फुलपाखरू….. (भाग १)

सगळी कामं चटाचट आवरती घेऊन रमा निघाली, दाराला कुलूप लावताना एकीकडे पिल्लूला सुचना देत होती ती… डबा नीट संपव, टिचरचं ऐक…. शाळा सुटली की तिथेच थांब , मी येतेच आहे घ्यायला….पिल्लूला त्याच्या शाळेच्या बसमधे चढवून रमा चटकन सरिता मॅडमच्या घरी पोहोचली.

मॅडम तिची वाटच पहात होत्या…. रमा जरा विसावली क्षणभर. मॅडमनी दोघींसाठी चहा मागवला आणि रमाच्या हातात एक पत्ता दिला.  पुढचे पंधरा दिवस रमाला जायचे होते तिथे. उशीर करून तसेही चालणार नव्हतेच…. पिल्लूची शाळा संपायच्या आत रमाला पुन्हा परतायचे होते.

रोजचे हे हक्काचे तीन तास रमाचे असायचे. या नव्या शहरात सुरूवातीचे काही दिवस रमाला अगदी कठीण गेले… नवी जागा, पिल्लू लहान , ही अडचण नं ती समस्या पण रमा रुळली तिथे… आणि अभयची साथ होतीच तिला. पिल्लू आता शाळेत मस्त एंजॉय करत होते :) … हे रमाचे नव्हे पिल्लूचे मत होते त्यामूळे रमा मात्र सुखावली होती ….. पिल्लूच्या शाळेत एंजॉय करण्याने रमा तिच्या आवडत्या समाजसेवेकडे वळली होती पुन्हा.

सरिता मॅडमची संस्था एक प्रकारे आधारगट चालवत होती, मात्र हे काम जरा वेगळे होते. एकटे रहाणारे वृद्ध किंवा वृद्ध जोडप्यांना काही वेळ देणे आणि तो ही त्यांच्या रहात्या घरातच हे या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट्य होते. तिथे जाउन त्यांच्याशी गप्पा मारणे, त्यांची औषधं आणून देणे, त्यांच्यासाठी पुस्तक वाचणे, त्यांना बॅंकांमधे वगैरे नेणे असली जिकीरीची कामंही त्यात असतं कधी कधी, ही सगळी कामं रमा आणि तिच्या नुकत्याच झालेल्या मैत्रीणी आनंदाने करत.

मॅडमने दिलेला पत्ता वाचताना रमा चमकली क्षणभर…. ’श्रीकृष्ण नगर’ ….ऐकलेले आहे हे नाव तिने याआधि खात्रीने…. कुठे पण?? तसे खूप नाविन्य नाहीये नावात म्हणजे याच गावाचा असेल संदर्भ कश्यावरून…..या शहरात आल्यानंतर खरं तर अधे मधे ते नाव तिच्या मनात डोकवून जायचे…. आज अवचित तेच नाव सामोरे आले अनं रमा गोंधळली.  अर्थात दवडण्यासाठी वेळ होताच कुठे तिच्याकडे… तिने पत्ता पर्स मधे कोंबला आणि गाडी वळवली…. एक अनामिक हुरहूर मनात दाटली तिच्या . आयुष्य रमाला याचसाठी कायम आवडायचे… सकाळी उठताना आपण कामाची यादी करू भलेही पण त्यातली होणार कुठली कुठली हे आपण ठरवूनही भागत नाही :) …आयूष्याचं unpredictable असणं अत्यंत मोहक असतं असं तिला कायम वाटायचं…. गाडीच्या वेगाबरोबर तिचे विचार आज धावत नव्हते तसे, आणि ते धावले असतेही तरी तिने त्यांना रोखून धरले होते……

श्रीकृष्ण नगरच्या पाटीपाशी थांबून तिने पत्ता पुन्हा एकदा वाचला….

पत्त्यातलं घर एक सुरेख बंगली होती…. इथल्या काकुंकडे रमाला यायचं होतं आता, वयाने सत्तरीच्या पुढच्या या काकू खरं तर ऑस्ट्रेलियात त्यांच्या मुलाकडे रहातात. सध्या महिनाभरासाठी एकट्याच भारतात आल्या आहेत ही सरिता मॅडमने दिलेली माहिती रमा आठवत होती. घाईत आपण त्यांचे नाव वाचलेच नाही या विचाराने रमा स्वत:शीच हसली…. यात नवे काय होते म्हणा, हे असे घोळ घालणं रमासाठी कायम होतं…. नावं न विचारणे आणि चुकून विचारलेत तर विचारल्याच्या पुढच्या क्षणी ते विसरण्याचा तिचा हातखंडा होता.

