फ्रेंड्स……….

आता म्हणाल पोस्टला नाव ’मित्र- मैत्रीणी’ न देता फ्रेंड्स का दिलेय? (म्हणाला नसाल तरी आणि असाल तरी………….कारण ऐका…) ’फ्रेंड्स’ नाव यासाठी कारण मी ही पोस्ट ज्यांच्या मुळे लिहीतीये त्यांना ’मित्र- मैत्रीणी’ कळत नाही………त्यांना कळते ते म्हणजे फक्त friends……

खरं तर मला या शब्दाची कायम गंमत वाटते…..कारण हा शब्द ’तो’ किंवा ’ती’ यासाठी वेगळा नसतो त्यामुळे  ’अमुक ढमुक फ्रेंड आहे….’ म्हटल्यावर भुवया जरा कमी उंचावल्या जातात. असो, मुद्दा वेगळा आहे, तर माझे हे सगळे नवे कोरे फ्रेंड्स आहेत माझ्या लेकिच्या शाळेतले वय वर्षे ३ च्या आसपासचे मुलं!!!!!!!!!!! त्याचं झालं काय मी लेकीला शाळेत घातलंय नुकतचं, आणि कुठल्याही परिस्थितीच तिथे रमायचे नाही असा विडा तिने उचललाय………….बरं येव्ह्ढ्याश्या लेकराला स्पर्धेत लोटलं, एकटं सोडलं वगैरे अनेक विचारांच्या अपराधीपणाचे ओझे माझ्या मनावर. मग करणार काय …………………..त्यातला सुवर्णमध्य म्हणजे तिच्याबरोबर निदान सुरुवातीचे काही दिवस तरी मी देखील शाळेत जाणे.

आता हा पर्याय आम्हा दोघींनाही पटला……. नव्हे आवडला…….त्यात आता तिच्या शाळेत आहे त्यांचे Annual Exhibition …..मग काय मला तर आयतीच मेजवानी मिळाली. मुख्य म्हणजे आयता मदतनीस मिळाल्यामुळे तिच्या मुख्याध्यापिकेनेही मला येउ दिले. सुरूवात अशी झाली तरी मैत्री व्हायला आम्हा दोघींनाही एक दोन दिवसच लागले आणि आमची स्वारी तिथे रमली…………..

तिथे मला मिळाले हे नवे नवे मित्र मैत्रीणी……………….आपल्याच विश्वात रमलेले, जगातली स्पर्धा, जीवघेणी शर्यत सगळ्या सगळ्या पासून दुर असलेले आणि त्यांच्या विश्वात अलगत फुलपाखरासारखे बागडणारे…………मजा येत होती या सगळ्या बच्चे कंपनीच्या बरोबर……पटकन मैत्री करतात ही मुलं. कसल्याही अटी नसणारे नवे नवे मित्र……….आपण जरासे हसलो तरी ते तोंड भरून हसतात, आपण जरा दोन वाक्य बोललो की यांचा कथाकथनाचा कार्यक्रम सुरू!!!!!!!!!!!! मला तर एक विचार मनात येउन गेला उगाच B.E. करत बसलो आपण मस्तपैकी शिक्षिका झाले असते तर या पिल्लांमधे कायम रमता आले असते!!!!!!

शाळेच्या एका भिंतीवर जंगलाचे चित्र बनवायचे ठरले आमचे, त्यासाठी माझ्या या बच्चू फ्रेंड्सची एक टीम आली माझ्या मदतीला.

या टीमने मी सांगेन ती चित्र पटापट कलर करायची असे डिलिंग झाले……कसला भयंकर उत्साह असतो या मुलांमधे……..माझी चित्र काढून होण्यापुर्वीचे आधि दिलेली चित्र रंगवून ते ’काम मागणाऱ़्या राक्षसासारखे’ माझ्या समोर उभे असायचे………….

त्या सगळ्या चित्रांमधुन दोन तासात आमचे मस्त जंगल साकारले…..पटापट रंगवलेली

हिरवी हिरवी झाडं आणि मधे मधे काही प्राणी…….

मग मधेच माझ्या एका फ्रेंडला वाटल्ं की I want a fish to colour……..मग जंगलाबरोबरच आले समुद्रातले काही प्राणी…..

आज माझ्या या बालमित्रांची कलाकारी टाकतेय ब्लॉगवर……………

किती निरागस वातावरण होते ते!!!! सगळेच आनंदी होते……ती मुलं निर्व्याज आनंद वाटत होती आणि मी तो ठेवा भरभरून  साठवत होते……..येणाऱ्या पुढच्या अनेक दिवसांचे श्वास मी तिथे भरून घेतलेत हे मात्र नक्की!!!!!!!!!!!!!!!!!!

या सगळ्या थोड्या गंभीर कधी खेळकर विचारात गढले असतानाच लेक आली आणि म्हणाली, “मम्मा मला हॉर्लिक्स नाही आवडत……………..” म्हटले ठीके पिल्लू, तुझ्या दुधाच्या कपात नाही टाकणार मग मी!!!”

