I’ll get back to u on this…………..

‘मम्माssssss’..चिरंजीव

’ओ रे….’ अस्मादिक किचनमधे कुकर लावताना..

’इज करिना कपूर सेक्सी??????’ ..चिरंजीव

’हं.. कायsss ?’ ..गरगरणे या प्रकाराच्या पहिल्या स्टेजमधली मी.

तीनताड उडाले होते मी…हातातले तांदुळाचे भांडे सुटून गेले तर नंतर बरचं निस्तरावं लागेल येव्हढा विवेक शाबुत राहिल्यामुळे ते वाचले.. सध्यातरी या अनपेक्षित प्रश्नाची उकल करावी या हेतूने ते भांडे ओट्यावर आदळून आमची स्वारी लेकाकडे…त्याला गाठून आधी त्या प्रश्नाचं उगमस्थान शोधलं..त्यांच्या कुठल्यातरी लाडक्या गाण्याच्या यू-ट्युबवरील व्हिडिओ खाली म्हणे ही   उपरोक्त ’शंका’ उपस्थित करण्यात आलेली होती. आता दचकण्याची वेळ पुन्हा माझी होती…(लहान मुलांच्या कुठल्यातरी सिनेमाच्या गाण्यात हे असले आगाउ प्रश्न विचारणाऱ्या महाभागाला गाठावे असेही वाटले क्षणभर!!!!

बरं ’हो ’ म्हणू की ’नो ’?? हा ’मम्मीकी सुनू या टम्मीकी’ छाप प्रश्नही मनात आला…त्यातही काहीही उत्तर दिले तरी ’सेक्सी’ म्हणजे काय गं मम्मा????? ही शंका चिरंजीव विचारणारच होते लगेच. ’गोची’ म्हणजे काय याचा प्रत्यय येतो बरेचदा…

प्रत्यक्षात माझी हे असले काही स्वत:शीही विचारायची प्राज्ञा आजवर झालेली नाही… असल्या संदर्भाला 1/ Cos C वर माझी मजल गेलेली नाही… पण आज म्हणजे!!!
’आहे का ती सुंदर किंवा छान?? ” मी त्याला विचारले..
’She is not so beautiful Mumma….तुला पण नाही ना आवडतं…”तो म्हणाला.

श्रावण बाळं ते माझं..तात्पुरती सुटका झाली होती…पण वरवरच्या मलमाने मुळ प्रश्नाला फक्त बगल दिलेली होती.

आजकाल हे प्रसंग वरचेवर येताहेत…स्वैर सुटलेला मिडीया, शाळेत अठरापगड ठिकाणची ’हुशार’ मुलं…टि.व्ही.,ईंटरनेट, पेपर्स…कश्याकश्यापासून वाचवणार आपण मुलांना…बरं ही पिढी अतिशय ’ज्ञानी’ आहे… प्रत्येकच पालकांपेक्षा मुलांची पिढी बदललेली असणार, प्रगत, आधुनिक असणार हे मलाही समजतेय…फक्त हा प्रश्नांचा ’सामना’ मात्र नुकताच जरा जास्तच हातघाईचा व्हायला लागलाय.. एक विचार असाही येतोय की आपणच विचारपूर्वक व्यवस्थित मुलांच्या वयाचे भान ठेवत, त्यांना झेपेलसे सांगावे म्हणजे उगाच मित्रवर्यांकडून मिळणाऱ्या माहितीची खरी बाजू त्यांना समजेल… त्यांचा आपल्यावर विश्वास असतो तेव्हा त्याच आधारावर आपण त्यांना चर्चेत घ्यायला हवेय.. मगर इस थेअरी का प्रॅक्टिकल उतना इझी नही है!!! अचानक जेव्हा असे हल्ले होतात तेव्हा त्यांना त्याच सफाईने तोंड देण्याइतका माझा सराव अजून झालेला नाहिये..

