डायरीची काही पानं…..

भारतातून सुट्टी संपवून येइन नं मी , मग सामान घेइन हळूहळू आवरायला. इथून नेलेल्या वस्तू जागच्या जागी ठेवायच्या आणि तिथून आणलेल्या वस्तूंसाठी नवी जागा करायची. दरवेळेचा त्रागा एकीकडे मनात , किती सामान आणतो आपण उगाच…. हल्ली सगळं सगळीकडे मिळतं….

सगळं सामान लावताना सोबत आणलेला एक बॉक्स दिसेल बघ मला…. नीट बंद केलेला…. तो दिसेल आणि मला एक मज्जा आठवेल… मी लगेच ठरवेन की तूला फोन करेन तेव्हा न विसरता सांगायची ती मज्जा, अगं झालं काय आम्हाला नं सामान चेक करताना विचारलं की काय आहे या बॉक्समधे…. मी म्हटलं की ’पापड’ आहेत….. पण बॉक्स असा नेता येणार नाही म्हणाली ती विमानतळावरची बाई… मी करवादलेच, कित्ती सांगाव या आईला नको देऊस पापडलापड पण ऐकतच नाही ….. तिथे नं एक कुलकर्णी आडनावाचे मॅनेजर होते, ते म्हणाले चालतो असा बॉक्स, आणि गेलं एकदाचं सामान आत :) …. विमानात चढताना कुलकर्णी होते तिथेच, मला म्हणाले गं सरळ की अहो तुमची काय आमची काय आया सगळ्या सारख्याच…. :)

तो बॉक्स उघडेन मी आणि कानात तूझा आवाज येइल ,” ताई इथल्या पावसात सर्दावले असतील गं पापड, उन्हात टाक ते ” …. एक एक पापड मी स्वतंत्र मांडते , मनात विचार येतो एकाच हाताने घडवलेले आणि वेगळं अस्तित्व असलेले पापड …. अलवार हात फिरतो माझा, तूझा हात लागलेला असतो नं त्या पापडांना …..

माहेरपण संपलं याची वारंवार जाणिव होते सारखी आणि मी स्वयंपाकघर गाठते ….. तिखट-मसाल्याचा डबा उघडते आणि पुन्हा कानात शब्द येतात , ” ताई तिखटाचा रंग फक्त लालभडक आहे हं, चवीला फारसे तिखट नाही ते …… मसाला बघ यावेळेस जरा बदल केलाय ….. आवडला की कळव, मग पुढल्या वर्षी तसाच करेन !!! ” ….

हे असं वारंवार घडतं नं, मग मला तू खूप आठवतेस …..

कुलकर्णीं भेटले नं कधी पुन्हा विमानतळावर तर त्यांना विचारायला हवय एकदा, “तुमची पण आई अशीच सतत बोलते का हो तुमच्या कानात :)

हळूहळू अशी सातत्याने येणारी आठवण आणि ओलावणारे डोळे यांची वारंवारता कमी होते…. मी ’ माझ्या घरात’ रमायला लागते …. तूला अधेमधे फोन करते, पण त्यात तुझ्यामाझ्यापेक्षा बाकिच्यांबद्दलच बोलत रहाते….. कधीतरी वाटतं तूला किती गृहित धरते गं मी …..

अशीच एकटी असते घरात नं सहज स्वत:कडे बघते , गंमत आहे आई माहितीये का… तू अगं कुठेच दूर नसतेस …. मलाच एक रहस्य समजतं , मी कुठे जाणार तुझ्यापासून दुर…. म्हणजे अगं बघ नं, मी जिथे, तिथे तू असणारचं नं…. मी आहेच काय वेगळं, मुळात माझी सुरूवातच तू नं :)

………………………………………………………………………………………………………………………………………………………………….

तूम्हाला बोलावणं म्हणजे नं दिव्य असतं आजकाल…. मला कळत नाही गं एक,  की तू कधीपासून अशी टिपीकल वगैरे झालीस ? , काय तर म्हणे अगं मुलीच्या घरी खूपदा येऊ नये… काहितरीच…. म्हणजे आम्हाला वाढवलस असं एकदम बिन्धास्त आणि आता स्वत: काकूबाई ….. चालणारच नाही, माझ्याकडॆ आहे नं हुकूमी एक्का, तो पटवतो तूला बरोबर ….. त्याने दिली धमकी , असं वागणार असाल तर मी ही तुम्हाला सासूबाई वगैरे म्हणायला लागेन…. त्याचं बरं ऐकतेस गं …. म्हणे त्याच्यासारखा दुसरा कोणी असूच शकत नाही ….

आले खरे तुम्ही पण टिकायला नको तूम्हाला … पुन्हा तेच पालूपद , खूप राहू नये मुलीकडे …. येडचॅप झालीयेस माय तू आजकाल .. फूल्लऑन विचित्र .. साठी नाही आली अजून तुझी पण ऐक माझं, म्हातारी झालीस तू !!!

सांगायला कशाला लागायला हवय तुम्हाला, की एरवी नं मला आठवण येते तुमची…. जा मग जाणार नं जा… उद्या जाणार ते आज जा!!!

मी कशाला फोन करू पोहोचले का सुखरूप वगैरे …

आणि हो ते आवळ्याच्या सुपारीच ताट आहे नं… उन्हाच्या दिशेला तोंड करून ठेवलेलं , तेच ज्यात मला आवडते म्हणून धावत पळत सुपारी करून ठेवलीस ते, ते नं जाता येताना रस्त्यात येतय हो…. अडचण होतेय मला त्याची …. तूझी घाई घाई आठवते मला ते दिसलं की , हे करून ठेवते, ते करून ठेवते ….. नको ठेवू ते, तू रहा त्यापेक्षा …….

ती लोणच्याची बरणी दिसते मला, तुझ्या लाडक्या जावयाचं लाडकं लोणचं केलस नं तू…. ” सात – आठ दिवसात मुरेल लोणचं, तोवर रोज हलव फक्त बरणीला …. वाटलं तर आणि लिंब पिळून टाक त्यात ” ….. लागलीस बघ माझ्या कानात बोलायला तू …..करते काय मी, हलवून ठेवते बरणी… तसंही मला कुठे खायचय ते लोणचं ….. मी खाणारच नाही जा !!!

कपडे ठेवायला जावं नं कपाटात , तर तो रिकामा कप्पा दिसतो मला… तूम्ही येण्यापुर्वी रिकामा करून ठेवलेला …. त्यात पुन्हा कपडे भरणं सोप्प नसतं गं…. तो कप्पाच काय, संपुर्ण घर रिकाम रिकामं वाटतं मला….

बाबांनी रामरक्षा म्हणताना लावलेल्या उदबत्तीची रक्षा भरून ठेवते मी…. अगं ती फार महत्त्वाची असते गं…. जरा काही खूट वाजलं, मन धास्तावलं नं की ती रक्षा साऱ्या घराला लावते मी !!!

म्हणजे नाही म्हणायला समजावते मी स्वत:ला … कसं आहे नं आई, मला माझ्यात तू आणि बाबा कायम सापडता अगं…. कोणाला सांगत नाही मी…. कशाला सांगायचं, सगळं सांगितलंच पाहिजे असा काही नियम नसतो नं…. आता खी खी हसू नका तू आणि बाबा ….. आठवतय मला ,”सगळं सगळ्यांना सांगू नये ” हे अनेकदा तुम्ही बजावता मला…. जाऊ दे !!!

पण महत्त्वाचं काय की, लेकीकडे खूप दिवस राहू नये वगैरे मुर्खपणाचे नियम मला प-ट-त ना-ही-त !!!

……………………………………………………………………………………………………………………………………………………………………

मला माहितीये तूला कुठलेही फॉर्म एकटीला भरायला आवडत नाहीत…. आपण काहितरी चूक करू असा तूझा आपला स्वत:बद्दलचा दावा !!! बॅंकेच्या लॉकरला भेट देऊन आल्यानंतर कशी तूला तीन चार दिवस भिती असते मनात की आपण नक्की काहितरी दागदागिना जमिनीवर पाडला असावा तिथे…. नाहितर आपण नक्की कुलूप घातले की नाही त्या लॉकरला :) …. विमानात यापुर्वी कधी स्वत:चा इमिग्रेशनचा फॉर्म तू भरला होतास का गं ?? विचारतेय काय तूला, मला माहितीये ते काम नेहेमी बाबा करत असावेत ….. गेल्या वेळेस कशी फिरायला गेली होतीस कुठेतरी, बाबा बिचारे तूला शोधत होते म्हणे मग ……

आणि यावेळेस सगळं ’जमलं’ नं आई तूला ….  विमानातले फॉर्म भरता आले, तू कुठे फिरायला गेली नाहीस… एकटीच प्रवासाला निघालीस तरी बिचकली नाहीस…..

मला पुर्णवेळ काळजी होती अगं की नक्की जमेल नं तूला एकटीला प्रवास … खरं सांगू तर इतकी मी ओळखतेच तूला की तू एकाच वेळेस अत्यंत कावरीबावरी आणि त्याच क्षणी तितकीच खंबीर असतेस जेव्हा प्रश्न तुझ्या मुलींबद्दल असतो :)

“मला बरं नाहीये आई ” हे चार शब्द तूला सांगितले की तू असशील तिथून धावत येशील खात्री वाटते मला !! किती सार्थ ’खात्री’ …. तूझं विमान उशिरा पोहोचणार होतं ना गं , मग मी झोपले … म्हणजे औषधं घेतली की झोप लागतच होती ना गं तेव्हा…. पण तरिही माझ्यातलं काहितरी टक्क जागं होतं, तुझी वाट पहात होतं …..

दमले होते गं….. काहितरी अंतस्थ अस्वस्थता आली होती…. घेरून आल्यासारखे !!!

गाढ झोपेत मन वाट पहात होतं, दार वाजण्याची ….. तू आलीस की धावत माझ्याकडे येणार असा भास होत होता….

आलीसच की तू… मी जागी आहे की झोपलेय आई ?? …..

डोक्यावरून तूझा हात फिरतोय …. हुंदका दाबतेय न तू, माझी झोप मोडू नये म्हणून ….. नवऱ्याला विचारते आहेस, आधि का नाही कळवलं हिला बरं नाहीये ते ?

तुझ्या हातात नं आवडे फार ताकद आहे गं…. मला किती शांत वाटतय…. आणि त्याचवेळेस एक अनामिक बळ संचारतय…. आता मी नाही घाबरत कशालाच….

मनात विचार येतोय अगं की झोपेत होते नं मी मग मला कसं समजलं तू आल्याचं ?? माझ्यात काय अपुर्ण होतं ??

तूझ्या कुशीत शिरले नं मग मला सगळ्या प्रश्नांची उकल झाली …..

