दुबई-२

दुबईतला दुसरा दिवस…….सकाळी आम्ही निघालो ते ’मॉल ऑफ़ द एमिराट्स’ पहायला. मला स्वत:ला उगाचच मुलांची फरपट करत विंडो शॉपिंग वगैरे आवडत नाही…….कुठल्यातरी मॉल मधे जा आणि ज्या वस्तू आपण बापजन्मात घेणार नाही त्या कशाला पहा अशी माझी मतं मी मांडत होते……पण बरोबरच्या वाटाड्याने मला गप्प बसायला सांगितले……हा आमचा ’होस्ट आणि दोस्त’ म्हणजे सुबी नावाचा माझ्या नवऱ्याचा मित्र……आबुर्ज दुबईधि मस्कतला असलेली ही स्वारी सध्या दुबईत असते. मुलांचा लाडका सुबी मामा त्यांना वर्षभराने भेटलेला असल्यामुळे माझी बडबड त्यांच्या भरतभेटीत व्यत्यय आणत होती. मेट्रो हे मुलाचे मोठे आकर्षण…….वाळवंटातली सगळीच आश्चर्य आणि प्रगती खुल्या मनाने पहायची होती त्यामूळे आम्ही मुंबईतल्या लोकल पहाणारे लोकं, मेट्रो काही नवी नाही वगैरे कद्रूपणा कोणी करत नव्हतं!!!!! ही ट्रेन सुरू झालीये ती ०९/०९/०९ या दिवशी सकाळी ०९:०९:०९ वाजता……कुतुहल होतं हिच्याविषयी…..

दोन वेगवेगळ्या टॅक्सीमधून आम्ही सगळे बर्जूमन या जवळच्या मेट्रो स्टेशनवर पोहोचलो. दुबईत सरळं हिंदी बोलले की काम भागते…..इथले टॅक्सी ड्रायव्हर्स भारतीय ,पाकिस्तानी वा बलुची असतात त्यामूळे अरेबिक आलेच पाहिजे असे नाही. ही सोय मस्कतला नाही….इथे जुजबी तरी अरेबिक आलेले केव्हाही सोयिस्कर ठरते. दुबईत फिरताना वारंवार जाणवत होते ते वैभव…….बराच भाग हा पुण्या मुंबईसारखा असला तरी अरबांचे वैभव आणि आपल्या राष्ट्राच्या प्रगतीशी असलेली बांधिलकी जाणवत होती. दोन वेगवेगळ्या टॅक्सी असल्यामुळे स्टेशनच्या दोन टोकांना उतरणे…..ए्कमेकांचे पर्सनल नंबर नसणे……मग तू गोंधळ घातलास की मी वगैरे माझे आणि नवऱ्याIce Land in The mall of the Emiratesचे वाद….सगळे सोपस्कार पार पाडतांना लक्षात आले की आपले हुशाIce Land in Mall of the Emiratesर चिरंजीव दुसऱ्या कुटूंबाकडे आहेत ते निस्तरतील हा गोंधळ. आणि लेकाने माझ्या विश्वासाला पात्र ठरत त्यांच्याकडच्या मोबाईल वरून मला फोन लावून आम्हाला शोधून काढले. एकदाचे आम्ही ट्रेनमधे चढलो…..’बुर्ज दुबई’ ही जगातली सर्वाधिक उंच बिल्डींग दुबईतल्या कुठल्याही टोकातून दिसते…….साक्षात आकाशाला गवसणी घालणारे ते वैभव आता जवळून पहात होतो आम्ही……

२०-२५ मिनिटांच्या ट्रेन सफारी नंतर पोहोचलो ’मॉल ऑफ़ द एमिराट्स’ मधे…..सुबीचे ऐकून आपण काहीही चूक केली नाही याची प्रचिती आली. प्रचंड मोठा आणि ऐश्वर्यसंपन्न मॉल……याचे आणि एक वैशिष्ट्य असे की या ठिकाणी एक ’आईस लॅंड’ बनवलेले आहेत…..शुन्य डिग्रीपेक्षा कमी तापमान राखून तयार केलेले हे आईसलँड पहाणे ही एक पर्वणी होती, ईग्लू, पोलर बेअर, एस्किमो सगळे हजर होते तिथे. वाळवंटातल्या मॉलमधे लोक मस्तपैकी आईस स्किईंग करत होते….एकमेकांच्या अंगावर बर्फाचे गोळे फेकत होते…….मनात ईच्छा आणि हातात पैसा असेल तर काय काय होउ शकते!!!!! २१ सप्टेंबर जागतिक शांती दिवस म्हणुन या मॉलमधे एक मोठी मेणबत्ती ठेवली होती ज्यावर ’शांती संदेश’ लिहायचे होते……जवळपास ३/४ तास या मॉलमधे फिरून आम्ही निघालो ते ’दुबई मॉल’ कडे……एक आश्चर्य तिथेही वाट पहात होते……..Aquarium...Dubai mall

