I’ll get back to u on this…………..

‘मम्माssssss’..चिरंजीव

’ओ रे….’ अस्मादिक किचनमधे कुकर लावताना..

’इज करिना कपूर सेक्सी??????’ ..चिरंजीव

’हं.. कायsss ?’ ..गरगरणे या प्रकाराच्या पहिल्या स्टेजमधली मी.

तीनताड उडाले होते मी…हातातले तांदुळाचे भांडे सुटून गेले तर नंतर बरचं निस्तरावं लागेल येव्हढा विवेक शाबुत राहिल्यामुळे ते वाचले.. सध्यातरी या अनपेक्षित प्रश्नाची उकल करावी या हेतूने ते भांडे ओट्यावर आदळून आमची स्वारी लेकाकडे…त्याला गाठून आधी त्या प्रश्नाचं उगमस्थान शोधलं..त्यांच्या कुठल्यातरी लाडक्या गाण्याच्या यू-ट्युबवरील व्हिडिओ खाली म्हणे ही   उपरोक्त ’शंका’ उपस्थित करण्यात आलेली होती. आता दचकण्याची वेळ पुन्हा माझी होती…(लहान मुलांच्या कुठल्यातरी सिनेमाच्या गाण्यात हे असले आगाउ प्रश्न विचारणाऱ्या महाभागाला गाठावे असेही वाटले क्षणभर!!!!

बरं ’हो ’ म्हणू की ’नो ’?? हा ’मम्मीकी सुनू या टम्मीकी’ छाप प्रश्नही मनात आला…त्यातही काहीही उत्तर दिले तरी ’सेक्सी’ म्हणजे काय गं मम्मा????? ही शंका चिरंजीव विचारणारच होते लगेच. ’गोची’ म्हणजे काय याचा प्रत्यय येतो बरेचदा…

प्रत्यक्षात माझी हे असले काही स्वत:शीही विचारायची प्राज्ञा आजवर झालेली नाही… असल्या संदर्भाला 1/ Cos C वर माझी मजल गेलेली नाही… पण आज म्हणजे!!!
’आहे का ती सुंदर किंवा छान?? ” मी त्याला विचारले..
’She is not so beautiful Mumma….तुला पण नाही ना आवडतं…”तो म्हणाला.

श्रावण बाळं ते माझं..तात्पुरती सुटका झाली होती…पण वरवरच्या मलमाने मुळ प्रश्नाला फक्त बगल दिलेली होती.

आजकाल हे प्रसंग वरचेवर येताहेत…स्वैर सुटलेला मिडीया, शाळेत अठरापगड ठिकाणची ’हुशार’ मुलं…टि.व्ही.,ईंटरनेट, पेपर्स…कश्याकश्यापासून वाचवणार आपण मुलांना…बरं ही पिढी अतिशय ’ज्ञानी’ आहे… प्रत्येकच पालकांपेक्षा मुलांची पिढी बदललेली असणार, प्रगत, आधुनिक असणार हे मलाही समजतेय…फक्त हा प्रश्नांचा ’सामना’ मात्र नुकताच जरा जास्तच हातघाईचा व्हायला लागलाय.. एक विचार असाही येतोय की आपणच विचारपूर्वक व्यवस्थित मुलांच्या वयाचे भान ठेवत, त्यांना झेपेलसे सांगावे म्हणजे उगाच मित्रवर्यांकडून मिळणाऱ्या माहितीची खरी बाजू त्यांना समजेल… त्यांचा आपल्यावर विश्वास असतो तेव्हा त्याच आधारावर आपण त्यांना चर्चेत घ्यायला हवेय.. मगर इस थेअरी का प्रॅक्टिकल उतना इझी नही है!!! अचानक जेव्हा असे हल्ले होतात तेव्हा त्यांना त्याच सफाईने तोंड देण्याइतका माझा सराव अजून झालेला नाहिये..

