छोट्या छोट्या गोष्टी……

आज सकाळी नेटाने सगळं काम आवरून ठेवलं होतं!! स्वयंपाक झाल्यावर कामवाली बाई आली त्यामुळे सगळीच भांडी घासली गेली…… घरही आवरुन झालं….. कामवाल्या बाईकडे (तिच्या नकळत 🙂 ) लक्ष ठेवून घर स्वच्छ पुसुनही झालं……. बास!!! पर्फेक्ट पर्फेक्ट काय तो आजचाच दिवस असे वाटत होते……. आता ही बाई गेली की धूणं फिरवायचं तिसऱ्यांदा की मस्तपैकी दिवस हातात…..

खुशीतच दुपारची जेवण झाली…… मग अचानक आठवलं की आपल्या आनंदाच्या नादात धूणं प्रकरण राहिलय तिथेच , ते मशिनात आपली वाट पहातयं….. मग मोर्चा तिथे वळवला……. वॉशिंग मशिनला मनात धन्यवाद म्हणतं पाणी भरायला लावलं…… नेहेमीपेक्षा जरा जास्तच भरू दिलं म्हटलं आज कपड्यांना पण जरा चंगळ, उगाच दाटीवाटी नको…मोकळेपणे आंघोळ करू देत!!!!!!  मशीन ईमाने ईतबारे फिरू लागले……. एक दिड मिनिटात जाणवलं की काहीतरी लोचा आहे ……. पिकलेल्या केळाचा वास येतोय घरात….. मग हा वास (/गंध  जे हवे ते वाचा…. आम्ही घरात ’वास’ असेच म्हणतो त्यामुळे तेच टायपले आहे…असो मुद्दा वेगळा आहे ) मशीन लावण्यापुर्वी येत होता की लावल्यानंतर येतोय असा प्रश्न पडला!!!!! माझा आजचा मस्त मुड पहाता आजकाल डिटर्जंट वाले काय फळांच्याही वासाच्या पावडरी विकायला लागलेत का असाही एक हलकाफुलका विचार मनात आला….. पण मग सलमान कसे चादरीतून ’बरसावो तूम फुल ..’ म्हणतो तसे माझा नवरा चादरीतून सफरचंद, केळी, द्राक्ष अगदीच गेला बाजार कलिंगड उडवतोय असाही विचार आला…… या फळांचा आघात फुलांसारखा नसेल असेही मनात आले आणि माझी मीच स्वत:शी हसले!!!! (आता ही बया बावळट आहे या विचाराने तुम्ही हसत असाल तर आपली वेवलेंथ मॅच होत नाहीये असे समजा….. पण मी दर एक दिड दिवसाने अशी ’येडचाप विचारांची’ ट्रीट देत असते स्वत:ला 🙂  )

विषयांतर करावे माणसाने पण किती???? तर कुठे होते मी….हं!!! पिकलेल्या केळाचा वास ……. घरातली फळांची परडी (मराठीत बास्केट!!!) पाहिली तर सगळीच फळं सुस्थितीत होती…… बाहेरच्या उन्हाने त्यातले एकही अजुन अति पिकले नव्हते….. आता मात्र माझ्यातली लेडी करमचंद (किटीच म्हणणार होते…पण मग सुश्मिता मुखर्जी आठवली 😦 …..तेव्हा करमचंद {त्यातल्या त्यात} बरयं!!!  [ या वटवट्या सत्यवानाच्या पोस्टपायी ना कंसांची सवय झालीये …आता हेच बघा आधि साधा कंस त्यात महिरपी त्यात चौकट…काय आहे हे सत्यवाना!!!!!!] ) तर…. हा केळाचा वास येत होता वॉशिंग मशिनमधुनच!!! मोहीम फत्ते उगमस्थान कळलेय!!!…… मग डोकावले त्या मशीनात…..माझे शोधकार्य संपेपर्यंत मशीन फिरून फिरुन दमुन थांबलेले होते……थोडक्यात त्याने त्याचे काम चोख पार पाडलेले होते!!!!!! सगळ्या कपड्यांमधे मधे मधेच केळाची सालं तरंगत होती…… मधेच थोडा फेससदृश काहितरी होते…… माझ्या मनात वैताग आणि कपाळावर आठ्या जमायला लागल्या होत्या!!!