’दुबई मॉल’ यात काय आश्चर्य असेल ते असो माझ्यासाठी हेच महत्वाचे होते की हा ’बुर्ज दुबई’ च्या जवळ होता…….हा मॉलमधे एक प्रचंड मोठे अक्वेरियम बनवलेले आहे……लहानमोठे विविध आकाराचे रंगाचे मासे पहाणे सगळ्यात जास्त एंजॉय केले माझ्या लेकीने……मनसोक्त बागडत होती ती. आणि तीच का आम्हाला ही मजा येतच होती……रोजच्या त्याच त्याच रूटिनमधून मिळालेला बदल सुखावत होता……… अक्वेरियम मधल्या बोगद्यातून मासे अजून जवळून बघितले……मस्कतहून आमच्याबरोबर आCandle for peaceलेले नवरा बायको हे नविनच लग्न असल्यामुळे मासे, बोगदे तत्सम गोष्टींपेक्षा एकमेकांचे फोटो काढण्यात रमलेले होते……

आता संध्याकाळचे सात वाजत आले होते…फिरून फिरून पाय दुखत होते. साडे आठ वाजता निघायचे होते क्रुजसाठी…..आम्ही परतलो हॉटेलवर. चहा पिउन फ्रेश झालो……मी आणि सुबी रमलो होतो शिळोप्याच्या गप्पात…या दोन दिवसात आम्हाला वर्षभराच्या गप्पा मारायच्या होत्या……आठ वाजता गाडी आली आणि आम्ही निघालो क्रूजसाठी…..भारतात क्रुज काही नवे नाही, गोव्याला केरळमधे क्रुज असतेच. आमचा हा अनुभव तितकासा सुखद होणार नाही याची जबाबदारी क्रुजवर असणाऱ्या गुज्जू ग्रुपने घेतली. बोट दुबई क्रीकमधे फिरायला लागल्यानंतर सुरु झालेली गाणी बंद करून या गुज्जू गँगचा म्होरक्या त्यांना गुजरातीमधे अनेक सुचना करत होता, त्यांच्या ट्रीपचे संपुर्ण प्लॅनिंग त्याने समजावले……आमच्या बरोबर असलेले ’गोरे’ आणि मल्लू मात्र वैतागले…..कसेबसे त्याची बडबड थांबली आणि डिनर लावण्यात आले……त्याबरोबरच ही सगळी फौज त्यावर तुटून पडली……बोट बॅलन्स होत नाहीये हे अनेक वेळा सांगुनही ते ऐकेनात. शेवटी गेलेल्या आम्हाला त्या डिनर मधे नक्की किती पदार्थ आहेत हे समजणार नाही याची काळजी त्यांनी घेतलेली होती. आम्ही मात्र सभोवतालचे दुबई पहाण्यात रमलो होतो, शेजारी असलेल्या गोऱ्यांची एव्हाना ईशानशी मैत्री झालेली होती….. ह्याने फोटो काढतो म्हटल्यावर त्या पन्नाशीच्या गृहस्थाने समोरच्या टेबलवरची फूले देऊन त्याच्या सौ.ना देण्याची पोज देउन त्याच्या तरूण मनाचे दर्शन घडवले……सौ. नेही ती फुलं लाजून स्विकारली. तेव्हढ्यातच आगमन झाले ’जादुगाराचे’, हा मल्लू जादुगार त्याच्या भयाकारी ईंग्लिशमधून त्याच्या ट्रिक्स समजावत होता……त्या गोऱ्यांनाच काय आम्हालाही समजेना, मग त्याला सल्ला दिला तुला हिंदी येत असेल तर त्यातूनच बोल!!!!! पण चाचपडतच त्याने केलेल्या जादू मात्र सगळ्यांना आवडल्या…… अंगठी गायब करणे आणि क्रूजच्या दुसऱ्या टोकाहून ती सापडणे….या जादुसाठी मी अंगठी दिली आणि तेव्हढ्यातच थोडं लाईमलाईट मधे येण्याची संधी साधली……

दमून थकून परतत आम्हाला अकरा वाजले होते…….पुढचा दिवस होता ’दुबई म्युझियम’ चा…….

