घासफूस…..

 माझ्यासारख्या शुद्ध शाकाहारी 🙂 (अभिमानाने.. ) असणाऱ्या माणसाच्या खादाडीचे आणि काय वेगळे नाव असणार …. खरे तर या नावामागे मोठा ईतिहासही आहे…कळेलच…पोस्ट संपत असताना ’घासफूस’ हेच नाव का तेही कळेल 🙂

साधारण ८ दिवसापुर्वी रोहणाला सांगितले होते की खादाडी पोस्ट ’सहजच’ पर आ रही है!!! पण जातीचा खादाड व्यक्ती किंवा खादाड जातीचा व्यक्ती खादाडीवरचा विचारही थोडक्यात कसा करेल…….  तेव्हा या पोस्टचा (जी की एका भागात आवरायची नाही माझ्याच्याने… हो मी आहे बऱ्यापैकी खादाड…. 😀 ) विचारच करतेय गेले काही दिवस !!!!

मला आणि माझ्या मामाला आमची आजी नेहेमी रागावते…… ’अन्न समोर दिसले की लागली यांना भूक!!! ’ ही तिची आमच्याबाबत कायम तक्रार!!! स्वयंपाकघरात चक्कर मारली की समोर दिसतात तिने करून ठेवलेल्या लोणच्याच्या बरण्या….. लालबुंद रंग आणि त्यावर तेलाचा मस्त तवंग…. भूक न लागते तर जाते कुठे , मग आम्ही दोघे ईमाने ईतबारे दोन ताटं घेतो आणि फन्ना उडवतो!!! यात आमचा काहिही दोष नाही (आमच्यामते!!!)….. एक मात्र खरे की उगाचच म्हणजे भूक अगदी लागलेली नसतानाही केवळ मोहापायी आम्ही खाऊ शकतो 🙂

माझे लग्न होण्यापुर्वी आजीने मला दहावेळा बजावले होते, आता सासरी जायचेय तेव्हा एका बैठकीत जेवायची सवय लावून घे!! उगा आपले दर दोन तासाने हातात ताट….. दरवेळेस चिमणीसारखे  उष्टावायचे की लगेच पुन्हा ’मला भूक लागली’ म्हणायचे 🙂 ई. ई. ….. आता हेच सगळे माझा नवरा मला म्हणत असतो!!!

लहानपणापासूनची खादाडी आठवायची म्हटली तर आईच्या हातचे अनेक पदार्थ हीच सुरूवात होते!!

पण या पदार्थांबरोबर मला आठवते ते ’पिंटी’चे घर…. आमच्या कॉलनीतल्या सगळ्या बंगल्यांसमोर असणारे हे लहानसे कौलारू घर!! त्यातली धाकटी लता (तिचे खरे नाव मला आमच्या दहावीत समजले 🙂 ) माझी मैत्रीण!!! तिच्या घरी किती वेळा जेवले असेन मी हिशोब नाहीये… काकू कायम त्यांच्या तिनही मुलांच्या ताटाशेजारी माझे ताट घ्यायच्या….. जेवण व्हायचे पण आमचा खरा ईंटरेष्ट होता घराबाहेर….. त्यांच्या घराच्या अंगणात असलेल्या चिंचेच्या झाडाचा कोवळा पाला खाणे ही खरी पोटभरी होती…… तो पालाही हिरवा नव्हे पोपटी रंगाचा , आहाहा!!! बरं हायजिन वगैरे विचार मनालाही शिवायचे नाहीत…. पाला धुवून खाणे म्हणजे त्याची चव घालवणे सरळसरळ….त्यामुळे तो तसाच कोंबला जायचा!!! वर जमिनीत रोवलेल्या ’रांजणातले’ थंडगार पाणी….. मला पिंटीचे बाबा ’बकरी’ म्हणायचे 🙂 … मला मात्र ते ऐकू यायचे नाही कारण मी तो आंबटगोड पाला खाण्यात मग्न!!!! 

अर्थात बकरी हे माझे नाव माझ्या बाबांनीही ठेवलेले होते ,(सतत बडबड म्हणजे बॅ बॅ करणे हे त्याचे कारण असावे )…. पण त्यांच्याबरोबर भाजीबाजारात जाण्याचा माझा मात्र कायम हट्ट असायचा!!! सगळीकडे वेगवेगळ्या रंगांच्या भाज्यांच्या पाट्या घेऊन बसलेले शेतकरी आणि बाजारातला तो कोलाहल…सगळ्या भाज्यांचा, फळांचा संमिश्र वास….. भाजीबाजार हे प्रकरण मला सोनाराच्या दुकानापेक्षा किंवा साड्यांच्या दुकानापेक्षा जास्त आवडते!!! सगळा कसा जिवंत मामला असतो इथे!!!

