डायरीची काही पानं…..

भारतातून सुट्टी संपवून येइन नं मी , मग सामान घेइन हळूहळू आवरायला. इथून नेलेल्या वस्तू जागच्या जागी ठेवायच्या आणि तिथून आणलेल्या वस्तूंसाठी नवी जागा करायची. दरवेळेचा त्रागा एकीकडे मनात , किती सामान आणतो आपण उगाच…. हल्ली सगळं सगळीकडे मिळतं….

सगळं सामान लावताना सोबत आणलेला एक बॉक्स दिसेल बघ मला…. नीट बंद केलेला…. तो दिसेल आणि मला एक मज्जा आठवेल… मी लगेच ठरवेन की तूला फोन करेन तेव्हा न विसरता सांगायची ती मज्जा, अगं झालं काय आम्हाला नं सामान चेक करताना विचारलं की काय आहे या बॉक्समधे…. मी म्हटलं की ’पापड’ आहेत….. पण बॉक्स असा नेता येणार नाही म्हणाली ती विमानतळावरची बाई… मी करवादलेच, कित्ती सांगाव या आईला नको देऊस पापडलापड पण ऐकतच नाही ….. तिथे नं एक कुलकर्णी आडनावाचे मॅनेजर होते, ते म्हणाले चालतो असा बॉक्स, आणि गेलं एकदाचं सामान आत :) …. विमानात चढताना कुलकर्णी होते तिथेच, मला म्हणाले गं सरळ की अहो तुमची काय आमची काय आया सगळ्या सारख्याच…. :)

तो बॉक्स उघडेन मी आणि कानात तूझा आवाज येइल ,” ताई इथल्या पावसात सर्दावले असतील गं पापड, उन्हात टाक ते ” …. एक एक पापड मी स्वतंत्र मांडते , मनात विचार येतो एकाच हाताने घडवलेले आणि वेगळं अस्तित्व असलेले पापड …. अलवार हात फिरतो माझा, तूझा हात लागलेला असतो नं त्या पापडांना …..

माहेरपण संपलं याची वारंवार जाणिव होते सारखी आणि मी स्वयंपाकघर गाठते ….. तिखट-मसाल्याचा डबा उघडते आणि पुन्हा कानात शब्द येतात , ” ताई तिखटाचा रंग फक्त लालभडक आहे हं, चवीला फारसे तिखट नाही ते …… मसाला बघ यावेळेस जरा बदल केलाय ….. आवडला की कळव, मग पुढल्या वर्षी तसाच करेन !!! ” ….

हे असं वारंवार घडतं नं, मग मला तू खूप आठवतेस …..

कुलकर्णीं भेटले नं कधी पुन्हा विमानतळावर तर त्यांना विचारायला हवय एकदा, “तुमची पण आई अशीच सतत बोलते का हो तुमच्या कानात :)

हळूहळू अशी सातत्याने येणारी आठवण आणि ओलावणारे डोळे यांची वारंवारता कमी होते…. मी ’ माझ्या घरात’ रमायला लागते …. तूला अधेमधे फोन करते, पण त्यात तुझ्यामाझ्यापेक्षा बाकिच्यांबद्दलच बोलत रहाते….. कधीतरी वाटतं तूला किती गृहित धरते गं मी …..

अशीच एकटी असते घरात नं सहज स्वत:कडे बघते , गंमत आहे आई माहितीये का… तू अगं कुठेच दूर नसतेस …. मलाच एक रहस्य समजतं , मी कुठे जाणार तुझ्यापासून दुर…. म्हणजे अगं बघ नं, मी जिथे, तिथे तू असणारचं नं…. मी आहेच काय वेगळं, मुळात माझी सुरूवातच तू नं :)

………………………………………………………………………………………………………………………………………………………………….

तूम्हाला बोलावणं म्हणजे नं दिव्य असतं आजकाल…. मला कळत नाही गं एक,  की तू कधीपासून अशी टिपीकल वगैरे झालीस ? , काय तर म्हणे अगं मुलीच्या घरी खूपदा येऊ नये… काहितरीच…. म्हणजे आम्हाला वाढवलस असं एकदम बिन्धास्त आणि आता स्वत: काकूबाई ….. चालणारच नाही, माझ्याकडॆ आहे नं हुकूमी एक्का, तो पटवतो तूला बरोबर ….. त्याने दिली धमकी , असं वागणार असाल तर मी ही तुम्हाला सासूबाई वगैरे म्हणायला लागेन…. त्याचं बरं ऐकतेस गं …. म्हणे त्याच्यासारखा दुसरा कोणी असूच शकत नाही ….

आले खरे तुम्ही पण टिकायला नको तूम्हाला … पुन्हा तेच पालूपद , खूप राहू नये मुलीकडे …. येडचॅप झालीयेस माय तू आजकाल .. फूल्लऑन विचित्र .. साठी नाही आली अजून तुझी पण ऐक माझं, म्हातारी झालीस तू !!!

सांगायला कशाला लागायला हवय तुम्हाला, की एरवी नं मला आठवण येते तुमची…. जा मग जाणार नं जा… उद्या जाणार ते आज जा!!!

मी कशाला फोन करू पोहोचले का सुखरूप वगैरे …

आणि हो ते आवळ्याच्या सुपारीच ताट आहे नं… उन्हाच्या दिशेला तोंड करून ठेवलेलं , तेच ज्यात मला आवडते म्हणून धावत पळत सुपारी करून ठेवलीस ते, ते नं जाता येताना रस्त्यात येतय हो…. अडचण होतेय मला त्याची …. तूझी घाई घाई आठवते मला ते दिसलं की , हे करून ठेवते, ते करून ठेवते ….. नको ठेवू ते, तू रहा त्यापेक्षा …….

ती लोणच्याची बरणी दिसते मला, तुझ्या लाडक्या जावयाचं लाडकं लोणचं केलस नं तू…. ” सात – आठ दिवसात मुरेल लोणचं, तोवर रोज हलव फक्त बरणीला …. वाटलं तर आणि लिंब पिळून टाक त्यात ” ….. लागलीस बघ माझ्या कानात बोलायला तू …..करते काय मी, हलवून ठेवते बरणी… तसंही मला कुठे खायचय ते लोणचं ….. मी खाणारच नाही जा !!!

कपडे ठेवायला जावं नं कपाटात , तर तो रिकामा कप्पा दिसतो मला… तूम्ही येण्यापुर्वी रिकामा करून ठेवलेला …. त्यात पुन्हा कपडे भरणं सोप्प नसतं गं…. तो कप्पाच काय, संपुर्ण घर रिकाम रिकामं वाटतं मला….

बाबांनी रामरक्षा म्हणताना लावलेल्या उदबत्तीची रक्षा भरून ठेवते मी…. अगं ती फार महत्त्वाची असते गं…. जरा काही खूट वाजलं, मन धास्तावलं नं की ती रक्षा साऱ्या घराला लावते मी !!!

म्हणजे नाही म्हणायला समजावते मी स्वत:ला … कसं आहे नं आई, मला माझ्यात तू आणि बाबा कायम सापडता अगं…. कोणाला सांगत नाही मी…. कशाला सांगायचं, सगळं सांगितलंच पाहिजे असा काही नियम नसतो नं…. आता खी खी हसू नका तू आणि बाबा ….. आठवतय मला ,”सगळं सगळ्यांना सांगू नये ” हे अनेकदा तुम्ही बजावता मला…. जाऊ दे !!!

