धडा…..

माझ्या मुलाचं ईंग्लिशचे तिसऱ्या टर्मचे पुस्तक आले परवा….त्यातला पहिला धडा आपण वाचून मग त्याला समजावून सांगावे म्हणून वाचला. धड्याचे नाव आहे ’A Beautiful house’. हा धडा वाचला आणि मी थक्क झाले की काय समजावू आता मुलाला!!!!

थोडक्यात धडा असा आहे एक वृद्ध कुटूंब असते कोणा एका गावात, त्यांच्या घरात एक पलंग, एक टेबल, दोन खुर्च्या, एक मांजर आणि त्या मांजराची बास्केट असे सामान असते. घरासमोर पडवी (पोर्च) असते, ते रोज तिथे बसतात, एकुणातच खुश असतात. मग एक दिवस त्यांच्याकडचे पैसे संपतात , त्यामूळे ते पलंग विकतात. आलेल्या पैश्यातुन काही दिवस घर चालते, पुन्हा पैसे संपतात….मग ते एक एक करून त्या मांजराच्या बास्केटपर्यंत सगळं सामान विकतात. सरतेशेवटी त्यांना ते घरही विकावे लागते…..पण ते सुखी कुटूंब असल्यामुळे त्यांची याही बाबत काहिच तक्रार नसते…..मग त्या म्हाताऱ्या आजीबाई डिंक आणि कागद वापरून एक कागदाचे घर बनवतात……अचानक एक दिवस मोठ्ठे वादळ येते आणि ते कागदाचे घर आतल्या मंडळींसहित उडून दुसऱ्या गावी जाऊन पडते…….त्या गावातले लोकं त्या घराकडे आश्चर्याने पहातात आणि उद्गारतात ’What A Beautiful House!!!!!’

आता या प्रकारातून काय बोध घ्यावा……मुळात त्याला काय शिकवावे हेच मला समजेना!!! आपल्या गरजा कमी ठेवाव्या, तरूणपणीच म्हातारपणाची सोय करावी, घरातले पैसे संपल्यावर वस्तु विकाव्यात पण जागचे हलू नये!!!!! काय म्हणजे नक्की काय?????? मनात मी म्हटले बाळा हा असला काही धडा आपल्याला होता हेच विसर तू!!!!

नाही म्हटले तरी मला माझ्या मराठीच्या पुस्तकांमधले काही धडे आठवतात अश्या वेळी….. पुस्तक मिळाल्यानंतर कव्हर घालण्याआधिच मी जवळजवळ सगळे धडे वाचायचे!!! त्यातले अनेकसे धडे वाचल्यावर उत्तरे काही कधी पाठ करावे लागले नाही…धड्यातला प्रत्येक शब्द असा काही मनात उतरायचा की पुन्हा त्याबद्दल लिहीताना वेगळा विचार नाही करावा लागायचा. त्यातही काही ’बोअर’ धडे असायचे किंवा कदाचित त्यावेळी तो धडा पेलायचा नाही….पण हे प्रमाण फार कमी होते!!!!! तरिही माझ्या मुलाच्या या निर्बुद्ध धड्याची तुलना नाही!!!!! दहावीत असताना आम्हाला शंकर पाटलांचा ’वळीव’ नावाचा धडा होता, मारूती चितमपल्लींच्या धडा वाचताना त्यांच्याबरोबर रानावनाची सफर व्हायची, पु.ल., जी.ए. कुलकर्णी, गोनीदा, मा्डगुळकर सगळ्यांच्या साहित्याची तोंडओळख शाळेतच होत होती. अश्यावेळी आवर्जून वाटते मातृभाषेतुनच शिकावे.