हिरकणीचं बाळ झाले होते मी पुन्हा … सगळ्या संकटांना पार करून माझी आई माझ्यापर्यंत पोहोचेल या आशेने तिच्या वाटेकडे डोळे लावून बसलेलं बाळ …. आई आली म्हणून सुखावलेलं बाळं !!

…………………………………………………………………………………………………………………………………………………………………………

आता माझ्या माझ्यासाठी असलेल्या डायरीची पानं इथे का टाकतेय म्हणशील नं ??? सांगते थांब …..

Mothers Day आहे अगं , म्हणजे मला माझ्या पिल्लांनी ग्रिटींग कार्ड्स दिलेत म्हणून समजलं :) …. मी तूला काय देणार ??? …. तूझी आठवण येते वगैरे सांगत नाही नं हल्ली मी तूला, म्हणजे मोठी झालेय नं मी आता ….. लहान मुलांसारखं सतत वागता आलं तर मजा येइल आई …. मग मी ओरडून तूला सांगू शकेन की , “आवडे आय लव्ह यू ” … पण जमत नाही गं ते ….

जाऊ दे काही सांगत नाही…. तूला फोन करते सरळ, आपण हवा पाणी, माझी तब्येत … माझ्या मुलांच्या खोड्या वगैरे तमाम विषयांवर बोलत राहू ….

मी पाल्हाळ संपवून फोन ठेवताना तू म्हणशील नं , ” आता सांग खरा फोन कशासाठी केला होतास ते ? ” … एरवी तूला कसं समजतं असा प्रश्न पडतो नं मला… आता माहितीये ’लबाड’ आहेस तू…. सगळं समजतं तूला, न सांगताही !!!मला नं खरं तर तूझे आभार वगैरे मानायचेत गं एकदम फॉर्मल बिर्मल …. तू हसू नकोस पण आणि हो बये रडूही नकोस!!

थांबावं कुठे नं कसं मला सुचत नाहीये …. तूला आठवतं लहानपणी मला ’माझी आई’ यावर तूच निबंध लिहून दिला होतास , “प्रेमास्वरूप आई … वात्सल्यसिंधू आई  ” आणि ते ’स्वामी तिन्ही जगांचा’  वगैरे भारी एकदम….

खरं सांगू मला त्या सगळ्या शब्दांचा अर्थ तू समजावला आहेस … निव्वळ अर्थच नव्हे ’मर्म’ समजावलंस तू …. लव्ह यू आई!!!! :)

फुलपाखरू….. (भाग १)

सगळी कामं चटाचट आवरती घेऊन रमा निघाली, दाराला कुलूप लावताना एकीकडे पिल्लूला सुचना देत होती ती… डबा नीट संपव, टिचरचं ऐक…. शाळा सुटली की तिथेच थांब , मी येतेच आहे घ्यायला….पिल्लूला त्याच्या शाळेच्या बसमधे चढवून रमा चटकन सरिता मॅडमच्या घरी पोहोचली.

मॅडम तिची वाटच पहात होत्या…. रमा जरा विसावली क्षणभर. मॅडमनी दोघींसाठी चहा मागवला आणि रमाच्या हातात एक पत्ता दिला.  पुढचे पंधरा दिवस रमाला जायचे होते तिथे. उशीर करून तसेही चालणार नव्हतेच…. पिल्लूची शाळा संपायच्या आत रमाला पुन्हा परतायचे होते.

रोजचे हे हक्काचे तीन तास रमाचे असायचे. या नव्या शहरात सुरूवातीचे काही दिवस रमाला अगदी कठीण गेले… नवी जागा, पिल्लू लहान , ही अडचण नं ती समस्या पण रमा रुळली तिथे… आणि अभयची साथ होतीच तिला. पिल्लू आता शाळेत मस्त एंजॉय करत होते :) … हे रमाचे नव्हे पिल्लूचे मत होते त्यामूळे रमा मात्र सुखावली होती ….. पिल्लूच्या शाळेत एंजॉय करण्याने रमा तिच्या आवडत्या समाजसेवेकडे वळली होती पुन्हा.

सरिता मॅडमची संस्था एक प्रकारे आधारगट चालवत होती, मात्र हे काम जरा वेगळे होते. एकटे रहाणारे वृद्ध किंवा वृद्ध जोडप्यांना काही वेळ देणे आणि तो ही त्यांच्या रहात्या घरातच हे या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट्य होते. तिथे जाउन त्यांच्याशी गप्पा मारणे, त्यांची औषधं आणून देणे, त्यांच्यासाठी पुस्तक वाचणे, त्यांना बॅंकांमधे वगैरे नेणे असली जिकीरीची कामंही त्यात असतं कधी कधी, ही सगळी कामं रमा आणि तिच्या नुकत्याच झालेल्या मैत्रीणी आनंदाने करत.

मॅडमने दिलेला पत्ता वाचताना रमा चमकली क्षणभर…. ’श्रीकृष्ण नगर’ ….ऐकलेले आहे हे नाव तिने याआधि खात्रीने…. कुठे पण?? तसे खूप नाविन्य नाहीये नावात म्हणजे याच गावाचा असेल संदर्भ कश्यावरून…..या शहरात आल्यानंतर खरं तर अधे मधे ते नाव तिच्या मनात डोकवून जायचे…. आज अवचित तेच नाव सामोरे आले अनं रमा गोंधळली.  अर्थात दवडण्यासाठी वेळ होताच कुठे तिच्याकडे… तिने पत्ता पर्स मधे कोंबला आणि गाडी वळवली…. एक अनामिक हुरहूर मनात दाटली तिच्या . आयुष्य रमाला याचसाठी कायम आवडायचे… सकाळी उठताना आपण कामाची यादी करू भलेही पण त्यातली होणार कुठली कुठली हे आपण ठरवूनही भागत नाही :) …आयूष्याचं unpredictable असणं अत्यंत मोहक असतं असं तिला कायम वाटायचं…. गाडीच्या वेगाबरोबर तिचे विचार आज धावत नव्हते तसे, आणि ते धावले असतेही तरी तिने त्यांना रोखून धरले होते……

श्रीकृष्ण नगरच्या पाटीपाशी थांबून तिने पत्ता पुन्हा एकदा वाचला….

पत्त्यातलं घर एक सुरेख बंगली होती…. इथल्या काकुंकडे रमाला यायचं होतं आता, वयाने सत्तरीच्या पुढच्या या काकू खरं तर ऑस्ट्रेलियात त्यांच्या मुलाकडे रहातात. सध्या महिनाभरासाठी एकट्याच भारतात आल्या आहेत ही सरिता मॅडमने दिलेली माहिती रमा आठवत होती. घाईत आपण त्यांचे नाव वाचलेच नाही या विचाराने रमा स्वत:शीच हसली…. यात नवे काय होते म्हणा, हे असे घोळ घालणं रमासाठी कायम होतं…. नावं न विचारणे आणि चुकून विचारलेत तर विचारल्याच्या पुढच्या क्षणी ते विसरण्याचा तिचा हातखंडा होता.

दारावरच्या पाटीवरचं आडनाव पाहून मात्र रमाची खात्री पटली आजचा दिवस काही वेगळा दिसतोय…. तोच भाग आणि तेच नाव, किती वर्षांपुर्वी ऐकलेलं…. कितीही विसराळू म्हटलं तरी काही नावं कोरलेली असतात की काय अश्या विचारातच रमाने दार वाजवलं. तसेही काही आडनावं काही भागात अत्यंत कॉमन असतात , आपण उगा गुंते घालायचे नाहीत असा विचार तिच्या मनात आला…..

या घरात आणि या काकूंकडे आपलं पटेल याची खात्री तिला पहिल्या काही मिनिटातच पटली . स्वच्छ , नीटसपणा आणि साधं पण कल्पकतेने सजवलेलं घरं ही रमाची अत्यंत आवडती बाब, आणि या घरात नेमकं तेच रमाला खूप आवडलं. कामवाल्या बाईकडून घर आवरून घेणं हे एक मोठं काम असतं वगैरे मुद्दे आले आणि तिचं काकूंशी जमून गेलं…. दोन गप्पिष्ट बायका एकत्र आल्या होत्या…

पुढचे तीन चार दिवस भराभर गेले….

त्यांना काय हवेय काय नकोय वगैरे रमा जाणून घेत होती.दोघींच एकमेकींशी ’जमलं’ मनापासून… काही घरात रमाला जमवून घ्यावं लागत असे , इथे अलगद सुर जुळत होते. ’रमा’ तुझं नाव मला कायम आवडायचं … काकू सहज तिला सांगत होत्या. त्यांच्या बालपणीचे किस्से ऐकत, त्यांच्या औषधांची यादी समजावत घड्याळाचा काटा रोज चटाचट पुढे सरकत होता. ” ’चहाचा कप’ आणि गप्पा  ” हे काकूंनी त्यांच्या गप्पांच नाव ठेवलं होतं….

“रमा,  गेल्या कित्येक वर्षात इतकं बोलले नव्हते गं मी, काका होते नं तेव्हा त्यांच्याशी खूप गप्पा व्हायच्या माझ्या , तुझी ती सरिता ओळखते नं मला…. तिला मी म्हटलं होतं तुझ्याकडची बडबडी मुलगी पाठव , तिने लगेच तुझे नाव सुचवले…. मला ’रमा’ नाव आवडतेच आणि, माझ्या फार आठवणी आहेत या नावाशी निगडित….. ” काकूंच्या बोलण्याचा ओघ सुरूच असे.

रमादेखील असं खळखळून किती दिवसानी हसली होती. काकूंच्या बोलण्यात बरेचदा उल्लेख व्हायचा, ’लहान आहेस गं पोरी अजून … ” … रमाला मजा वाटायची तेव्हा. लग्न झाल्यापासून  ती अचानक खूप मोठी झाल्यासारखे वाटवणारे दडपण ती विसरून जायची मग. रमाच्या मनातलं फुलपाखरू मोकळं वाटायचं तिला तेव्हा….

’फुलपाखरू’ … नाजुकसं, सुंदरसं…. रमाने गुपचूप ठेवलेलं होतं त्याला मनात लपवून…. बाहेर काहिही चालू दे , मनात मात्र राज्य त्या फुलपाखराचंच….. :)

रमाला या चहाच्या कपाबरोबरच्या गप्पा खूप आवडल्या होत्या. तिची खूप लहानशी स्वप्न होती नेहेमी,  त्यातलं एक म्हणजे अश्या गप्पा मारणारी सासू… अभयच्या आईला असली स्वप्नाळू कल्पना ऐकवणं जरा अवघडंच होतं.  रमा एका वेगळ्या पातळीवर विचार करणारी आणि अभयची आई एका वेगळ्या… दोघींचे सुर इतर अनेक सासू सुनांसारखे वेगळे असले आणि त्यांच्यात वाद नसले तरी रमाची लहानशी स्वप्न मात्र तिला नेटाने मागे सारावी लागली होती. “सुनेने सुनेसारखेच वागायचे ” हा नियम ऐकून ऐकून रमा नित्य नेमाने गोंधळत जायची….. सुनेकडे फुलपाखरू नसावं बहुतेक , हळुहळू रमाला वाटायला लागलं मग!!! फुलपाखराला बरणीत कोंबलं होतं जणू… मलूल पडलेलं असायचं ते तिथे….. सगळं सुख असलं तरी मोकळ्या हवेत उडणाऱ्या, रंगांची, ताजेपणाची सय व्हायची फुलपाखराला, त्या जिवाची घुसमट व्हायची !!!