तर हसायला लागली आणि म्हणाली, “हॉर्लिक्स कधी दुधात टाकतात का?”…………………….आता माझ्या अल्पमतीनुसार हॉर्लिक्स हे दुधातच टाकतात…………..पण ही बया तर हसतीये मला, तेव्हढ्यातच मुलगा म्हणाला, “मम्मा ती रॉड्रिक्स म्हणतेय……….”

अच्छा मग माझ्या डोक्यात प्रकाश पडला…………..लेकीने रॉड्रिक्स नावाच्या मुख्याध्यापिकेचे हॉर्लिक्स असे बारसे केलेले होते…………तिच्या मुख्याध्यापिकेलाही आवडलेय तिचे हे नवे नावं!!!!!!!!!!!!!!!

मुलांचे विश्व नेहेमी भुरळ पाडणारे….रंगीबेरंगी, नटलेले, हवेहवेसे……………..माझी लेक शाळेला सरावलीये खरं तर……पण मी का कबूल करू हे, त्यापेक्षा काहितरी कारणाने या पिल्लांच्या जगात लुडबुडायला जावे म्हणतेय………………….

Advertisements

’पास’ आजोबा…….

हॉटेलवाल्यांना करोडपती करून (म्हणजे निदान एका ठराविक रकमेचं दर आठवड्याला खाऊन) काल आम्ही निघालो. वीकएंडचा मूड होता सगळ्य़ांचा……लॉंग ड्राईव्ह हा लेकाचा कायमचा हट्ट असतो….रस्ता जसा जात राहील तसे जात रहायचे. कुठेतरी निर्जन रस्ता असला तरी चंद्राच्या प्रकाशात खुर्च्या टाकून उजाड माळरानात गप्पा टाकत बसलेले ओमानी असतात सोबतीला……..कधी नव्हे ते टेपमधल्या गायकांनाही विश्रांती दिलेली होती. गप्पा ऐन रंगात आलेल्या……………बाबा असा निवांत भेटला की मुलंही खुश असतात.त्यांच्याकडे अश्यावेळी सांगायच्या अनेक गोष्टी असतात……..मग तेरी उपर मेरी करत दोघेही चढाओढीने सांगत होते…………….

फिरून फारून विषय पोहोचला नासिकवर…..आधि आम्ही अगदी अंतराळाच्या गप्पा मारत असलो तरी एक पाय नासिकमधे घट्ट रोवलेला असतो. मग नवरा नेहेमीप्रमाणे लेकाला चिडवायला म्हणाला ,” काय समजतं रे तुझ्या बाबूंना ? तुला उगाच कौतूक त्यांच!!!!!! ”

आता ’बाबू ’( माझे बाबा ) हा विषय लेकाला त्याच्या श्वासाईतकाच प्रिय. माझे बाबा माझेही कायम लाडके पण लेकाचा जीव सतत त्यांच्यातच गुंतलेला असतो. तो विचार करता मी नवऱ्याला म्हणाले, ” अब तो तू गया….. Now to u r gone…..ईशान धोपटतो तुला आता!!!!!!!!!!!! ” आणि मागून चिरंजीवांचा आवाज आला, ” No mumma he is not gone…. बोलू दे त्याला!!!! ” मी चकित झाले अगदी….थोडी रागावलेही कदाचित…….गंमतीतही मला बाबांबद्दल काही बोललेले पटले नव्हते…………नवऱ्याच्या हेतू विषयी अजिबात शंका नाही मनात तरिही लेकाने react व्हावं असं मला वाटत होतं बहूतेक…………..

अगदी गेल्या वर्षीपर्यंत बाबा असं काही बोलला की माझा लेक त्याच्यावर तुटून पडायचा……………..आणि आज हे काहितरी भलतचं!!!!!!आजोबा आणि नातवातला दुरावा हा केवळ भौगोलिक  अंतराचा न उरता माझं पिल्लू मनानेही दुर होतय की काय अशी शंकाही मनात आली!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! चुकतय नक्कीच काहितरी…………….शेवटी त्यालाच विचारलं, “का रे आता तुला चालतं वाटतं तुझ्या बाबूंना कोणी काहि बोललेलं?????? ” तसा तो शांतपणे म्हणाला, “मम्मा त्याला बोलू दे ना काय बोलायचे ते, आपल्याला माहितीये ना आपले बाबू कसे आहेत ते!!!!!!!!!!!!!!!!!!!! झालं तर!!!!!!”

माझं पिल्लू वय वर्ष सात………एका वाक्यात मला खुप काही शिकवून गेलं………..नवऱ्याने फक्त एक नजर टाकली माझ्याकडे……तो एक जिंकलेला बाबा होता तेव्हा. आणि मी आई म्हणून जिंकले असले तरी या विचारापर्यंत लेकाला प्रगल्भ कसा करावा हा विचार करू शकणारी माझ्या बाबांची मुलगी हे स्वत:चच अस्तित्व शोधत होते!!!!!!!