या मुलांच्या कविताही अश्याच भयंकर गद्य आहेत……त्यांची पाठांतर परिक्षा असली की माझ्याच तोंडचे पाणी पळते. चाल लावायला गेलं तर ते तर महाकर्म कठीण काम!!! मुळात यमक बिमक नसलेल्या त्या निबंधाला कविता का म्हणायचे हाच एक प्रश्न असतो!!!!!! मुलगा मात्र बिचारा ’Learn well and come……’ हा शेरा मिळू नये म्हणून झटत असतो………

 आम्ही तिसरीत असताना आम्हाला एक कविता होती’ घाटातली वाट’ अजुनही तोंडपाठ आहे ती….कसारा घाटातून जाताना कुठेतरी मनात ती घोळत असते…… बा.भ. बोरकर, ग्रेस, ईंदिरा संत, शांता शेळके सगळ्यांची वर्णी होती पुस्तकात. भा.रा. तांबेंची, ’जन पळभर म्हणतील……’ तशीच्या तशी कायम स्मरणात आहे अगदी अर्थासहीत त्यामुळेच तर..

सुर्य तळपतील, चंद्र झळकतील

तारे आपूला क्रम आचरतील

होइल काही का अंतराय…..

यातलं काव्यच नाही तर अर्थ मनात रुजलाय. हा सगळा विचार करताना सहज गुणगुणले..

घाटातली वाट,काय तिचा थाट

मुरकते गिरकते, लवते पाठोपाठ

निळी निळी परडी, कोणी केली पालथी

पानं फुलं सांडली, वरती आणि खालती

खाली खोल दरी, वर उंच कडा

भला मोठा नाग जणू उभा काढून फणा…..

खुदकन हसला मुलगा…….पाच मिनीटात कविता अर्ध्याहून अधिक पाठ. खरच मनात विचार येतो आपण सतत नौकऱ्या बदलणार म्हणून ईंग्लिश मिडीयमला घातलाय खरा मुलगा पण something is missing गड्या!!!!! अशीच आणखी एक कविता होती ’खंड्या’ ची…..त्यातले

झाडावर धिवराची हाले चोच लाल छान…..

 शुभ्र छाती, पिंगे पोटsssss

जसा चाफा यावा फुलीssss

अश्या काही ओळी कधीतरी अचानक मनात येतात……बहिणाबाई पण तेव्हाच ओळखीच्या झाल्या होत्या. हिंदीच्या पुस्तकातला ’दुर्मूख’ हा सश्यावरचा धडादेखील असाच आठवणीतला…..ते ईंग्लिश देखील असे रटाळ नव्हते………

माझं प्रामाणिक मत आहे की माध्यम हा अडथळा नसतो…….घरचे वातावरण, आणि नवे स्विकारण्याची आपली ईच्छा यावरही सगळे अवलंबून असते!!!!!!! तरिही हा असला धडा काही मला पचत नाहीये…..मुळात ज्याचे नावच ’धडा’ किंवा ’Lesson’ आहे त्यातून जर धड काही बोधच झाला नाही तर त्याचा काय उपयोग???? उगाचच काहीतरी पाने भरायची आणि तो पसारा मुलांच्या डोक्यात बळजबरी कोंबायचा!!!! हा प्रस्तूत धडा वाचून जिथे माझीच मती गुंग झाली होती तिथे मी मुलाला काय समजावणार होते, कप्पाळ!!!!!!

कुठे कुठे आणि किती पुरणार आपण…….सगळ्ं काही खरच ईतके विचार करण्याजोगे आहे की वयाची तिशी ओलांडली की हे असे विचार मनात घोळायला लागतात………प्रश्न एक ना अनेक!!!!!! नाहीच सापडत कधी कधी उत्तरं!!!!!!! तरिही वाटतय पाठ्यपुस्तकं सोडून मुलाला चांगले साहित्य, किंवा त्याच्या वयाला समजणाऱ्या आवडणाऱ्या गोष्टी वाचायला देउन मी ह्या मुद्द्यावर उपाय नक्की शोधु शकेन!!!!!!

36 thoughts on “धडा…..

