विमानप्रवास…

झालं आमचं भारतात जाणं जवळ आलय, बॅगा भरण सुरु आहे. एकीकडे मुलाची परिक्षा सुरु आहे….ती गडबड आहेच…त्यात भर म्हणजे मस्कतमधे उन्हाळा भरात आहे सद्ध्या……तापमान ४५ चा पारा कधीच ओलांडलाय. सामानाच्या याद्या करणं त्यानुसार ते भरण हे माझे आवडते काम…ते तसे झाले नाही तर मी उगाचच रेस्ट्लेस होतं असते. त्यामुळे मी एकएक वस्तू बॅगेवर नेउन ठेवणं आणि माझ्या अतिकामसू लेकीने त्या वस्तू परत जागेवर किंवा तिला ती वस्तू जिथे पहायला आवडेल तिथे नेउन ठेवणंही सुरु आहे….

मुलगा शाळेतून घरी आल्यावर त्या बॅगांची Ice-cream ची गाडी करतोय…त्यामुळे फूटू शकेल असे सामान आम्ही शेवटच्या दिवशी भरणार आहोत…..हे शेवटच्या दिवसाचे सामान हा अतिशय स्फोटक मुद्दा असतो…त्यातले नेमके काहितरी विसरते आणि मग ते प्रवासातच आठवून प्रवासाची मजा जाते…..

थोडक्यात काय तर सगळ कसं अगदी आखिव रेखीव चाललय…त्यात नवरा येणार नाहिये त्यामुळे माझ्यासोबत दोन मोठमोठ्या स्वत:च्या ईच्छेने न हलणाऱ्या बॅगा आणि माझी कितीही ईच्छा असली तरी एकाजागी न बसणारी दोन कार्टी असा जामानिमा आहे. आता आमचा विमानप्रवास हा असतो मुळी २-३ तासाचा त्याच काय कौतूक असे माझ्या अमेरिकास्थित मैत्रीणींना वाटते पण मी खरी गंमत सांगितलीये कुठे अजुन……

विमान प्रवास असे नुसते नाव काढले तरी मला गरगरायला लागते……याबाबत मी थेट ’प्यार तो होना ही था’ मधल्या संजना ची बहिण आहे……मी तर मनापासुन वाट पहातेय की एकाद्या शुभ दिनी समुद्रातुन मस्त रेल्वे लाईन टाकली जाईल मुंबईपर्यंत आणि मी सुखाने प्रवास करेन…….

त्यात मी विमानात देवाचे नाव घेत स्वस्थ बसून रहाव तर माझी दिव्य कार्टी मोकाट सुटतात तिथे……मम्मा clouds बघ….आत्ता आपण किती हाईट वर आहोत…..बाहेर पडलो तर काय होईल…..शिट यार मम्मा तुला स्विमिंग पण येत नाही…..बाबा हवा होता सोबत…..ईति चिरंजीव.

त्याला म्हटल, “ अरे बाहेर आता खुप थंडी आहे..” तर तो म्हणे पण का बरं आपण तर आता Sun च्या जवळ आहोत ना….मग it should be hot…..u r telling lies. मी ना समजावण्याच्या मन:स्थीतीत असते ना रागावण्याच्या…मी मुळात कसल्याच मन:स्थीतीत नसते कारण मी जिथे कुठे नजर रोखलेली असते तिथुन ती मला हलवायची नसते नाहीतर गरगर सुरु…..ह्याचे आपले अखंड प्रश्नावली सत्र सुरुच असते…पायलट काका ब्रेक कसा लावतात, विमानाला गियर असतात का, सिग्नल लागतात का….आयला मम्मा आपल्याला घ्यायला कोणी आलेच नाही तर….(गाडी परत पायलटवर)काकांनी स्पीड हवेत कमी जास्त केला तर आपल्याला कळते का…..कहर म्हणजे “आपण बुडालो तर आपल्या सामानाचे काय??” असा प्रश्न त्याने विचारला होता मला……मी आपलं मन , डोके जे काही म्हणुन ठिकाणावर ठेवता येइल ते ठेवून त्याला गप्प बस असे सांगत असते……

माझी लेक…..हीचा वेगळाच गोंधळ सुरु असतो….तिला एका जागी बसायचे नसते…..जन्मापासूनच ती मुक्त विचारांची असल्यामुळे ’सीट बेल्ट’ नावाची बांधिलकी ती मानत नाही….. बर पडल्या तर पडू दे या मायलेकी असा विचार एअरहोस्टेसच्या तत्त्वात बसत नाही त्यामुळे ती बेरक्या नजरेनी आम्हा दोघींवर लक्ष ठेवून असते….ईतरांची लहान मुलं कशी विमान सुरु झालं की बाबाच्या (आईच्या नाही…ती शांतपणे सीटवर झोपते) कुशीत झोपून जातात….आमचं पात्र मात्र बागेत आल्यासारख विमानभर फिरत असतं…प्रत्येक प्रवाश्याशी आपली ओळख झालेली बरी या दुरदृष्टीने ती ईरेला पेटलेली असते…आणि मग पुन्हा तिची एअरहोस्टेस काकु( मुलं त्यांना काकू म्हणतात….त्या अरेबिक असल्यामुळे त्यांना कळत नाही नाहितर त्यांनी आम्हाला समुद्रात ढकलुन दिले असते…) चेहेऱ्यावर शक्य तेव्हढे नैसर्गिक हसू आणत लेकीला जागेवर बसवते….

