आ बैल मुझे मार………..

/ दिवसापुर्वी माझी एक शेजारीण संध्याकाळी साधारण साताच्या सुमारास येउन बसली……गप्पा झाल्या, चहा झाला, मुले/ नवरा यांची जेवणही झाली……होता होता साडेआठ झाले पण हिची काही हलण्याची चिन्ह दिसेनात. आम्हा सगळ्यांची चूळबूळ, मुलांवर माफक चिडचिड सगळं झालं. मला स्वत:ला संध्याकाळी कोणाचे नवरे घरी आल्यावर विनाकारणच त्यांच्याकडे ठिय्या देउन बसायला आवडत नाही…..आजच्या आमच्या पाहूण्याची मात्र अशी काही अट असल्याचे दिसत नव्हते.

नवाच्या सुमारास माझे आईबाबा ऑनलाईन आले, मग सासूसासरे- जावई, नातवंड- आजी आजोबा अश्या चॅटिंगच्या जुगलबंद्या झाल्यावर मला मैदानात पाचारण करण्यात यावं असा उभयपक्षी ठराव पास झाला…….त्यानूसार बेडरूममधून मला आवतण देण्यात आले…..पण हा ही प्रयत्न फोल ठरवून माझी शेजीबाईरुपी मैत्रीण जागीच होती.नवऱ्याच्या कपाळावरचं आठ्यांच जाळ आणि ही बाई गेल्यानंतरच माझ्यावरच शाब्दिक संकट मला स्पष्ट दिसत होतं………..आज पहिल्यांदाच तो माझ्याजागी होता, नाहीतर एरवी हा त्रास त्याच्या मित्रांपायी मला होत असतो. तरिही एकिकडे असेही वाटत होते की हिचं घरात काही बिनसलं तर नाही ना!!!!!!! ईथे परदेशात उठ्सूट, ’मै मायके चली जाउँगी’ ची धमकी घालता येतं नसल्यामुळे हिचा नाईलाज तर नाही ना झाला???? शेवटी न रहावून मी तीला विचारलेच तर ती म्हणे, “अरे कुछ भी नही, मेरे घर मे मेरे हजबंड मेरे बेटे की पढाई करवा रहे है तो ये सिरियल्स मै वहाँ नही देख सकती!!!!!!!!!!!!!” म्हटलं कप्पाळ माझं…….स्वत:चाच राग येतो अश्यावेळी. आपल्या अघळपघळ चांगूलपणाचा ( सर्किटचा शब्द), भिडस्तपणाचा लोक अक्षरश: गैरफायदा घेतात, आणि आपण काहीही करत नाही.

मस्कतला आल्यावर तर मला प्रकर्षाने हा अनुभव आलाय. आपल्या चांगूलपणाला आपला वेडेपणा म्हणण्याची वेळ अनेकदा आलीये…….आता हा परवाचा ’माझ्या’ मैत्रीणीचा एखादा किस्सा सोडला तर याप्रकारे बळीचा बकरा माझा नवराच अनेकदा बनत असतो. मी इथे आले तेव्हा मुलगी साडेपाच महिन्याची आणि मुलगा पाच वर्षाचा होता माझा. आल्यानंतर महिन्याभराच्या आतच नवऱ्याच्या बॅचलर मित्रमंडळींच्या गप्पा सुरू झाल्या, “अरे भाभीजी आ गयी है तो कब बुला रहा है खाने पे???” बरं नवरोजींनी व्रत घेतल्यासारखे त्या सगळ्यांना ईमाने ईतबारे बोलवायला सुरुवात केली. सकाळी ९/१० वाजता नवऱ्याचा फोन आला की मला धडकीच भरायला लागली, कारण हा फोन यायचाच मुळी त्याच्याबरोबर जेवायला कोणकोण येतय याची यादी द्यायला……घरात लहान मुलं, जागा नवी, कामाला बाई नाही फजिती व्हायची नुसती…..

मला स्वत:ला स्वयंपाक करायला आणि वेगवेगळे पदार्थ करून खाउ घालायला आवडतं पण ही परिस्थिती वेगळी होती, मुळात यात माझा नवराच फितूर होता. माझी बायको कशी सुगरण आहे हे जणू साऱ्या जगाला पटवायला निघाल्याच्या अविर्भावात तो वावरत होता. बरं त्याला काही म्हणावं तर याचे ठरलेले उत्तर, हे बघ मी काही स्वत:हून आमंत्रण वाटत फिरत नाही, लोक स्वत:ला self invite करतात त्याला मी काय करणार. यथावकाश यापैकी अनेक उपटसूंभांच्या फ्यामिलीज आल्या आणि त्यापैकी एखादा अपवाद वगळता बाकी कोणीही आम्हाला बोलावणे तर सोडाच पण ओळख दाखवण्याचेही कष्ट घेतले नाहीत………आता ’सोनारानेच कान टोचलेले’ असले तरी नवऱ्यात १००% सुधारणा होणार नाही याची मलाही जाणिव आहे…….