 1. एकदम सुंदर लेख !! चांगल्या गोष्टी सर्वत्र असतात हेच खरे आपण आपला आनंद हरवत चाललो आहे, शिक्षणाच्या बाबतीत पाठांतर एकदम नाही अशा शाळा IGCSE बोर्डाच्या आहेत तिथे हा त्रास बंद होईल!!

  अभिषेक मुळे

 2. hmm sahi 🙂 lihilys aawdle aani patlehi. marathi i mean matrubhaashetun shikshn ghene he phaar soyeech padte as maaze mat aahe! even matrubhaashebarobarch aapn ajun don/ chaar bhaashaa hi shiku shkto as mhntaat ki lahan astaanaa hya bhaashaa shiklya tar phaar chatkan jamte 🙂

 3. माझ्याकडे १ली ते १० वी च्या बालभारतीच्या कविता आहेत. pdf file आहे.

  तुम्हाला हवी असल्यास मला इ-पत्र पाठवा. मी तुम्हाला पाठवेन ती file.

  अनिकेत वैद्य.

 4. बाप रे अशक्यच आहे हा धडा… मलाही कधिकधि वाटते की शिक्षण हे मातृभाषेतुन व्हायला हवे. पण परत तेच. आमचे विंचवाचे बिर्‍हाड. आज इथे तर 2 वर्षाने अजुन कुठे. त्यामुळे इंग्रजी माध्यमाशिवाय पर्याय नाही. असो. आणि हो घाटातली वाट कविता मला चांगलीच आठवते. मी नाच केला होता त्यावर 3 रीत असताना. मस्त झाला आहे लेख. अनिकेत, मला आवडेल त्या सगळ्या कविता वाचायला आणि संग्रही ठेवायला.

 5. ह्म्म्म……..तन्वी धडा वाचला. तू म्हणतेस तसे बरेच अर्थ निघतात आणि खरेच नक्की काय म्हणायचे आहे हेच धड न कळल्यामुळे काय समजवावे हेच कळेनासे झालेय हेही पटतेय. पण जर हा धडा पाश्चिमात्य संस्कृती, नातेसंबंध व जीवनमान-राहणी यावर आधारून लिहीला असेल( बहुतेक तेच अभिप्रेत असेल हा माझा कयास आहे…जो चुकीचाही असू शकेल ) तर हे वृध्द जोडपे आयुष्यभर कष्ट करून( त्याचप्रमाणे कमावलेले उधळून-गमावून )आता थकले आहे. त्यांची मुले कधीचीच सोडून गेलीत. घर व आतील चार मोजक्या वस्तू, एक मांजर व ते स्वत: दोघे एवढेच शिल्लक आहेत. मांजर हे त्या दोघांचे जीव लावण्यासाठी व आपल्यावरही आजून कोणी प्रेम करतेय ही जगण्यासाठी ऒक्सिजन देणारी प्रतिकात्मक सजीव गोष्ट आहे. अचल, निर्जिव गोष्ट जगण्याची ओढ वाढवू शकत नाहीत. माझी कोणीतरी वाट पाहते आहे, मी कोणालातरी हवा आहे मग ते मांजर का असेना. तसेच या वृध्द जोडप्यात होणा~या संवादासाठी मांजराची नितांत गरज आहे. जेव्हां पैसे संपतात तेव्हां ते सगळ्या भौतिक गोष्टी विकतात,अगदी छप्परही विकतात परंतु मांजराला विकत नाहीत किंवा कोणाला सोपवतही नाहीत. तसेच ते स्वत:ही एकमेकांपासून दूर होत नाहीत. आयुष्याच्या शेवटच्या दिवसात का होईना त्यांना परस्पर संबंधाची महती कळते. संकटे कितीही आली तरी मी तुला सोडून जाणार नाही, जसे जमेल तसे आपण एकत्रच राहू.वादळ हे संकटाचे प्रतिक आहे. त्या संकटातही त्यांचे एकत्रच उडून पडणे पाहून गावातील लोकांचे अचंबित होणे साहजिक आहे. मुळात ही गोष्ट आपल्या कुटुंब संस्थेशी, मुल्यांशी जुडणारी नाही त्यामुळे प्रथम वाचताना हीच प्रतिक्रिया उमटते. मात्र पश्चिमेतील ढासळलेल्या मनांना कुटुंबसंस्था, नातीगोती, त्याग, स्नेह-साथ ही जीवनात किती आवश्यक आहे-असते हे सांगण्याचा प्रयत्न कदाचित या धड्यात केला गेला असावा. जसे वर म्हटले तसे माझे हे म्हणणे संपूर्ण चुकीचेही असेल….असा कुठलाही अर्थ अभिप्रेत नसेलही. उगाच काहीतरी चार ओळी खरडल्यात.( परंतु हे तसे नसावे असेच राहून राहून वाटते )
  बाकी मातृभाषेतूनच शिकावे याच मताची मी आहेच. म्हणूनच शोमूला मराठी माध्यमातच मी हट्टाने घातले. इथे आल्यावर पहिले तीन महीने थोडे जड गेले त्याला( संपूर्ण इंग्रजी तेही अमेरिकन इंग्रजी ) पण तो शिकला. सहा महिन्यानंतर भेटलेल्या कोणालाही सांगून खरे वाटले नाही की हा मुलगा सहावी पर्यंत मराठीतून शिकला आहे.
  हो गं कव्हरे घालायच्या आधीच धडे वाचून होत होते. कविताही सहज व मनाला भिडणा~यां. उगाच बोजडपणा नाही. ह्म्म…. खरे आहे मुलांना हे सगळे कसे मिळेल हे शोधायला हवे व त्यांच्यापर्यंत पोचवता यायला हवेच.
  लेखातला कळकळीचा मुद्दा मनापर्यंत पोचला, भावला. खूप छान.
  ( अवांतर: सॊरी गं, फार लंबेलाट प्रतिक्रिया झाली. एकदा वाटले डिलटावी पण…. 😦 )

