मस्कतमधली आजी….

काल काही कामानिमित्त एका शॉपिंग मॉलमधे गेलो होतो. गाडी पार्क करताना बाजुला एक नववारी साडी (इथे साडी ऐवजी पातळ म्हणणे जास्त योग्य होइल नाहे का!!!) नेसलेल्या आजीबाई आपल्या मुलाचा आणि सुनेचा (किंवा लेकीचा आणि जावयाचा) हात धरुन जाताना दिसल्या…. मस्कतमधे नउवारी साडी……आजकाल महाराष्ट्रातल्या शहरांमधे चटकन न सापडणारे हे वैभव मस्कतमधे !!!!! नवऱ्याला म्हटल्ं अरे लवकर कर गाडी कुठेतरी पार्क, मला त्या आजींना भेटायचे आहे.
गाडी पार्क करुन मॉलमधे पोहोचेपर्यंत धीर नव्हता…कुठल्या असतील त्या आजी? पुण्याच्या, मुंबईच्या, मराठवाड्यातल्या, विदर्भातल्या की माझ्या नासिकच्या??? त्या बोलतील का माझ्याशी?……नाही कारण सर्वसाधारणपणे मराठी माणुस पटकन दुसऱ्या मराठी माणसाशी बोलत नाही असा आम्हाला इथल्या दोन वर्षाच्या वास्तव्यात आलेला एक कटु अनुभव…..समोरच्या मराठी माणसाला कळले की आपणही मराठीच आहोत की एकतर तो साहेबाच्या भाषेचा आधार घेतो किंवा गप्प बसतो…….त्यातही सुरुवातीला मी थोडा लोचटपणा केला आणि एक दोन जणांशी केला बोलायचा प्रयत्न..पण जे काही अनुभव आले त्यावरुन पुन्हा काही हिंमत केली नाही….अर्थात त्यातही अपवाद आहेतच. असो!!! आत्ता हा मुद्दा नाहिये…विषयांतर होतय…
मॉलमधे पोहोचलो नवऱ्याला आणि मुलाला सांगुन ठेवलं होतं , मी काय ती खरेदी करणार आणि तुम्ही सगळीकडे लक्ष ठेवा…आजी कुठे दिसतेय का ते पहा…..सगळी खरेदी झाली, बिलिंगही झाले पण हाय राम !! आजीबाई कुठेच नाहित…. घरी निघतच होतो की जिन्याजवळच्या खुर्चीत आजी दिसल्या……धावतच गेलो म्हटलं “मराठी आहात का?” …..माझा हात पटकन हातात घेउन म्हणाल्या “ हो गं!!!” गोऱ्या पान, गोष्टीतल्या आजींसारख्या आजीला बघुन मुलं तर खुपच खुश होती. मरुन रंगाची साडी मस्त खुलुन दिसत होती त्यांना….आणि चेहेऱ्यावरचं गोडं स्मित, मनात आलं आपलं काहीही चुकलं नाही गड्या या शोधात….
आजीच्या हाताच्या त्या उबदार स्पर्शानीच ईतका आपलेपणा वाटत होता की ही आपली पहिलीच भेट आहे ही जाणिव नाहिशी झाली. आम्ही दोघी जणी भरभरुन बोलत होतो…आणि अहो आश्चर्यम आजी महाराष्ट्रातल्या नव्हत्याच..त्या होत्या बडोद्याच्या.
गप्पांमधे जाणवत होतं त्यांचही एकटेपण!!! कोणी नाही गं इथे बोलायला…परदेशात मुलांबरोबर येणाऱ्या बहुतेक सगळ्या वृद्धांची व्यथा……. म्हटलं आता असं म्हणु नका …माझ्या घरात सगळेच खुप बडबडे आहेत, आपण गप्पा मारत जाउ या आता. त्या सांगत होत्या की विकएंडला मुलगा आणि सुनेबरोबर इथे येते, थोडा वेळ बसते..निदान चार लोक दिसतात इथे. म्हणाल्या बोलत नाही गं इथे चटकन कोणी…….म्हटलं असु द्या ……आपण गप्पा मारुया. अर्ध्या तासात भरपेट बोललो एकमेकिंशी…खुप वर्षानी भेटलो होतो जश्या. एव्हाना ’अहो आजी’ ची ती ’ए आजी’ झालेली होती. म्हणाली ”आज घरातुन निघतांनाच वाटत होतं की आपल्याशी कोणितरी बोलावं!!!!”
तेव्हढ्यातच त्यांचा मुलगा आला..त्याच्याशीही बोललो…एकमेकांचा पत्ता , फोन नंबर घेतला.तिथुन निघालो ते त्यांच्याकडुन आमच्या घरी यायचा शब्द घेउनच. मॉलमधेच त्यांना वाकुन नमस्कार केला….” मुलांनो खुप मोठे व्हा!!!” आजीनी आम्हाला तोंड भरुन आशिर्वाद दिला. जाणवलं आजीच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या आहेत….काय होतय कळत नव्हतं पण मनात खुण पटली होती…..ओळख जाणवली होती आम्हाला तिच्याशी असलेली…..शेजारची अरेबिक बाई आमच्याकडे पहात होती…..तिला भाषा नव्हती कळत आमची पण भावनांना कधी भाषा असते का..तिच्या चेहेऱ्यावरचं हसु सांगत होतं तिला समजतोय हा आनंद सोहळा……
गेल्या दोन वर्षात त्या मॉलमधुन पैसे देउन आम्ही अनेक वस्तु घेतल्या..पुढेही घेत राहु….पण काल निव्वळ प्रेमाचा देवाणघेवाणीवर मिळालेला हा अमुल्य ठेवा मात्र हृदयात घर करुन गेला….
निघतांना मुलगा म्हणाला,” मम्मा !! आता इथे आलं की नेहेमी आपल्याला आजी आठवेल ना!!!!!”