पण महत्त्वाचं काय की, लेकीकडे खूप दिवस राहू नये वगैरे मुर्खपणाचे नियम मला प-ट-त ना-ही-त !!!

……………………………………………………………………………………………………………………………………………………………………

मला माहितीये तूला कुठलेही फॉर्म एकटीला भरायला आवडत नाहीत…. आपण काहितरी चूक करू असा तूझा आपला स्वत:बद्दलचा दावा !!! बॅंकेच्या लॉकरला भेट देऊन आल्यानंतर कशी तूला तीन चार दिवस भिती असते मनात की आपण नक्की काहितरी दागदागिना जमिनीवर पाडला असावा तिथे…. नाहितर आपण नक्की कुलूप घातले की नाही त्या लॉकरला :) …. विमानात यापुर्वी कधी स्वत:चा इमिग्रेशनचा फॉर्म तू भरला होतास का गं ?? विचारतेय काय तूला, मला माहितीये ते काम नेहेमी बाबा करत असावेत ….. गेल्या वेळेस कशी फिरायला गेली होतीस कुठेतरी, बाबा बिचारे तूला शोधत होते म्हणे मग ……

आणि यावेळेस सगळं ’जमलं’ नं आई तूला ….  विमानातले फॉर्म भरता आले, तू कुठे फिरायला गेली नाहीस… एकटीच प्रवासाला निघालीस तरी बिचकली नाहीस…..

मला पुर्णवेळ काळजी होती अगं की नक्की जमेल नं तूला एकटीला प्रवास … खरं सांगू तर इतकी मी ओळखतेच तूला की तू एकाच वेळेस अत्यंत कावरीबावरी आणि त्याच क्षणी तितकीच खंबीर असतेस जेव्हा प्रश्न तुझ्या मुलींबद्दल असतो :)

“मला बरं नाहीये आई ” हे चार शब्द तूला सांगितले की तू असशील तिथून धावत येशील खात्री वाटते मला !! किती सार्थ ’खात्री’ …. तूझं विमान उशिरा पोहोचणार होतं ना गं , मग मी झोपले … म्हणजे औषधं घेतली की झोप लागतच होती ना गं तेव्हा…. पण तरिही माझ्यातलं काहितरी टक्क जागं होतं, तुझी वाट पहात होतं …..

दमले होते गं….. काहितरी अंतस्थ अस्वस्थता आली होती…. घेरून आल्यासारखे !!!

गाढ झोपेत मन वाट पहात होतं, दार वाजण्याची ….. तू आलीस की धावत माझ्याकडे येणार असा भास होत होता….

आलीसच की तू… मी जागी आहे की झोपलेय आई ?? …..

डोक्यावरून तूझा हात फिरतोय …. हुंदका दाबतेय न तू, माझी झोप मोडू नये म्हणून ….. नवऱ्याला विचारते आहेस, आधि का नाही कळवलं हिला बरं नाहीये ते ?

तुझ्या हातात नं आवडे फार ताकद आहे गं…. मला किती शांत वाटतय…. आणि त्याचवेळेस एक अनामिक बळ संचारतय…. आता मी नाही घाबरत कशालाच….

मनात विचार येतोय अगं की झोपेत होते नं मी मग मला कसं समजलं तू आल्याचं ?? माझ्यात काय अपुर्ण होतं ??

तूझ्या कुशीत शिरले नं मग मला सगळ्या प्रश्नांची उकल झाली …..

हिरकणीचं बाळ झाले होते मी पुन्हा … सगळ्या संकटांना पार करून माझी आई माझ्यापर्यंत पोहोचेल या आशेने तिच्या वाटेकडे डोळे लावून बसलेलं बाळ …. आई आली म्हणून सुखावलेलं बाळं !!

…………………………………………………………………………………………………………………………………………………………………………

आता माझ्या माझ्यासाठी असलेल्या डायरीची पानं इथे का टाकतेय म्हणशील नं ??? सांगते थांब …..

Mothers Day आहे अगं , म्हणजे मला माझ्या पिल्लांनी ग्रिटींग कार्ड्स दिलेत म्हणून समजलं :) …. मी तूला काय देणार ??? …. तूझी आठवण येते वगैरे सांगत नाही नं हल्ली मी तूला, म्हणजे मोठी झालेय नं मी आता ….. लहान मुलांसारखं सतत वागता आलं तर मजा येइल आई …. मग मी ओरडून तूला सांगू शकेन की , “आवडे आय लव्ह यू ” … पण जमत नाही गं ते ….

जाऊ दे काही सांगत नाही…. तूला फोन करते सरळ, आपण हवा पाणी, माझी तब्येत … माझ्या मुलांच्या खोड्या वगैरे तमाम विषयांवर बोलत राहू ….

मी पाल्हाळ संपवून फोन ठेवताना तू म्हणशील नं , ” आता सांग खरा फोन कशासाठी केला होतास ते ? ” … एरवी तूला कसं समजतं असा प्रश्न पडतो नं मला… आता माहितीये ’लबाड’ आहेस तू…. सगळं समजतं तूला, न सांगताही !!!मला नं खरं तर तूझे आभार वगैरे मानायचेत गं एकदम फॉर्मल बिर्मल …. तू हसू नकोस पण आणि हो बये रडूही नकोस!!

थांबावं कुठे नं कसं मला सुचत नाहीये …. तूला आठवतं लहानपणी मला ’माझी आई’ यावर तूच निबंध लिहून दिला होतास , “प्रेमास्वरूप आई … वात्सल्यसिंधू आई  ” आणि ते ’स्वामी तिन्ही जगांचा’  वगैरे भारी एकदम….

खरं सांगू मला त्या सगळ्या शब्दांचा अर्थ तू समजावला आहेस … निव्वळ अर्थच नव्हे ’मर्म’ समजावलंस तू …. लव्ह यू आई!!!! :)

घरटं …

(वेळ -  संध्याकाळ पाच वाजलेले … )

– जायचय का तूला आज मॉलमधे ??? बघं मुलं घरी यायला वेळ आहे अजून… तुझी खरेदी आटोपेल तेव्हढ्यात….

– नको रे, आज राहू देऊ या का मॉल ?? मुलं असताना जाऊ या…. तसेही ती वाढदिवसाची पार्टी कधी संपेल कल्पना नाही… नेमके आपण जायचो आणि मुलं यायची…

– अजब आहेस तू ….. अगं आपण जाणार आहोत ना त्यांना घ्यायला… वेळही ठरलीये… त्याआधि कसे येणार ते ??? मुलं असली सोबत मॉलमधे की का वैतागतेस मग, की वर्षानूवर्षे राहिलं इथे तरी मेलं मॉलांमधे कोणकोणत्या गोष्टी मिळतात समजायचच नाही…. मुलं मला काही सुचू देत नाहीत …. एकदा मला मुलं नसताना घेऊन ये तू मॉलमधे… वगैरे वगैरे!!!!

– कळंsssssलं …. गाडी घराकडे ने गुपचूप!!!!

–ठीक आहे….. आणि बये आज शक्य आहे तर लाव ना तुझी लाडकी जुनी गाणी गाडीत….. एरवी मुलं त्यांची आवडती गाणी लावतात तर करवादतेस की काय धांगडधिंगा आहे म्हणून ….

– राहू दे… असू दे हीच गाणी … कुठे शोधू आता माझ्या लाडक्या गाण्य़ांचा पेन ड्राईव्ह…. चालू दे काहितरी….

