आज मै खुश हूँ………..

’आज मै खुश हूँ………..’ कारणही तसचं आहे उद्या माझं पिल्लू सात वर्षांच पुर्ण होतय………..१८ ऑगस्टची रात्र ही अशीच येते नेहेमी…..

आज रात्री गप्पा मारतांना अचानक नवऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं…….म्हणाला, “ गुंड्या किती मोठा झालाय ना आपला!!!!” खरं तर माझ्याही मनात हीच आवर्तन येताहेत……

पहिलं मुल……सगळं सगळं बदलून टाकणारं……नवरा बायकोचे आई-बाबा करणारं………पहिलं मुल सगळ्यांनाच किती प्रिय असते ना!!! रात्री नेहेमीप्रमाणे पिल्लू माझ्या कुशीत येउन शिरलं….बडबड करत गाढ झोपूनही गेलं…….माझे डोळे मात्र मिटत नव्हते………….मन मागे भुतकाळात केव्हाच पसार झाले होते……हे सात वर्षे मी पुन्हा पहात होते…अनुभवत होते……

१९ ऑगस्ट २००२, सकाळी दवाखान्यात नेल्यावर माझ्या शेजारी बसलेल्या एका पोटाचा माझ्यापेक्षा मोठा घेर असलेल्या प्रेग्नंट बाईने मला विचारले, “कितवा महिना?”…त्याही परिस्थितीत हसले मी…………म्हटलं अहो डिलिवरीसाठी आलेय मी !!!! आई, आजी, बाबा सगळेच दडपणात मी निवांत……..शेवटी आजी ओरडली की खरच हिला काही त्रास होतोय का नाहीतर चला घरी!!!!!! पण दुपारी लेबर रुममधे नेल्यावर अर्ध्या तासात माझी ’सुटका’ झाली……खर तर ती ’सुटका’ नसतेच ते असतं आयुष्यभराचे ’गुंतणं’………नाळ नसते जोडलेली आता पण मन मात्र त्या पिल्लूतच अडकलेले सतत…..

आम्हा नवरा बायकोचे विश्व अंतर्बाह्य बदललेलं…….पहिलाच नातू, पणतू, भाचा, पुतण्या सगळी बिरुद भुषवणारा माझा मुलगा……त्याचे पहिले बोल, रांगण सगळ आठवतय आत्ता. नाव काय ठेवायचे हा एक मोठा प्रश्न…..शेवटी ’ईशान’ हे शंकराचे नाव सगळ्यांना आवडले.

कितीतरी प्रसंग एकामागोमाग एक मनात येताहेत…..पिल्लू असेल तेव्हा ३ वर्षाचे, १५ ऑगस्टला टि. व्ही. वर जन-गण-मन ऐकले, म्हणालं मम्मा कोणतं गाणं हे?….. त्यानंतर दोन-तीन दिवस रोज मला ते म्हणायला सांगितले…..त्यावेळच्या गणपतीच्या सांस्कॄतिक कार्यक्रमांमधे खेळता खेळता मधेच जाउन त्याने आयोजकांना सांगितले की मला जन-गण-मन येत आणि स्टेजवर म्हणायचे आहे…….अचानक स्टेजवर माईक घेउन समोर आलं माझ पिल्लू…….अनपेक्षित आनंद होता तो….. न चुकता त्याने राष्ट्रगीत म्हटले, उपस्थित सगळे जण उभे राहिले…माझे डोळे नकळत वहायला लागले होते……आजही आठवताहेत मला त्या टाळ्या. गेल्यावर्षीच्या तुझ्या एस्किमोतल्या रुपाचा विडिओही किती वेळा पहातो मी आणि बाबा…..

दुसरं मुल होउ देण्याचा निर्णय घेतला आम्ही……..विश्वासात घेऊन आधि तुला सगळी कल्पना दिली. त्यानंतर काही दिवसात आपण गाडीवर येत असतांना अचानक तू म्हणाला , “बाबा नेक्स्ट ईयर गाडीवर आपण चौघे असणार तु, मम्मा, बाळ आणि मी….” पिल्लू तेव्हाही खुप भावलं होत रे तुझ ते स्वत:चे नाव शेवटी घेणं……ही लहानशी गोष्ट करण्यासाठी लागणारा मोठेपणा आहे तुझ्यात हे तेव्हा जाणवलं………….

