परवा पाहूणे येणार म्हणून आधि घर आवरलं…… “सगळं जागच्या जागी ठेवा, अजिबात ” पसारा “ दिसता कामा नये!!! “चा नारा लावत काही घरच्यांकडून आवरून घेतलं पण ’यांचा ” पसारा ” आवरणं म्हणजे फक्त तो फक्त एका जागेवरून उचलून दुसरीकडे ठेवणं’ ची तक्रार करत बरचसं स्वत:च आवरलं!!! ……
सगळं घर मनाजोगतं जागच्या जागी (म्हणजे मुलंही निदान देखाव्यापुरते आणि दोनेक मिनिटच एका जागी बसलेले) असल्याची खात्री करत पाहूण्यांना दार उघडलं गेलं…. पाहूण्यांच स्वागत झालं, त्यांना घरं दाखवताना सवयीने डायलॉग उच्चारला गेला ,” पसाऱ्याकडे दुर्लक्ष करा हं, घरात दोन लहान मुलं आहेत नं!!! ” …. आमची आई जेव्हा असं काही बोलायची तेव्हा किती राग यायचा, वाटायचं सगळा पसारा काय आम्हीच घातलाय??? …. ” हे घर आहे हॉटेल नाही… सतत तुझं पसारापुराण सुरू असतं….. कोणाकडून घरी आलं की हिचं सुरू होतं ’बघा त्यांच घर कसं लख्ख आवरलेलं असतं नाहितर आपल्या घरात तुम्ही कायम पसारा घालता ’…. ” वगैरे वाक्यांकडे मी हल्ली दुर्लक्ष करायला शिकलेय….. नाही सहन होत आपल्याला घर पसारलेलं म्हटल्यावर नाईलाज होतो बरेचदा….
तर आलेले पाहूणे गेले…. रात्र होता होता घरं पुन्हा आवरलं गेलं…. हॉल किचन पुन्हा एकवार नजरेखालून घातले गेले…. किचनचा ओटा हा एक महत्त्वाचा मुद्दा असतो…. तो किती वेळा पसारतो न किती वेळा आवरला जातो याचा हिशोब मांडायचाच नसतो, पण तो जर स्वच्छ आवरलेला सकाळीच दिसला की दिवसाची सुरूवात मस्त होते यावर तमाम स्त्रीवर्गाचं एकमत होईल…… तर सगळी आवराआवर आवरून ” देहाचा पसारा ” निद्राधिन झाला….
मधे केव्हातरी जाग आली , लेकीला तहान लागली होती ती पाणी मागत होती!!! जाग आल्यावर क्षणभर अजिबात समजेना आपण कुठे आहोत….मेंदूच्या आठवणींच्या राज्यात दूरचे कुठलेतरी चॅनल लागलेले असावे…… इथला रिमोट कंट्रोल काही आपल्या ताब्यात नसतो गड्या या विचाराने हसत लेकीला पाणी दिले… आईच्या अंगावर हात टाकून कन्यारत्न तर निर्धास्त झोपलं पण माझ्या मनात विचारांचा ” पसारा ” ठेवून….
विचारांचा ” पसारा ”
…. नुसता शब्द आला मनात आणि गंमत वाटली….. खरचं कुठे होते मी, जून्या कुठल्यातरी गावात, आमच्याच एका घरात …. गणपतीचेच काहितरी विचार होते मनात बहूधा!!! आठवलं तर आपण कुठे हरवलेलो होतो….. नेहेमी तर तीच एक पंचाईत होते, उठण्याआधि नक्की कोणता विचार मनात होता ते ही आठवत नाही….. बरं मनातल्या मनात आपण नक्की कुठे होतो पेक्षा तिथे “का” होतो हा ही एक उपप्रश्न असतो खरं तर, जो की मी हल्ली स्वत:लाच विचारत नाही. आपलं मन केव्हाही कुठेही असू शकतं हे एकदा स्वत:शीच मान्य केल्यावर “concentration ” नावाची ब्याद आपल्याच्याने होत नाही हा वैताग कमी होतो!!!
