Moral…

आईने मुलीच्या, ” गोष्ट सांग ना ” या हट्टासाठी सांगितलेली एक गोष्ट… नेहेमीची गोष्ट नको , नवी सांग या जोडहट्टासाठी आईने स्वत:च बालपण शोधलं आणि त्यातली जी गोष्ट पटकन आठवली ती सुरू केली सांगायला ……

दोन मित्र असतात. एका जंगलातून ते जात असतात…. जाता जाता त्यांना उशीर होतो. गप्पागोष्टी करत मित्र पुढे जाताहेत….. अचानक त्यांना एका अस्वलाचा आवाज येतो….. पहिला मित्र चटकन झाडावर चढतो, दुसऱ्या मित्राला काही झाडावर चढता येत नाही….. तो पहिल्या मित्राकडे आशेने पहातो पण पहिला मित्र काही त्याच्या मदतीला धावून येत नाही…. तो स्वत:चा जीव वाचवत झाडावर थांबतो.

दुसऱ्या मित्राची होते आता पंचाईत…. जीव तर वाचवायला हवं, अस्वल जवळ जवळ येत आहे….. तितक्यात त्याला सुचते एक युक्ती…. तो चटकन जमिनीवर आडवा होतो, श्वास रोखून धरतो…. अस्वल जवळ येतं त्याच्या… त्याच्या भोवती गोल फिरतं….. अस्वलाला वाटतं हा माणूस काही जिवंत नाही…. मग अस्वल थोडं घूटमळून तिथून निघून जातं……

दुसरा मित्र खुश होतो कारण त्याचा जीव वाचतो… त्याची युक्ती छान असते अगदी!!!

उगा आईच्या मनात एक विचार डोकावतो आपण एक झाड आणि समोर कोवळं कोवळं एक रोप  :)

आई इथे थांबते जरा ….. पुढची गोष्ट सांगायचीच असते आईला की मग पहिला मित्र दुसऱ्याला विचारतो की ’अस्वलाने तुझ्या कानात काय सांगितले ? ’

तितक्यात समोरची पाच वर्षाची लेक विचारते ,  “मम्मा गोष्ट छान आहे ही, पण या स्टोरीचं moral काय ? “

शाळेतली शिक्षीकेने सांगितलेली गोष्ट संपली की ’Moral of the story ” ऐकायची सवय लागलेली लेक या गोष्टीचा ’बोध’ शोधू लागते.

आई आपलं जुनं ऐकलेलं आणि त्यावर स्वत:चा विचार करता येइल का याचा विचारही न केलेलं moral सांगते, की जाता जाता किनई त्या अस्वलाने दुसऱ्या मित्राच्या कानात सांगितले की संकटात आपली मदत न करणाऱ्यांशी मैत्री करू नये.

गप्प बसावं नं इथे आईने पण तसं होत नाही, आईने पहिल्यांदा ही गोष्ट ऐकली त्याला मोठा काळ लोटलेला असतो , आयुष्यात मैत्रीचे अनेक भले बुरे अनूभव गाठीशी बांधलेली आई मनात उगाच सकारात्मक-नकारात्मक तुलना करते.

भले अनूभव असले तरी बुरेच आठवून ठेवण्याची मोठ्या माणसांची त्रासदायक खोड आईलाही असते. आई मग पुन्हा बोलते, नाहीच करू स्वार्थ्यांशी मैत्री, मैत्रीच्या व्याख्येत न बसणारे दुरच ठेवावे…. आईने संकटात मदत केलेली असते, किंवा संकटात मदत घेतलेली असते…. पहिल्या प्रकारात लोकं जाणिव ठेवत नाहीत हा त्रास तर दुसऱ्या प्रकारात लोकं मदत तर करतात पण नंतर त्रास देतात असा काहिसा अनूभव ….. उगा मनस्ताप देतात लोक…वगैरे वगैरे!!

.

.

.

समोर जीवन नुकतचं उमजून जगायला लागलेलं छोटसं रोपटं हलके हलके डोलतं . खुदकन हसतं आणि म्हणतं, ’नो मम्मा असं नको करूया आपण मॉरल :)

समोरून ठसक्यात मग वाक्य येतं …..

“आपण असं करूया की जेव्हा आपण आपल्या फ्रेंड सोबत असतो आणि त्या फ्रेंडला झाडावर चढता येत नाही तेव्हा आपण आधि त्याला झाडावर चढायला हेल्प करायची आणि मगच आपण चढायचं… आपल्याला येतच असतं नं चढायला मग आपण पटकन चढू शकू !!! “

:) :)

रोपट्याला हेच moral आवडलय असं रोपटं जाहीर करतं !!!

जुन्या मॉरलपेक्षा नवं खूप सकारात्मक असतं….. असणारच , जुनी गोष्ट सांगणारा / री नक्कीच कोणितरी मोठी व्यक्ती असणार नं , आईसारखी वयाने मोठी झालेली जराशी …. टक्के टोणपे पचवलेली …. आयूष्याच्या स्वच्छ सुंदर आरसपानी पाण्यात काही गढूळ ओघळ नाईलाजाने सहन करणारी  !!!

आईला क्षणभर गंमत वाटते…. आपण लहानपणी समोर दिलेलं मॉरल न स्विकारता स्वत: शोधलं असतं तर असेच शोधले असते का हा नवा गुंता येतो मनात :)

खरेखूरे जंगल लोप पावले ,त्याजागी आलेल्या सिमेंटच्या जंगलातही असतीलच नं चढता न येणारी माणसं !!! कधी आपण पहिला मित्र असणार कधी दुसरा, हे होतच रहाणार……

मॉरल बदललेलं पिल्लू लागतं नव्या कामांना …. सळसळता उत्साह एक आईच्या अवतीभोवती बागडत असतो. मोठ्या झाडावर हलके हलके डोलणारी वेल जशी एक… उंच झेपावू पहाणारी, सदैव वर नजर असणारी ……

तिच्या अस्तित्वातली उर्जा जून्या झाडाला देऊ करणारी!!! एक हलकसं हसू नकळत आणि अगदी सहज देणारी उर्जा !!

जीवन खूप सुंदर असावं , त्यात कुठलंही संकट येत नसावं ….. मैत्रीचा धरलेला हात घट्ट असावा, आलच समजा अस्वल तर आपला मित्र आपली किंवा आपण मित्राची मदत करावी असं सहज सोपं तत्त्वज्ञान असणारी…… :)

आईला एक ’बोध’ देणारी आईची लेक उद्या नवी कुठली गोष्ट असणार या विचारात मग्न होते एकीकडे ……

आईचं मन मोठं खोडसाळ….. तिच्या समोरचं निरागस आयूष्य मोठं होत असच आपल्यासारखं नकळत नकाराकडे झुकेल की काय अशी शंका आईच्या मनात ?? जंगल तर आहेच की अवतीभोवती ….. जंगलातल्या प्राण्यांचे गूण असलेली माणसाचा मुखवटा घातलेली वृत्ती आलीच ओघाने…. कसा जपावा हा अखंड उर्जेचा  स्त्रोत ??? आई प्रश्नांची मालिका स्वत:च गुंफते आणि स्वत:च तिच्यात गुरफटते….

जीवनाने नवा मार्ग स्विकारलेला असतो… ते वाढणारंच असतं…. हिरवी हिरवी नवी पानं जुन्या वठलेल्या झाडालाही आणण्याची ताकद ऋतूत असतेच…. आपणही तर आयूष्यात चांगूलपणावर विश्वास ठेवतोच…. आईच मनं अजून अजून विचारात :)

पिल्लू कुठूनतरी सहज झेपावतं आईकडे …. आईला मग ते आरश्यासमोर नेतं … काहिबाही बडबडतं, आईचीच नक्कल करतं , ठामपणे पुन्हा एक दावा करतं , ” मी मोठी होऊन फक्त माझ्या आईसारखीच होणार ” :)

त्या कोवळ्या मिठीतली ताकद सगळे विचार थोपवतात ….. आपलं पिल्लू नवा विचार करू शकतय, हे नवं रोपटं रूजू पहातय या विचाराने आई सुखावते .

खतं-पाण्याची जबाबदारी टाळून चालणार नाही , ऊनवाऱ्याची सवय व्हायलाच हवी… वाढ पुर्ण झालीच पाहिजे…. आई पिल्लाकडे पहाते आणि स्वत:लाच बजावते.

आईमधल्या क्षणिक नकाराचाही पार पार निचरा होतो….

आयूष्य नकारासाठी नसतेच मुळी आणि याचा विसर पडू न देण्यासाठीच समोर आपल्या पिल्लांच्या रूपातलं सृजन साकार होत असतं, असा नवा ’बोध’ … अहं अहं बोध नव्हे ’Moral’ आईला मिळतं :)

आई आज पिल्लाच्या कुशीत विसावते  ….. झाडावर चढणं विसरलेल्या आईला पिल्लाने आज मदत केलेली असते  :)

उद्या कोणती ’नवी’ गोष्ट आणि नवं Moral या विचारात मग त्या दोघीही रमतात ………………………. :)

एक आहे आई….

एक नं आई आहे….. मुलावर फार प्रेम करणारी…. मुलं सर्वस्व वगैरे मानणारी….. मुलांमधेच रमलेली…. इतकी की मुलांच्या आवडीनिवडींच्या नादात स्वत:ला नक्की काय आवडत ते ही विसरलेली…… अचानक विचारलत नं तिला की कुठला गं तुझा आवडता रंग तर नक्की गडबडेल बघा ती…..मुलांवर रागावणारी, चिडचिड करणारी आणि मग स्वत:वरच रुसणारी……

परवा म्हणे गंमतच झाली …. आईच्या मुलाला एक कॅलेंडर मिळालं….. पिल्लू खुश झालं….. आईला म्हणे सगळ्यांचे वाढदिवस लिहून ठेवतो यात….. आई भलतीच खुश झाली, मनात म्हणाली…. अगदी माझीच सवय आली बघा माझ्या मुलात….. कॅलेंडरमधे सगळ्यांचे वाढ्दिवस लिहून ठेवायचे, कध्धी म्हणून विसरायचे नाहीत!!!! किती आनंद असतो कोणी न विसरता वाढदिवसाला शुभेच्छा दिल्या की….. तरी आजकाल सोपं झालय सगळं…. रिमाईंडर नावाची भानगड आल्यापासून रिमेंबर म्हणून काही करायला नको…..मी तर पुर्वीही लक्षात ठेवायचे सगळ्यांचे वाढदिवस :)

जुन्या आठवणींमधे रमली आई आणि लागली कामाला…. तितक्यात तिकडून आला तिचा मुलगा म्हणाला, “आई झाले वाढदिवस लिहून!!! ” ….  थांब तूला सांगतो दर महिन्यानूसार…… येता येता जुलै महिना आला… आईने नकळत कान टवकारले…. मनूष्यस्वभावच तो…. मुलगा आता आपल्या वाढदिवसाची नोंद सांगेल म्हणून आई ऐकू लागली!!!! इथेच झाला सगळा घोळ… पिल्लूच्या जुलैमधे जन्माला आलेल्या मावसभावाचे नाव आले आणि त्यापुढे कोणाचे माहितीये, कतरिना कैफचे :) … संपला की जुलै महिना!!! आता मात्र मातोश्री उडाल्याच, त्यांचा जुलैतला जन्म या कॅलेंडरमधे काही दिसेना ….. हळूहळू पिल्लूच्या कॅलेंडरने डिसेंबर गाठलं आणि मातोश्रींनी किचन….

मला म्हणाल्या, “पाहिलस सगळं सगळं लक्षात आहे या मुलाच्या आणि माझा वाढदिवस अगदी विसरला बघ हा!!! ” …. डॊळ्यातलं पाणी दिसलं मला मासाहेबांच्या म्हणून आवरलं थोडं नाहितर वाटलं होतं विचारावं , “नक्की कसलं वाईट वाटलय, तुझा जुलैतला वाढदिवस विसरल्याचा की कतरिनाचा लक्षात ठेवल्याचा ??? ;) ” …..

