकडे खूप दिवस राहू नये वगैरे मुर्खपणाचे नियम मला प-ट-त ना-ही-त !!!

……………………………………………………………………………………………………………………………………………………………………

मला माहितीये तूला कुठलेही फॉर्म एकटीला भरायला आवडत नाहीत…. आपण काहितरी चूक करू असा तूझा आपला स्वत:बद्दलचा दावा !!! बॅंकेच्या लॉकरला भेट देऊन आल्यानंतर कशी तूला तीन चार दिवस भिती असते मनात की आपण नक्की काहितरी दागदागिना जमिनीवर पाडला असावा तिथे…. नाहितर आपण नक्की कुलूप घातले की नाही त्या लॉकरला :) …. विमानात यापुर्वी कधी स्वत:चा इमिग्रेशनचा फॉर्म तू भरला होतास का गं ?? विचारतेय काय तूला, मला माहितीये ते काम नेहेमी बाबा करत असावेत ….. गेल्या वेळेस कशी फिरायला गेली होतीस कुठेतरी, बाबा बिचारे तूला शोधत होते म्हणे मग ……

आणि यावेळेस सगळं ’जमलं’ नं आई तूला ….  विमानातले फॉर्म भरता आले, तू कुठे फिरायला गेली नाहीस… एकटीच प्रवासाला निघालीस तरी बिचकली नाहीस…..

मला पुर्णवेळ काळजी होती अगं की नक्की जमेल नं तूला एकटीला प्रवास … खरं सांगू तर इतकी मी ओळखतेच तूला की तू एकाच वेळेस अत्यंत कावरीबावरी आणि त्याच क्षणी तितकीच खंबीर असतेस जेव्हा प्रश्न तुझ्या मुलींबद्दल असतो :)

“मला बरं नाहीये आई ” हे चार शब्द तूला सांगितले की तू असशील तिथून धावत येशील खात्री वाटते मला !! किती सार्थ ’खात्री’ …. तूझं विमान उशिरा पोहोचणार होतं ना गं , मग मी झोपले … म्हणजे औषधं घेतली की झोप लागतच होती ना गं तेव्हा…. पण तरिही माझ्यातलं काहितरी टक्क जागं होतं, तुझी वाट पहात होतं …..

दमले होते गं….. काहितरी अंतस्थ अस्वस्थता आली होती…. घेरून आल्यासारखे !!!

गाढ झोपेत मन वाट पहात होतं, दार वाजण्याची ….. तू आलीस की धावत माझ्याकडे येणार असा भास होत होता….

आलीसच की तू… मी जागी आहे की झोपलेय आई ?? …..

डोक्यावरून तूझा हात फिरतोय …. हुंदका दाबतेय न तू, माझी झोप मोडू नये म्हणून ….. नवऱ्याला विचारते आहेस, आधि का नाही कळवलं हिला बरं नाहीये ते ?

तुझ्या हातात नं आवडे फार ताकद आहे गं…. मला किती शांत वाटतय…. आणि त्याचवेळेस एक अनामिक बळ संचारतय…. आता मी नाही घाबरत कशालाच….

मनात विचार येतोय अगं की झोपेत होते नं मी मग मला कसं समजलं तू आल्याचं ?? माझ्यात काय अपुर्ण होतं ??

तूझ्या कुशीत शिरले नं मग मला सगळ्या प्रश्नांची उकल झाली …..

हिरकणीचं बाळ झाले होते मी पुन्हा … सगळ्या संकटांना पार करून माझी आई माझ्यापर्यंत पोहोचेल या आशेने तिच्या वाटेकडे डोळे लावून बसलेलं बाळ …. आई आली म्हणून सुखावलेलं बाळं !!

…………………………………………………………………………………………………………………………………………………………………………

आता माझ्या माझ्यासाठी असलेल्या डायरीची पानं इथे का टाकतेय म्हणशील नं ??? सांगते थांब …..

Mothers Day आहे अगं , म्हणजे मला माझ्या पिल्लांनी ग्रिटींग कार्ड्स दिलेत म्हणून समजलं :) …. मी तूला काय देणार ??? …. तूझी आठवण येते वगैरे सांगत नाही नं हल्ली मी तूला, म्हणजे मोठी झालेय नं मी आता ….. लहान मुलांसारखं सतत वागता आलं तर मजा येइल आई …. मग मी ओरडून तूला सांगू शकेन की , “आवडे आय लव्ह यू ” … पण जमत नाही गं ते ….

जाऊ दे काही सांगत नाही…. तूला फोन करते सरळ, आपण हवा पाणी, माझी तब्येत … माझ्या मुलांच्या खोड्या वगैरे तमाम विषयांवर बोलत राहू ….

मी पाल्हाळ संपवून फोन ठेवताना तू म्हणशील नं , ” आता सांग खरा फोन कशासाठी केला होतास ते ? ” … एरवी तूला कसं समजतं असा प्रश्न पडतो नं मला… आता माहितीये ’लबाड’ आहेस तू…. सगळं समजतं तूला, न सांगताही !!!मला नं खरं तर तूझे आभार वगैरे मानायचेत गं एकदम फॉर्मल बिर्मल …. तू हसू नकोस पण आणि हो बये रडूही नकोस!!

थांबावं कुठे नं कसं मला सुचत नाहीये …. तूला आठवतं लहानपणी मला ’माझी आई’ यावर तूच निबंध लिहून दिला होतास , “प्रेमास्वरूप आई … वात्सल्यसिंधू आई  ” आणि ते ’स्वामी तिन्ही जगांचा’  वगैरे भारी एकदम….

खरं सांगू मला त्या सगळ्या शब्दांचा अर्थ तू समजावला आहेस … निव्वळ अर्थच नव्हे ’मर्म’ समजावलंस तू …. लव्ह यू आई!!!! :)

Moral…

आईने मुलीच्या, ” गोष्ट सांग ना ” या हट्टासाठी सांगितलेली एक गोष्ट… नेहेमीची गोष्ट नको , नवी सांग या जोडहट्टासाठी आईने स्वत:च बालपण शोधलं आणि त्यातली जी गोष्ट पटकन आठवली ती सुरू केली सांगायला ……

दोन मित्र असतात. एका जंगलातून ते जात असतात…. जाता जाता त्यांना उशीर होतो. गप्पागोष्टी करत मित्र पुढे जाताहेत….. अचानक त्यांना एका अस्वलाचा आवाज येतो….. पहिला मित्र चटकन झाडावर चढतो, दुसऱ्या मित्राला काही झाडावर चढता येत नाही….. तो पहिल्या मित्राकडे आशेने पहातो पण पहिला मित्र काही त्याच्या मदतीला धावून येत नाही…. तो स्वत:चा जीव वाचवत झाडावर थांबतो.

दुसऱ्या मित्राची होते आता पंचाईत…. जीव तर वाचवायला हवं, अस्वल जवळ जवळ येत आहे….. तितक्यात त्याला सुचते एक युक्ती…. तो चटकन जमिनीवर आडवा होतो, श्वास रोखून धरतो…. अस्वल जवळ येतं त्याच्या… त्याच्या भोवती गोल फिरतं….. अस्वलाला वाटतं हा माणूस काही जिवंत नाही…. मग अस्वल थोडं घूटमळून तिथून निघून जातं……

दुसरा मित्र खुश होतो कारण त्याचा जीव वाचतो… त्याची युक्ती छान असते अगदी!!!

उगा आईच्या मनात एक विचार डोकावतो आपण एक झाड आणि समोर कोवळं कोवळं एक रोप  :)

आई इथे थांबते जरा ….. पुढची गोष्ट सांगायचीच असते आईला की मग पहिला मित्र दुसऱ्याला विचारतो की ’अस्वलाने तुझ्या कानात काय सांगितले ? ’

तितक्यात समोरची पाच वर्षाची लेक विचारते ,  “मम्मा गोष्ट छान आहे ही, पण या स्टोरीचं moral काय ? “

शाळेतली शिक्षीकेने सांगितलेली गोष्ट संपली की ’Moral of the story ” ऐकायची सवय लागलेली लेक या गोष्टीचा ’बोध’ शोधू लागते.

आई आपलं जुनं ऐकलेलं आणि त्यावर स्वत:चा विचार करता येइल का याचा विचारही न केलेलं moral सांगते, की जाता जाता किनई त्या अस्वलाने दुसऱ्या मित्राच्या कानात सांगितले की संकटात आपली मदत न करणाऱ्यांशी मैत्री करू नये.

गप्प बसावं नं इथे आईने पण तसं होत नाही, आईने पहिल्यांदा ही गोष्ट ऐकली त्याला मोठा काळ लोटलेला असतो , आयुष्यात मैत्रीचे अनेक भले बुरे अनूभव गाठीशी बांधलेली आई मनात उगाच सकारात्मक-नकारात्मक तुलना करते.

भले अनूभव असले तरी बुरेच आठवून ठेवण्याची मोठ्या माणसांची त्रासदायक खोड आईलाही असते. आई मग पुन्हा बोलते, नाहीच करू स्वार्थ्यांशी मैत्री, मैत्रीच्या व्याख्येत न बसणारे दुरच ठेवावे…. आईने संकटात मदत केलेली असते, किंवा संकटात मदत घेतलेली असते…. पहिल्या प्रकारात लोकं जाणिव ठेवत नाहीत हा त्रास तर दुसऱ्या प्रकारात लोकं मदत तर करतात पण नंतर त्रास देतात असा काहिसा अनूभव ….. उगा मनस्ताप देतात लोक…वगैरे वगैरे!!

.

.

.

समोर जीवन नुकतचं उमजून जगायला लागलेलं छोटसं रोपटं हलके हलके डोलतं . खुदकन हसतं आणि म्हणतं, ’नो मम्मा असं नको करूया आपण मॉरल :)

समोरून ठसक्यात मग वाक्य येतं …..

“आपण असं करूया की जेव्हा आपण आपल्या फ्रेंड सोबत असतो आणि त्या फ्रेंडला झाडावर चढता येत नाही तेव्हा आपण आधि त्याला झाडावर चढायला हेल्प करायची आणि मगच आपण चढायचं… आपल्याला येतच असतं नं चढायला मग आपण पटकन चढू शकू !!! “

:) :)

रोपट्याला हेच moral आवडलय असं रोपटं जाहीर करतं !!!

जुन्या मॉरलपेक्षा नवं खूप सकारात्मक असतं….. असणारच , जुनी गोष्ट सांगणारा / री नक्कीच कोणितरी मोठी व्यक्ती असणार नं , आईसारखी वयाने मोठी झालेली जराशी …. टक्के टोणपे पचवलेली …. आयूष्याच्या स्वच्छ सुंदर आरसपानी पाण्यात काही गढूळ ओघळ नाईलाजाने सहन करणारी  !!!

आईला क्षणभर गंमत वाटते…. आपण लहानपणी समोर दिलेलं मॉरल न स्विकारता स्वत: शोधलं असतं तर असेच शोधले असते का हा नवा गुंता येतो मनात :)

खरेखूरे जंगल लोप पावले ,त्याजागी आलेल्या सिमेंटच्या जंगलातही असतीलच नं चढता न येणारी माणसं !!! कधी आपण पहिला मित्र असणार कधी दुसरा, हे होतच रहाणार……

मॉरल बदललेलं पिल्लू लागतं नव्या कामांना …. सळसळता उत्साह एक आईच्या अवतीभोवती बागडत असतो. मोठ्या झाडावर हलके हलके डोलणारी वेल जशी एक… उंच झेपावू पहाणारी, सदैव वर नजर असणारी ……

तिच्या अस्तित्वातली उर्जा जून्या झाडाला देऊ करणारी!!! एक हलकसं हसू नकळत आणि अगदी सहज देणारी उर्जा !!