मी प्रेग्नंट होते, नवरा कामानिमित्त पुण्याला गेलेला आणि दुपारी माझ्या पोटात खुप दुखायला लागलं……अगदी उठवेना…… पिल्लु भांबावलं, पण म्हणे, “मम्मा गोळी घे…मला सांग मी आणतो…” तेव्हा तो Jr. KG मधे होता , त्याला त्या गोळीच्या नावाचे स्पेलिंग सांगितले……त्याने गोळी आणि पाणी दिले…..ते घेतल्यावर मला झोप लागली…. अडिच तीन तासाने जाग आली…….पाहिलं तर बाळ उशाशी बसलेलं……..अपराधीपणाने मन भरलं माझं…. “सॉरी!!!” म्हटलं त्याला…..जवळ घेतल…….पिल्लू म्हणालं, “तुला बर वाटतय का आता?” बाळा कसं विसरु रे हे सगळं…………………

आजही तु तसाच आहेस!!!!! बहिणीला सांगणारा, “छकूली मम्मा दमते ना दिवसभर, त्रास देउ नकोस तिला…..”….तुझी आई कौतूकाने पहाते रे राजा तुला तेव्हा !!!!! पिल्लू आज सात वर्षाचे होतय म्हणजे मुंजीचे वय झालेय की आता…..

आज मनाला मुक्त सोडलय बेटा तुझ्या बालपणात……आनंदाचा अविरत ठेवा सापडतोय मला……मी तुला काय दिलं आणि तु मला काय हा हिशोब नाही मांडत पण तरिही ’आई’ केलयेस तु मला……  

शाळेतून आल्यावर तु हात पाय धुण्याचे नाटक करतोस……….बघू हाताला साबणाचा वास येतोय का असे विचारल्यावर हसतोस आणि म्हणतोस, “तुझे सब है पता मेरी माँ !!!!!”…………….बच्चू तु थोडा मोठा झालास ना की तुला सांगणार आहे असा निरुपद्रवी लबाडपणा मी देखिल करायचे लहानपणी…………..तुझ्याचसारखी तर होते मी तेव्हा…..वास्तवाकडे स्वप्नाळू डोळ्यांनी पहाणारी…….आपल्याच तंद्रीत असणारी……..आई रागावली तरी हसणारी……….वस्तूंशीही गप्पा मारणारी……….. मी तुझ्यासारखी की तु माझ्यासारखा!!!!! दुसरा ऑप्शन जास्त आवडलाय मला……. तु माझ्यासारखा. माझाच तर अंश आहेस तु…….तुझ माझं हे अस एकमेकांच्या अस्तित्वात असणं आवडत मला…….

तुझ्या दोन्ही आज्या सांगतात अशी वेड्यासारखी मुलांमधे गुंतू नकोस………मी पण ठरवणार आहे हेच !!!! पण खर सांगू का पिल्लू त्यांना तरी कुठे जमलय ते अजुन जे मला जमणार आहे!!!!! तरीही मी कमी करणार आहे बरं का…….आत्ता नाही येउ दे की ती दुसरी तुझी काळजी घेणारी!!!!!

हे जे काही लिहितीये ते ब्लॉगवर नव्हते टाकणार…… पण टाकतेय…..तु आणि मी मिळून वाचू ते नंतर….वाचतांना चूका करायच्या नाहीत पण ईनू…..नाहीतर मी रागावेन!!!!

“मम्मा मी तुला जिंकवणार आहे कायम!!!” तु म्हणतोस नेहेमी……………बाबा म्हणतो तोंड बघा माँ बेट्याच…… खरं वेगळंच असतं बरं….ह्या मम्मा असतात ना त्या बोलतात घडाघडा मनातलं सगळ……पण बाबा लोक जास्त हळवे असतात……तुझे ईंजेक्शन घ्यायला जायचो ना आपण तेव्हा बाबा कायम बाहेर उभा रहायचा, म्हणायचा मला नाही सहन होत तुच जा………तुझे बाबू पण तसेच. त्यांचे तर श्वासच तुझ नाव घेत येतात…… यावेळेस नासिकला रागावले मी त्यांना, म्हटल काय हे किती लाड कराल त्याचे….ऐकणार नाहीत ते माझं !!!!!!