ही आई हिरमुसली होती हे मात्र खरं….. बड्डे हॅपी कधी होतो तर जेव्हा तो सगळ्यांच्या आठवणीत असेल आणि ज्याच्या जन्माने आपला पुनर्जन्म होतो त्याच्या तो लक्षातही येऊ नये…. बरं संपुर्ण वर्ष उलटून झालं पण आपण आईचं नावही घेतलं नाही हे ही या मुलाला जाणवू नये….. आई रुसलीच जरा!!! आता हिला समजावू तरी काय मलाही लक्षात येइना….. सहज विचारलं, “का गं त्या बयेचा बड्डे कुठून मिळवला गं याने??? बरं ती ही नेमकी तुझ्याच महिन्यात??? ” … म्हणाली, ’गुगल गं, गुगलवरून शोधला म्हणे :) ’ …. “मुलगा मोठा होतोय नाही तुझा…. ” सहज म्हणून पाहिले….. तेव्हा जराशी हसली मग आई!!! चेहेरा खुलला तरी बिनसलेलं सगळं निस्तरलं नाहीये याची मलाही जाणिव होतीच…. त्यात आज आईबाईंना जराशी कणकण होतीच…. संध्याकाळी बरेच जण जेवायला बोलावलेले…..

आईने हिरमुसलेपण ठेवलं बाजूला न लागली कामाला…. तिने एक क्रोसिन घेतली ते पिल्लूनेही पाहिलं…. संध्याकाळ झाली… ठरल्याप्रमाणे पाहूणेही आले…. घरात मस्त गोंधळ सुरू झाला… मुलांची मस्ती…. पुरूषांच्या आपापल्या कंपन्या कश्या वाइट ठसवण्याच्या गप्पा तर बायकांच्या ’अगदी हो माझी मुलंही असेच वागतात’ वगैरे म्हणत तमाम मुद्द्यांवर एकमताच्या पण मुलं आणि संसाराच्याच गप्पा सुरू झाल्या…..

जेवणाची ताटं वाढणं सुरू झालं…. तितक्यात मुलांच्या ओरडण्याचा आवाज आला…. ’कहाँ जा रहा है तू… रूक ना…. ” …. गर्दीकडे बघितलं तर आईचं पिल्लू धावत, धापा टाकत बाहेरून आत आलं आणि म्हणालं, “हे बघ इतरांना वाढशील तेव्हा वाढ, आधि तू खा काहितरी… दुपारी बरं नव्हतं ना तूला… गोळी घेतलेली आहेस विसरू नकोस!!! ” …. आईने हसून मान हलवली न पिल्लू धुमकेतूसारखं पुन्हा बाहेर पळालं!!!! :) आई मग स्वत:शीच हसली… बाकिच्या आया म्हणाल्या , “so sweet of him” वगैरे….. आईने मान हलवली फक्त!!!!

पाहूणे गेल्यावर आवराआवर करताना आई स्वत:शीच खुदकन हसली….. म्हटलं, “का गं विसरलं नं तुझं पिल्लू तूला ” …. म्हणाली नाही गं, असं कसं विसरेल…आईला विसरतं का कधी कोणी ????

म्हटलं , “बघ बूवा, दुपारी तुच नाराज होतीस…. नाही सध्या ’आई’ आहेस तर हिरमुसली होतेस उद्या ’सासू’ होशील तेव्हा रागावू नकोस मुलावर म्हणजे मिळवली!!! “

“म्हणजे….काय म्हणायचय काय तूला?? ” आई नेहेमीप्रमाणे कंन्फ्यूज झाली!!!

“अगं आपलं मुलं म्हणजे आपण ’जन्माला घालतो ’ तो जीव….. तुझं प्रेम, माया, मुलांसाठी स्वत्व विसरणं सगळं मान्य मला…. पण ते जितकं नैसर्गिक आहे नं तितकच त्या मुलाचं स्वतंत्र जीव म्हणून वाढणंही नैसर्गिक आहेच की!!! त्या प्रवासात तूला तो अनेकदा गृहित धरेल , आज धरलं तसं…..पण त्याचा अर्थ तो तूला विसरला असा होत नाही हे तू विसरू नकोस!!! राहिलं असेल ते वाढदिवसाचं ….आणि मला कल्पना आहे हे तूलाही समजतय…. पण आज हे ’समजणं’ आणि लक्षात येणं जितकं सोप्पय नं तितकं ते कायम राहिलं पाहिजे मॅडम :) … शिरतय का डोक्यात की नाही…. आज ’आई’ आहेस उद्या ’मुलगा मला विसरला’ हे सुनेमुळे असं वाटणारी खाष्ट सासू होशील!!! “

“कैच्याकै…. कुठून कुठे पोहोचतेस गं….. पण माझं पिल्लू खेळण्याच्या नादातही मला  विसरलं नव्हतं बघ….. तुझं आपलं भलतंच ’क्योंकी सास भी कभी बहू थी!! ” ;)

“ठेव तूझी एकता तूलाच…. आम्हा मराठी लोकांना फार पुर्वीपासून माहितीये हे…. म्हणून आम्ही ’सासू’ म्हणतो….. सा(रखी) सू(न) …. सूनेसारखीच एक स्त्री… बये मुलगा तूला गृहित धरू शकतो हे तुझं यश … मोठा होताना, आयूष्याच्या टप्प्यांवर गोंधळताना, सावरताना, तो सोडेलही तुझा हात कधी, तेव्हा तू धर त्याचा हात….. आणि मुलगा आहे नं तो तुझा…….. सरळ कान पकड न विचार का रे माझा बड्डॆ विसरलास का गधड्या म्हणून….. तू न बोलता त्याला सगळं समजावं अशी अपेक्षा करून नंतर ते तसं झालं नाही म्हणून मुळूमूळू रडू नकोस……. बाकि ते ’कतरिना’ प्रकरण आवडलं बघ मला…. तूझ्या रूममधेही शाहरूखचा मोठा फोटो होता विसरलीस वाटतं!!! ;)

:) :) … होता ना शाहरूख होता, माधवन होता… बरेच होते :) ” आई म्हणाली!!!

दुपारचा आलेला किंचित ताणही आता अगदीच निवळला होता… आणि पुढे येऊ शकणारे अनेक ताणही बहूतेक मातोश्री आता हॅंडल करू शकणार होत्या समर्थपणे :) ….. माझी आता जायची वेळ आली मग…. आईला म्हटलं, “जाते गं आता…. सतत माझ्याशीच बोलत राहिलीस तर लोकं तूला म्हणतील की या बाईला काय मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर आहे की काय ;)

आई कितीतरी वेळानंतर स्वच्छ हसली आणि म्हणाली, “नाही गं ही डिसऑर्डर नाहीये… उलट गोंधललेल्या पर्सनॅलिटीला ऑर्डरमधे आणतेस तू!!! माझ्या डोक्यात शहाणपणाचं पिक येइनासं झालं की तू आणतेस बघ ती कलमं!!! :)

आईला आता तिचा मुलगा म्हणतो , डबा संपवला आज तुझ्यासाठी!!! आई खुश होते न म्हणते, माझ्यासाठीच नाही तर तुझ्यासाठीही गरज आहे हं त्याची….

आईला आता तिचा मुलगा म्हणतो ,अभ्यास केला बघ तू म्हणतेस म्हणून, मला तर आला होता कंटाळा!!!आई खुश होते न म्हणते, माझ्यासाठीच नाही तर तुझ्यासाठीही गरज आहे हं त्याची….

आईला तिचा मुलगा काहिबाही सांगत असतो, आई आता ’गुंता’ न करता ते सगळं ऐकते…. आपल्या आ्यूष्यातलं मुलांच स्थान आईला पक्कं माहितीये पण मुलांच्या आयू्ष्य़ात स्वत:च स्थान ती आता ठरवायला जात नाही…. ती उभी आहे आता ठाम ,चालत्या बोलत्या वृक्षासारखी….

आई आता जराशी शहाणी झालीये, अर्थात ती गोंधळणार नाही असेही नाहिये….. मला मात्र रहावे लागणार आहे पण तिच्यासोबत , कायम!!!! :)

उजळणी…..

पावसानंतर चिरंजीवांच्या फोटोग्राफीला उधाण आलेले….. म्हणे देवमामाला एक फोटो पाठवायचा आहे…. ‘दवबिंदू’ म्हणजे dew drops तर आता शक्य नाही पण तसेच दिसणारे rain drops पाठवतो त्याला….. ‘हो’ म्हणण्याला पर्याय नसतो अश्यावेळी कारण निदान त्यानिमित्ताने का होईना मुलं निसर्गाच्या जवळ जाऊ पहाताहेत :)

आज ईशानने चांदणीच्या फूलाचा एक फोटो काढून आणला…. म्हटलं तर त्या फोटोत विशेष असे काही नव्हते…. एक साधेसे पांढरे फूल, त्यावर पावसाचे थेंब ……

“छान आहे हं फोटो …. ” मी म्हणाले….

“मम्मा एक गंमत दाखवू ….. हा फोटो झूम केला ना की त्या फोटोच्या मधे लाईट लागल्यासारखा दिसतो बघ…..” …..

फोटो नीट पाहिला तर पिल्लू म्हणत होते ते खरं होतं …..

फूलाच्या मध्यभागी खरचं सुंदर प्रकाश दिसत होता……

__”मम्मा देवाने दिला असेल का गं फूलात प्रकाश…..”

__ “हो रे बाळा , देवबाप्पा देतो असा प्रकाश….. सगळ्यांमधेच असतो असा प्रकाश ….. एक दिवसात कोमेजणारे फूल देखील अंतर्यामी असा प्रकाश बाळगून असते तर आपल्यात किती शक्ती असेल…. वेळीच ती ओळखायला हवी ….. देवाने किती विलक्षण बनवलेय आपल्याला…… बाहेरच्या अंधाराला घाबरणारे आपण स्वत:चे स्वयंप्रकाशित असणे विसरतो…..दिखाव्याच्या झगमगाटाची आपल्याला अजिबात गरज नाहीये बाळा…. किती कार्य होऊ शकते आपल्याकडून…. स्वत:ला , स्वत:तल्या शक्तीला विसरायला नको बाळा….”

किती बडबडले मी…. ईशानने ऐकले सगळे… किती समजले त्याला देव जाणे … माझी मात्र उजळणी झाली…

मुलं मोठी होता होता आपल्याला शिकवतातही आणि प्रसंगी उजळणीही करून देतात….

किती चटकन हार मानतो आपण… निराश होतो, परिस्थितीला शरण जातो….. आज मात्र ‘चांदणीच्या’ एका लहानश्या फूलाने आणि माझ्या मुलाने मला स्वत:ची, आणि स्वत:च्या सामर्थ्याची पुन्हा ओळख करून दिली…..

Thank you बाळा!!!

जिंदगीची पहेली…..

प्रिय पिल्लू….

गंमत वाटतेय न तूला की मम्मा अचानक पत्र का लिहायला घेतेय याची…. असू दे, गंमत वाटू दे पण मला बोलायचंच आहे…. म्हणजे नेहेमीच बोलायचं असतं तुझ्याशी….पण तुझ्याबाबतही तुझ्या बाबासारखंच होतं, कितीही बोललं तरी वाटतं आणि थोडा वेळ बोलायचं आहे मला…. बरं बाबाच एक बरय मी बोलताना तो ऐकतो शांतपणे, तुझ्याबाबत ते ही नाही, तू भलता मधे मधे करतोस… का नाही करणार म्हणा, तू माझाच मुलगा… सगळ्या दुर्गूणांबाबत तर अगदी ’सख्खा’ आणि खरं सांगू माझा ’सखा’ही :) ….. तुझ्याशी कायम संवाद होतो माझा…. बोलता येतं तुझ्याशी मला खूप खूप, भरभरून….. तुझा चेहेरा, हावभाव सगळं पहायचं असतं मला मग….. आपण हसतो, बोलतो, कधी कधी आपलं आपलं म्हणूनचं गुपित बाबापासुन आणि जगापासून लपवतो….. मग तू काहितरी बोलतोस आणि गुपचूप डोळा मारतोस, बाबा सतत विचारतो मग तूला की सांग ना मलापण काय गंमत आहे तुमची दोघांची , तू मात्र जाम सांगत नाहीस त्याला….. खरं सांगू बच्चू तू बघत नसताना बाबा हळूच मला डॊळा मारतो मग नी पटकन हसतो कारण त्याला मी सांगितलेली असते ती गंमत….