  • ताई अग किती छान प्रतिक्रिया दिलीस….बरं झालं डिलीट नाही केलीस ती!!!हा असा वेगळा तरिही बरोबर विचार वाचायला मिळावा, नाण्याची दुसरी बाजू दिसावी म्हणूनच तर लिहीतो ना गं आपण!!!!
   नेहेमी अश्याच प्रतिक्रीया देत रहा!!!

 6. chan aahe lekh 🙂

  marathi ki english asa motha vad nakki aahe mala pan manapasun vatate ki shikshan marathi tun asave tula aathavat asel aapan ch apala abhays karay cho karan marathi tun hote sagale kadhi guide nahi ghave lagale karan aapan ch uttare dhadya tun shodhay cho kadhi abhasa che oze nahi vatale ……….

  sadhya mihir sathi shala shodh suru aahe baghu marathi shalet ch ghalay cha plan aahe pan aata purvi sarkhya marathi shala aani shikshak pan kami zale aahe 😦

  ghata li vat kavaita ajun hi path ch aahe tasech etar anek kavita lagech path vaycha tyamule maja yaychi

  aata thabate never ending subject aahe

 7. हा लेख मी आज तिसऱ्यांदा वाचतोय, पण यावर काय प्रतिक्रिया द्यावी तेच कळंत नव्हतं. तसं म्हंटलं तर भाषेचा अभ्यास म्हणजे फक्त भाषा .. एवढंच जर या शिक्षण महर्षींच्या डॊक्यात असेल, आणि त्या अनुषंगाने ते धडे तयार करित असतिल तर ती एक मोठी घोड चुक म्हणावी लागेल. प्रत्येक धड्यामधुन कांही तरी जीवनमुल्य शिकवल्या गेले पाहिजे.. या मताशी सहमत आहे. पण हे असे ना शेंडा ना बुडखा असलेले धडे पाहुन हसावं की रडावं हेच कळंत नाही.