तुझी स्पर्धा स्वत:शीच आहे बेटा……. वास्तवाचे भान येइलही तुला नंतर, नव्हे हे जग ती जाण करून देतेच आपल्याला……पण स्वत्व विसरु नकोस……स्वत:ला आणि जगाला तुझ्या नजरेतूनच बघ !!!!! त्यासाठी समर्थ हो!!!! तुझे आई- बाबा कायम आहेत तुझ्या सोबत………

हे खर तर पत्र नाहीये तुला हे असेच माझे विचार……तोडके मोडके…..तुला समजेल तरिही, हो ना!!!!!!

Advertisements

पत्ता……

नुकतच आम्हाला Max New York कडून एका पॉलीसीच्या प्रिमीयम साठी पत्र आलय. माझ्या नवऱ्याच्या ऑफिसमधल्या टेबलवर ते ठेवलेलं होतं म्हणजे निश्चितच ते पोस्टाने आलेलं आहे. पाहून आश्चर्य वाटलं कारण या संदर्भातला आमचा सगळा पत्रव्यवहार हा नासिकच्या पत्त्यावर होतो. या पत्राचे म्हणणे होते की आमच्या नासिकच्या पत्त्यावरून ते परत पाठवण्यात आलेले आहे म्हणून ते आम्हाला मस्कतला पाठवले आहे. आता ईथपर्यंत सगळे ठीक होते पण त्या पत्रावर जो पत्ता टाकलेला होता तो वाचून मात्र मोठी करमणूक झाली……..

त्या पत्त्यावर माझ्या नवऱ्याचे नाव आणि आडनाव एकत्र करून टाकलेलं होतं……………त्यामुळे साहजिकच आडनावाचे आद्याक्षर हे capital न असता ते small झालेले होतं. तसही त्याच आडनाव हे काही special noun नाही या माझ्या मताला Max New York मधल्या लोकांनी जोरदार पाठिंबा दिला होता . सर्वसाधारणपणे स्त्रीयांना फक्त त्यांच्या माहेरचे आडनाव special वाटतं आणि सासरचे सगळ्ंच common वाटतं याला मी का बरे अपवाद असावे !!!!! असो त्यानंतरचा पत्ता असा……

Gul Farenga post,

Box No. ——-,

Postal Code—–,

Muscat, Oman 422007

Maharashtra.

Muscat ही Oman या देशाची राजधानी असून हे संपूर्ण प्रकरण महाराष्ट्रातच आहे हा शोध बाकी नवा आहे. बरं त्यातही पुन्हा त्या पत्त्यावर माझ्या नवऱ्याच्या नावाचा दिव्य पद्धतीने केलेला उल्लेख सोडला तर त्याच्या कंपनीचे नाव, त्याचे डिपार्टमेंट, एम्प्लॉयी कोड नंबर यापैकी कसलाही पुसटसाही उल्लेख नाही. त्यातही हे ’Gul Farenga Post’ म्हणजे काय ते कळेना. त्यातही जरा लावा डोके आणि सोडवा कोडे वगैरे केले तर त्याच्या कंपनीचे नाव तयार होउ शकते पण मग त्या संधीचा असा विग्रह करून घालण्यामागचं व्याकरणीय कारण मला उमजलं नाही. या नावावरुन मला ते नवी दिल्लीतलं किंवा मुंबईतलं कुलाबा भागातल्या एरियाचे नाव वाटले. हेच कमी की काय पण देशाला 422007 हा नासिकच्या कुठल्या तरी भागाचा पिन कोड लावण्याचा अविष्कार देखील साधलेला आहे. या असल्या भयावह पत्त्यावरून पत्र पोहोचवण्यात भारतातले पोस्ट ऑफिस सक्षम आहे यावर माझा पुर्ण विश्वास आहे पण मस्कतमधल्या पोस्ट खात्याने देखिल हम भी कुछ कम नही हे आता सिद्ध केलेले आहे……..