परवा परवापर्यंत अगदी माझं हेच मत होतं … होतं म्हणू की आहे म्हणू रे बाळा…. ’आहे’च म्हणते तेच छान आहे….

तुम्ही शाळेत जाता ना मग माझी सुरू होते आवरासावर….रोजच्या आयुष्यात घर आवरणे हा एक महत्त्वाचा मुद्दा, तू रागावतोस मला नेहेमी माझ्या या सवयीबद्दल, हो ना!!!  तुमच्या पसरलेल्या वस्तू कधी रागवायला लावणाऱ्या, कधी तुमची आठवण वाढवणाऱ्या….. बरं पुन्हा जेव्हा  तुम्ही “आमचं अमूक ढमूक सामान कुठे ठेवलयेस? ” हे हक्काने विचारायला येता तेव्हा तो एक अनूभव वेगळाच सुखावणारा असतो रे माझ्यासाठी…. आपलं एक ’कुटूंब’ आहे , ज्यातल्या व्यक्ती ’आमच्याकडे किनई हे असं असतं, ते तसं असतं ’ असं काही अधिकारवाणीने सांगू शकतात, त्यातल्या घटकांना घराकडे परतायची ओढ वाटते वगैरे विचार कसे मस्त वाटतात नाही!!! तूला समजत नाहीये ना मम्मा काय बडबडतेय ते…. समजेल तूला मला खात्री आहे, कारण हे पत्र आत्ता लगेच कुठे देणार आहे मी तुझ्या हातात….

तर परवा काय झालं घर आवरत असताना काहितरी कचरा फेकायला म्हणून मी डस्टबीनकडे गेले आणि अचानक माझी नजर बाजूच्या कोपऱ्यात गॅस सिलेंडरच्या मागच्या बाजूला गेली…. तिथे एका तुटलेल्या टॉर्चचे तुकडे पडलेले , ठेवलेले किंवा लपवलेले होते…. ’हा टॉर्च कधी तुटला ?? ” हा प्रश्न पडला मग….. बरं हा तुझा अत्यंत आवडता टॉर्च, मग हा तुटलाय याबद्दल कुठे वाच्यता होऊ नये ….

खरं सांगते बच्चा ते तुकडे पाहिले नी आधि रागावले मी…. तो टॉर्च तूटला हा त्रागा कमी होता बहूतेक त्या रागात, पण तू मला सांगितलं नाहीस हा होता….. तू मला फसवलंस किंवा तू माझ्याशी खोटं बोललास ह्या विचाराने जास्त त्रास होत होता मला….. ते सगळे तुकडे गोळा केले नी व्यवस्थित ठेवले रे मी पण विचार येतच होते बघ मनात… हे सगळं कधी नी कसं झालं की होतय??? मला पत्ता लागू नये साधा….. माझं मुलं माझ्यापासून काहितरी लपवतय.. नव्हे त्याला माझ्यापासून काहीतरी लपवावसं ’वाटतय’ ही गोष्ट विचारात घ्यायला हवी ……

शांत बसले रे बाळा मी …. मग विचार आला की तुला जर खरच माझ्यापासून ही गोष्ट लपवायची असती तर ते तुकडे सिलेंडरच्या मागे जाण्याऐवजी सरळ त्या डस्टबीनमधेच नसते का गेले…. तू ते तसे टाकले नाहीस याचा अर्थ तूला ती बाब माझ्या निदर्शनास आणायची तर आहे पण बहूधा हिंमत होत नाहीये तुझी!!! होतं बाळा असं…. माझंही व्हायचं, आई रागावेल का ही भिती आणि आपलं तर चुकलय काहितरी ही जाणीव कधी आपल्याला खोटं बोलायला लावते वा लावू शकते….. आता पुढचा मुद्दा रे की तूला माझी ’भिती’ वाटतेय….. वाटायला हवी का???? थोडीशी हवी ना… की नको…. विश्वास वाटायला हवा!! ’आदर’ वगैरे शब्द मी आणत नाहीये मधे बाळा….. हो पण ’विश्वास’ या मुद्द्याबाबत विचार हवाच…. की माझ्याकडून काही चूक झाली तर मला माझे पालक समजून घेतील…… ज्याअर्थी ते तुकडे घरात आहेत त्याअर्थी तो ’विश्वास’ आपलं अस्तित्व राखून असावा ना…..

तू शाळेतून आलास….. रोजच्या दिवसासारखाच हा ही एक दिवस गेला…. तुम्ही खेळायला जाऊन आलात….. आल्या आल्या दोघं बहिण भाऊ बडबडत होता एकीकडे नी मी मनात भुमिका बांधत होते….. मग मी तूला विचारलं ,” पिल्लू तुझा टॉर्च कुठेय रे, मला दे ना जरा…. “

तू गांगरलास, म्हणालास , ” का हवाय तूला ?? “

“अरे बेडखाली ना काहितरी पडलेय ते दिसत नाहीये, तुझा टॉर्च भारी आहे म्हणतोस ना तू मग म्हटलं तो बघूया येतो का उपयोगात आज … :)

तू आलास नी मला घट्ट मिठी मारलीस, म्हणालास ,” मम्मा तूला न मला काहितरी सांगायचं आहे…. तो टॉर्च तुटलाय…. पण गॉड प्रॉमिस मी नाही तोडला… मी त्यादिवशी खेळायला जाताना तो सोबत नेला होता न तेव्हा माझ्या मित्राने तो पाडला…. मी तूला तेव्हाच सांगणार होतो पण वाटलं तू रागावशील…. सॉरी मम्मा!!!! थांब मी तूला दाखवतो कुठे ठेवलेत मी पार्ट्स…. “

……..

ते पार्ट्स मी ठेवलेत उचलून ,मी तूला सांगितलं …..

तसं तुझ्या डॊळ्यात पाणी आलं , तू म्हणालास ,” तुझं ऐकलं नाही ना मी, तू नेहेमी सांगतेस आवडत्या वस्तू, नाजूक वस्तू जपुन वापरा पण मी हट्ट केला आणि मला पनिशमेंट मिळाली… सॉरी मम्मा खरच सॉरी, टॉर्चसाठीपण आणि तूला सांगितलं नाही म्हणून पण!! ” … तुझे वहाणारे टपोरे डोळे खरं बोलत होते बाळा दिसत होतं मला, माझ्या पाणावलेल्या डोळ्यांअडूनही….

विषय खरं तर संपला नाही का हा तिथे…. मी तूला समजवलं मग काहिबाही , मुख्य म्हणजे तुझा हात घट्ट धरून ठेवून तुला सांगितलं की आई रागावली तरी जवळही ती घेणार असते वगैरे….

रात्री झोपताना तू म्हणालास मम्मा आता टॉर्च तर गेलाच पण माझा…. आता मात्र हसले मी, म्हटलं लबाडा नाही घेणार मी नवा टॉर्च तूला आता, ती गुरुदक्षिणा दिलीये आपण देवाला एक नवा ’धडा’ शिकवल्याची!!! :)

मनात मात्र विचार आला बाळा की आज मला वेळ होता सारासार विचार करायला… एक वस्तू तुटली , तसेच काहि पुढेही होणारच की… माझ्या मनात पहिला विचार तूला रागवायचाच आला होता की…. मग आयुष्य दरवेळेस मला विचाराची संधी देणार असा तर काही नियम नाही ना…. तेव्हा हे पत्र जितके तुझ्यासाठी तितकेच माझ्यासाठी …. की आयूष्य नित्य नव्या पहेल्या घालणार आहे तेव्हा सोपे पर्याय उपलब्ध असताना उगा त्रागा त्रागा करून आपण ’गुंता’ वाढवायचा नाही….. लगेच बोलले पाहिजे, रागावले पाहिजे असा काही नियम नाहीये….. छोट्या प्रसंगांना उगा मोठं करायचं नसतं लक्षात ठेवायचं आता …..

कभी तो हसाए… कभी ये रुलाए … असं असेल आयुष्याचं रूप तरच खरी खुरी गंमत आहे होय किनई….. पण मग सपनोंका माझा हा छोटासा राही….. एक दिवस जेव्हा खरच ’सपनोंके आगे’ जाईल तेव्हा त्या रस्त्यावर त्याला आईने आपल्या ’विश्वासाची शिदोरी’ द्यायला हवीये, नाही का…. :) …. गोष्टीतली आई देते ना तशीच… जगातही अनेक राक्षस असतात लपलेले, आपल्याला लढायचं असतं तेव्हा निदान घरात तरी लुटूपूटूच्याच लढाया असाव्या हे आईला पण हळूहळू समजतय रे बाळा… जसा तू मुलगा म्हणून साडेआठ वर्षाचा आहेस नं तसं आईचंही आई म्हणूनच वय तितकचं रे!!! पण आता एक ठरवूया आपण दोघेही एकत्र मोठे होऊया… मस्त फ्रेंडशीप करूया :) … शक्य तितकं पारदर्शक नातं असावं हे मला समजलेय , तूलाही समजेल…. अजून एक मैत्रीण येइपर्यंत तुझी मैत्रीण व्हायला हवेय मला….. :)

हो ना जमेल ना… की तुझ्या भाषेत विचारू ’What say ?? :)

तुझीच…

मम्मा .

ता.क. हे खरं तर मी माझ्या लेकाला लिहीलेले एक साधे पत्र….आयूष्य नित्य नवे कोडे घालत असते माणसाला, आपण आपापल्या परीने उत्तरं ्शोधत असतो….. त्याच्या काही नोंदी झाल्याच पाहिजेत असे मला नेहेमी वाटते!! पत्र लिहायला कधीही मागे फिरू नये…. अगदी घरातल्या घरातही बोटभर चिठ्ठी जर आपल्या नावाने कोणी ठेवली तर आनंदच होती की!!! तसेच हे ही एक पत्र….

ब्लॉगविश्वाने काय दिले, याचे उत्तर मी नेहेमी मैत्रीवरचा विश्वास वाढवणारी मित्रमंडळी असे देते. त्यानूसार माझ्या मनातली ही आंदोलन मी विद्याधर आणि हेरंब कडे व्यक्त केले…. हे पत्र पोस्ट म्हणून ब्लॉगवर मी नसतेही टाकले, कारण ’काय ही बाई सतत मुलांबद्दल बोलत असते’ असे काहीसे वाचणाऱ्याच्या मनात येइल वगैरे काही माझ्या मनात आले… पण मग सत्यवानांनी निवाडा केला की आत्ताच्या आत्ता लिहीलेले पत्र पोस्ट कर…. आता न्यायाधिशांच्या आज्ञेबाहेर कोण न कशाला जाईल!! :) ….

घरटं …

(वेळ -  संध्याकाळ पाच वाजलेले … )

– जायचय का तूला आज मॉलमधे ??? बघं मुलं घरी यायला वेळ आहे अजून… तुझी खरेदी आटोपेल तेव्हढ्यात….

– नको रे, आज राहू देऊ या का मॉल ?? मुलं असताना जाऊ या…. तसेही ती वाढदिवसाची पार्टी कधी संपेल कल्पना नाही… नेमके आपण जायचो आणि मुलं यायची…

– अजब आहेस तू ….. अगं आपण जाणार आहोत ना त्यांना घ्यायला… वेळही ठरलीये… त्याआधि कसे येणार ते ??? मुलं असली सोबत मॉलमधे की का वैतागतेस मग, की वर्षानूवर्षे राहिलं इथे तरी मेलं मॉलांमधे कोणकोणत्या गोष्टी मिळतात समजायचच नाही…. मुलं मला काही सुचू देत नाहीत …. एकदा मला मुलं नसताना घेऊन ये तू मॉलमधे… वगैरे वगैरे!!!!

