मावशी ते मेड…..(‘मेड’ ईन ईंडिया)……

’बस हो गया मॅडम अभी हमको मुलूक जानेका….’ नुकतीच माझ्याकडे येउ लागलेली बांग्लादेशी ’मेड’ म्हणत होती. म्हटलं ’का गं काय झालं???’ तर म्हणाली की अनेक वर्ष झाली बाहेर, आता घरही सावरलयं…..मुलूकची याद येते म्हणाली.

संध्याकाळी नवऱ्याला सांगितल तर हसायला लागला, म्हणाला मस्कतला काही तुमच्या नशीबात कामवाली बाई दिसत नाही. आजवर मारे सांगायचीस ना सगळ्यांना की माझ्याकडे बाई टिकतेही आणि चांगले काम करते. गेल्या तीन वर्षात पहिल्यांदा तुला तक्रार नाही आणि आता ही पळायच्या गप्पा करतीये…….

’मेड’ आपल्याकडची मोलकरीण, कामवाली बाई( सध्या ची Domestic Helper) ……आयूष्याचा एक अविभाज्य घटक. जिच्याशी बरेचदा ’तूझं माझं जमेना नी तूझ्याविना करमेना’चे नाते असते. ईथे आल्यावर कळले या ’बाई’ ची ’मेड’ झाल्यावर ती आमूलाग्र बदलते. ईथल्या मेड असतात श्रीलंकन, बांग्लादेशी किंवा दक्षिण भारतीय….पैसे द्यायचे तासावर. माझ्याकडची पहिली मेड हैद्राबादी होती. एका तासात वेजल्स, स्वीपिंग, मॉपिंग करणार म्हणे. म्हटलं कर बाई, मी तशीही अडलेला हरी आहे. मुळात धूणंभांडी, झाडूफरशी किंवा लादी ला या साहेबाच्या भाषेत ऐकताना मजा येत होती. ही  ’मेड’ मला ताई न म्हणता मॅडम म्हणत होती. विनाकारणच मला ती परकी वाटत होती…दुसऱ्या दिवशी तर हद्द झाली, खिडकीतून बाहेर पाहिले तर ही कारमधून उतरली. म्हणे लेट हो गया तो हजबंड ड्रॉप किया. कर्म माझं इथे माझ्या हजबंडला अजून लायसन मिळालेले नव्हते…..म्हणजे मी ’बे’कार आणि ही कारवाली बाई. त्यातही माझ्या रोह्याच्या पुष्पाला मी सगळ्या कामाचे ३०० रुपये देत होते आणि हिला अर्ध्याच कामाचे ३०००रुपये……चार महिने बाई नाही लावली तर एक तोळा सोनं येतं या माझ्या युक्तिवादाला नवऱ्याने अजिबात दाद दिली नसल्यामूळे मला हे आता सहन करायचे होते. पंधरा दिवसातच कढईवर काळी पुटं चढणे, घर पुसून न पुसल्यासारखे वाटणे, डिटर्जंट संपणे सु्रू झाले. त्यातच माझे बाबा आमच्याकडे रहायला आहे…..ते तर एक दिवस वैतागून म्हणाले की मी करतो ही कामं पण ही ब्याद हाकल!!!!!

ती गेली, मग हे सगळे काम घरात घेतले. काही दिवस तो फार्स झाला आणि माहिती कळली की शेजारच्या बिल्डिंगमधे मराठी मेड आहे. मग पुन्हा तिला बोलावून दोन महिने सुख अनूभवले…..पुनश्च पहिले पाढे पंचावन्न झाल्यावर मात्र कानाला खडा लावला की पुरे आता पैश्याची नासाडी. अर्धी भांडी जर आपणच घासायची असतील तर पुर्णच घासू…..घरात व्हॅक्य़ूम केलं की झालं. शुक्रवारी नवऱ्याने मदत करायची…सगळ्ं कसं आखिव रेखीव. कागदोपत्री मस्त झाला प्लॅन.  २-३ महिने पुन्हा मस्त मजेत….नवराही उत्साहाने मदत करत होता.मग भारत भेट झाली, पुन्हा महिना सुखात…..हळूहळू नवऱ्याने त्याच्या शुक्रवारच्या झोपेचे खोबरे होते या कारणाने अंग काढून घ्यायला सुरुवात केली….आणि मेलं दिवसभर आपण राब राब राबलो तरी काम ईथले संपत नाही याची मलाही प्रचिती येउ लागली.