” रमा तुझ्या बालपणाबद्दल सांग गं, कुठली आहेस तू?? “  काकूंचा अचानक आलेला प्रश्न होता खरं तर हा !! त्यांच्या आधारगटाचा तसा  अलिखीत नियम होता की जिथे जाल तिथली माहिती विचारायची नाही आणि सहसा आपल्याबद्दल फारसे काही सांगायचे नाही. आज त्या नियमाला मुरड घालून रमाने गप्पा मारल्या….  तिच्या कॉलेजचे नाव काकूंनी परत विचारले, आणि त्या मंदश्या हसल्या. रमा अभयबद्दल, पिल्लूबद्दल भरभरून बोलत राहिली. ती घरी जायला निघाली तेव्हा काकूंनी तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि तिला आशिर्वाद दिला. तिच्या पाठीवर त्यांची बोटं हळूवार फिरली…. त्यांच्या मायेनं भारलेल्या अनपेक्षित कृतीने रमा सुखावली. आज काकू बोलल्या नाहीत फारश्या, उलट मन लावून आपलं बोलणं ऐकत होत्या असं वाटलं तिला.

पंधरा दिवस चटकन संपले … काकूंचा निरोप घेणं रमाला जड गेलं. शेवटच्या दिवशी काकूंनी आग्रह केला म्हणून अभय आणि पिल्लूही त्यांना भेटायला आले. तिघांनी वाकून काकूंना नमस्कार केला. किती बोललं गेलं असलं तरी गप्पा कितीतरी मारायच्या राहिल्याच होत्या, काकूंबद्दल अजून किती जाणून घ्यायचे होते, त्या गप्पा पुढच्या भेटीत असे दोघींनी ठरवले :)

पुढच्या दिवशी काकूंचा मुलगा, सुन आणि नात येणार होते. ते सगळेच परत त्यांच्या मुक्कामी परतणार होते.

रमाला आता एखाद दोन दिवस सुट्टी आणि मग पुढच्या काकू किंवा काका-काकूंकडे जायचे होते. :)

……………………

 

फुलपाखरू भाग २ इथे आहे !!

फुलपाखरू….. (भाग २ )

(पहिला भाग इथे आहे. )

पुढचे काका- काकू , आणि मग त्याच्या पुढचे काका किंवा नुसत्या काकू …. दिवस पुढे सरकत होते. पिल्लूच्या शाळेतला अभ्यास वाढत होता…. अभयच्या ऑफिसमधलं कामंही छान चाललं होतं. रमाला निवांत वेळ हाताशी कमीच लागत होता तसा . कधीतरी चहाचा कप आणि जरा सवड हातात एकत्र आली की त्याबरोबर काकूंची आठवण मनात आल्याशिवाय रहायची नाही. सरिता मॅडमला काकूंबद्दल विचारू हा विचार मनात यायचा आणि मग घाईत ते राहून जायचे…..

त्यात पिल्लूच्या शाळेला सुट्ट्या लागल्यानंतर रमाच्या सासूबाई तिच्याकडे रहायला आल्या…. ’समाजाची कशाला हवीये सेवा , त्यापेक्षा एखादी नोकरी करावी ’ हा विचार रमाला येता जाता कानी पडायला लागला. रमाने त्यांचे बोलणे मनावर न घेता त्यांच्याशी संवाद साधायचा नेहेमीचा प्रयत्न चालवला होता. सगळं म्हणायला सुरळीत चाललेले होते.

एक दिवस मग ते सगळे या भागातल्या प्रसिद्ध साड्यांच्या दुकानात गेले होते…. या शहरात आल्यापासून अभय रमाला कित्येकदा तिथे चलण्याबद्दल म्हणत होता, रमाने ते कायम टाळले होते. आज सासूबाईंची इच्छा म्हटल्यावर रमाला जावेच लागले….. अनेक साड्यांची खरेदी झाली…. एकीकडे ती स्वत:, मधे अभय आणि दुसऱ्या बाजूला सासूबाई बसलेल्या होत्या…..  रमाला वाटले नात्यांची ही एक साडीच आहे ही, सासूबाई मुख्य साडी , अभय जोडणारा धागा आणि आपण काठाला उभे आहोत….

साड्यांच्या राशीतून एक बेंगनी रंगाची, हिरवे सुरेख नाजूक काठ असलेली साडी रमा हातात घेउन पहात होती. तिच्या मनातल्या फुलपाखराचे आवडते रंग….जांभळा रंग आणि हिरवे काठ असलेलं जरतारी फुलपाखरू….  तिच्या सासूबाई फणकारल्याच तितक्यात, काय तरी साडी निवडलीस गं रमा, वेगळच काहितरी शोधतेस नेहेमी ….. भिरभिरणारे फुलपाखरू बिचकले, पुन्हा कोषात गेले :(

” ती साडी घेऊयात तूला “, असे अभयने म्हटल्यावर मात्र तिने नकार दिला….

रमाच्या मनात एक विचार चमकला परत येताना , जुनी रमा असते नं मी तर आत्ताच्या आत्ता सासूबाईंना अर्धा तास डिवोर्स दिला असता … बोललेच नसते… बालिश इलाज होता तिचा हा… कट्टी नाही म्हणायची ती, डिवोर्स म्हणायची …. तिच्या कॉलेजमधे सगळे हसायचे तिला या शब्दाबद्दल. जुन्या आठवणी तरळल्या मनात आणि तिला वाटलं ’लहान आहोत आपण .. पिल्लूयेव्हढे किंवा जरासे मोठे ’ …. अधेमधे असे बालिश वागता येण्यासाठी तरी काकूंसारखी सासू हवी होती मला…. वयानेच नाही तर खरंखूरं मोठेपण असणारी….  मनात विचार आला खरा पण त्या विचारासरशी रमा चपापली. तिने सासूबाईंच्या हातातले सामान घेतले आणि ते सगळे घराकडे निघाले…. नाजुकश्या पंखाची उघडझाप झाली क्षणभर मनात आणि पुन्हा ते उदास मिटले ……

सासूबाई गावी गेल्यानंतर पुढचे जवळपास आठ -दहा दिवस रमाला सरिता मॅडमकडून फोन आला नव्हता… पिल्लूच्या शाळेची सुट्टी संपून शाळा सुरु झाली. रूटिन सुरू….

रमा घरातली कामं आवरत असताना बेल वाजली , सरिता मॅडमकडून तिच्यासाठी काही सामान आले होते.

पार्सलमधल्या एका पाकिटात एक पत्र होते रमासाठी…. रमा पत्र वाचू लागली आणि नकळत डोळे भरून वहायला लागले तिचे….तिच्या काकूंचे पत्र होते ते…

रमा वाचत गेली ओळींमागे ओळी…..

” प्रिय रमा, …….तुझ्या काकांनी निवडलेली आणि मी तुझ्यासाठी खरेदी केलेली भेट पाठवतेय…. काका म्हणू की सर म्हणू गं… तू सर म्हणायचीस नं त्यांना… तुझे लाडके सर… आणि सरांची लाडकी विद्यार्थीनी तू. आधि तू हरहून्नरी मुलगी म्हणून आवडायचीस त्यांना, मग त्यांना तुझ्यात त्यांची सुन दिसली म्हणून तू अजून लाडकी झालीस. मला घरी तुझ्याबद्दल सतत सांगत ते.  एकूलता एक मुलगा त्यांचा आणि अनेक स्वप्न… सतत म्हणत मी आणि माझी सुन मस्त पेपर वाचन करणार सकाळी , एक चहाचा कप हातात हवा आणि भरपुर गप्पा. मला सुन नकोय , मुलगी हवीये…. मला तर सक्त ताकिद होती, सुनं म्हणायचं नाहीस कधिही तूला…. तू मुलगी आमची. :)   तूला पहायला येऊ असे ठरवलेही मी पण राहूनच गेले ते…. मग आमची आमच्याच गावी पुन्हा बदली झाली … तुझं शिक्षण पुर्ण झाल्यावर तुझे सर निघालेही होते तूला मागणी घालायला पण तोपर्यंत तुझे आणि अभयचे लग्न तुम्ही ठरवलेले होते. ते हिरमूसले , म्हणाले मी आधि बोलायला हवे होते….

आमच्या मुलाचे लग्न होइपर्यंत ते काही थांबले नाहीत बघ पण !! मी ही निघालेय आता त्यांच्याकडे…. तू अशी अचानक सामोरी आलीस, सगळे संदर्भ जुळले. त्यांची मुलगी मला भेटली हे त्यांना सांगेन न विसरता…..  “

रमाच्या मनात तिचे सर तिच्याशी बोलत होते, सरिता मॅडमने सांगितलेल्या त्या भागाच्या नावाने, त्या घरावरच्या पाटीने मनात दाटलेली हुरहूर तिचा अर्थ समजावत होती… आठवणींची दाटी होत होती…. अभयशी लग्न ठरताना मैत्रीणींची ’रमा अगं लग्न एकाशी नसतं गं होत, संपुर्ण घर येत नं त्यात , त्या घरात कशी रमशील तू ?? त्याच्या आईच्या हेकट वागण्याकडे कानाडोळा का करते आहेस ?? “  वगैरे वाक्य रमाच्या मनात डोकावत होती….. वेडं फुलपाखरू घायाळ होत होतं…. काय कमावलं काय गमावलं हे हिशोब फुलपाखराला येतच नव्हते, आणि मांडायचेही नव्हते …. एक सल मनात उमटत होती तिला नाव मात्र त्या बिचाऱ्याला देता येत नव्हते…..

पत्र हातात ठेवून बराच वेळ रमा बसून होती… त्या पत्राबरोबर एक लहानशी चिठ्ठी होती …

” रमा, सासूबाईंनी हे पार्सल आणि पत्र तुझ्यासाठी ठेवले होते…. त्यांच्या शेवटच्या काही इच्छांपैकी एक की हे पत्र तूला पोहोचवावे. ….. तुझ्याबद्दल खूप बोलल्या त्या, अगदी आनंदी होत्या जाताना ….. “

काकूंच्या सुनेने तिचा पत्ता आणि फोन नंबर दिलेला होता. त्या कोण होत्या हे समजल्यावर,  आता त्या आपल्यात नाहीत हा विचार रमाला अजूनच कष्टी करत होता.तिचे डोळे सारखे भरून येत होते…..