दुबई……..

Burj-al-arab.....मस्कतला रहायला येण्यापूर्वी जसं ओमान हा देश जगाच्या पाठीवर नक्की कुठे आहे हा प्रश्न होता तसेच त्यावेळी दुबई आणि U.A.E. याबद्दलही मनात गोंधळ होता……क्रिकेटच्या मॅचेस मधे शारजा कप असतो ते शारजा, दुबई या देशाजवळ आहे हे असलं भौगोलिक अज्ञानसुद्धा होते.

मस्कतला आल्यानंतर मात्र या शेजारी राष्ट्राची अधिक आणि योग्य माहिती मिळाली. सात एमिराट्स मिळून बनलेले U.A.E……..त्यातलेच एक दुबई. ईतर सहा एमिराट्स आहेत शारजा, रास-अल-खैमा, अजमन, अल-ऐन, फुजैरा आणि अबुधाबी. दुबई हे त्यातले सगळ्यात प्रगत असल्यामुळे ते नाव अधिक परिचयाचे. पण बाकीचे एमिराट्स हे नवखेच होते. या ईदच्या सुट्टीत आम्ही चार दिवसांची दुबई सफर केली. ही पोस्ट थोडीफार त्या देशाबद्दल आणि आलेल्या अनु्भवाबद्दल……..मस्कतहून दुबईला जाण्याचे दोन पर्याय आहेत एक म्हणजे विमानाने आणि दुसरा रोडने…..साधारण ४०० कि.मी. अंतर स्वत:च्या गाडीने पार करा नाहीतर ONTC च्या सरकारी बसेस नी जा…….आम्ही पहिल्यांदाच जात असल्याने बसनी जाण्याचा पर्याय निवडला. या प्रवासात मुलांनी त्रास न दिल्याने तो आम्ही एंजॉय करू शकलो. मात्र सरकारी बसेस सगळीकडे ढोबळमानाने सारख्याच असा अनूभव आला.

विमानप्रवासात आपण देशांच्या सीमा केव्हा ओलांडतो ते कळत नाही पण या प्रवासात मात्र आम्हाला ते अनुभवायला मिळणार होते…….’No man’s land’ मधून जायला मिळणार होते. मुळात अश्या बॉर्डर्स म्हटल्या की डोळ्यासमोर ’वाघा बॉर्डर’ चे टि.व्ही. वर पाहिलेले दृष्य येते. इथे आम्हाला स्वत:चे विसाचे कागदपत्र वगैरे स्वत:च करायचे होते……खूप उत्सुकता होती सगळ्याची. सीमेवर शस्त्रांनी सज्ज जवान असतील वगैरे मुलाच्या कल्पनांना उधाण आले होते. नवरा आमच्याआधि एकदा जाउन आलेला असल्यामुळे प्रवास सुरू झाल्यावर थोड्याच वेळात मी आणि मुलाने त्याला भंडावायला सुरुवात केली………’बॉर्डर कधी येणार’ या आमच्या प्रश्नाला तो, “सोहार गेल्यावर लगेच येइल…” हे ठरलेले उत्तर देत होता. मग थोड्यावेळाने मुलाने, “बाबा सोहार कधी येणार….” असे विचारायला सुरुवात केली. दोन अडिच तासाने एकदाचे ते सोहार आले आणि मग लगेच १५-२० मिनिटात आम्ही ओमानच्या सीमेवर पोहोचलो. प्रशस्त ऑफिसमधे आम्हा सगळ्यांची रवानगी करण्यात आली……..आमचे पासपोर्ट बसच्या कंडक्टर बाईने आधिच घेउन ठेवले होते त्यावर ’एक्झिट’ स्टॅंपिंग तिनेच करुन घेतल्यामुळे आम्हाला तिथे काहिच करायचे नव्हते…….केवळ पासपोर्ट तिच्यादुबई एकीकडे अतिप्रगत तरिही आपल्या संस्कॄतीशी जोडलेले.... ताब्यात असल्यामुळे आम्ही तिच्यावर डोळा ठेवून होतो.