चिंचेचा पाला जसा खायला आवडायचा (आता आवडतो की नाही हा खरचं एक प्रश्न आहे….. किती लहानसहान गोष्टी मागे रहातात नाही मोठे होताना….अचानक एक दिवस मागे वळून पहावे तर वळणावळणावर किती जागा सापडतील जिथे आपण आयुष्याच्या विविध टप्प्यांवर आनंदाने क्षणभर रेगांळलेलो असतो……) तसेच आणि एक आवडता प्रकार म्हणजे ’गुलमोहोराचे फुल’…….

हे देखील चवीला आंबटगोड…..लाल केशरी पाकळ्यातल्या ज्या पाकळीवर पांढरे नक्षीकाम तो राजा बाकिच्या राणी पाकळ्या…… हे एक माझे अत्यंत आवडते झाडं!!! विलक्षण सौदर्य आहे या झाडात….. हिरवेगार झाड त्यावर तलवारीसारख्या शेंगा आणि कहर म्हणजे लालभडक केशरी फुलांचे मुकुट….. अजुन काय हवे!!! असेच आणि एक आवडते झाडं म्हणजे पळसाचे ….. तेदेखील म्हणजे एकदम दिल के करीब बिरीब…. हं पण त्याचे काही पानं फुलं कधी मी खाल्लेले नाही बरं…नाहितर म्हणाल या बकरीने ते ही चाखलेय का!! नाय बा!!!

आजच्या पोस्टमधे मी किचनमधे शिरणारच नाहीये…. ती लामण नंतर लावते…. आज मुक्तपणे भटकायचेय मला माझ्या बालपणात…. त्याच नाना उचापती पुन्हा आठवायच्या आहेत नव्याने!!!!! तेच क्षण पुन्हा जगायचेच स्वत:साठी….. (तेव्हा तुम्ही न घाबरता हे चऱ्हाट वाचायला हरकत नाही 🙂 )……

शाळेच्या मधल्या सुट्टीत मला रोज २० पैसे मिळायचे , नंतर ते ५० पैसे झाले…पण पुरायचा तो खिसामनी!!!  डबा कसाबसा कोंबला की आम्ही धूम पळायचो ते चिंचोके विकणाऱ्या मावश्यांकडे !!!! भाजलेले चिंचोके, आणि उकडलेले चिंचोके …… आई गं !!! आठवणी तरी किती आहेत या!! मधल्या सुट्टीतल्या चिंचोक्यांचा स्टॉक  उरलेल्या तासांना संपायचा…काय कला होती ती…. सरांचे लक्ष आपल्याकडे आहे समजले की अजिबात तोंड हलवायचे नाही आणि पाठ वळली की खाऊ गट्टम!!! शाळा सुटल्यावर घरी जाताना पुन्हा चिंचोके घ्यायचे स्पेशल आईसाठी!!!!  चिंचोके विकणाऱ्या मावशी हे प्रस्थ होते….. नववारी पातळातले भारदस्त व्यक्तीमत्व छप्पर असलेल्या हातगाडीवर मांडी घालून बसलेले असायचे…. (आताही असेल… आता त्या मावशीची सुन किंवा लेक असेल..पहायला हवे एकदा!!!)……

 चिंचेचे झाड हे बहूगूणी आहे हे माझे मत आहे….. मस्तपैकी गाभूळलेल्या चिंचा, दोन्ही प्रकारच्या म्हणजे पोपटी गर असलेल्या किंवा लाल गर असलेल्या !!!!चिंचेबरोबर तिखट आणि मिठाचे मिश्रण या मावश्या द्यायच्या ते प्रमाण सुगरणींनाही साधत नाही… खारट तरी होईल नाहितर तिखट तरी!!!  😉 तेच सत्य आवळ्याबाबत… पण आवळे कोणते तर ते पण झाडावरचे… ताजे ताजे!!!!!

याच खादाडी सत्रात (म्हणजे डायरेक्ट फ़्रॉम झाडं, विदाऊट प्रोसेसिंग…… तोडो…खाओ…..) पुढचा प्रकार म्हणजे फुलं खाणे….