– कळंsssssलं …. गाडी घराकडे ने गुपचूप!!!!

–ठीक आहे….. आणि बये आज शक्य आहे तर लाव ना तुझी लाडकी जुनी गाणी गाडीत….. एरवी मुलं त्यांची आवडती गाणी लावतात तर करवादतेस की काय धांगडधिंगा आहे म्हणून ….

– राहू दे… असू दे हीच गाणी … कुठे शोधू आता माझ्या लाडक्या गाण्य़ांचा पेन ड्राईव्ह…. चालू दे काहितरी….

:)

– माऊ असती गाडीत तर या गाण्याला ओरडली असती, “आवाज वाढवा … :) ” ….

– विचित्र बाई आहेस तू . इतकच समजलेय मला आता…. :) … सांगणार आहे मी आज मुलांना मम्माने तुमची आवडती गाणी ऐकली…

– मी काही ऐकत नाही रे ही गाणी… गप्पा मार बघू माझ्याशी… बोलायचं राहून जातं म्हणतोस ना एरवी… बोल बोल आता बोल!!!!

…………….

……………

( संध्याकाळ -साडे सहा )

– किती वाजले रे…. घरं कसलं शांत असतं नाही मुलं नसली की!!! शाळेत जातात ती वेळ माझी कामात जाते पण नंतर ते नसले की शुकशूकाट होतो घरात नुसता….

– हो का!!! अगं पण पसारा घालतात ना ते ….. ;) … तूच ओरडतेस….

……………

…………..

(संध्याकाळ – सव्वा सात )

– बरं जेवून घेऊ या का पटकन… मग निघू या मुलांना आणायला… .

– हो चालेल…. किती किती वेळ ठेवतात नाही लोक वाढदिवस….. फोन करू का त्यांना की आम्ही येतो लगेच मुलांना घ्यायला…

:) … अरे बातम्या बघ की… जगात किती घडामोडी घडताहेत ना… एरवी कुठे मुलं ऐकू देतात तूला…. एकतर आवाज तरी करतात नाहितर पोगो किंवा कार्टून पहातात  …. मी नाही हं म्हणत हे तूच म्हणतोस मुलांना….. ;)

:) … डाव उलटवलास :)

:)

– श्या आपण दोघेच जेवतोय एकटे , मजा नाही येत… मधे मधे ताटात लूडबूड नाही तर करमत नाहीये….

:) … ओ महाराज दोघं ’एकटे’ कसे असतात हो….. खरं सांगू आपण दोघं आत्ता आहोत आपल्या आई वडिलांसारखे… ते पण तर हल्ली असतात दोघेही ’एकटेच’ …. आपण निदान काही वेळाने मुलांना घरी आणणार हे माहितीये आपल्याला…..

:(

:( … सध्या आपण पिल्लांना चोचीने दाणा भरवणाऱ्या फेजमधे आहोत नाही…. पिल्लं अवतीभोवती चिवचिवताहेत….. मग ती हळूहळू मोठी होतील… नव्हे त्यासाठी आपणही धडपडू….. उंच आकाशातल्या त्यांच्या भराऱ्यांची स्वप्न पाहू…. ते उडतील त्याकडे कौतूकाने पाहू….

:) …. ते ’उडतील’ आणि मग उडून जातील…. वेगळी घरटी बांधतील….. त्याचं काय मॅडम ???

:) बांधू दे…. उलट मी म्हणेन बांधू दे…  जमवू दे एक एक काडी…. पहिल्या काही काड्या पुरवायच्या हव्या तर तू न मी…. आणि ठेवायचं हलकसं लक्ष घरट्याच्या मजबूतीकडे…. त्यांच्या नकळत हं!!! त्यांच्या पंखातली ताकद, जिद्द वाढती ठेवायची…. :)

:)

– मगं पिल्लं त्यांच्या घरट्यात बसतील नी हलकेच मागे वळून पहातील… आई- वडिलांचं घरटं असेल ना नीट असा विचार करतील…. दमले थकले की येतील इथे विसावायला….. :)

:) …. आवरा…. लेडी शेखचिल्ली…. माझं झालय जेवणं…. तुमचा खयाली ’पुलाव’ शिजवा आता गाडीत… मी फोन करून येतो… मुलांना आणायला जाऊया….

– कुचकट … :)

………………..

………………..

( संध्याकाळ – आठ वाजलेले )

– य्येssssss….. मम्मा बाबा …. आम्ही आलो!!!!! :)

:) ….. मजा केली ना पार्टीत….. आम्ही तुमची वाट पहात होतो…..

— जाम जाम मजा आली रे बाबा …  आणि मम्मा वाट कशाला पहायची…. आम्ही येणारच ’असतो’ ना!!!

:) … हो रे… मम्माला सांग हेच पुन्हा एकदा आता  :)

………….

…………

(वेळ रात्रीचे साठे आठ पावणे नऊ ….)

— अरे त्या रिटर्न गिफ्टांच्या पिशव्या नका रे फेकू इथे तिथे….. कपडे बदला…. हात पाय धूवा… आवरा रे….. ते फुगे तर सरळ डस्टबिनमधे जाऊ द्या… कोणी खेळत नाही… लोळतात नुसते घरभरं….. पसारा घालू नका sssssss !!!! मी काय बोलतेय…. कानात शिरतेय का तुमच्या ?????

—- पीं sssssssss!!!!!!!

— बंद करा रे त्या ’पिपाण्या’ ….. लोक पण ना का देतात ही डोकेदुखी देव जा्णे….काय एक एक खुळ निघतं नवं नवं …..

— मम्मा आपणही माऊच्या बड्डेला दिल्या होत्या हं या … उगाच बोलू नकोस….

— हो ना दिल्या होत्या ना… नाही दिल्याचं होत्या… लोक माझं डोकं दुखवतील मग मी का त्यांचे कान किटवायचे नाहीत!!! …. तुम मेरे बच्चे को पिपाणी दो मै वहीच म्हणजे वैसीच दुसरी तुम्हारे बच्चे को दुंगी…. मराठी बाणा आहे हा!!!

— मम्मा तू पण ना :)

– कळंलं ना मम्मा पण काय ते… चला झोपायला…..

– नशीब तुझं बाळा कळली तूला तुझी मम्मा… मला अजूनही कोड्यात टाकते ती…..  मुलं असली की त्यांच्यावर रागवते आणि नसली की कधी येतील याची वाट बघते…. चालू दे माते तुझे अखंड :)

– चूप रे तू…. असेच असते हे,  पिढ्यानूपिढ्या हेच घडणार असते…. उगा मला बोल लावू नकोस!!!

………………

……………..

(वेळ रात्रीचे दहा )

— मम्मा जुन कधी येईल ????

— मम्मा झालं हिचं सुरू….. आधि विचारायची आपण ईंडियाला कधी जाणार?? तू सांगितलस जुनमधे तर आता सारखी विचारते ’जुन कधी येणार ??? ’ …

— आता लगेच येणार हं जुन… लवकरच…. झोपा बघू आता….

— मम्मा मला नानीची आठवण येतीये….

— मम्मा मलापण मी पण मिस करतोय त्यांना…. ते पण आमची आठवण काढत असतील ना…. कधी येइल जुन असे वाटतेय मलापण…

:) हं….

– पण मम्मा आपण सगळे असे वेगवेगळे का रहातो…. ते पण दुसऱ्या दुसऱ्या कंट्रीमधे ??? सगळ्यांना एकाच ठिकाणी जॉब का नाही करता येत???

— मोठं होणं म्हणतात बाळा याला….. असू दे, नंतर सांगेन सगळं … झोपा आता… उद्या शाळा आहे!!!!

— ए मम्मा नानीच्या घरामागच्या नारळाच्या झाडावर सुगरणीने घरटे बांधले असेल ना…. ती खाऊ आणत असेल आतल्या पिल्लांसाठी…. मम्मा, मागच्या वर्षीची पिल्लं आता मोठी झाली असतील ना… धमाल!!!!

:) …. हो रे बाळा झालीयेत पिल्लं मोठी…. आता ती वेगळी रहातात…. सुगरणीच्या पिल्लाने मात्र पुन्हा एकवार सुंदर ’घरटं’ विणलय ., तसच अगदी मऊसूत, उबदार… मस्त झोका असणारं ..मन लावून , जिद्दीने. काडी काडी पारखून जमवून…. माहितीये तिला  पिल्लं मोठी होणार मग भुर्र्कन उडून जाणार एक दिवस… तरिही….

आणि आता मोठ्या सुगरणीची पिल्लं उडत उडत त्या घरट्याकडे धाव घेणारेत , विसावायला… जगण्याची , उडण्याची जिद्द पुन्हा पंखात साठवायला!!!!!!!!!!!! :) ….


—- :) … मिसेस. सुगरण झोप आता !!!  :)

— गुडनाईट मि.सुगरण  !!! :)

उशीर…..

“अगं माउ उशीर झालाय आज तूला यायला, चल आता पटापट हायपाय धूवा आणि जेवायला चला….” शाळेतून आलेल्या लेकीला माझी सल्लेबाजी सुरू झालेली होती…..

’उशीर’ ….सतत येतो हा शब्द नाही आपल्या बोलण्यात…. टाळायचा असतो ना तो, म्हणून त्याचा धाक आणि बागूलबुवा कायम!!!

मला आवरण्याची जितकी घाई साधारण तितकीच माझी लेक निवांत…. “होऊ दे उशीर, तू आधि माझं ऐक…. ” लेकीचा हुकूम!!!

शाळेतून आली ना ही की मला समोर बसवून आधि संपुर्ण दिवसाचं रिपोर्टींग करते , मग बाकि कामाला सुरूवात…. विलक्षण गोड दिसते ती तो वृत्तांत सांगताना म्हणून मी देखील बसते तिच्या समोर…. आज टिचर अमूक म्हणाली, ढमूक म्हणाली वगैरे सुरू होते मग … त्यात गाडं कुठे तरी अडतं, मग ’थांब हं मम्मा, मला याद करू दे’ वगैरे सुरू होतं…. मला समजलेलच असतं काय म्हणायचय ते, मग मी तो नेमका शब्द सांगते…. मग समोरचे डोळे एकदम विस्फारतात…. चेहेरा खुश एकदम, रोजचा प्रश्न, “अगंsssss मम्मा तूला कसं माहितं ??? तू पण माझ्याच स्कूलला जायची??? तूलापण माझीच टिचर होती ???? :) ” …… मी आपलं ठरलेला प्रश्न विचारते, “टिफीन संपलाय का ??? “

परवा इथवर सगळं रोजच्यासारखचं झालं , या मुलांना रोजचा डबा टिचरला दाखवावा लागतो…. मुलांना डब्यात सकस अन्न दिलं जावं यासाठी शाळा तशी जागरूक आहे…. परवा पिल्लूने मला सांगितले ,” मम्मा मी टिफीन दाखवला टिचरला, ती म्हणाली की गुड फूड ….. :) ” ….. मग काहिसा विचार केला तिने , घरात एक चक्कर मारली आणि परत माझ्यासमोर येउन उभी राहिली नी पुन्हा विचारलं ,” मम्मा एक सांग, जर टिचर नाही म्हणाली की गुड फुड तर  ??? ” ……

खरं सांगते, मी बसल्यानंतर माझ्या होणाऱ्या उंचीपेक्षा जरा उंच किंवा साधारण तितकच उंच असं ते ध्यान असे प्रश्न विचारतं तेव्हा चेहेरा असा काही गंभीर होतो की तो पहाताना आपल्या चेहेऱ्यावर नकळत हसू उमटावे…. तरिही मी आपलं चेहेरा शक्य तितका गंभीर ठेवत, गाल फुगवून म्हटलं ,” मला ना जाम सॅड वाटतं की मी माझ्या पिल्लूला टिफीन दिला आणि तो टिचरला आवडलाच नाही :( ” …..