सोबतचे पार्सल उघडले रमाने…. त्यात एक सुरेख साडी होती….. बेंगनी रंगाची, हिरवे नाजूक काठ असलेली……… तिचा मऊसूत अलवार स्पर्श रमाच्या हातालाच नव्हे तर मनाला झाला आणि आधिच वहाणारे डोळे अजूनच भरून येउ लागले.

त्या साडीकडे रमा एकटक पहात राहिली….. बेंगनी साडीवर त्याच रंगाचं फुलपाखरू गोल गोल फिरत राहिलं…………

एक सात्विक वादळ …. अमृता प्रीतम …

अमृता प्रीतमचं तिने स्वत: लिहीलेलं एकही पुस्तक मी वाचलेलं नाही ,कधी वाचेन ते ही माहित नाही!!!  पंजाबीत असलेलं पुस्तक वाचता येणार नाही कदाचित पण समजणार नाही असं मात्र म्हणता येणार नाही….. ती मराठी नाही, मी पंजाबी नाही…. तिच्या साहित्याची ओळख होण्याच्या टप्प्यापर्यंत येइपर्यंत मूळात माझी साहित्याशी अजून ओळख नाही….  मग असे असूनही , तुटपुंज्या वाटू शकणाऱ्या ओळखीवरही त्या व्यक्तीमत्त्वातलं नक्की काय साद घालतं समजत नाही….

बरेचदा वाटतं ब्लॉगवर एक पोस्ट लिहीण्याइतकी मी नक्कीच ओळखते तीला… मग वाटतं, छे!! मला जे समजतं , जे वाटतं ते शब्दांमधे बांधण्याइतकी समर्थ मी नक्कीच नाहीये.आणि मग तिथेच वाटतं, ’युरेका ’ …. सापडलं मला की मला काय आकर्षण वाटतं तिच्या व्यक्तीमत्त्वाचं…. माझं ’दुबळं’ असणं, समाजाच्या चौकटीचं सतत भान बाळगणं आणि तिने ते सशक्तपणे झुगारणं …. नुसतं झुगारणं ही बंडखोरी नव्हे तर स्वत:तल्या प्रतिभेला जपत स्वत:च्या नियमांनूसार आयुष्य जगणं !!!

भारतातून निघताना पुस्तकं खरेदी करणे हा एक महत्त्वाचा टप्पा असतो माझ्यासाठी नेहेमी . एका पुस्तकाच्या खरेदीवर एक पुस्तक मोफत अशी योजना त्या दरम्यान सुरू होती. घेतलेल्या कुठल्यातरी पुस्तकावर एक लहानसं पुस्तक हाती आलं , मुळचं ’उमा त्रिलोक ’ या लेखिकेचं आणि  ’अनुराधा पुनर्वसू ’ यांनी मराठीत भाषांतरित केलेलं  ’अमृता इमरोज ’ एक प्रेमकहाणी  नावाचं ते पुस्तकं !!!

अमृता प्रीतम एक मोठ्या पंजाबी लेखिका होत्या इतपतच ज्ञान होते तोवर मला…. केव्हातरी सहज पुस्तक चाळायला म्हणून हातात घेतलं . मात्र जसजशी वाचत गेले तेव्हा मात्र अमृताच्या व्यक्तिमत्त्वाच्या प्रेमात पडत गेले. इथे इमरोजना वेगळं काढणं शक्यच नाहीये. ते दोघे वेगळे होतेच कधी…..

एक जिगसॉ पझल येतं इश्वराकडून , आपल्यात एक अपुर्ण आपण असतो … त्या पझलचा दुसरा भाग देवाने पाठवलेला असतो ….. आणि ती दोन अपुर्णत्त्व जिथे भेटतात ते जीवन यशस्वी असते वगैरे प्रेमाच्या संकल्पना मनात कायम होत्या माझ्या , स्वत:ही तसेच काही जगण्याकडे कलही आहे पण बऱ्याच गोष्टी बोलत नाही आपण सहसा!!  ’हसं’  होइल आपलं अशी एक सुप्त भिती बाळगत आपण आपल्यातलं सामान्य असणं मान्य करतो :( …. अमृता आणि इमरोज यांच्या वयातलं ’उलटं’ अंतर आज तितकसं बोचणार नाहीदेखील पण समाजासाठी अश्या बाबींची मान्यता ५०-६० वर्षापुर्वी निश्चित नव्हती . त्यातही लग्नाच्या रूढ बंधनात न अडकता ४० वर्षापेक्षा अधिक काळाचं त्यांचं सहजीवन हा विषयच भुरळ घालणारा. अमृताला आधिच्या लग्नापासून झालेली मुलं आणि इमरोज अविवाहित , वेगळं आहे नं रसायन !!!

समाजाचा समाजानेच रचलेला एक पाया आहे…. वर्षानूवर्षे माणसांच्या अनेक पिढ्या त्या पायाला धरून जगताहेत… आमच्या पायावर आम्ही उभे आहोत हा दावाही ठोकतात…. आपण कसलातरी आधार घेतलाय ही जाणिवच जिथे नाही तिथे त्या आधाराशिवाय उभं रहाण्याचं आपल्यात सामर्थ्य असतं हे भान कुठून येणार ??? एखादा येतो मग चुकार गडी जो समाजाच्या या पायाला आव्हान करतो…. त्याच्या मजबूत भिंतींपलीकडे पहातो…. अवघड असतं हे नेहेमी …. पायाला चिकटलेली माणसं अश्या स्वतंत्र उभ्या रहाणाऱ्या माणसाचे पाय ओढतात ….. त्यात जर ती एक स्त्री असेल तर विचारायलाच नको…. जे आजही कठीण आहे ते आजपासून अनेक वर्षांपुर्वी अजूनच कठीण असणार नाही का ….

प्रस्थापिताविरुद्ध बंड करायचाय नं मग समर्थ असायला लागतं !! कणखर , मजबूत वगैरे असावं लागतं …. अमृता तश्या होत्या !! इथे मुळात ’भरकटण्याचा ’ धोका फार …. केलेल्या प्रत्येक कृतीचं समाज स्पष्टीकरण मागत फिरतो अश्या वेळेस ….. ते द्यायचं नसतं कारण ते मुळात ज्यांना समजत नाही तेच ते मागत असतात…. आपला वेगळा सुर आपण लावायचा असतो, समाज ऐकणार असतो तो सुर पण आपण यशस्वी झाल्यानंतर …. मधला काळ मात्र मोठा बाका असतो …..

काही लोक ’आवडून जातात ’ आपल्याला. सुर जुळतात, झंकार ऐकू येतो , ते होत होतं अमृताबाबत.

’ इतिहास माझ्या स्वयंपाकघरात आला आणि भुकेलाच परतला  . ’ ही ओळ असो किंवा , ’तिच्या आयुष्याचे धुमसते निखारे काळाने हलवले , त्या चटक्यांनी त्याच्या बोटांवर फोड आले. ’ असो,  जसजसे अमृताच्या साहित्याचे हलके हलके दर्शन व्हायला लागते मनाचा गोंधळ उडायला लागतो…. शब्दांची वेगळीच बांधणी असते ही…. अमृताच्याच एका पुस्तकाचं नावं आहे ’अक्षरों की रासलीला ’ … किती योग्य आहे हा शब्द तिच्या रचनांसाठीही ….. शब्दच जणू खेळताहेत एकमेकांशी आणि घडवताहेत एक अप्रतिम काव्य !!! वीज चमकते नं क्षणभर कसा लख्ख प्रकाश दिपवतो आपल्याला तशी धारदार रचना मोहात पाडते .

कधी कधी एखादं पुस्तकं वाचायला घेतलं की आवडतं पण उगाच मन साशंक होतं की आपल्या या आलूलकीला तडा तर नाही नं जाणार…. तसे न होता अमृताबाबत कुठेतरी खात्री वाटायला लागते,  इथे मुळातं नातं विश्वासाचं आहे…. निडर, बंडखोर, स्वत:शी प्रामाणिक लोकांबद्दल मला नेहेमी आदर वाटत आलाय , त्यांच्याकडे स्वत:चा विकास करण्याचंच नव्हे तर समाजाला एक सकस दृष्टिकोण देण्याचं सामर्थ्य असतं.

१२२ पानं झपाटलेली …. पुस्तकात अमृता – इमरोजच्या तरल नात्याचे अनेक सुरेख, तरल पैलू , अमृताच्या साहिर लुधियानवीबद्दल कायम वाटलेल्या प्रेमाचे रंग, तिचं प्रसंगी कणखर नं एक स्त्री म्हणून स्वत:तलं स्त्रीतत्त्वाशी प्रामाणिक असणं सगळंच आहे…. काहितरी देऊन जाणारं पुस्तकं !!! आपल्याला अंतर्बाह्य समृद्ध झाल्यासारखं वाटवणारी एक सोबत….

इमरोजसाठीची तिची ’मै तेनू फिर मिलांगी ’ कविता तशी अनेकांना परिचयाची …. गुलजारांच्या आवाजातली ही कविता इथे ऐका !!!

पुस्तक वाचून संपलं पण एक अस्वस्थता सोबतीला आली…. ती अजून खाद्य मागत होती. अमृताचा अजून शोध घे म्हणून सांगत होती….. अमृताचं लिखाणं आता शोधायचं आहे ….. काही काही अपुर्ण पानं हाती लागताहेत …..

फाळणीचं दु:ख अनूभवलेली अमृता…. त्या व्यथेला कायम मनात बाळगलेली अमृता ….. हीर ची दास्तान लिहिणाऱ्या ’वारिस शाह ’ ला फाळणी दरम्यान अत्याचार झालेल्या मुलींबद्दलही लिही रे सांगणारी , ’ वारिस शाह ’ ही  कविता लिहिणारी अमृता ….

फाळणीच्या वेळी पळवून नेलेल्या मुलींचा नंतर शोध घेतला गेला त्यातल्या अनेक मुलींच्या पोटात कोणाचं तरी बीज वाढत होतं :( …. त्या बाळांबाबत अमृता लिहीते , ” उस बच्चे की ओर से – जिसके जन्म पर किसी भी आंख में उसके लिये ममता नहीं होती , रोती हुई मां और गुमशुदा बाप उसे विरासत में मिलते हैं ….. “

” मैं एक धिक्कार हूं -

जो इन्सान की जात पर पड रही …

और पैदाईश हूं – उस वक्त की

जब सुरज चांद -

आकाश के हाथों छूट रहे थे

और एक -एक करके

सब सितारे टूट रहे थे ….