मशीनमधे केळं जाण्याचा संबंधच काय??????? गुन्हा सिद्ध होत नाही तोवर सगळेच आरोपी या दृष्टीने घरातल्या उर्वरीत तीनही सदस्यांना पाचारण करण्यात आले…… नवरा आणि मुलगा म्हणाले की आम्ही आत्ताच घरी आलोय आमचा काहीही संबंध नाही!!! ते सुटले…उरल्या दोघी मी आणि माझी लेक…… मी का बरं असे काही करू????? संशयाची सुई घरातल्या मोस्ट उचापती मेंबरकडे गेली…… आणि मला आठवले की हिला सकाळी केळं खायला दिले होते खरे…… मग तिला विचारले तर ती म्हणाली, मी तर खाल्लं केळं!! मग आता काय करावे????? पण माझ्या या लेकीचा भाऊ अतिशय हुशार त्याने तिला पुन्हा विचारले की गौरा तू केळ सगळे खाल्लेस ना , मग त्याचे साल कुठे फेकले????? त्यावर लेक बोलती झाली, “ईशान मी केळं सगळे नाही खाल्ले….. ते घाण होते, त्याला काहितरी काळं लागलेलं होतं मी ते धुवायला टाकलेय!!!!! ” 😀

कपाळावर हात मारून घेतला……. हसावे का रडावे कळेना!!!!!!  नवरोजी तर रवाना झाले हापिसात!!!! पण मग मी काय करणार……. सगळा प्रकार निस्तरता निस्तरता दोन तास गेले कारण मशीनने फिरून ते केळ आणि त्याच्या सालाचे अनेक छिन्नविछीन्न तुकडे कपड्यांमधे अडकवून ठेवले होते……. सगळं धुणं पुन्हा एकदा स्वच्छ (!!!) धुवून वाळतं घातले आणि हुश्श केले तेव्हा बराच वेळ गेलेला होता……… आलिया भोगासी असावे सादर!!!! घातलेत उचापती पोरं जन्माला मग निस्तरा… दुसरे काय!!!!! बरं हे सगळे होत असताना उत्सवमुर्ती निवांत घरभर फिरत होत्या…..नवे नवे उद्योग शोधत!!!!

हाच पराक्रम ईतर कोणाकडून झाला असता तर किती वैताग वाटला असता….. ईथे मी ग्लोबल वॉर्मिंगला टांग मारून पाणी नासत दोन दोन वेळा धूणं धुत होते आणि शांत होते……संध्याकाळी नवऱ्याला सगळी गाथा सांगितली तेव्हा आधि तर त्याला हसू आ्ले पण लगेच लक्षात आले की त्याच मशीनात त्याचेही कपडे जातात… मग सावध पवित्रा घेत त्याने त्याच्या नव्या शर्टांविषयी विचारले…….येव्ह्ढा वेळ शांत असणारे वातावरण तापवायला ती ठिणगी पुरेशी होती……. “अच्छा तुझे शर्ट म्हणजे कपडे आणि आमचे तिघांचे काय रे…..म्हणे माझ्या शर्टांचे काय!!! …… आहे ना आपल्या घरात B.E. केलेली धोबीण तिने धुतलेत हो तुमचे शर्ट व्यवस्थीत….. त्यांच्यातल्या पाण्याचे बाष्पिभवन व्हायला लटकवलेत हो ते!!!!”……. एक ना दोन नुसती धुसफूस सुरू होती माझी….. आणि ’अहो’ शांत… मग त्या तटस्थपणावर माझी आणिक चिडचिड……….

जरावेळाने वातावरणातला उष्मा कमी झालायसा अंदाज घेत नवरोजी म्हणाले तूला आठवतयं का ईशानने लहानपणी मोबाईल धूतला होता एकदा……. 🙂 …..

” हो मग न उचापत्या करायला काय झालेय.. तुझीच मुलं ना ती!!!! “… मी माझा राग न विसरता म्हणाले……

“आहेतच ती माझी मुलं…. पण मला एक सांग जवळजवळ सुरु झालेल्या ट्रेनखालती जाणे, कण्हेरीच्या पानात गंध घालून ते विडा म्हणून खाणे असले पराक्रम कोणाच्या खात्यात जमा आहेत??????”….. हसत नवरा म्हणाला.

आता मात्र मी पण हसायला लागले. हे दिव्य पराक्रम माझ्याच बालपणीचे आहेत…….