  • महेंद्रजी ह्या धड्याला फॅंटसीच्या कोनातून पहावे तर आजकालची मुले भलती प्रॅक्टिकल आहेत….सरळ विचारले ईशानने की हे लोक कागदाच्या घरातून पडत नाहीत का? How is it possible? …तो विसरेलही हा धडा पण मी मात्र विचारात पडलेय….भाग्यश्री ताई म्हणतीये ते बरोबर आहे, पटतेय….
   पण धडा म्हणजे ’बोध’ तो काय घेणार….आपला पाया असाच नकळत तयार होत असतो ना मग ह्या अश्या धड्यांनी भरलेल्या पुस्तकांचे काय करावे कळत नाही!!!!

 8. माझी पण मोठी प्रतिक्रिया होईल असे वाटते.धडा छान आहे. कल्पना विलास आवशक आहे.
  मराठी मध्ये पण ‘होईल का अंतराय’ हे समजावणे तिसरीत कठीण आहे. भानस म्हणाली, तसे अनेक पैलू आहेत, डॉल हाउस त्यांचे आवडते असते. घर घर खेळताना, अडचणी, सुख यांना आईवडील कसे सामोरे जातात हे ही ह्या खेळाच्या माध्यमातून समजावता येईल. मुलांपुढे त्यांचा अभ्यास, त्यांच्या शिक्षिका ह्या बद्धल कधीही आपले विरोधी मत व्यक्त करू नये.एक त्रस्त पालक म्हणून लेख नेहमी सारखा सुरेख, शाळेत जाऊन एक तास टीचर जवळ बसून त्यांचा कल्पना विलास काय पद्धतीने शिकवला हे जाणून घेणे गरजेचे आहे. ९०% धडे असेच असतात किती, आणि काय विचारायचे ? बरोबर आहे पण एखाद दोन कल्पना आपण ऐकल्या की अंदाज येतो.
  मला ह्या वर्षीची मराठी माध्यमाची , इंग्लिश पहिलीच कविता खास करून शाळेत वर्गात मुलांना कशी शिकवायची हे दाखवावे लागले होते, कदम सर मागे बसून ऐकत होते, ते आता माझ्याऐवजी इंग्लिश घेतात.असेच सहकार्य शाळेतून मिळते. नाहीतर ही मावशी आहेच बच्चा करता. ये केंवाही.

 9. हा धडा वाचुन आपल्यालाच धडा मिळाला म्हणायचं….अगं मला या लेखामुळे त्या सगळ्या कवितापण आठवल्या…आणि माहितेय का “दुर्मुख” हा माझा खूप खूप आवडता धडा आहे प्रेमचंदजींचा…त्यातले ते शशकशावक वगैरे शुद्ध हिन्दी शब्दही आठवले..आपण दोघी तेच धडे आणि कविता शिकलोयत….
  तू म्हणतेस त्याप्रमाणे मातृभाषेत शिकणं खरंच चांगलं…एक-दोन आठवड्यापुर्वी मला वाटतं (बालदिनाच्याही असेल कदाचित) चतुरामध्ये याविषयी लेखही आला होता…वाचलास का??
  बाकी मुलांना शिकवायचं या विचारानेच मला धडकी भरते..मी बहुतेक माझ्या कार्ट्याला अनुजाताईंकडे नेऊन देणार आहे…:)

 10. अग खुप छान लिहिला आहेस.सत्य आहे की पुर्वीचे आपले पाठ्यक्रम इतके चांगले होते कि कविता वगैरे नकळत त्या तोंडपाठ व्ह्यायच्या.लिमिटेड पुस्तके आणि भरपुर माहिती.आणि अत्ता तर मुलांचा पार डोक्याचा फ़डशा पाडला जातो.तुला सांगु का,१०वीच्या सी.बी.एस.सी च्या हिंदीच्या पाठ्यपुस्तकात एक धडा आहे.नाव माहिते काय…समशान घाट में मेलमिलाप …बोल,काय म्हणावे ह्या नावाला???नावावरुन धड्याची कल्पना आलीच असेल.[:p]

  • Thanks manya…पण तुला सारखे नेटवर बसू नकोस म्हणून सांगतेय ना!!!!! तो अमितदादा ओरडतो ना मग आपल्याला….तो म्हणतो जशी तू तशीच गार्गी!!!!ऐकायच्या नाहीत दोघी!!!!

