हे भलते अवघडं असते……

नुकताच सलील कुलकर्णी- संदीप खरेंना भेटायचा योग आला.

खरं तर या दोघांची अप्रत्यक्ष ओळख तशी खूप जुनी…… सलीलला मागे लिहीलेल्या एका मेलमधे मी लिहीले होते की तुमच्या ’दिवस असे की’ ते ’दमलेल्या बाबाच्या कहाणी’ पर्यंतच्या प्रवासातले आम्ही सगळे अदृष्य सहप्रवासी आहोत….. एक अत्यंत सुरेल सुखद प्रवास करायचे तुम्ही ठरवलेत… त्या वाटेवर निघालात आणि त्याच वाटेवर नकळत आम्हीही चालायला लागलो…… त्याच आनंदयात्रेचे आम्ही वाटसरू झालो!!!!! या मेलला सलीलचे उत्तर आले आणि आमच्या घरात सगळेच भलते खुश झाले…… त्या मेलमुळे सगळ्यात जास्त आनंद झाला होता तो ईशानला…..सलील-संदीपचा तो मोठा भक्त!!! त्याच्या बरोबरच गौरीही ’आताशा मी फक्त लकाने दिवसाचे भलते’ वगैरे काही काही गात असते……. ईशान गौरीला भेटायला मी मस्कतला येतोय असे सलीलने लिहील्यावर एरवीचा ’सलील कुलकर्णी’ आता त्यांचा ’सलील काका’ झाला होता…… खरं तर त्यांचा कार्यक्रम ठरलेला आहे आणि ते त्यासाठी येताहेत असे उगाच काही सांगून आम्ही मुलांच्या आनंदावर विरजण पाडणार नव्हतो आणि सलीलचे मेल पाहून आम्हालाही आनंद झालाच होता!!!!!’अग्गोबाई- ढग्गोबाई’, ’मी पप्पाचा ढापून फोन’ म्हणणारा काका कधी येणार हा प्रश्न आता दिवसाला एकदा येत होता!!!! जशी मुलं वाट पहात होती तशीच आम्ही मोठेही……

   कितीक हळवे कितीक सुंदर

किती शहाणे आपूले अंतर

    त्याच जागी त्या येऊन जाशी

माझ्यासाठी माझ्या नंतर

ऐकले की नकळत आम्हीही एकमेकांकडे बघतोच की!! संदीपच्या शब्दांची हीच खरी जादू आहे की ते अगदी आपले वाटतात…… आपल्याच मनाच्या कुठल्या तरी भावनेला तो न्याय देत असतो…… जे काही अगदी मनातले सांगायचे असते पण नेमके शब्द सुचत नसतात तिथे संदीपला गाठावे…… प्रत्येक प्रश्नाचे त्याने सुंदर शब्दात गुंफून उत्तर दिलेले असते, अगदी समर्पक, विलक्षण सौंदर्य असलेल्या उपमा तो ज्या सहजतेने देतो की ऐकत रहावे!!!!  गाण्याच्या जश्या जागा असतात, लय असते, तान असते तशीच त्याच्या काव्यातही अश्या काही सुंदर नक्षीकाम केलेल्या जागा असतात की अरसिक माणसानेही ’व्वाह!!!!’ म्हणावे!!!! आपल्याला आपलीच ओळख नव्याने पटत जाते…. सोप्या शब्दात तो ’आयूष्यावर काही बोलत’ जातो आणि एरवी अवघड वाटणारे प्रश्न आपल्याला सुटत जातात 🙂

प्रश्न मला जो पडला नाही

त्याचेही तुज सुचते उत्तर…..

या मग केवळ ओळी रहात नाहीत.

’मेघ नसता वीज नसता” असो की ’लव लेटर’ असो संदीप आपल्या मनाचा ठाव घेत असतो……. पावसाचे गाणे तो गातो आणि त्याच्या रसिक मनाचे आपल्याला दर्शन होत जाते. ’आयूष्यावर बोलू काही’ हा कार्यक्रम यापुर्वी पाहिला होता तो टिव्ही वर, पण यावेळेस तो अनुभवायचा होता प्रत्यक्ष.

भर पहाटे मी फुलांनी

दृष्ट काढून टाकली

पाहती स्वप्नी तुला जे

भय तयांचे वाटले…….

ह्या प्रचंड आवडलेल्या ओळी खुद्द संदीप गाताना ऐकायच्या होत्या!!!

कधीतरी आपल्याला अचानक साक्षात्कार होतो की आजकाल आपण फार काही कंस्ट्रक्टिव्ह करत नाहीये, उगाच उदास रिकामे वाटते. आणि सलील- संदीप गातात …

व्याप नको मज कुठलाही अन ताप नको आहे

उत्तर कुठले मुळात मजला प्रश्न नको आहे

या प्रश्नांशी अवघ्या परवा करार मी केला

मी न छळावे त्याना त्यांनी छळू नये मजला……….