मुळात आडात जे तेच पोहोऱ्यात यायचे ना….. सहज गप्पा सुरू झाल्या, चतूर मुलांनी ही संधी ऒळखली आणि ते ही सामिल झाले…. ईशान म्हणाला, ” मम्मा सांग ना तुझ्या लहानपणची ट्रेनची गोष्ट !!!! “….. मग पुन्हा एकदा त्या गोष्टीचे साग्रसंगीत पारायण झाले…… मग माझ्या भावंडाचे, नवऱ्याचे त्याच्या भावंडांचे लहानपणी केलेल्या पराक्रमांचे किस्से ऐकता ऐकता वेळ मस्त गेला……

केव्हातरी मनात एका जाहिरातीतली ओळ आली, ’छोट्या छोट्या गोष्टी आठवाव्या किती……………’

(फोटो जालावरून साभार!!!!)

Advertisements

कं ची बाधा……….

कालच्या पोस्टला मी  सगळ्या कमेंटला एकच उत्तर दिले… खरं तर प्रत्येकच उत्तरात आभार मानायचे होते. आणि मग तेच ते सगळ्यांना लिहायचे तर त्यापेक्षा एकत्रच एकच उत्तर टाकले……

त्या माझ्या महान चातुर्यावर हेरंब आणि अपर्णाने अजुन दोन कमेंटस टाकल्या…… हेरंबच्या मते मला ’कं’ ची लागण झाली आहे आणि त्याला अपर्णाचा दुजोरा 🙂  होता. थोडा वेळ मला गंमत वाटली या दोघांची…. एकूणातच आता ब्लॉगर्सची जी टीम झाली आहे, त्यात असे संवाद नेहेमीच घडतात. आणि काही वेळ चेहेऱ्यावर हसू फुलवून जातात……….

काही समजत नाहिये ना ही पोस्ट कश्याबद्दल आहे… 🙂 ….. नमनाला बरेचसे तेल ओतले गेलेले आहे तेव्हा आता मुख्य मुद्द्याला सुरूवात…………..

मुळ मुद्दा आहे माझ्या ’कं’ च्या बाधेचा…… काल मी सहज विचार करत होते की आयूष्यात मला आलेला पहिला ऐतिहासिक कंटाळा कोणता???? मग काय ईतिहासच खणला……….. माझा तो अतिमहत्वपुर्ण शोध पोहोचला थेट साडे एकतीस वर्षापुर्वीच्या अस्मादिकांच्या जन्मवेळेशी……. जन्मल्या जन्मल्या मला पहिला जाहीर कंटाळा आला होता आणि तो मी ’न रडून’ साजरा केला होता !!! (प्रस्तुत माहितीचे सौजन्य आमच्या मातोश्री…… 🙂 ) मग मला फटके मारून रडायला भाग पाडले होते असेही आईनेच पुढे सांगितले होते……. आणि आपल्या पहिल्या अपत्याला झाल्या झाल्या मार बसलेला आहे तेव्हा आपण मात्र कधी मारायचे नाही हा तिचा निर्धार कोणा एका ३१ डिसेंबरला आमच्या महान कर्तूत्त्वाने मोडला होता….. (तारिख कायम लक्षात रहाण्याजोगी आहे आणि तो पहिला आणि शेवटचा नॉनशाब्दिक मार असल्यामुळे आणि या मारातले हत्यार कुंचा असल्यामुळे आठवण अगदी पक्की आहे……..या मारानंतरचे अनेक शाब्दिक मार व्हाया कान मनाला लागत, मात्र हाच एकमेव मार व्हाया पाठ मनापर्यंत पोहोचला होता :D… या आठवणीवरचे आईचे मत असे की नेहेमीच बडवायला हवे होते म्हणजे नसते डिटेल्स लक्षात राहिले नसते 🙂 )  असो आज महत्वाचा मुद्दा हा की माझ्या आयुष्यातला पहिला कंटाळा जन्माला आल्यावर रड्ण्याचा होता…. खरं तर माझी वैचारिक बैठक (!!!) पहाता , जन्माला येणे हा सुंदर फिनॉमिनॉ रडून मला साजरा करायचा नसावा……