त्यातच तो जेवण नावाचा अत्याचार येतो…मी ठणकावून “No thanks…” असे सांगितल्या सांगितल्या चिरंजीव , “मम्मा मला भूक लागली आहे..” ची घोषणा करतात…मग ती ताटं सांभाळणे…त्यातले अर्धे काय आहे तेच न उमजणे….असले प्रकार ओघाने आहेच….त्यातच हुश्श !!! आलं मुंबई म्हणाव तर आमच्या विमानाला अनेक घिरट्या घालाव्या लागतात…मुलगा नुकतच खाल्ल्यामुळे अधिकच फ्रेश झालेला असतो मग तो हळुच विचारतो… “मम्मा पेट्रोल संपले तर???”

कसेबसे विमानाची चाक आणि आमचे पाय जमिनीला टेकतात….. मी अगदी ये जो देश है तेरा वगैरे मनात म्हणणार तोच दोघा मुलांपैकी कोणी तरी कोणाला तरी डिवचलेले असते…मग मी देशप्रेम वेटींगला ठेवुन पायपीटीसाठी तयार होते……आमचा जथ्था ट्रॉली घेउन सामानासाठी उभा होतो….पण इथेही सगळे लोक संपत आले की आमचे सामान बेल्टवर येते…………

रामा रामा रे …..मला का बरं गरगरतय…….मनाने तर मुंबई गाठली पण मला अजुन पोहोचायचे आहे……नाही मला अजून लिहायचेच नाही…..

त्याआधी नवऱ्यासाठी चिवडा लाडु करायचे आहेत……………

तसेही मस्कत मुंबई ट्रेन होईपर्यंत………… “जय विमान …जय राईट बंधु…”

Advertisements

5+6=12

काल माझी आणि मुलाची वादावादी झाली……खर तर या वाक्यामागे ’पुन्हा एकदा’ हे विशेषण लावणे योग्य ठरेल कारण आम्ही दोघं उठता बसता वाद घालत असतो……बरं “तुझं माझं जमेना…..” चा प्रॉब्लेमही आहेच.

काल त्याला काही गणितं म्हणजे सम्स (त्याच्या भाषेत) दिले होते करायला…..जे सोडवून त्याने थोड्या वेळाने मला चेक करायला दिलेले होते………जवळपास सगळे बरोबर होतं….व्हेरी गुड असा शेरा देणार तेव्हढ्यात नेहेमीचा गोंधळ दिसला……………..पोराने 5+6 चे उत्तर 12 असे लिहुन ठेवले होते.

जोरात ओरडले मी “ अरे भानात राहुन अभ्यास करत जा ना जरा…..लक्ष कुठे आहे तुझे? आणि काय रे 5+6 चे उत्तर 12 लिहायचे युनिवर्सल पेटंट घेतले आहेस का तु? किती वेळा तीच चुक करतोस तु?”

एव्हाना ती वही माझ्या हातात कोंबुन चिरंजीव Mr. Bean पाहण्यात गुंग झालेले होते…….या कार्यक्रमाचा मला भयंकर राग येतो……एकतर मला तो Bean नावाचा प्राणी अजिबात आवडत नाही आणि मुलाचे ते दैवत…मोठ्या मुश्किलीने भांडणाचा मुद्दा बदलु न देता मी त्याला परत हाक मारली…………

–“तुला हाक मारतेय मी!!!!”

–“मम्मा, पेटंट म्हणजे काय ग!!”

–“शुंभा ते सोड आधि मला 5+6 किती ते नीट सांग……………..”

गेले 6 डोक्यात आणि 5 बोटे वर… मोजणे सुरु……. ही त्यांची पद्धत आहे, बेरिज करतांना एक आकडा इन माईंड आणि दुसऱ्या आकड्यायेव्हढे फिंगर्स आउट…मग मोजामोजी सुरु…………………..

–“ईलेवन मम्मा…”

–“अरे मग एकावर एक असे लिहित नाहीये का पेन्सिल तुझी……………..”

–“ही ही ही !!!”

–“ कार्ट्या तुला जर 10 टाईम्स हेच सम दिले तरी तु पुन्हा एकदा तरी तीच चुक करशील…………….”

–“ छकुली आता बघ हं एकदम फनी सिन आहे……………ए सरक ना छकुली तिकडे नाहीतर दुसरीकडे जाउन    बस…………….”

(हा मुलगा निवांतपणे बहिणीशी बोलतोय……………माझ्याकडे सरळ दुर्लक्ष करुन……………)

–“ईकडे बघ नाहीतर T.V. बंद करेन हं मी आता………….”

–“मम्मा काय ग रोज तेच ते सम्स देते…… तु पण आणि ती टिचर पण एकदम सेम आहात……… simple addition, addition with carry, simple subtraction, subtraction with borrowing………..word problems………..मम्मा मला जाम बोअर झालय गं………………..”

(लेकरु पोटतिडकीने बोलत होतं…….)

–“ झालं रे बाळा आता ही एक्झाम झाली ना की मग सुट्टी सुरु………, बर उद्या काय आहे आता?”