दारावरच्या पाटीवरचं आडनाव पाहून मात्र रमाची खात्री पटली आजचा दिवस काही वेगळा दिसतोय…. तोच भाग आणि तेच नाव, किती वर्षांपुर्वी ऐकलेलं…. कितीही विसराळू म्हटलं तरी काही नावं कोरलेली असतात की काय अश्या विचारातच रमाने दार वाजवलं. तसेही काही आडनावं काही भागात अत्यंत कॉमन असतात , आपण उगा गुंते घालायचे नाहीत असा विचार तिच्या मनात आला…..

या घरात आणि या काकूंकडे आपलं पटेल याची खात्री तिला पहिल्या काही मिनिटातच पटली . स्वच्छ , नीटसपणा आणि साधं पण कल्पकतेने सजवलेलं घरं ही रमाची अत्यंत आवडती बाब, आणि या घरात नेमकं तेच रमाला खूप आवडलं. कामवाल्या बाईकडून घर आवरून घेणं हे एक मोठं काम असतं वगैरे मुद्दे आले आणि तिचं काकूंशी जमून गेलं…. दोन गप्पिष्ट बायका एकत्र आल्या होत्या…

पुढचे तीन चार दिवस भराभर गेले….

त्यांना काय हवेय काय नकोय वगैरे रमा जाणून घेत होती.दोघींच एकमेकींशी ’जमलं’ मनापासून… काही घरात रमाला जमवून घ्यावं लागत असे , इथे अलगद सुर जुळत होते. ’रमा’ तुझं नाव मला कायम आवडायचं … काकू सहज तिला सांगत होत्या. त्यांच्या बालपणीचे किस्से ऐकत, त्यांच्या औषधांची यादी समजावत घड्याळाचा काटा रोज चटाचट पुढे सरकत होता. ” ’चहाचा कप’ आणि गप्पा  ” हे काकूंनी त्यांच्या गप्पांच नाव ठेवलं होतं….

“रमा,  गेल्या कित्येक वर्षात इतकं बोलले नव्हते गं मी, काका होते नं तेव्हा त्यांच्याशी खूप गप्पा व्हायच्या माझ्या , तुझी ती सरिता ओळखते नं मला…. तिला मी म्हटलं होतं तुझ्याकडची बडबडी मुलगी पाठव , तिने लगेच तुझे नाव सुचवले…. मला ’रमा’ नाव आवडतेच आणि, माझ्या फार आठवणी आहेत या नावाशी निगडित….. ” काकूंच्या बोलण्याचा ओघ सुरूच असे.

रमादेखील असं खळखळून किती दिवसानी हसली होती. काकूंच्या बोलण्यात बरेचदा उल्लेख व्हायचा, ’लहान आहेस गं पोरी अजून … ” … रमाला मजा वाटायची तेव्हा. लग्न झाल्यापासून  ती अचानक खूप मोठी झाल्यासारखे वाटवणारे दडपण ती विसरून जायची मग. रमाच्या मनातलं फुलपाखरू मोकळं वाटायचं तिला तेव्हा….

’फुलपाखरू’ … नाजुकसं, सुंदरसं…. रमाने गुपचूप ठेवलेलं होतं त्याला मनात लपवून…. बाहेर काहिही चालू दे , मनात मात्र राज्य त्या फुलपाखराचंच….. :)

रमाला या चहाच्या कपाबरोबरच्या गप्पा खूप आवडल्या होत्या. तिची खूप लहानशी स्वप्न होती नेहेमी,  त्यातलं एक म्हणजे अश्या गप्पा मारणारी सासू… अभयच्या आईला असली स्वप्नाळू कल्पना ऐकवणं जरा अवघडंच होतं.  रमा एका वेगळ्या पातळीवर विचार करणारी आणि अभयची आई एका वेगळ्या… दोघींचे सुर इतर अनेक सासू सुनांसारखे वेगळे असले आणि त्यांच्यात वाद नसले तरी रमाची लहानशी स्वप्न मात्र तिला नेटाने मागे सारावी लागली होती. “सुनेने सुनेसारखेच वागायचे ” हा नियम ऐकून ऐकून रमा नित्य नेमाने गोंधळत जायची….. सुनेकडे फुलपाखरू नसावं बहुतेक , हळुहळू रमाला वाटायला लागलं मग!!! फुलपाखराला बरणीत कोंबलं होतं जणू… मलूल पडलेलं असायचं ते तिथे….. सगळं सुख असलं तरी मोकळ्या हवेत उडणाऱ्या, रंगांची, ताजेपणाची सय व्हायची फुलपाखराला, त्या जिवाची घुसमट व्हायची !!!