’पिंजर’ पाहिला तो केवळ अमृतासाठी …. तिच्या प्रेमात पुन्हा एकवार पडण्यासाठी !!  फाळणीपुर्वी पाकिस्तानात असलेल्या एका गावातली’पुरो ’ (उर्मिला मातोंडकर )…. तिचे लग्न ठरलेय…पुर्वजांच्या वैमनस्यातून सुडाच्या भावनेने तिला त्या गावातला रशीद नावाचा मुसलमान पळवून नेतो…. हा रशीद मनाने अतिशय चांगला आहे…. त्याच्याकडे राहून आलेल्या पुरोला घरी कोणी स्विकारायला तयार नाही… नाईलाजाने पुरोचा रशीदशी निकाह होतो, तिला त्याला स्विकारावं लागतं …. परिस्थीतीपुढे शरण गेलेली तरिही स्वत्व जपणारी…. खंबीर, लढावू वृत्तीची पुरो … आणि शेवटी ’रशीद’ च्या चांगूलपणामूळे, त्याच्यातल्या व्यक्तीची ओळख पटल्यानंतर त्याला शोधत धावणारी , त्याच्या नावाने हंबरडा फोडणारी एक साधी , हळवी स्त्री…. खऱ्या प्रेमापुढे सहज झुकणारी, त्याची कदर करणारी स्त्री !!  उर्मिला इथे ’पुरो ’ हे पात्र जगलीये… मात्र त्या पात्रात अमृता शोधता येते इतका तिचा ठसा मनावर उमटलाय….

ही पुरो सिनेमात शेवटी म्हणते, ” चाहे कोइ लडकी हिंदू हो या मुसलमान, जो भी लडकी लौटकर अपने ठिकाने पहूँचती है समझो की उसीके साथ पुरो की आत्मा भी ठिकाने पहूँच गयी…. ” !! स्वत: अमृताचे शब्द आहेत हे….

अमृताच्या सगळ्याच नायिका एक नवा प्रश्न सजगतेने सोडवणाऱ्या आहेत…. प्रस्थापितांविरुद्ध बंड करणाऱ्या तर कधी वेगळीच वाट शोधून पहाणाऱ्या…. मात्र त्या ’चुकीच्या’ कधिही नाहीयेत . म्हणजे अमृता एक शहाणपण स्वत:च बाळगून होती म्हणावं लागेल ….. एक सुधारक विचारांनी भरलेलं सुंदर मन होतं तिच्याकडे. तिची बुद्धिमत्ता तिच्या कथेतल्या नायिकांच्या संवादातून आणि त्यांच्या प्रश्न सोडवण्याच्या क्षमतेतून दिसून येते.

स्त्री आणि पुरूषाच्या नात्याबाबत अमृताने तिच्या एका कथेतल्या नायिकेद्द्वारे मांडलेले विचार खूप काही सांगणारे आहेत….

मलिका नावाची ही नायिका आजारपणात दवाखान्यात जाते आणि तिथे एक फॉर्म भरून देतेय ….

वय विचारून झालय , आता डॉक्टर तिला विचारतो ’ तुम्हारे मालिक का नाम ?? ’ .. तेव्हा ही नायिका त्याला खडसावते मी घड्याळ किंवा सायकल नाहिये मला मालिक असायला, मी एक स्त्री आहे….. चपापलेला डॉक्टर तिच्या पतीचे नाव विचारतो…  तेव्हा ती सांगते ,” मै बेरोजगार हूं ! ’”  …..

गोंधळलेला डॉक्टर पुन्हा सांगतो मी तुझ्या नोकरीबाबत विचारत नाहीये … तेव्हा ती त्याला समजावते ,” हर इन्सान किसी न किसी काम पर लगा हूआ होता है, जैसे आप डॉक्टर लगे हुए है, यह पास खडी हुई बीबी नर्स लगी हुइ है ….. इसी तरह जब लोग ब्याह करते है, तो मर्द खाविंद लग जाते है और औरतें बिवीयां लग जाती है ….. वैसे मै किसी की बीवी लगी हुइ नही हूं!!! “

आता मात्र पुरत्या गोंधळलेल्या डॉक्टरला मलिका समजावते , की जगातल्या सगळ्या व्यवसायामधे ’तरक्की’ होते, जसे आज मेजर असलेले उद्या कर्नल होतात, परवा ब्रिगेडियर होतात आणि मग जनरल !! मात्र ’शादी- ब्याह ’ च्या या पेश्यामधे तरक्की होत नाही !!!

’ यात कुठली तरक्की होणार ? ’ असा डॉक्टरचा प्रश्न येतो .

तेव्हा मलिका उत्तर देते , ” डाक्टर साहब हो तो सकती है , पर मैने कभी होती हुए देखी नही । यही कि आज जो इन्सान खाविंद लगा हुआ है , वह कल को महबूब हो जाए , और कल जो महबूब बने वह परसों खुदा बन जाए …. “

किती वेगळा विचार आहे हा…. किती खरा आणि ….. साध्या सरळ सहज शब्दात , एका गुंतागूंतीच्या नात्याला बांधू शकणारी अमृता म्हणूनच इमरोजसोबत विवाहाच्या बंधनात न अडकता एक यशस्वी सोबत करू शकली.

ध्यास घ्यावा वाटतो या लेखिकेचा आणि तिच्या साहित्याचा!!! ’वादळ ’ पेलावसं वाटतं हे ….

खूप लिहावसं वाटतं खरं तर पण आटोपतं घेतेय आता…

एक मात्र खरं की …..

अमृताचं वादळी विचारचक्राचं अत्यंत सात्विक असणं , वेदनेचं पचवणं आणि त्यावर मात करून येताना अजून परिपक्व होणं समजलं की अमृता मनापासून खूप आवडते …. ते समजण्यासाठी तिला वारंवार भेटावं लागतं … विशेष मेहेनत नाही लागत अर्थात, तीचं लिखाणं आणि विचार तशी भुरळ घालतात आपल्याला समर्थपणे  !! 

अमृताचीच एक कविता आहे …. समाजाच्या बंधनांतून स्वत:ला न जखडता स्वतंत्र जगणाऱ्यांच्या व्यथांबद्दल आणि प्रवासाबद्दलच्या तिच्या कवितेतल्या काही ओळी….

पैर में लोहा डले

कान में पत्थर ढले

सोचों का हिसाब रुकें

सिक्के का हिसाब चले ….

और लगा -

आज मैने अपने घर का नम्बर मिटाया है

गली कें माथे पर लगा गली का नाम हटाया है

हर सडक की हर दिशा का नाम पोंछ दिया है …..

गर आपने मुझे कभी तलाश करना है….

तो हर देश के, हर शहर की , हर गली का द्वार खटखटाओ -

यह एक शाप है – एक वर है

और जहां भी स्वतंत्र रूह की झलक पडे

समझना – वह मेरा घर है !!!

And that solves the mystery … माझ्यामते जर समाजातल्या काही रुढी परंपरांविरुद्ध मी बंड करत असेन , चुकीला चूक म्हणू शकत असेन तर माझ्यात ’अमृताचा ’ एक अंश नक्कीच आहे…. तेच नातं आहे माझं तिच्याशी !!!

म्हणून वारंवार मलाही तिला म्हणावसं वाटतं असावं ’ मै तेनू फिर मिलांगी ’ :)

_ लोकसत्तामधे ’फिरूनी पुन्हा भेटेन मी ’ नावाचा रवींद्र पाथरेंचा एक सुंदर  लेख इथे आहे.

( फोटो जालावरून साभार !! )

सर….

प्रिय सर,

पुन्हा एकदा काय होणार माहितीये का मी आज जुनी डायरी उघडणार…. ५-६ वर्षापुर्वीचे एक जपुन ठेवलेले पत्र बाहेर काढणार त्यातला  जवळपास पाठ असलेला प्रत्येक शब्द पहिल्या वेळेस वाचला होता तसाच अधाश्यासारखा वाचणार….. त्या ओळींवरून नजर फिरवत फिरवत केव्हातरी चटकन आठवणींच्या रस्त्याला गाडी वळवणार….. मनात नेहेमीचाच विचार पुन्हा येणार, मी पुन्हा नव्याने ठरवणार की सरांना यावेळेस भेटले ना की सांगायचंय की जेव्हा जेव्हा उदास व्हायला होते, काहितरी हरवल्यासारखे वाटते… कुठले तरी न्यून जाणवते मी चटकन या तुम्ही पाठवलेल्या पत्राचा आधार घेते…. आणि माझ्या विश्वासाला त्या ओळी कधिही दगा देत नाहित….. माझा स्वत:वरचा किंचितसा ढळलेला विश्वास चटकन उडी मारून पुन्हा त्याच्या जागेवर हजर होतो…..

सर, आज बाळासाहेबांचा वाढदिवस…. त्यांचा वाढदिवस म्हट्लं की डोळ्यासमोर डरकाळी घालणारा वाघ येणारच…. पण तुमचाही वाढदिवस हाच हे ज्या क्षणी समजले ना मनापासून हसले होते मी….. मला वाटलं सगळ्या शेर आणि समशेरांचा जन्म २३ जानेवारीला होतो वाटतं!!! :) कंपनीतल्या तुमच्या कॅबिनकडे पहायचंही कोणाचं सहसा धाडस होत नाही हे मला त्या केबिनमधे तुमच्या शेजारच्या टेबलवर बसायला लागल्यानंतर साधारण आठेक दिवसात समजलं, आणि मला वाटलं की काय वेडे आहेत हे लोक, सर म्हणजे तर एक दिलखुलास व्यक्तिमत्त्व आहे मग त्यांच्या केबिनला ’वाघाची गुहा’ का म्हणतात हे लोक??? लवकरच जसे खरे काम सुरू झाले आणि तुम्ही तुमच्या खऱ्या रुपातले सामोरे येऊ लागलात,  मलाही त्या शब्दाचं रहस्य समजलं बरं का पण  … :)

सर या आठवणी मनात येतात ना तर अशी काही गर्दी करतात की काय सांगू तुम्हाला….. जगाला ओरडून सांगावं वाटतं की बॉस कसा नसावा हे सांगणारी अनेक उदाहरणं असतीलही , किंबहूना ती तशीच असतात बरेचदा पण बॉस कसा असावा याचे आदर्श उदाहरण असणाऱ्या एका व्यक्तीबरोबर काम करायची संधी मिळालेल्या भाग्यवंतांपैकी मी एक आहे!!