–“ मला नाही माहित तुच टाईमटेबल बघ…”

मी उठुन दाराला चिकटवलेल्या कागदापुढे उभे राहुन उद्याच्या परिक्षेच्या विषयाचा शोध घेउ लागले………………. १६ मे ला सुरु झालेली ही परिक्षा संपत होती १ जुनला………खरच किती दिवस चालणार हा प्रकार म्हणून मुलाचे वैतागणे साहजिकच होते…………अभ्यासात मोजुन चार विषय ईंग्लिश, गणित, हिंदी आणि E.V.S. आणि परिक्षा १५ दिवस………..

एरवी ’मॉनिटर क्लास 2 A’ अशी ओळख मोठ्या तोऱ्यात मिरवणार माझं पिल्लु अनाठायी चिडचिड नव्हत करत तर…………….बरं शाळेची वेळ सकाळी ८ ते दुपारी १.१५ पर्यंत..घरुन सकाळी ७ वाजता गेलेला हा मुलगा दुपारी २ च्या सुमारास घरी येतो, मग त्याला कंटाळा आला तर त्याचे खरच काही चुकतेय का?

ईंग्लिश या एकाच विषयाच्या दोन धडे या महान सिलॅबसवर बेतलेले हे पेपर पहा…………

Dictation, Grammar, Comprehension, Literature, Listening Skills, Picture Composition, Reading and Recitation…………. अबब यादी लिहिताना सुद्धा दमायला होतय……बर हे सगळे पेपर्स वेगवेगळ्या दिवशी. हिंदी मधे एक दिवस ’आ ’ की मात्रा आणि ’छोटी इ’ की मात्रा आणि मग दुसऱ्या दिवशी ’बडी ई’ आणी ’उ’ की मात्रा………….गणिताचे तसेच…………माझ्या डोळ्यासमोर चित्र उभे राहिले माझ्या ईतिहास विषयाचे असे वर्गीकरण झालेले….एक दिवस गाळलेल्या जागा, मग जोड्या लावा, मग घटना आणि सनावळ्या, एका ओळीत उत्तरे, २/३ ओळीत, मग ८-१० आणि शेवटच्या दिवशी १६ ओळीतली उत्तरे……..देवा मी दहावीपर्यंत तरी शिकले असते का अश्याने !!!!!!!!!!!!!!!

तडक गेले आणि मुलांशेजारी बसले…..मुलगा म्हणे कसलाय ग उद्या पेपर???.

म्हटलं कसला नाही, काय करतोय तुझा Mr.Bean, पोरगं खुश…………….मनमोकळेपणे बोलायला लागलं…….भरपुर गप्पा मारल्या….. “मम्मा, girls are not clever…boys are clever” म्हणुन मला चिडवुनही झाले……..दिवस कसा मस्त गेला……………….

दुसऱ्या दिवशी तो शाळेत जायला निघाला…..अचानक काहीतरी आठवुन थांबला……….मला जवळ घेउन म्हणाला, “तु नको काळजी करुस मी 5+6 = 11 लिहीन exam मधे………………मम्मा आय लव यु………..मी काल त्रास दिला ना तुला…..सॉरी… प्रॉमिस मी छान करेन…मला तुला जिंकवायचं आहे………………”

डोळ्यातले पाणी लपवुन त्याला बसमधे बसवून आले……….अभ्यासाला सुट्टी दिली तरी मुलाचे शिक्षण सुरुच होते तर………………..

Value Education किंवा  value असलेले education यालाच म्हणतात नाही का!!!!!!!!!!!!!!!

साधू संत येती घरा……

कुठल्यातरी डिजिटल टि.व्ही. च्या कोणा एका स्पर्धेच्या विजेत्यांकडे रेहेमान, करिना कपूर ई. मंडळी जाताहेत म्हणे… परवा सहज लक्ष गेले तर त्यादिवशी करिना कपूर कोणाच्यातरी घरी जाणार होती….. करिनाला या अनुभवाविषयी काय वाटते, तिच्या त्या घरातल्या लोकांकडुन काय अपेक्षा आहेत, तिला काय खायला आवडते छाप मुलाखत एकिकडे दाखवत होते…आणि त्याचवेळी याच मुद्द्यांबाबत त्या घरातल्या लोकांचे मतं ..असे ते प्रसारण सुरु होते….

करिना बद्द्ल मी तशी neutral आहे म्हणजे ती आवडत्या किंवा नावडत्या नट्यांच्या यादीत नाही…..रेफ्युजी, ऐतराज , जब वी मेट सारख्या सिनेमांमधे ती आवडलीही होती… मला आवडतो तो तिच्या चेहेऱ्यावरचा टवटवीतपणा…………. अगदीच गेला बाजार ’क्योंकी’ नावाच्या सिनेमामधलं तिचं साडीतलं रुपही आवडलं होतं.

तर यावेळेस ती ज्यांच्या घरी येणार होती ते कुटुंब मराठी आहे हे समजल्यावर तो कार्यक्रम पुढे पहायला सुरुवात केली. त्यांनी केक, सॅलड वगैरे तयार ठेवले होते……सगळेजण उत्सुक असल्याचे सांगत होते. इथपर्यंत ठीक होतं सगळं……. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ना हा लेखप्रपंच नक्की कीं कारणमं आहे ते!!! नमनाला घडाभर ओतत होते मी………..बाकी काही नाही….