माझ्यामते विषय संपला होता, हातपाय धूणे वगैरे आटोपलं….. पुन्हा पिल्लूच्या घरात एक दोन फेऱ्या झाल्या,आणि पुन्हा धावत ती माझ्याकडे आली , घट्ट बिलगली आणि म्हणाली  “मम्मा अगं तू ते बनाना दिले होतेस ना टिफीनला, तेव्हाही टिचर ’गुड फूड’ असेच म्हणाली होती…. मी फक्त घरी येऊन तुझी गंमत केली होती…. :) ” ………… :) :) आता मात्र मला घरातल्या त्या सगळ्या वैचारिक फेऱ्यांच रहस्य उमगलं होतं ….. शाळा सुरू होऊन आता महिना होत आला आहे, आणि शाळेच्या अगदी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मी पिल्लूला तिची लाडकी केळी टिफीनमधे दिली होती…. आणि त्यादिवशी टिचरने विचारले होते की तुझ्या आईने केळं का दिलेय टिफीनला ???? ….. त्या एका वाक्याला मी काही तसे लक्षात ठेवलेले नव्हते , पण त्या वाक्याने आपली आई दुखावली असेल का हा प्रश्न किती भेडसावतोय या चार वर्षाच्या डोक्याला…..

“मम्मा चल ना किती ’उशीर’ करतेस , भूक लागलीये … जल्दी जल्दी!!! ” या तिच्या वाक्याने भानावर आले खरे पण खरच किती ’उशीर’ करते मी बऱ्याच गोष्टी समजून घ्यायला…..टिचर ’गुड फुड’ म्हटली की पिल्लूसारखीच मी ही खुश होते, पण जर एखाद दिवस ती तसे नाही म्हटली तर काय यासाठी मी कुठे माझ्या बाळाला तयार करतेय….. बरं समजा तसं झालच तर त्यासाठी माझ्या मुलीने कसं react व्हायचय हे मला तिला शिकवावसचं वाटलं नाहीये…. पिल्लू लहान असलं तरी ते विचार करतय, करू शकतय हेच मला ’उशीरा’ समजलं तर ????

चालतं नाही काही ठिकाणी ’उशीर’ केलेला…. ट्रेनसाठी, बससाठी, नौकरी ऑफिसेसमधे आपण धावत पळत पोहोचतो…. वेळ गाठतो…. ’लेट मार्क’ नकोच बाबा… पुन्हा आपण कसे ’वक्तशीर’ की punctual असा दावा करतो….. पण काही छोटे छोटे ’उशीर’ आपण किती नकळत करतो नाही!!!!

असाच आणि एक प्रसंग… संध्याकाळची मुलं खेळून घरी आली, जेवणं झाली …..माझा रोजचा वाक्यांचा रतीब सुरू झाला…. “चला चला शाळेच्या बॅगा आवरा आता…. पसारे जागच्या जागी ठेवा…. आवरा भराभर…. झोपा चटकन… उद्या शाळा आहे…. झोपायला ’उशीर’ झाला की उठायला ’उशीर’ होतो …. “

नॉर्मल पट्टीत सुरू झालेल्या घोषणा हळूहळू वरच्या पट्टीत जाइपर्यंत माझी पटाईत पोरं काही दाद देत नाहीत हा अनूभव आता नवा नाही, त्यामूळे मी हल्ली सुरूवातच एकदम जोषात करते…..

त्यादिवशी मुलंही ऐकेनात…. माझं किचनमधलं काम संपायच्या आत मुलांनी झोपायला जावं असा वटहूकूम मी काढला आणि मुलं तसं वागताहेत की नाही याकडॆ एक नजर ठेवली….. ’उशीर’ व्हायला नको या मतावर मी ठाम होते अगदी….. शेवटी मुलं वैतागली आणि म्हणाली, “अगं हो हो… जातोय आम्ही बॅग आवरतोय… पेन्सिल्स ठेवायच्या आहेत आत!!! “

छे छे पण ….. ’उशीर’ झालाच….. मी ओरडले ,”नकोय काहीच नाटकं , एका सेकंदात मला तुम्ही दोघंही बेडरूममधे गेलेले पाहिजे… मी आवरेन तो पसारा… ” ….. मुलं किचनमधे पाणी प्यायला आली, मला म्हणाली हॉलमधे ये ना थोडा वेळ….. म्हटलं अजिबात नाही, उगाच थोडा वेळ थोडा वेळ करत ’उशीर’ होतो मग झोपा होत नाहीत पुर्ण……

किचन आवरलं, मुलं एव्हाना बेडरूममधे पोहोचली होती…. तिथल्या मस्तीचा आवाज मंदावला होता….. बाबाबरोबर खिदळून झाले असावे त्यांचे असा अंदाज बांधला मी….. घड्याळाकडे नजर टाकली , मस्त वेळेत आवरलय सगळं….. अजिब्बात ’उशीर’ नाही झालेला…… हॉलमधे गेले, पेन्सिलींचा पसारा आवरायचा होता ना……

समोर आले ते हे पेन्सिलींचे पिरॅमिड….. :)

ते पाहिले आणि पहातच राहिले…. मुलं धांगडधिंगा घालताना एकमेकांशी संवाद साधताहेत , असं काही रचू पहाणाऱ्या दादाला त्याची धाकटी बहिण मदत करतेय….. त्यांच्या डोक्यात कल्पना येताहेत… आणि सगळ्यात महत्त्वाचे आपण जितके ज्ञान पुरवतो किंवा पुरवू शकतोय त्या पलीकडे झेप घेण्याचे सामर्थ्य दर पुढच्या पिढीत असते…… हे समजायला मला ’उशीर’ होतोय हेच काय ते सत्य!!!

तडक उठले आणि मुलांकडे गेले…. कधी नाही ते मी पोहोचण्याआधिच दोन्ही पिल्लं एकमेकांच्या कुशीत गाढं झोपली होती….. त्यांनी घातलेला ’पसारा’ मला खूप आवडलाय हे सांगायला जायला मला ’उशीर’ झाला होता ……

लहान सहान प्रसंग सतत डोळे उघडतात , पण मेली आपली झापडं भलती गहिरी … आपण सताड उघडेच नाही ठेवत डोळे… त्यांना पुन्हा पुन्हा मिटण्याचा चाळा…. नात्यांमधे, मैत्रीमधे, आयूष्यामधे हा ’उशीर’ चालत नाही हे का मला माहित नाहीये….

किचनमधले काम आणि मुलं यांच्यात निवड करणे ही साधि दिसणारी बाब तशी….’उशीर’ कुठे चालेल आणि कुठे नाही ही निवड जरा ’उशिरा’ केली की आलाच पश्चाताप ओघाने!!!

प्रत्येक ’उशीरा’ला कारणं देतोच नाही आपणं ….. असतात तय्यार आपल्याकडे कारणं …. प्रेमाचे चार शब्द बोलायला ’उशीर, चुकलं तर माफी मागायला ’उशीर’ , कोणी माफी मागितलीच तर माफ करायचा ’उशीर’  , कौतूकाचे शब्द बोलायला ’उशीर’ ……

काय करावे नी कसे करावे….. का मग Better late than never म्हणावे आणि जरा विचाराने वागावे….ह्योच करना पडॆंगा ऐसा लगता है!!!! :)

नाही यमाकडे म्हणे ’लेट मार्क’ची सोय नसते , त्याचे दुत त्यांचे काम चोख बजावतात वेळच्या वेळी….. ’उशीर’ न करता.. तेव्हा त्यांनी गाठायच्या आत ’जागो रेssss ‘… ;)

‘तो’ का म्हणे उगीच करावे….

साडेआठ वर्षाचा इशान आणि आठ वर्षाचा त्याचा मित्र यांच्यातले माझ्या कानावर पडलेले संभाषण…

–” हे इशान ईज ’अ’ युअर फ्रेंड ?? “….

– ……

–” हे इशान ईज ’ब’ युअर फ्रेंड ?? “….

– ……

–” हे इशान ईज ’क’ युअर फ्रेंड ?? “….

– ……

–” हे इशान ऍम ’आय’ युअर फ्रेंड ?? “….

– ……

–” हे इशान डू यू गो टू टेंपूल  ?? “…. (मित्र तामिळमधे ईंग्लिश बोलतोय )

– येस

– “डू यू गो देअर एव्हरी वीकएंड ???”

– नो

– ” व्हाय?? यू आर नॉट अ हिंदू ???”

– ……

(प्रत्येक आठवड्याच्या शेवटी मंदिरात गेले नाही की आपण हिंदू नाही असे ठरते का ??? असावे…. आई वडिल अनेक कल्पना भरवत असतात मुलांच्या मनात….

पुढे… )

— “हे इशान व्हाय यू पर्चेस्ड ’ह्युंदाई’ कार??? “

– …..

— “इशान माय कार ईज बिगर दॅन युअर्स …”

– ……

येव्हढा वेळ नुसतीच गंमत म्हणून मी हे संभाषण ऐकत होते… माझ्या किचनमधल्या कामाला या गप्पांची जोड येव्हढाच काय तो त्यात मला रस होता, पण आता मी जरा लक्ष देत होते .. कारण सायकल खेळायला म्हणून बाहेर गेलेली ही मुलं, नक्की काय करताहेत असा मला प्रश्न पडला होता…. त्यात माझे चिरंजीव चि.इशान कोणत्याही प्रश्नाला उत्तर देत नसतानाही हा ’मित्र’ नामक मुलगा पुढची प्रश्नपत्रिका सेट करणं काही थांबवत नव्हता…. आपलं सोडून लोकांच्या भानगडींमधे लक्ष घालणं हे या  ’मित्र बाळाचे’ पाय मला आत्ता सायकलवर दिसत होते…. :)

– ” हे इशान व्हाय यू डॊंन्ट गो टू टेंपूल एव्हरी वीकएंड??? “

– ….

– “इशान विल यू गो टू हेवन ?? “

– …

(मला आता त्या लहानग्याने विचारात टाकले होते… किती विचार आहेत याच्या डोक्यात… विचारांचा गोंधळ आहे नुसता…. स्वर्ग, मंदिर, हिंदू वगैरे सगळ्या कल्पना लहान मुलांच्या डोक्यात टाकणं खरच कितपत गरजेचं आहे??? …. माझीही मुलं रोज देवासमोर उभी रहातात, नमस्कार करतात आणि प्रसंगी देवाशी गप्पाही मारतात…. पण आपण मंदिरात गेलं नाही तर देव रुसेल रागावेल वगैरे कल्पना त्यांना शिवतही नाही…. एकीकडे मला इशानचं कौतूक आणि दया वाटत होती… कारण ‘प्रश्नपत्रिका ‘ काही त्याला खेळू देत नव्हती निवांतपणे, पण इशान मात्र आपल्याच नादात सायकल चालवत होता शांतपणे….)

— “हे इशान व्हाय युअर मम्मी वॉंन्ट्स AC ऑल द टाईम ??? “

– …..

(मी तर ना खरच विचारले असते की ’बिल काय तूला पाठवते का रे ?? ” … माझं पिल्लू शांत ….)

– “हे इशान व्हाय यू हॅव अ सिस्टर??? आय डोन्ट लाईक युअर सिस्टर … “

:)

(अरे इशान हसतोयेस काय नुसता दे की उत्तर त्याला…. माझा पारा आपलं मुळ स्थान सोडतोय असं वाटायला लागलय मला आता…. जरा जरा पारा चढलाय … किती ’नकारार्थ’ भरलाय या मित्रात… सतत करकर करणारे, नेहेमी नकारार्थी बोलणारे लोक मला थोड्यावेळाने त्रास द्यायला लागतात…)

– “इशान डू यू हॅव अ पुजा रूम ??? “

– नो

– “इशान यू डोंन्ट हॅव अ पुजा रूम ??? वुई हॅव ईट…. “

– ……

(आता वरचाच प्रश्न तीन वेळा…. पुन्हा… पुन्हा…. देवा अरे आवर रे याला…. मी हॉलमधे जाउन खिडकी उघडली आणि मुलांना बोलावलं, येता येताही प्रश्नचिन्ह शांत नाहीये… )

– “”इशान, आंटी … व्हाय यू डोंन्ट हॅव अ पुजा रूम ??? वुई हॅव ईट…. यू आर नॉट अ हिंदू ???”