यात फुलांचा राजा गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्या…. ’गुलकंद’ वगैरे होईपर्यंत इथे धीर कोणाला!!!!!! आणि एक म्हणजे झेंडूचे फुलं…. याच्या सगळ्या पाकळ्या उपटून त्या झाडात टाकायच्या (तेव्हढचं झाडाला खतं…आणि आपल्याला पुण्य!!!) आणि मग त्यातलं खोबरं खायचं!!!!!

परिक्षेला जाताना तुळशीचं पानं खायचं… परिक्षाच का आणि मी एरवीही बरेचदा तुळशीला शरण जायचे!!!!!! ’गुढीपाडव्या’ला कडूनिंब आणि गुळाचा जो छोटासा लाडु मिळायचा तो देखील मी आवडीने खायचे!!!!!! भाज्यांमधेही पालेभाज्या म्हणजे फ्येव्हऱ्येट……त्याबरोबरच नुसता परतलेला मुळ्याचा पाला, फ्लॉवरचा पाला हे पण चालते!!!!!!! 🙂 ही डाएट पोस्ट होत चाललीये हळूहळू…….

याच उचापतींमधे एकदा मी आणि माझ्या मामेभावाने कण्हेरीच्या पानामधे

खायचे गंध मिसळून तो ’विडा’ खाल्ला होता, दादाने तर खाण्याचे नाटक केले पण आम्ही तो गिळंकृत केला….. आणि मग जे आजारपण काढले ते ८ दिवस दवाखान्यात राहून संपवले!!!!  😦

त्याच्या भरपायीसाठी आम्ही खुपशे बदाम फोडून त्यातला गर खाल्ला आणि शेजाऱ्यांच्या झाडाचे काजुगर (चोरून) खाल्ले…….

थोडक्यात काय (मोठ्ठी पोस्ट लिहायची आणि शेवटी ’थोडक्यात” असे लिहायचे…हेहे) तर माझे लहानपणचे खेळ हे झाडावर चढणे, गवतात फिरत फुलपाखरं पकडणे हे असल्यामुळे ’घासफुस’ या प्रकाराशी सख्य असायचेच!!!!

तसेही रोपटी असो, गवत असो की मोठे वृक्ष असो…. झाडाझाडाच्या बुंध्यात, पानांच्या आकारात, विविध रंगात, फुलांत (आणि चवीत) ईतके वैविध्य असते की नतमस्तक व्हावे!!!! मी तासनतास झाडांचे सौंदर्य पहात बसू शकते….. निसर्गाची ही मनसोक्त उधळण मानवनिर्मीत ईतर कोणत्याही मनोरंजनाच्या साधनापेक्षा जास्त मनमोहक आणि खिळवून ठेवणारी……..

पानं, फुलं, फळं, बिया सगळ्या प्रकाराचे खाद्य आहे :D……….आजची पोस्ट ही पालापाचोळ्याची उद्या फळांवर हल्ला!!!!!  🙂

(फोटो जालावरून साभार!!!!)

Advertisements

59 thoughts on “घासफूस…..

 1. तन्वी… उर्फ़ मुजुमदार साहेबा… 🙂 चिंचेचा पाला नाही मात्र चिंचा जाम हाणल्या आहेत. गावची आठवण आली एकदम.. 🙂 आत्ता जास्त मी काजुगरावर पोस्ट टाकली बघ… 🙂

  • रोहणा अरे चिंचेचे सांगितलेस पण बाकि ’बकरी’ खादाडी केली आहेस की नाही….. एक से एक आहे रे…. आणि चिंचेचा पाला पण आंबटगोड असतो…… 🙂
   अरे तुला म्हटले ही पोस्ट टाकतेय आणि अक्षरश: बालपण जगतेय पुन्हा गेले आठ दिवस 🙂 ….. सगळ्या आठवणी पुन्हा एकदा जगतेय!!
   (नवऱ्याला पिडलेय….कारण त्याला ऐकावे लागतेय!!!! हेहे)

  • उद्याच्या पोस्टमधे ’द्राक्षाचा मळा’ टाकणार आहे…

   खरयं गं पुन्हा सगळे आवडेल की नाही शंका आहे…पण त्या सगळ्यांची चव मात्र अजुनही जिभेवर आहे 🙂

 2. post ekdam zakasach..

  Shetatoon kachchya tandulache daane daboon tyaatale god doodh..

  Ani majha khaas invention, bhatachya kovlya ropanche rasaal khod..usa sarkhe..I mean sugarcane sarkhe god.