3 Idiots मधला सीन आठवतोय बोमन इराणी ऍस्ट्रोनॉट्स पेन दाखवतो आणि त्याची महती गातो…आमिर कमाल भाबडा चेहेऱ्याने त्याला विचारतो की स्पेसमधे पेन नाही चालत तर पेन्सिल्स का नाही वापरत…त्यानंतर बोमनच्या चेहेऱ्यावर जे भाव येतात तसलेच काहिसे भाव माझ्या चेहेऱ्यावर आजकाल वारंवार येतात आणि मग मी म्हणते…’I’ll get back to u on this…’

मध्यंतरी कधीतरी देवापुढे दिवा लावत होते आमचा ’रांचो’ बाजुला उभा होता हात जोडून…आणि अचानक म्हणाला, ” मम्मा काड्यापेटी ला Sticks Box किंवा Fire Box न म्हणता मॅचबॉक्स का म्हणतात…” ..मला खरचं त्यापुर्वी नव्हता पडला हा प्रश्न…मग उत्तर शोधले की ’मॅच’ या शब्दाचा अर्थ ’असे काही तरी की ज्यामुळे आग लावता येते” असाही आहे…………तोवर मात्र माझ्या चेहेऱ्यावर ’I’ll get back to u on this…’ चेच भावं होते…

आजकाल तर मुलांबरोबर टि.व्ही. बघण्याचीही माझी हिम्मत होत नाही…सॅनिटरी नॅपकिनच्या चपला किंवा छत्र्या पहाण्यापेक्षा नकोच ते !!!!! तरीही सुटका नसतेच, मागे याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला काहीतरी असेच वेळ काढू उत्तर देउन मी स्वत:साठीच खड्डा खणला होता… मग उलट त्याने तो भुंगा जास्त लावला, शेवटी पुन्हा ये रे माझ्या मागल्या होण्यापेक्षा त्याला झेपेल असे समजावले…आणि जादुची कांडी फिरल्यासारखी तो प्रश्नही गायब आणि ते कुतूहलही…अनेक जाहिराती येतात तश्या याही येतात आणि जातात… पण मूळ मुद्दा रहातोच की अडलय का काही या जाहिरातदारांचेच, उगाच नसत्या माहित्या अगदी सखोल दाखवणे खरचं कितपत गरजेचे आहे???? लहान मुलांच्या रिऍलिटी शो मधले ऍंकररूपी आगाउ बडबडीचे यंत्र पाहिले की तर हे प्रश्न अजूनच वाढतात…बरं त्यांच्या त्या बेफाम वटवटीला दाद देण्यात त्यांचे जन्मदातेही असतात.. मग मेले आम्हीच का असे चिकित्सक असेही वाटते कधीतरी!!!

मला कळतयं हा काही ’भारत-पाक’ मुद्दा नाहीये…..पण ज्याचं जळतं त्यालाच कळतं म्हणतात ना ती गतं आहे…… हळूहळू पिल्लू मोठं होतय, प्रश्नांच स्वरुपही बदलतय…आज प्रश्नपत्रीकेच्या गट ’अ’ मधे असणाऱ्या मला गट ’ड’ ही सोडवायचा आहे…आणि नुसतं पास न होता नंबरही काढावा लागेल… तेव्हा मन कसून कामाला आणि विचाराला लागावं लागणार आहे…

काल लेकीचा तिसरा वाढदिवस…परवा झोपण्यापुर्वी अचानक माझ्यावर चिरंजीवांनी पुन्हा प्रश्नहल्ला केला…’मम्मा आता माउ तीन वर्षाची झाली …मग आता पुन्हा बाळ कधी होणार … :)’. क्षणभर राग आला मग तो गेला पण विचार आला की या प्रश्नाला काहीबाही उत्तर देउन सुटका होइल खरी पण या प्रश्नोत्सर्गी प्राण्याबाबतचे एक सत्य असेही आहे की प्रश्न आणि उत्तर यांची चेन रिऍक्शन असते…म्हणजे एका प्रश्नाचे उत्तर पुढचे २/३ प्रश्नांचे जनक असते…तेव्हा मी त्याला म्हटले, ” झोप बाळा तू आता…I’ll get back to u on this……..” 🙂

थोडक्यात काय तर हे ’पार्सल ’ त्याच्या बायकोच्या ताब्यात देण्यापूर्वी मेऱ्येको बहूतच बडे बडे प्रश्न सोडवणेके है ऐसा दिखता है!!!!!!!!!!!!!!!

ता.क. करिना कपुरच्या नावाला दिलेली लिंक ही तिच्याबद्दल अधिक काही माहिती (!) देणारी असेल असे वाटून तिला क्लिक केल्यावर जर भ्रमनिरास झाला… I can get back to u on that …कारण त्यात माझा दोष नाही .. (कोणे एके काळी तिचा उल्लेख असलेली एक पोस्ट मी टाकली होती ती ज्यांनी वाचलेली नाही त्यांनीही ती वाचावी हा एकमेव उदात्त 😀 हेतू माझ्या मनी होता..)