या सगळ्या गुडी..गुडी अतिउत्साही वातावरणात एक काकु हिंदी ईंग्लिशमधे भरभरुन बोलत होत्या …आणि अचानक त्या म्हणाल्या…….” In Marathi we say.. साधु संत येती घरा तोची दिवाळी दसरा…..  so today Kareena is coming, it’s like diwali for us.”

आता ये बात हमको खरच कुछ हजम नही हुइ!!! नाही म्हणजे करिनाला साधु किंवा संत यातले काय म्हणु शकतो आपण हा भुंगा डोकं पोखरतोय (आहे मला ते!!!) …….. मला आपले उगाचच भगव्या वस्त्रातले करीनाचे रुप आले डोळ्यासमोर..कारण सध्या ती ज्या वस्त्रात(?) वावरते त्यामध्ये तिला साधु म्हणुन कल्पना नाही करवणार!!! गळ्यात रुद्राक्षाची माळ… ही घ्यायला तिला बाजारात जायची गरज नाही ती तीच्या शम्मी आजोबांकडून घेउ शकते……..

फिल्मस्टार्स किंवा क्रिकेटर्स याबद्दल माझे मत थोडे रुक्षच आहे …यातले जास्त प्रमाणातले लोकं हे साधू नसुन संधीसाधू असतात हे आपले माझे प्रामाणिक मत……..त्यामुळेच की काय पण मला तो कार्यक्रम ऐकल्यावर कळेना काय करावे????

याच विचारात पडले असतांना अचानक काहीतरी ऐकु येतय ….. अरे ही गाणी कुठे लागलीयेत…..कोणतं बरं सुरु आहे……….आलं आलं ऐकु आलं…’सत्यम शिवम सुंदरम…’ का येतीये माझ्या डोळ्यासमोर ती झीनत अमान !!!!! संपल एकदाचं…  हुश्श…….. पुन्हा दुसरं सुरु होतय….आता हे आणखी कोणतय बरं……………’ राम तेरी गंगा मैली…’…आता पुढे बॉबी चे गाणे सुरु होणार बहुतेक…………. याच संत घराण्याच्या भजनांची कॅसेट लावलीये बहुतक कोणितरी………

या पोस्टला लांबवुन मला त्यांचा शाप नको रे बाबा!!!! थांबते मी आता…….संतांच्या घराण्याची बदललेली व्याख्या तर पचु दे आधि……………….

गोष्ट लहान असते……

“काल आसिफला सेकंड हाफ मधे यायला उशिर झाला….” नवरा सांगत होता. आसिफ त्याचा मित्र…तो म्हणे बँकेच्या कामानिमित्त ऑफिसमधुन निघाला आणि ते उरकुन लंच करुनच परत जाणार होता. पण झाले असे की तो बँकेतलं काम आटोपुन येत होता, आपल्याच घाईत गाडी चालवत असताना त्याला रस्त्याच्या विरुद्ध बाजुला एक कुटुंब भर उन्हात लहान मुल कडेवर घेउन टॅक्सीची वाट पहाताना दिसलं…….दुपारची ती वेळ नमाजची असल्यामुळे टॅक्सी मिळणं तेव्हा अवघडच होतं……ह्याची गाडी तिथुन पुढे गेली पण मनातुन त्या कुटुंबाचे विचार जाईनात……….एकिकडे लंच टाईम संपत होता……………तरिही मनाशी विचार पक्का करुन जवळपास २-३ कि.मी. पुढच्या round about वरुन हा वळुन त्यांच्याकडे गेला….. त्यांना मदतीचा हात देउ केला…..ते लोकं त्या मुलाला घेउन दवाखान्यात निघाले होते….त्यांना व्यवस्थित पोहोचवुन परत ऑफिसमधे येइपर्यंत ह्याला उशिर झाला होता.

मनात सहज विचार आला…हा तर रस्त्याच्या विरुद्ध बाजुस होता….त्या कुटुंबाच्याच बाजुने अश्या कितीतरी गाड्या गेल्या असतीलच की !!!! दखल मात्र घेतली ती याने…………

मला ’तमन्ना’ या सिनेमाचे गाणे आठवले..’ घर से मस्जिद है बहुत दुर चलो युँ कर ले….किसी रोते हुए बच्चे को हसाया जाये’ हे गाणं जेव्हा पहिल्यांदा ऐकल तेव्हाच आवडलं होतं पण काल ते नव्याने उमजलं.

असच मागे एकदा माझ्या मुलाची शाळेतुन परत येतांना बस चुकली…..त्याची घरी येण्याची वेळ जसजशी टळत होती माझी काळजी वाढत होती…तेव्हढ्यात एक फोन आला..पुर्णपणे अनोळखी नंबर…..फोनवरचा माणुस सांगत होता…” Your son was standing in front of the school….he gave me this number…..could you please arrange some transportation for him or else I would drop him..” परका देश…..पहिलीतला मुलगा….आधिच घाबरलेले मी..तसाच नवऱ्याला फोन लावला, त्याला त्या अनोळखी माणसाचा नंबर दिला. नवऱ्याला पोहोचत करत २०-२५ मिनिटे लागली तोपर्यंत त्या भल्या माणसाने मुलाला एकटे सोडले नव्हते.