अश्यावेळी मला आवर्जून आठवण येते ती माझ्या औरंगाबादच्या मावशींची.  लग्नापुर्वी मी जॉब करत असताना माझ्याकडे येणाऱ्या या मावशी……काय काय काम करणार वगैरे काही बोली न करता माझ्याकडे यायला लागल्या, त्या आम्ही मुलाला घेउन चार वर्षानी औरंगाबाद सोडले तोवर येत राहिल्या. दिसेल ते काम झपाट्याने उरकणे, एकीकडे तोंडाचा पट्टा सुरू. मी घराबाहेर असल्यामूळे घराची एक किल्ली कायम त्यांच्याकडे असायची. संध्याकाळी दार उघडले की मिळायचे एक स्वच्छ नीटनेटके आवरलेले घर. मला मुलगा झाल्यावर मावशी सकाळी यायला लागल्या ……मुलाला आंघोळ घालणे, त्याच्या गादीवरची चादर बदलणे, त्याची दुपटी डेटॉलच्या पाण्यात भिजवणे असलं सगळ हायजिन ती अडाणी बाई पाळायची. जास्तीचे पैसे देते म्हटल्यावर मात्र त्या रागावल्या होत्या म्हणाल्या, “ताई अगं लेकरू आत्ता रांगत येइल आणि मला आजी म्हणायला लागेल…त्याला काय सांगायचे ही आजी तुझ्या कामाचे जास्तीचे पैसे घेते!!!!!”  आल्याआल्या मी काही खाल्लय का ते पहाणं आणि लगेच गरम गरम बाजरीची भाकरी करणं हे त्यांच रोजचं काम……”माझा नातू मोठ्ठा साहेब होइल मला गाडीतून फिरवेल…..” माझ्या लेकाबद्दलची त्यांची स्वप्न आज लिहीतानाही माझ्या डोळ्यात पाणी येतेय!!!!! नवऱ्याशी मात्र नेहेमी वाद व्हायचे त्यांचे….ह्यानी खूंटीवर टांगलेल्या एकूण एक कपड्याला त्यांच्यामते घामाचा वास येत असायचा…आणि मग त्या ते सगळे कपडे भिजत घालून आपटुन धुवायच्या. याच्या मते काही मळत नाहीत येव्हढे माझे कपडॆ आणि मावशींना मात्र हे अजिबात पटायचे नाही, त्यांचे ठरलेले उत्तर ,”माणसाने स्वच्छ कपडा घालावा!!!! ” दर शुक्रवारी मस्त जुंपायची त्यांची!!!!!

लहान गावात तशी पटकन जुळतात ही नाती!!! साधी माणसं आणि लहान मागण्या असतात. प्रोफेशनल नसतात म्हणा ना!!! माझ्या मावशीकडे मालेगावला कामाला येणारी आमची शोभा मावशी, आज गेली २५ वर्षे बघतीये मी तिला. मावशीचे आणि तिचे अनेकदा रुसवे फुगवेही व्हायचे, पण ती तरी परत यायची नाहीतर मावशी तरी तिला घेउन यायची.