3 Idiots मधला सीन आठवतोय बोमन इराणी ऍस्ट्रोनॉट्स पेन दाखवतो आणि त्याची महती गातो…आमिर कमाल भाबडा चेहेऱ्याने त्याला विचारतो की स्पेसमधे पेन नाही चालत तर पेन्सिल्स का नाही वापरत…त्यानंतर बोमनच्या चेहेऱ्यावर जे भाव येतात तसलेच काहिसे भाव माझ्या चेहेऱ्यावर आजकाल वारंवार येतात आणि मग मी म्हणते…’I’ll get back to u on this…’

मध्यंतरी कधीतरी देवापुढे दिवा लावत होते आमचा ’रांचो’ बाजुला उभा होता हात जोडून…आणि अचानक म्हणाला, ” मम्मा काड्यापेटी ला Sticks Box किंवा Fire Box न म्हणता मॅचबॉक्स का म्हणतात…” ..मला खरचं त्यापुर्वी नव्हता पडला हा प्रश्न…मग उत्तर शोधले की ’मॅच’ या शब्दाचा अर्थ ’असे काही तरी की ज्यामुळे आग लावता येते” असाही आहे…………तोवर मात्र माझ्या चेहेऱ्यावर ’I’ll get back to u on this…’ चेच भावं होते…

आजकाल तर मुलांबरोबर टि.व्ही. बघण्याचीही माझी हिम्मत होत नाही…सॅनिटरी नॅपकिनच्या चपला किंवा छत्र्या पहाण्यापेक्षा नकोच ते !!!!! तरीही सुटका नसतेच, मागे याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला काहीतरी असेच वेळ काढू उत्तर देउन मी स्वत:साठीच खड्डा खणला होता… मग उलट त्याने तो भुंगा जास्त लावला, शेवटी पुन्हा ये रे माझ्या मागल्या होण्यापेक्षा त्याला झेपेल असे समजावले…आणि जादुची कांडी फिरल्यासारखी तो प्रश्नही गायब आणि ते कुतूहलही…अनेक जाहिराती येतात तश्या याही येतात आणि जातात… पण मूळ मुद्दा रहातोच की अडलय का काही या जाहिरातदारांचेच, उगाच नसत्या माहित्या अगदी सखोल दाखवणे खरचं कितपत गरजेचे आहे???? लहान मुलांच्या रिऍलिटी शो मधले ऍंकररूपी आगाउ बडबडीचे यंत्र पाहिले की तर हे प्रश्न अजूनच वाढतात…बरं त्यांच्या त्या बेफाम वटवटीला दाद देण्यात त्यांचे जन्मदातेही असतात.. मग मेले आम्हीच का असे चिकित्सक असेही वाटते कधीतरी!!!

मला कळतयं हा काही ’भारत-पाक’ मुद्दा नाहीये…..पण ज्याचं जळतं त्यालाच कळतं म्हणतात ना ती गतं आहे…… हळूहळू पिल्लू मोठं होतय, प्रश्नांच स्वरुपही बदलतय…आज प्रश्नपत्रीकेच्या गट ’अ’ मधे असणाऱ्या मला गट ’ड’ ही सोडवायचा आहे…आणि नुसतं पास न होता नंबरही काढावा लागेल… तेव्हा मन कसून कामाला आणि विचाराला लागावं लागणार आहे…

काल लेकीचा तिसरा वाढदिवस…परवा झोपण्यापुर्वी अचानक माझ्यावर चिरंजीवांनी पुन्हा प्रश्नहल्ला केला…’मम्मा आता माउ तीन वर्षाची झाली …मग आता पुन्हा बाळ कधी होणार … :)’. क्षणभर राग आला मग तो गेला पण विचार आला की या प्रश्नाला काहीबाही उत्तर देउन सुटका होइल खरी पण या प्रश्नोत्सर्गी प्राण्याबाबतचे एक सत्य असेही आहे की प्रश्न आणि उत्तर यांची चेन रिऍक्शन असते…म्हणजे एका प्रश्नाचे उत्तर पुढचे २/३ प्रश्नांचे जनक असते…तेव्हा मी त्याला म्हटले, ” झोप बाळा तू आता…I’ll get back to u on this……..” 🙂

थोडक्यात काय तर हे ’पार्सल ’ त्याच्या बायकोच्या ताब्यात देण्यापूर्वी मेऱ्येको बहूतच बडे बडे प्रश्न सोडवणेके है ऐसा दिखता है!!!!!!!!!!!!!!!

ता.क. करिना कपुरच्या नावाला दिलेली लिंक ही तिच्याबद्दल अधिक काही माहिती (!) देणारी असेल असे वाटून तिला क्लिक केल्यावर जर भ्रमनिरास झाला… I can get back to u on that …कारण त्यात माझा दोष नाही .. (कोणे एके काळी तिचा उल्लेख असलेली एक पोस्ट मी टाकली होती ती ज्यांनी वाचलेली नाही त्यांनीही ती वाचावी हा एकमेव उदात्त 😀 हेतू माझ्या मनी होता..)