महाराष्ट्र असा स्पष्ट उल्लेख असलेलं पत्र एअरमेलनी येतं ही गंमत आहे. आणि केवळ नावावरून ते माझ्या नवऱ्याला मिळतं यावरून, “बघीतलसं मी किती फेमस आहे ते!!!” हे वाक्य मला दिवसभर ऐकावे लागले.

ओमान हा देश आणि त्याची मस्कत ही राजधानी आहे हे बरेच जणांना माहित नसते हा अनुभव आम्हाला नवा नाही. आम्ही जेव्हा जेव्हा आमचे मुक्कामस्थळ सांगतो तेव्हा हे आवर्जून नमूद करतो की मस्कत ही सल्तनत ऑफ ओमान या देशाची राजधानी आहे आणि ही जागा मुंबईपासून अवघ्या २५००कि.मी. वर आहे.

मागे एकाने आम्हाला प्रश्न विचारला होता की, ’काय रे हे तुमचे मस्कत रोह्याच्या जवळ आहे का?’ काय उत्तर देणार कपाळ !!!! ते पहाता पोस्ट खात्याचे मात्र कौतूक करावे लागेल.

आणि जाता जाता Max New York च्या पत्ते टाईप करणाऱ्या त्या महान संशोधकाला सलाम !!!!! कारण तो या गोंधळावर थांबला नाही तर त्याने आमच्या नासिकच्या पत्त्याचेही व्यवस्थित पोस्ट मार्टेम केलेले आहे…… मधूमालती हे स्पेलिंग  MadhuMalit आणि म्हसोबा मंदिर चे स्पेलिंग Bhmasoba Mand करायला तो विसरलेला नाही…..तेव्हा त्याला त्रिवार सलाम!!!!

संवाद……………….

“ पण खरचं अडलय का तुझं काही?” आहेत ना तुझ्या बऱ्याच ओळखी त्यांना तरी कुठे होतय भेटणं नेहेमी?” नवऱ्याची नेहेमीप्रमाणे चिडचिड सुरु झाली होती…….कारण तसं क्षुल्लक (माझ्या मते!!!) ……माझ्या मुलाच्या वर्गात असलेल्या एकमेव मराठी मुलाचा फोन नंबर चिरंजीवांनी दहा वेळा आठवण करून दिल्यानंतर आणला होता आणि माझा त्यांना फोन करण्याचा विचार चालला होता.

आता मला खरच कितीही ओळखी झाल्यातरी त्या पुरेश्या वाटत नाहीत……….बरं मराठीच लोक हवेत अशी काही अट नाही पण जर स्वत:हुनच पुढाकार घेउन ओळख करायची तर मातृभाषेला मान का देउ नये …… जगात खूप चांगली माणसे आहेत ज्यांच्याशी निव्वळ संवाद साधला तरी जीवन खुप सोपे आणि सुंदर होते. मग केली आपणहुन सुरुवात तर बिघडले काय या माझ्या मताचा माझ्याच नवऱ्याला बरेचदा उपद्रव वाटतो……….. बरं असेही नाही की ओळख वाढल्यानंतर हा बोलत नाही तर माझ्यापेक्षा जास्त गप्पा मारतो पण नवीन आणि त्यातही स्वत:हून करायची ओळख म्हटली की वाजलीच नकारघंटा……….

परवाचीच गोष्ट घ्या आम्ही मुंबई एअरपोर्ट चेक ईन केल्यानंतर मला एक आई आणि मुलगी दिसली, भारतात जातानाही त्या दोघी आमच्याच विमानात होत्या हे मी आणि मुलाने लगेच ओळखले……… आम्ही गेलो आणि बोललो झाली ओळख. प्रसन्न चेहेऱ्याने त्यांनीही गप्पा मारल्या………..बरं मुळात नवीन ओळख करायला मनापासून ईच्छा आणि मनमोकळे बोलण्याची तयारी याहुन जास्त भांडवल ते काय लागते!!!!!

