विमानप्रवास…

झालं आमचं भारतात जाणं जवळ आलय, बॅगा भरण सुरु आहे. एकीकडे मुलाची परिक्षा सुरु आहे….ती गडबड आहेच…त्यात भर म्हणजे मस्कतमधे उन्हाळा भरात आहे सद्ध्या……तापमान ४५ चा पारा कधीच ओलांडलाय. सामानाच्या याद्या करणं त्यानुसार ते भरण हे माझे आवडते काम…ते तसे झाले नाही तर मी उगाचच रेस्ट्लेस होतं असते. त्यामुळे मी एकएक वस्तू बॅगेवर नेउन ठेवणं आणि माझ्या अतिकामसू लेकीने त्या वस्तू परत जागेवर किंवा तिला ती वस्तू जिथे पहायला आवडेल तिथे नेउन ठेवणंही सुरु आहे….

मुलगा शाळेतून घरी आल्यावर त्या बॅगांची Ice-cream ची गाडी करतोय…त्यामुळे फूटू शकेल असे सामान आम्ही शेवटच्या दिवशी भरणार आहोत…..हे शेवटच्या दिवसाचे सामान हा अतिशय स्फोटक मुद्दा असतो…त्यातले नेमके काहितरी विसरते आणि मग ते प्रवासातच आठवून प्रवासाची मजा जाते…..

थोडक्यात काय तर सगळ कसं अगदी आखिव रेखीव चाललय…त्यात नवरा येणार नाहिये त्यामुळे माझ्यासोबत दोन मोठमोठ्या स्वत:च्या ईच्छेने न हलणाऱ्या बॅगा आणि माझी कितीही ईच्छा असली तरी एकाजागी न बसणारी दोन कार्टी असा जामानिमा आहे. आता आमचा विमानप्रवास हा असतो मुळी २-३ तासाचा त्याच काय कौतूक असे माझ्या अमेरिकास्थित मैत्रीणींना वाटते पण मी खरी गंमत सांगितलीये कुठे अजुन……

विमान प्रवास असे नुसते नाव काढले तरी मला गरगरायला लागते……याबाबत मी थेट ’प्यार तो होना ही था’ मधल्या संजना ची बहिण आहे……मी तर मनापासुन वाट पहातेय की एकाद्या शुभ दिनी समुद्रातुन मस्त रेल्वे लाईन टाकली जाईल मुंबईपर्यंत आणि मी सुखाने प्रवास करेन…….

त्यात मी विमानात देवाचे नाव घेत स्वस्थ बसून रहाव तर माझी दिव्य कार्टी मोकाट सुटतात तिथे……मम्मा clouds बघ….आत्ता आपण किती हाईट वर आहोत…..बाहेर पडलो तर काय होईल…..शिट यार मम्मा तुला स्विमिंग पण येत नाही…..बाबा हवा होता सोबत…..ईति चिरंजीव.

त्याला म्हटल, “ अरे बाहेर आता खुप थंडी आहे..” तर तो म्हणे पण का बरं आपण तर आता Sun च्या जवळ आहोत ना….मग it should be hot…..u r telling lies. मी ना समजावण्याच्या मन:स्थीतीत असते ना रागावण्याच्या…मी मुळात कसल्याच मन:स्थीतीत नसते कारण मी जिथे कुठे नजर रोखलेली असते तिथुन ती मला हलवायची नसते नाहीतर गरगर सुरु…..ह्याचे आपले अखंड प्रश्नावली सत्र सुरुच असते…पायलट काका ब्रेक कसा लावतात, विमानाला गियर असतात का, सिग्नल लागतात का….आयला मम्मा आपल्याला घ्यायला कोणी आलेच नाही तर….(गाडी परत पायलटवर)काकांनी स्पीड हवेत कमी जास्त केला तर आपल्याला कळते का…..कहर म्हणजे “आपण बुडालो तर आपल्या सामानाचे काय??” असा प्रश्न त्याने विचारला होता मला……मी आपलं मन , डोके जे काही म्हणुन ठिकाणावर ठेवता येइल ते ठेवून त्याला गप्प बस असे सांगत असते……

