क्लब 60

एकाच फ्रेममध्ये दोन अतिशय आवडती माणसं. फारुख शेख आणि सारिका. क्लब 60 नावाचा हा सिनेमा लागलेला दिसतो तेव्हा तो दर वेळी पाहिला जातो याचं कारण ही दोन माणसं. अभिनेत्यांचं म्हणून मनात पक्कं स्थान असणं वगैरे मागे सुटून गेल्यानंतरही काही मोजके लोक मनात ठामपणे राहिलेत त्यातलेच हे दोघं.

या सिनेमापाशी पहिल्यांदा थांबले यातली एक गज़ल ऐकली तेव्हा…

रुह में फासले नहीं होते
काश हम तुम मिले नहीं होते

या शेरने सुरुवात होणारी गोड गज़ल. टिनू आनंदला संपूर्ण करियरमध्ये मिळालेलं इतकं सुरेख गीत हे एकमेव असावं असं क्षणभर वाटलं. चित्रपट काहीसा रुळलेल्या वाटेवरचा असला तरी ह्या फ्रेममधली ही दोन माणसं, ही प्रेम आहेत… यांना डावलून पुढे कसं जावं.

“मला फारुख शेख आवडतो”, असं आम्ही लहान असताना एक भाऊ म्हणाला होता. सिनेमाच्या मुख्य प्रवाहातली इतर नावं सगळे घेत असताना त्याने हे नाव घेतलं आणि संपूर्ण सुट्टीभर इतरांनी त्याला चिडवलं. भाऊ खरंच शहाणा होता, आम्हाला शहाणपण यायचं बाकी होतं. घरंदाज, खानदानी वगैरे शब्द व समंजस, सहज, सौंदर्याची ओळख व्हायला आयुष्य बरेचदा पुढे जायला लागतं. सुदैवाने माझं ते तसं गेलं असावं आणि मला फारुख शेख नावाची व्यक्ती समजू लागली. दीप्ती नवलची आणि त्याची मैत्री, त्या आश्वासक मैत्रीचे अनेक कंगोरे त्यांच्या मुलाखतींमधून, एकत्र कामांमधून उलगडले तेव्हा या दोघांच्याही अजून अजून प्रेमात पडत गेले.

‘जिंदगी धूप तुम घना साया’, म्हणजे नेमकं काय हे समजलं. कथा, साथ-साथ ते लिसन अमाया सारं पाहून झालं. त्याच्या जमीनदार असण्याविषयी, गर्भश्रीमंत व्यक्तिमत्त्वाविषयी दीप्ती जेव्हा जेव्हा बोलली तेव्हा त्यातलं सत्य मनाला स्पर्शून जात होतं. ‘गर्म हवा’ पाहिला तो बलराज साहनींसाठी, कैफी आजमींसाठी मात्र फारूखही ठळक लक्षात राहिला होता. असेच माया मेमसाब बद्दलही…

‘जिंदगी जब भी तेरी बज़्म में लाती है हमें’ च्या सुर्ख फुलांच्या वाटेवरून ‘बात फुलों की’ पर्यंत येताना फारुख नावाच्या ह्या विलक्षण ठहरावाची ओळख पक्की झालेली होती… उर्दू अदब आणि लहेजातलं बोलणं आणि त्याचं ते अलवार अस्पष्ट हास्य… “मला फारुख शेख आवडतो”, ये जवानी है दिवानी पाहणाऱ्या माझ्या लेकाला आता मी सहज सांगितलेलं असतं. रणबीर कपूरच्या वडिलांच्या लहानशा भूमिकेत तो फारुख शेखला पाहत असला तरी त्याने माझ्याच वाटेवरून का होईना पण ह्या अभिनेत्यापर्यंत पोहोचावं असं मला मनापासून वाटत जातं…

