झोप …

झोप …मोठा सेंसिटिव विषय आहे आमच्या घरात….. म्हणजे मला आणि मुलाला अतिशय कमी झोपायला आवडते (ज्याला आम्ही quality झोप म्हणतो) आणि नवर्‍याला आणि मुलीला प्रचंड झोप येते. आमच्या सरळ सरळ दोन विरोधी पार्ट्या होतात… मग बाकी कितीही एकमत असले तरी झोपेचा विषय निघाला की वाद सुरु होतात. म्हणजे रात्रीचे नऊ वाजले की नवरा घड्याळ बघायला लागतो…. आणि सकाळी मुलाला शाळा आहे रे !!! झोपा आता….. वगैरे त्याचे पेटेंटेड वाक्य यायला लागली की आली याला झोप हे आम्ही ओळखतो.

त्यातही मग मुलाला झोपवायला म्हणुन हे महाराज त्याला बेडरुममधे नेतात  आणि पाचच मिनिटात “मम्मा …बाबा झोपला गं!!!” असे चिरंजिव सांगतात. मला स्वत:ला निद्रादेवी न वाटता निद्राराक्षस वाटतो. म्हणजे बघा ना…उद्या पेपर आहे, बराच अभ्यास बाकी आहे आणि आपले डोळे प्रचंड जड झाले आहेत. आपण मोठ्या मुश्किलिने काहीतरी एकाग्रचित्तने वाचायचा प्रयत्न करतोय आणि आपल्या डोक्यात काहीही प्रकाश पडत नाहीये….हा किती common सिन आहे.  कट टु.…… परिक्षा संपलेली आहे…… सुट्टीचा पहिला दिवस….. उद्या मी खुप वेळ झोपणार आहे हे आपण आधिच डिक्लेअर केलेलं आहे…… आणि पहाटे पहाटे आपल्याला जाग येते, बरं नुसतेच डोळे उघडत नाहीत तर टक्क जाग येते. नंतर काय either अंथरुणात लोळत पडा नाहीतर चरफडत उठा. हीच बाब नौकरीबाबतही, weekly off  ला नेमकी सकाळीच जाग येते. ही तर मोठ्यांची गत… पण कार्टेही सुट्टीच्या दिवशी न उठवता उठतात आणि आपल्यालाही उठवतात.

आमच्या घरात माझ्या नवर्‍याची ८-१० तास झोपुनही झोप पुर्ण होत नाही त्यामुळे त्याला नाइलाजाने उरलेल्या झोपेचा कोटा कंपनीच्या बसमधे पुर्ण करावा लागतो. अनेकवेळा डोक्याला टेंगुळ येउनही हा पठ्ठ्या काही ऐकत नाही. एकदा एक नविन रुजु झालेली मुलगी बसमधे होती. जागा नसल्यामुळे हे महाराज तिच्याशेजारी बसले आणि बस सुरु झाल्या झाल्या ह्यांची ब्रम्हानंदी टाळी लागली. त्यातही रस्त्यावरच्या सगळ्या खड्ड्यांमधुन आपली बस गेलीच पाहीजे हा ड्रायवरचा अट्टहास ….. ती बिचारी मुलगी सरकत सरकत आता खिडकीतून खाली पडेल की काय असे वाटत होते….हा झोपलेला नागोबा बसच्या हेलकाव्यांबरोबर मस्त डोलत होता. हा तिच्या अंगावर पडेल की नाही यावर म्हणे त्यादिवशी बसमधे बेटिंग झाले. अशिच माझी एक झोपाळू मैत्रिण…परिक्षेच्या दिवसात हिला रात्री जागून अभ्यास करण्याची हुक्की यायची. मग हिला जागं ठेवण्याची जबाबदारी आम्ही वाटून घ्यायचो. मांडीवर पुस्तक ठेऊन डुलक्या घेणार्‍या डोक्याला हाताचा आधार देऊन ही बसली की हमखास झोपलेली असायची….मग धक्का द्यावा लागायचा…..जरा जागी झाली की आरडाओरडा सुरु ’ ते कपड्यांना लावायचे चिमटे लावा रे माझ्या पापण्यांना…..’

असाच एक किस्सा माझ्या बाबांचा….आमचे एक परिचित एकदा त्यांचा कुत्रा घेऊन आले होते( लोकं कुत्रा का पाळतात???) ….हे गृहस्थ तर त्यांच्या घरी परत गेले पण कुत्रा मागे राहिला. रात्री केव्हातरी आईला आवाजाने जाग आली म्हणून शोधले तर तोपर्यंत घरात या कुत्र्याने मोठा गोंधळ घालून ठेवला होता. मग आरडाओरडा…आवाज करत मी आणि आईने त्याला घराबाहेर काढले. सगळ घर आवरले. हे होत असतांना बाबांच्या ज्या पलंगाखाली लपुन कुत्रा घरात राहिला होता त्यावर ते निवांत झोपलेले होते.