जीवन खूप सुंदर असावं , त्यात कुठलंही संकट येत नसावं ….. मैत्रीचा धरलेला हात घट्ट असावा, आलच समजा अस्वल तर आपला मित्र आपली किंवा आपण मित्राची मदत करावी असं सहज सोपं तत्त्वज्ञान असणारी…… :)

आईला एक ’बोध’ देणारी आईची लेक उद्या नवी कुठली गोष्ट असणार या विचारात मग्न होते एकीकडे ……

आईचं मन मोठं खोडसाळ….. तिच्या समोरचं निरागस आयूष्य मोठं होत असच आपल्यासारखं नकळत नकाराकडे झुकेल की काय अशी शंका आईच्या मनात ?? जंगल तर आहेच की अवतीभोवती ….. जंगलातल्या प्राण्यांचे गूण असलेली माणसाचा मुखवटा घातलेली वृत्ती आलीच ओघाने…. कसा जपावा हा अखंड उर्जेचा  स्त्रोत ??? आई प्रश्नांची मालिका स्वत:च गुंफते आणि स्वत:च तिच्यात गुरफटते….

जीवनाने नवा मार्ग स्विकारलेला असतो… ते वाढणारंच असतं…. हिरवी हिरवी नवी पानं जुन्या वठलेल्या झाडालाही आणण्याची ताकद ऋतूत असतेच…. आपणही तर आयूष्यात चांगूलपणावर विश्वास ठेवतोच…. आईच मनं अजून अजून विचारात :)

पिल्लू कुठूनतरी सहज झेपावतं आईकडे …. आईला मग ते आरश्यासमोर नेतं … काहिबाही बडबडतं, आईचीच नक्कल करतं , ठामपणे पुन्हा एक दावा करतं , ” मी मोठी होऊन फक्त माझ्या आईसारखीच होणार ” :)

त्या कोवळ्या मिठीतली ताकद सगळे विचार थोपवतात ….. आपलं पिल्लू नवा विचार करू शकतय, हे नवं रोपटं रूजू पहातय या विचाराने आई सुखावते .

खतं-पाण्याची जबाबदारी टाळून चालणार नाही , ऊनवाऱ्याची सवय व्हायलाच हवी… वाढ पुर्ण झालीच पाहिजे…. आई पिल्लाकडे पहाते आणि स्वत:लाच बजावते.

आईमधल्या क्षणिक नकाराचाही पार पार निचरा होतो….

आयूष्य नकारासाठी नसतेच मुळी आणि याचा विसर पडू न देण्यासाठीच समोर आपल्या पिल्लांच्या रूपातलं सृजन साकार होत असतं, असा नवा ’बोध’ … अहं अहं बोध नव्हे ’Moral’ आईला मिळतं :)

आई आज पिल्लाच्या कुशीत विसावते  ….. झाडावर चढणं विसरलेल्या आईला पिल्लाने आज मदत केलेली असते  :)

उद्या कोणती ’नवी’ गोष्ट आणि नवं Moral या विचारात मग त्या दोघीही रमतात ………………………. :)

या जन्मावर …..

गेला पुर्ण महिना आधि मुलगा आजारी आणि मग तिच्या मानेचं दुखणं , ती वैतागली होती अगदी . मुलाला बरं नाही मग मन अगदी हळवं झालेलं, त्यातच एरवी अगदी दुर्लक्ष करावे इतपत मुर्ख असे काही भलेबुरे अनूभव…. तिने जशी हार मानली .

मानेच दुखणं आलं काय म्हणायचं…. हाहा म्हणता वाढलं प्रचंड!! अगदी बसवेना आणि उठवेना…. बरं मानेला झटके न देता आपल्याला बोलताच येत नाही हा नवा साक्षात्कार त्या दरम्यान झाल्याने, तीची बोलती बंद झाली अगदी :) … या संधीचा तसं पहाता घरच्यांना आनंदच झाला असता पण तीची परिस्थीती पहाता तो त्यांनी खूप बडबडून व्यक्त केला नाही इतकेच :)

हळवं मन वेडेपणा करण्यात पटाईत… कशाला महत्व द्यावं नं कशाला  “खल्लीवल्ली ” (आमच्या अरेबिक मधे  “गेले उडत” :) )म्हणावं याचं भान विसरलेलं :( …. मळभ मनावर आलेलं…. आवसं जशी सारी !!! काळी काळी… कुंद कुंद वातावरण….

डॉक्टरांच्या वाऱ्या आणि औषधांच्या वेळा आलेच मग ओघाने !!

एक सकाळ, उठताना तिला अंमळ उशीरच झाला… होणारच होता… उठून लागली ती तयारीला, मुलं जायची होती नं शाळेत…. तोच ’सरप्राईज’ चा नारा कानावर पडला… मुलं शाळेची तयारी करून कधीचीच तयार बसलेली :) एरवी हाका मारूनही लवकर न उठणारी मुलं, आज बाबाच्या एका हाकेत उठून अजिबात आवाज न करता आवरून तयार होती…. हा गोड धक्का कमी वाटावा तर काही वेळातच ऑफिसला गेल्यानंतर, दर दोन तासानी नवरोजींचे येणारे फोन सुरू झाले. गोळ्या घ्यायची आठवण नवरोजी न विसरता देत होते.

“तू मला फोन करत तर नाहीसच पण मी केला तर घेतही नाहीस, येव्हढं काय काम असतं ऑफिसमधे ???  ” हा बायकोमंडळाचा सार्वजनिक मुद्दा तिच्याहीकडे आहेच… पण या आजारपणाच्या दिवसात तो पार धुवून निघत होता. सकाळी सगळं काम आवरून बाहेर पडणारे घरातले बाकिचे मेंबर्स , ’तुम्हाला माझ्या कामाची कदर नसते ’ वगैरे तिचे स्वत: दमल्यानंतरचे आरोप बिनबूडाचे ठरवत होते :)

नेहेमी ’चटपटं आणि यम्मी ’ जेवायला दे हा हट्ट असणारी मुलं , “मम्मा आम्हाला वरण भात खायचाय ” असे समजूतदारपणे सांगून आईच्या डोळ्यांच्या कडा ओलावत होती.

सगळं तसच चाललं होतं जे एखाद्या साध्या ’सुरळित’ चालणाऱ्या घरात चालायला हवं !!! पण हे ’सुरळित’ चालणंच यावेळेस तिला विचारात पाडत होतं …. किती गृहित धरलेलं असतं ते आपणं …. लहानशी पिल्लं ,आईला काम पडू नये म्हणून स्वत: स्वत:च काम आवरताना पहाणं हा भाग्ययोग असावा, हा सोप्पा विचार मनात डॊकावत होता !!!

होता होता बरी झाली ती… मित्रमंडळाने एकटं पडू दिलं नाही आणि जपण्यात घरचे कमी पडले नाहीत :)

मनावरची आवस दुर होतं चंद्राची कोर आकार वाढवत होती….

महिनाभर घराबाहेर न पडता आलेले तीचे कुटूंब मग किराणा घ्यायच्या निमित्ताने मॉलच्या आवारात शिरले… तिला आता मान हलवता येत असल्याने, बोलताही येउ लागले होते…. :)

सगळं ’सुरळित ’ …. म्हणजे अगदी आपल्याला गाडी पार्क करायची असल्याने कोणी तरी त्यांची गाडी अगदी हुकूमी रिव्हर्स घेत असावे, पार्किंगची समस्या हा प्रश्न आपल्याला न पडण्याची खबरदारी घेतल्यासारखे ….. बाहेर सुरेख गार हवा असावी…. आपल्या मनातले त्रासदायक  विचार तीने होळीच्या आगीत मनातल्या मनात टाकलेले असावे….

’ती’ कितीतरी दिवसांनी मनापासून हसली :)

नवरोजी आणि मुलं , “आम्ही आलोच ” म्हणून कुठेतरी गेली तिची …. ती आपली सामानाच्या रांगामधून फिरत होती… स्वत:च स्वत:शी संवाद साधत… “महिला दिन”शब्दाचा , स्त्रीमूक्ती वगैरे उहापोहाचा अर्थ स्वत:शी लावत तीने नेहेमीची खरेदी केली.

गाडीपाशी परत पोहोचली ती, नवरा आणि मुलं अचानक कुठूनतरी प्रकटले…. तीने हसून विचारलेही, “काय टपून बसले होतात का कुठे मी यायची वाट पहात ?? ” :)

मुलं गाडीत बसली आणि ती तिच्या जागेकडे वळली… तिथे असलेली सामानाची पिशवी पाहून तिने प्रश्नार्थक नजरेने त्या तिघांकडे पाहिलं , ते पुन्हा ओरडले  “सरप्राईज “ :) ….त्या पिशवीत काय होतं, सोन्याचा हार बिर …छे, मुळीच नाही … त्यात होतं एक सरप्राईज :) .. या फोटोतलं …..

खूप मोठं नाही… छोटसं…. त्या मॉलमधल्या गेल्या दोन तीन चकरांमधे तिने उचलून उचलून पाहिलेलं आणि  किंमत पाहून नेहेमीप्रमाणे परत ठेवलेलं. :) … साधीशी आवड तिची, तिने न उच्चारलेली न उल्लेखलेली ….. तिच्या घरच्या मंडळींनी कधी तरी लक्षात ठेवलेली :) …. ती खुश होत होती ….. ती पुन्हा ’ती’ होत होती… हसणारी, खुश होणारी आणि हो मान हलवत बोलणारीही :)

गाडीमधे गाणं लागलं तितक्यात , “तेरे जैसा यार कहा “  ….. सगळं ठरलेलं म्हणजे … गाणं ठरलेलं, गिफ्ट ठरलेलं …. मुख्य म्हणजे ती आपली आहे , सध्या नाराज आहे, तिला हसवायलाच हवं हे पक्कं ठरलेलं :) ….

“मेरी जिंदगी सवारी, मुझको गले लगाके

बैठा दिया फलकपें, मुझे खाक से उठाके….

यारा तेरी यारी को, मैने तो खुदा माना ” …….. :)

तिचा नवरा गात होता….तिच्यासाठी :)

एकही शब्द खोटा नव्हता … सगळं साधंस, प्रामाणिक :)

गाडी घराकडे धावत होती…. गाणी एकापाठोपाठ एक बदलत होती…. मुलं बोलत होती, हसत होती, खेळत होती, दंगा करत होती…..

एक  ” स्त्री ” एक महिला वगैरे विचारांच्या पुढे ती एक व्यक्ती, एक बायको, एक आई म्हणून क्षणोक्षणी तृप्त होत होती…. घरच्यांनी गिफ्ट दिले म्हणून का, ते आजारात काळजी घेत होते वगैरे म्हणून का ? तर नाही…. पण त्यांना तसे करावेसे वाटले म्हणून :)

मोठ्या मोठ्या वल्गना करताना , छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष होते आणि जीवनातला आनंद हरवून जातो हे सत्य तिला पुन्हा सापडले होते.  मनात आनंद तृप्त असेल तरच तो ओसंडतो आणि ज्यांच्याकडे दु:ख असते ते दु:खच वाटणार जगाला, हा विचार मनाच्या कोपऱ्यात हरवलेला जणू :( … तोच विचार तिला पुन्हा गवसला आज …..”आयडियल” म्हणजे काय याचा नेमका हिशोब चोख समजला पुन्हा  :)

गाडी तिच्या मार्गाने घराकडे निघाली होती… ती पुन्हा परतत होती तिच्या घरी :) ….