प्यार मुझसे जो किया तुमने तो क्या पाओगी
मेरे हालात की आंधी मे बिखर जाओगी

ह्या खरंतर फारुखच्या असलेल्या ओळी पण ‘हालात की आंधी’ वगैरे सारिका या अभिनेत्रीसाठी जास्त योग्य ठरेल असं काहीसं शापित राजकुमारी सारखं आयुष्य जगलेली ही विलक्षण सुंदर स्त्री. तिच्या डोळ्यांमधली काहीशी गूढ, वेदनेने पूर्ण, काही हरवून निसटून गेल्याची भावना, तिच्या चेहऱ्यावरची औदासीन्याची छटा, हसण्यात उमटणारी वेदनेची किनार सारं समजून येतं तिच्या आयुष्याचा प्रवास पाहताना. बालकलाकार म्हणून वयाच्या पाचव्या वर्षापासून सिनेसृष्टीत दाखल झालेली ही मुलगी कधीही शाळेत तर जाऊ शकली नाही पण सिनेमाचे सेट हेच आपले घर झाले असं सांगणारी. लग्नापूर्वीच स्वीकारलेलं मातृत्व, लग्नानंतर नव्हे तर दोन्ही मुलींमध्ये समाजाने भेदभाव करू नये म्हणून दुसऱ्या लेकीच्या जन्मानंतर लग्न करण्याचा तिने घेतलेला निर्णय सारंच मुख्य प्रवाहापासून खूप वेगळं. पुढे कमल हसनपासून विभक्त झाल्यानंतर पुन्हा नव्याने आयुष्य सुरू करणारी ही धीराची आई.

एखाद्या विवाहित पुरुषाच्या आयुष्यात असणारी दुसरी स्त्री असणं म्हणजे वेदनेला स्वतःहून निमंत्रण देण्यासारखे आहे वगैरे ती बोलते तेव्हा तिच्या स्वरापेक्षा तिचे डोळे खूप काही सांगून जाणारे… अर्थात आयुष्याने आपल्या वाटेवर चालायला भाग पाडलेलं असलं तरी तिने न हरवलेली ‘ग्रेस’, किंबहुना वेदनेच्या समंजस स्वीकारातून, वाचनाच्या लक्षणीय वेडातून घडलेलं एक संयमित प्रगल्भ व्यक्तिमत्त्व म्हणजे आताची ती…

खोकर मैंने आज तुम्हे पाया हैं
फिर से मेरे साथ मेरा साया हैं

क्लब 60 मधल्या गाण्यातल्या ह्या आवडत्या ओळी ऐकते तेव्हा विचारांच्या प्रवाहातून मी पुन्हा चित्रपट पुढे पाहू लागते, पण या दोघांची ही फ्रेम पुन्हा पुन्हा मनात डोकावत जाते.

…. तन्वी

आज कल मैं मन का करती हूँ… चित्रा देसाई

आज कल मैं मन का करती हूँ
चित्रा देसाई

काव्यवाचन
तन्वी अमित

अनुभवांना नेमकेपणाने शब्दबद्ध करू शकणारी अल्पाक्षरी कविता मनाच्या पटलावर तिची नोंद दीर्घकाळ उमटवते…

अशीच एक कविता,

आज कल मैं मन का करती हूँ

आजच्या मार्मोरिस मध्ये.

नक्की ऐका.

प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत….

Do like share n Subscribe to the channel ✨

…. तन्वी अमित

एक सिरफिरे बूढ़े का बयान… हरीशचंद्र पांडे

एक सिरफिरे बूढ़े का बयान
हरीशचंद्र पांडे

काव्यवाचन
तन्वी अमित

प्रथमदर्शनी सहज वाटू शकणारी हरीश चंद्र पांडेची एकूण कविता जसजशी उलगडत जाते तिची आशयगर्भ मांडणी मनात दीर्घकाळ टिकून राहते.

एक सिरफिरे बूढ़े का बयान

आजच्या मार्मोरिस मध्ये.

नक्की ऐका.

प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत….

Do like share n Subscribe to the channel ✨

साधना… द भा धामणस्कर

साधना
द भा धामणस्कर

काव्यवाचन
तन्वी अमित

धामणस्करांची एकूण कविता सहज, संयत, प्रवाही, अर्थगर्भ… मराठी कविता कधी वाचणार अशी विचारणा मित्र मैत्रिणींनी केली… सुरूवात माझ्या अत्यंत आवडत्या कवितेपासून 🙂

साधना

आजच्या मार्मोरिस मध्ये.

नक्की ऐका.

प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत….

Do like share n Subscribe to the channel ✨

वेताल…

कविता – वेताल
उदयन वाजपेयी

काव्यवाचन
तन्वी अमित

ओढणी ह्या विषयावर किती लिहिले गेले आहे पण ह्या ओढणीला कवी ‘वेताल’ संबोधतो तेव्हा ती कविता वेगळी ठरते.

वेताल

आजच्या मार्मोरिस मध्ये.

नक्की ऐका.

प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत….

Do like share n Subscribe to the channel ✨

तुम मेरे कौन हो :-

तुम मेरे कौन हो
धर्मवीर भारती

काव्यवाचन
तन्वी अमित

कनुप्रिया… धर्मवीर भारतींची अभिजात कलाकृती. राधेच्या स्त्रीमनाची आंदोलनं समर्थपणे मांडणारं काव्य. ह्या विलक्षण संग्रहातील

तुम मेरे कौन हो

आजच्या मार्मोरिस मध्ये.

