लेकीच्या माहेरासाठी…….

नुकताच जागतिक Girl Child Day झाला……

मुळात या राजकन्या जन्माला आल्यानंतरचे सगळेच दिवस खरं तर त्यांचेच असतात……..तरिही असा एक दिवस ज्यात आपलीच नव्हे तर जगातल्या सगळ्याच मुलींचा विचार प्रत्येकाने करावा नाही का!!!! आज मात्र हे विचार मी एक आई, एका सात वर्षाच्या मुलाची आणि अडिच वर्षाच्या मुलीची या भुमिकेतून मांडतेय……..माझी मुलाची डिेलिवरी अगदी सोपी झाली…….पण माझ्या लेकीची गोष्टच निराळी!! मुलगा झाला तेव्हा म्हटलं आहा रे!! आपण केव्हढे पक्के आहोत…..अजिबात आरडाओरडा नाही केला डिलिवरीत….. माझ्या लेकीने मात्र माझी पुरती खोड जिरवली……भरपूर त्रास झाला…अगदी जीव नको नको झाला….अखेरी रात्री तीन वाजता एकदाचे कन्यारत्नाचे आगमन झाले……..तिचं ते पहिल ’ट्याँव……’ ऐकलं ….माझे श्रमलेले, शिणलेले आधीच पाझरत असलेले डोळे आणखीनच वाहू लागले……त्याक्षणी मनात आलं देवा रे माझ्या पिल्लाला पण याच दिव्यातून पार पडावं लागणार आहे रे!!!! तो क्षण, तो विचार, मनातली ती आंदोलन…..घट्ट जोडले गेले मी तिला……जाणवलं फरक आहे गड्या एका मुलाची आणि एका मुलीची आई होण्यात!!!!! ’आईपण’ सारखच असतं मुलगा असो की मुलगी190120091609…आईसाठी सगळीच लेकरं सारखी वगैरे या माझ्या समजाला धक्का बसत होता……

त्यानंतर दवाखान्यातले चार दिवस खूप बोलले तिच्याशी……’सखी’ हे तिचं आणि आम्हा दोघींच्या नात्याच ठेवलेलं पहिलं नाव……..नवऱ्याला म्हट्लं आता गरज नाही तुमची…..आम्ही दोघी भटकू आता…….गळ्यातले, कानातले, ड्रेसेस, साड्या, टिकल्या ह्या तुमच्या लेखी निरर्थक गप्पा मारत……. एक ना अनेक स्वप्नच स्वप्न…….मी आणि माझी लेक दोघी दोघी……जवळ कुशीत होते ते एक सत्य…तेही स्वप्नवत…………..

मला मुलींची भलती हौस. याउलट माझी बहिण म्हणायची ताई काय करायचीये मुलगी…..मुलगाच बरा!!! मुलींना जपत बसा उगाच!!!तरीही मला मुलगीच हवी होती…….सुंदर सुंदर फ्रॉक घालणारी…छुमछूम वाजवत घरभरं फिरणारी……बाजारातले मुलींचे ड्रेसेस पाहिले की तर ही ईच्छा आणि वाढायची. नवरा म्हणायचा आहे ना आपल्याला मुलगा त्याची बायको येइल…सुनेलाच मुलगी मान!!! आता सुनेला मुलगी मानायला माझी ना नाही पण ते म्हणजे दुधाची तहान ताकावर भागवण्यासारखे आहे…….दुसऱ्यांदा मुलं होणार म्हटल्यावर मला सासरी सगळे म्हणाले मुलगी होत नाही आपल्याकडे….मुलांची संख्या वाढणार फक्त……..म्हटलं नाही मला मुलगीच होणार……मग मधेच एखादी अनुभवी(!!!) मैत्रीण सांगायची मुलासारखाच आहे बघ पोटाचा घेर….तुला काही मुलगी होत नाही बघ!!! मी म्हणायचे मी काय तुच बघ!!! तरिही कधीतरी वाटायचे होईल ना आपल्याला मुलगीच!!! अश्याच एका क्षणी आईकडच्या गौरीला नवसही बोलले म्हटलं मुलगी होउ दे गं बाई!!! …..मग लेकीचे नाव ठेवलेय “गौरी”……