झोपणार्‍यांमधेही अनेक प्रकार आहेत….सतत वळवळ करणारे आणि घोरणारे हे त्यातले त्रासदायक टाईप. बरं हे घोरणारे लोक सकाळी उठल्यावर आपण झोपेत घोरतो हे अमान्य का करतात हे एक न उलगडलेले कोडे आहे. त्यातही ट्रेनमधे, बसमधे, विशेषत: कोणाच्या घरी गेल्यावर झोपु शकणार्‍या लोकांचा मला हेवा वाटतो. या लोकांची झोप आवाज, डास असल्या यत्किष्चित घटकांमुळे मोडत नाही. हुकुमी झोप हा असाच एक प्रकार…. हे लोक त्यांना केव्हाही झोप म्हटले की मिनिटभरात गाढ झोपेत असतात. ट्रेनमधे झोपेच्या नादात आपले स्टेशन सोडुन पुढे जाण्याच्या कथाही घडतात अश्याच. दुपारची झोप हा ही एक प्रकार….. माझं डोकं दुपारी झोपले तर जडं होतं आणि नवर्‍याचं नाही झोपला तरं. आहे की नाही भांडणाचा मुद्दा.

हे इंग्लिश्मधे टाईप करुन मराठी लिहिणे किती जिकिरिचे काम आहे नाही!!!! आई गं!!! जाम झोप आलीये……Good Night.  

Advertisements

मातृदिन

परवा एका मॉलमधे भाजी खरेदी करत असतांना सहज शेजारच्या दहा बारा वर्षाच्या मुलीकडे लक्ष गेले. ही मुलगी तिच्या आई बरोबर भाजी घेत होती. मायलेकी कैरी खरेदी करत होत्या.आई मुलीला कैरी कशी निवडायची ते समजावत होती आणि त्याप्रमाणे मुलीने ती निवडुन आईला दिली.नंतर त्या section मधे फिरताना पुन्हा त्या दोघिंशी गाठ पडली, पुन्हा तेच दृष्य. बिलाच्या रांगेतही लेक पुढे, मग आईचा सल्ला… टोमॅटो, केळी वर ठेव…. कांदे, बटाटे खाली ठेव ई. ई……….

माझं मन २०-२२ वर्षे मागे भुतकाळात गेले. अशीच आईबरोबर भाजी आणायला जाणारी मी…… बटाटे शक्यतो एकाच आकाराचे आणि वजनाचे निवडावे, मेथी लाल काठाची घे, पालेभाजी ची जुडी नेहेमी मधे check करावी नाहीतर ती खराब निघु शकते, भरताची वांगी वजनाला हलकी बघ, टोमॅटो हलक्या हाताने दाबुन बघावा………. एक ना दोन. किती सहज सांगायची आई सगळं. पण आज ती शिदोरी जवळ असल्यामुळे संसारात किती मदत होते.

आखाती देशात २१ मार्च ला मातृदिन साजरा करतात. इथल्या पपेर्समधे, मॉलमधे त्यानिमित्त वेगवेगळ्या जाहिराती, स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. आपल्या आईला मेसेज पाठवा… सर्वोत्तम मेसेजला बक्षिस किंवा यातलं कोणते गिफ़्ट तुम्ही तुमच्या आईला द्याल छाप contest ही आहेत.

आज अनेक विचार आहेत मनात…… मला माझ्या आईने काय दिले ते मी एक आई म्हणुन माझ्या मुलांना मी काय देणार पर्यंत. त्यामुळे आज मनं माझ्या आईची लेक ते माझ्या मुलांची आई या माझ्या प्रवासाचा आढावा घेतयं. खरं तर “ आमची आई” या विषयावर आजवर अनेकांनी लिखाण केलेलं आहे.तरिही माझी आई कशी आहे हे सांगण्याचा मोह मात्र आवरत नाही!!! कठिण आहे ते, कारण जिने मला जन्म दिला, या जगात येतांना केवळ जिच्या ह्र्दयाच्या ठोक्यांची ओळख होती तिच्याबद्दल लिहिण्याची संधी सोडण्याचा करंटेपणा मला करायचा नाहीये.

