भूलाबाई

आज मुग्धाच्या ब्लॉगवरील पोस्टमधे भूलाबाईचा उल्लेख वाचला आणि जाणवले की बदललेय खरच सगळं….वाढत्या वयाबरोबर ईतर अनेक नव्या गोष्टी शिकतेय मी, पण तरीही साध्या साध्या अनेक गोष्टी हातातून केव्हा निसटताहेत याचा पत्ताही लागत नाहीये. ’ भूलाबाई’ जिला आम्ही गुलाबाई म्हणत असू……….किती आनंद होता तो लहानपणी……….आपल्या मुलांना, या पुढच्या पिढीला संस्कृतीशी ओळख करून देण्याची जबाबदारी आम्हा पालंकांची…….आणि हे असे मीच विसरून गेले तर काय सांगणार त्यांना…………मुलाची परिक्षा, स्वाईन फ्लुच्या रोज नव्या येणाऱ्या बातम्या, नवऱ्याच्या ऑफिसमधील पॉलिटिक्स, एक ना अनेक विचारांच्या या भाऊगर्दीत आयुष्याच्या प्रवासातली आनंदाची बेटं चूकत आहेत बहूतेक…………नाही नाही हे सगळं मुलांना सांगायलाच हवयं…………एक मात्र लक्षात आलय की मुलं मग ती कुठल्याही पिढीची असोत, आपले आई वडिलही आपल्याबरोबर एखादा खेळ खेळायला बसताहेत म्हटलं की खूश होतातच. त्याशिवाय का टि.व्ही., मोबाईल, लॅपटॉप, ट्रान्सफॉर्मर यात रमणारा माझा मुलगा दर सुट्टीला मागणी करतो….चला ना आपण ’राजा राणी चोर शिपाई’ खेळू…………….

असो, तर लिहीत काय होते आणि कुठे भरकटले….. विषय होता भूलाबाईचा. किती लगबग असायची आमची तेव्हा…….बाजारात जाऊन मुर्ती आणायची…….मग आरास. रोज एकेकिच्या घरी जमून आधि गप्पा मग गुलाबाईची गाणी…….. सगळ्यात शेवटी डब्ब्यांमधे लपवलेला खाऊ ओळखायचा………..म्हटलं तर सगळ साध सरळ………….पण मजा होती त्यात. संध्याकाळी खूप वेळ खेळायला मिळावं म्हणुन गॄहपाठही दुपारीच संपवायचो आम्ही………………

आमच्या घरी ही गाणी म्हणण्यात माझे बाबा कायम आमच्या बरोबर असत…..त्यांना सगळी गाणी पाठ होती…….. “लहानपणी बहिणींबरोबर म्हणायचो मी ही गाणी” असं सांगत ते आनंदाने आमच्यात सहभागी होत…… त्यामुळे कुलकर्णी काका हे माझ्या मैत्रीणींमधे फेव्हरेट होते. आणि आपले बाबा कसे मस्त आहेत ना!! म्हणून आम्ही दोघी बहिणी खूश होत असू…………..तेव्हा तर ’टिपऱ्यांच्या’ दांडियाही नव्हत्या झाल्या…………….त्यामुळे आम्ही मुली ’टिपऱ्या’ खेळत असु………….

आज आठवायला बसले तर सगळीच गाणी काही पुर्ण आठवत नाहीये…. ’एक लिंबू झेलू बाई दोन लिंबू झेलू’ ,  ’ यादवराया राणी रूसून बैसली कैसी’, ’अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ’ किंवा ’अक्कणमाती चिक्कणमाती अशी माती सुरेख बाई’ ह्या गाण्यांची सुरूवात आणि मधले कडवे आठवतात फक्त…………काही मोजकीच गाणी पुर्ण आठवताहेत ती इथे पोस्ट करतीये, ते पण किती बरोबर आहेत कल्पना नाही…………..

१.सासरच्या वाटे कुचकुच कांटे

 कोण पाहुणा आला गं बाई……….

 सासरा पाहुणा आला गं बाई……….

 सासऱ्यानं काय आणलं गं बाई……….

 सासऱ्यानं पाटल्या आणल्या गं बाई……….

 पाटल्या मी लेत न्हाई, संग मी येत न्हाई………

 चारी दरवाजे लावा गं बाई…………..

 झिपरं कुत्रं सोडा गं बाई…………….

 सासरच्या वाटे कुचकुच कांटे

 कोण पाहुणा आला गं बाई……….

 पती पाहुणा आला गं बाई……….

 पतीनं काय आणलं गं बाई……….

 पतीनं चाबूक आणला गं बाई……….

 चाबूक मी लेतें , संग मी येते………

 चारी दरवाजे उघडा गं बाई…………..

 झिपरं कुत्रं आवरा गं बाई…………….

 

२.कारल्याचा वेल लाव गं सुने लाव गं

 मग जा अपूल्या माहेरा माहेरा

 कारल्याचा वेल लावला हो सासूबाई लावला

 आता तरी जाऊ का माहेरा माहेरा……

 कारल्याला कार्ली येउ दे गं सुने येउ गं

 मग जा अपूल्या माहेरा माहेरा

 कारल्याचा कार्ली आली हो सासूबाई आली

 आता तरी जाऊ का माहेरा माहेरा……

 कारल्याची भाजी कर गं सुने कर गं

 मग जा अपूल्या माहेरा माहेरा

 कारल्याची भाजी केली हो सासूबाई केली

 आता तरी जाऊ का माहेरा माहेरा……

 कारल्याची भाजी खा गं सुने खा गं

 मग जा अपूल्या माहेरा माहेरा

 कारल्याची भाजी खाल्ली हो सासूबाई खाल्ली

 आता तरी जाऊ का माहेरा माहेरा……

 आपलं उष्ट काढ गं सुने काढ गं

 मग जा अपूल्या माहेरा माहेरा

 आपलं उष्ट काढलं हो सासूबाई काढलं

 आता तरी जाऊ का माहेरा माहेरा……

 आणा फणी घाला वेणी जाऊ द्या राणी माहेरा माहेरा…..

 आणली फणी घातली वेणी गेल्या राणी माहेरा माहेरा…..

आज ही पोस्ट लिहिलीये आता खरं काम हे की मुलांना ही सगळी माहिती देणे……भूलाबाईची मुर्ती मिळतेय का तो शोध घेणे……..आणि सगळ्यात महत्वाचा मी स्वत:च डब्यात भरून दिलेला खाऊ ओळखणे………..

थोडक्यात काय निसटू पहाणारं बालपण पुन्हा जगणे…………….