येव्हढ्या गर्दीत मुलाची भुणभूण सुरुच होती, सोल्जर्स कुठे आहेत म्हणून……..मग त्याला सांगितले की ते U.A.E. बॉर्डरवर तुझी वाट पहात आहेत…………..एकदाचे ओमान मागे सुटले आणि आम्ही U.A.E. मधे प्रवेश केला. इथे सगळीकडे निवांत कारभार होता……..इथले कायदे एकूणातच भयंकर कडक असल्यामुळे फारसे गुन्हे करण्याच्या फंदात सहसा कोणी पडत नाही………बरं पुन्हा वर्षानूवर्षे खटले लांबत नाहित…….लगेच् शिक्षा होते. मागे एकदा नवऱ्याच्या मित्राने रात्री २ वाजता सिग्नल मोडला…….गस्तीवर असलेल्या पोलिस पथकाने लगेच त्याच्या गाडिचा पाठलाग केला……..त्याला थांबवून गाडी ताब्यात घेतली……बरोबर असलेल्या त्याच्या बायकोला, पोलिसांनी त्यांच्या गाडीने घरी सुरक्षित सोडले…….या गुन्ह्यासाठी असणारी ४८ तासांची जेल भोगून दोन दिवसांनी रात्री पावणे तीन वाजता त्याला सोडण्यात आले……. बर चिरीमिरी देतो म्हटल्यावर तीच शिक्षा ४८ वर्षे होण्याचीच शक्यता जास्त…….तेव्हा कायद्याच्या चौकटीतच राहिलेले बरे!!!!!

तर ओमान सोडल्यावर १० ते १५ मिनिटात आम्ही ’हत्ता बॉर्डर’ ओलांडुन U.A.E. चौकीवर पोहोचलो……..रांगेत उभे राहून विसा फी भरून एकदाचे आम्ही या देशात ’एंट्री’ मिळवली. सगळे सोपस्कार पार पाडून बाहेर पडलो आणि पाहिले की आमची बस ’गायब’ आहे. सगळे सामान बसमधे……बरोबर लहान मुलं, आणि आम्ही ८/१० माणसं रात्रीच्या ८ वाजता तिथे उभे होतो…….गोंधळलेलो……तिथल्या पोलिसाला विचारले तर त्याने वर आकाशाकडे बोट दाखवले आणि तो निघुन गेला. आता मात्र खरी पंचाईत होती……अश्या वेळी दुसऱ्या पोलिसाला विचार वगैरे सल्ले नवरा अजिबात ऐकत नाही…….आहेत ना अजुन लोकं बरोबर ते बघतील काय ते किंवा जे त्यांचे होइल तेच आपले………असली भूमिका घेऊन बाप लेक तिथे पकडापकडी खेळतं होते……..मला मात्र असा वैताग आवडत नाही. मी दुसऱ्या पोलिसाकडे गेले आणि शक्य तेव्हढे त्याला समजावले की बाबा रे माझ्याकडे दोन लहान मुलं आहेत, मला बसचा पत्ता दे. तेव्हा कुठे त्याला समजले की आम्हाला खरच माहित नाहीये बस कुठे गेलीये ते!!!! मग त्याने सांगितले की बसमधल्या काही जणांचा पासपोर्टवर ’एक्झिट’ स्टॅंपिंग’ झालेले नव्हते…..तसेच या बॉर्डरवर काही जणांना विसा नाकारण्यात आलेला होता त्या सगळ्यांसाठी बस पुन्हा ओमान बॉर्डरला गेलेली आहे आणि ती अर्ध्या तासात येइल……….तेव्हा कुठे जीवात जीव आला, बरोबरच्या एका वयस्क कुटुंबालादेखील हा निरोप दिला……….पाउण तासात बस आली आम्ही सगळे बसलो………….आता मुलाचे प्रश्न सुरु झाले, “बाबा दुबई कधी येणार?????” मुलीचे वेगळेच नाटक सुरु होते……. “आहा !!!! मस्त आहे मुंबई, मला तर खूप आवडलं………” असे ’दुबई’ चे ’मुंबई’ असे नामकरण करून ती मोकळी झाली होती. आणि नुकत्याच दिसू लागलेल्या वाळवंटाचे कौतूक करून तिने या सहलीत ती खूश असल्याची ग्वाही दिली होती.