आई ….. प्रामुख्याने दोन रुपे आहेत तिचे. एक कणखर बायको, मुलगी, बहिण, आई, आजी, सासु या रुपात भेटणारे तिचे पहिले रुप. सतत सगळ्यांच्या मदतीला धावणारी…प्रसंगी त्याबद्दल तीला आमच्या कटकटीलाही सामोरे जावे लागते. एक सक्षम शिक्षिका… एक जबाबदार पत्नी, आई. वैयक्तिक आणि घराच्या प्रगतीबाबत जागरुकतेने निर्णय घेणारी… त्यासाठी गरज पडली तर कठोरपणे निर्णय घेण्याची क्षमता असणारी. तितकीच प्रेमळं…. मुलांना, नातवंडाना काहिही झाले तर पटकन घायकुतीला येणारी. खुप काळजी करणारी अशी…… तिचे दुसरे रुप मात्र मजेशिर आहे. आईला कधिही विचारले की “ आई अगं तांदुळ कुठल्या डब्यात आहेत?” की तिचे हमखास ठरलेले उत्तर येते “ बघ बाई वरच्या नाहीतर खालच्या डब्यात असतीलं.” किंवा आम्ही घरात नसतांना आमच्यासाठी कोणाचा फोन आला तर त्याचे नाव सांगायची तिची पद्धत मोठी unique आहे, त्या अनिल की सुनिल की रमेश का सुरेश कोणाचा तरी होता बाई फोन. नावं अजिबात लक्षात ठेवायची नाही हा गुण मी अगदी सही रे सही उचललाय तिचा. मागे एक खुप जुनी मैत्रीण रस्त्यात भेटली आणि म्हणे “ ओळखलसं का?” आता चेहरा वाटत होता ओळखीचा पण नावाबाबत मेंदुच्या कानाकोपर्‍यात शोधलं तरी नाव आठवेना… बरं याबाबत धाकटी बहिण नेमकी बाबांवर गेलेली तिला लोकांचे नावच काय कुंडलीही पाठ. पण पठ्ठीने काही माझी बाजु सांभाळली नाही …..मस्तपैकी मंद स्मित करत माझी फजिती बघत होती कार्टी. अरे !!विषयांतर होतेय….

आईमधे एका सुशिक्षित आणि सुसंस्कारी स्त्रीची प्रतिमा मला कायम दिसते. ’दिसते’ म्हणण्याचे कारण माझे लग्न होईपर्यंत अस्मादिकांना आई हिटलर वाटायची. सतत अभ्यास कर, घर आवरुन ठेव, अगं अशी अजागळ राहु नकोस छाप अनेक सुचनांचा भडिमार करणारी आणि त्या न पाळल्यास रागावणारी आई जवळची न वाटता बाबा कायम मित्रासारखे वाटले. अनेक वेळा आईचा हळवेपणा, प्रेम जाणवायचे पण हा आपला हक्क आणि तिचे कर्तव्य आहे अश्या आविर्भावात तिला कायम गृहित धरले गेले.

लग्न झाले मग सासरी ’ए आई गं!!’ आणि ’ अहो आई!!’ मधली सुक्ष्म रेषा तिच्या अस्तित्वाची जाणिव करुन देत् गेली. संसारातल्या स्वयंपाक करणे, भाज्या चिरणे यासारख्या अनेक लहानमोठ्या जबाबदार्‍या पार पाडताना मला माझ्यातल्या ’मी’ मधे तिच असलेलं अस्तित्व जाणवत होतं. जे काही लहानमोठ यश आपल्याला मिळतय त्यात तिच्याकडुन कळत नकळत झालेल्या संस्कारांचा मोठा वाटा आहे हे उमजत गेलं.आणि हळूहळू मी आईच्या जवळ येत गेले. आपल्या आईला कितीतरी गोष्टी न सांगताच समजतात आणि ती किती सहजपणे solutions देते हे ही जाणवलं.माझीच आई मला नव्याने मिळत होती. मला आठवतयं एरवी कणखर असणारी आई माझ्या पहिल्या डिलिवरीनंतर बांध कोसळुन रडली होती. मला रुममधे शिफ़्ट केल्यानंतर सगळेजण बाळाकडे धावले आणि आई माझ्याकडे. तेव्हापासुन तिच आईपण पुन्हा नव्याने समजलं. तिचे कष्ट, तिने केलेली जागरण….खरच निरपेक्षपणे ही बाई किती करत असते मुलांसाठी.

आज वाटतय “ माझी आई कशी होती!!!!” याचबरोबर “ मी एक मुलगी म्हणुन कशी होते !!!” याचाही हिशोब मांडावा. आज माझ्या संसाराला आठ वर्षे पुर्ण झाल्यावर आईनी घेतलेल्या कित्येक निर्णयांमागची तिची भुमिका मला समजू शकते. बरेचदा मला कोडे वाटत असे की ही का अशी वागतेय? पण आता सगळं समजते तेव्हा ती दर वेळी कशी योग्य होती हे जाणवते. आता तर मीदेखिल एका मुलीची आई आहे, आता समजतेय तिची काळजी. तिने आम्हाला जागरुकतेने वाढवण्यासाठी केलेली धडपड.

आज मला आई खुप खुप भावते….. पटते…. समजते. त्याचबरोबर जाणवते की उतारवयात आपण आपल्याच आईचं मातृत्व स्विकारायच आहे आणि आपल्याला मोठे करतांना तिची जी हौस करायची राहिलीये ती सगळी पुर्ण करायची. तिचे माहेरपण करायचे…….

किती लिहिणार आता…..

या मातृदिनाबद्दल सगळ्या आयांना (माझ्यासहित) मनापासुन सलाम!!!