Advertisements

57 thoughts on “I’ll get back to u on this…………..

 1. “ऍंकररूपी आगाउ बडबडीचे यंत्र” ……..wow…सहीये तन्वीताय तुमी तर चौक्यांची खैरात केलीत…ही पोस्ट पण फ़ेवरिट्स मध्ये ठेवणार लवकरच कामाला येणारे…अगं ती दोन माकडं, (एकापेच्चा एकवाली) त्यांचा नुसता आवाज लांबुन (म्हणजे हळू) कानी पडला तरी चिरंजीव खुदकन हसतो जणू याच्या मागच्या जन्माच्या ओळखीचं कुणी बोलतंय…
  पण सांग नं फ़ेवरिट्स मध्ये ठेवु की काही वर्षांनी प्रश्नांची उत्तरे द्यायला तुझ्याकडेच धाडू??? तसंही लेकानं आणखी एक पिलु ऑर्डर केलंय ना…हे हे….

  • अपर्णा तू लेकाला माझ्याकडे पाठवल्यावर त्याच्या प्रश्नांना उत्तरं तर मी देइन पण माझ्या घरातल्या ’प्रश्नकर्त्यांच्या’ संगतीत आरुषही तसाच होइल बघ मग!!!!! 🙂
   तरिही पाठव त्यालाच ईकडे आम्ही सगळे मज्जा करू!!!!

 2. तन्वी, भट्टी झकास जमलीये गं.सॆनिटरी नॆपकीनच्या चपला…..अगदी अगदी. अग तुमच्याकडे पण दाखवतात की नाही माहीत नाही पण इथे एकतर डिप्रेशनच्या ऎड नाहीतर त्या टिपीकल उत्साहवर्धक…:)) गोळ्यांच्या जाहिरांतींनी वात आणलाय अगदी. आणि लहान लहान मुले ते पाहून-ऐकून काय काय तारे तोडतात ते म्हणजे…. गौरा तीन वर्षांची झाली…. मग काय विचार आहे? हाहा…

  • अगं ताई तरी सेन्सॉर्ड पोस्ट आहे……..अजुनही अनेक तारे तोडलेले आहेत चिरंजीवांनी….बरं विलक्षण भाबडेपणे तो बडबडत असतो…………. त्याचे प.पु.पिताश्री उत्तरे देण्याच्या फंदात पडत नाहीत…तो म्हणतो मला नाही सुचत ते वयाचे आणि समर्पक उत्तराचे गणित मांडायला, तुच बघ ते!!!!!
   मग काय रोजची नवी प्रश्नपत्रीका…………… 🙂

 3. तन्वीबाई, तुमचं हे पोस्ट आणि एकूणच ब्लॉग म्हणजे आमच्यासारख्यांना पुढे येणा-या प्रश्नांना (वाचा संकटांना) उत्तरं देण्यासाठीचं ‘नवनीत मार्गदर्शक’ किंवा ‘२१ अपेक्षित प्रश्नसंच’ असं काहीसं आहे आणि त्यामुळेच मी ते वाचतोही तेवढ्याच भक्तीभावाने.. आता एवढं सगळं सांगितल्यावर पोस्ट शॉल्लीट झालंय हे वेगळं सांगायला हवं का?

  • हेरंब अरे बाबा ’संकट’ असेच वाचले रे….कारण आम्ही जात्यात असलो तरी तुम्ही सुपात आहात याची जाणीव आहे मलाही…….
   मी अपर्णालाही तेच सांगणार होते, बोलायला लागू देत फक्त एकदा ज्युनियर्स की तुमच्या पोस्ट वाढतील बघा…. 😀

 4. लेख सणसणित आणि खणखणित आहे ! खरं सांगतॊ माझ्या मुलींनी मला-आम्हाला असले खिंडीत पकडणारे प्रश्न कधीही विचारले नव्हते…थॅक्स गॉड … तूं ही मुलूखमैदान सदोदित कशी सांभाळत्येस…खरंच कौतुकास्पद आहे !
  कालच तिसरा वाढदिवस साजरा केलास ना ? म्हणजे आता दुसरी मुलूखमैदान पण जवळ येऊ पहात्येय ! होशिय्यार !
  ….. आणि कार्ट तिसरी तोफ/तोफा मागतंय… बघ बाई काय करायचंय ते !!!

