“सुख हे मानण्यावर असतं नाही ” …गुळगुळीत वाक्य आहे हे… अनेकदा ऐकलेलं…. जोवर प्रत्यय येत नाही तोवर ही अशी वाक्यं quotes म्हणून बरी वाटतात, अर्थ मात्र झिरपत नाही…. कधी तरी अचानक सामना होतो या वाक्यांच्या अर्थाशी, मग ती पटायला लागतात…. आपल्या मनाचं प्रतिबिंब कुठल्या तरी अनोळखी मनात पडल्यासारखं वाट्तं…. मग या वाक्यांचे फेसबूकचे स्टेट्स बनते… चार दोन मस्त व्यस्त लोक मग ते लाईक वगैरे करतात….
आज तिला म्हणावं वाट्लं, “सुखं बिख सब झूट… च्यायला दु:ख झालय मला ” … राग राग करायचाय… सगळ्याचा…. ब्रम्हदेवाच्या ते या राज्यकर्त्यांच्या सिस्टिमचा… हवापाण्यापासून ते माणसांपर्यंत सगळ्याचा….
लहानपणापासूनचे अनेक प्रसंग आठवताहेत मग तिला…. कोणाची लबाडी, कोणी केलेली फसवणूक असो की जिव्हारी लागलेल्या अनेक जखमांवर धरलेल्या खपल्यांची पुटं असो ….. आज कारणीभूत व्यक्तींची भले नावं गावं आठवत नाहीत पण बिनचेहेऱ्याच्या त्या सारख्याच मनोवृत्तीच्या लोकांची आठवण होतेय…. अनेक हक्क हिरावलेले, अनेकदा गरजेच्या हाकेला ओ न दिलेले काही बाही एकामागे एक आठवणींच्या रांगेत येतेय….
काल मग ती जेव्हा म्हणत होती की ती सुखी आहे तेव्हा कुठे होत्या या आठवणी ???? आज आठवताहेत भराभर म्हणजे त्यांचं अस्तित्व कालही होतच की, म्हणजे “मी सुखात आहे ” या भावनेच्या बांधाने यांना अडवलं होतं जणू…. आज जरा वाटले तिला की इतर कुठे नाही पण आपल्या मनाशी प्रामाणिकपणे कबूल करावे की आजवरच्या आयूष्यात मी ही कधी एकटी होते, खचले होते, निराश होते.. दु:खी होते!!!! जरा असं वाटू द्यायचा अवकाश की कटू आठवणींची ’टोळधाड’ मेंदूत !! टपलेल्या होत्या त्या बांधावर जश्या….
काहिही आणि कोणिही त्रास देऊ शकतं आज… एरवी ज्यांना ’मुर्ख’ म्हणून सोडून द्यावे असे लोकही काही काळ मनात डॊकावतात…. लोक असे का वागतात??? मी नाही असे वागू शकत ??? लोक फक्त मलाच असे त्रास देतात का?? वगैरे अपेक्षित प्रश्नांचे टप्पे येतात, आणि दु:ख एक एक मजला वर चढतं… कीव करावी वाटणं हा आणि भोज्जा शिवावा लागतो या प्रवासात…. कधी स्वत:ची कीव कधी जगाची… जगाची असेल तर काम सोपे… स्वत:ची असेल तर मदत लगेच नाही मिळत…. मनात एक आवर्त पुर्ण होइपर्यंत सहन करावे लागते ते वाईट वाटणे!!!
साधं मॉलमधे जावं तर आपल्याकडॆ एखादीच वस्तू असते… काउंटरवर मारूतीच्या शेपटायेव्हढी रांग…. कोणालातरी ’प्लीज’ म्हणून काम भागू शकते, नंबर आधि लागू शकतोही…. पण मग तिच्या मनात ’एथिक्स’ नावाचं खूळ डोकं काढतं…. मग रांगेत ताटकळा किंवा वस्तू ठेवून बाहेर पडा…. आपल्याआधिची मंडळी रांगेत उभी आहेत ना आधिपासून, त्यांनाही घाई असू शकते ना हे सत्य आहे…. मग ’सत्याची’ कास वगैरे विचार !!! आपल्याला नाही बूवा जमत काही गोष्टी हे आणि एक दु:ख…..