ईशानला नेहेमी खूप रागावते सर मी… नाईलाज आहे माझा म्हणा हवे तर पण गलथान कारभार मला सहन होत नाही…. तो चिडतो माझ्यावर , त्याला माझा रागही येतो…. मग त्याला समजावते मी… सर त्या प्रत्येक वेळी माझ्या मनात तुम्ही बोलत असता…..आपल्या केबिनच्या समोरून हळू चालत जाऊ नकोस, Why can’t u walk faster म्हणून रागावायचात….. तर कधी कधी मी एखाद्या कामाला गरजेपेक्षा जास्त वेळ लावत एखादे कमी महत्त्वाचे काम घेऊन बसल्याबद्दल, Why do you get involved in clerical work??? म्हणून मला फैलावर घ्यायचात…… तुम्ही मलाच काय पण आम्हा सगळ्यांनाच भरपुर रागावायचा…. मग मी तुमच्यावर रागावायचे….. जेवताना मैत्रीणींकडे धुसफूसायचे….. म्हणायचे, “ईतके रागावतात हे…. काय तर म्हणे फास्ट का चालत नाही…. एखादवेळी ना मला हार्टरेटही ठरवून देतील….त्याहून कमी नाही किंवा जास्त नाही….. ” माझी चिडचिड चालायची आणि मैत्रीणी हसायच्या…. कारण मी बोलतेय तोवर ठीक पण ईतर कोणी तुमच्या विरुद्ध शब्दही बोललेलं मलाच काय पण तुमच्या त्या ’वाघाच्या गुहेतल्या’ कोणालाच खपायचं नाही…..

रूसायचा अधिकार होता पण आम्हाला… मी रूसून बसायचे आणि कमी बोलायचे मग तुम्ही विचारायचा, “Do u want me to behave artificially ?? तसे असेल तर नाही रागावणार तूला आजपासून पण तन्वी तू या कंपनीची गरज झाली पाहिजेस… तन्वी नाहिये म्हटल्यावर काम अडले पाहिजे…. तूला लोकांनी शोधायला हवेय….. त्यासाठी मला तूला सध्या तू चुकल्यावर रागवावेच लागणार ना!!! ” ….. सर मी ईशानला समजावत असते, ’दादा अरे आपले काम असे असावे की ते आपण सोडून कोणालाच जमायला नको, ईतके व्यवस्थित, ईतके सुंदर, ईतके मनापासून केलेले…. ” …. त्याच्याशी एकीकडे बोलत असते आणि एकीकडे तुमच्याकडून ऐकत असते…..

सर तो चिडतो माझ्यावर की अभ्यासाला बसलं की मम्मा आधि तू माझ्याकडच्या सगळ्या पेन्सिल्स तपासतेस… आणि त्या व्यवस्थित टोकदार नसल्यास तर ओरडतेस….. :) …  मला नेहेमी हसायला येते कारण त्या प्रत्येक प्रसंगाला पेन्सिल्स शार्प नसल्या की रागावणारे तुम्ही आठवता मला…. माझ्यावर तुमचा किती प्रभाव आहे हे सतत जाणवते !!!! आज मात्र तुमची आठवण येते ती तुम्ही रागावता अशी नाही तर तूम्ही वेळोवेळी केलेल्या कौतूकाची….. सर आठवतं तुम्हाला, नविन होते मी कंपनीत आणि तुम्ही काही कामाने बाहेर होतात… एक मेल पाठवायचे होते अगदी लगेच, मी घाबरत घाबरत ते पाठवले….  मनात गोंधळ होता त्या ऑर्डरबद्दल म्हणून शेवटी एक नोट टाकली, “As the quantities are less they are assumed to be packed in pizza boxes. ” मनात धाकधूक घेऊनच घरी गेले मी…. दुसऱ्या दिवशी केबिनमधे आले तर तुमच्या हातात तेच मेल… माझ्या मनात घाबरगुंडी….. पण तुम्ही माझे भरपुर कौतूक केले….. हा प्रसंग आठवला ना सर की मला लहानपणी बाबांबरोबर मी लावत असलेल्या शर्यतीची आठवण येते…. मी सायकलवर आणि बाबा स्कूटरवर पण ते हरायचे …. आणि मला मी खूप ग्रेट असल्यासारखे वाटायचे…. आता जाणवतं बाबा आपणहून हरायचे, तसेच सर माझी ती एक तळनोट खरं तर खूप काही महान नव्हती पण त्यादिवशी मला विश्वास वाटला की आपल्याला जमेल आता काम…. :) …. आपल्या सहकाऱ्यांच्या हक्काची पायमल्ली करणारे अनेक, पण ” उद्या मी जर कंपनीला काय दिले असा विचार केला तर मी कंपनीला ’तन्वी’ दिली ईतपत तूला तयार व्हायचेय …” असे सांगणारे सर तुम्ही एखादेच!!!

सकाळी तुम्ही एखाद्या कामाबद्दल आम्हाला रागावायचात आणि ते काम झाल्याबद्दल MD कडून तुम्हाला आलेले मेल दुपारी आम्हाला हळूच फॉरवर्ड करायचात…. सकाळी तुमच्यावर रुसलेले आम्ही सगळे पुन्हा एकदा आनंदाने कामाला लागायचो…. बरेचदा तुम्ही काहितरी विचारात डॉक्यूमेंट्सच्या फाईल्स कडे बघायचात आणि मी तूम्हाला नेमकी हवी असलेली फाईल आणि त्यातले एखादे डॉक्य़ूमेंट आणून द्यायचे…. तुम्ही दरवेळेस विचारायचात , “तन्वी तूला कसं समजलं मला आत्ता नेमके हेच डॉक्य़ूमेंट हवेय??? ” पण मला समजायचं सर ते…. तुम्हाला कसं आम्ही सगळे न सांगता समजायचं की आम्ही घरची एखादी काळजी घेऊन कंपनीत आलोय…. तुम्ही हळुवार चौकशी करायचात मग आमची…. किती आधार वाटायचा आम्हाला तुमचा!!!

बॉस त्रासदायक आहे म्हणून नोकरी सोडणारे पाहिले होते पण बॉस दुसरीकडे जाणार म्हणून त्याच्या मागे निघालेले लोक तुमच्यामूळे पाहिले मी!! मी असते तर मी पण आले असते त्या सगळ्यांच्या बरोबर तुमच्या मागे…. विलक्षण हेवा वाटतो मला त्या सगळ्यांचा जे अजूनही तुमच्या बरोबर आहेत…. वाटतं आपणही पुन्हा एकदा केबिनचं दार उघडावं आणि तुम्ही मस्तपैकी ’गुडमॉर्निंग तन्वी’ असं म्हणावं… एखाद दिवशी पाचच मिनीट उशिरा पोहोचावं आणि तुम्ही शाळेतल्या मुलीसारखं मला समोर उभे करावे आणि रागावतं विचारावं, ” What is your reporting time?? ” …. पुन्हा एकदा भारताची मॅच असावी , मला द्रविड आवडतो हे तूम्हाला माहित असावे आणि मग तुम्ही उगाच , “द्रविडने किती केले रे ?? ” असं बाकिच्यांना मुद्दाम विचारावं…. मग चिडवत म्हणावं, “The wall म्हणे .. कामाचा नाही तो.. ” … सकाळी मी ऑफिसमधे शिरावे आणि तुम्ही मला विचारावे , “तन्वी सूनामी शब्दाचे स्पेलिंग सांग “, मी हसत तूम्हाला सांगावे ,”मी काय टाईम्स वाचत नाही का?? मला येतं स्पेलिंग… ” :) ….कधितरी तुम्ही पु.लं, वपू, अत्रेंबद्दल बोलावे आणि मी तूम्हाला विचारावे, “सर अहो माहे्श्वरी ना तूम्ही… मराठी साहित्य किती माहितीये तूम्हाला!!” … अचानक कोणीतरी यावे आणि instruments ला मराठीत काय म्हणतात विचारावे, मी मठ्ठासारखं आठवतं बसावे आणि तुम्ही ’उपकरणं’ असं सांगावं आणि मला चिडवावं, “तन्वी मराठी ना तू?? :)

“सर मला सगळे आळशी म्हणतात “, मी तुम्हाला सांगावे आणि तूम्ही ते विधान पार खोडून काढावे…. मी ते सगळ्यांना सांगावे, की माझ्या सरांच्या मते मी आळशी नाहिये!! बोलताना तूमच्या नावाचा उल्लेख यावा आणि समोरच्याने भुवया उंचावत विचारावे, ” तू कैसे जानती है उनको?? ” मी भाव खात सांगावं नुसती ओळखत नाही काही ते माझे ’सर’ आहेत :)

अजून कितीतरी लिहू शकते मी सर, पण ही पोस्ट तुमच्या वाढदिवसाच्याच दिवशी आली पाहिजे म्हणून थांबणार आहे आता…. तूम्हाला एक मात्र आम्हा सगळ्यांतर्फे सांगायचे आहे, सर आम्ही खूप भाग्यवान आहोत ज्यांना तुमच्याकडे काम करायला मिळालेय… आम्हा सगळ्यांच्या मनात प्रचंड आदर आहे तुमच्याबद्दल!!!

आज हे पत्र केवळ तूम्हाला म्हणून न ठेवता ब्लॉगवर टाकतेय ते एकाच कारणाने की मला सगळ्यांना सांगायचे आहे की एका आदर्श बॉसला मी भेटले आहे, त्यांच्याच केबिनमधे बसून धडपडत खूप काही शिकले आहे…. एक असा बॉस की जो रजेवर असला की हाताखालच्या मंडळींना आनंद नव्हता होत, पण सर कधी परत येतील असा प्रश्न पडत होता…. सरांचे ब्लडप्रेशर वाढायला नको म्हणून कामचूकारपणा करू नये असा विचार करावासा वाटायला लावणाऱ्या एका वरिष्ठाला पाहिलेय मी… थोडक्यात काय तर एका उच्च पदावर काम करणारा एक साधा पण ग्रेट माणूस माझ्या ओळखीचा आहे आणि याचा मला खूप अभिमान आहे, आणि हे जाहिरपणे मान्य करायची संधी मी साधतेय ईतकेच !!! :)

तूम्हाला वाढदिवसाच्या अनेक अनेक शु्भेच्छा!!! Wish u a very very happy birthday!!!

तन्वी

 

 

आज मै खुश हूँ………..

’आज मै खुश हूँ………..’ कारणही तसचं आहे उद्या माझं पिल्लू सात वर्षांच पुर्ण होतय………..१८ ऑगस्टची रात्र ही अशीच येते नेहेमी…..