  • काका पर्फेक्ट शब्द आहे ’मुलुखमैदान’…….

   बरं या तोफा माझ्यावरच धडाडतात कायम….. दुसरी ’मुलुखमैदान’ आणि डेंजर आहे काका….परवा तिला म्हटलं हॉलमधे अंधार आहे जाउ नको तरिही गेली, आणि जोरात ओरडली …..आम्हाला वाटलं ही घाबरली की काय!!! तिला विचारल्यावर म्हणे की मी अंधाराला घाबरवत होते…. 🙂 आता बोला…… घाउक ’संकट’ आहे ते तर… तेव्हा तिसरी तोफ तर स्वप्नातही नकोय आता 😀

   • अरे हो एक राहिले…..काका तुम्ही नशीबवान आहात खरचं!!! मी मात्र आईबाबांना असे कोंडीत अडकवलेय बरेचदा लहानपणी…. :)…कितीही समजावले की बोलु नकोस तरी नेमके नको तेव्हा पाहुण्यांसमोर बडबड करून त्यांची पंचाईत करणे हा उद्योग अस्मादिकांनी अनेकदा केलाय…. 🙂

 5. यु ट्युब मधे तर बरेचदा असं काहीतरी विचित्र दिसतं. मुलांच्या हातात इतक्या लवकर लॅपटॉप द्यायची गरज आहे कां? या प्रश्नाचा जरुर विचार करावा. अगदी साध्या साध्या साईट जसे डिस्ने लॅंड वर पण विचित्र जाहिराती असतात. एकदा मी सेव्ह करुन ठेवली होती .-http://twitpic.com/v1jv7
  असं काही मुलांना एकदम दिसलं तर काय उत्तर देणार?? म्हणुन मी तर मुलींना १२वी पास होई पर्यंत कॉप्युटर म्हणण्यापेक्षा इंटरनेट पासुन दुरच ठेवलं होतं- अर्थात तो पण अतिरेक आहे असं म्हणणारे माझे मित्र आहेतच, सुवर्ण मध्य कुठे असतो हो?? कसा साधायचा? या प्रश्नाच्ं उत्तर शोधायचा प्रयत्न करायचा- आणि त्या प्रमाणे वागायचं!

  • महेंद्रजी खरचं मलादेखील हा प्रश्न पडतो की लॅपटॉप द्यावा की न द्यावा….. पण शाळेचे अनेक प्रोजेक्ट्स आहेत की जे घरीही करावे लागतात हा एक मुद्दा. आणि खरं तर बाहेर खुपसे न खेळायला मिळणारे हे मुलं कायम आपल्या आसपास असतात त्यामुळे आपण लॅपटॉपवर काम करताना, ’तू गाणे कसे ऐकले?’ या प्रश्नांची उत्तरे द्यावीच लागतात…तरिही ईशान पेंटमधे काम करत असताना त्याच्या जवळच असते मी अनेकदा……
   पण केवळ नेट ला दोष देउन चालणार नाही, मध्यंतरी पोगोवर ’जब वी मेट’ दाखवला होता, त्याला लहान मुलांचा सिनेमा कसे म्हणणार आपण???? अनेक कार्टूनही असेच आहेत!!!!
   ईशानचा वर्गमित्र आला होता परवा, म्हणे ,”My mother was telling today it is very romantic out!!! ” …आता ही मुक्ताफळं उधळून ते लेकरू घरी गेलं पण आमच्या चिरंजीवांनी ‘म्हणजे काय??’ हे मला विचारलेच….आता त्या मातेला तरी काय गरज दुसरीतल्या मुलाला असे काही सांगण्याची????? 🙂
   हे माझ्यासमोरचे पण शाळेत तर काय काय होते याचा विचार न केलेलाच बरा……किंवा काही अंशी सजगता आणि काही वेळा दुर्लक्ष करून ’सुवर्णमध्य’ साधायला प्रयत्न सुरू आहे सध्यातरी…….

 6. पावन खिंडीत सारखा अडकून
  बाजीप्रभू देशपांडे झाल्यासारखे वाटत असेल न?
  पण त्यामुळे एक फायदा होतो…
  हजरजबाबी पण नसेल तर वाढतो…
  असेल तर उपयोगी पडतो…
  लेख झक्क्क्कास…
  मुल किती curious असतात ..
  अजून छान प्रतिक्रिया हवी असेल तर
  i will get back to u on this..!!

