मावशी ते मेड…..(‘मेड’ ईन ईंडिया)……

’बस हो गया मॅडम अभी हमको मुलूक जानेका….’ नुकतीच माझ्याकडे येउ लागलेली बांग्लादेशी ’मेड’ म्हणत होती. म्हटलं ’का गं काय झालं???’ तर म्हणाली की अनेक वर्ष झाली बाहेर, आता घरही सावरलयं…..मुलूकची याद येते म्हणाली.

संध्याकाळी नवऱ्याला सांगितल तर हसायला लागला, म्हणाला मस्कतला काही तुमच्या नशीबात कामवाली बाई दिसत नाही. आजवर मारे सांगायचीस ना सगळ्यांना की माझ्याकडे बाई टिकतेही आणि चांगले काम करते. गेल्या तीन वर्षात पहिल्यांदा तुला तक्रार नाही आणि आता ही पळायच्या गप्पा करतीये…….

’मेड’ आपल्याकडची मोलकरीण, कामवाली बाई( सध्या ची Domestic Helper) ……आयूष्याचा एक अविभाज्य घटक. जिच्याशी बरेचदा ’तूझं माझं जमेना नी तूझ्याविना करमेना’चे नाते असते. ईथे आल्यावर कळले या ’बाई’ ची ’मेड’ झाल्यावर ती आमूलाग्र बदलते. ईथल्या मेड असतात श्रीलंकन, बांग्लादेशी किंवा दक्षिण भारतीय….पैसे द्यायचे तासावर. माझ्याकडची पहिली मेड हैद्राबादी होती. एका तासात वेजल्स, स्वीपिंग, मॉपिंग करणार म्हणे. म्हटलं कर बाई, मी तशीही अडलेला हरी आहे. मुळात धूणंभांडी, झाडूफरशी किंवा लादी ला या साहेबाच्या भाषेत ऐकताना मजा येत होती. ही  ’मेड’ मला ताई न म्हणता मॅडम म्हणत होती. विनाकारणच मला ती परकी वाटत होती…दुसऱ्या दिवशी तर हद्द झाली, खिडकीतून बाहेर पाहिले तर ही कारमधून उतरली. म्हणे लेट हो गया तो हजबंड ड्रॉप किया. कर्म माझं इथे माझ्या हजबंडला अजून लायसन मिळालेले नव्हते…..म्हणजे मी ’बे’कार आणि ही कारवाली बाई. त्यातही माझ्या रोह्याच्या पुष्पाला मी सगळ्या कामाचे ३०० रुपये देत होते आणि हिला अर्ध्याच कामाचे ३०००रुपये……चार महिने बाई नाही लावली तर एक तोळा सोनं येतं या माझ्या युक्तिवादाला नवऱ्याने अजिबात दाद दिली नसल्यामूळे मला हे आता सहन करायचे होते. पंधरा दिवसातच कढईवर काळी पुटं चढणे, घर पुसून न पुसल्यासारखे वाटणे, डिटर्जंट संपणे सु्रू झाले. त्यातच माझे बाबा आमच्याकडे रहायला आहे…..ते तर एक दिवस वैतागून म्हणाले की मी करतो ही कामं पण ही ब्याद हाकल!!!!!

ती गेली, मग हे सगळे काम घरात घेतले. काही दिवस तो फार्स झाला आणि माहिती कळली की शेजारच्या बिल्डिंगमधे मराठी मेड आहे. मग पुन्हा तिला बोलावून दोन महिने सुख अनूभवले…..पुनश्च पहिले पाढे पंचावन्न झाल्यावर मात्र कानाला खडा लावला की पुरे आता पैश्याची नासाडी. अर्धी भांडी जर आपणच घासायची असतील तर पुर्णच घासू…..घरात व्हॅक्य़ूम केलं की झालं. शुक्रवारी नवऱ्याने मदत करायची…सगळ्ं कसं आखिव रेखीव. कागदोपत्री मस्त झाला प्लॅन.  २-३ महिने पुन्हा मस्त मजेत….नवराही उत्साहाने मदत करत होता.मग भारत भेट झाली, पुन्हा महिना सुखात…..हळूहळू नवऱ्याने त्याच्या शुक्रवारच्या झोपेचे खोबरे होते या कारणाने अंग काढून घ्यायला सुरुवात केली….आणि मेलं दिवसभर आपण राब राब राबलो तरी काम ईथले संपत नाही याची मलाही प्रचिती येउ लागली.