आज रात्री गप्पा मारतांना अचानक नवऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं…….म्हणाला, “ गुंड्या किती मोठा झालाय ना आपला!!!!” खरं तर माझ्याही मनात हीच आवर्तन येताहेत……

पहिलं मुल……सगळं सगळं बदलून टाकणारं……नवरा बायकोचे आई-बाबा करणारं………पहिलं मुल सगळ्यांनाच किती प्रिय असते ना!!! रात्री नेहेमीप्रमाणे पिल्लू माझ्या कुशीत येउन शिरलं….बडबड करत गाढ झोपूनही गेलं…….माझे डोळे मात्र मिटत नव्हते………….मन मागे भुतकाळात केव्हाच पसार झाले होते……हे सात वर्षे मी पुन्हा पहात होते…अनुभवत होते……

१९ ऑगस्ट २००२, सकाळी दवाखान्यात नेल्यावर माझ्या शेजारी बसलेल्या एका पोटाचा माझ्यापेक्षा मोठा घेर असलेल्या प्रेग्नंट बाईने मला विचारले, “कितवा महिना?”…त्याही परिस्थितीत हसले मी…………म्हटलं अहो डिलिवरीसाठी आलेय मी !!!! आई, आजी, बाबा सगळेच दडपणात मी निवांत……..शेवटी आजी ओरडली की खरच हिला काही त्रास होतोय का नाहीतर चला घरी!!!!!! पण दुपारी लेबर रुममधे नेल्यावर अर्ध्या तासात माझी ’सुटका’ झाली……खर तर ती ’सुटका’ नसतेच ते असतं आयुष्यभराचे ’गुंतणं’………नाळ नसते जोडलेली आता पण मन मात्र त्या पिल्लूतच अडकलेले सतत…..

आम्हा नवरा बायकोचे विश्व अंतर्बाह्य बदललेलं…….पहिलाच नातू, पणतू, भाचा, पुतण्या सगळी बिरुद भुषवणारा माझा मुलगा……त्याचे पहिले बोल, रांगण सगळ आठवतय आत्ता. नाव काय ठेवायचे हा एक मोठा प्रश्न…..शेवटी ’ईशान’ हे शंकराचे नाव सगळ्यांना आवडले.

कितीतरी प्रसंग एकामागोमाग एक मनात येताहेत…..पिल्लू असेल तेव्हा ३ वर्षाचे, १५ ऑगस्टला टि. व्ही. वर जन-गण-मन ऐकले, म्हणालं मम्मा कोणतं गाणं हे?….. त्यानंतर दोन-तीन दिवस रोज मला ते म्हणायला सांगितले…..त्यावेळच्या गणपतीच्या सांस्कॄतिक कार्यक्रमांमधे खेळता खेळता मधेच जाउन त्याने आयोजकांना सांगितले की मला जन-गण-मन येत आणि स्टेजवर म्हणायचे आहे…….अचानक स्टेजवर माईक घेउन समोर आलं माझ पिल्लू…….अनपेक्षित आनंद होता तो….. न चुकता त्याने राष्ट्रगीत म्हटले, उपस्थित सगळे जण उभे राहिले…माझे डोळे नकळत वहायला लागले होते……आजही आठवताहेत मला त्या टाळ्या. गेल्यावर्षीच्या तुझ्या एस्किमोतल्या रुपाचा विडिओही किती वेळा पहातो मी आणि बाबा…..

दुसरं मुल होउ देण्याचा निर्णय घेतला आम्ही……..विश्वासात घेऊन आधि तुला सगळी कल्पना दिली. त्यानंतर काही दिवसात आपण गाडीवर येत असतांना अचानक तू म्हणाला , “बाबा नेक्स्ट ईयर गाडीवर आपण चौघे असणार तु, मम्मा, बाळ आणि मी….” पिल्लू तेव्हाही खुप भावलं होत रे तुझ ते स्वत:चे नाव शेवटी घेणं……ही लहानशी गोष्ट करण्यासाठी लागणारा मोठेपणा आहे तुझ्यात हे तेव्हा जाणवलं………….

मी प्रेग्नंट होते, नवरा कामानिमित्त पुण्याला गेलेला आणि दुपारी माझ्या पोटात खुप दुखायला लागलं……अगदी उठवेना…… पिल्लु भांबावलं, पण म्हणे, “मम्मा गोळी घे…मला सांग मी आणतो…” तेव्हा तो Jr. KG मधे होता , त्याला त्या गोळीच्या नावाचे स्पेलिंग सांगितले……त्याने गोळी आणि पाणी दिले…..ते घेतल्यावर मला झोप लागली…. अडिच तीन तासाने जाग आली…….पाहिलं तर बाळ उशाशी बसलेलं……..अपराधीपणाने मन भरलं माझं…. “सॉरी!!!” म्हटलं त्याला…..जवळ घेतल…….पिल्लू म्हणालं, “तुला बर वाटतय का आता?” बाळा कसं विसरु रे हे सगळं…………………

आजही तु तसाच आहेस!!!!! बहिणीला सांगणारा, “छकूली मम्मा दमते ना दिवसभर, त्रास देउ नकोस तिला…..”….तुझी आई कौतूकाने पहाते रे राजा तुला तेव्हा !!!!! पिल्लू आज सात वर्षाचे होतय म्हणजे मुंजीचे वय झालेय की आता…..

आज मनाला मुक्त सोडलय बेटा तुझ्या बालपणात……आनंदाचा अविरत ठेवा सापडतोय मला……मी तुला काय दिलं आणि तु मला काय हा हिशोब नाही मांडत पण तरिही ’आई’ केलयेस तु मला……  

शाळेतून आल्यावर तु हात पाय धुण्याचे नाटक करतोस……….बघू हाताला साबणाचा वास येतोय का असे विचारल्यावर हसतोस आणि म्हणतोस, “तुझे सब है पता मेरी माँ !!!!!”…………….बच्चू तु थोडा मोठा झालास ना की तुला सांगणार आहे असा निरुपद्रवी लबाडपणा मी देखिल करायचे लहानपणी…………..तुझ्याचसारखी तर होते मी तेव्हा…..वास्तवाकडे स्वप्नाळू डोळ्यांनी पहाणारी…….आपल्याच तंद्रीत असणारी……..आई रागावली तरी हसणारी……….वस्तूंशीही गप्पा मारणारी……….. मी तुझ्यासारखी की तु माझ्यासारखा!!!!! दुसरा ऑप्शन जास्त आवडलाय मला……. तु माझ्यासारखा. माझाच तर अंश आहेस तु…….तुझ माझं हे अस एकमेकांच्या अस्तित्वात असणं आवडत मला…….

तुझ्या दोन्ही आज्या सांगतात अशी वेड्यासारखी मुलांमधे गुंतू नकोस………मी पण ठरवणार आहे हेच !!!! पण खर सांगू का पिल्लू त्यांना तरी कुठे जमलय ते अजुन जे मला जमणार आहे!!!!! तरीही मी कमी करणार आहे बरं का…….आत्ता नाही येउ दे की ती दुसरी तुझी काळजी घेणारी!!!!!

हे जे काही लिहितीये ते ब्लॉगवर नव्हते टाकणार…… पण टाकतेय…..तु आणि मी मिळून वाचू ते नंतर….वाचतांना चूका करायच्या नाहीत पण ईनू…..नाहीतर मी रागावेन!!!!

“मम्मा मी तुला जिंकवणार आहे कायम!!!” तु म्हणतोस नेहेमी……………बाबा म्हणतो तोंड बघा माँ बेट्याच…… खरं वेगळंच असतं बरं….ह्या मम्मा असतात ना त्या बोलतात घडाघडा मनातलं सगळ……पण बाबा लोक जास्त हळवे असतात……तुझे ईंजेक्शन घ्यायला जायचो ना आपण तेव्हा बाबा कायम बाहेर उभा रहायचा, म्हणायचा मला नाही सहन होत तुच जा………तुझे बाबू पण तसेच. त्यांचे तर श्वासच तुझ नाव घेत येतात…… यावेळेस नासिकला रागावले मी त्यांना, म्हटल काय हे किती लाड कराल त्याचे….ऐकणार नाहीत ते माझं !!!!!!

तुझी स्पर्धा स्वत:शीच आहे बेटा……. वास्तवाचे भान येइलही तुला नंतर, नव्हे हे जग ती जाण करून देतेच आपल्याला……पण स्वत्व विसरु नकोस……स्वत:ला आणि जगाला तुझ्या नजरेतूनच बघ !!!!! त्यासाठी समर्थ हो!!!! तुझे आई- बाबा कायम आहेत तुझ्या सोबत………

हे खर तर पत्र नाहीये तुला हे असेच माझे विचार……तोडके मोडके…..तुला समजेल तरिही, हो ना!!!!!!

पत्ता……

नुकतच आम्हाला Max New York कडून एका पॉलीसीच्या प्रिमीयम साठी पत्र आलय. माझ्या नवऱ्याच्या ऑफिसमधल्या टेबलवर ते ठेवलेलं होतं म्हणजे निश्चितच ते पोस्टाने आलेलं आहे. पाहून आश्चर्य वाटलं कारण या संदर्भातला आमचा सगळा पत्रव्यवहार हा नासिकच्या पत्त्यावर होतो. या पत्राचे म्हणणे होते की आमच्या नासिकच्या पत्त्यावरून ते परत पाठवण्यात आलेले आहे म्हणून ते आम्हाला मस्कतला पाठवले आहे. आता ईथपर्यंत सगळे ठीक होते पण त्या पत्रावर जो पत्ता टाकलेला होता तो वाचून मात्र मोठी करमणूक झाली……..

त्या पत्त्यावर माझ्या नवऱ्याचे नाव आणि आडनाव एकत्र करून टाकलेलं होतं……………त्यामुळे साहजिकच आडनावाचे आद्याक्षर हे capital न असता ते small झालेले होतं. तसही त्याच आडनाव हे काही special noun नाही या माझ्या मताला Max New York मधल्या लोकांनी जोरदार पाठिंबा दिला होता . सर्वसाधारणपणे स्त्रीयांना फक्त त्यांच्या माहेरचे आडनाव special वाटतं आणि सासरचे सगळ्ंच common वाटतं याला मी का बरे अपवाद असावे !!!!! असो त्यानंतरचा पत्ता असा……

Gul Farenga post,

Box No. ——-,

Postal Code—–,

Muscat, Oman 422007

Maharashtra.

Muscat ही Oman या देशाची राजधानी असून हे संपूर्ण प्रकरण महाराष्ट्रातच आहे हा शोध बाकी नवा आहे. बरं त्यातही पुन्हा त्या पत्त्यावर माझ्या नवऱ्याच्या नावाचा दिव्य पद्धतीने केलेला उल्लेख सोडला तर त्याच्या कंपनीचे नाव, त्याचे डिपार्टमेंट, एम्प्लॉयी कोड नंबर यापैकी कसलाही पुसटसाही उल्लेख नाही. त्यातही हे ’Gul Farenga Post’ म्हणजे काय ते कळेना. त्यातही जरा लावा डोके आणि सोडवा कोडे वगैरे केले तर त्याच्या कंपनीचे नाव तयार होउ शकते पण मग त्या संधीचा असा विग्रह करून घालण्यामागचं व्याकरणीय कारण मला उमजलं नाही. या नावावरुन मला ते नवी दिल्लीतलं किंवा मुंबईतलं कुलाबा भागातल्या एरियाचे नाव वाटले. हेच कमी की काय पण देशाला 422007 हा नासिकच्या कुठल्या तरी भागाचा पिन कोड लावण्याचा अविष्कार देखील साधलेला आहे. या असल्या भयावह पत्त्यावरून पत्र पोहोचवण्यात भारतातले पोस्ट ऑफिस सक्षम आहे यावर माझा पुर्ण विश्वास आहे पण मस्कतमधल्या पोस्ट खात्याने देखिल हम भी कुछ कम नही हे आता सिद्ध केलेले आहे……..