नक्की ऐका.

प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत…

Please like, Share n Subscribe to the channel.

जो मेरे घर कभी नहीं आयेंगे….

जो मेरे घर कभी नहीं आएँगे
विनोद कुमार शुक्ल

सादरीकरण –
तन्वी अमित

नवं वर्ष नवा प्रयत्न ✨
कवितेला पुन्हा भेटण्याचा…

विनोद कुमार शुक्ल, हिंदी कवितेतील एक अग्रगण्य नाव. 2021 या नव्या वर्षाची सुरुवात आपण सगळेच वेग-वेगळे संकल्प करून करणार आहोत त्यातलाच एक संकल्प म्हणावा अशी ही एक कविता.

कवीच्या जन्मदिवशी त्या कवीची कविता वाचून नव्या वर्षाच्या एका संकल्पाला मी ही सुरुवात करत आहे…

प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत…

नक्की ऐका.

Please like, Share n Subscribe to the channel.

थोड़ा-सा… काव्यवाचन

थोड़ा – सा
अशोक वाजपेयी

सादरीकरण
तन्वी अमित

समकालीन हिंदी साहित्यातील एक प्रमुख नाव – अशोक वाजपेयी. पूर्व प्रशासकीय अधिकारी असणाऱ्या अशोक वाजपेयी यांनी कवितेतील सफलता आणि सार्थकता याचे अतिशय उत्तम विवेचन कायमच केलेले आहे. त्यांच्या अनेक उत्तमोत्तम कवितांपैकी थोड़ा- सा या काव्याचे सादरीकरण आजच्या मार्मोरिस मध्ये.

नक्की ऐका.

Please like, Share n Subscribe to the channel.

सखि वे मुझसे कह कर जाते… काव्यवाचन

सखि, वे मुझसे कह कर जाते
मैथिलीशरण गुप्त

सादरीकरण
तन्वी अमित

हिंदी साहित्यातील एक मानाचे नाव. मैथिलीशरण गुप्त. सखि वे मुझसे कह कर जाते ह्या त्यांच्या लक्षणीय काव्यात त्यांनी सिद्धार्थ गौतमाची पत्नी यशोधरेचं मनोगत व्यक्त केले आहे.

यशोधरेच्या ह्या रुपातील भेट मार्मोरिस मध्ये.

नक्की ऐका.

Please like, Share n Subscribe to the channel.

ट्विंकल स्टार:

अनंत चतुर्दशी… दोन चर्चांनी वेढलेली. नेहमीप्रमाणे वाजतगाजत विसर्जन होत नाहीये म्हणून सुखावलेल्या आणि हळहळणाऱ्या चर्चा. आपण दोन्ही चर्चा वाचाव्यात किंवा तेही करू नये वगैरे तिसऱ्या मितीत…

घरात बाप्पा आहे अजून. त्याला निरोप देणे जमत नाहीये, म्हणूनच की काय मी शांतपणे गॅलरीत येऊन बसलेय. इथेही चर्चा पाठ सोडत नाहीये, विषय बदललाय इतकंच. बिल्डींग मधल्या कुठल्यातरी एक काकू दुसऱ्या काकूंना गव्हातांदळाला कीड लागू नये म्हणूनचे उपाय यावर काहीतरी सांगतायत, आणि दुसऱ्या काकू काहीतरी प्रतिक्रिया देत आहेत. अर्थात ह्या चर्चेबाबतही तिसरीच मिती निवडल्यामुळे चर्चेचा उत्तरार्ध माझ्यापर्यंत पोहोचू नये हे आपोआप साधले जाईल… प्रत्येकाचे विषय वेगवेगळे… गर्दीतून आपल्याला नेमकं काय ऐकू यावं हे ही प्रत्येकाचे ठरलेलं असतं.

या सगळ्या गर्दी गडबडीत एक अतिशय उत्साहाचा प्रामाणिक स्वर मात्र माझ्या पर्यंतची वाट काढून येतोय…

Twinkle twinkle Little star
गणपती बाप्पा Super Star

चिमुरड्यांची एक फौज बाप्पाला निरोप द्यायला निघालेली आहे… मुलांनी मास्क लावलेला असला तरी त्यांचा उत्साह माझ्यापर्यंत सहज येऊन पोहोचणारा…