Advertisements

दात………..

’पडला का रे??’…….’कितने दिन हिलने वाला है? बच्चे को दर्द हो रहा है क्या?’…….’मम्मा!! हाऊ मेनी डेज विल ईट टेक?’ वगैरे अनेक प्रश्नांचे काल उत्तर मिळाले. हो ! आमच्या चिरंजिवांचा दुधाच्या दातांपैकी पहिला दात पडला. आता यात काय नविन, सगळ्यांचेच दात पडतात आणि नविन येतात असे तुम्हाला वाटण्याची दाट (चुकुन आधि दात असेच type केले होते….) शक्यता आहे….. पण एक आई म्हणुन या घटनेचे महत्व समजायला आईच व्हावे लागते( ऊसके लिये माँ का दिल होना चाहिये ….). मुलाला पालथे पडता येणे, तो रांगणे, दात येणे, चालता बोलता येणे या टप्प्यांप्रमाणेच दात पडणे सुद्धा ’Something must be celebrated..’ याची जाणिव झाली.

तर झाले असे की माझा मुलगा आता साडे सहा वर्षाचा झालाय…. त्याच्या एका मित्राच्या (त्यांच्या भाषेत friend च्या) आईने एक दिवस मला विचारले “ईसके दात गिरने लगे क्या?” आणि आमच्या डोक्यात प्रकाश पडला अरे हो ! आता दात पडतील नाही का याचे. मग किती मोठा झाला रे शोनुल्या वगैरे म्हणत त्याचे दात जरा तपासले…काही नाही सगळे आपापल्या जागी ठाम ऊभे होते. त्यानंतर २/३ महिने गेले तरी काही चिन्ह नाही, तो विषयही डोक्यातुन गेला.. आणि एक दिवस अचानक राजे समोर उभे म्हणे “ मम्मा हा जो फ़्रंट चा दात आहे ना तो मूव होतोय बघ!!” हलला रे हलला !! मग आजी आजोबा , मावशी सगळ्यांना फोनवर बातमी देण्यात आली. काय पण सल्ले दिले त्याच्या मित्रांनी….. एक म्हणे पेन्सिल शार्प करुन ती त्या हलणार्‍या दाताच्या मागुन टाक आणि त्याला पुश कर… दातावर रुमाल टाक आणि हळुच दात ओढ…ई.ई. मग आमचे सल्ले ’बाळा यातलं काहीही करु नको”.. करत करत ४/५ दिवस गेले पण हलत हलत त्या दाताने किल्ला लढवला, जाम पडला नाही तो.