:)

– माऊ असती गाडीत तर या गाण्याला ओरडली असती, “आवाज वाढवा … :) ” ….

– विचित्र बाई आहेस तू . इतकच समजलेय मला आता…. :) … सांगणार आहे मी आज मुलांना मम्माने तुमची आवडती गाणी ऐकली…

– मी काही ऐकत नाही रे ही गाणी… गप्पा मार बघू माझ्याशी… बोलायचं राहून जातं म्हणतोस ना एरवी… बोल बोल आता बोल!!!!

…………….

……………

( संध्याकाळ -साडे सहा )

– किती वाजले रे…. घरं कसलं शांत असतं नाही मुलं नसली की!!! शाळेत जातात ती वेळ माझी कामात जाते पण नंतर ते नसले की शुकशूकाट होतो घरात नुसता….

– हो का!!! अगं पण पसारा घालतात ना ते ….. ;) … तूच ओरडतेस….

……………

…………..

(संध्याकाळ – सव्वा सात )

– बरं जेवून घेऊ या का पटकन… मग निघू या मुलांना आणायला… .

– हो चालेल…. किती किती वेळ ठेवतात नाही लोक वाढदिवस….. फोन करू का त्यांना की आम्ही येतो लगेच मुलांना घ्यायला…

:) … अरे बातम्या बघ की… जगात किती घडामोडी घडताहेत ना… एरवी कुठे मुलं ऐकू देतात तूला…. एकतर आवाज तरी करतात नाहितर पोगो किंवा कार्टून पहातात  …. मी नाही हं म्हणत हे तूच म्हणतोस मुलांना….. ;)

:) … डाव उलटवलास :)

:)

– श्या आपण दोघेच जेवतोय एकटे , मजा नाही येत… मधे मधे ताटात लूडबूड नाही तर करमत नाहीये….

:) … ओ महाराज दोघं ’एकटे’ कसे असतात हो….. खरं सांगू आपण दोघं आत्ता आहोत आपल्या आई वडिलांसारखे… ते पण तर हल्ली असतात दोघेही ’एकटेच’ …. आपण निदान काही वेळाने मुलांना घरी आणणार हे माहितीये आपल्याला…..

:(

:( … सध्या आपण पिल्लांना चोचीने दाणा भरवणाऱ्या फेजमधे आहोत नाही…. पिल्लं अवतीभोवती चिवचिवताहेत….. मग ती हळूहळू मोठी होतील… नव्हे त्यासाठी आपणही धडपडू….. उंच आकाशातल्या त्यांच्या भराऱ्यांची स्वप्न पाहू…. ते उडतील त्याकडे कौतूकाने पाहू….

:) …. ते ’उडतील’ आणि मग उडून जातील…. वेगळी घरटी बांधतील….. त्याचं काय मॅडम ???

:) बांधू दे…. उलट मी म्हणेन बांधू दे…  जमवू दे एक एक काडी…. पहिल्या काही काड्या पुरवायच्या हव्या तर तू न मी…. आणि ठेवायचं हलकसं लक्ष घरट्याच्या मजबूतीकडे…. त्यांच्या नकळत हं!!! त्यांच्या पंखातली ताकद, जिद्द वाढती ठेवायची…. :)

:)

– मगं पिल्लं त्यांच्या घरट्यात बसतील नी हलकेच मागे वळून पहातील… आई- वडिलांचं घरटं असेल ना नीट असा विचार करतील…. दमले थकले की येतील इथे विसावायला….. :)

:) …. आवरा…. लेडी शेखचिल्ली…. माझं झालय जेवणं…. तुमचा खयाली ’पुलाव’ शिजवा आता गाडीत… मी फोन करून येतो… मुलांना आणायला जाऊया….

– कुचकट … :)

………………..

………………..

( संध्याकाळ – आठ वाजलेले )

– य्येssssss….. मम्मा बाबा …. आम्ही आलो!!!!! :)

:) ….. मजा केली ना पार्टीत….. आम्ही तुमची वाट पहात होतो…..

— जाम जाम मजा आली रे बाबा …  आणि मम्मा वाट कशाला पहायची…. आम्ही येणारच ’असतो’ ना!!!

:) … हो रे… मम्माला सांग हेच पुन्हा एकदा आता  :)

………….

…………

(वेळ रात्रीचे साठे आठ पावणे नऊ ….)

— अरे त्या रिटर्न गिफ्टांच्या पिशव्या नका रे फेकू इथे तिथे….. कपडे बदला…. हात पाय धूवा… आवरा रे….. ते फुगे तर सरळ डस्टबिनमधे जाऊ द्या… कोणी खेळत नाही… लोळतात नुसते घरभरं….. पसारा घालू नका sssssss !!!! मी काय बोलतेय…. कानात शिरतेय का तुमच्या ?????

—- पीं sssssssss!!!!!!!

— बंद करा रे त्या ’पिपाण्या’ ….. लोक पण ना का देतात ही डोकेदुखी देव जा्णे….काय एक एक खुळ निघतं नवं नवं …..

— मम्मा आपणही माऊच्या बड्डेला दिल्या होत्या हं या … उगाच बोलू नकोस….

— हो ना दिल्या होत्या ना… नाही दिल्याचं होत्या… लोक माझं डोकं दुखवतील मग मी का त्यांचे कान किटवायचे नाहीत!!! …. तुम मेरे बच्चे को पिपाणी दो मै वहीच म्हणजे वैसीच दुसरी तुम्हारे बच्चे को दुंगी…. मराठी बाणा आहे हा!!!

— मम्मा तू पण ना :)

– कळंलं ना मम्मा पण काय ते… चला झोपायला…..

– नशीब तुझं बाळा कळली तूला तुझी मम्मा… मला अजूनही कोड्यात टाकते ती…..  मुलं असली की त्यांच्यावर रागवते आणि नसली की कधी येतील याची वाट बघते…. चालू दे माते तुझे अखंड :)

– चूप रे तू…. असेच असते हे,  पिढ्यानूपिढ्या हेच घडणार असते…. उगा मला बोल लावू नकोस!!!

………………

……………..

(वेळ रात्रीचे दहा )

— मम्मा जुन कधी येईल ????

— मम्मा झालं हिचं सुरू….. आधि विचारायची आपण ईंडियाला कधी जाणार?? तू सांगितलस जुनमधे तर आता सारखी विचारते ’जुन कधी येणार ??? ’ …

— आता लगेच येणार हं जुन… लवकरच…. झोपा बघू आता….

— मम्मा मला नानीची आठवण येतीये….

— मम्मा मलापण मी पण मिस करतोय त्यांना…. ते पण आमची आठवण काढत असतील ना…. कधी येइल जुन असे वाटतेय मलापण…

:) हं….

– पण मम्मा आपण सगळे असे वेगवेगळे का रहातो…. ते पण दुसऱ्या दुसऱ्या कंट्रीमधे ??? सगळ्यांना एकाच ठिकाणी जॉब का नाही करता येत???

— मोठं होणं म्हणतात बाळा याला….. असू दे, नंतर सांगेन सगळं … झोपा आता… उद्या शाळा आहे!!!!

— ए मम्मा नानीच्या घरामागच्या नारळाच्या झाडावर सुगरणीने घरटे बांधले असेल ना…. ती खाऊ आणत असेल आतल्या पिल्लांसाठी…. मम्मा, मागच्या वर्षीची पिल्लं आता मोठी झाली असतील ना… धमाल!!!!