दु:ख …..दु:ख ….. छोटं दु:ख ….. मोठं दु:ख ….. सगळ्या दु:खाचं मूळ परावलंबन असावे का??? आर्थिक, वैचारिक की मानसिक ???? छोटं दु:ख हे वैयक्तिक…. नी मोठं दु:ख हे सामाजिक … की याउलट हा क्रम…… मोठ्या दु:खात ’सल’ हा एक भलता प्रकार मोडतो…. चॅनलवरच्या ब्रेकिंग न्य़ुज वगैरेंपासून सुरू होणाऱ्या या सलात दादोजींचा रातोरात हटवलेल्या पुतळ्याला स्थान द्यावे, की लोक तर ही घटना विसरून IPL पहाताहेत ला द्यावे ???? मोदीने केलेले घोटाळे आठवावे, आदर्श बिदर्श गाठावे की आपण पार हर्षद मेहेता, तेलगी वगैरे प्रभुतींना आठवावे…. दु:खाला किती कारणं असू शकतात याचे प्रत्यय येत होते तिला……
मुळ मुद्दा असा मग की आपण ’सुखी’ आहोत हे म्हणताना समोर पहातो का फक्त…. डोळ्यांना झापडं लावून….. मागे असते बहूधा ही दु:खाची बाजू….. म्हणजे ती सुखात असताना दु:खातही असते…… किंबहूना सुख आणि दु:खाच्या मधे असते …. जे हवे त्याच्याकडे नजर ठेवायची आणि नको त्याच्याकडे पाठ….. आज ती बहूधा उलट्या दिशेला तोंड करून ’उभी’ आहे ….. शाळेतली कविता आठवतेय तिला आत्ता ‘Never admit your sorrows’ …… वर्षानूवर्षे कटाक्षाने पाळलीये ही ओळ…. कधीतरी आज ती म्हणतेय, “होय मी जरा दु:खी’ आहे गड्या…..
तिला वाटतेय आपण ना मनाला एक घट्ट ड्रेस शिवायचा…. उन वारा वगैरे चटक्यापांसून होरपळ अडवायची या मनाची…. पण मेला या मनाचा आकार सतत बदलतो…. कधी सुईच्या भोकाइतकं क्षुद्र तर कधी समूद्रासारखं विशाल…. पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत सतत आकार बदलणाऱ्या चंद्रासारख्या हे ’मना’ घे मग तूला दु:खाची शिक्षा!!!!
…………..
…………………
…………………………
– अगं हे काय बारा वाजलेत रात्रीचे, तू जागीच अजून ???? आणि चेहेरा का हा असा केलायेस??? … तिचा नवरा विचारतोय!!
– काही नाही झालयं , मला जाम वाईट वाटतय, बोअर होतय… ईन शॉर्ट मी दु:खी आहे….. ती
– “दु:खी” आणि तू … हळू बोल कोणि ऐकेल…. कसलं दु:ख झालय, आणि काय लिहीलयेस येव्हढं तावच्या ताव??? …. थांब मी आलोच मग वाचून दाखव…. नवरा
——–
आलाय तो परत, हातात कॉफीचे मग… (हो कप नाही… ’मग ’…. तिला कपात कॉफी नाही आवडत प्यायला… त्याला काहीही चालतं, त्याच्यामते कंटॆंट महत्त्वाचा
…. वेलदोडा घातलेला दिसतोय… मस्त सुगंध … वाफाळलेली कॉफी…. )
— हं हे घे… आणि आता वाचून दाखव..…… मला सांगा दु:ख म्हणजे नक्की काय असतं .. ईति नवरा…
ती आपलं वरं लिहीलेलं सगळं पुराण वाचते एका दमात….
– थांब थांब, मधे जरा कॉफी पी
…. नवरा
कॉफीचा पहिला घोट पोटाआधि मनात डोकावतो….. वाफाळलेली कॉफी दुखावलेल्या मनावर हळूवार फुंकर घालतेय….. कॉफीच्या गोडव्याचा अंमल मनावरही चढतो हलकेच….. ती पुढे वाचते….
