घरटं …

(वेळ -  संध्याकाळ पाच वाजलेले … )

– जायचय का तूला आज मॉलमधे ??? बघं मुलं घरी यायला वेळ आहे अजून… तुझी खरेदी आटोपेल तेव्हढ्यात….

– नको रे, आज राहू देऊ या का मॉल ?? मुलं असताना जाऊ या…. तसेही ती वाढदिवसाची पार्टी कधी संपेल कल्पना नाही… नेमके आपण जायचो आणि मुलं यायची…

– अजब आहेस तू ….. अगं आपण जाणार आहोत ना त्यांना घ्यायला… वेळही ठरलीये… त्याआधि कसे येणार ते ??? मुलं असली सोबत मॉलमधे की का वैतागतेस मग, की वर्षानूवर्षे राहिलं इथे तरी मेलं मॉलांमधे कोणकोणत्या गोष्टी मिळतात समजायचच नाही…. मुलं मला काही सुचू देत नाहीत …. एकदा मला मुलं नसताना घेऊन ये तू मॉलमधे… वगैरे वगैरे!!!!

– कळंsssssलं …. गाडी घराकडे ने गुपचूप!!!!

–ठीक आहे….. आणि बये आज शक्य आहे तर लाव ना तुझी लाडकी जुनी गाणी गाडीत….. एरवी मुलं त्यांची आवडती गाणी लावतात तर करवादतेस की काय धांगडधिंगा आहे म्हणून ….

– राहू दे… असू दे हीच गाणी … कुठे शोधू आता माझ्या लाडक्या गाण्य़ांचा पेन ड्राईव्ह…. चालू दे काहितरी….

:)

– माऊ असती गाडीत तर या गाण्याला ओरडली असती, “आवाज वाढवा … :) ” ….

– विचित्र बाई आहेस तू . इतकच समजलेय मला आता…. :) … सांगणार आहे मी आज मुलांना मम्माने तुमची आवडती गाणी ऐकली…

– मी काही ऐकत नाही रे ही गाणी… गप्पा मार बघू माझ्याशी… बोलायचं राहून जातं म्हणतोस ना एरवी… बोल बोल आता बोल!!!!

…………….

……………

( संध्याकाळ -साडे सहा )

– किती वाजले रे…. घरं कसलं शांत असतं नाही मुलं नसली की!!! शाळेत जातात ती वेळ माझी कामात जाते पण नंतर ते नसले की शुकशूकाट होतो घरात नुसता….

– हो का!!! अगं पण पसारा घालतात ना ते ….. ;) … तूच ओरडतेस….

……………

…………..

(संध्याकाळ – सव्वा सात )

– बरं जेवून घेऊ या का पटकन… मग निघू या मुलांना आणायला… .

– हो चालेल…. किती किती वेळ ठेवतात नाही लोक वाढदिवस….. फोन करू का त्यांना की आम्ही येतो लगेच मुलांना घ्यायला…

:) … अरे बातम्या बघ की… जगात किती घडामोडी घडताहेत ना… एरवी कुठे मुलं ऐकू देतात तूला…. एकतर आवाज तरी करतात नाहितर पोगो किंवा कार्टून पहातात  …. मी नाही हं म्हणत हे तूच म्हणतोस मुलांना….. ;)

:) … डाव उलटवलास :)

:)

– श्या आपण दोघेच जेवतोय एकटे , मजा नाही येत… मधे मधे ताटात लूडबूड नाही तर करमत नाहीये….

:) … ओ महाराज दोघं ’एकटे’ कसे असतात हो….. खरं सांगू आपण दोघं आत्ता आहोत आपल्या आई वडिलांसारखे… ते पण तर हल्ली असतात दोघेही ’एकटेच’ …. आपण निदान काही वेळाने मुलांना घरी आणणार हे माहितीये आपल्याला…..

:(

:( … सध्या आपण पिल्लांना चोचीने दाणा भरवणाऱ्या फेजमधे आहोत नाही…. पिल्लं अवतीभोवती चिवचिवताहेत….. मग ती हळूहळू मोठी होतील… नव्हे त्यासाठी आपणही धडपडू….. उंच आकाशातल्या त्यांच्या भराऱ्यांची स्वप्न पाहू…. ते उडतील त्याकडे कौतूकाने पाहू….

:) …. ते ’उडतील’ आणि मग उडून जातील…. वेगळी घरटी बांधतील….. त्याचं काय मॅडम ???

:) बांधू दे…. उलट मी म्हणेन बांधू दे…  जमवू दे एक एक काडी…. पहिल्या काही काड्या पुरवायच्या हव्या तर तू न मी…. आणि ठेवायचं हलकसं लक्ष घरट्याच्या मजबूतीकडे…. त्यांच्या नकळत हं!!! त्यांच्या पंखातली ताकद, जिद्द वाढती ठेवायची…. :)

:)

– मगं पिल्लं त्यांच्या घरट्यात बसतील नी हलकेच मागे वळून पहातील… आई- वडिलांचं घरटं असेल ना नीट असा विचार करतील…. दमले थकले की येतील इथे विसावायला….. :)

:) …. आवरा…. लेडी शेखचिल्ली…. माझं झालय जेवणं…. तुमचा खयाली ’पुलाव’ शिजवा आता गाडीत… मी फोन करून येतो… मुलांना आणायला जाऊया….