गणपती बाप्पाला सुपरस्टार ठरवणारी नव्या पिढीची ही नवीच हाक मला नक्कीच आवडतेय. या हाकेत मी रमतेय तोवर मन मात्र धावत्या पावलांनी मनमाडच्या आमच्या कॉलनीत कधीच जाऊन पोहोचलं आहे… साधारण या मुलांच्याच वयाची मीही होते तेव्हा आमच्या कॉलनीला अगदी लागूनच असलेल्या हुडको या वसाहतीच्या मधोमध असणाऱ्या विहिरीत बहुतेक सगळ्यांच्या गणपतींचे विसर्जन व्हायचं… हुडको ही एकसारख्या घरांची वसाहत. आमच्या घरापासून विहिरी पर्यंतचे अंतर साधारण दोनशे किंवा तीनशे मीटर असावं पण बाप्पाला निरोप द्यायला जातांना ते पार करायला मात्र बराच वेळ लागत होता… अर्थात हे अंतर मोजले ते आत्ता, तेव्हा मात्र ह्या काकूंच्या घरापासून त्या काकुंचं घर ओलांडलं की पुढे मैत्रिणीचं घर, ते मागे गेलं की आलीच विहीर असं काहीसं समीकरण होतं…

वाटेवर गणपती बाप्पा मोरयाचा गजर आणि पुढल्या वर्षी लवकर या ही विनंती सारं जसं ठरलेलं… रस्त्यावरचे ओळखीचे अनोळखी सगळेच मग बाप्पाच्या धाग्यानी बांधले जायचे. तो तेव्हा आमच्यातला एक होता… एक-दोन-तीन-चार वर त्याचा जयजयकार व्हायचा, अर्धा लाडू चंद्रावर तेव्हा आमचा बाप्पा उंदरावर असायचा… विहिरीपाशी खिरापत, वाटली डाळ, खोबरं असा प्रसाद खात आरतीचा एक मोठा जयघोष होत मूर्ती पाण्यात सोडली जायची आणि परतीच्या वाटेवर मात्र आमचा बाप्पा गावाला गेल्यामुळे चैन पडेना आम्हाला अशी बहुतेक सगळ्यांचीच भावना असायची…

मनमाड सुटलं तसं मग नासिक, औरंगाबाद, कोकणातलं रोहा, मस्कतला भर अरबी समुद्रात जाऊन केलेलं गणपती विसर्जन तर अबुधाबी आणि शारजाहला केलेलं गणपती विसर्जन सारं काही आता मनासमोर येऊन जात आहे… आम्ही गणपती विसर्जनाला जात असू तेव्हा आमच्याही कुठल्या काकू अशा अलिप्तपणे आम्हाला बघत आपल्या माहेरच्या आठवणीत रमल्या असाव्यात तर कोणीतरी धान्य कसं टिकवावं ह्याची चर्चा करत असाव्यात का असंही क्षणभर वाटून जात आहे.

संध्याकाळ गडद होत जातेय.. दोन प्रहरांच्या संधीकाळात मी भूतकाळ आणि वर्तमानाच्या चौकटीपाशी रेंगाळतेय… किती मोठा प्रवास पार करत आपण “आज” पर्यंत पोहोचलेलो असतो… काळाच्या प्रवाहात मात्र सारं विरून जातं, विसर्जित होऊन जातं. तरीही एखादी आठवण त्या प्रवाहाला छेद देत तळापासून पुन्हा वर येते. काही काळ साथ करते आणि पुन्हा कधीतरी परतण्यासाठी किंवा कायमस्वरुपी काळाच्या पोटात विसर्जित होऊन जाते… आठवण आणि विचारांचे तरंग काळाच्या प्रवाहात एकामागे एक गिरकी घेताहेत…

विचारांपाशी आता तटस्थ थांबतेय मी. तिसऱ्या मितीतून त्यांच्याहीकडे बघत असल्यासारखी. त्यांच्यापाशी आहेही आणि नसल्यासारखी… हा ही एक प्रवासच…

मघा गेलेली चिमुकली फौज आता परतीच्या वाटेवर दिसतेय… मघाचा उत्साह आता फिकुटला आहे… आपापसात काहीतरी बोलताहेत पण पावलांना घराची ओढ आहे. वातावरणाचा रंग गहिरा होत जातोय…अंधाराची लाट आता वेढू लागतेय…

घरात बाप्पा आहे अजून…

घरात परतताना मनात विचारांची एक लहानशी चांदणी चमकते…

विसर्जनात सर्जन आहे… विस्मरणापाशी स्मरणही आहे…

ह्या चांदणीच्या, लहानशा ट्विंकल स्टारच्या अस्तित्वात प्रकाशाची दिशा ठरते आणि मूर्तीपुढच्या समईतली वात प्रकाशमान होते…!!!

✍🏻 तन्वी अमित