  • मस्तच आहे तुझी प्रतिक्रीया नेहेमीप्रमाणे….. योग्य उपमा दिलीस ’चौफेर’ प्रश्नांच्या माऱ्याला उत्तरे देतांना खरचं खिंडीत अडकल्यासारखे वाटते!!!

 7. ते शेजारचं कार्टं असंच आगाऊ आहे बरं का… बॅचलर होके भी मेरे को असेच बडे बडे प्रश्न सोडवणेके है. एकदा एका मित्राच्या मुलाने त्याला प्रश्न विचारला होता “बाबा, हाडळ कशी असते हो?” बिचारा बाळाच्या आईकडेही बोट दाखवू शकला नाही.
  “बाबा, बाबा होण्यासाठी लग्न करावे लागते का हो?” हा असाच एक प्रश्न त्याचा. तरी बरं तीनच वर्षाचं आहे.

 8. je ahe te khare khare ani spasht sangaave..ugeech round about, ardhavat khote sangoon kahi fayda nahi…ulat baheroon kalnari information ani apli golmaal uttare yaat por confuse houn aplyavarcha vishvas ghalvoon basayache..jya divashi majha porga pahilyanda vicharel ki Kareena sexy ahe ka,tevha me HO mhanoon saangen.

  • पण तेव्हढ्यावर तॊ थांबेल ? पुढचाच प्रश्न असेल बाबा सेक्सी म्हणजे काय?… त्याच्या पुढील प्रश्न असेल … तुमच्या ह्या आधीच्या उत्तरा नंतर ! ( तुम्हाला ती बिरबलाची गोष्ट आठवत असेलच बालहट्टा वरची… इथे हट्ट आणि प्रश्न ह्यात फारसा फरक नाही !!)

 9. Exactly..to vicharel sexy mhanaje kaay? Mag vicharel sex mhanaje kaay and so on..
  Asehi to sarvach baabteet prashnavar prashn vicharat rahatoch..ya hee baabteet vicharel..pan mee tyala saty ani samadhankarak uttare deu shaken..nahitar to baheroon te shikelach..

  • नचिकेत तुझं मत अगदी मनापासून पटतय….. म्हणुनच मी भाग्यश्रीताईला दिलेले उत्तर बघ की ही पोस्ट सेंसॉर्ड आहे जरा…… 🙂
   असो, हे मात्र खरय की सॅनिटरी नॅपकिनला मी जेव्हढी व्यवस्थित त्याला समजावू शकले तेव्हढे या अचानक हल्ल्याला समाधानकारकरित्या हाताळले नाही……नाही रे अजून मला झेपत पटकन कितपत खरे सांगावे हे ठरवायला……
   मुलांना सगळे समजणारच असते ..ते आपणच सांगावे म्हणुन तर पोस्टचे नावचं हे दिलेय ना I’ll get back to u on this…… 🙂 लगेच नाही झेपले (मला) तरी सवडीने देते उत्तरे त्याच्या प्रश्नांना!!!!

 10. तन्वी गं, आपली पोरं मागच्या जन्मातली जत्रेतली हरवलेली जुळी भावंडं आहेत का? अगं आत्ता चारपाच दिवसांपूर्वी मी सेम टू सेम प्रसंगात होते. फ़रक इतकाच आहे की इशानपुढे करीना होती आणि आमच्यापुढे बॉम्बे टाईम्सच्या मागल्या पानावरची हॉलिवुड सुंदरी दो कपडों में होती. सेम गं सेम. भावना अगदी पोहोचल्या, पटल्या. 🙂

  • 🙂 काय बोलू गं!! अगं काल एक मन वाटलं होतं ही पोस्ट उडवावी की काय…. पण हा प्रश्न खरचं हल्ली फार भेडसावतो गं!!!!