” रमा तुझ्या बालपणाबद्दल सांग गं, कुठली आहेस तू?? “  काकूंचा अचानक आलेला प्रश्न होता खरं तर हा !! त्यांच्या आधारगटाचा तसा  अलिखीत नियम होता की जिथे जाल तिथली माहिती विचारायची नाही आणि सहसा आपल्याबद्दल फारसे काही सांगायचे नाही. आज त्या नियमाला मुरड घालून रमाने गप्पा मारल्या….  तिच्या कॉलेजचे नाव काकूंनी परत विचारले, आणि त्या मंदश्या हसल्या. रमा अभयबद्दल, पिल्लूबद्दल भरभरून बोलत राहिली. ती घरी जायला निघाली तेव्हा काकूंनी तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि तिला आशिर्वाद दिला. तिच्या पाठीवर त्यांची बोटं हळूवार फिरली…. त्यांच्या मायेनं भारलेल्या अनपेक्षित कृतीने रमा सुखावली. आज काकू बोलल्या नाहीत फारश्या, उलट मन लावून आपलं बोलणं ऐकत होत्या असं वाटलं तिला.

पंधरा दिवस चटकन संपले … काकूंचा निरोप घेणं रमाला जड गेलं. शेवटच्या दिवशी काकूंनी आग्रह केला म्हणून अभय आणि पिल्लूही त्यांना भेटायला आले. तिघांनी वाकून काकूंना नमस्कार केला. किती बोललं गेलं असलं तरी गप्पा कितीतरी मारायच्या राहिल्याच होत्या, काकूंबद्दल अजून किती जाणून घ्यायचे होते, त्या गप्पा पुढच्या भेटीत असे दोघींनी ठरवले :)

पुढच्या दिवशी काकूंचा मुलगा, सुन आणि नात येणार होते. ते सगळेच परत त्यांच्या मुक्कामी परतणार होते.

रमाला आता एखाद दोन दिवस सुट्टी आणि मग पुढच्या काकू किंवा काका-काकूंकडे जायचे होते. :)

……………………

 

फुलपाखरू भाग २ इथे आहे !!

फुलपाखरू….. (भाग २ )

(पहिला भाग इथे आहे. )

पुढचे काका- काकू , आणि मग त्याच्या पुढचे काका किंवा नुसत्या काकू …. दिवस पुढे सरकत होते. पिल्लूच्या शाळेतला अभ्यास वाढत होता…. अभयच्या ऑफिसमधलं कामंही छान चाललं होतं. रमाला निवांत वेळ हाताशी कमीच लागत होता तसा . कधीतरी चहाचा कप आणि जरा सवड हातात एकत्र आली की त्याबरोबर काकूंची आठवण मनात आल्याशिवाय रहायची नाही. सरिता मॅडमला काकूंबद्दल विचारू हा विचार मनात यायचा आणि मग घाईत ते राहून जायचे…..

त्यात पिल्लूच्या शाळेला सुट्ट्या लागल्यानंतर रमाच्या सासूबाई तिच्याकडे रहायला आल्या…. ’समाजाची कशाला हवीये सेवा , त्यापेक्षा एखादी नोकरी करावी ’ हा विचार रमाला येता जाता कानी पडायला लागला. रमाने त्यांचे बोलणे मनावर न घेता त्यांच्याशी संवाद साधायचा नेहेमीचा प्रयत्न चालवला होता. सगळं म्हणायला सुरळीत चाललेले होते.

एक दिवस मग ते सगळे या भागातल्या प्रसिद्ध साड्यांच्या दुकानात गेले होते…. या शहरात आल्यापासून अभय रमाला कित्येकदा तिथे चलण्याबद्दल म्हणत होता, रमाने ते कायम टाळले होते. आज सासूबाईंची इच्छा म्हटल्यावर रमाला जावेच लागले….. अनेक साड्यांची खरेदी झाली…. एकीकडे ती स्वत:, मधे अभय आणि दुसऱ्या बाजूला सासूबाई बसलेल्या होत्या…..  रमाला वाटले नात्यांची ही एक साडीच आहे ही, सासूबाई मुख्य साडी , अभय जोडणारा धागा आणि आपण काठाला उभे आहोत….

साड्यांच्या राशीतून एक बेंगनी रंगाची, हिरवे सुरेख नाजूक काठ असलेली साडी रमा हातात घेउन पहात होती. तिच्या मनातल्या फुलपाखराचे आवडते रंग….जांभळा रंग आणि हिरवे काठ असलेलं जरतारी फुलपाखरू….  तिच्या सासूबाई फणकारल्याच तितक्यात, काय तरी साडी निवडलीस गं रमा, वेगळच काहितरी शोधतेस नेहेमी ….. भिरभिरणारे फुलपाखरू बिचकले, पुन्हा कोषात गेले :(

” ती साडी घेऊयात तूला “, असे अभयने म्हटल्यावर मात्र तिने नकार दिला….