खिडकीच्या काचेतून पौर्णिमेचा तेजस्वी पुर्ण चंद्र तिच्यासोबत निघाला होता :) …. मनात एक सुर निनादत होता….. “या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे ” :)

सहजच ब्लॉगिंगची तीन वर्ष :)

५ मार्च २००९ …… ’सहजच’ सुरू केलेलं ब्लॉगिंग !!

५ मार्च २०१२ ……. या प्रवासाला होता होता तीन वर्ष पुर्ण झाली. :) :) :)

ब्लॉगच्या पहिल्या वाढदिवसाला एक पोस्ट लिहीली .

दुसऱ्या वाढदिवसालाही एक पोस्ट लिहीली. :)

नेहेमीचाच डायलॉग आजही पुन्हा म्हणावा लागेल ….

खरं तर माझा आरंभशुर स्वभाव पहाता हा ब्लॉग गेले तीन वर्ष टिकाव धरून आहे याचेच मला कधी कधी आश्चर्य़ वाटते. पण एक खरेय की अधून मधून मला येणारे कंटाळ्याचे लहानमोठे झटके वगळता ब्लॉगाची तब्येत ठीकच किंवा उत्तमच आहे म्हणावी लागेल.

गेल्या वर्षभरात ब्लॉगर्स आणि वाचकांच्या रुपात जोडली गेलेली बरीच नवी नावं/ नाती , देउळ या पोस्टची कृषीवलच्या कलासक्त पुरवणीतली दखल ह्या काही विशेष बाबी …. :) …. नवी नाती जोडली जातानी जुनी तशीच टिकून आहेत याचा आनंद खरच भरपुर आहे.

यावेळेस खूप काही बोलणार नाही ( खरं तर गेल्या ३-४ दिवसात मानेने पुकारलेल्या असहकारामूळे डॉक्टरांनी लॅपटॉपला हात लावायला देखील मनाई केलेली आहे… मगर आजका दिन खास है ना :) ) … छोटीशी पोस्ट आणि नोंद एक …..

मंडळी या ब्लॉगवर , इथल्या धडपडणाऱ्या कधी जमणाऱ्या अक्षरांवर प्रेम करणाऱ्या माझ्या कुटूंबियांचे, ब्लॉगर मित्र मंडळींचे, कमेंटणाऱ्या आणि न कमेंटणाऱ्या वाचक मंडळींचे सगळ्यांचे मन:पुर्वक आभार!!!!

तुम्ही सगळे नसता तर मी खरच टिकले नसते इथे ….. :)

जय ब्लॉगिंग !!!!!!!!!!!!! :) :) :)

फुलपाखरू….. (भाग १)

सगळी कामं चटाचट आवरती घेऊन रमा निघाली, दाराला कुलूप लावताना एकीकडे पिल्लूला सुचना देत होती ती… डबा नीट संपव, टिचरचं ऐक…. शाळा सुटली की तिथेच थांब , मी येतेच आहे घ्यायला….पिल्लूला त्याच्या शाळेच्या बसमधे चढवून रमा चटकन सरिता मॅडमच्या घरी पोहोचली.

मॅडम तिची वाटच पहात होत्या…. रमा जरा विसावली क्षणभर. मॅडमनी दोघींसाठी चहा मागवला आणि रमाच्या हातात एक पत्ता दिला.  पुढचे पंधरा दिवस रमाला जायचे होते तिथे. उशीर करून तसेही चालणार नव्हतेच…. पिल्लूची शाळा संपायच्या आत रमाला पुन्हा परतायचे होते.

रोजचे हे हक्काचे तीन तास रमाचे असायचे. या नव्या शहरात सुरूवातीचे काही दिवस रमाला अगदी कठीण गेले… नवी जागा, पिल्लू लहान , ही अडचण नं ती समस्या पण रमा रुळली तिथे… आणि अभयची साथ होतीच तिला. पिल्लू आता शाळेत मस्त एंजॉय करत होते :) … हे रमाचे नव्हे पिल्लूचे मत होते त्यामूळे रमा मात्र सुखावली होती ….. पिल्लूच्या शाळेत एंजॉय करण्याने रमा तिच्या आवडत्या समाजसेवेकडे वळली होती पुन्हा.

सरिता मॅडमची संस्था एक प्रकारे आधारगट चालवत होती, मात्र हे काम जरा वेगळे होते. एकटे रहाणारे वृद्ध किंवा वृद्ध जोडप्यांना काही वेळ देणे आणि तो ही त्यांच्या रहात्या घरातच हे या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट्य होते. तिथे जाउन त्यांच्याशी गप्पा मारणे, त्यांची औषधं आणून देणे, त्यांच्यासाठी पुस्तक वाचणे, त्यांना बॅंकांमधे वगैरे नेणे असली जिकीरीची कामंही त्यात असतं कधी कधी, ही सगळी कामं रमा आणि तिच्या नुकत्याच झालेल्या मैत्रीणी आनंदाने करत.

मॅडमने दिलेला पत्ता वाचताना रमा चमकली क्षणभर…. ’श्रीकृष्ण नगर’ ….ऐकलेले आहे हे नाव तिने याआधि खात्रीने…. कुठे पण?? तसे खूप नाविन्य नाहीये नावात म्हणजे याच गावाचा असेल संदर्भ कश्यावरून…..या शहरात आल्यानंतर खरं तर अधे मधे ते नाव तिच्या मनात डोकवून जायचे…. आज अवचित तेच नाव सामोरे आले अनं रमा गोंधळली.  अर्थात दवडण्यासाठी वेळ होताच कुठे तिच्याकडे… तिने पत्ता पर्स मधे कोंबला आणि गाडी वळवली…. एक अनामिक हुरहूर मनात दाटली तिच्या . आयुष्य रमाला याचसाठी कायम आवडायचे… सकाळी उठताना आपण कामाची यादी करू भलेही पण त्यातली होणार कुठली कुठली हे आपण ठरवूनही भागत नाही :) …आयूष्याचं unpredictable असणं अत्यंत मोहक असतं असं तिला कायम वाटायचं…. गाडीच्या वेगाबरोबर तिचे विचार आज धावत नव्हते तसे, आणि ते धावले असतेही तरी तिने त्यांना रोखून धरले होते……

श्रीकृष्ण नगरच्या पाटीपाशी थांबून तिने पत्ता पुन्हा एकदा वाचला….

पत्त्यातलं घर एक सुरेख बंगली होती…. इथल्या काकुंकडे रमाला यायचं होतं आता, वयाने सत्तरीच्या पुढच्या या काकू खरं तर ऑस्ट्रेलियात त्यांच्या मुलाकडे रहातात. सध्या महिनाभरासाठी एकट्याच भारतात आल्या आहेत ही सरिता मॅडमने दिलेली माहिती रमा आठवत होती. घाईत आपण त्यांचे नाव वाचलेच नाही या विचाराने रमा स्वत:शीच हसली…. यात नवे काय होते म्हणा, हे असे घोळ घालणं रमासाठी कायम होतं…. नावं न विचारणे आणि चुकून विचारलेत तर विचारल्याच्या पुढच्या क्षणी ते विसरण्याचा तिचा हातखंडा होता.

दारावरच्या पाटीवरचं आडनाव पाहून मात्र रमाची खात्री पटली आजचा दिवस काही वेगळा दिसतोय…. तोच भाग आणि तेच नाव, किती वर्षांपुर्वी ऐकलेलं…. कितीही विसराळू म्हटलं तरी काही नावं कोरलेली असतात की काय अश्या विचारातच रमाने दार वाजवलं. तसेही काही आडनावं काही भागात अत्यंत कॉमन असतात , आपण उगा गुंते घालायचे नाहीत असा विचार तिच्या मनात आला…..

या घरात आणि या काकूंकडे आपलं पटेल याची खात्री तिला पहिल्या काही मिनिटातच पटली . स्वच्छ , नीटसपणा आणि साधं पण कल्पकतेने सजवलेलं घरं ही रमाची अत्यंत आवडती बाब, आणि या घरात नेमकं तेच रमाला खूप आवडलं. कामवाल्या बाईकडून घर आवरून घेणं हे एक मोठं काम असतं वगैरे मुद्दे आले आणि तिचं काकूंशी जमून गेलं…. दोन गप्पिष्ट बायका एकत्र आल्या होत्या…

पुढचे तीन चार दिवस भराभर गेले….

त्यांना काय हवेय काय नकोय वगैरे रमा जाणून घेत होती.दोघींच एकमेकींशी ’जमलं’ मनापासून… काही घरात रमाला जमवून घ्यावं लागत असे , इथे अलगद सुर जुळत होते. ’रमा’ तुझं नाव मला कायम आवडायचं … काकू सहज तिला सांगत होत्या. त्यांच्या बालपणीचे किस्से ऐकत, त्यांच्या औषधांची यादी समजावत घड्याळाचा काटा रोज चटाचट पुढे सरकत होता. ” ’चहाचा कप’ आणि गप्पा  ” हे काकूंनी त्यांच्या गप्पांच नाव ठेवलं होतं….

“रमा,  गेल्या कित्येक वर्षात इतकं बोलले नव्हते गं मी, काका होते नं तेव्हा त्यांच्याशी खूप गप्पा व्हायच्या माझ्या , तुझी ती सरिता ओळखते नं मला…. तिला मी म्हटलं होतं तुझ्याकडची बडबडी मुलगी पाठव , तिने लगेच तुझे नाव सुचवले…. मला ’रमा’ नाव आवडतेच आणि, माझ्या फार आठवणी आहेत या नावाशी निगडित….. ” काकूंच्या बोलण्याचा ओघ सुरूच असे.

रमादेखील असं खळखळून किती दिवसानी हसली होती. काकूंच्या बोलण्यात बरेचदा उल्लेख व्हायचा, ’लहान आहेस गं पोरी अजून … ” … रमाला मजा वाटायची तेव्हा. लग्न झाल्यापासून  ती अचानक खूप मोठी झाल्यासारखे वाटवणारे दडपण ती विसरून जायची मग. रमाच्या मनातलं फुलपाखरू मोकळं वाटायचं तिला तेव्हा….

’फुलपाखरू’ … नाजुकसं, सुंदरसं…. रमाने गुपचूप ठेवलेलं होतं त्याला मनात लपवून…. बाहेर काहिही चालू दे , मनात मात्र राज्य त्या फुलपाखराचंच….. :)

रमाला या चहाच्या कपाबरोबरच्या गप्पा खूप आवडल्या होत्या. तिची खूप लहानशी स्वप्न होती नेहेमी,  त्यातलं एक म्हणजे अश्या गप्पा मारणारी सासू… अभयच्या आईला असली स्वप्नाळू कल्पना ऐकवणं जरा अवघडंच होतं.  रमा एका वेगळ्या पातळीवर विचार करणारी आणि अभयची आई एका वेगळ्या… दोघींचे सुर इतर अनेक सासू सुनांसारखे वेगळे असले आणि त्यांच्यात वाद नसले तरी रमाची लहानशी स्वप्न मात्र तिला नेटाने मागे सारावी लागली होती. “सुनेने सुनेसारखेच वागायचे ” हा नियम ऐकून ऐकून रमा नित्य नेमाने गोंधळत जायची….. सुनेकडे फुलपाखरू नसावं बहुतेक , हळुहळू रमाला वाटायला लागलं मग!!! फुलपाखराला बरणीत कोंबलं होतं जणू… मलूल पडलेलं असायचं ते तिथे….. सगळं सुख असलं तरी मोकळ्या हवेत उडणाऱ्या, रंगांची, ताजेपणाची सय व्हायची फुलपाखराला, त्या जिवाची घुसमट व्हायची !!!

