कोंबडीची शंकरावर भलती भक्ती….. तशी ती होतीच देवभोळी…. शंकरभगवान, गणपतीबाप्पा, सगळ्या देवी-देवता सगळेच तिचे लाडके…. तिचे वागणे, बोलणे ही स्वच्छ असायचे तिच्या पांढऱ्या शुभ्र रंगासारखे….
कोंबडा तसा तापटच… तो रागावला की ती म्हणे, “अहो का तांडव करताय ??? ” … पण कोंबडीही कधी वैतागायची मग कोंबडा म्हणायचा, “अगं आज माझ्या पार्वतीने दुर्गेचं कालीमातेचं रुप का हो धारणं केलेय… ” …. कोंबडीचा राग तो कुठला… क्षणा दोन क्षणात राग पळून जाई… मग ती खुदकन हसे नी तुरूतूरू खुशीत इकडुन तिकडे पळे…. पंखांची उघडझाप करत तिने केलेला नाच पाहिला की कोंबड्याला कोण आनंद होई…. सकाळ आहे की दुपार तो विसरून जाई .. तो आपला जोरदार ललकारे “कुकूचsssssss कू !!!!”
कोंबडी त्या कुटूंबाची लाडकी… चिमणी सात आठं पिल्लं सतत तिच्या अवती भोवती बागडतं… आई म्हणेल ती पुर्वदिशा होती त्यांच्यासाठी…..
अशातच आली महाशिवरात्र…. कोंबडीने नवऱ्याला आणि पिल्लांना स्पष्ट बजावले, ’उद्या शंभो महादेवाचा दिवस…. समोरच्या घरातल्या काकू काय दाणे घालतील ते तेव्हढे खायचे पण किडा मुंग्यांवर ताव मारायचा नाही…. पवित्र दिवस आहे उद्याचा…
’ …. चिमूकली पिल्लं हसली….
.. कोंबड्याने मान तुकवली!!!!
महाशिवरात्र आली… पिल्लं उठली…. आईचा कुठे पत्ता आहे ते त्यांना कळेना… ती जरावेळ घूटमळली नी खेळायला पळाली….. दुपारची भूक लागली तर काकूंच्या अंगणात जाऊन कलकलाट करू लागली…. काकू आल्या त्या उशीरानेच… आल्या त्या फणकाऱ्यातच… बडबड करत होत्या काहितरी… कोंबडीच्या पिल्लाला काही कळेना…. त्या सगळ्यांनी दाणे खाल्ले…. आपली आई कुठे गेलीये या प्रश्नाने भंडावले आता पिल्लांना….. होता होता संध्याकाळ झाली…. पिल्लू कोंबड्याकडे आलं आणि म्हणालं ,” बाबा आई कुठेय ?? काकू काहितरी बडबडत होत्या आज…. म्हणाल्या या चॅनलवाल्यांना काही विधीनिषेध नाही उरलेला आजकाल…… मेलं शिवरात्रीच्या फराळाचं ताटं घेऊन बसावं तर चॅनलवर चिकनच्या रेसिप्या दाखवताहेत….. तो शेफ मस्त खाऊन स्वस्थ झोपला असेल आता…
…. पण बाबा एक सांगा ’विधीनिषेध’ म्हणजे काय हो ???? ” …. पिल्लू निरागसपणे विचारत राहिलं…
“विधीनिषेध!!!!! ” ………….. “विधीलिखीत!!!!! ” …. कोंबडा अस्पष्ट पुटपूटला आणि मंद पावलं टाकत दुर निघून गेला….त्याच्या चालीतला नेहेमीचा डौल पिल्लू शोधतं राहिलं…..
पिल्लू बिचारं “विधीनिषेध” आणि “विधीलिखीत ” च्या घोळात अडकलं…………………
तिकडे कोंबडीचा उपास, महाशिवरात्र वगैरे गोष्टींशी सोयरं सुतकं नसलेल्या मस्त खाऊन स्वस्थ झालेल्या शेफने कॅमेरा बंद झाल्यावर विचार केला की आजच्या कोंबडीला काही चव आली नाही गड्या……..
कोंबडा हळूहळू चालतं शंकराच्या देवळाशी पोहोचला तेव्हा पहाट होत होती….. पुर्वेचा दूत रोजच्यासारखा देवाचे निरोप घेऊन येता झाला…. कोंबड्याच्या डोळ्यातल्या पाण्याने त्याला सगळे धुसरं दिसत होते…. कोंबड्यासमोर यायचे आज सुर्या्चेही धाडसं होइना….बराचवेळ तो ढगांआड लपला…. शेवटी सुर्याने हिंमतीने पाठवलेला एक किरण कोंबड्याकडे पोहोचला आणि म्हणाला ,” कोंबड्या तुझं ’पांढरं ’ फूल महादेवाला मिळालं रे!!!!!!!!!!!!!!!!!! “
ता.क.
मी स्वत: शुद्ध शाकाहारी असले तरीही ही पोस्ट मांसाहाराच्या विरोधात टाकलेली नाही. अर्थात पोस्टमधे दिलेली लिंक पाहिली की माझा मुद्दा स्पष्ट होइलच
…. कुठल्याही कार्यक्रमाचे चित्रीकरण आधिच झालेले असते आणि त्यात शेफचा काहीही दोष नाही असे गृहित धरले तरी महाशिवरात्रीच्या दिवशी ’चिकन’ शिकवणे खटकले … आणि त्या अनूषंगाने आलेले विचार इथे मांडलेले आहेत!!!