आम्हा दोघांनाही कोणाला आपल्या घरी बोलावून बाहेरचे जेवण द्यायला आवडत नाही, अगदीच नाईलाज असेल तर गोष्ट वेगळी पण केवळ कंटाळा म्हणून असले काही आम्ही करत नाही……याविषयी लोकसत्तामधे मुकूंद टाकसाळेंचा एक छान लेख आलेला आहे…… पण मग करा मेहेनत आणि बरेचदा तर भाजा लष्कराच्या भाकऱ्या. काहीही असलं तरी आता मात्र मी हे असले एकतर्फी नाते ठेवण्याबद्दल आवाज वाढवायला सुरुवात केली आहे…….यावेळेस भारतात गेल्यावर सासूबाईंशी बोलताना त्या म्हणाल्या, “अगं बाई वेळीच आवर घाल त्याला, बदलला नाही गं बाई हा अजून!!!!!!!” कधी नाही ते नवऱ्याबाबत आम्हा दोघींचे ऐतिहासिक दुर्मिळ एकमत झाले.

गेल्या वर्षी आम्ही भारतात गेलो त्याचसूट्टीत नवऱ्याच्या मित्राचे आई-वडिल येणार होते, आता ईतर बॅचलर लोकांमधे त्यांना रहायला का भाग पाडायचे, एवीतेवी आपले घर रिकामेच आहे तर राहू दे त्यांना ईथे सुखाने या विचाराने प्रवृत्त होउन आमचे घर त्यांना सुपुर्त करण्यात आले. आम्ही परत आल्यावर घरात मी आल्या आल्या गैरसोय नको म्हणून भरून ठेवलेल्या किराण्याचा खातमा झालेला, आयर्न बोर्ड जळालेला, वॉशिंग मशिनच्या ड्रायरची रिंग तुटलेली अश्या अनेक लहानसहान बाबी आढळल्या. कहर म्हणजे मस्कतसारख्या ठिकाणी जिथे प्रचंड घरभाडे आहे तिथे आपली सोय झाली याबद्दल त्या मित्राने अवाक्षरही काढले तर नाहीच उलट आलेल्या लाईटबिलाची ब्यादही आमच्या गळ्यात घालण्याचा त्याचा हेतू होता………तेव्हा मात्र मी खडसून सांगितले की हे चालणार नाही……..सरतेशेवटी एक मान्य आहेच की आपलेच नाणे खोटे…….

या सगळ्या पाहुणचाराची ही नावडती बाजू असली तरी काही अशीही नाती लाभलीत जी नुसती टिकावी नाही तर जोपासावी असे कायम वाटते. कदाचित त्याच मंडळींमूळे असावं की माणूसकीवरचा आणि नात्यांमधल्या गोडव्यावरचा विश्वास काही उडत नाही.

थोडक्यात काय माझा नवरा जोवर मोकळ्या मनाने ’आ बैल….’ म्हणतोय तोवर ’मुझे मात्र मार’ खावा लागणार आहे……कारण कितीही ठेचा खाल्ल्या तरी म्हणतात ना, ’त्याचा येळकोट राहिना…मुळ स्वभाव जाईना………’

 

Advertisements

16 thoughts on “आ बैल मुझे मार………..

 1. तन्वी,
  मी वाट बघतच होते कधी लिहितेस हा विषय. मस्तच लिहिलेस.तिला मराठी वाचता येत असावे कारण आमची मुंबई.बरे होईल न सोनाराने कान टोचले

 2. माझे वडिल ही असेच आहेत तुम्ही जे वर्णन केल आहे त्याप्रमाणे मोकळ्या मनाने ‘आ बैल….’ अस म्हणणारे आणी कोणालाही कधीही मदत करायला तयार अशे,तस हे काही वाईट नाही पण बहुतेक वेळा त्यामुळे त्रास होतो तो आम्हाला…शिवाय बरयाच वेळा समोरची व्यक्ति त्याच्या गरजेनंतर पार बदलून जाते तेव्हा फार वाईट वाटते..असो आम्ही घरातल्या राउंड टेबल कोन्फ़रन्स मध्ये नेहमीच वडिलांना याबाबत समज दिली आहे पण ते तेवढ्यापुरती हा म्हणतात बाकी त्यांच्या तत्सम समाजकार्यात कुठेही खंड पडू देत नाही.मलाही बरयाच वेळा दुसरे आपल्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतात अस जाणवते मग मी मनाशी निश्चय करतो यावेळी नाही बस झाल आता ..पण वेळ आली की तो निश्चय कुठे विरून जातो ते कळत सुद्धा नाही.बरच मनात येत आहे,पण पोस्ट कमेन्ट खुप मोठी होत आहे म्हणून थांबतो आता….