:) …. हो रे बाळा झालीयेत पिल्लं मोठी…. आता ती वेगळी रहातात…. सुगरणीच्या पिल्लाने मात्र पुन्हा एकवार सुंदर ’घरटं’ विणलय ., तसच अगदी मऊसूत, उबदार… मस्त झोका असणारं ..मन लावून , जिद्दीने. काडी काडी पारखून जमवून…. माहितीये तिला  पिल्लं मोठी होणार मग भुर्र्कन उडून जाणार एक दिवस… तरिही….

आणि आता मोठ्या सुगरणीची पिल्लं उडत उडत त्या घरट्याकडे धाव घेणारेत , विसावायला… जगण्याची , उडण्याची जिद्द पुन्हा पंखात साठवायला!!!!!!!!!!!! :) ….


—- :) … मिसेस. सुगरण झोप आता !!!  :)

— गुडनाईट मि.सुगरण  !!! :)

कल भी-आज भी-कल भी….

कल भी आज भी ….. आज भी कल भी… कुछ रिश्ते बदलते नही है कभी… :)

VIP suitcase ची जुनी जाहिरात आणि तिच्यातल्या या ओळी अनेकदा नकळत मनात गुणगुणल्या जातात… काही नाती बदलू नयेत असेच नेहेमी वाटते, नाही!!!! आणि हेच ईतके ठामपणे सांगणाऱ्या या ओळी कायम स्मरणात राहिल्या असाव्यात… :) आजही या ओळी मनात  आल्या, पण ’का’ या प्रश्नाशी गाडी अडली….

मनात येणारे उघड विचार आणि आपण कितीही कामात असलो तरी मनाच्या कोपऱ्यात स्वत:चे स्पष्ट अस्तित्व राखणारे काही विचार असतात नाही का… हे कोपऱ्यातले विचार बरेचदा जाणवतही नाहीत इतके खोलवर असतात ….. उघड विचार आणि त्यांचे एकमेकांमधे मस्त भाष्य़ चालते आपल्याला न कळू देता… लेकिन हम भी कुछ कम नही है…. आज या ओळी का मनात आल्या ते शोधायचेच हा चंग बांधला मी आणि समद्या विचांरांचा वैचारिक मागोवा घ्यायला सुरूवात केली…. :) (काय शब्दबंबाळ झालाय हा पॅरा… पण खरचं हे असंच घडलं असल्याने मला पर्याय नाहीये :) )

गेले संपुर्ण वर्ष.. ब्लॉगाच्या निमित्ताने झालेल्या अनेक सुंदर ओळखी… स्टार माझाचे मिळालेले बक्षीस वगैरे अनेक विचार मनात घोळताहेत हे आठवतेय मला…. त्याबद्दल मी बेहद्द खुशही आहे… पण अजूनही काहितरी आहे.. असावे नक्कीच!!!

गेल्या शनिवारी भारतात गेले… गेल्या जवळपास ८-९ वर्षातला एकटीने केलेला पहिला प्रवास… मुलाचा जन्म झाल्यानंतर कायम आम्ही दोघांनी एकत्र प्रवास केले… एकटीने आता प्रवास करता येईल का असे वाटावे ईतपत मुलांच्या सोबतीची झालेली सवय….. पण यावेळेस स्टार माझाच्या चित्रीकरणासाठी एकटी निघाले… विमानतळावर बोर्डिंग पास घेताना हट्टाने लहान मुलांसारखी खिडकीची जागा मागितली… :) … मस्तपैकी  जागेवर जाऊन बसलेही… शेजाऱ्यांशी ओळखी झाल्या… मुलांची आठवण, ते रहातील ना व्यवस्थित वगैरे मनात वारंवार डोकावणाऱ्या प्रश्नांना मागे सारले जरासे… विमान आकाशात ज्या गतीने धावत होते त्यापेक्षा कितितरी वेगाने माझ्या मनात एकामागे एक अनेक विचार चौफेर धावत होते…. ढगांचे पुंजके… खाली समुद्रात मधेच दिसणारे एखादे जहाज… मग त्या जहाजावरून कोणितरी आत्ता या विमानाकडे पहात असेल वगैरे टिपीकल लहानपणीचे विचार मनात डोकावत असताना आमच्या विमानाची सावली खालच्या समु्द्राच्या निळयाशार पाण्यावर दिसली…. आणि खूळ्यागत मी ती वाकून पहात राहिले…. लहानपणीच नाही तर अगदी कॉलेजात असतानाही ट्रेनमधून वाकवाकून मागे पळणाऱ्या झाडांकडे पहायचे तसे :) … आणि वाटलं का्लच्या ’मी’ चे अंश मोठ्या प्रमाणावर टिकून आहेत गड्या आपल्यात :) शेजारच्या माणसाशी मस्त ओळख झालेली होतीच…. माझा बालिशपणा पाहून ते म्हटलेही, “खूप वाकू नका हं… खिडकीतून मान बाहेर काढू नका… मागून येणारे विमान ठोकेल ;) ” मनसोक्त हसलो आम्ही दोघे….. जेवण नामक प्रकार आल्यावर मी , “मला बरे नाहिये, नको मला जेवायला ” सांगितल्यावर शेजारच्या दादांनी, अहो नका जेऊ पण सॅलड खा तेव्हढे…. मग ते संपल्यावर… चक्कर येतेय ना ती खिर खा तेव्हढी :) … ती संपवल्यावर … एक काम करा बघू थोडा भात-भाजी खा तकवा राहील म्हणून मला जवळपास सगळे ताट संपवायला लावले…. :) मला आई आठवली कायम रागावणारी, घरात गं कुठला आग्रह लागतो तूला…. आळशी…. जेवायचा कुठला आळस या मुलीला म्हणणारी…. :) …. मुलांना याच मुद्द्यांवर रागावणारी मी आहे तशीच आहे की अजून… गम्माडी गंमत आहे हा नवा शोध म्हणजे ….

आई-बाबा मुंबईला विमानतळावर वाट पहातच होते…. गाडीत बसल्या बसल्या आईने पुन्हा आग्रहाने खाऊ घातले…. मला खूप आवडते म्हणून माझ्या हॉस्टेलला येताना ती नेहेमी बटाट्याच्या काचऱ्या आणि वांग्याचे भरित आणायची… त्यादिवशीही तोच डबा पाहिला आणि वाटले, माँसाहेब मानले तुम्हाला…… कुछ चीजे और कुछ डबे कभी नही बदलते :) … मुलं झाल्यानंतर जसा अनेक वर्षाने माझा पहिला एकटीने केलेला प्रवास होता तसे गेल्या पंचवीस वर्षात आई-बाबा आणि फक्त मी असे आम्ही तिघेच पहिल्यांदाच भेटत होतो एकमेकांना…. आम्हाला न कोणाला फोन करायचा होता, न कोणाला लवकर भेटायचे होते… खूप गप्पा मारायच्या होत्या एकमेकांशी…. मग त्या गप्पा आमच्याबरोबर नसलेल्या आमच्या घरातल्या ईतरांबद्दलच्याच असल्या तरी… ते क्षण आमचे तिघांचेच… किंबहूना माझेच… :)

भरपूर भटकले मी आई-बाबांबरोबर… मधे मधे माझ्या तब्येतीची कुरकुर सुरू असली तरी कुठल्याही अडचणीवर मात करावी असा आई-बाबांचा हात हातात आणि डोक्यावर होता…. ईतकं शांत , सुरक्षित वाटत होतं की जाणवलं आपल्याला ढिग गर्व असेल आपण खूप मोठे झाले आहोत वगैरे… सब झूट …आई-बाबांची कुशी आणि त्यात उबदार सुरक्षित वाटणे ह्यापुढे सगळेच लहान वाटते….