दुबईला पोहोचलो साधारण अकरा साडेअकराच्या सुमारास आणि मुलीचे म्हणणे खरे असल्याचे पटले…….खुप साम्य आहे ’दुबई’ व ’मुंबई’ या दोन्ही शहरात……..पहिल्या दिवशी हॉटेलवर पोहोचल्यावर चहा पिउन गप्पा मारत बसलो……..दुसऱ्या दिवशी ’मॉल ऑफ द एमिराट्स’ , नुकत्याच सुरु झालेल्या मेट्रोची सवारी, ’ दुबई मॉल’, आणि दुबई क्रीकमधे क्रूझ सफारी असा भरगच्च कार्यक्रम असल्यामुळे आणि सगळे बऱ्यापैकी दमल्यामुळे पटापट झोपले…………………

क्रमश:

रोहा( रोहे)

आज झी मराठी वर ’नवरा माझा नवसाचा’ चित्रपट लागला आहे…मुलाचा आवडता सिनेमा….कारण त्यात बराच वेळ बस आहे हे एक कारण आणि दुसरे महत्वाचे म्हणजे याचे चित्रीकरण झाले आहे रोह्याजवळ.

रोहा, कोकणातले कोकण आणि मुंबई च्या सीमेवरचे गाव….येव्हढीच माहिती होती आम्हाला २००४ पर्यंत…आणि अचानक तिथे नौकरीनिमित्त जाणे झाले. भर मे महिन्यात सगळ सामान घेऊन आम्ही तिथे पोहोचलो. कंपनीच्या केवळ दोन बिल्डिंग्स….काही मोठ मोठी झाडे, आणि मोठे आवार. संपल … बाकी काहिही नाही. अगदीच नाही म्हणायला घराच्या मागे काही अदिवासी पाडे होते. आणि समोरच्या बाजुला Water purification plant च्या क्वार्टर्स.

सामान लावण्यात एक दोन दिवस गेले पण हळूहळू जाणवत होते की आपलं काही खरं नाहिये इथे. आमच्या दोन बिल्डिंग्स मधे एकुण २४ घरे त्यातली एक दोन रिकामी म्हटली तरी बरीच कुटुंब आजुबाजुला दिसत होती. पण मला तोपर्यंत नौकरीनिमित्त बाहेर पडण्याची सवय असल्यामुळे सकाळपासुनच काय गप्पा मारत बसायच्या हा प्रश्न होता… आणि तशी लग्नाला ४-५ वर्षे झालेली असली तरी भाजीचे आणि किराणा मालाचे rates discuss करत माझे माहेर तुझे सासर टाईप विषयांमधे गती नव्हतीच. मग मनात ठरवले आपल्याला कुठे इथे तळ ठोकायचा आहे… सतत दुसरीकडॆही नौकरीचे प्रयत्न तर सुरुच असणार आहेत. थोडे relax झाले या विचाराने परंतु सुरुवातीला वाटल तितकसं काही कठिण गेलं नाही तिथे रुळायला.

रोहा गावं तसं साधंस…पण मुंबई जवळ असल्यामुळे प्रगत. गावातले धाविराचे स्वच्छ मंदिर. गावातुन वहाणारी कुंडलिका नदी. पावसाळ्यात पडणारी धो धो पाउस. जवळच असणारे पाली..बल्लाळेश्वराचे मंदिर. हिरवागार निसर्ग. आणि साधी माणसे. प्रेमात पडत होतो आम्ही रोह्याच्या. ताडी पिऊन झिंगत आपल्या मस्तित शिव्या देत जाणार्‍या अदिवासी बाया पाहिल्या त्या इथेच. संध्याकाळी फिरायला जायला कूठलाही जॉगिंग ट्रॅक नव्हता पण मागच्या अदिवासी पाड्यावरच्या टेकडीवर जाऊन सुर्यास्त पहाणे हे सुख शहरात कुठे….