अश्यावेळी मला आवर्जून आठवण येते ती माझ्या औरंगाबादच्या मावशींची.  लग्नापुर्वी मी जॉब करत असताना माझ्याकडे येणाऱ्या या मावशी……काय काय काम करणार वगैरे काही बोली न करता माझ्याकडे यायला लागल्या, त्या आम्ही मुलाला घेउन चार वर्षानी औरंगाबाद सोडले तोवर येत राहिल्या. दिसेल ते काम झपाट्याने उरकणे, एकीकडे तोंडाचा पट्टा सुरू. मी घराबाहेर असल्यामूळे घराची एक किल्ली कायम त्यांच्याकडे असायची. संध्याकाळी दार उघडले की मिळायचे एक स्वच्छ नीटनेटके आवरलेले घर. मला मुलगा झाल्यावर मावशी सकाळी यायला लागल्या ……मुलाला आंघोळ घालणे, त्याच्या गादीवरची चादर बदलणे, त्याची दुपटी डेटॉलच्या पाण्यात भिजवणे असलं सगळ हायजिन ती अडाणी बाई पाळायची. जास्तीचे पैसे देते म्हटल्यावर मात्र त्या रागावल्या होत्या म्हणाल्या, “ताई अगं लेकरू आत्ता रांगत येइल आणि मला आजी म्हणायला लागेल…त्याला काय सांगायचे ही आजी तुझ्या कामाचे जास्तीचे पैसे घेते!!!!!”  आल्याआल्या मी काही खाल्लय का ते पहाणं आणि लगेच गरम गरम बाजरीची भाकरी करणं हे त्यांच रोजचं काम……”माझा नातू मोठ्ठा साहेब होइल मला गाडीतून फिरवेल…..” माझ्या लेकाबद्दलची त्यांची स्वप्न आज लिहीतानाही माझ्या डोळ्यात पाणी येतेय!!!!! नवऱ्याशी मात्र नेहेमी वाद व्हायचे त्यांचे….ह्यानी खूंटीवर टांगलेल्या एकूण एक कपड्याला त्यांच्यामते घामाचा वास येत असायचा…आणि मग त्या ते सगळे कपडे भिजत घालून आपटुन धुवायच्या. याच्या मते काही मळत नाहीत येव्हढे माझे कपडॆ आणि मावशींना मात्र हे अजिबात पटायचे नाही, त्यांचे ठरलेले उत्तर ,”माणसाने स्वच्छ कपडा घालावा!!!! ” दर शुक्रवारी मस्त जुंपायची त्यांची!!!!!

लहान गावात तशी पटकन जुळतात ही नाती!!! साधी माणसं आणि लहान मागण्या असतात. प्रोफेशनल नसतात म्हणा ना!!! माझ्या मावशीकडे मालेगावला कामाला येणारी आमची शोभा मावशी, आज गेली २५ वर्षे बघतीये मी तिला. मावशीचे आणि तिचे अनेकदा रुसवे फुगवेही व्हायचे, पण ती तरी परत यायची नाहीतर मावशी तरी तिला घेउन यायची.