 11. मला वाटतं….की हा लेख केवळ मातृभाषेतून शिक्षण घेणे या साठी नसून त्यातून आपणही धडा घेण्याची गरज आहे……..भाग्यश्री ताईला धन्यवाद……..अगदी योग्य विश्लेषण केले आहे तिने या धड्याचे……..खरच…..भाषा कुठलीही असो पण तिच्या अभ्यासातून बोध मिळणे
  जास्त महत्वाचे आहे……इतक्या लहान वयात मुलांना नुसती भाषेची ओळख करून देणे जास्त गरजेचे असते……पुढे पाया पक्का
  झाल्यावर ही मूल भाषेच्या जोरावर कुठलीही संस्कृती समजावून घेऊ शकतात………….तेव्हा भाषा कुठलीही असो मुलांच्या वयाला अनुसरून धडे असावेत असे मला वाटते.
  बाकी लेख सुंदर……

 12. खरच काय म्हणावे या धडयाला? मला वाटते, अशा वेळी आपण शांत राहून मुलाच्या प्रतिक्रिया जाणून घ्याव्यात व त्या प्रतिक्रियेनुसार आपण आपले संस्कार करावेत. धडा काय किंवा बाहेर घडणारी एखादी घटना काय, मुलाला तो एक नवा अनुभवच असतो. त्या अनुभवाला तो त्याच्या basic instincts ने सामोरा जात असतो. अशा परिस्थितीत कसा विचार करावा येवढेच आपण पालक त्याला शिकवू शकतो. विचार त्यानेच करावयाचा असतो व निर्णयही सर्वस्वी त्याचाच असतो. आपले संस्कार फक्त त्या निर्णयास पायभूत असणारे framework तयार करू शकतात. ते framework तेवढे आपण आपल्या संस्कृती प्रमाणे बनविण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच केला पाहिजे.

 13. Dhada chhan zalay…vichar karayala lavato…..
  Matrubhasha ki English medium ha kharetar katheen prashna aahe…sadhyache lifestyle pahata we don’t want our kids to lag behind (i am not talking about race or comparison) aani English shivay paryay nahi pan mag fakt Eka Language sathi aapan tyana Englsh medium madhe takayache ka ? tar tase nahi they learn many things apart from language…it will help them in long run. we should think of a bigger picture. These guys will be more confident and stand firm in tomorrows world..hech bagh na they are faster than us… Aani rahile sanskaranche tar ti aapali jababdari… and anyways you a;ready have answer with you :)- माझं प्रामाणिक मत आहे की माध्यम हा अडथळा नसतो…….घरचे वातावरण, आणि नवे स्विकारण्याची आपली ईच्छा यावरही सगळे अवलंबून असते!!!!!!!

 14. malahi ghatatun jatana ghataatali vat ajun athavate tasech khandyababat chouthila hoti ti kavita … mulala kingfisherbaddal sangtana tyala kavita mhanun dakhavli hoti to mhanal mummi tumhi classmadhe gane mhanaycha asso tumachi niymit vachal ahe dillit rahte tyamule marathi adhashsarkhi vachat asate pan mast lihita agdi sahaj!!!!

  • हो की नाही बिंदीया, या कविता म्हणजे आपलं बालपण आहेत 🙂
   प्रतिक्रीयेबद्दल आभार….. ब्लॉग नेहेमी वाचता म्हणताय तरिही स्वागत… येत रहा!!!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s