काय या बाया सकाळी नवरे गेले की जे बसतात खाली बेंचेस वर ते लंच टाईम पर्यंत तेच असे विचार करता करता मीही कधी त्यांच्यात सामील झाले कळलेच नाही. एक मात्र गंमत झाली कधिही कुठेही job न केलेल्या या मैत्रिणींकडुन मला जे व्यवहारज्ञान मिळाले ते मिळवणे एरवी येव्हढे सोपे वाटले नसते. हळुहळु तिथे गप्पा मारणे हा नुसता टाईम पास नसुन त्यामुळे एरवी अतिशय बेचव होउ शकणारे आयुष्य कितीतरी सुखद झाले आहे याची जाणीव झाली. बरं त्या गप्पा कट्ट्याला वयोमर्यादा नसल्यामुळे अनेक वर्षाच्या संसारामुळे मिळालेली अनुभवांची शिदोरी सहज उपलब्ध होत असे. मग वहिनी ही भाजी कशी करु ते मुलाला हे होतय ते होतय वगैरे समस्यांचे निराकरण सहज होत असे. जाणवत गेला तो माझ्या या सगळ्या मैत्रीणींचा निरपेक्ष प्रेम करण्याचा स्वभाव. कोणाच्याही घरचे पाहुणे कधी संपुर्ण बिल्डिंगचे होत हे कळतच नसे. इतकी आपुलकी,प्रेम ,जिव्हाळा त्यापुर्वीही कधी आणि त्यानंतरही कधी नाही लाभला.

सगळ्यात आवडणारी बाब म्हणजे खेळायला एकुण ४०-४२ मुले होती. प्रत्येक वयोगटाचे १०-१२. मनसोक्त हुंदडत असत हे सगळे. झाडावर चढणे, गोट्या, लपाछुपी सारखे खेळ ही मुले खेळत त्यामुळे निरोगी वाढ होत होती. बर खेळल्यावर भुक लागलीये म्हणुन आपल्याच घरी आले पाहिजे हे बंधन नव्हते, कुठल्याही काकुला सांगितले तरी काम भागायचे. आजकाल किती दुर्मिळ आहे हे सगळ.

माझ्या दुसर्‍या pregnancy मधे मी रोह्याला होते हा माझ्या नशिबाचाच भाग असावा. डोहाळे पुरवणे हा  किती हौसेचा भाग असतो हे तिथेच समजले. जणु मला सांभाळणे ही या बिल्डिंगचीच जबाबदारी होती. जवळपास रोज सकाळी मला कोणीतरी सांगायचे मी आज हा स्वयंपाक करणार आहे तु काहिही करु नकोस. किती ते लाड आणि ते ही त्या सगळ्यांकडून ज्यांची माझी ओळख एक दिड वर्षाची होती. सतत कौतुक केले त्यांनी. मला मोठी बहिण नाही पण ते सुख मात्र भरभरुन मिळाले रोह्यात. अगदी डिंकाच्या लाडवांपासुन ते मला आवडते म्हणुन वेगवेगळे चाट, पाणिपुरी पर्यंत सतत तयार असायचे काहीतरी. माझ्याकडे कामाला येणारी पुष्पा, माझ्यापेक्षा वयाने लहान पण या मुलीने मला कधीही काम पडु दिले नाही. अगदी एकही सुट्टी घ्यायचे ती टाळत असे. ते नऊ महिने माझा मुलगा कसा सांभाळला गेला हे मला कळलेही नाही.

खरच का करावे कोणीतरी आपल्यासाठी येव्हढे… यावेळेसही आम्ही भारतात आल्यावर रोह्याला गेलो आणि प्रेमाची शिदोरी भरुन आणली. आजकाल जेव्हा सख्खे सख्ख्याला पारखे होतात तेव्हा माणुसकी वरचा उडणारा विश्वास मला या सगळ्या मंडळींमुळे परत मिळाला.

आज खुप खुप आठवतेय ते घरात शिरु पहाणारे आंब्याचे आणि जांभळाचे झाड. किती आधार वाटायचा त्या दोघांचाही. समोर असणारे मोठे वडाचे झाड जणु त्या दोन्ही बिल्डिंगच्या रक्षकासारखे भासायचे…

आजही तिथले सगळे शेजारी वेगवेगळ्या गावांमधुन एकमेकांच्या संपर्कात आहेत….प्रत्येक नवी खरेदी…नवी achievement आवर्जुन सगळ्यांना कळवली जाते. आभार मानायचे आहेत मला या सगळ्यांचे….म्हणुन हा प्रपंच.