आपण आपल्या मिळालेल्या यशाची मोजमापं करतो आणि आपल्या नातेवाईकांना, गुरुंना, ओळखीच्यांना त्याचे श्रेय देतो……………..पण असे किती अनोळखी हात नकळत मदत करतात… बरेचदा तर न मागता!!!! आज आठवायला बसले तर कितीतरी प्रसंग डोळ्यासमोर येताहेत……….साधच बघा ना आपण ट्रेननी ,बसनी प्रवास करत असतो अचानक कोणीतरी उठुन एखाद्या लहान मुलाला, महिलेला, वृद्धाला बसायला जागा देतं…. आपण रिजर्वेशनसाठी उभे आहोत…खुप वेळानंतर नंबर येतो आणि लक्षात येतं की १५-२० रुपये कमी आहेत….ते मिळतात ते एखाद्या अपरिचिताकडुन….कितीतरी घटना असतात दवाखान्यातल्याही….या सगळ्या गोष्टींच महत्व यामुळे की यात परतफेडीची भावना नसते. मुंबईतल्या दंगलींचा, पुराचा अनुभव घेतलेल्या लोकांना आलेल्या अश्या अनुभवांचे सार हे एक पुर्ण पुस्तक होउ शकते.

मी जेव्हा पहिल्यांदा मस्कतला आले तेव्हा दोन लहान मुलं आणि तिघांच्या तिकिटावर जेव्हढे किलो सामान आणता येइल ते सगळं बरोबर घेतलेलं……….एका गुजराती व्यक्तीने मुंबईला माझ्या बाबांना सांगितले की तुम्ही नका काळजी करु, मी करेन मदत…आणि त्या वाक्याला अक्षरश: जागला तो माणुस……….तोच नव्हे तर विमानातल्या ईतरही लोकांनी खुप मदत केली…त्यामुळेच तो प्रवास सुखकर वाटला, नाहितर कल्पनाही करवत नाही. 

असाच एक लहानसा प्रसंग, आम्ही मॉलमधे जातो तेव्हा माझी मुलगी हट्टीपणा करत बास्केट ट्रॉली ओढत असते……अंगापेक्षा बोंगा खुप जड झालेला असतो…मग उगाचच तिच्या ट्रॉलीमधे थोडसं सामान टाकावं लागतं. लोकांची गैरसोय नको म्हणुन आम्ही शक्यतो गर्दीची वेळ टाळतो…परवा या बाईसाहेबांची स्वारी रस्ता अडवुन निवांत चालली होती……मी ओरडत होते….मागे एक सहा फुटाचा माणुस आपल्या मुळे खोळंबला आहे याची तमा न बाळगता मॅडम चालत होत्या…शेवटी मी न रहावुन तिला उचलायला लागले तर तो माणुस पटकन म्हणाला..” No!! I can wait!!!” त्याच्या चेहेऱ्यावरच्या निखळ हवभावांवरुन वातावरणातला ताण हलका झाला………….

खरच गोष्ट किती लहान असते पण ती सहजपणे करणारी माणसं मात्र खुप महान वाटतात मला. या सगळ्या नायक नायिकांचा उल्लेख होत नाही कारण त्यांची नावं तरी कुठे माहित असतात !! एक मात्र नक्की  काढता येतो की जगात चांगलीच माणसे जास्त आहेत……..माणुसकीचा स्वच्छ सुंदर झरा अखंड वहातोय………….   

मला पुर्ण कल्पना आहे याची की मी आलेल्या अनुभवांपैकी सगळ्यांचे उल्लेख केलेले नाहीत..आज झरकन जे नजरेसमोर आले त्यांचा उल्लेख करत आहे. ईतरही अनेक घटना आहेत ज्या काळाबरोबर धुसर होत गेल्या आहेत.

निरपेक्षपणे मदतीचा हात देउ करणाऱ्या त्या सगळ्या माणसांना मनापासुन सलाम!!!

म्हणतात ना…

’देणाऱ्याने देत जावे……’ मला आज ते देणाऱ्याचे लाखमोलाचे हात खरच घ्यावेसे वाटताहेत……………

सिरियल्स….भाग २

चला एकदाची देवयानी विक्रमादित्यला ’हो’ म्हणाली..मुळात या सिरियलचे नाव कुलवधु..त्यात most eligible bachelor म्हणुन पहिल्या एक दोन भागातच समोर आला विक्रमादित्य आणि नायिका देवयानी त्यामुळे पहिल्या १००-१५० भागात हे दोघे कसेही एकमेकांच्या प्रेमात वगैरे पडणार हे भाकित आम्ही केले होते…….

आता विक्रमादित्य बदलला बिदलला असला तरी हे त्याचे नाटक असुन, लग्न झाल्यावर तो देवयानीला जाम छळणार आहे आणि श्रावणी बहुतेक रणवीरराजेंशी लग्न करुन त्याच घरात जाणार असेही भाकित वर्तवण्याचा कालचा आमचा प्रयत्न आमच्याच घरात दुर्लक्षला गेला..(घर की मुर्गी……एकतामातेकडे जावे का आता आम्ही???) “ज्योती” नावाच्या सिरियलच्या प्रोमोजवरुन आम्ही केलेली भाकितं तंतोतंत खरी ठरलेली असुनही ही उपेक्षा आमच्या वाट्याला यावी…..जाउ द्या…..धावत जाउन बेडरुममधल्या बेडवर पडुन रडावे का आता आम्ही??? की एका बॅगमधे उगाचच २-४ कपडे कोंबावे!!!!!!(नाहीत आमच्या साड्या येव्हढ्या व्यवस्थित हँगरला लटकवलेल्या..)