“वैयक्तिक दु:ख कधितरी मग मागेच पडतात…. समाज ते मागे पाडायला भाग पाडतो…. चार वर्षाचं मुलं घरी आलं तरी आई धास्तावल्यासारखी शहानिशा करते, त्याला न समजणारे प्रश्न विचारते… शाळेत बसमधे तूला कोणी हात तर लावत नाही ना???? कोणी काही खायला दिलं तर खायचं नाही हं… कोणी हात लावला तर रागावयचं हं…. ते मुलं बावरतं मग, ते सांगतं बसमधून उतरताना अंकल हात धरून उतरवतो, मग काय करू ???? … आईकडेही उत्तरं नसतात…. अविश्वास दाखवायला ती शिकवत असते….. एक एक ’धडे’ वाढतात… आणि दु:ख ही…. दु:खाचा डॊंगर होतो नुसता….कडेलोट…... “
—
…. थोडक्यात आत्ता या क्षणी तुझं ’दु:ख’ एकदम टॉपला आहे म्हणजे…. हो की नाही…. टॉपला काय असतं, ’टेरेस’
…. तिथून होतो कडेलोट…. नवरा
— हे बघ तूला गंमत वाटतेय ना……
….. ती
(ती अजून दु:खी जरा… पण कॉफी खरच मस्त जमली होती आजची
… दु:खाचा दोलक कमी ते जास्त वर डोलतोय……किंचित हसू चेहेऱ्यावर , म्हणजे कॉफीची चव चेह्ऱ्यावर उमटावी असे काहीसे…नवऱ्याने तिच्या आवडत्या मगमधे, तिला आवडते तशी कॉफी , तिला गरज होती त्याक्षणी आणली याचा परिणाम मनावर झाला होता हे मान्य तिलाही ….)
— आता तू मला खरच सांग या सगळ्या पानभर दु:खात, दु:खाचं मूळ काय ???? …… नवरा
— मुळ ना मुळ आहे ते माणसाच्या प्रवृत्तीत…. स्वत: सुखी होताना, स्वत:चा स्वार्थ पहाताना इतरांचा विचार न करण्याच्या वृत्तीत दु:खाचं मुळ आहे, असतं ……. ती
— झालं मग… अगं जसं charity begins at home तसं लेट सुख अल्सो बिगिन ऍट अवर होमच
…. आपण प्रत्येकाने निदान आपल्यापुरतं असा विचार केला की मी माझ्या सुखासाठी इतर कोणाला दु:ख देणार नाही, की जगावरचा बराच ताण कमी होइल नाही का….
“
– मॅडम अहो आशावादी वागणं हे आपलं बलस्थान आहे त्यावरून ढळू नका…..मान्य, बरच काही नसतं आपल्या हातात, पण जे आहे ते अनेकांपेक्षा अनेक पटीने जास्त आहे , आणि मी सुखी आहे म्हणणारेच सुखी असतात आणि होतात हे स्वत:चे डायलॉग्स तू विसरते हे माझं आता दु:ख झालयं
..खाली त्या डायरीत काय बघतेयेस, समोर बघ माझ्याकडॆ.. .. आणि हो कुठे पोहोचलय तुझं दु:ख, कडेलोटाला ना… करतोच थांब त्याचा कडॆलोट, ढकलतो त्याला सरळ खोल दरीत…. खून करतो आज त्या दु:खाचा…….. .. बोला आता काय म्हणताय ..
……. नवरा
— एक खून माफ
…. ती
(मगाच्या तिच्या विचाराप्रमाणे ’समोर’ची बाजू तर सुखाची होती ……. हा आपल्याला ’समोर’ बघायला सांगतोय, त्याच्याकडे ….
)
(मनाची कॉफीशी घट्ट मैत्री झालीच होती आता…. मन हळूच कॉफीच्या कानात कुजबूजलं … तो जो समोर हसतोय ना तो ’सिरियल किलर’ आहे बरं, अश्या अनेक दु:खांचे त्याने खून केलेत !!!!!
)