लहानपणी शाळेत फक्त बुधवारी यूनिफॉर्मची सक्ती नसायची… मग मैत्रिणींचे वेगवेगळे ड्रेसेस पहायला मिळायचे त्यातला कुठला तरी एक खूप आवडायचा…. बाबा घरी आले की माझा फतवा निघायचा… बाबा मला तसाच्या तसा ड्रेस आजच्या आज हवा…. आणि माझी आणि बाबांची वरात कपड्यांच्या दुकानात निघायची… ते थेट तसाच्या तसा ड्रेस घेऊन घरी यायची… आई रागावायचा लहानसा प्रयत्न करायची, पण बहूधा बाबांनी माझे हट्ट पुरवावे हे तिलाही मान्य असावे….. मग तिच्या कुठल्या तरी कुरकुरीला बाबा म्हणायचे, “अरे फिकिर नॉट , हम है ना :) “…. असं वाटायचं आपण फक्त मागण्याचा अवकाश, बाबा ती वस्तू हजर करू शकतात!!! परवा मुंबईत फिरताना बाबांनी मला डझनभर ड्रेसेस घेतले, तरी मला हवी तशी पर्स मिळेना…. आई-बाबा मात्र न कंटाळता फिरत होते, पर्स शोधत…. केव्हातरी म्हटलं बाबा असू द्या, दमलात तुम्ही…. हसून बाबा म्हणाले, “अरे अभी मिलेगी तुमको पर्स… फिकिर नॉट… हम है ना!!!” पुढच्या दहा -पंधरा मिनिटात खरचं तशीच पर्स मिळालीही…. डोळे तेव्हाही पाणावले होते.. आजही पाणावताहेत….

रस्त्यावरून चालताना एक खड्डा दिसला, मी पुढे झाले आणि आई-बाबांना हात दिला…. आई-बाबा पुढे गेले आणि मी त्या खड्ड्याचे वळून आभार मानले… एक जाणिव होती ती… लहानपणापासून आय़ुष्याच्या वाटेवरच्या अनेक खड्ड्यांना ज्यांच्या आधाराने मी सहज पार केले त्यांना आज मला आधार द्यायचाय, आणि जसे त्यांनी मला प्रत्येक खड्ड्यापासून वाचवले तसेच मला माझ्या मुलांना सावध करायचे आहे….

स्टार माझाचे शुटिंग आटोपल्यावर विद्याधरच्या घरी मालाडला गेले…. काकुंनी भरपूर लाड केले…. माझ्या बॅगेत माझ्याकडचे सामान मावेना…. मी आणि विद्याधर मिळून ती बॅग बंद करायचा अयशस्वी प्रयत्न करत होतो आणि काकू आल्या…. आम्हाला म्हणाल्या, व्हा बाजूला मी भरते सामान… प्रश्न सामानाचा नाहिये, ते सामान कसे कोंबलेय त्याचा आहे…. काकुंच्या चेहेऱ्यात मला आई दिसत होती तेव्हा…. सामान भरण्यावरून नेहेमी रागावणारी… काका-काकूंशी गप्पा मारल्या मस्त…कुछ रिश्ते खरच तसेच असतात नाही… ’आई” बसं शब्दच पुरेसा आहे… आई ही एक भावना आहे नाही का, म्हणून आई कोणाची याने फरक पडत नाही, त्या सगळ्या बाया सारख्याच असतात :) ….. मस्कतला आल्यावर नवरा म्हणालाही, मालाड नव्हे मा’लाड’ ठेव नाव… म्हटलं हो तर यावेळेस नासिकला जाणे नाही झाले पण माझे माहेरपण झाल्याशिवाय रहात नाही :)

शुटिंगमधे झालेल्या अनेक नव्या ओळखी, विद्याधर,सुहास आणि मी ट्रेनमधे मारलेल्या भरपूर गप्पा, एक नवा अनुभव आणि आलेले क्षण भरभरून जगण्याची ईच्छा, माझ्यातल्या ’मी’ मधे काही फारसे बदल झालेले नाहित हेच खरे :)

आज ही पोस्ट लिहिताना जाणवतेय हे ईतके सगळे मंथन मनाच्या कोपऱ्यात निवांत चालले होते आणि यासगळ्याची मावळत्या वर्षाच्या संध्याकाळी माझे मन नोंद घेत होते तर…. परिपाक म्हणजे मनात आलेल्या ’कल भी-आज भी… आज भी- कल भी’ या ओळींचे तरंग…. :)

खरयं कालच्या मी ला शोधताना मला आजच्या मी पासून जरा बाजूला व्हावे लागले आणि खूप काही नव्याने गवसले …. मस्कतला पोहोचल्या पोहोचल्या कन्यारत्न कानात म्हटले, “मम्मा आम्ही तुझ्यासाठी काहीच नाही आणलेय… गाडीतल्या तुझ्या सिटवर काहीच ठेवलेले नाही हं बुके वगैरे !! ” :)

मनात आल्या पुढच्या ओळी, ” कुछ रिश्ते बदलते नही है कभी ” :)

आयूष्यातलं , कॅलेंडरातलं एक पान उलटलं… पण कुठलिही हुरहूर न लावता…. नवी उमेद, नवी जिद्द, नव्या आशा सबकुछ है…. :) … माझ्या मुलांमधे मलाही एक विश्वास निर्माण करायचा आहे, ” फिकिर नॉट… हम है ना!!” ….

काल-आज आणि उद्याचे एक वैचारिक आवर्तन सुफळ संपुर्ण झालेय :) येणारे नवे वर्ष जगायला मी तयार आहे…

एक महत्त्वाचे विसरून चालणार नाहिये…

तुम्हा सगळ्यांनाही येणाऱ्या नव्या वर्षाच्या अनेकोनेक उत्तमोत्तम शुभेच्छा…. सगळी स्वप्न, अपेक्षा, आशांची पुर्तता होवो, जो जे वांछिल ते ते सगळे प्रत्येकाला मिळो ह्याच सदिच्छा !!! :)

खोप्यामधी खोपा……….

सुगरण पक्ष्याचे नुसते नाव घेतले तरी बहिणाबाई आठवल्याशिवाय रहात नाही…….

बहिणाबाई म्हणते……..

अरे खोप्यामधी खोपा
सुगरणीचा चांगला……
देखा पिल्लांसाठी तिने
जीव झाडाले टांगला……

सध्या मुक्काम पोस्ट नासिक असल्यामुळे आईच्या घरामागच्या नारळाच्या झाडावर सुगरण पक्षी बांधत असलेले घरटे पहायची संधी मिळाली. तसा दरवर्षी मी हे घरटे पहाते. पुर्ण झालेली घरटी, न पटलेली अपुर्ण राहिलेली (सोडलेली) घरटी……त्यासाठीची त्या ईवल्याश्या पक्ष्याची लगबग ….. एक एक काडी, कापुस आणून त्या घरट्याचे सुरू असलेले बांधकाम सगळेच खिळवणारे असते……

यावेळेस त्या घरट्याचे आणि त्या सुगरणीचे फोटो काढायचा विचार आला पण माझा हा विचार सौ. सुगरण बाईंना फारसा पसंत आला नसावा कारण मी कॅमेरा सरसावावा आणि त्यांनी पानाआड लपावे हे सत्र बराच वेळ चालले……पण मी हार मानते कशाला काही फोटु मिळवलेच………:)

लपाछूपीचा खेळ …..