हेच तर शिकवले होते ना कायम बाबांनी आम्हाला…….तत्वज्ञान कधीही सांगितले नाही त्यांनी ते तसे जगून दाखवले होते……….कधीही सल्ले दिले नाहीत तर कायम उत्तरे स्वत: शोधायला शिकवले होते……..बसलेला हत्ती हा ईतर अनेक प्राण्यांपेक्षा उंच असतो हे ते सहज कोणाला तरी सांगत होते, कोणाला सांगितलं ते आता अजिबात आठवत नसले तरी सहज कानावर पडलेली अशी अनेक वाक्यं कायम मनात आहेत……मी हॉस्टेलला निघाल्यावर बाबा म्हणाले होते, “ताई पाण्यात पडलेल्या तेलाच्या थेंबासारखी रहा……………..पाण्यात विरघळलेला तरिही स्वत:चं स्वतंत्र अस्तित्व, गुणधर्म जपणारा……………..”

असेच एकदा आई-बाबांना कोणितरी गैरसमजातून आलेल्या रागाने खुप काही बोलत होते…..बाबा शांत होते. मी मात्र वाक्यागणिक चिडचिड करत होते….शेवटी न रहावून मी बोलायला लागले…….माझ्या आयुष्यातला तो पहिला आणि शेवटचा उद्रेक असावा……..कारण माझा आवाज ऐकल्यावर चमकून बाबांनी माझ्याकडे पाहिले होते……ती नजर कायम लक्षात राहिलीये माझ्या, त्यात राग नव्हता चीड नव्हती…..पण माझी मुलगी अशी ताबा सोडून बोलली हे त्यांना सहन होत नव्हते. उघडपणे ते बोलले येव्हढचं की ताई मोठ्यांना बोलायचं नाही!!!!!!!! समोरची व्यक्ती शांत झाल्यावर त्यांच्याशी व्यवस्थित बोलून एकही अपशब्द न उच्चारता स्वत: त्यांना निरोप द्यायला गेलेले बाबा कायम आठवणीत तसेच आहेत……..एरवी विलक्षण स्वछंदी, मस्तमौला असणारे आमचे बाबा असेच कायम काहीतरी शिकवत राहीले……

पुढे कधीतरी Quotes ओळखीचे झाल्यावर वाचले , ’Speak when you are angry and you will make the best speech you will ever regret!!!!!!’  म्हटलं छटं तेरी तो…..मला हे आधिच माहीतीये……मेरे पास मेरे बाबा है!!!!!!

आणि आजची मी मुर्खासारखी लेकाने चिडावे तेही बाबाने चिडवल्यावर, काहितरी प्रतिक्रीया द्यावी अशी अपेक्षा करत होते!!!!! कोणीतरी आपल्या मनाचा असा ताबा घेउन आपल्याला ईच्छेविरूद्ध, स्वभावाविरूद्ध वागायला भाग पाडतो ती आपली हार असते ही साधी गोष्ट मी विसरले !!!!!! आज मी ’तन्वी देवडे’ हे नाव मिरवताना आधीचे कुलकर्णीपण विसरले की काय……..आडनाव बदलायच्या affidavit वर सही करताना स्वभावही बदलत होते मी!!!!!! गलत है ये!!!!! आज लेकाने मला पुन्हा जागे केले…………….

एकदा मी बाबांना म्हटले होते ,” बाबा मला जेव्हा कोणी काही बोलतं आणि समोरच्याची अपेक्षा असते की मी वाद घालावा तेव्हा मी शांतपणे झालेल्या आरोपांच analysis करते मनात…..खरे आहेत की खोटे ते जोखते !!!!! शक्यतो शांत रहाते!!!! आणि स्वत:चे मुद्दे नंतर शांतनेने मांडते……..”  बाबांनी टाळीसाठी हात पुढे केला, हसत ते म्हणाले ,”चहा ठेवू का? घेणार????? ”   आयूष्याच्या परिक्षेसाठीची आमची तयारी पुर्ण आहे असे वाटले की ते खुश असायचे………’सुख म्हणजे नक्की काय असते’ हे बाबांना पुर्ण माहीत असावे, ते उगाच गद्य स्वरुपात आम्हाला न सांगता ते त्यांनी लहान मोठ्या उदाहरणातून कायम दाखवून दिलेय……………

आज माझ्या लेकाने मला सगळे आठवायला भाग पाडलेय!!!!!! हे खरं तर माझे विचार सगळे , माझ्याच अस्तित्वात त्यांच अस्तित्वं. मीच हरवते माझ्याच विचारात आणि माझे विचार माझ्यात………कधी कधी कुठे जातात ते सगळे राम जाणे……म्हणून आज या विचांराची एक पोस्ट करतेय सरळ!!!!! नाहीतर पुढच्यावेळेस ,” आईना जेव्हा माझी पहेलीसी सुरत मागेल, ” तेव्हा माझ्या ’डॅडींचा’ नातू यायचा पुन्हा अक्कल शिकवायला……………

पिताश्री तुमच्या तालमीत छोटे ’उस्ता्द’ बऱ्यापैकी ’वस्ताद’ होताहेत तर……………..लगे रहो!!!!!!!!!!!!!!