तिथे “श्री” मधलं भुत हे कंगना आहे आणि ती ईस घरकी बहुच होती हे बडी बा नी सांगुन सुद्धा पुढे काय होइल याचा अंदाज बांधता येत नाहीये. आमच्या ईतक्या वर्षाचा ’K’ सिरियल्सचा अभ्यास, चार दिवस सासुचे, या गोजिरवाण्या (इथे आम्ही लाजिरवाण्या, कंटाळवाण्या, रटाळवाण्या सारखी नावे fit करुन पाहिली आणि ती चपखल बसत होती हा आमचा अनुभव..)  घरात या मालिकांचे काही भाग पहाण्याचा केलेला पराक्रम ही शिदोरीसुद्धा यावेळेस उपयोगी ठरत नाहीये….

छोटी बहु या अत्यंत छोट्या वेगाने चालणाऱ्या मालिकेची आम्हास लिंक आहे..तशी आम्हास ईतर अनेक मालिकांची लिंक आहे कारण आम्ही एका ब्रेक मधे ईतर सगळे चॅनल्स फिरतो…आजकाल सगळीकडे एकदमच ब्रेक असतात हा चिंतेचा विषय आहे. अगले जनम मोहे बिटिया ही किजो…हे टायटल…ऐश—अभिषेक अभिनित(?) उमराव जान या चित्रपटातल्या गाण्यावर बेतलेलं आहे हा नवा शोध आम्हाला नुकताच लागला आहे.

सोनी, स्टार प्लस, कलर्स ह्याची आपणास विशेष मा्हिती नसल्याचा आम्हास खेद आहे…अर्थात बालिका वधु या मालिकेबद्दल विपुल लिखाण झालेले असल्याची exclusive माहिती आम्ही आमच्या ब्लॉगच्या वाचकांना देउ ईच्छितो..(आता हा ब्लॉग खरच कोणी वाचतं का, हा ही विषय संशोधनास घेण्याचा आमचा विचार आहे.) उतरण (नावं नक्की स्मरतं नाही) मालिकेचा अर्धा भाग आम्ही पाहिला होता कारण त्यातल्या लहान मुलीच्या (नावं नक्की स्मरतं नाही) दातांशी आमच्या दाताच्या structure चे असलेले साम्य…

आम्हास एक गहन प्रश्न पडलेला आहे आणि तो असा की या यच्चयावत मालिकांमधे कुटुंबातली एक व्यक्ती wheel chair वर बसवण्यामागे काय बरे हेतु असावा? ती wheel chair कॉमन आहे का ह्या संशोधनाच्या अंतिम टप्प्यात आम्ही आहोत… लांबलचक कानातले घालुन ह्या बायकांचे कान दुखत नाहीत का..हा ही एक उपप्रश्न पडण्याचे कारण म्हणजे आमच्या तश्या प्रयत्नानंतर आम्हास उठलेली कानदुखी…

वहिनीसाहेब, मायका असल्या मालिकांविषयी बोलण्यापेक्षा आम्ही शेफ निलेश लिमये आणि राणी गुणाजी यांच्या निवेदनाविषयी बोलु..कारण ३० मिनिटांपैकी साडॆ अठ्ठावीस मिनिटे हे दोघे न थकता बोलत असतात.

मराठी बातम्यांचा खास ओघ असणाऱ्या एका वाहिनीवर सेलिब्रिटीना बोलावुन आपणच बोलायचे..अगदी नाहिच बोलु द्यायचे त्यांना हा कठोर नियम असावा असेही आम्हास भासते…ह्याचा कॉस्चुम डिजायनरही नवखा असावा… किंवा कोणाला कोणते कपडे अजिबात शोभत नाहीत याचे तो प्रयोग करत असावा…हे आमचे मतं…

गुन्हा या सदरात आपले नाव यावे म्हणुन आम्ही परवा नवऱ्याच्या खुंटीला लटकलेल्या पँटमधुन त्याचे वॉलेट काढले..पण त्याने रहा सावध चा नारा लक्षात ठेवल्यामुळे तो सावज होउ शकला नाही… निव्वळ काही चिल्लर त्यात असल्यामुळे आम्ही ते जागच्या जागी ठेउन दिले… नाहीतर आमच्याविषयी सांगितले गेले असते…”गेले चार पाच दिवस तिचे लक्ष नवऱ्याच्या वॉलेटकडे होते..आणी एका बेसावध क्षणी तिने आपला डाव साधला….”