” रमा तुझ्या बालपणाबद्दल सांग गं, कुठली आहेस तू?? “  काकूंचा अचानक आलेला प्रश्न होता खरं तर हा !! त्यांच्या आधारगटाचा तसा  अलिखीत नियम होता की जिथे जाल तिथली माहिती विचारायची नाही आणि सहसा आपल्याबद्दल फारसे काही सांगायचे नाही. आज त्या नियमाला मुरड घालून रमाने गप्पा मारल्या….  तिच्या कॉलेजचे नाव काकूंनी परत विचारले, आणि त्या मंदश्या हसल्या. रमा अभयबद्दल, पिल्लूबद्दल भरभरून बोलत राहिली. ती घरी जायला निघाली तेव्हा काकूंनी तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि तिला आशिर्वाद दिला. तिच्या पाठीवर त्यांची बोटं हळूवार फिरली…. त्यांच्या मायेनं भारलेल्या अनपेक्षित कृतीने रमा सुखावली. आज काकू बोलल्या नाहीत फारश्या, उलट मन लावून आपलं बोलणं ऐकत होत्या असं वाटलं तिला.

पंधरा दिवस चटकन संपले … काकूंचा निरोप घेणं रमाला जड गेलं. शेवटच्या दिवशी काकूंनी आग्रह केला म्हणून अभय आणि पिल्लूही त्यांना भेटायला आले. तिघांनी वाकून काकूंना नमस्कार केला. किती बोललं गेलं असलं तरी गप्पा कितीतरी मारायच्या राहिल्याच होत्या, काकूंबद्दल अजून किती जाणून घ्यायचे होते, त्या गप्पा पुढच्या भेटीत असे दोघींनी ठरवले :)

पुढच्या दिवशी काकूंचा मुलगा, सुन आणि नात येणार होते. ते सगळेच परत त्यांच्या मुक्कामी परतणार होते.

रमाला आता एखाद दोन दिवस सुट्टी आणि मग पुढच्या काकू किंवा काका-काकूंकडे जायचे होते. :)

……………………

 

फुलपाखरू भाग २ इथे आहे !!

फुलपाखरू….. (भाग २ )

(पहिला भाग इथे आहे. )

पुढचे काका- काकू , आणि मग त्याच्या पुढचे काका किंवा नुसत्या काकू …. दिवस पुढे सरकत होते. पिल्लूच्या शाळेतला अभ्यास वाढत होता…. अभयच्या ऑफिसमधलं कामंही छान चाललं होतं. रमाला निवांत वेळ हाताशी कमीच लागत होता तसा . कधीतरी चहाचा कप आणि जरा सवड हातात एकत्र आली की त्याबरोबर काकूंची आठवण मनात आल्याशिवाय रहायची नाही. सरिता मॅडमला काकूंबद्दल विचारू हा विचार मनात यायचा आणि मग घाईत ते राहून जायचे…..

त्यात पिल्लूच्या शाळेला सुट्ट्या लागल्यानंतर रमाच्या सासूबाई तिच्याकडे रहायला आल्या…. ’समाजाची कशाला हवीये सेवा , त्यापेक्षा एखादी नोकरी करावी ’ हा विचार रमाला येता जाता कानी पडायला लागला. रमाने त्यांचे बोलणे मनावर न घेता त्यांच्याशी संवाद साधायचा नेहेमीचा प्रयत्न चालवला होता. सगळं म्हणायला सुरळीत चाललेले होते.

एक दिवस मग ते सगळे या भागातल्या प्रसिद्ध साड्यांच्या दुकानात गेले होते…. या शहरात आल्यापासून अभय रमाला कित्येकदा तिथे चलण्याबद्दल म्हणत होता, रमाने ते कायम टाळले होते. आज सासूबाईंची इच्छा म्हटल्यावर रमाला जावेच लागले….. अनेक साड्यांची खरेदी झाली…. एकीकडे ती स्वत:, मधे अभय आणि दुसऱ्या बाजूला सासूबाई बसलेल्या होत्या…..  रमाला वाटले नात्यांची ही एक साडीच आहे ही, सासूबाई मुख्य साडी , अभय जोडणारा धागा आणि आपण काठाला उभे आहोत….

साड्यांच्या राशीतून एक बेंगनी रंगाची, हिरवे सुरेख नाजूक काठ असलेली साडी रमा हातात घेउन पहात होती. तिच्या मनातल्या फुलपाखराचे आवडते रंग….जांभळा रंग आणि हिरवे काठ असलेलं जरतारी फुलपाखरू….  तिच्या सासूबाई फणकारल्याच तितक्यात, काय तरी साडी निवडलीस गं रमा, वेगळच काहितरी शोधतेस नेहेमी ….. भिरभिरणारे फुलपाखरू बिचकले, पुन्हा कोषात गेले :(

” ती साडी घेऊयात तूला “, असे अभयने म्हटल्यावर मात्र तिने नकार दिला….

रमाच्या मनात एक विचार चमकला परत येताना , जुनी रमा असते नं मी तर आत्ताच्या आत्ता सासूबाईंना अर्धा तास डिवोर्स दिला असता … बोललेच नसते… बालिश इलाज होता तिचा हा… कट्टी नाही म्हणायची ती, डिवोर्स म्हणायची …. तिच्या कॉलेजमधे सगळे हसायचे तिला या शब्दाबद्दल. जुन्या आठवणी तरळल्या मनात आणि तिला वाटलं ’लहान आहोत आपण .. पिल्लूयेव्हढे किंवा जरासे मोठे ’ …. अधेमधे असे बालिश वागता येण्यासाठी तरी काकूंसारखी सासू हवी होती मला…. वयानेच नाही तर खरंखूरं मोठेपण असणारी….  मनात विचार आला खरा पण त्या विचारासरशी रमा चपापली. तिने सासूबाईंच्या हातातले सामान घेतले आणि ते सगळे घराकडे निघाले…. नाजुकश्या पंखाची उघडझाप झाली क्षणभर मनात आणि पुन्हा ते उदास मिटले ……

सासूबाई गावी गेल्यानंतर पुढचे जवळपास आठ -दहा दिवस रमाला सरिता मॅडमकडून फोन आला नव्हता… पिल्लूच्या शाळेची सुट्टी संपून शाळा सुरु झाली. रूटिन सुरू….

रमा घरातली कामं आवरत असताना बेल वाजली , सरिता मॅडमकडून तिच्यासाठी काही सामान आले होते.

पार्सलमधल्या एका पाकिटात एक पत्र होते रमासाठी…. रमा पत्र वाचू लागली आणि नकळत डोळे भरून वहायला लागले तिचे….तिच्या काकूंचे पत्र होते ते…

रमा वाचत गेली ओळींमागे ओळी…..

” प्रिय रमा, …….तुझ्या काकांनी निवडलेली आणि मी तुझ्यासाठी खरेदी केलेली भेट पाठवतेय…. काका म्हणू की सर म्हणू गं… तू सर म्हणायचीस नं त्यांना… तुझे लाडके सर… आणि सरांची लाडकी विद्यार्थीनी तू. आधि तू हरहून्नरी मुलगी म्हणून आवडायचीस त्यांना, मग त्यांना तुझ्यात त्यांची सुन दिसली म्हणून तू अजून लाडकी झालीस. मला घरी तुझ्याबद्दल सतत सांगत ते.  एकूलता एक मुलगा त्यांचा आणि अनेक स्वप्न… सतत म्हणत मी आणि माझी सुन मस्त पेपर वाचन करणार सकाळी , एक चहाचा कप हातात हवा आणि भरपुर गप्पा. मला सुन नकोय , मुलगी हवीये…. मला तर सक्त ताकिद होती, सुनं म्हणायचं नाहीस कधिही तूला…. तू मुलगी आमची. :)   तूला पहायला येऊ असे ठरवलेही मी पण राहूनच गेले ते…. मग आमची आमच्याच गावी पुन्हा बदली झाली … तुझं शिक्षण पुर्ण झाल्यावर तुझे सर निघालेही होते तूला मागणी घालायला पण तोपर्यंत तुझे आणि अभयचे लग्न तुम्ही ठरवलेले होते. ते हिरमूसले , म्हणाले मी आधि बोलायला हवे होते….

आमच्या मुलाचे लग्न होइपर्यंत ते काही थांबले नाहीत बघ पण !! मी ही निघालेय आता त्यांच्याकडे…. तू अशी अचानक सामोरी आलीस, सगळे संदर्भ जुळले. त्यांची मुलगी मला भेटली हे त्यांना सांगेन न विसरता…..  “

रमाच्या मनात तिचे सर तिच्याशी बोलत होते, सरिता मॅडमने सांगितलेल्या त्या भागाच्या नावाने, त्या घरावरच्या पाटीने मनात दाटलेली हुरहूर तिचा अर्थ समजावत होती… आठवणींची दाटी होत होती…. अभयशी लग्न ठरताना मैत्रीणींची ’रमा अगं लग्न एकाशी नसतं गं होत, संपुर्ण घर येत नं त्यात , त्या घरात कशी रमशील तू ?? त्याच्या आईच्या हेकट वागण्याकडे कानाडोळा का करते आहेस ?? “  वगैरे वाक्य रमाच्या मनात डोकावत होती….. वेडं फुलपाखरू घायाळ होत होतं…. काय कमावलं काय गमावलं हे हिशोब फुलपाखराला येतच नव्हते, आणि मांडायचेही नव्हते …. एक सल मनात उमटत होती तिला नाव मात्र त्या बिचाऱ्याला देता येत नव्हते…..

पत्र हातात ठेवून बराच वेळ रमा बसून होती… त्या पत्राबरोबर एक लहानशी चिठ्ठी होती …

” रमा, सासूबाईंनी हे पार्सल आणि पत्र तुझ्यासाठी ठेवले होते…. त्यांच्या शेवटच्या काही इच्छांपैकी एक की हे पत्र तूला पोहोचवावे. ….. तुझ्याबद्दल खूप बोलल्या त्या, अगदी आनंदी होत्या जाताना ….. “

काकूंच्या सुनेने तिचा पत्ता आणि फोन नंबर दिलेला होता. त्या कोण होत्या हे समजल्यावर,  आता त्या आपल्यात नाहीत हा विचार रमाला अजूनच कष्टी करत होता.तिचे डोळे सारखे भरून येत होते…..

सोबतचे पार्सल उघडले रमाने…. त्यात एक सुरेख साडी होती….. बेंगनी रंगाची, हिरवे नाजूक काठ असलेली……… तिचा मऊसूत अलवार स्पर्श रमाच्या हातालाच नव्हे तर मनाला झाला आणि आधिच वहाणारे डोळे अजूनच भरून येउ लागले.