शेवटी या सुगरणीच्या नकळत तिचे फोटो काढण्यात मला यश मिळाले…. :)

 

तिची उलुशीच चोच…
तेच हात तेच बोटं…..
तुले दिले रे देवाने…
दोन हात दहा बोटं…..

बहिणाईने माणसाला विचारलेला हा प्रश्न किती योग्य आहे हे या सुगरणीच नीटसपणा समजावत होता.

 एव्हाना माझे अस्तित्व तिला जाणवायला लागले होते…..पण घरट्यात दोन पिल्ले आहेत हे मलाही समजले होते…… मी तिथून कधी हटते याची वाट ती पहात होती, आणि जमल्यास पिल्लांचे फोटो काढता आले तर पहावे याची मी :)

 तास दोन तास तो पक्षी आणि मी रमलो एका वेगळ्याच विश्वात …..वेळोवेळी तो ईवलासा अगदी आपल्या हाताच्या तळव्यापेक्षा लहान पक्षी मला जाणीव करून देत राहिला माझ्या खुज़ेपणाची,ती चिकाटी,ते कलाकुसर, ते नेटकेपण आपल्यात नाही ही खंत वाटत राहिली मग मनात …..

गाते माहेराचे गाणे….(पुढचे कडवे… :) )

माहेराच्या गाण्याचे पुढचे कडवे…

रिक्षाने खूप खूप भटकेन मग मी….. कधी शेअर रिक्षा ,कधी  फक्त आपल्यासाठी असलेली रिक्षा!!!! शेअर रिक्षा मला आवडते….. मजा असते ती पण एक….  आजुबाजूचे लोक मुलांशी गप्पा मारतात , त्यांच्या गप्पा ऐकतात…. तेव्हा उगाच आपल्या माहेरी मुलांचे कौतूक होतेय असे वाटत असते मला…. पण या रिक्षाचा एक तोटा आहे रिक्षावाला मनमोकळ्या गप्पा मारण्याच्या मुडमधे नसतो इथे….

कधितरी रिक्षा माझ्या कॉलेजवरून जाईल मग…. मग मी लेकाला म्हणेन, “पिल्लू हे मम्माचे कॉलेज बरं!!!!” त्या वास्तूकडे काही ओळखीच्या आणि काही अनोळखी नजरेने बघत राहीन मी!!!  रस्त्यारस्त्यावरच्या मंदिरांना मी आणि रिक्षावाल्यासहित बाकीचेही सगळे नमस्कार करत राहू आम्ही….. “दोघे पुढे व्हा दोघे मागे…. जरा ऍडजस्ट करा” या रिक्षावाल्याच्या हुकूमावरून झालेल्या कोंबाकोंबीत मागे बसलेल्या दोघांचा नमस्कार देवाला दिसला असेल का हा पुराणकालीन प्रश्न माझा मलाच पुन्हा पडेल… खूदकन हसेन मीच माझ्याशी!!!! :)

मेनरोडला, दहीपूलावर गल्ली- बोळात उगाच भटकत राहीन मी….. फुटाण्याच्या, खारेदाण्याच्या गाड्यांवर थांबून खरेदीही करेन मग….

’नासिक किती बदललय ना !!!’ या विषयावर अनेक चर्चासत्र होतील…. अंगणात ओट्यावर बसून पेपर वाचत असताना आई कॉलनीचा गेल्या वर्षाचा आढावा देत राहील… मग एखाद्या नऊवार काकू पायरीवर येऊन बसतील…. “काय म्हणतेय गं तुझी दुबई???” त्या काळजीने विचारतील….. काकू अहो दुबई नाही मस्कत हे  अनेकदा दिलेले स्पष्टीकरण मी यावेळेस देणार नाही पण  :)  ”मस्त मजेत” सांगून मोकळी होईन मग!!!

अंगणात माझी दोन मुलं आणि त्यांच्याबरोबर ’मुलं’ झालेले आई-बाबा एकमेकांशी खेळण्यात मग्न असतील…. मी मात्र कुठलेतरी पुस्तक वाचत पायऱ्यांवर बसून राहीन…. डोळे, चित्त मात्र त्या बाळगोपाळांकडे असेल माझे…… या दोन पिढ्यांमधला दुवा मी आहे या विचाराशी मनाची गाडी थांबेल आणि एका अनामिक आनंदाची मी धनी होईन….  ”बुढ्ढा बुढ्ढी जपून… वय झालेय आता …. :) ” मी आई-बाबांना चिडवेन…. त्या कोणाच्या कानावरही माझे बोलणे जाणार नाही….. ;)

“हं!! हं!!” म्हणत मी पेंगत असले तरी आईच्या गप्पा संपायच्या नाहीत….. वर्षभराचा बॅकलॉग तिला भरून काढायचा असेल आणि हीच कथा ही कितव्यांदा सांगतेय याचा हिशोब मी हसत मनात मांडत राहीन….. बाबा केव्हा तरी घोरायला लागतील………… दिवसभर नातवंडांशी धमाल खेळून दमलेले बाबा शांत झोपलेले असतील….. गोष्टी ऐकत ऐकत त्यांच्या दोन्ही बाजूला त्यांची ’गुणी’ नातवंड झोपलेली असतील….. येव्हढा वेळ मला बॅन असलेल्या खोलीत मी चादरी टाकायच्या निमित्ताने उगा डोकावून येईन….. !!!! समोरचे चित्र मला माझ्या मनात साठवायचे असेल…..

मग येईल सासरी जायचा दिवस….. पोहोचे पोहोचे पर्यंत नवऱ्याशी कटकट करणारी मी तिथे पोहोचले की त्याच्यापेक्षा जास्त गप्पा मारत राहीन…. जेवायला बसल्यावर  ” आई पुडचटणी नाही केली तुम्ही???? ” मी सासुबाईंना विचारेन…..मोठ्ठा डबा माझ्यासमोर ठेवत त्या म्हणतील, “सासऱ्याची सुन गं ती… पंचपक्वान्न ठेवा समोर तरी पुडचटणी मागतील…. :) “….. मला खरचं त्यांचाकडे लक्ष द्यायला वेळ नसेल…. त्यांच्या हातचे गोड आंबट वरण, भात आणि पुडचटणी…   “मुरलीये ती पक्की आता घरात…” हसत मावससासूबाई म्हणतील…. त्यांच्या वाक्यापेक्षाही त्यांचा पाठीवरचा हात हटुच नये वाटत राहील…..तृप्त होत राहीन मी……..

