मस्कतमधे येउन दोन वर्ष झालेली, साधारण सगळं मार्गी लागलेलं…. मोठ्या मुलाची शाळा आणि दोन वर्षाच्या धाकट्या लेकीची प्रगती सगळं सुरेख सुरू होतं. तृप्त समाधान देणारं चौकोनी कुटूंब माझं , आणि तरीही पोकळीची एक हलकीच जाणीव मनात डॊकावू लागली होती. रिकामा वेळ हाती लागत होता…. आणि त्याचा सकारात्मक वापर नक्की काय आणि कसा करावा हे उत्तर मिळत नव्हतं !!
चळवळ्या मनाला आणि स्वभावाला मधेच अचानक , आपण दिवसाचे रकाने भरून ’चाकोरीचे कागद खरडतोय ’ की काय अशी शंका वाटू लागली होती…. त्या सगळ्या गुंत्यात एक दिवस हाती लागला महेंद्रजींचा ब्लॉग. मग वाटलं आपणही का लिहू नये ? …. झालं, ब्लॉग सुरू करायला इतकंच कारण पुरेसं वाटलं आणि लिहायला सुरूवातही केली .
एक वर्ष, दोन वर्ष, तीन वर्ष आणि चक्क चार वर्ष लिहीत गेले.
. ब्लॉगबाळ आज ’चार वर्षाचं’ पुर्ण झालय !!
…. माझ्या ब्लॉगबाळाचा आज हॅपी बड्डॆ आहे !!
पोस्टमागे पोस्ट करता करता कधी मी ’चाकोरीबाहेरचे कागद खरडायला ’ लागले हे मलाही समजू नये इतका सहज सुंदर प्रवास झाला. चाकोरीबाहेरेचे म्हणजे काही भव्यदिव्य नाही तर माझ्या रोजच्या आयूष्याच्या ’चाकोरीबाहेरचे ’ बरं
चार वर्षात काय नाही मिळालं इथे …. अनेक मित्र मैत्रीणी, नाती, वाचक , आणि लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, कृषीवल ,सकाळ पेपरमधली दखल , चारचौघी मासिकात लिहीण्याची संधी , स्टार माझाच्या ब्लॉग माझामूळे टिव्हीवर चमकून येण्याची संधी !!
. मात्र या सगळ्या सगळ्या पलीकडे मला ब्लॉगने काय दिलं तर माझ्या आजारपणाच्या गेल्या पुर्ण वर्षात माझ्या पाठीशी खंबीर उभी रहाणारी नाती. ’हरायचं नाही ’ सांगणारे भाऊ . एअरपोर्टला दहा मिनीटाची धावती भेट होणार ही कल्पना असली तरी धावणारे भाऊ. ’तन्वे तुझी काळजी वाटतीये ’ म्हणणाऱ्या माझ्या मैत्रीणी, बहिणी …… तर एकीकडे, ’तायडे प्रेमात पडलोय/ पडलेय ’ हे आवर्जून सांगणारी चिल्लर पार्टी …..
. ॠणानूबंधांबाबतची माझी श्रीमंती हा माझा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय , तो अधेमधे ब्लॉगवर न डॊकावला तर नवल.
सतत रडता येत नाही मला…. ’संकटं’ आली होती, येताहेत आणि येतीलही. डगमगायलाही होतं … मात्र दु:खाचा पुरस्कार नकोच वाटतो. कधी कधी डोळे भरून येतात, नकळत वहायला लागतात. अश्या वेळी एखाद्या जीवलगासारखा माझा ब्लॉग अश्रॄंना अडवणाऱ्या बांधाचे काम करतो. जुन्या पोस्ट्स, त्यावरच्या कमेंट्स आधार देणाऱ्या ठरतात !!
नवं काही लिहून होत नसलं, मनातले विचार मांडता येइनासे झाले की कधीतरी वैतागून ब्लॉग बंद करायचा विचार मनात येतो आणि नेमकी त्याचवेळी एखादी मैत्रीण सहज बोलून जाते , “तुझं ठीक आहे गं, तू निदान तुझे विचार ब्लॉगवर मांडून मोकळी होतेस ’ … !! मग ब्लॉग बंद करायला निघालेल्या ’माझे’ डोळे उघडतात आणि मी पुन्हा ब्लॉगकडे प्रेमाने नजर टाकते
सुरूवातीच्या पोस्ट्स आणि आत्ताचं लिहीणं यात फार फरक मला स्वत:लाच जाणवतो. त्या त्या परिस्थीतीला अनूसरून, मानसिकतेनूसार आणि त्या त्या वयाच्या भुमिकेला अनूसरून मी व्यक्त होत गेले….. आणि हे असं , इतकं सोपं सहज लिहीणं व्हावं याला कारण वाचकांचा सततचा पाठिंबा , तेव्हा या सहजच प्रवासाचे श्रेय त्यांचे!!
ब्लॉग लिहीणं मला मनापासून आवडतं…. खूप काही लिहीता येत नसलं तरीही
. जवळपास १६० पोस्ट्स लिहून झाल्या आहेत. पुष्कळ लिहीणं होतय… इथे मांडले अनेक अनूभव, आठवणी आणि मतंही !! मात्र ओंजळ अजूनही रिकामी वाटत नाहीये…. अजूनही खूप बोलायचं आहे….. ब्लॉगवर लिहायचं आहे !!
गुरूनाथ सामंतांची नुकतीच एक कविता वाचली….
आकाश तुझ्यासाठी वेडं होइल ….
खाली वाकेल आणि तू नीळा होशील ..
असं लिही ….
आकाश पेलण्याची माझी कुवत नाही , आणि विचारांची तशी काही क्षमताही नाही ….. पण म्हणूनच अजून अजून समृद्ध होता यावं यासाठी तरी वाचायला/ लिहायला हवंय !!
पोस्ट लिहून पुर्ण होताना समाधान लाभतयं तोपर्यंत लिहायला हवंय…. ड्राफ्ट माझा असतो, एकटीचा…. पोटातून आईला नाजूक लाथ मारणाऱ्या बाळासारखा…. तो ड्राफ्ट , पोस्ट होऊन बाहेरच्या जगात कसा वावरतोय हे पहाताना तो मला आणि मी त्याला सांभाळतेय तोवर लिहिण्याला अर्थ आहे !!
(त्याच कवितेच्या पुढच्या ओळी : )
शाई , कागद, शब्द आणि तुही
निमित्तमात्र आहेस
तुझ्यातली चेतना ही भवतालच्या अखंड चैतन्याची
ॠणी आहे
याची सजगता ठेवून लिही…..
हे ॠण मान्य आहे तोवर , या अखंड चैतन्याच्या झऱ्याला सामोरे जावे म्हणतेय ….. चाकोरीबाहेरच्या माझ्या या कागदांना खरडावे म्हणते, आकाशाला वाकवता आले नाही तर निदान दिलखुश गगनाशी उदार गप्पा तरी माराव्याच म्हणते……. वेड्यावाकड्या उमटणाऱ्या, धडपडणाऱ्या, सावरणाऱ्या , स्वत:चेच गीत गाऊ पहाणाऱ्या अक्षरांचं बोट धरत ’सहजच’ म्हणून जे जसे लिहीता येइल ते लिहावे म्हणते !!!