त्या साडीकडे रमा एकटक पहात राहिली….. बेंगनी साडीवर त्याच रंगाचं फुलपाखरू गोल गोल फिरत राहिलं…………

बाकी शून्य ……

अंक, बाराखडी, गणित, भाषा, इतिहास, भुगोल, विज्ञान, मग जीव नी भौतिक त्यात रसायनाचा घोळ….. बीजगणित, भूमिती, ट्रिगनॉमेट्री नं बिट्री…. साईन न कोसाईन, टॅन न बिन …… ईंटिग्रेशन, डेरिव्हेटिव्हज…. डबल नं ट्रिपल…. काळ काम न वेगही त्यात….आपली भाषा, साहेबाची भाषा… हिंदी बिंदी मधेमधे….व्याकरणं बिकरणं, नुसतंच प्रकरण….. प्रोजेक्टाईल नी सरळ , रिलेटिव्ह बिलेटिव्ह मोशन की बिशन ….. हालचाल नुसत्याच नावाची नी खरं तर सगळं थबकवणारी …… व्हेक्टर्स बिक्टर्स , डोक्यावरचे बाण….. वर्तूळ नि चौकोन….. इकडे रेषा,  तिकडे किरण….. वाकड्यात शिरले की डिगीटल नं ऍनालॉग….. डेटा न फेटा…. बायनरी बियनरी ….. मेकॅनिक्स नं ग्राफिक्स …. कंडक्टर नं नॉनकंडक्टर भलती धुडं … मधे सेमी वाल्यांच रिजर्वेशन चं लफडं ….. मिली सेंटी डेसी मिटर …  डेका हेक्टो किलो मिटर… नसती पाठांतर… त्यात मैलाची गणितं …. आर्टस न कॉमर्स…..आम्ही सुखी न तुम्ही दु:खी….. उभ्या दोन रेषा समोरासमोर की कपॅसिटर …आडवं पाडा त्यांना वेड्या वाकड्य़ा ओढा झाली की रेजिस्टर…. डायोड न ट्रायोड, इन्व्हर्टर नं बिन्व्हर्टर ….

आमचं सायन्स तुमचं सायन्स….. तुम्ही डॉक्टर, तुम्ही वकील .. तुमची जात वेगळी आणि आमची वेगळी !!! तुमचे विषय सोप्पे आणि आमची मेली ब्रॅंचच अवघड…… तुम्ही करा मज्जा नं आम्हाला सजा….

एकाचे एक विषय नं एकाचे एक…. तुमचा अभ्यास आमचा अभ्यास… तुमची डिग्री नं आमची डिग्री…… तुमची वर्ष गेली नं आमचीही गेली……

आम्हाला नोकरी मिळते तुम्हाला नोकरी मिळते….. कधी कधी आमचं नं तुमचं ऑफिसही एकच ….. तुमच्या डिपार्ट्मेंटला काम कमी नं आमच्यावर जबाबदारी भारी…… तुमचं लग्न होतं नं आमचं ही लग्न होतं…. तुम्हाला पोरं होतात नं आम्हालाही पोरं होतात… आयुष्याच्या वेव्हज एकाच दिशेला वहातात…. ए सी असो नं डि सी असो… त्यांचा रस्ता ठरलेला  …..

नाती नं गोती जपा फार….. लोकांच्या वागण्याचा भलता भार….. एक न धड चिंध्याच फार …. आमचं माहेर तुमचं सासर ….. आमची घरं तुमची घरं…. आमचा किराणा, तुमचा किराणा ….. आमच्या मुलांचे रिजल्ट नं तुमचे ते निकाल…..आम्ही घरं घेतो तुम्हीही घेता घरं …. आमचं महाबळेश्वर नं तुमचं माथेरान… लंडन बिंडनला तिकीटं फार…..

दमछाक करताना तुम्हीही दमता… दमछाक करताना आम्हालाही थकवा….. आयुष्याचा अर्थ शोधतो आम्ही…. अर्थात आयूष्याला शोधताना रमताय तुम्ही….

आयुष्याची गणितं म्हणे तुम्ही सोडवता… आयूष्याची गणितं मग आम्हिही सोडवतोच….

गणितात असतं काय काय…. अधिक नं उणे….भागाकार नं गुणाकार…. बालपणीच्या वर्गात शिकवतात बाई…. त्यांच्यावर विश्वासायची आपल्याला घाई….

प्रत्येक जण एक अंक असतो खरा…. पूर्णांक असो किंवा अपूर्णांकच बरा…. काही गोष्टी जोडतो काही वजा करतो….. घातांक बितांक शोधायचेच नसतात… पुस्तकाच्या बाहेर सांगा ते तसेही कुठे दिसतात??? वर्गमूळ नं घनमूळ की नुसतं खूळ …..

प्रश्न पडतात आम्हाला बरं , वाटतं तुमचंही असचं असतं हेच एक खरं…..

आयुष्यात गणिताला एकच फुटते वाट…. भागाकाराच्या रस्त्याचा भलताच थाट …..

आयुष्य स्वत:च होतो मग भाज्य एक…  भाजक म्हणजे आपणच अंक नेक….. अंक जितका मोठा भागाकार तितका सोपा… खूप पायऱ्या उतरायच्या नाहीत, उधाऱ्या उसनवाऱ्या करायच्या नाहीत……

अंक असू देत कुठलाही म्हणा….. नियम हाच गणिताचा कणा… पायऱ्यांना इथे मार्क असतात….. चुकारपणाच्या वाटा नसतात ….

काहीतरी भाग मग आम्ही देतो….. वजाबाक्या बिक्या करत असतो…. एक दरी पार की पुढची खाई ओढायची…. सारं बळ्ं एकवटत पुन्हा उडी मारायची…. आमचं ते असं नं तुमचंही असंच….. भागाकारात गुणाकार.. … गुणाकाराचा एक साक्षात्कार…. आम्ही नं तुम्ही रस्ते तेव्हढे वेगळे, आकडेच काय ते नवे …… तुमचं तेच नं आमचंही तेच की …..

गुणाकाराची वजाबाकी …. हे बाकि नं ते ही बाकि…..

आयुष्याचं संचित वर हळूहळू साठत जातं …..स्वत:लाच स्वत:ने भागायचं वळणं येतं….. हा भाग असतो एक भोग बरं का ….. त्याला चुकवणं आपल्याच्याने खरय का????

अंकातून अंक वजा मग होतो…. संचिताला एक अंक जोडला जातो….. ह्याचं संचित , त्याचं संचित…. आमचं वेगळं … तुमचं पुन्हा वेगळं….

तळाशी उरतं त्याला मग ’बाकी’ म्हणतात…… भेदाभेदाची गणितं इथे येऊन विरतात…..

गोल गोल आकडे फेर धरतात…. शुन्यातून विश्व उगाच का म्हणतात !!!!! :)

एक सात्विक वादळ …. अमृता प्रीतम …

अमृता प्रीतमचं तिने स्वत: लिहीलेलं एकही पुस्तक मी वाचलेलं नाही ,कधी वाचेन ते ही माहित नाही!!!  पंजाबीत असलेलं पुस्तक वाचता येणार नाही कदाचित पण समजणार नाही असं मात्र म्हणता येणार नाही….. ती मराठी नाही, मी पंजाबी नाही…. तिच्या साहित्याची ओळख होण्याच्या टप्प्यापर्यंत येइपर्यंत मूळात माझी साहित्याशी अजून ओळख नाही….  मग असे असूनही , तुटपुंज्या वाटू शकणाऱ्या ओळखीवरही त्या व्यक्तीमत्त्वातलं नक्की काय साद घालतं समजत नाही….

बरेचदा वाटतं ब्लॉगवर एक पोस्ट लिहीण्याइतकी मी नक्कीच ओळखते तीला… मग वाटतं, छे!! मला जे समजतं , जे वाटतं ते शब्दांमधे बांधण्याइतकी समर्थ मी नक्कीच नाहीये.आणि मग तिथेच वाटतं, ’युरेका ’ …. सापडलं मला की मला काय आकर्षण वाटतं तिच्या व्यक्तीमत्त्वाचं…. माझं ’दुबळं’ असणं, समाजाच्या चौकटीचं सतत भान बाळगणं आणि तिने ते सशक्तपणे झुगारणं …. नुसतं झुगारणं ही बंडखोरी नव्हे तर स्वत:तल्या प्रतिभेला जपत स्वत:च्या नियमांनूसार आयुष्य जगणं !!!

भारतातून निघताना पुस्तकं खरेदी करणे हा एक महत्त्वाचा टप्पा असतो माझ्यासाठी नेहेमी . एका पुस्तकाच्या खरेदीवर एक पुस्तक मोफत अशी योजना त्या दरम्यान सुरू होती. घेतलेल्या कुठल्यातरी पुस्तकावर एक लहानसं पुस्तक हाती आलं , मुळचं ’उमा त्रिलोक ’ या लेखिकेचं आणि  ’अनुराधा पुनर्वसू ’ यांनी मराठीत भाषांतरित केलेलं  ’अमृता इमरोज ’ एक प्रेमकहाणी  नावाचं ते पुस्तकं !!!

अमृता प्रीतम एक मोठ्या पंजाबी लेखिका होत्या इतपतच ज्ञान होते तोवर मला…. केव्हातरी सहज पुस्तक चाळायला म्हणून हातात घेतलं . मात्र जसजशी वाचत गेले तेव्हा मात्र अमृताच्या व्यक्तिमत्त्वाच्या प्रेमात पडत गेले. इथे इमरोजना वेगळं काढणं शक्यच नाहीये. ते दोघे वेगळे होतेच कधी…..

एक जिगसॉ पझल येतं इश्वराकडून , आपल्यात एक अपुर्ण आपण असतो … त्या पझलचा दुसरा भाग देवाने पाठवलेला असतो ….. आणि ती दोन अपुर्णत्त्व जिथे भेटतात ते जीवन यशस्वी असते वगैरे प्रेमाच्या संकल्पना मनात कायम होत्या माझ्या , स्वत:ही तसेच काही जगण्याकडे कलही आहे पण बऱ्याच गोष्टी बोलत नाही आपण सहसा!!  ’हसं’  होइल आपलं अशी एक सुप्त भिती बाळगत आपण आपल्यातलं सामान्य असणं मान्य करतो :( …. अमृता आणि इमरोज यांच्या वयातलं ’उलटं’ अंतर आज तितकसं बोचणार नाहीदेखील पण समाजासाठी अश्या बाबींची मान्यता ५०-६० वर्षापुर्वी निश्चित नव्हती . त्यातही लग्नाच्या रूढ बंधनात न अडकता ४० वर्षापेक्षा अधिक काळाचं त्यांचं सहजीवन हा विषयच भुरळ घालणारा. अमृताला आधिच्या लग्नापासून झालेली मुलं आणि इमरोज अविवाहित , वेगळं आहे नं रसायन !!!

समाजाचा समाजानेच रचलेला एक पाया आहे…. वर्षानूवर्षे माणसांच्या अनेक पिढ्या त्या पायाला धरून जगताहेत… आमच्या पायावर आम्ही उभे आहोत हा दावाही ठोकतात…. आपण कसलातरी आधार घेतलाय ही जाणिवच जिथे नाही तिथे त्या आधाराशिवाय उभं रहाण्याचं आपल्यात सामर्थ्य असतं हे भान कुठून येणार ??? एखादा येतो मग चुकार गडी जो समाजाच्या या पायाला आव्हान करतो…. त्याच्या मजबूत भिंतींपलीकडे पहातो…. अवघड असतं हे नेहेमी …. पायाला चिकटलेली माणसं अश्या स्वतंत्र उभ्या रहाणाऱ्या माणसाचे पाय ओढतात ….. त्यात जर ती एक स्त्री असेल तर विचारायलाच नको…. जे आजही कठीण आहे ते आजपासून अनेक वर्षांपुर्वी अजूनच कठीण असणार नाही का ….