या माझ्या असल्या सगळ्या युक्तीवादावर नवऱ्याचे मत असते की हे बघ मी काही कोणी माणुसघाणा नाही पण मला एक सांग का तुला येत का असे कोणी शोधत??? तु पण तर जिथे तिथे मराठी बाणा जागवत मराठीच बोलत फिरतेस मग तुझ्या आजूबाजूची मराठी माणसं येतात का अशी लोचटपणा करत???? ’लोचटपणा’ ही ही ही!!!!!! दात दाखवत हसले मी !!!!!! आहे मी लोचट !!!!!!!

केव्हढा मोठा शब्द तो………….साधं गणित आहे आपण बोलायला सुरुवात केली समोरचा हसून बोलला …..थोडा वेळ गप्पा मारल्या….त्यातूनही एखादा आपल्याच राशीचा निघाला तर ती ओळख बहरते !!!! आणि नसेलच एखाद्याची ईच्छा तर ते ही लगेच समजते किती सोप्पय हे सगळं त्यात काही लगेच अपमान वगैरे होत नाही. कुठलेही अवघड आणि बोजड शब्द आयुष्यही जड करतात असे माझे मतं आहे.

मुळात संवाद ही माणसाची गरज असते……… आम्ही भारतात जाण्याच्या आदल्या दिवशी आम्हाला केळकर आजींचा ( ’मस्कतमधली आजी’ ही पोस्ट मी ज्यांच्यावर टाकली आहे त्या….) फोन आला त्या म्हणाल्या , “दोन्ही मुलांना घेऊन एकटीच जातेस जपून जा हो!!!!!”…… “Happy Journey” त्या दिवसभरात खूप वेळा ऐकले होते पण आजीच्या “ जपून जा हो!!” ची सर त्याला कुठली यायला!!!! या आजीशीही तर अशीच ओळख झाली होती पण तो ठेवा मात्र आयुष्यभर पुरेल.

यावेळेस नासिकला मी आणि नवरा दवाखान्यात गेलो होतो ….बाहेर आल्यावर एका रिक्षावाला भेटला आणि म्हणाला, “ अरे ताई ईकडे कुठे सगळे ठीक आहेत ना?” मग घरापर्यंत त्यानी भरपूर गप्पा मारल्या……….. रिक्षातून उतरल्यावर नवरा म्हणे ओळखीचा होता का ग? म्हटलं नाही रे परवा मैत्रीणीकडे याच्याच रिक्षातून गेले होते…………. अच्छा त्याचाही दादा, मामा किंवा भाऊ करून बौद्धिक घेतलत का आपण!!! नवरा हसत हसत म्हणाला…..आणि त्याने हाताबाहेर गेलेली केस, ही सुधारणार नाही अश्या अर्थाचा चेहेरा केला………

आम्ही कुठेही गेलो मॉल, हॉटेल, स्टेशन तरी नवरा एका बाजूला उभा रहातो आणि निघण्यापुर्वी विचारतो की झालं सगळ्यांना हाय बाय करून, घरचे सगळे कसे आहेत, हवा पाणी राजकारण सगळ्या विषयांवर सखोल चर्चा करून झालेली असेल तर निघायचे का आपण? बरं मी एक कमी होते बिचाऱ्याचा आयुष्यात तर माझी दोन्ही मुलं याबाबतीत थेट माझ्यावर गेलेली आहेत त्यामुळे बरेचदा बाबा थांब आम्ही बोलतोय ना असा आदेश आल्यावर त्याचा नाईलाज होतो……..आणि मग आमच्या बाहेरच्या ’संवादा’ वरून घरात ’वाद’ होतात……

थोडक्यात काय तर मला माझ्यासारखेच अनेक वेडे आणि जरा गोजिऱ्या शब्दात सांगायचे तर संवादासाठी कायम भुकेले माणसं सतत भेटतात. आमची आजी नेहेमी सांगते जसा चष्मा लावाल तसे जग दिसते……..त्यामुळे आपण बोलल्यावर समोरच्याने दुर्लक्ष केले तर, आपण फसवले जाउ वगैरे मुर्ख शंका मनात न येता जगात खूप चांगली लोकं आहेत आणि त्यांच्याशी होणाऱ्या संवादातून आपलेही जीवन समृद्ध होईल याविषयी माझ्या मनात किंतू नाही!!!!!!!!!!!!!!!!!!!