गेला जवळपास अर्धा तास बिल्डींगचे ’हे टोक’ ते ’ते टोक’ अनेक अनेक प्रश्नांनी माझ्या पिल्लाला छळल्यानंतर या मुलाने मोर्चा माझ्याकडे वळवला… बरं या अश्या लोकांना एका प्रश्नाला उत्तर द्यावं तर ते दुसरा निर्माण करतात…. माझं डोकं तापलं होतं जरासं हे मात्र सत्य…. त्यात मित्राने नुकताच एक गुगली टाकलेला माझ्या लक्षात आला होता की आमच्या घरात पुजा रूम आहे…. आता आमच्याच बिल्डिंगमधे असलेल्या कुठल्याही घरात ’पुजेसाठी’ वेगळी खोली असण्याचा प्रश्नच येत नव्हता… मुळात या अरब देशात आपल्याला देवपुजेला बंधन नाही हेच वेगळेपण , पण म्हणून अरब आता पुजेला खोल्या बांधायला घेतील , कल्पनाच नको!! हं आता एखाद्याने आहे त्याच घरात एखादी रूम देवासाठी ठेवली तर वेगळा मुद्दा पण याच्या घरात असे काही नाही हे मला नक्की माहित… कारण ज्य़ु. प्रश्नचिन्हाची सि. प्रश्नचिन्ह आई माझी मैत्रीण (!!??) :) ….

प्रश्नांची ईतकी मोठी सरबत्ती सहन केल्यावर मात्र मी मुलांना रागावले … लहान मुलं म्हणून मी एरवी सगळे सहन केलेही असते आणि दुर्लक्षही केले असतेच… मात्र इथे नसत्या प्रश्नांच्या नादात माझ्या मुलाच्या डोक्यात नको त्या कल्पना शिरायला नको वगैरे काहितरी भिती मनात आली आणि मी मुलांना सांगितले की खेळायला गेला आहात बाहेर तर गुपचूप खेळा आणि उगाच वटवट करत बसण्यापेक्षा जरा नजर फिरवा चौफेर , बरेच काही छान छान पहायला आणि शिकायला मिळेल…आणि पुजारूम, हिंदुत्त्वाचा दर्जा वगैरे मुद्दे सोडा मोठ्यांना चर्चेसाठी, देवाला तुम्ही लहान मुलं खूप आवडता त्यामूळे तुम्ही नाही गेलात मंदिरात तरी तो तूम्हाला आशिर्वाद देतोच …..  (आता माझी बडबड प्रश्नचिन्हाच्या डोक्यात शिरली की नाही हे तो ’टेंपूलमधला गॉडच ’ जाणे … सध्या तरी माझा चढलेला आवाज कारणीभूत ठरला असावा पण प्रश्नचिन्हाचं रुपांतर पुर्णविरामात झालं होतं आणि तो जरा शांत होता!!! )

थोड्या वेळाने इशान पाणी पिण्यासाठी म्हणून घरात आला….. पाणी चटकन पिउन खेळायला निघाला , जाताना मला म्हणाला, “मम्मा का रागावलीस?? ” … त्याला जवळ घेतलं आणि म्हटलं, “सॉरी रे बाळा…. तुमच्या दोघांच्या गप्पांमधे मला नव्हतच बोलायचं पण नाही रहावलं रे शेवटी … “

पिल्लू शांतपणे म्हणालं ,”पाणी हवय का तूला मम्मा ?? …. डोन्ट वरी गं….. अगं हे बघ तो जाम पकाउ बडबड करतो मला माहितीये ….. पण मग मी नाही उत्तर देत , त्यापेक्षा मी मनात म्हणतो ,” अपने दोस्त की पकाउ बातों सें कैसे बचे!!!! ” मग मी खोटं खोटं स्प्राईट पितो आणि मग सरळ दुर्लक्ष करतो त्याच्याकडे :) ” …..

“कूल यार मम्मा…. तो नेहेमी आपल्या गाडीपेक्षा त्याची गाडी बिग म्हणतो… पण मी चेक केलेय पेपरमधे … अगं सेम प्राईज आहे दोन्ही गाड्यांची …. :) ” …ईति इशान …

मी चकित… कधी केलेय हे याने….

“आणि ऐक, आपली गौरी त्याला नाही आवडत… पण ती ’आपली’ माउ आहे ना, आपल्याला आवडते ना….. “

“अरे पण बाळा कधी कधी विरोधही करावा रे आयूष्यात , ते ही गरजेचं असतं रे… समजेल रे तूलाही हे… ” … माझी आपली अनूभवाची मतं ….

“मम्मा …………… तू काय सांगितलं होतं मला की देवळात पायऱ्या उतरताना देवाला पाठ दाखवू नये पण म्हणून त्या नादात धडपडायचंही नाही… हो ना!!! कारण देवबाप्पा सगळीकडे असतो…. आपण कुठेही पहात असलो तरी तो आपल्या समोर आणि पाठीमागे असतोच :) … मग मम्मा तू सांग, देव फक्त पुजारूममधेच असतो का ???  आणि मला सांग तू नाही का बाबाला म्हणालेलीस की काय तरी ते ” तो का म्हणे उगीच करावे “ त्या आंटीच्या घरून आपण निघालो तेव्हा…. सो आता कूल गं मम्मा… चल बाय मी जातोय खेळायला….. “

समोरचं पात्र गेलं खेळायला निघून पण माझ्या मनात एकापाठी एक विचार नुसते…. माझ्या समोर वाढणारं पिल्लू माझ्या नकळत ’घडतंही’ आहे ही पहिली जाणीव :) …. आपण जे जे काही बोलत असतो ते रुजतं आहे हे दुसरं :)

कळीचा प्रश्न हा पण की मी कधी म्हणाले नवऱ्याला की ” तो का म्हणे उगीच करावे “????  कधी कधी ??? व्हेन व्हेअर ??? …. आठवलं आठवलं , दिमाग की बत्ती पेटली एकदम…..

एका ओळखीच्यांच्या घरी गेलो होतो आम्ही, २९ मार्चच्या संध्याकाळी… स्टार माझावर ब्लॉग माझाचे सकाळी प्रसारण झाले होते त्या दिवशी….. तिथे गेल्यानंतर तिथल्या हुशार स्त्रीने जणू आमच्या चेहेऱ्यावर ’यांच्या गेल्या सात पिढ्या एकतर नापास किंवा निव्वळ पासक्लासात पास झालेल्या आहेत ’ असे काही वाचले असावे अश्या थाटात मला चौफेर व्याख्यान दिले होते… त्यात मला जर माझ्या मुलांबाबत वगैरे काहिही अडचण आली तर या ’गोल्ड मेडलिस्ट ’ (तिनेच सांगितले ;) ) काकू नक्की मदत करणार होत्या…. :) वर त्यांनी मुलांनाही आश्वासन दिले होते की त्या आहेत, सो डोन्ट वरी !!! (आता आम्हाला खरच नक्की काय अडचण आहे किंवा अडचण आहे की नाही वगैरे काही आम्ही न सांगताच काकूंना समजले होते हा भाग निराळा!! ;) ) … मला दोन प्रकारची माणसं नेहेमी कोड्यात टाकतात… एक ज्यांना inferiority complex आहे आणि एक ज्यांना superiority complex आहे, यांच्यामूळे माझ्यात नेहेमी भलताच गंड निर्माण होतो की मेला आपल्यात complex सुद्धा मिडल क्लास आहे ;) …. तेव्हा त्या काकूंच्या घरून जेव्हा आम्ही बाहेर पडलो तेव्हा नवरा म्हणाला, “ऐकून का घेतेस नेहेमी , सांगायचे ना की स्टार माझावर आजच्या कार्यक्रमात तू होतीस :) अगदीच काही ’ढ’ नाहियेस तू म्हणून ;)   …. “  ….. तेव्हा मी त्याला म्हटले होते “तुका म्हणे उगी रहावे ….. जे जे होइल ते ते पहावे  ” :) …..

अच्छा म्हणजे चिरंजीवांना ’तुकाराम महाराज’ नाहियेत ओळखीचे अजून पण त्यांच्या सांगण्यातले मर्म निश्चित समजले आहे तर :) …. सगळीकडेच नसते बोलायचे…. दिसेल त्याला आपले मुद्दे नसतात पटवायचे हे ’स्प्राईट’ वाल्या माझ्या पिल्लाला माहितीये तर, पुन्हा त्या मित्राबद्दल मनात कुठलाही आकस नाहीये …. खूप मस्त वाट्लं एकदम!!! एखादी मस्त गाण्याची लकेर कानावर पडावी आणि मन एकदम ताजतवानं व्हावं ना तसं काहिसं…. :)

उगाच करावे असे चिरंजीव सांगून गेलेच होते म्हणून उगाच पुन्हा खिडकीतून बाहेर पाहिले….. ड्रिंक्स ब्रेकनंतर ’प्रश्नचिन्ह’ही ताजं झालं होतं पुन्हा मस्तपैकी …. ’Wh’ questions चा रतीब पुन्हा एकवार सुरू झाला होता…..

मला समोरच्या दृश्यात ’जुदाई’ मधल्या परेश रावलच्या कपाळावरचं ठळक प्रश्नचिन्ह आणि स्प्राईट पिणारे ’तो का’ राम महाराज दिसत होते आत्ता :) …. पुढच्या वेळेस असा काही प्रसंग आला तर मी ’तो का ’ रामांकडून स्प्राईट मागणार आहे प्यायला….. :)

सहजच- पुन्हा एकदा….

गुरुवार शुक्रवारची सुट्टी मुलांबरोबर घालवायची…. आणि फक्त अभ्यास किंवा खेळ येव्हढेच न करता, दर सुट्टीला त्यांना काहितरी नवीन शिकवायचे असा गेल्या काही दिवसात आम्ही केलेला नवा नियम….. त्यानुसार गेल्या शुक्रवारी आम्ही (मी आणि ईशानने) केलेली कलाकारी…..

स्वत:च्याच कलाकारीवर चिरंजीव खुश झाल्याने या गुरूवारी पुन्हा टुमणं लावलं माझ्यामागे, शिकव काहितरी नवे म्हणून….. नवे म्हणजे त्याला अगदीच माहित नसलेले काहितरी असा अर्थ असतो कारण आपण काहितरी सांगायला जावे आणि त्याला जराही कल्पना असली तर लगेच ,”ए हे नको मम्मा… हे मला माहितीये!!’ नावाची नवी भुणभूण सुरू होते……

जरा डोके लावल्यावर लक्षात आले, नवे, त्याला अजिबात माहित नसलेले आणि करायला सोपे असे म्हणजे ’वारली चित्रकला’ …… पेंटींगही होइल आणि महाराष्ट्राच्या या आदिवासी कलेबद्दलची माहिती सांगणेही होईल….. त्यातही वेगळेपण हवे, मग घरी असलेल्या एका जुन्या बॉक्सची चिरफाड केली त्याच्याच लेसला हाताशी धरले आणि काही बुकमार्क्स बनवले…….

हा होता पहिला प्रयत्न…… जरा सोपेच करूया म्हटलं…. उगाच लेकासमोर आपलाच पोपट नको म्हणून आधि स्वत:चा हात कितपत साथ देतोय याचा अंदाज घेण्यासाठीचा हा बुकमार्क….. मग बुकमार्कची गरज काय, हे लेकाला समजावले की  आपण काय वाचत होतो हे लक्षात ठेवायला उगाच पुस्तकाची पानं मुडपायला नकोत, पुस्तकांचा आदर  वगैरे विषय मी बोलायला लागल्यावर मात्र चिरंजीवांनी, “अच्छा म्हणजे एरवी तू मोबाईल किंवा चमचा बिमचा घालून ठेवतेस बुकमधे, त्याऐवजी आता हे बुकमार्क्स घालून ठेवायचे , म्हणजे आपण वाचत असलेले पेज सापडेल……. बाबा ही मम्मा ना मोबाईल ठेवते बुकमधे आणि मग ते बुक जाडं दिसतं जाम :) ” असे मलाच कोंडीत पकडून गप्प बसवले…… मग आम्ही बुक्सबद्दलचा रिस्पेक्ट या मुद्दा तुर्तास बाजूला ठेवून मोर्चा वळवला पुढच्या बुकमार्काकडे!!!