तसेही News Channel नावाच्या फंदात आम्ही सहसा पडत नाही…चार आने की मुर्गी आणि बारह आने का मसाला हे आमच्या तत्वात बसत नाही…

बरेच लिहिले आणि बरेच लिहिले जाउ शकते याची आम्हास पुर्ण कल्पना आहे पण परंतु वाचणारे वाचतात आणि ऐकणारे ऐकतात म्हणुन चऱ्हाट लावणेही आम्हास रुचत नाही…तेव्हा आता आवरते घ्यावे असा विचार येतोय…

(खरं असेही आहे की आमच्या स्वयंपाकघरात आम्हास स्वयं जाउनच पोळ्या करायच्या आहेत…तेव्हा आत्ता निरोप घेणे भाग आहे….)

सिरियल्स……..

“मम्मा त्या ’श्री’ मधल्या बाईचा फेस दाखवणार आहेत….” मुलाने ओरडुन सांगितले…………. “अरे तुला किती वेळा सांगायचे आहे आता की नको पाहुस असले सिरियल्स..” हॉलमधे जाउन त्याला विचारले “बाळा अरे त्यात ते भुत आहे त्याची भिती नाही वाटत का?”

“भुत !! ह्यँ !! कॉमेडी आहे ते सिरियल… आणि घाबरायचे काय त्यात? तुझे पण केस मोकळे असे टाकले तोंडावर तर तु पण अशीच दिसशील…” …..मी–भुत…. अवाक झाले मी. टी.व्ही. बंद केला आणि त्याला अभ्यास दिला… रोजच्यापेक्षा जास्त.. मला भुत म्हणतो काय !!!!!

वैताग आहे या सिरियल्स म्हणजे…मागे नवऱ्याचा असंभव या मालिकेचा एक एपिसोड पहायचा राहिला…आता त्या भागात काय झाले ते त्याला सांगण्याची जबाबदारी माझी… केली सुरुवात……

–हे बघ सुलेखानी तनिष्काच्या कामवाल्या बाईच्या मनाचा ताबा घेतला आणि ती तनिष्काचा घरी गेली.

–कोण? कुठे घेतला ताबा? सुलेखाला कसे कळले तनिष्काची  बाई कुठे रहाते?

–अरे रस्त्यात भेटते ती तिला, मग एका आडोश्याच्या झाडाखाली ते ताबाबिबा घेतात…. आणि सुलेखा त्या बाईच शरीर घेउन जाते…

–कोणी बघत नाही?

–छे रे!! असं बघत का कधी कोणी? हं मग ती तनिष्काच्या घरी जाते आणि तिथे त्यांचे वाद होतात..त्यात सुलेखा जिंकते कारण तनिष्काला पिहु जी की मागच्या जन्मीची छबु आहे ती डिस्टर्ब करते आणि त्यामुळे सुलेखा तनिष्काच्या मनाचा ताबा मिळवते….आता ती तनिष्का असते.

–च्यायला गुरुची विद्या गुरुलाच…मान गये सुलेखा!!! पण काय म्हणालिस तु? सुलेखा तर बाई आहे ना?

–अरे मग ती बाईच तर हे करते!!!

–पण त्या बाईला कुठे येते ही विद्या?

(एव्हाना नवरा confuse व्हायला सुरुवात झालेली आहे…)

–मठ्ठ आहेस का रे तु!!! बाई सुलेखा आहे ना…..

–मग सुलेखा कुठे आहे? म्हणजे तिचे शरीर कुठेय?ती बाई जी तिच्या शरीरात आहे तिचं काय?

–अरे ती काही expert आहे का या प्रकारात? ती पडलीये बेशुद्ध, तिला परमेश्वरच्या माणसाने सुलेखा समजुन हॉस्पिटलमधे नेलय.

–?????( याच्या डोक्यावरुन जातय आता….मला याच्या मनाचा ताबा घेता आला असता तर किती बरं झालं असतं असाही एक विचार मनात येउन गेला..म्हणजे हा सव्यापसव्य तरी वाचेल)

–कळतय का?

–पुढचं सांग…

–मग ती तनिष्कारुपी सुलेखा मम्मांच्या घरी जाउन त्यांचा खुन करते..

–अगं माते पण मम्मांचा खुन तर सुलेखानी केलाय ना एकदा…आता पुन्हा ती हे का करतेय?

–अरे ती आता तनिष्काच्या शरीरात आहे ना..मग ती आता त्याचे शुटिंग करुन ठेवणार आहे….तिला तनिष्काचा सुड उगवायचा आहे ना!!!

(वातावरण तापायला लागलय आता))

–continue करं…

–ते शुट करुन झालं की ती सुलेखाला म्हणजे तिच्या शरीराला शोधत हॉस्पिटलमधे जाते….

(दयनीय दिसतोय हा आता… किती ताण पडतोय याच्यावर…)

–माझी आई ..अगं पण ती बाई कुठेय? (ओरडला जोरदार)

–त्या बाईचा मेंदु हॉस्पिटलमधे, शरीर ज्यात आता तनिष्काचा मेंदु आहे ते तनिष्काच्या घरी….तनिष्काच्या शरीरात सुलेखाचा मेंदु…..सुलेखाच शरीर ज्यात बाईचा मेंदु आहे ते हॉस्पिटलच्या बेडवर बेशुद्ध….. मग ती सुलेखा(तनिष्का) नर्सला हिप्नॉटाईज करते …… मग………

–एक काम कर…आता ब्रेक घे एखादा मी चहा करुन आणतो तो घे..आणि विसरुन जा की मी तुला काही विचारलय…..पोरखेळ कुठला….