  लवकर पुढचा लेख टाका

  • मला तरी नैतिक अधिकार नाही कांही बोलण्याचा. मी पण अमितच्याच रांगेतला. नाही म्हणणं कधिच जमत नाही मला.या मुळे माझा बरेचदा तोटा पण झालेला आहे…. पण…………

   • देवेंद्र, महेंद्रजी…नवऱ्याने असे असायला आम्हा बायकांचा विरोध नसतो, उलट मनात तो हक्काने कहितरी करतोय ही जाणिव सुखावते. त्याने हे असे आपल्याला गृहित धरणे ही आवडते पण लोक जाण ठेवत नाहीत मग फार वाईट वाटते…..उगाच आपल्याला वेड्यात काढल्यासारखे होते. नात्यांमधे ही असलीच गोची होते मग…..

 3. खूप खरे आहे. माझा अगदी असाच अनुभव आहे – आपल्याच पाहुणचाराचा आपल्यालाच त्रास होण्याबाबतीत!
  आपण भले उगाच परक्या देशात त्रास नको म्हणून ‘ओसरी’ द्यावी तर त्यानी ‘हात-पाय पसरले’च म्हणून समजा. त्यामुळे मी आज-काल कितीही वाटत असले तरी मागितल्याशिवाय मदत करत नाही. अगदीच रहावलं नाही तर अपेक्षा न ठेवता आणि माफक मदत करते.
  पोस्ट छान झाली आहे. पुढच्या भागाची वाट पाहते.

 4. काय गं आपलीच का नाणी खोटी…माझा पण याबाबतीतला अनुभव अगदी असाच आहे…आमच्या नवर्याचा एक मित्र कम इथला शेजारी अगदी आग्रह करुन एका आइस्क्रिम पार्लरमध्ये जाऊया करायचा आणि नेमकेच त्याच्याकडे सुटे पैसे नसायचे..खरं तर इथे क्रेडिट कार्ड सरसकट चालायचे पण आमचे साहेब तत्परतेने त्यांना अरे मेरे पास है ना..आणि असं एका वर्षी संपुर्ण उन्हाळा झालं..आणि मजा म्हणजे याला ते पैसे देताना त्याचं कुठलं कार्ड होतं त्या दुकानाचं जिथे अमुक एक पैसे खर्च केले की पुढचं आईसक्रिम फ़ुकट होतं ती सवलत पण उकळायची असायची..असो….पुढच्या भागाची वाट अर्थातच पाहातेय हे वेगळं सांगणं नको….

  • श्रद्धा, अपर्णा आभार…..अगं आपली नाणी का खोटी हे त्या नाण्याला विचार, बघ कसे मस्त गुंडाळतात आपल्याला. अमित तर म्हणतो की तू खणखणीत नाणं आहेस म्हणून मी खोटेपणा करू शकतो….बरं चेहेरा अश्याच वेळेस विशेष भोळा करतो गं, माझा नाईलाज झालाच समज!!!!

   • अगदी बरोबर दिनेश खूपदा मला त्याची पौणागिंनी म्हणतो…म्हणजे झालं ना पाउण जबाबदारी माझी…

 5. अगदी माझ्याच मनातले लिहिले. आम्हालाही बरेचदा हा आ बैल मझे मार चा अनुभव आला आहे. आणि चांगुलपणाचा गैरफायदा घेऊन वर अरेरावी / हा आमचा हक्कच होता टाईप वागणे म्हणजे कळस. भिडस्तपणा असा अंगाशी येतो कधिकधि. छान झाली अहे पोस्ट.

 6. तन्वी अगं देशस्थ आणि भिडस्त हे काही उगाच पडलेले समीकरण नाहीये गं. बहुतांशी सगळीच नवरे मंडळी अचानक फोन करून बायकोची तारांबळ उडवण्यात माहीर असतातच. पण ते असे मुद्दाम करत नाहीत गं. तेही बळीच पडतात ना[:)]. आमच्याकडे लागोपाठ चार वेळा हे आ बैल झाले की मी रणशिंग फुंकते मग पुढचे दोन आठवडे शांतता की पुन्हा येरे माझ्या मागल्या….. हाहा… मजा व सजा असा हातात हात घालून चालणारा हा प्रकार आहे खरा. मस्त विषय घेतलास गं. पुढचाही लागलीच वाचतेय.

  • अंजू मी नेहेमी म्हणते मला जुन्या लेखांवर प्रतिक्रिया आल्या की भलता आनंद होतो……तेव्ह आभार आणि स्वागत….

   बाकि हा अनुभव …काय बोलावे…..बरेच घरी मातिच्या चुली असे म्हणावे लागेल…..

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s