रमाच्या मनात एक विचार चमकला परत येताना , जुनी रमा असते नं मी तर आत्ताच्या आत्ता सासूबाईंना अर्धा तास डिवोर्स दिला असता … बोललेच नसते… बालिश इलाज होता तिचा हा… कट्टी नाही म्हणायची ती, डिवोर्स म्हणायची …. तिच्या कॉलेजमधे सगळे हसायचे तिला या शब्दाबद्दल. जुन्या आठवणी तरळल्या मनात आणि तिला वाटलं ’लहान आहोत आपण .. पिल्लूयेव्हढे किंवा जरासे मोठे ’ …. अधेमधे असे बालिश वागता येण्यासाठी तरी काकूंसारखी सासू हवी होती मला…. वयानेच नाही तर खरंखूरं मोठेपण असणारी….  मनात विचार आला खरा पण त्या विचारासरशी रमा चपापली. तिने सासूबाईंच्या हातातले सामान घेतले आणि ते सगळे घराकडे निघाले…. नाजुकश्या पंखाची उघडझाप झाली क्षणभर मनात आणि पुन्हा ते उदास मिटले ……

सासूबाई गावी गेल्यानंतर पुढचे जवळपास आठ -दहा दिवस रमाला सरिता मॅडमकडून फोन आला नव्हता… पिल्लूच्या शाळेची सुट्टी संपून शाळा सुरु झाली. रूटिन सुरू….

रमा घरातली कामं आवरत असताना बेल वाजली , सरिता मॅडमकडून तिच्यासाठी काही सामान आले होते.

पार्सलमधल्या एका पाकिटात एक पत्र होते रमासाठी…. रमा पत्र वाचू लागली आणि नकळत डोळे भरून वहायला लागले तिचे….तिच्या काकूंचे पत्र होते ते…

रमा वाचत गेली ओळींमागे ओळी…..

” प्रिय रमा, …….तुझ्या काकांनी निवडलेली आणि मी तुझ्यासाठी खरेदी केलेली भेट पाठवतेय…. काका म्हणू की सर म्हणू गं… तू सर म्हणायचीस नं त्यांना… तुझे लाडके सर… आणि सरांची लाडकी विद्यार्थीनी तू. आधि तू हरहून्नरी मुलगी म्हणून आवडायचीस त्यांना, मग त्यांना तुझ्यात त्यांची सुन दिसली म्हणून तू अजून लाडकी झालीस. मला घरी तुझ्याबद्दल सतत सांगत ते.  एकूलता एक मुलगा त्यांचा आणि अनेक स्वप्न… सतत म्हणत मी आणि माझी सुन मस्त पेपर वाचन करणार सकाळी , एक चहाचा कप हातात हवा आणि भरपुर गप्पा. मला सुन नकोय , मुलगी हवीये…. मला तर सक्त ताकिद होती, सुनं म्हणायचं नाहीस कधिही तूला…. तू मुलगी आमची. :)   तूला पहायला येऊ असे ठरवलेही मी पण राहूनच गेले ते…. मग आमची आमच्याच गावी पुन्हा बदली झाली … तुझं शिक्षण पुर्ण झाल्यावर तुझे सर निघालेही होते तूला मागणी घालायला पण तोपर्यंत तुझे आणि अभयचे लग्न तुम्ही ठरवलेले होते. ते हिरमूसले , म्हणाले मी आधि बोलायला हवे होते….

आमच्या मुलाचे लग्न होइपर्यंत ते काही थांबले नाहीत बघ पण !! मी ही निघालेय आता त्यांच्याकडे…. तू अशी अचानक सामोरी आलीस, सगळे संदर्भ जुळले. त्यांची मुलगी मला भेटली हे त्यांना सांगेन न विसरता…..  “

रमाच्या मनात तिचे सर तिच्याशी बोलत होते, सरिता मॅडमने सांगितलेल्या त्या भागाच्या नावाने, त्या घरावरच्या पाटीने मनात दाटलेली हुरहूर तिचा अर्थ समजावत होती… आठवणींची दाटी होत होती…. अभयशी लग्न ठरताना मैत्रीणींची ’रमा अगं लग्न एकाशी नसतं गं होत, संपुर्ण घर येत नं त्यात , त्या घरात कशी रमशील तू ?? त्याच्या आईच्या हेकट वागण्याकडे कानाडोळा का करते आहेस ?? “  वगैरे वाक्य रमाच्या मनात डोकावत होती….. वेडं फुलपाखरू घायाळ होत होतं…. काय कमावलं काय गमावलं हे हिशोब फुलपाखराला येतच नव्हते, आणि मांडायचेही नव्हते …. एक सल मनात उमटत होती तिला नाव मात्र त्या बिचाऱ्याला देता येत नव्हते…..

पत्र हातात ठेवून बराच वेळ रमा बसून होती… त्या पत्राबरोबर एक लहानशी चिठ्ठी होती …

” रमा, सासूबाईंनी हे पार्सल आणि पत्र तुझ्यासाठी ठेवले होते…. त्यांच्या शेवटच्या काही इच्छांपैकी एक की हे पत्र तूला पोहोचवावे. ….. तुझ्याबद्दल खूप बोलल्या त्या, अगदी आनंदी होत्या जाताना ….. “

काकूंच्या सुनेने तिचा पत्ता आणि फोन नंबर दिलेला होता. त्या कोण होत्या हे समजल्यावर,  आता त्या आपल्यात नाहीत हा विचार रमाला अजूनच कष्टी करत होता.तिचे डोळे सारखे भरून येत होते…..