मजा आहे पण नाही….. मन कुठेही असतं म्हणजे “कुठे असतं??? ” …. मूळात कुठेही जाऊ शकणारं हे मन बेटं नक्की कुठे असतं हेच ज्याला माहित नाही ती व्यक्ती मन त्याच्या निर्धारित जागेवर नसून इतरत्र भटकतय हा दावा कसा ठोकते……
बरं समजा आज मी “मनाचे भटकणे ” (कसलं आत्म्याचे भटकणे टाईप वाटतयं न्ं!!) यावर मनोवैज्ञानिक चर्चा करायची नाही असं ठरवलं (म्हणजे तसंच ठरवावं लागणार , कारण तशी चर्चा करायची ठरवलं तरी इथे तेव्हढा वकूब कोणाचा आहे, तेव्हा मला नाही बूवा करायची चर्चा!!
) तरी मनाने मनातच किती ” पसारा “ घातलाय याचा अंदाज आला मला….. आईशप्पथ म्हणजे हा पसारा माझ्या पाचवीला पुजलाय की काय…. घरातला आवरला की मनात “उभा” की हा!!!
गेल्या तेहेतीस वर्षातली पहिली तीन सोडली समजा तरी उरलेल्या तीस वर्षांचा पसारा…. स्वत:ला न्हाऊमाखू घालणाऱ्या मावश्यांपासून ते माझ्या मुलांच्या मावश्यांपर्यंतच्या प्रवासातले “रिश्तों का ईल्जाम” दिलेलीही आणि न दिलेलीही तमाम मंडळी ते आजवरच्या आयूष्याच्या प्रवासातली अनेक गावं असोत की तिथली घरं असोत की अनेक अनेक प्रवास असो…… वस्तू, खेळणी, कपडे, पदार्थ त्यांच्या रेंगाळलेल्या चवी….. स्वत:ची, इतरांची आजारपण….. स्वत:च्याच काय पण लोकांच्याही सवयी (
)….. सुखाचे क्षण…..अनेक मतं,भलेबूरे अनूभव…… अरारारा आठवू पाहिलं तर जाणवलं मनात काय कमी पसारा नाय बा माझ्या…. उलट तिथं जास्त घोळ आहे!!!
विश्वाच्या अनंत “पसाऱ्यातलं “ माझं अणूरेणूपेक्षा लहान मन, स्वत:मधे एक स्वतंत्र “विश्व ” थाटून बसलय…… विदाउट तिकीट फिरतं मग बेटं स्वैर कुठेही…..
रात्रीपासून सकाळपर्यंत लौकिकार्थाने झोपलेलं हे त्रासदायक “मनं” घेऊन खरच आपण कितीवेळा निवांत झोपलोय हा एक नवा प्रश्न आहे!!! ” सकाळ कधी झाली कळलचं नाही ” या सदरात मोडणारी झोप रोज कुठे असते??? ….. आणि रात्र कशाला , दिवसाही कामाच्या व्यापात असो की कोणाशी बोलताना असो हे ’मन’ तिथेच असेल कश्यावरून ??? आणि जर माझं मन कोलांटउड्या मारत असेल तर समोरच्याचं मन “घसरगुंडी’ खेळत नसेल कश्यावरून ???? का त्या बापड्याच्या मनात त्याच्या वाटचा ’पसारा ’ नसेल????
का मग हा मनात असा ” पसारा ” असणं ….. मनाला फिरायला जागा असणं , कधी कधी इतकी की त्या गुंत्यात मनाने हरवून जात असावं …घरात कसा ” पसारा “ आवराताना कधीकाळी एखादी डाव्या हाताने ठेवलेली वस्तू अचानक सामोरी येते आणि आपण विचारात पडतो ,’इथेच होती की ही
’ …. तसं एखादी मागे पडलेली लहानशी मस्त आठवण मनाच्या पसाऱ्यात अलगद वर यावी आणि आपण “दिन बन गया’ म्हणावं…… भटकायला नव्या जागांना “जागा ” देण्याची मनाची तयारी असणं हेचतर जिवंतपणाचं, आयूष्याला समरसपणे भिडण्याचं लक्षण नसावं
और वैसे भी आपण ढीग मनाची स्वच्छता मोहीम आखू, तिथला ” पसारा ” आवरू पण त्यासाठी हा अदृष्य अवयव हाती तर लागायला हवा!!!