सगळी पुरूष मंडळी झोपलीये असे वाटले की आई माझ्या शेजारी बसतील…. “तूला म्हणुन सांगते..” या पालूपदाने मग खूप काही बोलत रहातील…… कानातले मशिन काढून ठेवलेल्या मावशी खाणाखूणांनी काय बोलाताय तूम्ही म्हणून विचारत रहातील… पण यावेळेस आम्ही मात्र “देवड्यांच्या सुना” असू दोघी…. घरातल्या बाबी अश्या थोडीच सांगू कोणाला…. आम्ही खूणेनेच ’काही नाही’ म्हणु त्यांना!!!! “सगळे देवडे सारखेच गं बाई!!! ” या घोषवाक्याशी येऊन आमची गाडी थांबली की नवरा ओरडेल ,”आवरा.. चहा ठेवा आता दुपारचा :) ” आईच उठतील मग ,”वर्षभर एकटीच तर करतेस तू सगळं!!! ” सारख्या म्हणत रहातील……. चहा पिताना अण्णाही सामिल होतील…. खूप काही बोलत रहातील, सांगत रहातील….. ’माहेराच्या गाण्यात’ कोणे एके काळचे सासरही अलगद सामावले जाईल मग!!! :)

एक दिवस बाबा आईला म्हणतील मग….. बॅगा भरा आता तिच्या नाहीतर नंतर घाई होते मग!!!! आपण अगदी तटस्थ असल्याचा क्षणिक आव आणलेले बाबा खाकरल्यासारखे करून खिडकीबाहेर नजर वळवतील….. मी पुढे होऊन त्यांच्या मांडीत डोके ठेवीन….. ते पाठीवर मायेने हात फिरवत रहातील…. आईही मग बाजूला उभी राहील आमच्या….. त्या क्षणी मी त्यांची ’ताई’ आणि ते माझे ’आई-बाबा’ असतील फक्त….. आमच्यापुरताच असेल तो क्षण… गोठलेला…. मनात खोल खोल साठवलेला!!!!!!

बाबा म्हणतील मग ,” मिसेस देवडे कढी खिचडी होऊन जाऊ द्या एकदा तुमच्या हातची :) “…………

निघताना आजी सकाळी लवकरच येईल….. मी तिला म्हणेल , ” अगं तू का आलीस मी येतच होते ना!!!! “…. पाठीवर पुन्हा पुन्हा हात फिरवेल ती… मुलांना जवळ ओढून घेईल….. अनेकदा विचारलेला प्रश्न विचारत राहील, “ताई पुन्हा कधी येशील गं!!” …………… “जप स्वत:ला!!!” आम्ही एकदमच म्हणु ……

एक काठोकाठ भरलेलं .. म्हणुनच जडावलेलं मन आणि पाय घेऊन मी पाठ वळवेन….. समोरच्या बिल्डिंगमधल्या कुठल्यातरी काकू आईला म्हणतील…” दिवस किती भराभर गेले हो!!!!” आई मान हलवत राहील फक्त….. बोलत नाही ती आम्ही निघताना…. पहात राहील फक्त……………………… गाडी वळताना मागे वळेन मी……. आई तिथेच उभी असेल गुलमोहोराखाली…………..

गाते माहेराचे गाणे…..

“मम्मा मला बाबूंबरोबर रोज रेल्वे स्टेशनला जाता येणार आता….. य्येsssssssss!!!!!!! तपोवन, नंदीग्राम, पंचवटी, गोदावरी मै आ रहा हूँ!!!!!!!!!!!!!!!!!!!” चिरंजीव आपल्याच नादात ओरडत होते…..

“मम्मा यावेळेस मी पण जाणार ना ???? ” …कन्यारत्न

“हो हो … सगळी सगळी मजा करा ठीके!!!” ….मी

एक एक बेत आखताहेत सगळे, काही बोलले सांगितले जाताहेत तर काही कागदावर.. आणि बरेचसे मनात :)

मुलांना आजोळी जायची, आजी-आजोबांना भेटायची घाई… तर मला ’माझ्या घरी’ जायची घाई झालीये!!!!

पुन्हा एकवार तो मायेचा उंबरठा ओलांडून आत जाईन मी!!  मुंबईहून नाशकात पोहोचत पोहोचत बाबा आणि मुलं एकमेकांशी गप्पा मारण्यात गुंग होतील…. मी आणि नवरा दोन खिडक्यांमधून बाहेर पहात असू!!!! ठाणे सोडल्यावर मन धावायला लागेल माझे…. बाहेरच्या प्रत्येक झाडा, पाना फूलाला आसुसून पाहीन मी… मोकळ्या आकाशाला साद घालेन….. “आले रे बाबांनो मीsssss”  त्या प्रत्येकाला सांगेन… त्यांचे माझे मुक नाते मी जपेन आणि पानांची सळसळ करून झाडंही मग मला “ये गं!!” म्हणतील……. एकीकडे “बाबा कसारा घाट मस्त झालाय हो आता…………” असे काहितरी बोलून आजोबा आणि नातवंडामधे शिरण्याचा निष्फळ प्रयत्न करेन…… ईगतपुरी, घोटी पार करत गाडी नाशकात शिरेल……

आता माझ्या मनाचा वेग गाडीपेक्षा खूप जास्त असेल…. दारात उभी असलेली आई मला आत्ताच दिसायला लागेल….. वर्षभरात बदललेले नासिक डोळ्यात साठवत घरापुढे गाडी उभी राहील……गेटजवळचा गुलमोहोर रंगीबेरंगी स्वागत करेल…. मागच्या आंब्याच्या कैऱ्या दिसताहेत का मी पटकन नजर टाकून बघेन…..मी भराभरा दाराकडे चालत जाईन आणि मग आदेश येईल, “मम्मा थांब!!!! नानी ते काय पोळी आणि पाणीने ओवाळेल आपल्याला… then u can enter the house!!!!”……….. अस्सा राग येईल मग वाटेल त्याला सांगावे, ” शहाण्या हे माझे घर आहे… माझी आई आहे ती, मला माहितीये ती काय करेल ते!!!!!”

घरात गेल्यावर आईला चहाची ऑर्डर देइन मी… किचनच्या ओट्याजवळ ती गेली की तिला मागून घट्ट मिठी मारेन मी… चहा होत होत आई भरलेवांगे,भरीत भाकरी, ईडली, आई हे आई ते अश्या सुचना देत देत तिच्या कुशीत विसावेन मी……

आता सकाळी दहा वाजताना पुन्हा एकवार किचनमधे शिरेन मी… “बाबा चहाssss”  करून ओरडेन…. “कुलकर्णी बाई तुमच्या मुली भलत्या चहाबाज!!!” बाबा आईला म्हणतील…. गेल्या वर्षभरात आईने घर काहीच बदललेले नसेल… मग मी तिला रागावेन… “ताई अगं तू कर हवे ते बदल…” आई म्हणेल…. किचनमधले ठिय्या आंदोलन आळशीपणे पेपर वाचन संपल्यावर उठेल केव्हातरी :)

मी पोहोचण्याच्या दिवसाच्या हिशोबाने आईने गहू भिजत घातलेले असतील…. सकाळी ती म्हणेल “चीक करू का खायला????” सगळे एकसुरात “होss” करून ओरडतील….. मी उगाच निरर्थक घरात फिरेन… मागच्या दाराने अंगणात जाऊन पुढच्या दाराने पुन्हा आत शिरेन…. अश्या परिक्रमा करताना अंगणातल्या झाडांना  पहात राहीन…. मागच्या टाकीच्या नळाखाली पाय सोडून धुण्याच्या दगडावर बसून राहीन थोडावेळ… जणू त्या थंडगार पाण्यात गेल्या वर्षभराचा शीण वाहून जाईल मग…. :) … किचनमधे आई-बाबा, माझा नवरा गप्पा मारत बसतील….. बहिणाबाई माझा मागोवा काढत मागच्या दारी येईल…. गप्पा सुरू होतील मग…. केव्हातरी आई हाक मारेल……