पुढे आम्ही नासिकला गेल्यावर आमचे मात्र या आघाडीवर थोडे हालच झाले…मनाजोगती बाई काही लवकर मिळेना. पण हा मोलकरणीचा ग्रह माझ्या राशीला जरा उच्चीचा असावा माझा कारण आम्ही रोह्याला गेलो…..आणि मला भेटली ’पुष्पा’. वयाने माझ्याबरोबरीची पुष्पा महिन्याभरातच माझी मैत्रीण झाली. सासर माहेर, आजुबाजूच्या बाया, भाजीपाला कुठल्याही विषयावर गप्पा मारत आमचे काम पटापट उरकायचे. मग फक्कड चहा घेतला की ती पळायची बाकीच्या कामांना. पण दिवाळी असो किंवा माझ्याकडे कोणी येणार असो लगबग पुष्पाचीच असायची. ना मला कधी तिच्या मागे घरभर फिरावे लागले ना सतत सुचना कराव्या लागल्या…..एखाददिवस तिलाही कंटाळा येणार हे मला मान्य होते, आणि ती आजारी पडू शकते, घरच्या जबाबदाऱ्यांसाठी एक तारखे आधि पैसे मागू शकते हे गृहित धरले होते. आमचे सूर जुळले होते हे खरे!!!  मी दुसऱ्या डिलीवरीसाठी नासिकला गेले आणि आम्ही रोहा सोडले….मावशींसारखीच पुष्पाचीही माझ्या लेकीबद्दलची स्वप्न तशीच राहिली. लेक सव्वा महिन्याची झाल्यावर तिला आधी नेले रोह्याला कारण मी जन्मदाती आई असले तरी नऊ महिने तिची काळजी घेणारी ’ही’ आई तिची वाट पहात होती. आम्ही पोहोचण्यापुर्वी आमचे घर रांगोळी घालून लेकीची वाट पहात होते. निघताना पुष्पाने दोन्ही मुलांच्या हातात पैसे ठेवले. तिच्या त्या पन्नास रुपयांची परतफेड कशी करावी हा विचार नेहेमी मनात येतो!!!!!

या सगळ्याची सर येणारी मेड मिळणं हे एक स्वप्नच वाटते मला……इथे तर सगळा ’मोले घातले रडाया’ प्रकार आहे असे वाटत असताना आता ही बाई यायला लागली आणि लगेच दिवाळी आली. मूळची बांग्लादेशी मुस्लिम बाई पण मॅडम दिवाली का लिये घरका क्लिनिंग कबसे स्टार्ट करनेका असे विचारून माझ्या मनात जागा करून गेली. गेल्या महिन्यातला तिचा उत्साह, मुलांशी बोलणं सगळं पहाता आपला मेडशोध सुफळ संपूर्ण झालाय असे वाटत असतानाच तिने मला ’मुलूक ची याद’ चा दणका दिला. दिवाळीत एक दिवस खिडकीतल्या पणत्या उचलून त्या ठेवायच्या होत्या तिला, पण ही हात लावेना म्हणे आपको कैसे चलेगा मै हात लगाएगा तो?……म्हटलं बाई तू घासलेल्या भांड्यांमधे सगळा फराळ केला. त्यातच नैवेद्य दाखवला आणि आता हे काय नवीन!!!!! खुदकन हसली ती, पटकन पणत्या उचलल्या आणि पटापट घर आवरले.

तसही मनात येतं आपल्या आयूष्यातली मोलाची, हिंमतीची, तारूण्याची वर्ष आ्पल्या आईसाठी, भावांसाठी सहज ओवाळून टाकून दुर देशात काम करणाऱ्या या बाईच्या पावित्र्यावर मी कशी शंका घेणार!!!!!!! माझ्या आधिच्या मावशींसाठी, पुष्पासाठी काहितरी करायचे आहे हा एक विचार पण घरी जाण्यासाठी तिकीटाचे पैसे साठवणाऱ्या या सेलीनाला मात्र आज मी सांगितले की तिच्या या साठ्यातले शेवटचे काही पैसे माझ्याकडून न्यायचे आहेत तेव्हा लवकर बाकी रक्कम जमव आणि पळ तूझ्या घरी!!!!!!

जोवर आहे ही तोवर मात्र पुन्हा मस्त गट्टी जमणार हे नक्की…..मावशी ते मेड माझ्या मैत्रीणी…..नावं गावं वय वेगळं पण नातं तसचं, व्यवहारापलीकडचं…………………

आरसा……..