  I hope tumhi sangitalela badam ha deshi badam asava..

  Chinchecha popati pala ha chabar chabar bakrisarkha khayala majja yaychi ho..

  Mast post agadi..

  • नचिकेत आभार रे!!!

   तांदुळाचे कोवळे दाणे आणि एकूणच हुरडा प्रकार असाच अतिशय आवडता रे!!! कधी कधी वाटते की आपल्या मुलांपर्यंत हे सगळे पोहोचायला हवेय नाही का….. महागड्या चॉकलेट्स मधे रमणारी ही पिढी गोळ्यांची चव समजू शकेल का, की आपण प्रयत्न करून पाहिला तर जमेल ते ही…
   असो भरकटतेय बघ मी…

   भाताचे खोड…. बघायला हवे रे!! आणि ज्या बदामाच्या झाडाचा मी उल्लेख केलाय ना ते देशीच रे…. मनमाड आणि ईगतपुरी सारख्या साध्या गावात गेलेय बरेचसे बालपण तिथे हीच झाडं होती….ते बदाम तोडून दगडाचे ठेचून आतला कोवळा बदाम खायचा….. 🙂

 3. ह्म्म… चिंचेचा पाला, झेंडुची फुलं आणि तुळशी लहानपणी खुप खाल्लीये…
  आताही तुळशी दिसली की त्याची पानं टाकतो लगेच तोंडात…

  मस्त आठवणी जागविल्यात लहानपणीच्या तन्वी!

  • आनंद आभार…. ’सहजच’ टाकली ही पोस्ट आणि बघा सगळ्यांचेच बालपण सारखेच गेलेय हे समजले 🙂

 4. तन्वी, तू पण बकरी का? 🙂 एकदम भुसावळच्या रेल्वे कॉलनीत घेऊन गेलीस मला.

  चिंचेचा पाला, गुलमोहोर आणि झेंडूची फुलं, तुळस एकदम सेम टू सेम.

  अजून खल्ली नसशील, तर ट्राय करून बघ – फुलातला मध, जांभळाची पानं, उंबराची फळं आणि पेरूची पानं (मध्ये थोडी साखर घालायची … एकदम पेरू खल्ल्यासारखी लागतात)

  खेरीज कडुनिंबाच्या लिंबोण्या खाणं हे एक कौशल्याचं काम असायचं. लिंबोणीचा गर एकदम गोड असतो, आणि बी अतिशय कडू. त्यामुळे कडू चव येणार नाही एवढाच गर चोखायचा 🙂

  • 🙂 🙂 …. आपण सगळ्या बकऱ्या…..हेहे…. अगं गावोगावी रेल्वेच्या कॉलन्या, अशी म्हण हवी आता!!!

   मेंदीच्या पांढऱ्या फुलातला मध चाखलाय बघ!! बाकी अगं आज पोस्ट लिहितानाही जांभळाच्या, पेरुच्या पानांचा वास येतो बघ लगेच नाकात :)…. कडूनिंबाच्या लिंबोण्या नाही ग खाल्ल्या मी :(…. पण त्या झाडाखाली त्या ’टोप्या’ मिळायच्या आठवताहेत का…त्या जाम जमा करायचो आम्ही!!!

  • सपना आभार आणि स्वागत!!!!

   नेले की नाही बालपणात :)… गम्मत बघ मी माझ्या बालपणात एक चक्कर मारली आणि आता जाणवतेय तुम्ही सगळे आसपासच होता!!!

 5. अरे वा! मस्तच. गुलमोहराचे पान , आम्ही त्याला कोंबडा म्हणायचो, चिंचेचा कोवळा पाला, चिंचोके,झेंडुचे खोबरे, गुलाबाची पाने, तुळशीची पाने सगळे भरपूर प्रमाणात खाल्ले आहे लहानपणी.आणि उन्हाळ्यात डोळ्यांना सुखावणारा गुलमोहर आम्हालाहि आवडतो बरं का. चिंचोके वर्गात खायलाच जास्त मजा यायची.आमच्या वर्गात खेड्यातल्या मुली पेन्सिलच्या बदल्यात वगैरे गाभूळलेल्या चिंचा,आवळे आम्हाला द्यायच्या.खरेच तन्वीताई , तुम्ही तुमचे नाहि तर मला वाटते सगळ्यांचे बालपण पोस्टमधे उतरवले आहे. (मला उगीचच वाटायचे हे सगळे फक्त आपणच हादडले आहे आणि हे काहि खाण्याचे पदार्थ नव्हेत.)