खरय ’हिरवा निसर्ग हा भवतीने’ हे गाणं रोह्याने अगदी सार्थ ठरवलं आहे……पण आम्हाला मात्र या निसर्गाइतकेच भरभरुन दान दिले ते या निसर्गाच्या कुशीत रहाणार्‍या साध्या पण प्रेमळ माणसांनी….

इगतपुरी — आमचे आजोळ !!!

इगतपुरी आमचे आजोळ……………काय आणि किती लिहु असं होतय नुसते नाव आले या गावाचे तरीसुद्धा !! जवळजवळ संपुर्ण बालपण इथेच गेले आमचे. सुट्टी संपली की नाइलाजाने आम्ही पुढच्या सुट्टी पर्यंत मनमाडला जात असु… तेव्हा आमच्या बाबांची ट्रांस्फर तिथे होती. एकदाचा परिक्षेतला शेवटचा पेपर देण्याची पीडा आटोपली की चंबुगबाळ आवरुन आम्ही पहिली ट्रेन पकडुन इगतपुरी गाठत असु. एक दोन दिवसाच्या फरकाने मामे , मावस भावंड येत असत. मग धमाल सुरु.

माझे आजी आजोबा रेल्वेमधे सर्विस करत, तिथल्या रेल्वेच्या शाळेत आजोबा मुख्याध्यापक होते. त्यांचे घर म्हणजे रेल्वेचे मोठ्ठे् क्वार्ट्रर. छानसे टुमदार कौलारु घर. मोठ मोठ्या ७/८ खोल्या….उंच उंच व्हेंटीलेटर्स, आणि उंचावर असलेले पंखे. आताच्या बिल्डिंगमधल्या घरांमधल्या बेडरुमपेक्षाही मोठे बाथरुम….मागे पुढे मोठे अंगण .घराच्या दारापासुन गेटपर्यंत सिमेंट्चा फुटपाथ. तो ओला असतांना आम्ही उमटवलेली पावले आणि आमची कोरलेली नावे…… आंबा, पेरु, जांभुळ, चिंच, काजु ,कारंज्या अशी अनेक झाडे अंगणात होती. त्यामुळे उन्हाळ्यात कधिही सावलीची कमतरता नसे.

आम्ही रेल्वे लाईन ओलांडून घराकडे जातांना आधि आजीची शाळा लागत असे. मग आम्ही धावत जाऊन तिला आणि आजोबांना भेटुन आमच्या येण्याची खबर देत असु. शाळेत चारच वर्ग. पहिली ते चौथी. चारच शिक्षक….त्यामुळे आम्ही गेलो की सगळ्यांना भेटुनच घरी जात असु. ही शाळा फार सुंदर आणि स्वच्छ होती. मोठे आवार , आणि अंगणात कारंज्याची झाडे. आमचा मुक्काम बरेचदा या शाळेतच असे…कारण तिथल्या मोठमोठ्या कपाटात अनेक पुस्तके होती. वाचनाची आवड लागली ती या शाळेमुळेच…. इसापनिती, पंचतंत्र, जादुच्या कथांची अनेक पुस्तके, खजिनाच होता ह्या शाळेत. आता मुलांसाठी ही पुस्तके शोधतांना होणारा त्रास पहाता आम्ही किती नशिबवान होतो असे वाटते. घरी पुस्तके आणण्यासाठी आजोबांची (ज्यांना आम्ही बापु म्हणायचो…. ते गावातही बापुसाहेब म्हणुनच प्रसिद्ध होते) परवानगी लागायची. कारण पुस्तके हा त्यांचा वीक पॉइंट त्याबाबत आबाळ त्यांना चालत नसे.