पुढे आम्ही नासिकला गेल्यावर आमचे मात्र या आघाडीवर थोडे हालच झाले…मनाजोगती बाई काही लवकर मिळेना. पण हा मोलकरणीचा ग्रह माझ्या राशीला जरा उच्चीचा असावा माझा कारण आम्ही रोह्याला गेलो…..आणि मला भेटली ’पुष्पा’. वयाने माझ्याबरोबरीची पुष्पा महिन्याभरातच माझी मैत्रीण झाली. सासर माहेर, आजुबाजूच्या बाया, भाजीपाला कुठल्याही विषयावर गप्पा मारत आमचे काम पटापट उरकायचे. मग फक्कड चहा घेतला की ती पळायची बाकीच्या कामांना. पण दिवाळी असो किंवा माझ्याकडे कोणी येणार असो लगबग पुष्पाचीच असायची. ना मला कधी तिच्या मागे घरभर फिरावे लागले ना सतत सुचना कराव्या लागल्या…..एखाददिवस तिलाही कंटाळा येणार हे मला मान्य होते, आणि ती आजारी पडू शकते, घरच्या जबाबदाऱ्यांसाठी एक तारखे आधि पैसे मागू शकते हे गृहित धरले होते. आमचे सूर जुळले होते हे खरे!!!  मी दुसऱ्या डिलीवरीसाठी नासिकला गेले आणि आम्ही रोहा सोडले….मावशींसारखीच पुष्पाचीही माझ्या लेकीबद्दलची स्वप्न तशीच राहिली. लेक सव्वा महिन्याची झाल्यावर तिला आधी नेले रोह्याला कारण मी जन्मदाती आई असले तरी नऊ महिने तिची काळजी घेणारी ’ही’ आई तिची वाट पहात होती. आम्ही पोहोचण्यापुर्वी आमचे घर रांगोळी घालून लेकीची वाट पहात होते. निघताना पुष्पाने दोन्ही मुलांच्या हातात पैसे ठेवले. तिच्या त्या पन्नास रुपयांची परतफेड कशी करावी हा विचार नेहेमी मनात येतो!!!!!

या सगळ्याची सर येणारी मेड मिळणं हे एक स्वप्नच वाटते मला……इथे तर सगळा ’मोले घातले रडाया’ प्रकार आहे असे वाटत असताना आता ही बाई यायला लागली आणि लगेच दिवाळी आली. मूळची बांग्लादेशी मुस्लिम बाई पण मॅडम दिवाली का लिये घरका क्लिनिंग कबसे स्टार्ट करनेका असे विचारून माझ्या मनात जागा करून गेली. गेल्या महिन्यातला तिचा उत्साह, मुलांशी बोलणं सगळं पहाता आपला मेडशोध सुफळ संपूर्ण झालाय असे वाटत असतानाच तिने मला ’मुलूक ची याद’ चा दणका दिला. दिवाळीत एक दिवस खिडकीतल्या पणत्या उचलून त्या ठेवायच्या होत्या तिला, पण ही हात लावेना म्हणे आपको कैसे चलेगा मै हात लगाएगा तो?……म्हटलं बाई तू घासलेल्या भांड्यांमधे सगळा फराळ केला. त्यातच नैवेद्य दाखवला आणि आता हे काय नवीन!!!!! खुदकन हसली ती, पटकन पणत्या उचलल्या आणि पटापट घर आवरले.

तसही मनात येतं आपल्या आयूष्यातली मोलाची, हिंमतीची, तारूण्याची वर्ष आ्पल्या आईसाठी, भावांसाठी सहज ओवाळून टाकून दुर देशात काम करणाऱ्या या बाईच्या पावित्र्यावर मी कशी शंका घेणार!!!!!!! माझ्या आधिच्या मावशींसाठी, पुष्पासाठी काहितरी करायचे आहे हा एक विचार पण घरी जाण्यासाठी तिकीटाचे पैसे साठवणाऱ्या या सेलीनाला मात्र आज मी सांगितले की तिच्या या साठ्यातले शेवटचे काही पैसे माझ्याकडून न्यायचे आहेत तेव्हा लवकर बाकी रक्कम जमव आणि पळ तूझ्या घरी!!!!!!

जोवर आहे ही तोवर मात्र पुन्हा मस्त गट्टी जमणार हे नक्की…..मावशी ते मेड माझ्या मैत्रीणी…..नावं गावं वय वेगळं पण नातं तसचं, व्यवहारापलीकडचं…………………

Advertisements