“मम्मा मी बाबाजवळ झोपणार……………….” —-कन्यारत्न

 “नाही काल ही झोपली होती आज मी झोपणार……………” —चिरंजीव

“दादू काय आहे रे बाबाजवळ……तू लहानपणी मम्माजवळच झोपायचा. मला नाही करमत तूझ्याशिवाय!!!!!!काही नको बाबा बिबा, तू ये माझ्याजवळ…………तसंही माझं शहाणं शहाणं पिल्लूच माझं आहे!!!! बरं का छकूले दादा माझा आहे……………..”—-ईति आम्ही

 “नाही दादा माझा आहे…..”—-कन्यारत्न

“माझा…”—-मी

 “झोपा रे कोणीही कुठेही…………..”—–बाबाची एंट्री.

“ए बाबा तू थांब जरा!! दादा माझा आहे………..”—-कन्यारत्न

“ए छकूले आपण भांडतोय खऱ्या, पण खरा मेंबर यईल आणि आपल्या दोघींशी वाद घालेल या मालकी हक्कावरून!!!!!!!!!!!!!!!!!!!”——मी

आता छकूली शांत…तिच्या डोक्यावरून गेलय माझं वाक्य. पण चिरंजीव आडव्याचे उभे…………..

 “म्हणजे माझी बायको ना!!!!!…”—- चिरंजीव

आता मी गार!!!!

“काहीतरीच काय रे…चला चला झोपा….”—-मी

“मम्मा मला माहितीये माझी बायको आली की तिचे आणि तुझे भांडण होणार…. “—-चिरंजीव

 “तूला कोणी सांगितलं रे….मी आणि आजी काही भांडतो का????आम्ही नाही का म्हणत की आपण सगळे एकमेकांचे आहोत…we are a family म्हणून…..”—–मी

 “नाही माझ्या क्लासमधे एक फ्रेंड आहे माझा, त्यानी सांगितलय की आपली वाईफ आली की तिचे आपल्या मम्माशी फायटींग होणार…”—- चिरंजीव

“अच्छा!!!!! अजून काय सांगतो हा तुझा फ्रेंड????…….”—–मी चांगलेच चपापले होते मी, पण पाणी किती खोल आहे अंदाज नको यायला……..मुले हे आपला आरसा असतात. घरात काय चाललय याचा मस्त आढावा घेतात आणि चारलोकात शोभा करतात. आणि याबद्दलची जागरूकता मी पाळतेच पण माझ्यापेक्षाही जास्त माझ्या सासूबाई पाळतात. मुलं मोठी होताहेत…ते तुम्हालाच बघून शिकताहेत, एकटेच रहाता…..जपा त्यांना हे त्या दर फोनवर सांगत असतात. आम्हा दोघींमधे मतभेद असले तरी ते टोकाचे नाहीत….आणि त्यांना मुलगी नसल्यामूळे म्हणा किंवा मी त्या घरची सून होउन आज ८-९ वर्षे झाली म्हणा पण नातं गोडं झालय हे खरे!!!आणि आज हे पात्र माझीच शाळा घेत होते. म्हणजे माझ्या घरच्या पोळीभाजीला बाहेरच्या पिझ्झाचा गंध!!!! सरसावून बसले मी!!!!!!

“मी त्याला सांगितल की आई-आजी नाही पण मम्मा-बाबा नेहेमी भांडतात…..”—- चिरंजीव

“कधी भांडतो रे आम्ही????? काहीही आपलं!!! शाळेत अभ्यासाला जाता ना तूम्ही……तुमची ती बाई काय करते….पाढे पाठ करायला सांग त्या मित्राला तूझ्या!!!!!!”—-नवऱ्याची रिएंट्री

“अहो let me handle!!!!”—-मी

“हे बघ रात्रीचे दहा वाजलेत, झोपा आता!!!! सकाळी उठत नाही मग तुम्ही दोघं!!!! उद्या शाळा आहे त्याला…. लावलीये बडबड दोघांनी उगाच!!!!”—-नवरा

 “थांब रे जरा…..बोलू दे आम्हाला!!!!”—मी

“हे बघा झालं तुमचं भांडण सुरू!!!!!!!”— चिरंजीव

“ह्याला भांडण नाही discussion म्हणतात रे राजा…..आता तू आणि मी पण बोलतोय ना, तसेच मम्मा बाबा बोलताहेत……”—-मी

आता ही असली discussions जरा रेग्यूलर आहेत आमच्याकडे, पण कार्ट्याने तेच पहावे…कठीण आहे.