प्रस्थापिताविरुद्ध बंड करायचाय नं मग समर्थ असायला लागतं !! कणखर , मजबूत वगैरे असावं लागतं …. अमृता तश्या होत्या !! इथे मुळात ’भरकटण्याचा ’ धोका फार …. केलेल्या प्रत्येक कृतीचं समाज स्पष्टीकरण मागत फिरतो अश्या वेळेस ….. ते द्यायचं नसतं कारण ते मुळात ज्यांना समजत नाही तेच ते मागत असतात…. आपला वेगळा सुर आपण लावायचा असतो, समाज ऐकणार असतो तो सुर पण आपण यशस्वी झाल्यानंतर …. मधला काळ मात्र मोठा बाका असतो …..

काही लोक ’आवडून जातात ’ आपल्याला. सुर जुळतात, झंकार ऐकू येतो , ते होत होतं अमृताबाबत.

’ इतिहास माझ्या स्वयंपाकघरात आला आणि भुकेलाच परतला  . ’ ही ओळ असो किंवा , ’तिच्या आयुष्याचे धुमसते निखारे काळाने हलवले , त्या चटक्यांनी त्याच्या बोटांवर फोड आले. ’ असो,  जसजसे अमृताच्या साहित्याचे हलके हलके दर्शन व्हायला लागते मनाचा गोंधळ उडायला लागतो…. शब्दांची वेगळीच बांधणी असते ही…. अमृताच्याच एका पुस्तकाचं नावं आहे ’अक्षरों की रासलीला ’ … किती योग्य आहे हा शब्द तिच्या रचनांसाठीही ….. शब्दच जणू खेळताहेत एकमेकांशी आणि घडवताहेत एक अप्रतिम काव्य !!! वीज चमकते नं क्षणभर कसा लख्ख प्रकाश दिपवतो आपल्याला तशी धारदार रचना मोहात पाडते .

कधी कधी एखादं पुस्तकं वाचायला घेतलं की आवडतं पण उगाच मन साशंक होतं की आपल्या या आलूलकीला तडा तर नाही नं जाणार…. तसे न होता अमृताबाबत कुठेतरी खात्री वाटायला लागते,  इथे मुळातं नातं विश्वासाचं आहे…. निडर, बंडखोर, स्वत:शी प्रामाणिक लोकांबद्दल मला नेहेमी आदर वाटत आलाय , त्यांच्याकडे स्वत:चा विकास करण्याचंच नव्हे तर समाजाला एक सकस दृष्टिकोण देण्याचं सामर्थ्य असतं.

१२२ पानं झपाटलेली …. पुस्तकात अमृता – इमरोजच्या तरल नात्याचे अनेक सुरेख, तरल पैलू , अमृताच्या साहिर लुधियानवीबद्दल कायम वाटलेल्या प्रेमाचे रंग, तिचं प्रसंगी कणखर नं एक स्त्री म्हणून स्वत:तलं स्त्रीतत्त्वाशी प्रामाणिक असणं सगळंच आहे…. काहितरी देऊन जाणारं पुस्तकं !!! आपल्याला अंतर्बाह्य समृद्ध झाल्यासारखं वाटवणारी एक सोबत….

इमरोजसाठीची तिची ’मै तेनू फिर मिलांगी ’ कविता तशी अनेकांना परिचयाची …. गुलजारांच्या आवाजातली ही कविता इथे ऐका !!!

पुस्तक वाचून संपलं पण एक अस्वस्थता सोबतीला आली…. ती अजून खाद्य मागत होती. अमृताचा अजून शोध घे म्हणून सांगत होती….. अमृताचं लिखाणं आता शोधायचं आहे ….. काही काही अपुर्ण पानं हाती लागताहेत …..

फाळणीचं दु:ख अनूभवलेली अमृता…. त्या व्यथेला कायम मनात बाळगलेली अमृता ….. हीर ची दास्तान लिहिणाऱ्या ’वारिस शाह ’ ला फाळणी दरम्यान अत्याचार झालेल्या मुलींबद्दलही लिही रे सांगणारी , ’ वारिस शाह ’ ही  कविता लिहिणारी अमृता ….

फाळणीच्या वेळी पळवून नेलेल्या मुलींचा नंतर शोध घेतला गेला त्यातल्या अनेक मुलींच्या पोटात कोणाचं तरी बीज वाढत होतं :( …. त्या बाळांबाबत अमृता लिहीते , ” उस बच्चे की ओर से – जिसके जन्म पर किसी भी आंख में उसके लिये ममता नहीं होती , रोती हुई मां और गुमशुदा बाप उसे विरासत में मिलते हैं ….. “

” मैं एक धिक्कार हूं -

जो इन्सान की जात पर पड रही …

और पैदाईश हूं – उस वक्त की

जब सुरज चांद -

आकाश के हाथों छूट रहे थे

और एक -एक करके

सब सितारे टूट रहे थे ….

’पिंजर’ पाहिला तो केवळ अमृतासाठी …. तिच्या प्रेमात पुन्हा एकवार पडण्यासाठी !!  फाळणीपुर्वी पाकिस्तानात असलेल्या एका गावातली’पुरो ’ (उर्मिला मातोंडकर )…. तिचे लग्न ठरलेय…पुर्वजांच्या वैमनस्यातून सुडाच्या भावनेने तिला त्या गावातला रशीद नावाचा मुसलमान पळवून नेतो…. हा रशीद मनाने अतिशय चांगला आहे…. त्याच्याकडे राहून आलेल्या पुरोला घरी कोणी स्विकारायला तयार नाही… नाईलाजाने पुरोचा रशीदशी निकाह होतो, तिला त्याला स्विकारावं लागतं …. परिस्थीतीपुढे शरण गेलेली तरिही स्वत्व जपणारी…. खंबीर, लढावू वृत्तीची पुरो … आणि शेवटी ’रशीद’ च्या चांगूलपणामूळे, त्याच्यातल्या व्यक्तीची ओळख पटल्यानंतर त्याला शोधत धावणारी , त्याच्या नावाने हंबरडा फोडणारी एक साधी , हळवी स्त्री…. खऱ्या प्रेमापुढे सहज झुकणारी, त्याची कदर करणारी स्त्री !!  उर्मिला इथे ’पुरो ’ हे पात्र जगलीये… मात्र त्या पात्रात अमृता शोधता येते इतका तिचा ठसा मनावर उमटलाय….

ही पुरो सिनेमात शेवटी म्हणते, ” चाहे कोइ लडकी हिंदू हो या मुसलमान, जो भी लडकी लौटकर अपने ठिकाने पहूँचती है समझो की उसीके साथ पुरो की आत्मा भी ठिकाने पहूँच गयी…. ” !! स्वत: अमृताचे शब्द आहेत हे….

अमृताच्या सगळ्याच नायिका एक नवा प्रश्न सजगतेने सोडवणाऱ्या आहेत…. प्रस्थापितांविरुद्ध बंड करणाऱ्या तर कधी वेगळीच वाट शोधून पहाणाऱ्या…. मात्र त्या ’चुकीच्या’ कधिही नाहीयेत . म्हणजे अमृता एक शहाणपण स्वत:च बाळगून होती म्हणावं लागेल ….. एक सुधारक विचारांनी भरलेलं सुंदर मन होतं तिच्याकडे. तिची बुद्धिमत्ता तिच्या कथेतल्या नायिकांच्या संवादातून आणि त्यांच्या प्रश्न सोडवण्याच्या क्षमतेतून दिसून येते.

स्त्री आणि पुरूषाच्या नात्याबाबत अमृताने तिच्या एका कथेतल्या नायिकेद्द्वारे मांडलेले विचार खूप काही सांगणारे आहेत….

मलिका नावाची ही नायिका आजारपणात दवाखान्यात जाते आणि तिथे एक फॉर्म भरून देतेय ….

वय विचारून झालय , आता डॉक्टर तिला विचारतो ’ तुम्हारे मालिक का नाम ?? ’ .. तेव्हा ही नायिका त्याला खडसावते मी घड्याळ किंवा सायकल नाहिये मला मालिक असायला, मी एक स्त्री आहे….. चपापलेला डॉक्टर तिच्या पतीचे नाव विचारतो…  तेव्हा ती सांगते ,” मै बेरोजगार हूं ! ’”  …..

गोंधळलेला डॉक्टर पुन्हा सांगतो मी तुझ्या नोकरीबाबत विचारत नाहीये … तेव्हा ती त्याला समजावते ,” हर इन्सान किसी न किसी काम पर लगा हूआ होता है, जैसे आप डॉक्टर लगे हुए है, यह पास खडी हुई बीबी नर्स लगी हुइ है ….. इसी तरह जब लोग ब्याह करते है, तो मर्द खाविंद लग जाते है और औरतें बिवीयां लग जाती है ….. वैसे मै किसी की बीवी लगी हुइ नही हूं!!! “

आता मात्र पुरत्या गोंधळलेल्या डॉक्टरला मलिका समजावते , की जगातल्या सगळ्या व्यवसायामधे ’तरक्की’ होते, जसे आज मेजर असलेले उद्या कर्नल होतात, परवा ब्रिगेडियर होतात आणि मग जनरल !! मात्र ’शादी- ब्याह ’ च्या या पेश्यामधे तरक्की होत नाही !!!

’ यात कुठली तरक्की होणार ? ’ असा डॉक्टरचा प्रश्न येतो .

तेव्हा मलिका उत्तर देते , ” डाक्टर साहब हो तो सकती है , पर मैने कभी होती हुए देखी नही । यही कि आज जो इन्सान खाविंद लगा हुआ है , वह कल को महबूब हो जाए , और कल जो महबूब बने वह परसों खुदा बन जाए …. “

किती वेगळा विचार आहे हा…. किती खरा आणि ….. साध्या सरळ सहज शब्दात , एका गुंतागूंतीच्या नात्याला बांधू शकणारी अमृता म्हणूनच इमरोजसोबत विवाहाच्या बंधनात न अडकता एक यशस्वी सोबत करू शकली.

ध्यास घ्यावा वाटतो या लेखिकेचा आणि तिच्या साहित्याचा!!! ’वादळ ’ पेलावसं वाटतं हे ….

खूप लिहावसं वाटतं खरं तर पण आटोपतं घेतेय आता…

एक मात्र खरं की …..

अमृताचं वादळी विचारचक्राचं अत्यंत सात्विक असणं , वेदनेचं पचवणं आणि त्यावर मात करून येताना अजून परिपक्व होणं समजलं की अमृता मनापासून खूप आवडते …. ते समजण्यासाठी तिला वारंवार भेटावं लागतं … विशेष मेहेनत नाही लागत अर्थात, तीचं लिखाणं आणि विचार तशी भुरळ घालतात आपल्याला समर्थपणे  !! 

अमृताचीच एक कविता आहे …. समाजाच्या बंधनांतून स्वत:ला न जखडता स्वतंत्र जगणाऱ्यांच्या व्यथांबद्दल आणि प्रवासाबद्दलच्या तिच्या कवितेतल्या काही ओळी….

पैर में लोहा डले

कान में पत्थर ढले

सोचों का हिसाब रुकें

सिक्के का हिसाब चले ….

और लगा -

आज मैने अपने घर का नम्बर मिटाया है

गली कें माथे पर लगा गली का नाम हटाया है

हर सडक की हर दिशा का नाम पोंछ दिया है …..

गर आपने मुझे कभी तलाश करना है….