सोबतचे पार्सल उघडले रमाने…. त्यात एक सुरेख साडी होती….. बेंगनी रंगाची, हिरवे नाजूक काठ असलेली……… तिचा मऊसूत अलवार स्पर्श रमाच्या हातालाच नव्हे तर मनाला झाला आणि आधिच वहाणारे डोळे अजूनच भरून येउ लागले.

त्या साडीकडे रमा एकटक पहात राहिली….. बेंगनी साडीवर त्याच रंगाचं फुलपाखरू गोल गोल फिरत राहिलं…………

मैत्र…. (भाग २)

मैत्र भाग १…

” आज ना मला  माझ्या लेकाबद्दल बोलायचेय रे…. ” ती सांगत होती…

“असली सुरूवात….एकदम मुद्दाच ….. म्हणजे आजचा एपिसोड हा सामाजिक नसून पारिवारीक आहे असे दिसतेय… त्यातही लेकाबद्दल,  त्याशिवाय झाशीची राणी हत्यारं म्यान करून अंगाई गीत गायच्या नाहीत….. अगं मला वाटलं इथे एव्हाना कोणितरी प्रचंड रागावलेले असेल… मी तर त्यादृष्टीने तयारी पण करून आलो होतो… तुझी लाडकी भेळ आणि मोगऱ्याचे गजरे आणलेत बघ ” तो हसतच बोलला….

” अरे वा भेळ आणि गजरे… एक मला आणि एक बायकोला ना!!! :) पण बोलू देत आज मला आधि…..अगदी बरोबर आहे रे तुझे…  हळवी झालेयं मी हे खरयं….. तूला माहितीये ना माझा नवरा कसा आहे??? ” …..ती

“न–व–रा sssssss!!!! अगं बाई माझी त्याचं काय??? त्याने काय केलय आता??? ” तो जवळपास ओरडलाच…..

दोन वर्षापुर्वीची त्यांची भेट आठवली त्याला अचानक… दुसऱ्या दिवशी ती एका वकिलांकडे जाणार होती… तिच्या एका जवळच्या नातेवाईकांनी आपल्या मुलाच्या मानसिक आजाराबाबत माहिती लपवून त्याचे लग्न लावून दिले होते…. लग्नानंतर झाला प्रकार उघडकीस आल्यावर त्या मुलीने घटस्फोटाचा अर्ज दिला होता…. आम्ही मुलीला पुर्ण कल्पना देणार आहोत असे हिलाही त्या नातेवाईकांनी कबूल केलेले होते पण प्रत्यक्षात मात्र त्या निरागस मुलीची फसवणूक झाली होती….. त्यावेळी आपल्या दिर-जावेच्या विरोधात जाऊन हिने त्या मुलीला पुर्ण मदत केली होती….. नंतर पुतण्यालाही त्याची ट्रीटमेंट घेण्यात मदत केली होती… पण आधिच सासरी नावडती असणारी ही मात्र या प्रसंगानंतर अजुनच मनातून उतरली होती…..

आपण तिला भेटून सांगितलेही की उगाच लोकांच्या भानगडीत पडू नकोस…. काहिही झाले तरी खरं वागणे बोलणे सगळ्यांनाच नसते पटत हे त्याचे मत होते!! पण नेहेमीप्रमाणे ही आपला मुद्दा पटवून गेली होती….. पण यावेळेस एकदम नवऱ्यावरच हल्ला आहे म्हटल्यावर तो गोंधळला…..

“चूप!!!  ओरडतोयेस काय??? नवऱ्याबद्दल असे की एरवी तो ढीग चांगला असला तरी त्याची काही मतं जाचक वाटतात आम्हाला…. त्याच्या काही समजूती आम्हाला पटत नाहीत… एरवीचे त्यांच्या घरचे देव देव करणे वगैरे, जाती पातींबद्दल बोलणे मला पटत नसले तरी मी ऐकते बरेचदा पण आता माझ्या मुलाचा प्रश्न आहे तेव्हा मी काहिही ऐकणार नाहीये….. त्याविषयावर आहे आजची आपली चर्चा!!! “……

“बोला आता.. ऐकतोय मी…..” …. तो म्हणाला…

“तरं बघ झालयं असं की माझा लेक प्रेमात पडलाय :) आणि आता ही बातमी त्याच्या बाबाला सांगून बाबाचे या विषयावरचे मतं मला जाणून घ्यायचे आहे…. आधि तूझ्याशी बोलूयात म्हणून तुला बोलावले आहे….. ” ती