मात्र हा कंटाळा माझ्याबरोबर वाढतोय…… शाळेत येणारे लहानसहान कंटाळे, माध्यमिक- उच्चमाध्यमिक वर्षात प्रगत होत गेले…….मला तीन तास एका जागी बसून पेपर लिहिण्याचाही भयंकर कंटाळा होता. मग मी पेपर अर्धा लिहीला की स्वत:च स्वत;ला मार्क देउन पहायचे… ते एकदा का ३५ भरले की मी उत्तरपत्रीका देउन मोकळी व्हायचे…… माझ्या या अतिहुशारीची कल्पना माझ्या शाळेतल्या शिक्षकांना फारच लवकर आल्याने मी पेपर दिला की ते तो आधि तपासून पहात आणि जर पुर्ण लिहीलेला नसेल तर मला पुन्हा माझ्या जागेवर दामट्त……. P.T. चा तासही एक असाच महाकर्मकठीण कंटाळ्याचा होता…..मला स्वत: कवायती करण्याचा कंटाळा यायचा मग मी ईतरांकडे पहात उभी रहायचे……. यावर रागावून मला आमच्या मॅडमनी एक संपुर्ण वर्ष टेबलवर उभे राहुन P.T. करायला लावले होते……. सारी शाळा पुर्वेला तोंड करून उभी असेल तर मी एकटी त्यांच्यासमोर पश्चिमेला तोंड करून उभी असायचे , ते देखील टेबलवर :)…… अश्या आळशी विद्यार्थ्याला आमचे शिक्षक लाडकी का म्हणत हा खरचं एक प्रश्न आहे……

माझे म्हणजे पहिलीत वर्गात पहिला नंबर, दुसरीत दुसरा, तिसरीत पहिला, चौथीत दुसरा….. असे सम संख्येच्या वर्गांना दुसरा नंबर आणि विषम संख्येंच्या वर्गांना पहिला नंबर यायचा. या हिशोबाने माझ्या दहावीच्या वर्षाचे काय व्हावे असे टेन्शन आमच्या मातोश्रींना आले होते…… मला हे असले टेन्शन घेण्याचाही कायम कंटाळा असल्याने मी निवांत होते. असेच काहिसे विचार माझ्या दोन शिक्षकांना पण आले असावे…… कारण सुरूवातीच्या काही दिवसातल्या माझ्या शाळेतल्या आणि शिकवणीच्या दांड्या पहाता हे दोघे जण मला घरी रोज शिकवायला यायला लागले….. ते ही नि:शुल्क…. आताची शिक्षणपध्दती पहाता या गोष्टीवर विश्वास ठेवणे कठीण असले तरी मला मात्र तेव्हा हा जगातला सगळ्यात मोठा उपद्रव वाटायचा…… आणि मग मी चार दारे असलेल्या आमच्या घराच्या कुठल्यातरी दाराने पळून जायचे…… मग सर घरी यायच्या आधि मला शोधून दामटून घरी आणणे हे आईचे काम असायचे……. बरं हे सर घरी आले की सगळ्या गणितांची तोंडी उत्तरे देउन मी मोकळी होत असे….. मग ’स्टेप्सला मार्क्स असतात, त्या लिहिण्याचा कंटाळा करायचा नाही!!!! ’ हे माझ्याकडून ५ वेळा लिहून घेतले जाई!!!!!!!……………… एक मात्र खरं आहे की या शिक्षकांनी मला वळण लावण्याच्या विचाराचा ’कंटाळा’ न केल्यामुळे मी दहावीत शाळेत पहिली आणि केंद्रात मुलींमधे पहिली आले……. 🙂 माझ्या या रिझल्टवर खुश होण्याऐवजी जेव्हा माझे सर म्हणाले बघ येव्हढा आळस केलास तरी पहिली आलीस…. खरचं जरा अभ्यास केला असतास तर मेरीट असे ८-१० मार्काने चुकले नसते…. :(………….. यावर आमच्या आईचे मत ’जिद्द’ म्हणजे अशी ती नाहीच, सगळ्याचा मेला कायम कंटाळा आहे या मुलीला…………..तिचे हे मत बदलणार नाही याची मात्र मी कायम ’उत्साहाने’ काळजी घेतलीये……