   आणि अगं आपली पोरं असायचीच सारखी आपण नाही का सारख्या !!! मुलांना पर्याय नाही… 🙂

  • अखिल अरे सॉरी रे…….पण मध्यंतरी जवळपास १५ दिवस आजारपण होते त्यामुळे खुपश्या कमेंट्स अश्याच राहिल्याहेत…..
   आणि तुझ्या बाबत तर असे होते की तू काहि तरी ईतके सुंदर लिहितोस की त्यावर काय उत्तर द्यावे हे कळत नाही……मग वाटतं आपल्याला नंतर सुचेल काहितरी जरा चांगलं म्हणून उत्तर जरा उशीराने देते मी!!! पण आता काळजी घेइन की पुन्हा असे होणार नाही…. 🙂

 11. पुण्यातील गरवारे बालभवनच्या संचालिका (नाव नक्की आठवत नाहीये आत्ता. बहूदा शोभा भागवत. त्या बालमानसशास्त्रात खूप शिकलेल्या आहेत.) त्यांच गारांचा पाऊस नावाच १ अप्रतीम पुस्तक आहे. लहान मुले विचारणार्‍या शंका व त्या मुळे होणारी आई-वडीलांची पंचाईत मस्त लिहिली आहे त्यात.
  बरेचदा मुले निरागसपणे प्रश्न विचारतात. पण विषय एव्हडॆ भयनाक असतात की काय उत्तर द्यावे हे कळत नाही. त्यांना समजेल अश्या भाषेत सांगण हे सगळ्यात अवघड काम असत.
  कित्येक वेळा मुले एव्हडे भलते प्रश्न विचारतात की आपली विकेट उडते पण त्यामागचा निरागसपणा कळल की राग कुठल्याकुठे निघून जातो.

  (माझ लग्न झालय पण अजून मुले नाहीयेत. ओळखितल्या लहान मुलांच्या अनुभवावरून सांगतोय.)

  आपला,
  (लहान मुलांचा मोठा मित्र) अनिकेत वैद्य.

 12. ” पण या प्रश्नोत्सर्गी प्राण्याबाबतचे एक सत्य असेही आहे की प्रश्न आणि उत्तर यांची चेन रिऍक्शन असते ”
  हे…हे..हे…
  खुपंच छान लिहिले आहे…माझ्या ४ वर्षाच्या पुतणीचे प्रश्न ऐकुन मी असाच हैराण झालो होतो…

  • आनंद आभार….. “माझ्या ४ वर्षाच्या पुतणीचे प्रश्न ऐकुन मी असाच हैराण झालो होतो…” म्हणजे तुम्हाला नक्की समजले असेल माझी अवस्था…..

 13. तन्वी,

  आज तुमचा पुर्ण ब्लॉग वाचुन काढला. खुपच छान आणि मनापासुनचे तुमचे लेखन भावले. माझा मुलगा आर्यन दीड वर्षाचा आहे. तेव्हा मला आता पुढे कोणत्या संकटांना तोंड द्यायचे आहे याची चांगलीच कल्पना आली. इशानच्या वाढदीवसाचे पोस्ट वाचताना खरच डोळे पाणावले.

  सोनाली

 14. hi tanvi,

  kharach he ase mala vatata pratyek aaila face karave lagat astil.
  mazha hi mulga 6 varshacha ahe.
  mi nehmi vichar karte ki mi jeva 6 varshachi hote teva mala evdhi akkal hoti ka?
  aaj apan neet vichar karun mulana uttare deto ani tyat tyanche samadhan hoil ase baghto.
  mala nahi vatat aplya aai vadilana apan ase prashana vicharle astil ani dhapatya shivay kahi milale asete.

  sagle lekh khupach chaan ahet……

  DAAT ha lekh khupach chaan…….amchya kade hi gele 4-5 divas daat haltoy…..vaat baghtoye padlyaver celebration chi!!!! 🙂

  • सुषमा स्वागत आणि आभार….

   खरयं आपल्या लहानपणी नव्हते येव्हढे प्रश्न पडत…. खरं तर आपला आपल्या पालकांशी आजकालच्या मुलांईतका संपर्क ही होत नसायचा….. खेळायला गेलो संध्याकाळी की घरी येउन दमुन झोपणे…..आजकाल मुले तितकीशी खेळतही नाहित मग आईवडिलांच्या भोवती रेंगाळतात आणि मग प्रश्नांचा तोफखाना सुरू!!!

   ’दात” वरील ्प्रतिक्रीयेसाठीही आभार……… 🙂 नक्की करा celebration……..आणि मला कळवायला विसरू नका!!!

 15. मला लक्ष्यात नाही मी आई-बाबांना असे प्रश्न कधी विचारले होते का… पण मी खुप अगाऊ करता होतो असे बाबा अजून सुद्धा म्हणतात (आणि आता बायको सुद्धा)

  बघुया मला काही आठवते का… I’ll get back to u on this … 😀

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s