असतो किनई विचारांचा ” पसारा ” , आठवणींचा ” पसारा ” , मतमतांतरांचा ” पसारा ” , रागाचा ” पसारा ” , लोभाचा ” पसारा ” ….. षडरिपूनामक भारदस्त नाव असलेल्या भावभावनांचा ” पसारा ” …… सामान्य़ माणूस तरी निदान हावरटच नाही का , नव्या वस्तूंची खरेदीही संपत नाही नी नव्या ओळखीही थांबत नाहीत….. मग नवे अनूभव नी जुन्या ” पसाऱ्याला ” भर
विचार खूप येतात नाही माणसाच्या मनात (बाईच्याही मनात … नाही तर माझ्या मनात नसते आले
… पांचट आहे जोक, दुर्लक्ष करूया!!!! ) …… एक विचार मग असा आला की एक सुर्य, एक पृथ्वी न एक चंद्र पुरेसे होते की पण साक्षात ब्रम्हदेवाला तरी कुठे आवरलाय विश्वाचा पसारा …. हजारो सुर्य आहेत ’म्हणे’ !!!! अगणित ग्रह नी चंद्रही असावेत….. आपल्यासाठी त्यांचे अस्तित्व चांदण्यांयेव्हढे….. तसंच आहे की मनाच्या पसाऱ्यातही…… प्रत्येकजण एक ’सुर्य’ नी त्याची त्याची स्वतंत्र ग्रहमालिका….. त्यापलीकडे सगळे चांदण्यांसारखे कमीअधिक लु्कलूकणारे तारेच की…. म्हणजे जोवर आपलं अस्तित्व आहे तोवर आपल्या कक्षेत इतरांनी फिरायचं नी त्याच वेळेस कोणाच्या तरी कक्षेत कमीअधिक अंतरावर फिरत आपणही स्ट्रॉंग पसारा मटेरियल व्हायचं!!!
आयला शिंपल हाय की लॉजिक…..
….. शेवटी काय आपला दोष नं कश्यातच नसतो म्हणजे कोणामूळे तरी आपण काहितरी चूकतो वगैरे….. वैसाच है पसारेके बाबतीत आपण आहोत “ब्रम्हदेवाचे वंशज ” ….. तेव्हा ह्यो प्रॉब्लेम है अनुवंशिक !!!!
हुश्श चर्चा समाप्त….. घर कितीही आवरलं तरी मन माझ्या ताब्यात नाही…. ते तसे नसतेच आणि त्यावर ताबाबिबा मिळवण्याच्या भानगडीत मेरेको पडनेका नही है (सुलेखासारखं नाही, मी स्वत:च्या मनाबद्दल बोलतेय
) ……. मनात “पसारा” होणारच आणि वाढता वाढता वाढणारच !!!!concluded!!!
आपण दोषी नाही कळलं ना की मी एक मिनिटही वाद वाढवत नाही, शप्पथ!!!
तरिही ब्रम्हदेवाला भेटीन तेव्हा त्याला खणखणीत प्रश्न विचारणारच आहे मी कारण केवळ त्याच्यामूळे अनेक constructive कामं करता करता राहिले मी,नसता ना मनात हा पसारा खरच सांगते विलक्षण काहितरी केले असते प्रत्येकाने (म्हणजे काय याचा शोध वैयक्तिक घ्यावा )!!!
मी सध्यातरी मनासाठी अंगाई गीत गाऊन त्याला झोपवते…..
……….
……….
“ ती नवी मैत्रीण झालीये तिच्याकडे जायचेय उद्या…. ” …… ” नव्या फर्निचरची जागा बदलून पाहू या का??? ” ….. “मुलांना बजावावं लागणार आहे गणपतीसाठी लोक येणारेत, पसारे काढू नका!!! ” ……. “आईकडे आणि अनुस्वारवाल्या आईकडेही गौरी बसल्या असतील….. मी होते तेव्हा दोन्हीकडे जायचे गौरीला…. ” …… “आईकडे यावेळेस गौरीच्या जेवणाच्या ताटांभोवती रांगोळ्या कोणी काढल्या असतील??? आईला माझी आठवण आली असेल….. ” ….. “नाही हे मन झोपायचं नाही असं….. ” …… सुरूच आहे नाही या मनाचं भटकणं… भटकू दे…. मगा केलाय की काथ्याकूट विचारांचा….
अरे हो त्या विचारांची पोस्ट केलीये तिचं काय करायचं ???? … ती मुलांपासून लपवून ठेवायची… नवऱ्यापासूनही ….. नाहितर घरातला पसारा आवरताना मलाच ’ब्रम्ह’ आठवेल…….
फिर क्या करनेका ???? हेहे… सोप्पय….बरेच दिवस झाले ब्लॉगला आरामच आहे या पोस्टने ब्लॉगविश्वातला “पसारा ” वाढवायचा!!!!!