चहा घेता घेता तो म्हणाला “मला वाटतय सतीश राजवाडे नी संगीत कुलकर्णीच्या मनाचा ताबा घेउन आता ही सिरियल डायरेक्ट करावी…नाहीतर कोणीतरी पल्लवी जोशीच्या मनाचा ताबा घेउन ती बंद तरी पाडावी……

दुसऱ्या दिवशी नवऱ्यानी सांगितल की रात्री झोपेत काय आवाज येतोय म्हणुन पाहिल तर तु बडबडत होतीस …बाई…सुलेखा…तनिष्का………………………..मेंदु…. ताबा… गतजन्म……

क्रमश:

सत्संग(???)

मध्यंतरी एका परिचित महिलेच्या घरी जाण्याचा योग आला….पाहिले तर त्यांच्या घराच्या हॉलमधील सगळी arrangement बदललेली होती, जमिनीवर चटया टाकलेल्या, सोफा, टि.व्हि. सगळ सरकवलेलं….तेव्हढ्यात लक्षात आलं एरवी एका कोपऱ्यात असलेली त्यांच्या भगवानाची तसबीर जागा बदलुन त्या हॉलच्या मध्यावर स्थानापन्न झालेली आहे… …….या महिला आणि त्यांचा एक मोठा ग्रुप एका कुठल्यातरी भगवानाची पुजा करतात… आणि नव्या नव्या लोकांना त्यांच्या चमत्काराच्या कथा सांगुन आपल्या ग्रुप मधे सामिल करुन घेण्याचा प्रयत्न फावल्या वेळात करत असतात…….

त्यादिवशीच त्यांचं घर पाहुन मला पडलेलं प्रश्नचिन्ह त्यांना समजलं असाव त्यामुळे त्या म्हणाल्या “ आज घरमे सत्संग था ईसिलिये ये सब .” थोडावेळ गप्पा झाल्यावर म्हणाल्या “ आज afternoon सोने के लिये बहुत लेट हो गया था, वो _ _ _ आंटी है ना वो २.०० बजे तक बैठे थे…..उनकी बहु के बारे मे बता रहे थे…अरे वो बहु का नाम तो है सुमती मगर वो actual मे एकदम कुमती है, क्या बताउ आपको?” मग तिने मला त्या सुनेचा किस्सा बयाजवार सांगितला… आंटीनी सुनेला कश्या शिव्या घातल्या वगैरेही आलेच त्यात.

त्यानंतर म्हणे “ वो उपरवाली है ना उसका हजबंड every six months India क्यों जाता है पता है क्या आपको?” आता म्हट्लं, असेल त्याची ऐपत म्हणुन जात असेल..कारण आम्ही वर्षातुन एकदा सहकुटुंब जातो त्याचा खर्च कंपनी देते…….पण बाईनी वेगळीच माहिती दिली “ उसकी है कोई उधरभी !!!” च्यामारी हे ज्ञान मला नव्हते…..या धक्क्यातुन मी सावरत नाही तोच पुढचा मुद्दा आला….. “वो सिंधु है ना उसका हजबंड उसको पिटता है…तो ये उपरवाली ने उसे बोला तुम डिवोर्स ले लो…अब इससे अपना घर नहि संभलता और ये दुसरोंको सलाह देती है। आप ही बताओ ऐसा कोइ करता है क्या?” आम्ही आपली नकारार्थी मान हलवली……….

जवळजवळ पुढचा एक तास ’आपकी बिल्डिंग मे वो अमकीढमकी है ना वो अपने डॉक्टर हजबंड पे शक करती है की उसका किसी नर्स के साथ कुछ चल रहा है……. वो दुसरी है ना उसे एक कान से सुनाई नही देता है…….वो तिसरी है ना उसको देखा क्या आपने कैसे transparent ड्रेसेस पहेनती है और उपरसे दुपट्टा भी नही लेती……………..’ ई. ई……………….. अतिशय मौल्यवान माहिती मला मिळाली.

सरतेशेवटी मी हिंमत करुन विचारले की आपको कैसे पता है ये सब…….मिळालेलं उत्तर असे की ये लोग सत्संग आते है ना तो बातोंमे बात निकल जाती है!!!!!!!! पुढे मला म्हणे आप भी आया किजिये …ये भगवान सबको एकदम अच्छे से देखते है!!!! मै आपको और बच्चोंको दिक्षा देती ँहु ॥ मनात म्हटलं नको रे बाबा …….तिला सांगितल की हम ना डायरेक्टली गणपती भगवानकीच पुजा करते है…त्यामुळे हमे अपनी बात उनतक पहुचवनेके लिये किसी मिडियेटर की गरज नही पडती है……

हुश्श !!!! म्हणत घरी आले…साडेसहा वाजुन गेले तरी नवऱ्याचा पत्ता नाही… आधी चहा केला …डोकं भणभणायला लागलं होत, ह्याला का म्हणायचे सत्संग असा विचार येत होता……..चहाचा कप हातात घेतला…ए.सी. लावला…पहिला घोट घेतला आणि मनात विचार आला.. “आज का बरं उशीर झाला असेल ह्याला…. फोन पण नाही केला…… कही मेरेपण हजबंड का बाहर कुछ…………………………….”

“नही ssssssssssssssssssssssssssssssss!!!!!!”