  • शैलजा मनापासून आभार!!! खरयं की नाही चिंचोके खाताना कुडुम कुडुम आवाज करायचा नाही,तोंड स्थिर ठेवायचे :)… वर्गातच खरी मजा !!!

   हेहे.. मलापण उगीचच वाटायचे हे सगळे फक्त आपणच हादडले आहे आणि हे काहि खाण्याचे पदार्थ नव्हेत. आणि हसतील लोक या पोस्टला 😀 …आता कळतेय नही ये तो खरा खजाना है!!!

  • सोनाली आभार गं!!!! आत्ता घासफुस झालीये आता फळं, भाज्या यांच्यावर हल्लाबोल…. एकदा का ते झाले की मोहीम स्वयंपाकघर 🙂

  • हेहे…. आहे की नाही मी नमुना… तरी मला वाटलेच बरं की बटाट्याला कुठले खोड !!!! 🙂

   कोकणात आम्हीही होतो दोन वर्षे रोह्याला…. आताही मामाचे तांदूळाचे शेत आहे ईगतपुरीला त्यामुळे ये प्रकार हम ट्राय कर सकते है!! नक्कीच पहायला हवेय हे….

 6. aho Tanvi, tumchyakade te purple colour che agadi chhote fal hote ka je zudupavar lagayache? Shai che fal mhanayacho amhi tyala. Dabale ki shai baher alyasarkhe disayache. Tond shai pyaylyasarkhe nile jambhale vhayche..

  Jambhul navhe..

  • आम्ही एक आंबटगोड आमुन्याकामुन्या 🙂 नावाचा प्रकार खायचो रे जे झुडुपावर लागायचे!! त्या झाडाला केशरी पिवळी लहानशी फुलं यायची!! ….हे शाईचे फळं म्हणजे तेच का ते पहायला हवेय!!!

   आणि बाबा रे मला ’अहो’ का रे म्हणतोस उगाच खूप मोठे झाल्यासारखे वाटते!!! 🙂

 7. मी पण घास फूस वाला बर का??? पोस्ट वाचताना बालपण आठवल. . .चिंचेचा पाला, गुलमोहराची फूल,अबोलीची फूल, गुलाबाच्या पाकळ्या हे असच चरायचो आम्ही पण. कोवळ्या हरभराचा पाला खाल्ला आहेस का कधी मस्त लागतो…त्याची भाजी पण मस्त बनते!!!

  • कोवळ्या हरभऱ्याचा पाला नाही रे खाल्ला कधी…हो पण त्याचा मऊसुत मखमलीसारखा स्पर्ष मात्र अगदी आठवला बघ…. आणि हरभरे तर किती खाल्ले सुमार नाही!!!

   बाकी हरभऱ्याशी अजुनही संबंध आहेच बघ… तुम्ही सगळी ब्लॉगर मित्र-मंडळी असे लेखांचे कौतूक करता मग माझी स्वारी चढते पटकन झाडावर… 🙂
   गमतीचा भाग निराळा पण हो रे सगळ्यांचेच बालपण सारखेच गेलेय बघ!!!

 8. भाजीबाजारातला त्या हिरवागार जिवंतपणासमोर चकाकते ते पिवळे तुकडे म्हणजे… 😦 सगळ्या बक~या एकदा जमूच या गं. गुलमोहोराचा राजा खायचा आणि मग त्यातल्या केसरांनी मस्त हाणामारी करायची. झाडावर चढून आकडीने जांभळाचे घोस खेचायचे आणि खाली उभे असलेली भावंडे संतरंजी पकडून ती झेलायचे… किडे नसलेले उंबर खाल्ले आहेस? मस्त लागते… फक्त मनात तरीही येत राहतेच की किती किडे खाल्ले असतील….हा हा… सहीच गं तन्वी, घासफूस झिंदाबाद…. चिंचेचे बुटुक खाऊन बरेच दिवस झालेत…आठवणीनेही कसेकसेच झाले बघ… गुंजाचा पालाही आम्ही जाम खायचो. लालभडक गुंजा जमवायच्या अन पाला ओरबाडून गट्टम करायचा. एकदम फ्रेश झाले गं… येऊ दे पुढची लगेच…

  • अगदी बरोबर गं ताई….. भाजीबाजारातल्या जिवंतपणासमोर नकली रंग काय कामाचे!!!