खाण्यापिण्याचीही मोठी चंगळ असायची. आजी सुगरण. तिच्या हातच्या वरणाची चवतर आजही जिभेवर रेंगाळते.मला आठवतेय एकदा तिने आम्हाला नारळाच्या करवंटीला भोक पाडुन जिलेबी करुन खाउ घातली होती. एका रांगेत आम्ही आठही नातवंड जेवायला बसत असु. तोच क्रम चहा प्यायलाही असे.भराभर खाउन खेळायला पळणे हाच उद्योग असे. उन्हाळ्यात कैर्या, आंबे खाणे हा आवडता कार्यक्रम. स्वताच्या झाडाच्या नाही बरं!!!शेजारच्यांच्या चोरलेल्या…तिथुनच आम्ही काजुगरही चोरत असु. त्यांच्या कोणत्या झाडाला किती फळ आहेत याचे रेकॉर्ड आमच्याकडे असे. मग मामीला विचारुन आम्ही आमच्या घराच्या कौलावरुन शेजारच्यांच्या झाडाची फळे तोडायचो.विलायती चिंच हा प्रकार इथेच कळला आम्हाला. भेळ खायची ती चौकोनी कागदावर मस्तपैकी अंगणात बसुन. घरामागच्या जोश्यांच्या फ्रिजमधे ठेवलेले आईसक्रिम खाणे किंवा रात्री उशिरा येणार्या कुल्फिवाल्याकडची कुल्फि खाणे ही तर पर्वणी होती.

आमचा आवडता खेळ म्हणजे बाहेर बसुन कारंज्यांची फळं तोडणे.त्यातल्या बियांपासुन तेल बनवतात ज्याचे अनेक औषधी गुणधर्म आहेत त्यामुळे आम्ही फोडलेल्या बिया विकुन आम्हाला पैसे मिळत जे आम्ही आजीकडे देत असु.मग त्या टरफलांचा पसारा अंगणात…मामा अतिशय रागावत असे पण आम्ही मात्र स्थितप्रद्न्यासारखे आमचे उद्योग चालवत असु. मधेच एका सुट्टीत आम्हाला निलगिरीपासुन विक्स बनवता येइल असा जावईशोध लागला होता मग ती पाने दोन दिवस कुटली. एकदा तर पाच वर्षाची असतांना मी खायचे पान समजुन कण्हेराचे पान त्यान गंध टाकुन खाल्ले होते…मग दवाखाना आणि आईचा मार…….झाडावर चढणे, कौलावरुन उड्या मारणे, खेकडॆ पकडणे हे जोडधंदे. ते पकडलेले खेकडे आउटहाउस मधल्या लोकांना देणे मग ते तो कसा खातात ते बघणे हे आजीला न कळु देता केलेले उद्योग. यातुनही वेळ उरला तर कट्ट्यावर बसुन जाणार्या मालगाड्यांचे डबे मोजणे.

पावसाळ्यात प्रचंड पाऊस पडत असे त्यामुळे साप भरपुर. त्यामुळे आयुष्यात पुन्हा कधिही सापाची भिती वाटली नाही. कपडे वाळवणे मोठे जिकिरीचे असायचे पावसाळ्यात, ते शेकोटीवर वाळवावे लागत. सापाची नाही पण डरकु ची फार भिती होती…. हा प्राणी किंवा राक्षस किचनसमोरच्या चिंचेच्या झाडावर असतो ही माझ्या मामेभावाने मारलेली थाप आहे हे कळेपर्यंत रात्री तिकडे पहायची हिंमत होत नसे. अश्याच एका झाडावर वाढलेला हरितवेल वाळुन तो लोंबत असे तो म्हणजे डरकुच्या अंगावरचे केस आहेत ही माहितीही त्याचीच. ट्रेनच्या इंजिनमधे बसुन कसारा घाटात मामाबरोबर जाणे आणि करवंदाच्या जाळ्यातुन ताजी करवंद खाणे, कैर्या तोडणे …मस्त मजा होती. आमच्या मामाचे मित्रही मोठे वल्लि होते. त्यातला राजेशमामा बोबडा नाहिये हे मला माझी दहावी झाल्यावर कळले होते तोवर या पठ्ठ्याने ते सोंग इतके अफ़लातुन वठवले की शंकाही येउ नये.

खरचं काय आणि किती लिहु? माझ्यासाठी हा विषय न संपणारा आहे……

मागे एकदा आम्ही लोणावळ्याला गेलो होतो, सगळे खुश होते पण खर सांगु का व्यवसायिकरण न झालेले आमचे इगतपुरी मला जास्त आवडते…… आज तिथे कोणिही नाही. आजी नासिकला स्थायिक झाली आहे …..पण आठवणीतले ते क्वार्ट्रर मात्र आमचेच. आजही आम्ही भावंड हा विषय निघाला की भरभरुन बोलतो….आम्हाला जोडुन ठेवलय ते याच आठवणिंनी. आजही मुंबईला जातांना इगतपुरी आलं की डोळे पाणावतात…….