माझी लेक…..हीचा वेगळाच गोंधळ सुरु असतो….तिला एका जागी बसायचे नसते…..जन्मापासूनच ती मुक्त विचारांची असल्यामुळे ’सीट बेल्ट’ नावाची बांधिलकी ती मानत नाही….. बर पडल्या तर पडू दे या मायलेकी असा विचार एअरहोस्टेसच्या तत्त्वात बसत नाही त्यामुळे ती बेरक्या नजरेनी आम्हा दोघींवर लक्ष ठेवून असते….ईतरांची लहान मुलं कशी विमान सुरु झालं की बाबाच्या (आईच्या नाही…ती शांतपणे सीटवर झोपते) कुशीत झोपून जातात….आमचं पात्र मात्र बागेत आल्यासारख विमानभर फिरत असतं…प्रत्येक प्रवाश्याशी आपली ओळख झालेली बरी या दुरदृष्टीने ती ईरेला पेटलेली असते…आणि मग पुन्हा तिची एअरहोस्टेस काकु( मुलं त्यांना काकू म्हणतात….त्या अरेबिक असल्यामुळे त्यांना कळत नाही नाहितर त्यांनी आम्हाला समुद्रात ढकलुन दिले असते…) चेहेऱ्यावर शक्य तेव्हढे नैसर्गिक हसू आणत लेकीला जागेवर बसवते….

त्यातच तो जेवण नावाचा अत्याचार येतो…मी ठणकावून “No thanks…” असे सांगितल्या सांगितल्या चिरंजीव , “मम्मा मला भूक लागली आहे..” ची घोषणा करतात…मग ती ताटं सांभाळणे…त्यातले अर्धे काय आहे तेच न उमजणे….असले प्रकार ओघाने आहेच….त्यातच हुश्श !!! आलं मुंबई म्हणाव तर आमच्या विमानाला अनेक घिरट्या घालाव्या लागतात…मुलगा नुकतच खाल्ल्यामुळे अधिकच फ्रेश झालेला असतो मग तो हळुच विचारतो… “मम्मा पेट्रोल संपले तर???”

कसेबसे विमानाची चाक आणि आमचे पाय जमिनीला टेकतात….. मी अगदी ये जो देश है तेरा वगैरे मनात म्हणणार तोच दोघा मुलांपैकी कोणी तरी कोणाला तरी डिवचलेले असते…मग मी देशप्रेम वेटींगला ठेवुन पायपीटीसाठी तयार होते……आमचा जथ्था ट्रॉली घेउन सामानासाठी उभा होतो….पण इथेही सगळे लोक संपत आले की आमचे सामान बेल्टवर येते…………

रामा रामा रे …..मला का बरं गरगरतय…….मनाने तर मुंबई गाठली पण मला अजुन पोहोचायचे आहे……नाही मला अजून लिहायचेच नाही…..

त्याआधी नवऱ्यासाठी चिवडा लाडु करायचे आहेत……………

तसेही मस्कत मुंबई ट्रेन होईपर्यंत………… “जय विमान …जय राईट बंधु…”

Advertisements

13 thoughts on “विमानप्रवास…

 1. माझा नवरा पण थोडासा टेन्सच असतो विमानप्रवासात. मी आणि माझा लेक असेच काहीबाही बोलून त्याला उचकवत असतो. 🙂 दोन मुलांना घेऊन प्रवास म्हणजे जरा…. ह्म्म्म, आवराआवरी सुरू झाली तर. प्रवासासाठी शुभेच्छा. भारतातूनही आपली भेट होईलच. तुझा email देशील का मला? shree_279@yahoo.com हा माझा ID आहे. Happy Journey, Njoy!!

 2. तन्वी
  अगदी चित्र उभं झालंय डॊळ्यापुढे .. मस्त आहे लेख. हाच अनुभव थोड्याफार फरकाने सगळ्यांनाच येतो. आमची धाकटी कन्या ( शारिरिक वय १५ मानसिक ६ वर्षं) पण अजुनही शांत बसु शकत नाही विमानात. अगदी अस्सेच प्रश्न असतात..) 🙂

 3. छान, माझाही विमान प्रवासाबद्दलचा अनुभव फारसा चांगला नाही आहे फार भयानक प्रसंगातुन गेलो आहे पहील्या विमान प्रवासात तर.

  असो, लेख मस्त जमलाय पण, डोळ्यापुढे चित्र उभ राहीले होते 🙂

 4. chan lihilay lekh, agadi dolyasamor thet Chitra ubhe rahate.
  keep it up madam , aamhi tumchya navya navya Postschi vat pahat asato.
  tumache lekh vachun khup maja hi yete aani relaxhi vatate.
  lavkar navin post taka aamhi vat pahatoy.

 5. मस्त झालाय लेख. आता परत आल्यावर भारतभेटीवर पण लिही…मी एकदाच लेकाला भला मोठठा विमानप्रवास करुन मुंबई नगरीला जाऊन आले आणि आता परत त्याची बॅग तो स्वतःच उचलेल तेव्हाच जाऊ असा पण (अर्थात मनातल्या मनात :)) केलाय…

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s