   जमुया ग एकदा नक्की सगळ्य़ाजणी!!!! उंबर नाही ग मी खाल्लेले…..गुंजाचा पाला म्हणजे तोच ना ताई जो विड्यात किंवा सुपारीत घालतात??

 9. ओह्ह्ह्ह मस्तच.
  झेंडूचे खोबरं, चिंचेचा पाला, तुळस आणि याच बरोबर आठवलं ते म्हणजे चन्यामन्या बोरं, बारीक आवळे आणि तुती, खास चोरून खाल्लेल्या तिखट मीठ लावलेल्या कैऱ्या बस्स ……
  लहान पण देगा देवा…………..

 10. ……खाणार त्याला देव देणार 🙂
  गुलमोहर च्या शेंगांच्या तलवारी बनवून गनिमी कावा करायचो आम्ही 🙂 …..गुलमोहर फार आवडायचे त्या फुलांच्या आतल्या केशरांनी मारा-मारी…पावसाळ्यात फुलपाखरू आणि भुंगे पकडत फिरायचो. तुला लीम्बोन्या महित आहेत..त्या सुकल्या कि थोड्या कडक होतात मग खराट्याच्या काडीत अडकवून गुलेर मारल्यासारखे मारायचे…सोलिड फटका लागायचा 🙂 ..मस्तच होते ते दिवस..आपल्या मुलांना ह्या गमती नाही करता येत 😦

  • शेखर आभार रे!!!! 🙂

   खरयं तुझं आपल्या मुलांना नाही या गमती करता येत….. तुला माहितीये आम्ही लहानपणी एका गवताच्या फुलाला रावणाचे डोके म्हणून टिचकीने उडवायचो!!! ते गवत सरळ उपटायचे 😦 आणि त्याच्या पिवळसर फुलाला टिचकीने नेम धरून मस्त ओरडायचे, “रावणा रावणा सीतेला सोड नाहितर तुझे मुंडके उडवीन :)”… आणि टिचकी मारायची, ईशानला अतिशय आवडतो तो प्रकार!! दरवेळेस नासिकला गेले की आम्ही दोघे पुन्हा गवत तुडवतो!!!

 11. “पोस्ट संपत असताना ’घासफूस’ हेच नाव का तेही कळेल” असं तू जे सुरुवातीला म्हणालीस ना ते कळलं आणि अगदी पटलंही. एक अंदरकी बात सांगतो. अगदी शुशा असूनही मला हे कच्ची फळं, पानं असे प्रकार खरं तर आवडत नाहीत. लहानपणीही आवडायचे नाहीत. पण माझी बहिण, सगळे मित्र, भावंडं यांना सगळ्यांना या सगळ्याचं खूप प्रेम. सुट्टीत तर यांची अशी कच्ची खादाडी चालू असायची तेव्हा मी प्रेक्षक असायचो.. पण आता तुझी पोस्ट आणि सगळ्यांच्याच कमेंट्स वाचल्यावर मला कम्प्लीट ‘ऑड मॅन आउट’ वाटतंय.. मी आठवायचा प्रयत्न करत होतो की आपल्याला (म्हणजे मला) तू लिहिलेल्यातली निदान एखादी गोष्ट तरी आवडते का.. बट नो.. कम्प्लीट इल्ले 😦 .. पण एवढी आंबटगोड आणि चविष्ट पोस्ट वाचून ट्राय करून बघायची अनिवार इच्छा होतेय. 🙂 मजा करा तुम्ही लोकं !! आणि भाग -२ लवकर लवकर येउदे..

  • हेरंब ठॅंकु….

   अरे किती मोठ्या सुखाला वंचित राहिलास रे…. 😦 शुशा आहेस हे ऐकुन बरे वाटले…( तो शब्द लगेच समजला नाही हा भाग बेगळा, पुर्ण १५ सेकंद विचार केल्यावर कळले ते!!! 🙂 )

   अरे माझ्या डोंबिवलीच्या( मुद्दाम गाव लिहीलेय हे तुला समजले असेलच 🙂 ) मामाचा मुलगाही असाच होता त्याला पण आमची ही खादाडी आवडायची नाही!!!!