तो हर देश के, हर शहर की , हर गली का द्वार खटखटाओ -

यह एक शाप है – एक वर है

और जहां भी स्वतंत्र रूह की झलक पडे

समझना – वह मेरा घर है !!!

And that solves the mystery … माझ्यामते जर समाजातल्या काही रुढी परंपरांविरुद्ध मी बंड करत असेन , चुकीला चूक म्हणू शकत असेन तर माझ्यात ’अमृताचा ’ एक अंश नक्कीच आहे…. तेच नातं आहे माझं तिच्याशी !!!

म्हणून वारंवार मलाही तिला म्हणावसं वाटतं असावं ’ मै तेनू फिर मिलांगी ’ :)

_ लोकसत्तामधे ’फिरूनी पुन्हा भेटेन मी ’ नावाचा रवींद्र पाथरेंचा एक सुंदर  लेख इथे आहे.

( फोटो जालावरून साभार !! )

नवी नजर आणि स्वर्गाचा रंग !!!

मराठी किंवा हिंदी भाषेव्यतिरिक्त इतर भाषांचे चित्रपट मी पहावे असे काही ठरवून झाले नाही, माझा सगळा कारभार ’सहजच’ या सदरात मोडणारा :) .  त्यात या दोन भाषांव्यतिरिक्त इंग्लिश सिनीमे पहाणे म्हणजे ते हिंदीत डब झालेले किंवा सबटायटल्स असलेले असेच आत्ता पर्यंत जणू ठरलेले होते. उगाच कान ताणताणून संवाद ऐकायचे कशाला, हा मुळचा आळशी स्वभावाला धरून असणारा प्रश्न पडायचा आणि मी इतर भाषिक चित्रपटांच्या वाटेला जायचे नाही.त्यामूळे पाहिलेल्या इंग्लिश चित्रपटांची यादी तशी लहानशीच होती / आहे !!

गेल्या सुट्टीत भारतातून येताना विश्वास पाटलांचं ’नॉट गॉन विद द विंड ’ पुस्तक सोबत आणलं…. इतकं अभ्यासपुर्ण नजरेने चित्रपटांकडे पहाता येतं हे नव्याने समजलं !! गणेश मतकरींचा ’आपला सिनेमास्कोप ’ हा ब्लॉगही असाच सिनेमा कसा पहावा हे शिकवणारा. आमचा आनंद पत्रेही त्याच्या सिनेमा कॅन्वासवर अधून मधून रंग भरत असतो :) … कोणे एके काळी हेरंब आणि विद्याधरही लिहीत असत, असे वाक्य इथे टाकण्याचा मोह आवरता घेतेय (वाक्य टाकून झाल्यावर ;) ) !!!

थोडक्यात काय आजकाल मी साहेबाच्या चित्रपटांपासून फारकत घेतल्यासारखी वागत नाही. अधेमधे एखादा चित्रपट पाहून टाकते :)

तर याच नव्या दालनात एक लोभस दालन अचानक उघडलं माझ्यासाठी…. ’माजिद माजिदी’ नावाचं !!! एखाद्या प्रवासाला निघावं, वाट ठरलेली नसावी पण नेमक्या स्थळी जाऊन पोहोचावं असं काहिसं झालं या ठिकाणी !! माजिदीचा ’बरान’ पाहिला आणि लक्षात आलं हे वेगळं रसायन आहे…. हे झेपेल, आवडेल आपल्याला !!!

मी माजिदीबद्दल लिहावं किंवा एकूणात एखाद्या चित्रपटाबद्दल लिहावं असा काही माझा अभ्यास नाही हे माझं मत होतं, अजूनही आहे तरिही आज एक नोंद करावी वाटली म्हणून ही पोस्ट!!!

The Color of Paradise “  …. Rang -e- Khoda … नावाचा सिनेमा पाहिला आणि पोस्ट लिहायला घेतली … हे परिक्षण नाही हे आधि नमूद करायला हवे …. हे आहे एक भारावलेपण !!

मोहम्मद हा आठ वर्षाचा मुलगा… जो पाहू शकत नाही !! तो तेहेरानच्या एका शाळेत शिकतोय . ब्रेल लिपीत भराभर लिहू वाचू शकणारा मोहम्मद हा चुणचूणीत मुलगा आहे. शहर आणि त्या अनूषंगाने येणारे टेपरेकॉर्डर, मोबाईल फोन हे बारकावे लहानश्या प्रसंगातून सामोरे येतात. शाळेला सुट्टी लागलीये, सगळ्या मुलांचे पालक येऊन मुलांना घेऊन गेलेत…. मोहम्मद एकटा आपल्या वडिलांची वाट पहातोय ….. तितक्यात बाजूच्या झाडांमधे पक्ष्याचं एक पिल्लू घरट्यातून खाली पडलय…. त्या पिल्लाला लहानसा मोहम्मद ज्या आत्मियतेने घरट्यात परत ठेवतो ते फक्त पहात रहावे. गंमत म्हणजे डोळ्यांनी सिनेमा पहाताना आपली नजर मोहम्मदच्या त्या पक्ष्यावर अलवार फिरणाऱ्या बोटांबरोबर फिरते. घरटं मोडू नये म्हणून अलगद्पणे घरट्याला तो चाचपडत शोधतो तेव्हा त्याची धडपड मनात उतरते.

मोहम्मदचे वडील (हाशेम ) येतात , ते मात्र त्याला परत नेण्यास उत्सूक नाहीत …. शाळा मोहम्मदला ठेवून घ्यायला तयार नाही… तिथे सुरू होतो मोहम्मदचा घरचा प्रवास. वाटेत बसने, घोड्याने होणारा प्रवास अखेर एका निसर्गरम्य प्रदेशात येतो…. बसमधल्या खिडकीतून मुठीत हवा पकडू पहाणारा मोहम्मद अत्यंत निरागस दिसतो. या प्रवासात जाणवते मोहम्मदचे निसर्गाशी असलेले नाते…. पाण्याच्या प्रवाहातल्या गोट्यांमधे त्याला अक्षरं सापडतात. पक्षी त्याला साद घालतात… डोळ्यांनी पाहू न शकणारा मोहम्मद निसर्गाशी मनमूराद संवाद साधतो.

मोहम्मदचं गाव, घर , त्याच्या विलक्षण सुंदर दिसणाऱ्या लहानश्या बहिणी (हानये आणि बहारें ) , त्याची कष्टाळू आजी सगळच अतिशय मोहक आहे. गावातल्या शाळेत डोळस मुलगा चुका करत वाचतोय एक धडा, आणि मोहम्मदने मात्र ब्रेललिपीत तोच धडा न चुकता खणखणीत वाचलाय…. त्यावेळेस शिक्षकाच्या चेहेऱ्यावरचे झरझर बदलणारे भाव पहाण्याजोगे. शिक्षकाबरोबरच आपण आधिच मोहम्मदच्या हुशारीच्या, जिवंतपणाच्या प्रेमात पडलेलो असतो. त्याच्या नजरेने जग पहायला लागलेलो असतो.

मोहम्मदच्या आजीची त्याच्यावर असलेली माया ठायीठायी दिसते…. तिचे सुरकुतलेले हात मोहम्मदला जगातले सगळ्यात सुंदर हात वाटतात. नातवासाठी राबणारे ते हात खरोखरीच खूप सुंदर आहेत. पुढे ही आजी जेव्हा घरातून निघून जाते तेव्हा रस्त्यात पाण्याबाहेर पडलेल्या तडफडणाऱ्या मासोळीला उचलून पुन्हा पाण्यात टाकते. हा प्रसंग चटकन विसरला जाणारा नाही…. सुरूवातीच्या एका प्रसंगात मोहम्मद चिमणीच्या पिल्लाचे प्राण वाचवतो आणि त्याची प्राणप्रिय आजी इथे तसाच एक जीव वाचवते…. त्या दोघांचं ते घट्ट नातं पहाताना paradise या शब्दाची महती समजते.

चित्रपटात एक महत्त्वाची किनार अजून आहे….

मोहम्मदच्या वडिलांना , हाशेमला दुसरं लग्न करायचं आहे …. त्यांना मात्र हा मुलगा ही या लग्नातली अडचण वाटतेय. एका साध्या कामगाराची  ’मुलगा ’ आणि  ’वैयक्तिक स्वार्थ ’ यातली घुसमट साध्या साध्या प्रसंगातून आणि वाक्यातून पुरेपुर उतरलीये. लग्नाची वेळ जवळ येते म्हणून मोहम्मदला दुसऱ्या गावातल्या एका सुताराकडे त्याचे वडिल सुतारकाम शिकायला पाठवतात. हा सुतार स्वत:ही अंध आहे. या सुताराला मोहम्मद सांगतो , “देवाचं माझ्यावर प्रेम नाही नाहितर त्याने मला डोळे दिले नसते का ?? ” एका लहानश्या मुलाचे ते प्रश्न, समज अस्वस्थ करून टाकतात. हाशेमच्या नजरेत वारंवार दिसणारी स्वत:बद्दलची ’दया’ आणि मोहम्मदचा राग करण्याबद्दल स्वत:ची वाटणारी लाज आणि चिड जाणवतात अगदी!!

मोहम्मदची आजी जग सोडून जाते तेव्हा तिच्यासमोर क्षणभर एक दिव्य प्रकाश चमकतो…. आईच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरत मोहम्मदचे वडिल त्याला परत आणायला पोहोचतात. येताना एका प्रचंड वेगाने वहाणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाजवळ ते येतात. प्रवाहावरचा लाकडी पुल ओलांडताना अचानक तो पुल खचतो आणि मोहम्मद त्या पाण्यात पडतो. त्यानंतरचे त्याच्या वडलांच्या चेहेऱ्यावरचे भाव  अतिशय सुंदर उमटले आहेत. एका क्षणासाठी थबकलेले , ही आपली मोहम्मदपासून सुटका आहे का अश्या विचारात पडलेले वडिल पुढच्या क्षणी प्रवाहात वेगाने वहाणाऱ्या मोहम्मदच्या मदतीला धावतात. चेहेऱ्यावरची ती अगतिकता स्पष्टच सांगते वडलांच्या मनातलं मोहम्मदबद्दलचं प्रेम…. अक्षरश: खिळवणारा क्षण …..

प्रवाहाच्या प्रचंड वेगापुढे हाशेम आणि मोहम्मद हारतात ….. बऱ्याच वेळाने हाशेम शुद्धीत येतो , समुद्रकिनारी  काही अंतरावर त्याला मोहम्मद निश्चल पडलेला दिसतो….. त्याची हालचाल बंद आहे आणि तितक्यात पक्ष्यांचे आवाज येताहेत… आपल्याकडे, कॅमेऱ्याकडे हाशेमची पाठ आहे , त्याच्या कुशीत मोहम्मद विसावलाय…. मोहम्मदचा हात, त्याची बोटं आपल्या दिशेला आहेत…. पक्ष्यांच्या त्या आवाजाला मोहम्मद पहातोय , त्याची बोटं हलताहेत…. एक सुरेख सोनेरी प्रकाश त्याच्या हातावर चमकतोय ….. The Color of Paradise , निसर्गाच्या इतका जवळ असणारा मोहम्मद आता नंदनवनातल्या पक्ष्यांशी बोलतोय!!!

.

.

आपण स्तब्ध… शांत !!!

का आवडला हा सिनेमा इतका की पोस्ट लिहावी वाटली ???