– कुचकट … :)

………………..

………………..

( संध्याकाळ – आठ वाजलेले )

– य्येssssss….. मम्मा बाबा …. आम्ही आलो!!!!! :)

:) ….. मजा केली ना पार्टीत….. आम्ही तुमची वाट पहात होतो…..

— जाम जाम मजा आली रे बाबा …  आणि मम्मा वाट कशाला पहायची…. आम्ही येणारच ’असतो’ ना!!!

:) … हो रे… मम्माला सांग हेच पुन्हा एकदा आता  :)

………….

…………

(वेळ रात्रीचे साठे आठ पावणे नऊ ….)

— अरे त्या रिटर्न गिफ्टांच्या पिशव्या नका रे फेकू इथे तिथे….. कपडे बदला…. हात पाय धूवा… आवरा रे….. ते फुगे तर सरळ डस्टबिनमधे जाऊ द्या… कोणी खेळत नाही… लोळतात नुसते घरभरं….. पसारा घालू नका sssssss !!!! मी काय बोलतेय…. कानात शिरतेय का तुमच्या ?????

—- पीं sssssssss!!!!!!!

— बंद करा रे त्या ’पिपाण्या’ ….. लोक पण ना का देतात ही डोकेदुखी देव जा्णे….काय एक एक खुळ निघतं नवं नवं …..

— मम्मा आपणही माऊच्या बड्डेला दिल्या होत्या हं या … उगाच बोलू नकोस….

— हो ना दिल्या होत्या ना… नाही दिल्याचं होत्या… लोक माझं डोकं दुखवतील मग मी का त्यांचे कान किटवायचे नाहीत!!! …. तुम मेरे बच्चे को पिपाणी दो मै वहीच म्हणजे वैसीच दुसरी तुम्हारे बच्चे को दुंगी…. मराठी बाणा आहे हा!!!

— मम्मा तू पण ना :)

– कळंलं ना मम्मा पण काय ते… चला झोपायला…..

– नशीब तुझं बाळा कळली तूला तुझी मम्मा… मला अजूनही कोड्यात टाकते ती…..  मुलं असली की त्यांच्यावर रागवते आणि नसली की कधी येतील याची वाट बघते…. चालू दे माते तुझे अखंड :)

– चूप रे तू…. असेच असते हे,  पिढ्यानूपिढ्या हेच घडणार असते…. उगा मला बोल लावू नकोस!!!

………………

……………..

(वेळ रात्रीचे दहा )

— मम्मा जुन कधी येईल ????

— मम्मा झालं हिचं सुरू….. आधि विचारायची आपण ईंडियाला कधी जाणार?? तू सांगितलस जुनमधे तर आता सारखी विचारते ’जुन कधी येणार ??? ’ …

— आता लगेच येणार हं जुन… लवकरच…. झोपा बघू आता….

— मम्मा मला नानीची आठवण येतीये….

— मम्मा मलापण मी पण मिस करतोय त्यांना…. ते पण आमची आठवण काढत असतील ना…. कधी येइल जुन असे वाटतेय मलापण…

:) हं….

– पण मम्मा आपण सगळे असे वेगवेगळे का रहातो…. ते पण दुसऱ्या दुसऱ्या कंट्रीमधे ??? सगळ्यांना एकाच ठिकाणी जॉब का नाही करता येत???

— मोठं होणं म्हणतात बाळा याला….. असू दे, नंतर सांगेन सगळं … झोपा आता… उद्या शाळा आहे!!!!

— ए मम्मा नानीच्या घरामागच्या नारळाच्या झाडावर सुगरणीने घरटे बांधले असेल ना…. ती खाऊ आणत असेल आतल्या पिल्लांसाठी…. मम्मा, मागच्या वर्षीची पिल्लं आता मोठी झाली असतील ना… धमाल!!!!

:) …. हो रे बाळा झालीयेत पिल्लं मोठी…. आता ती वेगळी रहातात…. सुगरणीच्या पिल्लाने मात्र पुन्हा एकवार सुंदर ’घरटं’ विणलय ., तसच अगदी मऊसूत, उबदार… मस्त झोका असणारं ..मन लावून , जिद्दीने. काडी काडी पारखून जमवून…. माहितीये तिला  पिल्लं मोठी होणार मग भुर्र्कन उडून जाणार एक दिवस… तरिही….

आणि आता मोठ्या सुगरणीची पिल्लं उडत उडत त्या घरट्याकडे धाव घेणारेत , विसावायला… जगण्याची , उडण्याची जिद्द पुन्हा पंखात साठवायला!!!!!!!!!!!! :) ….


—- :) … मिसेस. सुगरण झोप आता !!!  :)

— गुडनाईट मि.सुगरण  !!! :)

खो…..