” अगं मोजून साडेबावीस वर्षाचा आहे ना तुझा लेक…. नुकताच हापिसात जातोय… त्याला सांग करियर कर ना जरा आधि!! कसली घाई आहे एव्हढी??? …..बरं मुलगी कोण आहे? तू भेटलीयेस का तिला??? डोळे उघडे ठेवलेस की चिरंजीव दाखवताहेत आणि तुम्ही त्यांच्यासाठी म्हणून जपलेला हळवेपणा उधळलात??? तिचं शिक्षण काय? आई-वडिल कसे आहेत? काय आहेत? अगं खूप मुद्दे असतात गं…..  आणि तुझ्या त्या कार्ट्याला बापाला सांगता येत नाही का डायरेक्ट काही… बाप काही अगदी हिटलरच आहे का त्याचा….” तो बोलतच राहिला ..

“अरे जरा दम घे… आणि माझ्या नवऱ्यासारखे बोलणे बंद कर आधि!!! हे बघ मुलगी सुंदर आहे… माझ्या लेकाईतकीच शिकलेली आहे….. ते दोघे एकमेकांना गेली २ वर्ष ओळखताहेत आणि मी तिला गेले सहा महिने ओळखतेय….फक्त…. ” ती सांगत होती,

“सगळं ठरलयं म्हणजे मायलेकाचं मग बापाची गरज काय तुम्हाला??? आणि ’फक्त..’ काय आहे?” तो

“फक्त असं की मुलगी एकुलती एक आहे आणि तीचे आई-वडील तिच्यावर अवंलबून आहे्त….. आणि ’जात-पात’ या आघाडीवर थोडा घोळ आहे… त्यांची जात वेगळी आहे…. आता हे सगळ्ं मला नवऱ्याशी बोलायचं आहे….. म्हणजे बघ तसं ८०% ठरलयं सगळं पण उरलेले २० % संमती मिळाली की झालं!!!” तीने सांगितले….

“८०% —- २०% हे काय? आणि तुझा नवरा जात मानतो…ही माहिती नवी आहे बुवा… ” तो मिश्किलपणे म्हणाला…. त्याला आता आजच्या तिच्या हळवेपणाची गंमतही वाटायला लागली होती…. एरवी कितीही धिटुकली असणारी आपली मैत्रीण मुलाचा मुद्दा आला की टिपीकल आईच असते हे माहित असलेले सत्य तो पुन्हा अनुभवत होता…..

“म्हणजे मी, माझा लेक आणि अबोली हे तयार आहेत तेव्हा ८०% आणि माझा नवरा आणि तिचे आईवडिल हे उरलेले २०%…. म्हणजे मेजॉरिटी विन्स हा न्याय आहे इथे…. तिच्या आई-वडिलांची जरा कुरकुर आहे….. तेव्हा माझ्या नवऱ्याने त्यांना समजवायचे अशी आमची अपेक्षा…. सगळे हवेत ना रे आणि ते ही मनापासून…. नाहितर त्रास होतो रे …..” ती म्हणाली…

:) मला आवडली ही ८०%-२०% ची थेअरी….. माझा रोल काय आहे आता यात?? “

“हे बघ मी काही इथे प्रश्नपत्रिका सोडवायला आलेले नाहीये… तू ठरव ना काहीतरी….. ” हळवेपणाचा त्रागा होत होता आता….

“वेडाबाई अग्ं ईतका का कठीण करते आहेस हा पेपर…. मी आधि तुमच्या त्या ’अबोली’ ला भेटतो मग ठरवतो पुढचे काय ते…. आणि तुझ्या नवऱ्याची काळजी करू नकोस ते माझ्याकडे लागलं….. लव्ह मॅरेज असलं तरी ते शक्यतो एका जातीतच असावं हे त्याचं मत मलाही पटतयं कारण त्यामूळे ’आमच्यात असं तुमच्यात तसं’ असले लहानसहान मुद्दे वादाचे कारण कमी होतात…. तरिही आपली मतं मुलांवर सगळीकडेच तो लादणार नाही गं!!! तो कडक वागतो कारण घराची घडी बिघडू नये… तुम्ही तर त्या बिचाऱ्याला अगदीच वाईट ठरवायला निघालात :( ……. तूला एक सांगू का आज तू डिट्टो माझ्या बायकोसारखी वागते-बोलतेयेस… वो मेरी ’मैत्रीण’  आज दिखाई नही दे रही है!! तुझा फोन आला तेव्हा मनात धाकधूकच होती माझ्या पण आज तर इथे एकदम घरगुती प्रश्न होता….  ” तो बोलता बोलता हसत होता आता….