मला वाटतं माजिदीचं अत्यंत साधेपणाने कथा सांगणं हे महत्त्वाचं कारण आहे !! आपली आजी लहानपणी परिची कथा सांगते नं, खूप आवाज नसतो त्यात…. आजीच्या उबेत विसावलेले आपण आणि हळूवार कानावर येणारा तिचा आवाज ….. त्या आवाजाची आठवण माजिदी करून देतो आपल्याला आणि जिंकतो !!! उगाच मोठमोठे संवाद नाहीत, रडारडी नाही… हाणामारी तर नाहीच नाही….. मोहम्मद नकोसा वाटण्याचा , आणि त्याचबरोबर या नकोश्या वाटण्याबद्दल अपराधीपणाने मन पोखरलं जाण्याचा त्याच्या वडलांचा संयत अभिनय असो की मोहम्मदला दुर नेलं तेव्हा मला त्याची नाही पण तुझी काळजी वाटतेय हे त्राग्याने स्वत:च्या मुलाला सांगणारी त्याची आजी असो , अभिनय जेव्हा अभिनय वाटत नाही तिथे आपण गुंतत जातो. लहानश्या प्रसंगातून मोठी कथा सांगण्याची या दिग्दर्शकाची हातोटी खरच वाखाणण्याजोगी आहे.

मोहम्मदला दिसत नाहीये तरिही तो खूप काही पहातो त्याच्या हाताने, कानांनी !!! आपण ते सगळं अनूभवू शकतो अगदी त्याच्याबरोबर… परंतू त्याचवेळेस सभोवतालचा हिरवागार सुरेख परिसर, फुलांचे, झाडांचे, पानांचे , पक्ष्यांचे , आकाशाचे अप्रतिम रंग पडदा व्यापून मनात उतरतात. Paradise ’नंदनवन ’ हा शब्द लागू पडतो इथे. फुलांपासून बनवलेल्या रंगाचे धागे , अनेकरंगी गालिच्यांची आठवण करून देतात. इराणचे गालिचे इतके सुरेख का असतात हे पटतं !!

हा संपुर्ण चित्रपटच एखाद्या कुशल हाताने विणलेल्या रंगीबेरंगी गालिच्यासारखा आहे…. मोहम्मदच्या नजरेने म्हणजे त्याच्या हाताने पाहिल्यासारखा तो आपल्याला तितकाच तरल , हळूवार जाणवतो ….  “दिसतो  ” !!!  भावभावनांचा गालिचा !!! ही नजर नक्कीच मिळवण्याजोगी….. त्याने स्वर्गाचे, नंदनवनाचे रंग पहायला हरकत नाही!!

माजिद माजिदीच्या चित्रपटांच्या, दिग्दर्शनाच्या प्रेमात पडलेय मी सध्या …. एक नवी नजर मिळतेय, एका जुन्या ओळखीच्या माध्यमाची एक नवी ओळख होतेय …. तसेही कोणाला नकोय सांगा बरं वाऱ्याची अलगद, मंद झुळूक , पकडता न येणारी तरी जाणवणारी आणि मोहात पाडणारी … !!! :)

(फोटो जालावरून साभार !! )

जगातल्या सगळ्यात उंच इमारतीच्या १२४व्या मजल्यावरून…..

गेल्या पोस्टमधे म्हटलं होतं की नव्या वर्षाची सुरूवात बुर्ज खलिफाच्या १२४व्या मजल्यावरून करायचा बेत आम्हाला बुकिंग न मिळाल्यामूळे पुढे ढकलावा लागला होता, तो अखेर ६ तारखेला पुर्ण केला आम्ही !!!

बु्र्ज खलिफाच्या नावासोबत दिलेल्या विकीमातेच्या लिंकवर त्याबद्दल बरीचशी माहिती आहेच. तशीच माहिती मागे देवेंद्रने त्याच्या ब्लॉगवर इथे लिहीली होती.

दुबईत गेल्यानंतर दुरवरून दिसणाऱ्या या इमारतीबाबत कायम कुतूहल वाटत होते. त्यात तिचे आधिचे ’बुर्ज दुबई’ हे नाव बदलून ’बुर्ज खलिफा’ होण्यामागे, अबूधाबीच्या खलिफाने ( राज्यकर्त्याने )या इमारतीसाठीचे कर्ज फेडण्यासाठी दुबईला केलेली आर्थिक मदत हे कारण आहे समजल्यावर तर आता ही इमारत दुबईत असली तर अबूधाबीचा मात्र तिच्याशी संबंध आहे असे वाटले :)

अबूधाबीतून सकाळी निघाल्यावर तासाभरात दुबई मॉलमधे पोहचता येतं. तिथलं aquarium आणि Under water zoo पाहिल्यावर , दुबई मॉलच्याच दुसऱ्या बाजूला असणाऱ्या बुर्ज खलिफाच्या प्रवेशद्वाराशी आम्ही पोहोचलो.

बुर्ज खलिफाची दिशा दाखवणारा बोर्ड

:)

At the Top या प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर जिथे तिथे बुर्ज खलिफाच्या प्रतिकृती आहेत. मला खरच उत्सूकता होती ती एका मिनिटात १२४ मजले चढून जाणाऱ्या जगातल्या सगळ्यात वेगवान लिफ्टमधे चढण्याची. तिथपर्यंत पोहोचताना UAE बद्दल माहिती देणारे स्लाईड्स ही एक सुरेख सोबत होती !!!

आम्ही लिफ्टसाठी थांबलेलो असताना एकीकडे बुर्ज खलिफाची संपुर्ण माहिती दाखवली जात होती. त्यात काढलेले काही फोटो….

हे काही सगळे फोटो नाहियेत अर्थात कारण माझे फोटो काढून होइपर्यंत लिफ्ट आली.

जगातली सगळ्यात वेगवान लिफ्ट समोर आहे :)

लिफ्टमधल्या एका मिनिटात सगळ्यांच्या कानाचे दडे (ज्याला चिरंजीवांनी कानाचे धडे असे नामकरण केले :) ) बसले वगैरे चर्चा सुरू होती… माझ्याबाबत असे काही झाले नाही चक्क…. आपण अखंड बोलत असलो तर कानाचे दडे बसत नसावे असा (जावई)शोध मला लागला त्यादिवशी … आणि तासनतास न थांबता बोलू शकणाऱ्या व्यक्तीला एक मिनीट सलग बोलणं काय कठीण यावर घरच्यांच एकमत झालं :)

आता मात्र मी काही बोलणार नाहीये…. फकस्त फोटो…. खरं सांगते उंचीला घाबरणाऱ्या माझ्यासारख्या व्यक्तीला असं १२४ व्या मजल्यावरून खाली वाकायला लावणं सोप्प नाहीये… पण तिथे असणं हा एकूण प्रचंड अविस्मरणीय अनूभव होता…. प्रचंड शांतता, आणि दुरवर दिसणारं दुबई शहर….. नजर पार क्षितीजावर न्या, कोणतीही इमारत , अडथळा थांबवणार नाही तूम्हाला….निसर्गाने उधळलेले असिमीत रंग आणि त्यात एरवी उंच वाटणाऱ्या मानवनिर्मीत इमारतींची रांग…. रस्ते, त्यावर असलेले अजून रस्ते, आणि लहानश्या दिसणाऱ्या गाड्या … मजा आली सगळं पहाताना !!!

’विमानात बसलेल्या माणसाला वर आकाशातून खाली पहाण्यात काय नाविन्य ’ असं माझ्या शेजारी उभं राहून बोलणाऱ्या पंजाबी बाईला ढकलून द्यावं वाटलं होतं मला क्षणभर… तिला समजावून सांगावं की अगं बये विमान  आकाशात थांबत का तूला एखादी गोष्ट पुन्हा पहावी वाटली तर, अनेक मुद्दे मांडावे वाटले पण समोर दिसणारं मानवाने उभारलेलं आकाशाला गवसणी घालणारं आश्चर्य बाकि काही सुचू देत नव्हतं !!!

पहिला फोटो

सावली :)

रस्ते पे रस्ता, रस्ते पे गाडी … :)

मधे खाली वर गिरक्या घेणारा मेट्रोचा ट्रॅक ..

वर उरलेले ७६ मजले…. यात म्हणे शाहरूख खान आणि अमिताभ बच्चनचे फ्लॅट्स आहेत !!

सोन्याच्या नाण्यावर बुर्ज खलिफाचे चित्र मिळण्याचे ATM :)

डोळ्याचं पारणं फिटेपर्यंत क्षितीज न्याह्याळल्यानंतर , दुर दिसणाऱ्या अरबी समुद्राला मनसोक्त पाहिल्यानंतर ….. इच्छा असेल तर गगनभरारीच नव्हे तर आकाशाला गवसणी घालणं शक्य आहे हे भान मनात आल्यानंतर….. दिव्य असा एक , किंवा शब्दात बांधणं शक्य नाही असा अनूभव घेतल्यानंतर सुरू झाला परतीचा प्रवास …… :)

14 :04 ला १२४ व्या मजल्यावर असणारी लिफ्ट…

14 :05 ला Ground Floor ला पोहोचलेली होती :)

परत येताना जागोजागी बुर्ज खलिफाबद्दल माहिती देणारे बोर्ड आणि प्रतिकृती होत्या. सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे या बांधकामात असणाऱ्या  अगदी मजूर, कामगारांपासून ते ईंजिनीयर पर्यंत सगळ्यांचे जागोजागी नावासह लावलेले फोटो !!

अनेक बाबींमधे जगात ’सगळ्यात पहिल्यांदा ’ आणि ’सगळ्यात उंच ’ असे बिरूद मिळवणाऱ्या या इमारतीतला सुंदर अनूभव देखील मनात आठवणींच्या राज्यात वरचं स्थान पटकावणार हे नक्कीये.

बुर्ज खलिफाचं रात्रीचं मोहक रूप ….

आमच्या देवेंद्रने दवबिंदू या त्याच्या ब्लॉगवर २०१० मधे बुर्ज खलिफाबद्दल ’सहजच’ वर पोस्ट येइल असं भाकित केलं होतं…. ते खरं करताना मात्र २०१२ उजाडावं लागलं :)

पोस्ट लिहावी असा मोह झाला होता एकदा, त्यात माहिती वगैरे टाकावी…. पण अशी अप्रतिम उंची गाठणं हे सामर्थ्य माझ्या शब्दात नाहीये… तेव्हा तुर्तास फोटोच… और कुछ नही !!! बाकि लिंका दिलेल्या आहेतच…. उधर मिलेंगी बरीच माहिती !!! माझं म्हणणं एकच, जिथून एकाच वेळी मानवनिर्मीत आश्चर्य खुजे वाटावेत आणि त्याचक्षणी मानवाच्या ताकदीला सलाम करावासा वाटावा अश्या ठिकाणी मी तास दिड तास  होते :)

तळटिपा :

गेल्या एक दोन पोस्ट जरी मी प्रवासवर्णनं लिहीत असले तरी आम्ही भारताबाहेर रहाणारे कसे ग्रेट वगैरे काहिही किंतू माझ्या मनात नाही बरं !! हे उगाच शहाणे करावे सकल जना , आणि जे मला भावले ते पोहोचवण्याचा मार्ग आहे म्हणून इथे येतेय !! (हे झाले नव्याने ब्लॉग्स वाचणाऱ्यांसाठी )

घाबरू नका, वाळवंटातले आश्चर्य यावर आश्चर्य आणि वैताग वाटावा इतपत मी पिडणार नाहीये बरं ;) ( हे जुन्या जाणत्यांसाठी ) :)