छळ मांडलाय या खो प्रकरणाने गेले काही दिवस……. म्हणजे ’मला झोप येत नाही माझे चैन गायब झाले ssssss’ अशी अवस्था झाली होती…. (वरील ओळी ’मुझे निंद ना आये मुझे चैन ना आये’ या गाण्याचे भाषांतर आहे….. :)

थोडक्यात पुढे वाचायचे की नाही ते इथेच ठरवा… ;)  नंतर डोके दुखायला लागल्यास , चिडचिड झाल्यास, आपला वेळ वाया गेला असली काही भावना आल्यास माझा अजिबात दोष नाही…. ईथवर आला असाल तर स्वत:च्या जबाबदारीवर पुढे वाचा!!!! शक्यतो भिंतीजवळ बसा नंतर डोके आपटावे वाटल्यास सोयीचे होईल …. :)

तर सुरूवात झाली ती गाणे निवडण्यावरून…. जाम सुचत नव्हते….. न्युनगंड कशाला म्हणतात ते समजले अक्षरश: ……तरी घाईघाईने श्रीताईच्या आधि उरकतेय हा प्रकार म्हणजे तिने केलेला सुंदर अनुवाद वाचून लोक इथला मानसिक छळ विसरतील :)

भाषांतर या शब्दाचा अर्थ निवडलेल्या गाण्यासाठी आपली ’भाषा’ आणि मुळ अर्थापासून जरासे (लक्ष द्या खूप नाही) ’अंतर’ असा सोयिस्कर लावून घेतल्यावर जरा हुश्श केले आणि म्हटलं ,”आने दो!!”   :)

निवडलेल्या गाण्याची गायिका कू/सौ. (माहित नाही) शनाया ट्वेन आहे…. मला साहेबाच्या भाषेतली बरीच गाणी आवडतात आणि समजतात (असा माझाच समज आहे…. स्वत:बाबतीत मला कुठलाही समज असू शकतो …लोकशाही आहे!!! ) …

गाणी हा प्रकारच तूफान फ्येव्हरेट असणाऱ्या माझ्यासारख्या गद्य व्यक्तीने (मला आमच्या थेअरी सबजेक्टमधे नेहेमी बरे मार्क असायचे :) ) ही असली तोडमोड करू नये खरं तर पण कभी कभी मेरे भी दिल मे खयाल येतो की ’का नाही करायचे?  करून बघू एकदा ….’

मुळ गाणे, (मुद्दाम लिरिक्स वाले गाणे टाकलेय… सगळेच माझ्यासारखे हुशार नसले मग!!! आणि खर्राखुर्रा विडिओ टाकला तर या गाण्यांमधे मधेच केव्हा काय येइल भरवसा नाय बा.. तेव्हा लिरिक्सच बरे!!!! )

आठवणींच्या राज्यातल्या त्या,

ओळखीच्या वळणावर…..

नेहेमीच मग पुन्हा विचार येतो…..

अजुनही तूच आहेस,

ज्याच्यात गुंतलाय श्वास……

सुख् दू:ख रागलोभाच्या पलीकडल्या या ,

नात्याचीच आपल्याला आस…..

आठवतं तूला ,

प्रवाहात मन मारून धारा न होता……..

प्रवाहाविरूद्ध पोहून राधा व्हायचा,

निर्णय मी घेतला जेव्हा…….

निरूद्योगी अनेक सरसावले ,

सोपं नाहिये बरं का!!

येता जाता म्हणु लागले…..

सोपे नसतात बघ सारे रस्ते,

ओळखीच्या रस्त्यांवरही तर असतातच खड्डे……

अनोळखी रस्त्यांची खुमारी नवी,

निदान नव्या ठेचा लागतात पायी……

नियतीचे निर्णय नी प्राक्तनाची मर्जी,

यावर का ठरायचे सारे….

फसव्या कल्पना नी खुळचट भावना,

यापलीकडले आयूष्यच न्यारे!!!

आठवणींच्या राज्यातल्या त्या,

ओळखीच्या वळणावर…..

नेहेमीच मग पुन्हा विचार येतो…..

कधितरी पुन्हा घ्यावा हातात हात,

सांगावे तूला मनापासून आज…..

माझ्यातल्या मी ला,

तुझ्यातल्या तू ने जपले…..

तुझ्यातल्या तू साठी,

मी जगाशी भांडले…..

खरयं रे अगदी खरयं,

अजुनही तूच आहेस,

ज्याच्यात गुंतलाय श्वास……

सुख् दू:ख रागलोभाच्या पलीकडल्या या ,

नात्याचीच आपल्याला आस….. :)

हुश्श!!! संपले … सुटले एकदाचे…….

(नेहेमी हा ब्लॉग आणि पोस्टा वाचणाऱ्यांनो ..नवे जर कोणी आले तर त्यांचा विचार करा रे!!! तुम्हाला हा अत्याचार सहन करायची सवय आहे… ;) )

आवरा आवरा हे ’खो आवरा!!!! :)

(तळटीप:  अमित (अस्मादिकांचे मंगळसुत्र) बाबा रे ईतर कोणाला समजो न समजो तूला नक्की समजेल रे मला काय म्हणायचेय!!!)

माझा खो शिनूला ….