आठवायचा कंटाळा म्हणजे ’विस्मरण’…… कंटाळ्याच्या या उपप्रकारानेही माझ्या आयुष्यात अनेक चमत्कार घडवलेत आजवर….. आई-बाबांसाठी म्हणून मला दिले गेलेले कुठलेही निरोप मी कधीच त्यांच्यापर्यंत पोहोचवले नव्हते…… निरोप सांगणाऱ्या काका- मावश्यांना तोंडभरून ’हो नक्की सांगते!!!’ म्हटल्या म्हटल्या मी तो निरोप विसरून जायचे………. कोणी उद्या घरी येतो वगैरे सांगितलेले असले की ते प्रत्यक्ष आल्यावरच आईला समजायचे की ते येणार होते…… मग मी आपली ’मला आज खूप गृहपाठ आहे!!! ’असले कारण सांगुन तिथून काढता पाय घ्यायचे!!!! पण ते पाहूणे गेल्यावर बाबांचे ठरलेले वाक्य यायचे, ” अगं कुठल्या तंद्रीत असतेच गं!!! कायम स्वत:च्याच नादात…..” …………… विसराळूपणा मी माझ्या मामाकडून घेतलाय. आमच्या मामाच्या विसराळूपणाचे किस्से आम्ही आजही एकत्र आलो की आठवत असतो…… आमच्या मामाने एकदा ट्रेनमधे जाताना लोणच्याचा संपुर्ण डबा वरच्या बर्थ वर ठेवला होता आणि साधारण दिड तासाच्या प्रवासात हे महाशय त्याबाबत ठार विसरले आणि तो न घेताच उतरून गेले होते….. एखाद्या ठिकाणी जाताना गाडीने जाणे आणि येताना मित्र भेटला तर गाडी तिथेच किल्लीसहित विसरण्याचे भीमपराक्रमही मामाच्या खात्यात आहेत…. 🙂 वस्तू हरवणे हे तर आमचे कॉमन आहे!!!

आम्हाला कंटाळा नाहिये तो फक्त बोलण्याचा ….. डोक्याच्या मातीत विचारांची शेती आणि तोंडाच्या गिरणीत शब्दांचे दळण सतत सुरू असते……. मला आईने सांगितलेली कामं करण्याचाही एक असाच असह्य कंटाळा होता…… मग मी ’हो हो करते!!’ असे सांगायचे, थोड्या वेळाने पुन्हा आईने विचारले की , ’अगं आई ५ मिनिटाचे तर काम आहे, मी नाही म्हटले का, करते थांब!!!” हे उत्तर ठरलेले असायचे…………….. मग आई काय समजायचे ते समजून ते काम करून टाकायची. एकदा आईने मला धुतलेल्या तांदूळाचे पाणी झाडाला टाकायला सांगितले होते…मी संपुर्ण पातेले झाडात ओतून, भुमीतून आलेले तांदूळ पुन्हा भुमीत अर्पण करून आले होते. 🙂  मी आणि माझे दोन मामा (एक ज्याचा आधि उल्लेख केलेला आहे आणि एक आमच्याच कॅटेगरीतला आईचा मामेभाउ.. ) गप्पा मारायला बसलो की इतरांच्या मते ’वल्गनांना’ उत यायचे, कारण या कंटाळाग्रस्त आत्म्यांकडून प्रत्यक्षात काही घडायचे नाहिये या मतावर सगळे ठाम होते….. आमच्या या मामाला आमची मामी आजी ,” रात को बका दिन को नका!!’ असे म्हणायची………. 😀

पुढे कॉलेजमधे फाईल्स पुर्ण करायचा, लेक्चर्स अटेंड करायचा या प्रकारातले अनेक कंटाळे आले नी गेले……हा ’दिग्विजयी कंटाळा’ ( शब्दाचे सौजन्य हेरंब) माझ्या आयूष्यात नसता तर माझ्याकडून काहितरी भव्यदिव्य झाले असते या विचारावर आमची आई अजुनही ठाम आहे!!!!! अहो नुसतीच प्रखर बुद्धीमत्ता काय कामाची, काहितरी रिझल्टही तर दिसायला हवा ना, हे तिचे पेटंटेड वाक्य ती न कंटाळता नेहेमी बाबांना सांगत असते…… आणि गेली साधारण २५-२६ वर्षे (जेव्हा आईला असा बोध झाला की आपली लेक हुशार {!} आहे तेव्हापासुन पुढची वर्ष…) ते न कंटाळता मान डोलवत असतात!!!!!!!!!!!!!!! तिच्या तगमगीत काहितरी तथ्य असावे असे मला मात्र आजकाल कधीमधी वाटते जेव्हा असलाच काहिसा विचार स्वत:च्या लेकाबाबत मनात डोकावतो!!!!! 🙂

असो, तर सारांश काय आम्ही कंटाळापंथीय लोक…….. वपूंचे एक वाक्य आहे ’कंटाळ्याच्या दिवशी काय होते…… आधि कंटाळा येतो आणि मग …. आणखी कंटाळा येतो …’ तसलेच आहे आम्हा कंटाळाप्रेमींचे. कुठलीच नवी गोष्ट खूप दिवस मन रमवू शकत नाही, काही दिवसातच तिचा कंटाळा येतो आणि मन नवे काहितरी उद्योग शोधू लागते!!!!