 12. असे होते बघ…गेलो होतो बालपणात 🙂
  पोस्ट बद्दल लिहायचे तर Tempting…सुपर्ब…बाकी खाणे थोडे कमी करा आणि पोस्ट वाढवा

 13. तन्वी…….खादाडी मधे तेरी अपुनके साथ एकदम जमेंगी……..फक्त घासफूसइतकंच मी चिकन पण अती प्रेमाने, जिव्हाळ्याने खाते 🙂
  लहानपणीच्या खूप आंबट, गोड, चविष्ट आठवणी जाग्या केल्यास 🙂

  • जयश्री मस्त वाटतेय बघ …आपण सगळ्याच बकऱ्या 🙂

   खादाडी में खरचं जमेंगी!!! आणि चिकन हा प्रांत मला अगदीच अपरिचित… 🙂

 14. अग्ग,बक~यांनो..मला नका विसरु वो…म्या बी हाय तुमच्यातलीच….तुमच आमचं डिट्टो सेम टु सेम हाय व्ह !!
  तन्वी बाय..लय बेश झाली बघा पोष्ट………..भारीच येकदम………

 15. तन्वी,
  पुन्हा एकदा तू मला लहानाहून लहान बनविलेस ! तुझी पोस्ट वाचित असतांना मला माझे बाळपण वेगळे नव्हते असे सतत जाणवत होते. पिढींच्या फरकानेही त्यात तीळमात्र ही फरक झाला नाही.

  मी यशवंत व्यायाम शाळेत जायचो ( आता फारच छोटे झाले आहे ते, सगळ्या बाजूने त्या ग्राऊंड्चे लचके तोडले गेले आहेत) त्याच्या त्या विस्तीर्ण जागेत शोभेल असे होते तेथे एक भले मोठे चिंचेचे झाड ! आमचे चिंचेचे सारे चोचले हेच झाड पुरवायचे , अगदि पाल्या बरोबर छोट्या नखुल्या एव्हढ्या चिंचे पासून ते लाल गाभुळलेल्या फक्कड आकड्यांपर्यंत !… तेही बरोबरीने शिव्या खात खात !
  (परवा माझ्या बायकोने समोरील झाडाच्या पडलेल्या चिंचा आणल्यात उन्हात वाळवून मीठ लावून गोळा करून ठेवायला ! पुर्वी असे गोळे गच्चीवर वाळत पडलेले.. खिश्यातून भरभरून आणून संपवायचो ! आता एक बुटुक खाववेना… दात आंबतात लगेच ! )

  बाकीची तू लिहीलेली यच्ययावत सर्व पाने मीही चविष्ठपणाने खाल्लेली आहेत त्याच बरोबर ओव्याची पाने, दुर्वा आदी पानांचाही समाचार घेतला जाई.

  माझे वडील घरगुती आयुर्वेदिक पध्दतीने गुलकंद करून विकायचे. बोहोरीपट्टी आणि मेनरोड च्या कोपऱ्यावर फुलाचे दुकान होते, तो फुलवाला आमच्याकडे रोज ’रोझ ’ चा शेकड्याने रतीब घालायचा…कधी तीनशे , कधी पाचशे कधी हजार व मग सगळे मधल्या घरात बसायचो निवडायला ! एव्हढासा हिरवा भाग पाकळ्यात राहीलेला वडिलांना खपत नसे ! काही पाकळ्या एकी कडे गट्टम व्हायच्याच !

  खादाड्पणा बद्दल काय सांगू ? स्वयंपाक घराचे बाहेर एका पडवीत एक ओटा होता, काहीही संपवायचे असेल तर तेथे ठेवले जाई ! काही तासाच्या अंतरातच ते फस्त होई व मग बाकीची फडताळे शोधली जात, त्यात कुठे कुठे लपवून ठेवलेलेही मिळून फस्त होत असे ! मला ताटली घेऊन दिवसातून पाचवेळा ऑफिशियली खायला लागायचेच (आमची भांडीवाली मंजूळा सांगायची ना हिशेब ताटल्यांचा ), अनऑफिशियलीचा हिशेब कशाला ठेवायचा?
  सगळ्यात शेवटी माझ्या आजीचा धान्य फराळ असायचा ! आई विचारायला आली की आजीच्या पुढ्यात पहुडलेला मीच सांगायचो… आज काय धिर्डे लाव… नाहीतर एव्हढेसे थालिपीठ कर !

  एव्हढे सारे करून ही शेजारच्या इंदूने( सौंदाणकराची, परवा तिला भेटालो नाशिकला गेलो होतो तेव्हा, पाणी आले आमच्या दोघांचे डोळ्यात ! नव्वदी पार केली आहे तिने आता ) हांक मारली …. काही तरी नक्कीच चुर्र फुर्र असणार … की स्वारी निघाली अंथरूणातून उडी मारून तिच्या कडे !