हळुहळू माउ मोठी होतीये…..आता तर ध्यान अडिच वर्षाचे झालेय…..आता आम्ही तिचे केस वाढवणार आहोत……मस्त पोनी बांधायचीये आम्हाला……माझ्या ड्रेसिंग टेबलवरचे सगळे सामान आता शेअरिंग मधे आहे…..मस्त नट्टापट्टा सुरू असतो मॅडमचा……मी डोळ्यात साठवत असते तिच रूप……. तिच्या बालपणात माझं बालपण जगतेय मी….. ती म्हणते मम्मा आपण दोघी फ्रेंड्स…………एकाददिवशी आजीबाईपणा करत बापाला सुनावते, “मला ना तुझा कंटाला आलाय ऑफिसमधून आल्यावल हायपाय का नाही धूत तू ?? जा आधि बातलूममधे…….” तिच्या त्या कमाल बोबड्या धमकीचा मान ठेवत तो मला म्हणतो, “खरयं बरं तुझं, ही बया पक्की तुझ्यावर गेलीये…….”

परवा रात्री माझी गौराई झोपली……तिला म्हटलं “ तू झोप मी चादल टाकते तुझ्या अंगावल…” तर मला उलटून म्हणाली, “मम्मा चादल नाही चा—द—य, बोबलं बोलू नकोस!!!!” म्हणजे ’र’ चा उच्चार ’ल’ न करता ’य’ केला की ते स्पष्ट………पण हा असला तोरा मुलींनाच शोभून दिसतो. मागच्या दिवाळीत अभ्यंगस्नानासाठी मी घरातल्या उर्वरीत तिघांना तेल लावलं……मनात सहज विचार आला, आज आईकडे असते तर आईने मलाही तेल लावले असते…….क्षणभर तिच्या मायेच्या स्पर्शाची आठवण झाली तेव्हढ्यातच माझी लेक धावत आली म्हणाली, “ अले मम्मा तुला कोन लावनाल तेल…चल बस पाटावल….” कोण आनंद झाला होता मला…म्हटलं, ’जितं मया’ याचसाठी तर केला होता अट्टहास………..

मागे एकदा माझी एक मैत्रीण म्हणाली होती, “अरे बेटी ऐसेही नही आती किसीके भी घर……कन्यादान करने के लिये पुण्य होना चाहिये.” आपण कितीही शिकलेलो, पुढारलेलो बिढारलेलो असलो ना तरीही कोणी असं काही बोललं की मस्त वाटतं की माझ्याकडे माझी छकूली आहे……..तरिही मनात कधीकधी काहितरी बोचतं………..आता सासरी निघालेल्या मुलींना पहाताना एक वेगळीच सल उमटते….. “जा लाडके जा…” ऐकताना बाबा का रडायचे ते उमजलयं आता……..’सर्किट’ ची मुलगी पाहिली मागे…गोरी गोरी पान…निळ्या डोळ्यांची…..म्हटलं देतोस का रे सुन म्हणुन…..तर म्हणे आधिच मागण्या आहेत तिच्यासाठी…..आणि बायको आत्ताच रडते मुलगी सासरी जाणार म्हणून…….हसले मी…….पण असच होतं ते लेकीमधे आई स्वत:ला पहात असते ना!!! माहेरचा उंबरा ओलांडून सासरी जाणं…….काही गोष्टी नाही बदलत जग, काळ कितीही बदलले तरी!!!!!

अश्यावेळी मला हम आपके है कौन मधली ’समधी समधन’ म्हणणारी रिमा आठवते…..गाताना अचानक तिचं लक्ष लेकीच्या फोटोकडे जातं…..डोळे पाणावतात…..ती गाते

मेरी छाया है जो , आपके घर चली…..

 सपना बनके मेरी , पलकों मै है पली…..

राजकी बात बताए , ये पुँजी जिवन की…..

शोभा आजसे है ये आपके आँगन की॥

लेकीचं सासरी जाणं……तिचं माहेरपण आईची स्वप्न सगळी…….माझ्या लेकीला समजत नाही अजून तरी माझ्या मात्र कितीतरी अपेक्षा आहेत तिच्या शिक्षणाविषयी, व्यक्तिमत्वाविषयी…….आणि हो नवरा, सासर याविषयीसुद्धा……….. माहेरचे गाणे गायचे होते तर सासराले कश्यासाठी आली असे विचारणाऱ्याला बहिणाबाई उगाचच नाही म्हणून गेली………..

अरे लागले डोहाये,सांगे शेतातली माटी

गाते माहेराचे गानं, लेक येईल रे पोटी….

 दे रे दे रे योग्य ध्यान ऐक काय मी सांगते

लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते……………

तर काय मी स्वत:, माझी आई, माझी आजी आणि अश्या तमाम आयांना आणि त्यांच्या लेकींना शुभेच्छा!!!!!

Advertisements