हे झाले दुसरे बुकमार्क……

आणि हे तिसरे आणि शेवटचे (सध्यातरी)…. कारण यातले एक आणि ईशानने बनवलेले एक गेलेत शाळेतल्या टिचर्ससाठी … त्या पण बुकमधे स्केल घालून ठेवतात याचा चिरंजीवांना अचानक साक्षात्कार झाला…. :)

थोडक्यात काय आमचा हा गुरूवार -शुक्रवार मस्त गेला!!!

याआधिचे सहजच इथे आहे, म्हणूनच आज आहे सहजच- पुन्हा एकदा!!! :)

शेवटी काय ब्लॉगाचे नाव चुकलेय असे नको वाटायला!!!

रात्र वैऱ्याचीच आहे..(अजुनही :) )…..

इथे एक मुख्य पात्र (ज्याचा उल्लेख ’मुपा’ असा करणार आहे मी पोस्टेत… ) आणि तीन साईड पात्र आहेत…. सगळीच मंडळी एकसे एक ’पात्र’ असल्यामुळे ’पात्रं’ हे नाव हा नाटकाचा अंक बिंक असला कुठलाही विचार मनात न ठेवता पात्रतेनुसार ते पात्र या नावास पात्र आहेत….. मुपा म्हणगे गौराई हे आमचे साडेतीन वर्षाचे ’पात्र’ असुन बाकि पात्र इथे नाममात्र आहेत J

उल्लेखानुसार :

मोठी चादर- मुपाचे आई-बाबा (कोणिही एक , प्रसंगानुसार)

छोटी चादर- ईशान

——————————————–

—गुडनाईट मम्मा…

—गुडनाईट बाबा…

—गुडनाईट ईशान…

(’गुडनाईट गं बये!!! किती वेळा गुडनाईट म्हणशील , झोप ना आता…’ गेल्या निदान अर्ध्या तासाची मुपाची चुळबूळ सहन करणाऱ्या ईतर तीन पात्रांपैकी कोणितरी एक वैतागून म्हणेल!!!)

—गुडनाईट गौई sss ….

(आता सदर मुपा स्वत;लाच रोज गुडनाईट म्हणतं हे माहित असले तरी उर्वरीत तीन पात्रांपैकी कोणितरी एकजण अजाणतेपणे खुदकन हसेल…… संसर्गजन्य रोग हा, त्वरीत लागण होऊन उरलेले दोन पात्रही दबक्या आवाजात हसतात….. त्या पिकलेल्या खसखशीचा वास मुपाच्या जाणत्या नाकाला लगेच लागतो…. आणि मग सुरू होते तीन नॉट सो फ्रेश [जवळपास अर्धझोपे {अर्धमेले तसे अर्धझोपे} ] मेंबर्स Vs एक ताजातवाना मेंबर अशी बॅटिंग!!! )

— हा कोणाचा हात आहे ????

(चढ्या आवाजात एक निरर्थक प्रश्न!! मुपाचा अंधारातला तीर….. )

—माझा !!! (तिघांपैकी एक!!)

— माझा म्हणजे कोणाचा ???

(एरवी अगदी चाहुलीवरून माणूस  नक्की ओळखणारं मुपा आता वेड पांघरून बसलेय…. परिस्थितीची गरज ओळखणे म्हणतात याला!! J )

–’बाब’ चा!!!!

(इथे ’बाब’ म्हणजे मुपाचा बाबा {मुपीचा ’बाबा’ नाही… सुज्ञ ओळखतीलच तसे ;) } असे असते…. कारण शाळेतल्या मित्रमंडळींमधे कोणा एका डॅडी नावाच्या प्राण्याचा डॅड झालेला मुपाला नुकतेच समजलेले असते त्यामुळे त्याच जातीच्या आपल्या घरातल्या प्राण्याचे नुकतेच ’बाबा’ वरून ’बाब’ असे बारसे झालेले असते!! हे कमी की काय म्हणून कहर म्हणजे ’ईंकी पिंकी पॉंकी – फादर हॅज अ डॉंकी ’ ह्या गाण्याचा अपभ्रंश होऊन ते , ’ ’ईंकी पिंकी पॉंकी – फादर ईज अ डॉंकी’ असे नुकतेच आमच्या कानावर पडलेले असते. बाबाची ढोर मेहेनत अक्षरश: सार्थ ठरवण्याकडे मुपाचा कल असावा…. मुलांचे कल शाळेत दिसतात हेच खरे!! ;) )

— अरे पण ’बाब’ म्हणजे कोण??

What is your name, BABY???

(अच्छा म्हणजे प्रस्तूत ’हात कोणाचा’ ह्या प्रश्नाचे उत्तर ’या व्यक्तीचे मुपाशी नाते काय’ असे द्यायचे नसुन ’सदर व्यक्तीने आपले नाव सांगावे’ असे आहे होय!! हे बहुतेक आपल्या बापाला समजले नसावे असे मुपाला वाटल्यामुळे प्रश्नात स्पष्टीकरणरूपी भर हा ईंग्लिश उपप्रश्न असावा…. बरं या उपप्रश्नाच्या शेपटाला ’BABY’ नावाचा झुपकाही होता… )

— यांच्या या नर्सरीतल्या बाया ते उगाच पन्नासवेळा लाडं लाडं बेबी बेबी करतात कशाला??? मला ना अजिबात आवडत नाही हा प्रकार!!!! ( ’बाब’ आता नावं न सांगता भलतचं बोलत होता पण सुर चढा लागल्यामुळे मी ’कुल ईट baby’  हा माझ्या मनात आलेला डायलॉग मनातल्या मनातच बोलते …. उरलेल्या दोन चादरी [ म्हणजे दोन पात्रं] चादरीत तोंड खुपसून सौम्य आवाजात जरा खि-खि करतात.. )

—तुम्हारा नाम क्या है BABY ??? (मुपा अजून प्रश्नावर ठाम J )

— अss मि ss त ssss….. झोपतेस का आता, का मारू दोन रट्टे??? (आवाजात वाढीव राग!!! )

—ऐसे क्यूँ करते हो BABY??? मै तुम्हारी बहन हूँ ना!!!

(मुपा आता फुल्ल फॉर्मात येतयं हळूहळू… हिंदी रूळतयं नुकतच जिभेवर त्यामूळे ’बेटी’ ला ’बहेन बिहेन’ घोळ मनापासून अगदी….. उरलेल्या दोन चादरींमधली खसखस वाढतेय….. “मम्मा ती बेटीला बहेन म्हणतेय…. ती काही सिस्टर आहे का बाबाची, डॉटर आहे ना!!!” लहान चादर मोठीला [चादरीतल्या चादरीत—बाहेर तोंड काढायची सोय नाही ] “गप बस!! लहान आहे ती…. चालू दे त्यांचे…. तू झोप सकाळी शाळा आहे ना!!! “ मोठी चादर लहानीला कुजबुजत… )

—अंगात येतं का गं रोज रात्री तुझ्या??? गौरे झोपतेस आता का बोलावू पालीला??? येss गं पालं sss

( बाब भडकलाय आता…. डायरेक्ट पालीची धमकी…. भात्यातले साधे बाण कामाचे नाहीत हे उमगलेय त्याला… ब्रम्हास्त्र बाहेर….)

— पाsssलं गुडनाईट!!! (मुपा ऐकायला तयार नाही….. आज पालीलाच झोपायला सांगितलेय….. उरलेल्या दोन चादरी जरा जोरात ख्या-ख्या!!! )

— और ये लगा सिक्सर.. नटराज फिर चॅंपियन!!! ( मोठी चादर अर्थात अस्मादिक न रहावून बोलून गेलेले…. )

— हो का!!! मग शिस्त लाव ना जरा कार्टीला तुझ्या….आईची जबाबदारी असते ही!! ( बाबाला थर्ड स्टेजमधली झोप आल्याचे चिन्ह …. मुपा काहितरी बडबडतेय् यावरही…)

—पर्र्फेक्ट!!!! शिस्त ’आईची जबाबदारी’ बद्दलच्या विधानाची ग्राह्यता गृहीत धरता तुमच्या बेशिस्तपणाचे खापर कुठे जाते याचा विचार करून उपरोक्त स्टेटमेंटात अमेंडमेंट करायची असेल तर तुझ्या त्या वर्तनाला मी बेजबाबदार म्हणणार नाही… गो अहेड!! ( सोडते की काय मी…… मी का ऐकून घेऊ???)

— झोपा रे सगळे….डिस्टर्ब नका करू!!! (लहान चादर… पेंगुळलेला आवाज )

— हो ना , हा बाब नुसती ’जागमोड’ करतोय माझी!!! (मुपा कधी कधी चुकून बरोबर बोलते ते असे…. तिची ’जागमोड’च होत असते कारण ती ९९.९९% जागी असते )

— मम्मा आपण पालीला दगडाने मारू ना!!! मी तर आता बिग होणारे… टॉल होणारे…. ( आयला ’बाब ’ सुटला…. आता गाडी माझ्यावर वळलीये….चौफेर हल्ला, नव्या दमाने आता!!! पहिल्यांदा पस्तावा गप्प न बसल्याचा…. छे छे!!! सबुरी सहनशक्ती कश्याशी खातात तो पदार्थ बनवायला हवाय आता!!!

— अनन्याssss….. अनिश ssss sit properly!!! (मुपा मधेच जोरदार…. स्वत:च्याच तंद्रीत…. पुन्हा एक मोठी आणि एक लहान चादर नाटकातल्या नव्या अनोळखी पात्रांच्या एंट्रीने गोंधळलेले….. या प्रकाराची मला दिवसात सवय असल्यामूळे, ही दोन पात्र आणि असे अनेक ही मुपाची शाळासोबती असून मुपा सध्या त्यांच्या टीचरच्या भुमिकेत आहे या माझ्या खुलाश्यावर दोन्ही चादरी गुडूप!!)

(ईकडे मुपा हवेत हातवारे करत गम्य-अगम्यच्या सीमारेषेवर ईंग्लिशमधल्या हिंदीमधल्या मराठीत काहितरी सुचना देतेय!!! ’कौन बनेगा करोडपतीच्या’ नव्या जाहिरातीतला पाय हवेत उंचावून, “पापा अकबर का बाप कौन था??” विचारणारा मुलगा आठवतोय आता मला… आणि मग ’कोई भी सवाल छोटा नही होता’ असे सांगणाऱ्या अमिताभला मुपा सांभाळायला द्यावी एक दिवस असा विचारही मनात येतो!!)

— आता ’दिन’ नाहिये ’रात’ आहे…. रातला अंधार असतो पण मला सगळे दिसतेय… (मुपा आवर आता!!!)

—हंम्प्टी डंम्प्टी फॅट ऑन अ फॉल …. (मुपा रंगलेय आता कवितेत… सॉरी पोएमांमधे….. कोणिही कुठल्याही दुरुस्त्या सुचवत नाहीये… हंम्प्टी डंम्प्टी फॅट तर फॅट, मरो मेला!!! अचानक माझ्या गळ्यात दोन नाजुक हात… मुपाचे मातृप्रेम जागृत!!! )

— आजा मेरी बेटी!! (पुन्हा हिंदीत चमत्कार…. माँला बेटी केलेले होते!!!! ’हं’ यावर माझी मजल नाही… कुठे तोंड उघडून अवलक्षण करू पुन्हा!!)

—हॉलमधलं भुत झोपलं आता!!! (अचानक भलतचं चॅनल आता हे….. बरं रिमोट मुपाकडे….  )

—अरे पिल्लू आपल्याकडे भुतं नाहिये बेटा… आपल्याकडे देवबाप्पा आहे किनई!! (बोलल्याशिवाय अगदीच रहावलं नाही मला!!!)