त्याच्या हसण्यात ती ही सामिल झाली मग… “मला नक्की कसलं ओझं वाटतं होतं ते कळतं नव्हतं रे….. म्हणजे हे सगळं नवऱ्याला सांगायचं की आता लेकाचे लग्न होणार, तो थोडा दुरावणार…. समजत नाहिये पण चलबिचल होतीये बघ मनात… म्हणजे सतत संमिश्र भावना…. खूप आनंद होतो मग काहितरी हुरहूर…. आता छान वाटतयं …. तुझ्याशी बोलायचं होतं मला आज……” ती मग बोलतच राहिली खूप खूप काही…. मुलाचं बालपण, त्याचं शिक्षण, नवी सुनं, तिच्यासाठीचे दागदागिने….. विषयाला वाट फूटेल तसे ते वहात होते…. मधेच ती अचानक ओरडली, ” ए मी बेटातल्या अरूणा ईराणीसारखी सासू होईन की डोली सजाके रखनातल्या मौशमी सारखी…. मला दोघी आवडतात!!! :)

आता हिची गाडी आलीये रूळावर त्याच्या लक्षात आले… “भेळ खाऊया का की बडबडीवरच पोट भरायचेय..” तो तिला थांबवत म्हणाला….. भरपेट गप्पा मारून ते निघाले… निघताना तो म्हणाला, ” तुझं पण वय झालयं आता!!! ;) ” ती चक्क न चिडता नुसती हसली.

गाडीपाशी पोहोचताना तिने पटकन मोबाईल काढून ’Done :) ‘ असा एक sms पाठवला….. गाडीत त्याने टेप लावलेला होता, किशोर गात होता… “फिर वही रात है!!!” तिचे अत्यंत आवडते गाणे…. ती त्याला नेहेमी म्हणायची कायम माझी लाडकी गाणी लावतोस तूला आवडी निवडी नाहीत का रे…. तो म्हणायचा, “मला तू आवडतेस!!! :)

घरी पोहोचले ते….. तिचे मस्त आल्याचा चहा केला… त्याच्या हातात कप देऊन ती काही कामाने किचनमधे गेली…तेव्हढ्यात दार उघडून तिचा लाडका लेक आला दारातूनच ओरडला, “माँ मी आलोय….” …. टीपॉयवर वाफाळत्या चहाचा कप पहाताच लेकाने आनंदाने तो उचलला…..

आत्तापर्य़ंत शांत बसलेला तो ओरडला, ” कप खाली ठेव तो चहा माझ्यासाठी आहे!!!”

तीदेखील आतून ओरडली, ” पिल्लू आधि हात-पाय धूवून ये मग चहा देतेय!!”

“This is not fair aai….. बाबासाठी वेगळे नियम आणि आम्हाला वेगळे असे का ??? तो पण ऑफिसमधून आल्यापासून इथेच बसलाय ना!!!”

लेकाला अडवत तो म्हणाला, ” ’अबोल’ पणे कप देतोस की ८५% चे पुन्हा ८०% करू???? :)

आपल्या बाबाच्या डोळ्यातले मिश्किल भाव पहाता त्याला मगाशी आईने पाठवलेला sms आठवला….. बाबा आपल्याकडे मायेने पहातोय की चिडवतोय समजत नाहीये पण डोळे भरलेले दिसताहेत त्याचे….. लहानपणी आपण कधी खोटं बोललो, गृहपाठ केला नाही की बाबा चिडायचा पण आई नेहेमीच काहितरी जादू करायची मग बाबा असाच पहायचा आपल्याकडे….. लेक चटकन मिठीत शिरला बाबाच्या… लहानपणी शिरायचा तसा……

एव्हाना ती किचनमधून बाहेर येऊन उभी राहिली होती… तिच्याकडे पहात ते दोघेही म्हणाले, “Love u!!!”

ती हसतच म्हणाली, “Love u ‘two’ !!!”

मोगऱ्याचे दोनही गजरे तिने माळले होते तेव्हा……

मैत्र…..

त्याची मिटिंगला जायची तयारी जवळपास पुर्ण झाली होती…. सगळ्या फाईल्स वगैरे पुन्हा तपासत असतानाच त्याचा फोन वाजला….. कपाळाला जरा आठ्या पाडतच त्याने फोनवर नंबर पाहिला….. नंबर त्याच्या ओळखीचाच होता….. तरिही त्याला आश्चर्य वाटले, हिचा फोन आत्ता… हे कसे काय बुवा??? जवळपास २ वर्षानी तिने त्याला फोन केला होता…..

गेल्या जवळपास पंचवीस वर्षांची मैत्री होती त्यांची…… लग्नापुर्वीची!!! लग्न, बदललेल्या नौकऱ्या, मुलंबाळं , त्यांची शिक्षण सगळे अडथळे पार करतही तशीच टिकलेली!!! तो मात्र तिला अगदी क्वचित फोन करायचा….. तिचे तसे नव्हते…..अधुनमधून फोन करून ती त्याला भेटायला बोलावून घ्यायची!!!