काहिही असले तरी मला ’कंटाळ्या’ चा राग नाहीये कधीच…. कारण जसे आम्हाला स्वत:च्या आयुष्यात भव्यदिव्य कर्तूत्व करायचा कंटाळा आहे तसेच ईतर कोणाला असे काही करण्यापासून परावृत्त करायचाही कंटाळा आहेच की!!! आम्हाला गॉसिपींग, हेवेदावे, राग, मत्सर हे नसते उद्योग करण्याचाही कंटाळा आहेच की…….

तेव्हा सौ बातों की एक बात अशी की कंटाळ्याला ’टाळा’ असे काही मी म्हणणार नाही…………….. 🙂

कंटाळ्यावरचा सलील कुलकर्णींचा लोकसत्तामधला एक सुंदर लेख इथे आहे.

(यॉ डॉ खरं तर ’कंटाळा’ पुराणातला तू महर्षी व्यास पण तरिही तुझ्या टेरीटरीत केलेल्या घुसखोरीचा राग करायचा तुला कंटाळा येवो ही ईच्छा!!!!!!!!!!!!!! 🙂 )

हॅपी बर्थडे………….

आज माझ्या ब्लॉगाचा हॅपी बर्थडे आहे…… ५ मार्च २००९ ला सुरू केलेल्या या माझ्या घराला एक वर्ष पुर्ण होतय आज….. खरं तर माझा आरंभशुर स्वभाव पहाता हा ब्लॉग गेले एक वर्ष टिकाव धरून आहे याचेच मला कधी कधी आश्चर्य़ वाटते. पण एक खरेय की अधून मधून मला येणारे कंटाळ्याचे लहानमोठे झटके वगळता ब्लॉगाची तब्येत ठीकच किंवा उत्तमच आहे म्हणावी लागेल.

मी मागच्या २/३ पोस्ट्स मधे म्हटलेच आहे की या जागेने मला खूप समृद्ध केलेय…….. एकटेपणा कसा असतो हेच आता माहित नाही. अगदीच क्वचित प्रसंगी मन सैरभैर असले की माझ्या ब्लॉगर मित्र मैत्रीणींचे ब्लॉग्स वाचते….. म्हणतात ना कंटाळा जसा संसर्गजन्य असतो तसाच उत्साहही…….. आता तर अनिकेत, दीपकने कष्टाने ’मराठी मंडळी’ ची स्थापना केलेली आहे. मनात असा विचार येतो की हे दोघे जर सगळे व्याप सांभाळून ईतके काही करू शकतात तर आपण का नाही????? मराठीब्लॉगविश्व, नेटभेट , माझ्या ब्लॉगाच्या कोंबड्याला स्वत:च्या ब्लॉगावर मोकळ्या मनाने स्थान देणारे माझे मित्र मैत्रीणी,सगळ्याचा विचार करताना असे वाटते की खरच या मार्गावर निघताना मी एकटी असले तरी आज मात्र काफिला बनलाय आणि या गोष्टीचा खरचं खूप आनंद होतोय!!!!

माझ्या या ब्लॉगला मी जियो हजारो साल वगैरे तर नाही म्हणणार पण आम्हा दोघांची ही मैत्री टिकेल असे चित्र दिसतेय……..

महेंद्रजींनी आणि भाग्यश्रीताईने त्यांच्या ब्लॉगांच्या वाढदिवसाला सुंदर पोस्ट टाकल्या आहेत. संपूर्ण ब्लॉगर्स जगातल्या प्रत्येकाच्याच मनात यादिवशी असणाऱ्या भावनांचे प्रातिनिधीक उदाहरण म्हणजे त्या दोघांच्या पोस्ट्स…. तेव्हा मी खरं तर अजुन काही लिहीत नाही…… आज इथेच थांबते…..

आपण सगळ्यांनी धरलेला हा सुपंथ असाच उत्तरोत्तर प्रगती करो असे मात्र मनापासून वाटतेय…………..

माझ्या या घरात येणाऱ्या आणि या ब्लॉगवर प्रेम करणाऱ्या, आणि हो न विसरता प्रतिक्रीया देणाऱ्या  सगळ्यांचेच मनापासून आभार!!!!!!!

(केकचा फोटो अर्थातच जालावरून 🙂 , आणि मला तो तिथून घ्यावा लागल्याचा सर्वस्वी दोष भाग्यश्रीताईवर, कारण केकाची रेशीपी तिने अजुन दिलेली नाही!!! )