 “असो, पिल्लू मजा आहे रे तुमची. आम्ही पण लहानपणी अश्याच खूप गप्पा मारायचो स्कूलमधे!!!! अजून काय म्हणाला तूझा फ्रेंड!!!!!”……मी

आता या असल्या गप्पा मारायला आम्हाला ईंजिनीयरींगचे सेकंड ईयर उजाडले होते…लटेस्ट ट्रेंड नुसार ’बावळट’ होतो आम्ही हा भाग निराळा. एव्हाना नवरा भुवया उंचावायला लागला होता….याच्या मते मी उगाचच लहानसहान बाबी सिरीयसली घेत असते………………

 “तो फ्रेंड म्हणे त्याचे पण पॅरेंट्स भांडतात!!!!”….. चिरंजीव म्हणजे हा सार्वत्रीक गुन्हा आहे तर!!!!

“पुढे……”……मी

“झोपा रे ssssssssssss………..”—-नवरा.

मी आणि पिल्लू एका चादरीत……मी विचारात, माझ्या आरश्यात हे वेगळेच प्रतिबिंब. काय करावे????? वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर हे व्हायचेच…..एक वेळ अशी येणारच की आई वडीलांपेक्षा मित्रांचा प्रभाव जास्त असणार. ह्या पिढीत जाणिवा गेल्या पिढीच्या आधि येताहेत….सगळं मान्य….कळतय!!!!! आता हे सगळं ’वळायलाही” हवं………

 “मी त्याला सांगितलं की I love my mumma- baba, but I like my nani-babu more than anybody else!!!!!! अरे पण मम्मा तो जाम फनी आहे माहीतीये!!!!!”—-चिरंजीव

“आता हे काय मधेच!!!!…”—मी

“तुच तर विचारलं ना आम्ही काय गप्पा मारतो ते!!!!!!! Music sir म्हणाले मी चांगला म्हणतोय but I should practice more……., तू म्हणाली होतीस नवा पेन्सिल बॉक्स घ्यायचाय ना….कधी घेणार????”—–चिरंजीव

 “झोपा बच्चा उद्या शाळा आहे……”—-मी

सकाळी नवरा म्हणाला, “काय मग डिटेक्टिव्ह ! समजली का सगळी रहस्य!!!! उगाच त्याच्या लेखी महत्व नसलेल्या गोष्टींना आपणच अवास्तव खतपाणी घाला……”

मला याचं पटतय…पण मी नाही ईतकी तटस्थ राहू शकत……, “अरे अस्ं कस्ं आपण पालक आहोत ना त्याचे, समजायला नको त्याचे भावविश्व !!!!!”

 “अगं पण त्याला अशी प्रश्नावली झाडून काय साध्य होणार आहे?????”—–नवरा

“असं नाही जमत मला…..आपण मारे संस्कार म्हणायचे आणि बाहेर असा घोळ!!!! त्याचा गोंधळ नाही का होणार????”—–मी

“होईल ना!!!! होणारच….आपला नव्हता होतं????? यासाठीच तर आपण घरात पक्के रहायचे ना….त्याची मुळं पक्की असली की येउदेत ना वादळं वारे…….हबकून जाउ नकोस!!!!!”—–नवरा

“नाही हो नाही…..मला पटतं तुझं नेहेमी पण मला वाटलं काही सिरीयस की तू घे ते एकदम लाईटली!!!!!”…..मी

“मॅडम या केसमधे converse is also true!!!!!”—-नवरा

“झालास सुरू तू !!!! एक वाक्य खाली पडू देउ नकोस….”—-मी

“आपण पुन्हा भांडतोय का!!!!!”—- हसत हसत नवरा म्हणाला. आम्ही दोघेही हसायला लागलो ……

तेव्हढ्यात पिल्लू ओरडले, “मम्मा बाबा मी उठलोय….Good Morning!!!!!”

“Good Morning!!!!!” आम्ही एकदमच म्हणालो…………

सकाळच्या कोवळ्या उन्हात माझ्या आरश्यातले प्रतिबिंब स्वच्छ दिसत होते पून्हा!!!!!!!!!!!!!!!!!!!