—अगं मम्मा!!! ते देवाचेच भुतं आहे!!! ( देवा रे वाचव रे मला….. हॉलमधलं भुतं झोपवलसं मग बेडरूममधलही झोपवं रे… रेहेम खुदा रेहेम!!)

——————————————-

(शांतता….. झोपली की काय???)

— माँ पाणी दे…. (आता ईतकी वटवट केल्यावर घसा कोरडा न पडता तर नवल!!!)

(मुपा आणि मी जागे…. उरलेल्या दोन्ही चादरी एव्हाना स्वप्नांच्या राज्यात!!! मुपाचा एकपात्री प्रयोग सुरूच!!)

पाणी—- शू— बडबड— प्रश्न— पोएमा—हातवारे— ईत्यादी ते इत्यादी….. (म्हणजे कॅपिटल ईत्यादी ते स्मॉल इत्यादी…)…….

————————————————–

(शांतता… पुन्हा एकवार …… मी गोंधळात मुपा झोपलं बहूतेक!!!)

वळून पाहिल्याशिवाय रहावत नाहिये…. मुपा गाढं झोपलयं!!!! प्रचंड प्रचंड गोड दिसतयं!!!! देवाच्या भुतासारखं!!!! लंबे लंबे बाल फेसवर आलेत…. मुपाला आवडत नाहीत ते तसे आलेले….. मी हलक्या हाताने ते मागे सारतेय….. उघड्या चिमुकल्या हातावर हळूवार गाल टेकवतेय….. पिल्लू जागरण होते रे!! तूझाही आराम होत नाही, बाकिच्यांचीही ’झोपमोड’ वगैरे काहीबाही मनात येतेही…… पुन्हा जाणवते ती शांतता…. देवाचे ते भुतं, शाळेतले ते सवंगडी सगळेच गायब एकदम होतात मग!!! नको वाटतेय ही शांतता….. पिल्लू तू अशीच रहाशील ना… अशीच रहा गं!! मोठेपणी ना ’रात’ झाली की नाही दिसत सगळं…. देवाचे भुतं पण सोडून जाते मग…. चिवचिवणारी चिमणी आहे तोवर घरटे जागे आहे माझे….. रात म्हणं दिन म्हणं, बाब म्हण, बहेन म्हण काहिही म्हणं…. आणि हो बच्चू कुठलीही पाल बाबा कधीही येऊ नाही देणार तुझ्याजवळ!! घाबरू नकोस कधिही!!! मी आहे ना तुझी ’बेटी’ तूला जपायला…. डोळे पाणावतात बघ तुझ्यापायी नेहेमी…

मग मुपाच्या कपाळावर ओठ टेकवत मी हलकेच म्हणते….

—–गुडनाईट बच्चा!!!

—-गुडनाईट तन्वी!!!

( याआधिची वैऱ्याची रात्र इथे आहे….)

छोट्या छोट्या गोष्टी……

आज सकाळी नेटाने सगळं काम आवरून ठेवलं होतं!! स्वयंपाक झाल्यावर कामवाली बाई आली त्यामुळे सगळीच भांडी घासली गेली…… घरही आवरुन झालं….. कामवाल्या बाईकडे (तिच्या नकळत :) ) लक्ष ठेवून घर स्वच्छ पुसुनही झालं……. बास!!! पर्फेक्ट पर्फेक्ट काय तो आजचाच दिवस असे वाटत होते……. आता ही बाई गेली की धूणं फिरवायचं तिसऱ्यांदा की मस्तपैकी दिवस हातात…..

खुशीतच दुपारची जेवण झाली…… मग अचानक आठवलं की आपल्या आनंदाच्या नादात धूणं प्रकरण राहिलय तिथेच , ते मशिनात आपली वाट पहातयं….. मग मोर्चा तिथे वळवला……. वॉशिंग मशिनला मनात धन्यवाद म्हणतं पाणी भरायला लावलं…… नेहेमीपेक्षा जरा जास्तच भरू दिलं म्हटलं आज कपड्यांना पण जरा चंगळ, उगाच दाटीवाटी नको…मोकळेपणे आंघोळ करू देत!!!!!!  मशीन ईमाने ईतबारे फिरू लागले……. एक दिड मिनिटात जाणवलं की काहीतरी लोचा आहे ……. पिकलेल्या केळाचा वास येतोय घरात….. मग हा वास (/गंध  जे हवे ते वाचा…. आम्ही घरात ’वास’ असेच म्हणतो त्यामुळे तेच टायपले आहे…असो मुद्दा वेगळा आहे ) मशीन लावण्यापुर्वी येत होता की लावल्यानंतर येतोय असा प्रश्न पडला!!!!! माझा आजचा मस्त मुड पहाता आजकाल डिटर्जंट वाले काय फळांच्याही वासाच्या पावडरी विकायला लागलेत का असाही एक हलकाफुलका विचार मनात आला….. पण मग सलमान कसे चादरीतून ’बरसावो तूम फुल ..’ म्हणतो तसे माझा नवरा चादरीतून सफरचंद, केळी, द्राक्ष अगदीच गेला बाजार कलिंगड उडवतोय असाही विचार आला…… या फळांचा आघात फुलांसारखा नसेल असेही मनात आले आणि माझी मीच स्वत:शी हसले!!!! (आता ही बया बावळट आहे या विचाराने तुम्ही हसत असाल तर आपली वेवलेंथ मॅच होत नाहीये असे समजा….. पण मी दर एक दिड दिवसाने अशी ’येडचाप विचारांची’ ट्रीट देत असते स्वत:ला :)   )

विषयांतर करावे माणसाने पण किती???? तर कुठे होते मी….हं!!! पिकलेल्या केळाचा वास ……. घरातली फळांची परडी (मराठीत बास्केट!!!) पाहिली तर सगळीच फळं सुस्थितीत होती…… बाहेरच्या उन्हाने त्यातले एकही अजुन अति पिकले नव्हते….. आता मात्र माझ्यातली लेडी करमचंद (किटीच म्हणणार होते…पण मग सुश्मिता मुखर्जी आठवली :( …..तेव्हा करमचंद {त्यातल्या त्यात} बरयं!!!  [ या वटवट्या सत्यवानाच्या पोस्टपायी ना कंसांची सवय झालीये ...आता हेच बघा आधि साधा कंस त्यात महिरपी त्यात चौकट...काय आहे हे सत्यवाना!!!!!!] ) तर…. हा केळाचा वास येत होता वॉशिंग मशिनमधुनच!!! मोहीम फत्ते उगमस्थान कळलेय!!!…… मग डोकावले त्या मशीनात…..माझे शोधकार्य संपेपर्यंत मशीन फिरून फिरुन दमुन थांबलेले होते……थोडक्यात त्याने त्याचे काम चोख पार पाडलेले होते!!!!!! सगळ्या कपड्यांमधे मधे मधेच केळाची सालं तरंगत होती…… मधेच थोडा फेससदृश काहितरी होते…… माझ्या मनात वैताग आणि कपाळावर आठ्या जमायला लागल्या होत्या!!!

मशीनमधे केळं जाण्याचा संबंधच काय??????? गुन्हा सिद्ध होत नाही तोवर सगळेच आरोपी या दृष्टीने घरातल्या उर्वरीत तीनही सदस्यांना पाचारण करण्यात आले…… नवरा आणि मुलगा म्हणाले की आम्ही आत्ताच घरी आलोय आमचा काहीही संबंध नाही!!! ते सुटले…उरल्या दोघी मी आणि माझी लेक…… मी का बरं असे काही करू????? संशयाची सुई घरातल्या मोस्ट उचापती मेंबरकडे गेली…… आणि मला आठवले की हिला सकाळी केळं खायला दिले होते खरे…… मग तिला विचारले तर ती म्हणाली, मी तर खाल्लं केळं!! मग आता काय करावे????? पण माझ्या या लेकीचा भाऊ अतिशय हुशार त्याने तिला पुन्हा विचारले की गौरा तू केळ सगळे खाल्लेस ना , मग त्याचे साल कुठे फेकले????? त्यावर लेक बोलती झाली, “ईशान मी केळं सगळे नाही खाल्ले….. ते घाण होते, त्याला काहितरी काळं लागलेलं होतं मी ते धुवायला टाकलेय!!!!! ” :D

कपाळावर हात मारून घेतला……. हसावे का रडावे कळेना!!!!!!  नवरोजी तर रवाना झाले हापिसात!!!! पण मग मी काय करणार……. सगळा प्रकार निस्तरता निस्तरता दोन तास गेले कारण मशीनने फिरून ते केळ आणि त्याच्या सालाचे अनेक छिन्नविछीन्न तुकडे कपड्यांमधे अडकवून ठेवले होते……. सगळं धुणं पुन्हा एकदा स्वच्छ (!!!) धुवून वाळतं घातले आणि हुश्श केले तेव्हा बराच वेळ गेलेला होता……… आलिया भोगासी असावे सादर!!!! घातलेत उचापती पोरं जन्माला मग निस्तरा… दुसरे काय!!!!! बरं हे सगळे होत असताना उत्सवमुर्ती निवांत घरभर फिरत होत्या…..नवे नवे उद्योग शोधत!!!!

हाच पराक्रम ईतर कोणाकडून झाला असता तर किती वैताग वाटला असता….. ईथे मी ग्लोबल वॉर्मिंगला टांग मारून पाणी नासत दोन दोन वेळा धूणं धुत होते आणि शांत होते……संध्याकाळी नवऱ्याला सगळी गाथा सांगितली तेव्हा आधि तर त्याला हसू आ्ले पण लगेच लक्षात आले की त्याच मशीनात त्याचेही कपडे जातात… मग सावध पवित्रा घेत त्याने त्याच्या नव्या शर्टांविषयी विचारले…….येव्ह्ढा वेळ शांत असणारे वातावरण तापवायला ती ठिणगी पुरेशी होती……. “अच्छा तुझे शर्ट म्हणजे कपडे आणि आमचे तिघांचे काय रे…..म्हणे माझ्या शर्टांचे काय!!! …… आहे ना आपल्या घरात B.E. केलेली धोबीण तिने धुतलेत हो तुमचे शर्ट व्यवस्थीत….. त्यांच्यातल्या पाण्याचे बाष्पिभवन व्हायला लटकवलेत हो ते!!!!”……. एक ना दोन नुसती धुसफूस सुरू होती माझी….. आणि ’अहो’ शांत… मग त्या तटस्थपणावर माझी आणिक चिडचिड……….

जरावेळाने वातावरणातला उष्मा कमी झालायसा अंदाज घेत नवरोजी म्हणाले तूला आठवतयं का ईशानने लहानपणी मोबाईल धूतला होता एकदा……. :) …..

” हो मग न उचापत्या करायला काय झालेय.. तुझीच मुलं ना ती!!!! “… मी माझा राग न विसरता म्हणाले……

“आहेतच ती माझी मुलं…. पण मला एक सांग जवळजवळ सुरु झालेल्या ट्रेनखालती जाणे, कण्हेरीच्या पानात गंध घालून ते विडा म्हणून खाणे असले पराक्रम कोणाच्या खात्यात जमा आहेत??????”….. हसत नवरा म्हणाला.

आता मात्र मी पण हसायला लागले. हे दिव्य पराक्रम माझ्याच बालपणीचे आहेत…….

मुळात आडात जे तेच पोहोऱ्यात यायचे ना….. सहज गप्पा सुरू झाल्या, चतूर मुलांनी ही संधी ऒळखली आणि ते ही सामिल झाले…. ईशान म्हणाला, ” मम्मा सांग ना तुझ्या लहानपणची ट्रेनची गोष्ट !!!! “….. मग पुन्हा एकदा त्या गोष्टीचे साग्रसंगीत पारायण झाले…… मग माझ्या भावंडाचे, नवऱ्याचे त्याच्या भावंडांचे लहानपणी केलेल्या पराक्रमांचे किस्से ऐकता ऐकता वेळ मस्त गेला……

केव्हातरी मनात एका जाहिरातीतली ओळ आली, ’छोट्या छोट्या गोष्टी आठवाव्या किती……………’

(फोटो जालावरून साभार!!!!)