त्याची बायको मात्र त्याला शक्यतो ऑफिसमधे फोन करत नसे….ती स्वत: जॉब करत असतानाही तिला घरून विनाकारण कोणी फोन केलेला आवडत नसे….. एथिक्स वगैरे मुद्दे ठाम असायचे तिचे… पण  ही मैत्रीण म्हणजे एक वेगळेच रसायन होते…..  मी वाटेल तेव्हा फोन करणार हा मैत्रीचा हक्क तिने राखून ठेवला होता….

विचारातच त्याने फोन उचलला………. “बोला मॅडम आज अचानक पामराची आठवण केलीत….. काही विशेष ??? ” तो म्हणाला…

“हो रे , मला भेटायचयं तूला…. बोलायचयं महत्त्वाचं… ” ती म्हणाली.

“ठीक आहे मला आत्ता एक मिटिंग आहे , ती आटोपतो आणि तूला बागेत गाठतो… चालेल ना!!”…. त्याने विचारले.

तिची परवानगी घेऊन फोन ठेवताना त्याच्या मनात पुन्हा विचार आले, आता या बयेने काय नवा पराक्रम केलाय राम जाणे!!! ’बिन्धास्त’ हे एकमेव विशेषण त्याने आणि त्यांच्या ग्रूपने तिला दिलेले होते…. मनात येईल ते बोलणे…. तूफान चांगले वागणे…. रागावली की तोंडाचा पट्टा सोडणे…. खरेदी तर जीव की प्राण होता तिचा….. उत्स्फुर्त असे तिचे वागणे त्याला कायम आवडायचे….. अश्याच कुठल्यातरी तिच्या बडबडीनंतर त्याने तिला वचन दिले होते की मी आयुष्यभर मित्र राहिन तुझा… तू हाक मारलीस की मी येणारच…. :) …… आपली बायकोही तर अशीच होती नाही लग्नाआधि, प्रपंचातल्या अनेक जबाबदाऱ्या , मुलं , आपल्या घरच्यांच्या वेळोवेळच्या टोमण्यांमधे ती कुठेतरी हरवत गेली असे वाटते कधी कधी….. पुन्हा एकदा दोघिंची तुलना मनात झाली त्याच्या…..  त्या दोघिंचीही  रूपं त्याला अतिशय आवडती होती एकीचे मनमोकळेपणं आणि एकीचे समंजसपणं….. .

एका मागोमाग एक येणारे विचार त्याने मागे सारले आणि मिटिंग गाठली….. मिटिंग आटोपून तो लगेच बाहेर पडला….. ट्रॅफिकच्या भाउगर्दीतून तिच्यापर्यंत बागेत पोहोचताना त्याला उशीरच होणार होता….. ती आपल्याआधि पोहोचली असणार आणि आपल्याला जसजसा उशीर होईल तसतसा पारा चढत असणार तेव्हा बचावासाठी त्याने वाटेत थांबून तिच्यासाठी तिची आवडती भेळ पार्सल करून घेतली….. बागेपाशी पोहोचला तर मोगऱ्याचे गजरे विकणारी बाई दिसली त्याला….. त्याने पटकन दोन गजरे घेतले…. आता तिचा राग आवरणे सोपे काम होते त्याच्यासाठी अगदी!!!

एका डेरेदार झाडाखाली ती बसलेली दुरूनच दिसली त्याला…. समोरच्या झाडाकडे आणि तिथे खेळणाऱ्या मुलांकडे तन्मयतेने पहात असलेली ती!!! अजिबात बदलली नाहिये ही असा मनात विचार करतच तो तिच्या बाजूला जाऊन उभा राहिला आणि तिच्या कानात जोरात तिचे नाव ओरडला…..

दचकून तिने पाहिले आणि ओरडली, ” शोभतेय का रे गधड्या असले उद्योग… अरे गेल्या महिन्यात वयाची पंचेचाळिशी ओलांडलीस ना!!! लहान आहेस का ८-१० वर्षाचा उगा बालिशपणा आपला….”

तो हसला, तिच्याशेजारी बसत म्हणाला, “बोल आता बये काय झालयं , कशाला बोलावलेस असे अचानक…. ठीक आहे ना सगळे… की आपणच वाढवा केलात काही ??? “

“चूप रे , बोलायचेय महत्त्वाचे जरा…. ”  आणि ती सांगू लागली…..

क्रमश:

(तळटीप: ब्लॉगवर पहिल्यांदाच कथा टाकतेय… मला स्वत:लाच क्रमश: प्रकार आवडत नाही … तेव्हा निषेधाला सुरूवात माझ्यापासूनच… :) …. कंटाळाही आलाय टायपायचा आणि पाल्हाळ न लावेन तर मी कसली… मग वाचकांच्या सहनशक्तीच्या मर्यादा लक्षात घेता आज ईतकेच वाचन पुरे… बाकि उद्या!!! )