  ….. काय काय म्हणून सांगू तन्वी ? तुझ्या मुळे आठवले हे सारे ……. ! ( माझी प्रतिक्रीयाच पोस्ट झालीय जणू ! )

  • काका होऊ दे प्रतिक्रीयेचीच पोस्ट…. यात मला खरच जास्त आनंद आहे!!!

   या बाबत आता आपल्याला सगळ्यांना म्हणावं लागेल,” तुमचं आणि आमचं सेम होतं बालपणं!!!”

   मस्त, तुमची प्रतिक्रीया मला खूप आवडली!!!

  • अगं आहे ते ही लिहीणारच आहे…. आजची पोस्ट फक्त पालापाचोळा 🙂 ….विलायती चिंच आणि बसेरा अंकलच्या झाडाची कैरी आहेच मनात 🙂

 16. धन्य आहे तुमची ही बकरी खादाडी… 🙂
  या मांसाहारी बकरयाने (एमटीवी वाला नाही हं) सुदधा चाखली आहे यातील काही घासअपुस…
  बाकी भूक अगदी लागलेली नसतानाही केवळ मोहापायी आम्ही खाऊ शकतो, लय भारी
  आणि हो अंबाडीची पान चाखलीत का …..
  चला पुढची पोस्ट येउ द्या लवकर…

  • अंबाडीची पानं नाहीत पण भाजी आवडीने खाल्लीये रे!!!! मांसाहारी बकरा 🙂

   टाकते रे पुढची पोस्ट लवकरच….. 🙂

 17. Ag khadadi agdi balpanat gheun gelis bagh.to chinchecha popati pala,gulmoharachi fule [aamhi thyala kombda-kombdi mahnaucho],lal lal choti bore,umbarache fal,chote aavale,lal tuti dupari saletun aale ki hech kaam aasayche. zhadavar chadhun aambe aahi peru todayche tikhat meet laun khayche.zhadavar konala chadhta yayche nahi mag bolwa rekhala.[tula sangte aai mahnaychi lagan zhalyavar ase kahi karu nkos .nahi tar…] shalet astana kiti tari vela mi aani mazhi maitrin sona chinchuke aani bore khatana pakadli geli aahe mag kaai..kadha uthabsha.kiti kiti aathvani aahet man bhrun yet bagh.mla chatur aani khekda pakadayla far aawdayche pahilya pavsacha upkarm asaycha ha mag konache kiti hotat he baghayche.

  • तुझ्या दोन्ही कमेंट्सला एकत्रच उत्तर देतेय….. पहिली कमेंट वाचून कळले की आपण सेम टू सेम आहोत दोघी!!! 🙂
   चतूर आणि टाचण्या मी पण पकडायचे खूप….खेकडा माझा दादा पकडायचा….. मला भिती वाटायची फार 😦

   आता दुसऱ्या कमेंटबद्दल …
   मस्त मस्त आणि मस्तच :)….. मला वाटतेय छोटा प्रयत्न जमलाय अगदी तर आता तू मोठा करायला हरकत नाही….
   कधी लिहितेस बोल!!!

 18. अग तन्वी, बोर कशी विसरलिस तू …
  आणि कच्चे लिंबू हाताने शिलुन खाल्ले का कधी.
  माझे तर लहानपण नुसते आंबट खाण्यात गेले त्यातही आजीच्या चोरून चिंचा खाण्याची काही वेगळीच मजा होती.
  “रम्य ते बालपण”..
  अर्थात मी अजूनही खूप आंबट खाते…..कोथरूड ला कर्वे रोड वर एक चींचेचे झाड आहे आणि त्याला सध्यातरी भरपूर चिंचा लागलेल्या आहेत.जेव्हा पण त्या रोड ने जाते ना नेहमी हळहळते…

 19. kay mast jamun aalay lekh

  balpanat ramun gelo hoto Mala hi SHUSHA banaychay pan ajun tari jamel asa vatat nahi

  Tumhi sidhdhhast aahat ekhada pustak liha na

  waiting for nest post

 20. hi tanvi,
  atta paryant chya tujhya sagalya post vachat ale pan ya post var comment kelya shiway rahawal nahi
  wow mast, mi sudha lahan pani he sagal khallele ahet, chinchechi pala, gulmoharach phool, zendu ch khobar, gulabachya pakalya wow
  kharach sagalya athavani parat alya mastach ekdum , khup enjoy keli tujhi hi post me, sahichhhhhhhhh ekdum

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s