काल रात्री मुलानी त्याच्या टिचर्ससाठी कार्ड बनवले…..आधि प्रश्न होता काय चित्र काढू? ….मग मी त्याला सुचवले की तु पिकॉक काढ, कारण सरस्वती ही विद्येची देवता आहे आणि मोर हे तिचे वाहन आहे. मग चित्रकलेचा तो तास संपेपर्यंत मी त्याचे ’शिक्षकदिन’ या विषयावर बौद्धिक घेतले. जरा दमादमाने,त्याला बोअर होणार नाही अश्या पद्धतीने सगळं सांगाव लागत नाहीतर कार्टं ’हं हं….’ करत पण लक्ष देत नाही.
माझं घराण शिक्षकांच. माझ्या दोन्ही आज्या, आजोबा, आई, मावशी सगळे शिक्षक. त्यामूळे या व्यवसायाचे सगळेच कंगोरे अगदी जवळून अनुभवलेले. त्यात दहावी पर्यंतच शिक्षण लहान गावात झाले, जिथे सगळेच एकमेकांना ओळखत होते . शिक्षकांविषयी आदर बाळगायचा असतो हे काही कधी सांगावे लागले नाही. माझ्या बालवाडीपासून ते दहावी पर्यंतच्या प्रत्येक शिक्षकाचे नाव, आडनाव त्यांची शिकवण्याची सवय, त्यांच्या लकबी….त्या त्या तासांना झालेल्या काही गमती जमती सगळ आठवत व्यवस्थित. झालेल्या शिक्षा….केलेल्या खोड्या सगळ मुलाला सांगत होते एक एक करून. मी दहावीत असतांना माझे दोन शिक्षक मला शिकवायला घरी येत, अगदी स्वत:हून. माझा सगळा आळशीपणा, नखरे सहन करत ते माझा अभ्यास घेत. आणि या एक्स्ट्रा ट्य़ूशनचा त्यांनी कधीही एक कपर्दीकही घेतला नाही. केवळ ही एक हुशार मुलगी आळशीपणामुळे मार्क घालवेल या भीतीने आणि आम्हा मुलांविषयी असलेल्या मायेमुळे ते हे करत. सहावीत असतांना मी शाळेत पडले होते माझे पाटोदकर सर धावत आले आणि मला उचलून घरी सोडायला आले……पाचवीत असताना शाळा दूर पडते म्हणुन माझे वर्गशिक्षक स्वत:च्या सायकल वर बसवून मला नेत होते………भर वर्गात सोनावणे सर ” अग जरा concentration वाढव..” म्हणून दम भरत असत……एक ना अनेक किती सांगणार मी मुलाला.
माझं मलाच भरून येत होते त्या शिक्षकांच्या आठवणीने…कारण त्यांना ’गुरू’ हे संबोधन योग्य वाटावे अशी त्या सगळ्यांची पात्रता होती. कुठल्याही मुलाच्या जडणघडणीत शिक्षकाचा वाटा किती मोठा असतो. खरच आताची शिक्षणपद्धती आहे का तेव्हढी निरपेक्ष? आताचे मोठमोठे क्लासेस त्यांच्या भरमसाठ फीया त्यातले शंभर शंभर मुले कुठे आणि माझ्या एकटीसाठी घरी येणारे माझे चिंचोलकर सर आणि पाटोदकर सर कुठे? खरच मी माझ्या मुलाला समजावयाला बसले होते की मीच सगळ नव्याने समजून घेत होते….एका आईच्या दृष्टीकोनातून…………
सगळ्या संभाषणात मुलाला विचारले, “पिल्लू तुझ्या नर्सरीच्या टिचरचे नाव काय रे? ” खरं सांगते……….दोन चुकीची नाव सांगितली त्यानी आधि……माझ्या मनात विचार येत होते ’उडदामाजी काळे गोरे’ असणारच पण आता प्रमाण बदललेय का? माझ्या मुलाला त्याच्या शिक्षकांविषयी तोच आदर वाटणार का खरच जो आधिच्या पिढ्यांना वाटतोय? नाही पण हे असे चालणार नाही……किती महत्वाचे असतात शिक्षक. कोण जाणे त्यालाही मिळतील ’राम शंकर निकूंभ’……नव्हे मिळावेच. कारण तेच तर घडवतात पाया यशस्वी आयुष्याचा…………तेच तर खरी तोंडओळख करून देतात या जगाची………माझी मीच गोंधळतेय आता……त्याच्याकडुन रोज ’गुरुब्रम्हा….’ म्हणुन तर घेतेय पण या श्लोकाचा खरा अर्थ उमजतो तसे शिक्षक लाभल्यावर…….
परवाचे ’हप्ता बंद’ पाहिले……प्रश्न होता “चंद्र ,पृथ्वी आणि सुर्याच्या मधे आल्यानंतर होणाऱ्या भौगोलिक घटनेचे नाव काय?”……..आलेल्या स्पर्धकांमधल्या शिक्षिकेनी उत्तर दिले “चंद्रग्रहण”………..का तर म्हणे “मला confusion झाले…की चंद्रग्रहण की सुर्यग्रहण”…………हाच प्रश्न मी मुलाला विचारला,” पिल्लू अर्थ आणि सनच्या मधे मून आला तर कोणते एक्लिप्स होइल?” दुसरीतल्या मुलाने “सोलर एक्लिप्स” हे उत्तर दिले…………का विचारल्यावर तो टि.व्ही. समोर उभा राहिला आणि मला म्हणे दिसतोय का टी.व्ही. तुला? “नाही” हे उत्तर दिल्यावर हसून म्हणाला असेच होते ’सोलर एक्लिप्स’ मी आत्ता मूनच्या जागेवर उभा आहे आणि टी.व्ही. म्हणजे सन आहे ………..यावर काय बोलणार? अगदीच् निराश व्हायला नकोय तर………
आजच्या लोकसत्ताच्या चतुरंग पुरवणीत शिक्षकदिनाचे छान लेख आलेले आहेत……त्यातली डॉ. ए.पी.जे. अब्दूल कलामांनी दिलेली शिक्षकांसाठीची प्रतिज्ञा आचरणात आणलीच गेली पाहिजे. काही भले बुरे अनुभव आले तरी जगात उत्तम, ऋषीतुल्य आणि आदरणीय गुरू अजुनही आहेत हा विश्वास मनात आजही वाटतोय मला……..अश्याच सगळ्या शिक्षकांना, गुरूंना
’शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा………………’