पुढच्या दारी पेपरवाल्याने पेपर टाकलेला असेल… मी तो उचलायला जाईन, तर मुलं पेपरवाल्या मामाशी गप्पा मारत असतील….. तोवर दुधवाला येइल…. ” चिक्या कसा आहेस रे?” तो मुलाला विचारेल….. मग माझ्या लक्षात येइल तो आपल्या दारी नाही आला…. मी बाबांकडे पाहीन….. यांचे रेग्युलर दुधवाला लावणे, बंद करणे सुरू आहे समजेल मला…… “अगं हा उशिरा येतो वेळा जमत नाहीत आमच्या” वगैरे परिचित कारणं बाबा सांगतील…… तोपर्यंत तो परत येईल,” कशी आहेस ताई?? दाजी कसे आहेत?? … आहेस ना आता महिनाभर….” तो कुठलाही किंतू मनात न आणता माझ्याशी आणि बाबांशी गप्पा मारत राहील….. समोरच्या बिल्डींगमधल्या गॅलऱ्यांमधे काका-काकू येतील…. मग गप्पा मोठमोठ्याने रंगतील निदान १५-२० मिनीट…… मी कधी गप्पांमधे भाग घेत कधी अलिप्तपणे त्या संवादात रमेन….. मनात कुठेतरी सुखावत राहीन पण!!!!!!!

गुलमोहोर एव्हाना रागाने लालबुंद होईल….. मनात म्हणेल हिच्या एकटेपणात कित्येकदा साथ दिलीये मी पण ही बदललीये आता….. आल्यापासून माझी दखल नाही घेतली हिने….. त्याला एकनजर पाहिले की  मात्र नजरबंद होइल तिथे….. त्याचे हिरवेगार शेंदरी रुप मोहावत राहील…. खुळ्यागत त्याच्या पानाफूलात रमेन मी….. मनात रागावेन मग मी देखील….. यावेळेस जरा जास्तच बहरलाय … कचरा किती होतोय रे दारात!!!!! तो हलकेच एक लकेर घेईल आणि अजुन काही फुला-पानांची बरसात करेल….. :) …. जा रे बाबा मला खूप वेळ नाहीये… आजीकडे जायचेय त्याला सांगेन मी….. तो अजूनच हसेल….थोडा पलीकडे झुकून हलकेच पावले टाकत येणाऱ्या आजीवर सावली धरेल तो!!!!  सुंदर साडी नेसलेली, नीटनेटकी आवरलेली….. बगलेत ’पाकिट’ आणि हातात छत्री  घेतलेली आजी मला दिसेल येताना….. “ये गं आई!!!!” माझी आई स्वयंपाकघरातल्या जाळीअडून म्हणेल…… अच्छा म्हणजे मी माझ्या पाउलखूणांचा ईथे मागोवा घेत बसलेय आणि जाळीअडून मातोश्री आम्हाला पहाताहेत वाटतं….. आजी हसेल….. आई हसेल… मी देखील आणि अंगणात बागडणारी माझी लेकही……………. :)

“पणजीआजी ssssss” ती धावेल आजीकडे….” छकुले किती मोठी झालीस गं!!!!!” आजी म्हणेल……. धावलेली छकुली एक असली तरी आजीच्या मात्र आम्ही तिघी छकुल्या :) तिच्याकडे पहात असतील….. “तायडे अगं काय हा अवतार???? ” आजी रागावेल मला…. “अगं म्हातारे तुझ्यावर नाही ना गेले मी”, म्हणत तिच्या कुशीत शिरेन मी….. पॉंड्स…. चिरपरिचित सुगंध पण तो माझ्या आजीची ओळख आहे, स्वत:लाच पुन्हा सांगेन मी!!!! हातातलं सोनचाफ्याचे माझ्यासाठी आणलेले फुलं आजी मला देईल मग…. तिचा हात हातात घेऊन मी म्हणेन,” काय हे चिरतरूण बाई तुमच्या हातावर सुरकुत्या???”………….. :)

माझं वजन वाढलय, यावेळेस मी योगा क्लास लावणार आहे, झालचं तर कुकरी क्लास पण ई. ई. बडबडेन मी… कोणीही दखलही घेणार नाही… मग थोड्यावेळाने बहिणाई ओरडेल,” ताई सगळ्यांना माहितीये तू घरात बसणार आहेस फक्त :( ” मी काय ऐकून घेईन वाटलं का…… “तूला होऊ दे ना दोन मुलं मग बघू किती ऍक्टिव रहातेस तू???? ” मी सुनावेन तिला…. “मला कशाला आईला बघ… आपलीच आई आहे ना ती!!!” वगैरे म्हणत वाद घालेल ती…..

माझा लाडका मामा आणि मामी येतील मग…. मी मामाला त्याच्या स्वत:च्या तब्येतीबाबतच्या हेळसांडीबद्दल व्याख्यान देत राहीन आणि तो आपलं मला चिडवत राहील या ना त्या कारणाने… लहानपणी ’ताई तुझं नाक बघ किती लहान आहे माझं कसं मोठं म्हणून’ चिडवायचा तसा….. केव्हातरी रागावेन मी आणि सरळ मामीकडे जाईन आणि ठणकावून सांगेन की मामा तुझ्यापेक्षा मला माझी मामी जास्त आवडते….. आमचं बालपण, भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ गप्पा वाट फूटेल तिथे वहातील मग…. :) …. मामा हलकेच माझ्या डोक्यावर हात ठेवेल मग….. आता वाटेल आपण परतून जाऊच नाही ईतके दुर… इथेच रहावे या सगळ्यांच्या जवळ… :)

केव्हातरी मोठ्या मामीचा फोन येईल ,” बारका बाई कशी आहेस??” ती म्हणेल…… मामी अगं सुटलेय गं आता, मी कुरकुर करेन…..

एखाद्या दिवशी पहाटेच जाग येईल …. मग मी दुसऱ्या मजल्यावरच्या गच्चीत जाईन…. पहाटं….. एकटीनेच बसून राहीन तिथे…..वर असणारे आकाश माझे एकटीचे असेल तेव्हा…..बोटायेव्हढे नारळाचे झाडं मात्र आता ईतके वाढलेले असेल की आम्हा माहेरवासिणींना ईतक्या वरही साथ देईल….नुकतेच दव पडलेले असेल त्या पानापानावर हलकाच हात फिरवेन मी…. नारळाशी अबोल संवाद होत राहील आणि तितक्यात तो येईल …. पुन्हा एकदा मारूती चितमपल्लींचा कुकुडकोंबा आठवेल मला… तेजस्वी काळा आणि तपकिरी रंग असलेल्या भारद्वाजाला मला सांगायचे असेल की मी आल्या दिवसापासून तूला शोधतेय रे!!! तो फांदी फांदीवर बागडेल… मी लपून कधी प्रकट होत त्याला पहात राहीन…. सुगरणींचे अनेक खोपे नारळाच्या पानापानाला असतील…. एखादी सुगरण मन लावून आपला खोपा विणत असेल….. मी मग भारद्वाजाला हलकेच खूण करेन “गप्प बैस जरा” तीला मन लावून काम करू दे जरा!!! त्यादिवशीच्या सुर्योदयाचे आम्ही तिघं साक्षीदार होऊ मग……

(आज थांबतेय इथे….पण माहेरपुराणं संपलेले नाही बरं!!)