महाराष्ट्र असा स्पष्ट उल्लेख असलेलं पत्र एअरमेलनी येतं ही गंमत आहे. आणि केवळ नावावरून ते माझ्या नवऱ्याला मिळतं यावरून, “बघीतलसं मी किती फेमस आहे ते!!!” हे वाक्य मला दिवसभर ऐकावे लागले.

ओमान हा देश आणि त्याची मस्कत ही राजधानी आहे हे बरेच जणांना माहित नसते हा अनुभव आम्हाला नवा नाही. आम्ही जेव्हा जेव्हा आमचे मुक्कामस्थळ सांगतो तेव्हा हे आवर्जून नमूद करतो की मस्कत ही सल्तनत ऑफ ओमान या देशाची राजधानी आहे आणि ही जागा मुंबईपासून अवघ्या २५००कि.मी. वर आहे.

मागे एकाने आम्हाला प्रश्न विचारला होता की, ’काय रे हे तुमचे मस्कत रोह्याच्या जवळ आहे का?’ काय उत्तर देणार कपाळ !!!! ते पहाता पोस्ट खात्याचे मात्र कौतूक करावे लागेल.

आणि जाता जाता Max New York च्या पत्ते टाईप करणाऱ्या त्या महान संशोधकाला सलाम !!!!! कारण तो या गोंधळावर थांबला नाही तर त्याने आमच्या नासिकच्या पत्त्याचेही व्यवस्थित पोस्ट मार्टेम केलेले आहे…… मधूमालती हे स्पेलिंग  MadhuMalit आणि म्हसोबा मंदिर चे स्पेलिंग Bhmasoba Mand करायला तो विसरलेला नाही…..तेव्हा त्याला त्रिवार सलाम!!!!

बाबांची पत्र…

या ब्लॉगवरची माझी पहिली पोस्ट माझ्या बाबांनी त्यांच्या जावयाला म्हणजे माझ्या नवऱ्याला लिहिलेल्या पत्राची आहे….खर तर ही पत्र हा एक खाजगी मुद्दा आहे…पण मला असे मनापासून वाटते की आपल्या मुलांसाठी असलेली आई वडिलांची माया ही सगळीकडे सारखीच असते….म्हणुन हा नवा टॅगच बनवला आज….. “ बाबांची पत्र…”

माझ्याकडे बाबांनी लिहिलेली जवळपास सगळी पत्र आहेत…एक एक करून लिहायचा मानस आहे…त्यातलेच हे पहिले….

आमची आई पत्र लिहिण्याच्या फंदात पडत नाही…..बाबा लिहिताहेत ना , माझेही आलेच त्यात हे उत्तर देऊन मोकळी होते ती….असो…..

हे पत्र बाबांनी मला माझ्या घरी महिनाभर राहिल्यानंतर (खर तर ’टिकल्यानंतर’ म्हणायला हवे, कारण दोन दिवसावर रहाणे म्हणजे खुप झाले असे त्यांना वाटते) लिहिलेले आहे……

चि. ताईस…

फुलासारख जपण कसं असतं हे तू आम्हाला महिनाभरात शिकवलंस. यापुर्वी ईतके दिवस आम्ही तुझ्याकडे राहिलोच नाही. सुखी संसाराची गुरुकिल्ली तुला सापडली आहे. एकुणच आम्हाला अभिमान आहे. या वयात मुलांचा सुखी संसार व नातवंडे हाच आमचा आनंदाचा ठेवा असतो. तो तुझ्याकडे पुर्ण आहे. त्यामुळे आम्ही आनंदी आहोत.

मुली, जावई, नातवंड हीच आमची मोठी संपत्ती आहे. त्यामुळे भविष्याची चिंता नाही. तु स्वत:च्या प्रकृतीची काळजी घे. दोन्ही मुले तुला पार दमवून टाकतात. तुम्ही नासिकला आल्यावर तुमचे ईतके छान आतिथ्य आमच्याकडुन होत नाही.

दोन्ही बहिणी सुखात रहा. एकमेकींच्या संपर्कात रहा. आम्ही दिलेल्या संस्कारांना चांगली फळे आलीत. खुप बरे वाटले. आता तुमची कार येइल. मजेत रहा. आर्थिक संपन्नतेला भावनिक परिपुर्णतेची, परस्पर सामंजस्याची जोड असेल तरच उपयोग अन्यथा ती कुचकामी ठरते.

दोन्ही नातवंड ईतकी गोड आहेत की ईश्वराचे आभार मानावे तेव्हढे थोडॆच. त्यांना सोडुन जावेसे वाटत नाही. तुम्ही दोघे प्रकृतीची काळजी घ्या, लवकर भारतात या.

ईशानची खूप काळजी घ्या. तो फार गोड आहे. गौरी तर प्रश्नच नाही. दोघेही ईश्वरी अंश आहेत.

 

      आनंदात रहा तुम्ही

         घेउनी सुखाचा प्याला..

      शब्दसुरांचा काफिला

         घेउन सोबतीला…  ॥

      आयुष्य नाव ज्याचे

         सुवर्णक्षण त्यात आला…

      आम्ही पायउतार झालो

        सोपवूनी सिंहासन तुम्हाला ॥

      दुधापेक्षाही प्रिय ही

         दुधावरची साय आम्हाला…

       पाहुनी ईशान गौरी

          जीव हा कृतार्थ झाला ॥

सुखी रहा…..

                              आई – बाबा.

 

गेले अनेक दिवस ही पोस्ट टाईप करुन ठेवली होती…. पण आज टाकते आहे. आज सकाळी बाबांशी बोलले… आठवण येत होती त्यांची….. किती सहजपणे बाबांनी लिहिले की आम्ही तुमचे असे स्वागत करत नाही…..खर तर आज आम्ही जे काय आहोत, त्यात त्यांच्याच संस्कारांचा मोठा वाटा आहे.

साधीशीच ही पत्र पण ती सतत माझ्या पर्समधे असतात…. खूप आधार वाटतो त्याचा.

खरच आपण कितीही मोठे झालो तरी आई बाबांच्या छत्राखाली, त्यांच्या मायेच्या उबेत किती सुरक्षीत वाटते नाही का !!!!!!!!!

माझे वडिल आणि माझा नवरा..

ब्लॉग सुरु करुन अनेक दिवस झालेत पण सुरुवात कुठून करावी कळत नव्हते…त्यातच आज बाबांनी आम्हा दोघांना लिहिलेली पत्र अचानक हाती लागली… आणि ठरवलं शुभारंभ यापासुनच. हि पत्र माझ्या बाबांनी  ते आमच्याकडे मस्कतला आले असतांना लिहिली होती.

पहिले पत्र माझ्या नवर्‍याला अमितला आहे……

चि. अमित,
इथे येउन आम्हाला आज २५ दिवस झालेत. काळ किती गतीने धावत असतो. अगदी कालच आल्यासारखे वाटते.मुलगी जावयाकडे आलो असे न वाटता मुलाकडे आलो असे वाटते.येथे अनुभवले तुझे अगत्य, दिलदार स्वभाव. हौशी,आनंदी,खेळकर , विनयशील, निगर्वी असे एक व्यक्तिमत्व.
तुझ्या बाल्यापासुन जे वातावरण तुला लाभले त्या तुलनेत तू मोठी झेप घेतलीस. नवा देश, नवीन लोक, सगळ अनोळखी. अंधारातली उडीच होति ती. परंतु तु सगळं छान निभावलेस.एकुण काय वाळवंटात नंदनवन फुलवलेस.
आम्ही अभिमानाने जगाला सांगतो ज्याच मन चांगल त्याच इश्वर चांगलच करतो.त्यानुसार तुला पत्नी, मुले चांगली मिळाली. मुलांबद्दल काय आणि किती लिहावे कळत नाही. फार गोड, लाघवी, समंजस मुले आहेत. त्यांचा गोंडसपणा, लुसलुशीत स्पर्श थेट बालपणात घेउन जातो. त्यांच्याशी खेळतांना सगळी दु:ख विसरायला होते. काळज्या मिटतात. असे वाटते त्यांचे बाल्य असेच अबाधित रहावे.त्यांच्या एका हास्याने दिवसभराचे श्रम, थकवा विसरायला होतो.
इशानला रागावु नका. अत्यंत समंजस व हळवा आहे तो.
३०.१२.०८ ला आम्ही जाउ. जातांना इथल्या तुमच्या सहवासाच्या गोड आठवणी सोबत नेउ .पुढील भेटीपर्यंत त्या पुरतील. असाच आनंदी रहा.यशस्वी हो! पुढे जात रहा.
अमित कसा आहे असे कोणी विचारले तर मी येव्हढेच म्हणीन…

        अमित स्वत:चा आरसा
           शब्दात मी सांगु कसा..

        फुलांचा ताटवा तो
            शुभ्र पाण्याचा झरा..
        चांदण्यांचा गारवा अन
            पौर्णिमेचा चंद्र जसा//

        इशान गौरीचा पिता
           अन तन्विचा आहे सखा..
        देवडेंचा पुत्र अन
            कुलकर्ण्यांचा जणू वारसा//

        वसंताचा बहर तो
           अन आनंदाचा कहर तो..
        समुद्राची लहर तो..
            अन पर्जन्यतुषार हलकासा//

असाच आनंदी रहा. सुखी रहा. हसत आणि हसवत रहा. शुभाशिर्वाद.
                                             आई-बाबा
मधे एका कम्युनिटीवर जावई आणि सासरेबुवा असा टॉपिक होता. त्या दोघांमधील नात्याचे हे हळुवार मधूर रूप मला पहायला मिळाले याचे श्रेय अर्थातच त्या दोघांना . स्त्रीच्या आयुष्यातले महत्वाचे तिन पुरुष म्हणजे वडिल, नवरा आणि मुलगा. ज्याप्रमाणे सासु सुनेमधे तक्रारी असतिल तर नवऱ्याची कुचंबणा होते तसेच वडिल आणि नवर्‍यामधे तणाव असेल तर मुलिलाही त्रास होतोच.
खर तर हे वैयक्तिक पत्र पण या नात्याचा हा मला भावलेला पैलू सगळ्यांसमोर आणण्यासाठी हा खटाटोप.