’मम्मा ब्रश जपुन करुन दे’, ’मला पोळी नाही खाता येणार..इडली दे’, या प्रकारात मोडणारे यतेच्छ लाड करुन घेतले कार्ट्याने.

रोज सगळ्यांचा तोच प्रश्न ’पडला का रे?’. त्या निमित्ताने आमचीही एकदा बालपणाची उजळणी. हो! मी आणि नवर्‍यानी या विषयावर काही कधी चर्चा केलेली नव्हती….तुझे दात पडायला कधी सुरुवात झाली, तुला काही त्रास झाला होता का? या यादीत चिरंजिवांच्या प्रश्नांची भरं… तुमचे पण दात असेच हलायचे का? मग आता माझा दात परत कधी येइल? आता next कोणता दात् पडणार? वरचा की खालचा? तुझे दात कोणत्या सिक्वेंस नी पडले होते?( काय सांगणार कपाळ!! कोणाला आठवतो हा सिक्वेंस!!) तुझा आणि बाबाच्या दात पडण्याचा सिक्वेंस सेम होता का?( सरळ हो म्हणुन उ्त्तर दिलं.) बाप रे!! किती ते संशोधन…..

मला आठवतयं आमच्या लहानपणी दात पडल्यावर तो आम्ही वर उंच फेकत असु,त्यामुळे म्हणे नवीन दात लवकर येतो….नवीन येणार्‍या दाताला जिभ लावायची नाही,तसे केले तर तो वाकडा येतो हा सल्ला न जुमानल्यामुळे मी सह्याद्रीच्या पर्वतरांगांना लाजवेल अ्श्या वेडया वाकडया शिखरांची माळ तोंडात बाळगुन आहे. आणि हे असे दात लकी माणसांचे असतात हे आधिच नवर्‍याला सांगुन ठेवले आहे.

पण मुलगा महा वात्रट त्याने आधिच जाहीर केलेय की मम्मा मला तुझ्या सारखे दात यायला नको ..बाबाचे दात मस्त आहेत ,मला तसेच हवेत. तथास्तु म्हणण्याशिवाय पर्याय नव्हता.

तर !! काल बाळराजे शाळेतुन घरी आले तेच विजयी मुद्रा घेऊन… त्या हलणार्‍या दाताने काल अखेर हार मानली आणि तो शरण आला. आता हे झाले शाळेत त्यामुळे मला त्या घटनेची साक्षीदार नाही होता आले.पण त्या दाताचे कलेवर एका टिश्यु पेपरमधे भरुन नर्स नी दिले आहे…..आता तो आम्ही उंच फेकणार आहोत. पुढचा दात लवकर आला पाहिजे ना!! सद्ध्या आम्ही त्याला “ए दातपडक्या!!”, “दातपडी माऊ” आणि “तुझा दात उंदराने नेला” वगैरे चिडवतोय.

काय खुश आहे पिल्लु माझं !! अनेक फोटो काढुन झालेत..आणि सगळ्यात चीssssssssज करुन हसणे सुरु आहे. हो आता चेहर्‍यातला गोडवा थोडा कमी झालाय हे माझे मत. ’पण आता मी मोठा झालोय मम्मा” हे जेव्हा तो सांगतो ना तेव्हा खर सांगु त्या पडलेल्या दातासहित खुप गोड दिसतो. आणि एक आई म्हणुन नाही म्हटल तरी डोळे भरुन येतात “खरच पिल्लं कधी मोठी होतात कळतच नाही!!” एक दिवस असाच हा मुलगा शिक्षणासाठी, नौकरीसाठी कुठे दुरही जाईल तेव्हा माझ्याकडे असतील त्याच्या गोड आठवणी आणि हे असे अनेक फोटो अल्बम. त्याला खिडकीत उभे करुन त्याचे हसणारे फोटो राहिलेत की काढायचे आणि हो दोन्ही मुलांचा दात दाखवणारा फोटोही काढते आता…….हवाय मला माझ्याकडे 🙂