आताशा मी फक्त रकाने दिवसाचे भरतो……. किती सोपे, सहज रोजच्या वापरातले शब्द पण केव्हढा अर्थ त्या कवितेत!!!

कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी मंडळाच्या काही कुटुंबांना सलील-संदीपला भेटायला मिळणार होते…… डिनर त्यांच्याबरोबर… कोण सोडतय ही सुवर्णसंधी 🙂 …… मनात मात्र विचार होते आपण बोलू शकू का व्यवस्थित, ते बोलतील का आपल्याशी???? आपल्याला सलीलचे लोकसत्तामधले जे लेख आवडतात त्यांची नावं ऐन वेळेवर विसरायला तर नाही ना होणार 🙂 …… उगाच टेन्शन मला आपले!!!

ठरल्या प्रमाणे ते दोघे आले….. सगळ्यांना भेटल्यानंतर काही वेळातच जाणवलं की हे वातावरण अजिबात औपचारिक नाहीये!!! इथे मनमोकळं बोलता येतेय आपल्याला…… पटकन सलीलला सांगून टाकले की त्याने लिहीलेले लेख मी फक्त वाचतच नाही तर नवऱ्याला वाचूनही दाखवते!!! त्याबद्दलचे मत मी कळवते ह्याची त्याला आठवण आहे हे पाहून पटकन आपली कॉलर ताठ करून घेतली 🙂 . मुलंही खुश होती कारण एकतर सलील-संदीप काकांनी त्यांना जवळ बसवून फोटो काढले होते आणि मनाजोगत्या गप्पा मारल्या होत्या.  ईशानच्या डायरीतली दोघांची सही पहाणे हा तर सध्या त्याचा आवडता छंद झालाय!!! गौरीने सहीसाठी डायरी पुढे केल्यावर मात्र संदीपकाकाने तिला अट घातली की ती जर एक गोड पापा देणार असेल तर तो सही करेल……. एकूणातच एक सुंदर अनुभव आम्हाला मिळाला होता!!!! एक असा अनुभव की जो येणारे अनेक दिवस मन प्रसन्न करत राहील.

आजवर कलाकार म्हणुन हे दोघे आम्हा रसिकांना आवडत होते पण एक माणूस म्हणूनही ते आमच्या मनात जागा करून गेले. त्यांच्या संवेदनशील मनाचे प्रतिबिंब त्यांच्या अनेक गाण्यांतून दिसतेच…. पण त्यातही ’दुर देशी गेला बाबा’ आणि ’दमलेल्या बाबाची कहाणी’ हे तर कळस आहेत!!!!! संदीप चे शब्द आणि सलीलचे संगीत आणि आवाज आणि काय हवे 🙂 !!!!!

जपत किनारा शीड सोडणे -नामंजूर

अन वाऱ्याची वाट पहाणे- नामंजूर

मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची

येइल त्या लाटेवर झुलणे -नामंजूर

किती जणांना प्रेरणा दिली असेल या गाण्याने!!! 🙂  ‘मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो’ असो की ’खरा खुरा नास्तिक’ असो आपल्याला कुठेतरी नक्कीच भेटलेली असतात ही माणसं… फक्त त्यांच्या ईतक्या नेटक्या काव्यमय व्याख्या या जोडगोळीने केल्यात की बस आता कोणी यापुढे यावर काही बोलुच नये!!!  ’नसतेस घरी तू जेव्हा’ ऐकून मला वाटतयं काही घरातले वाद तरी नक्कीच मिटले असते 🙂 (ईन्क्लुडिंग आमचे घर 😉 )

संदीपप्रमाणेच सलीलही पट्टीचा लेखक आहे हे लोकसत्तामधल्या त्याच्या लेखांतून जाणवते. चतुरंग पुरवणीतले ’म्युझिकली युवर्स’ हे सदर अतिशय सुंदर असते. ’अर्पणपत्रिका’ , ’दमलेल्या बाबाची कहाणी’ ,’ कंटाळ्याचा देखील आता कंटाळा येतो’ ते ’नातलग’ आणि ’मी म्हणालो बरं’ असो….. संवेदनशील मनाला माध्यमाचा अडथळा येत नाही हे त्याने सप्रमाण सिद्ध केले आहे…… 🙂 ’सारेगमप’ चा परिक्षक म्हणून जेव्हा तो सामोरा आला तेव्हा स्वयंपाकघरातले एक से एक दाखले देउन त्याने सुगरणींना तोंडात बोटे घालायला लावली होती!!!!!

मस्कतला झालेला कार्यक्रमही असाच मस्त रंगला…. तीन तास केव्हा गेले खरच कळले नाही!!! यातली किती तरी गाणी कित्येकदा ऐकलेली. ’आयूष्यावर बोलू काही’ चे निवेदनही पुर्वी ऐकलेले काहीसे…. पण नाविन्य राखून तो कार्यक्रम अतिशय रंजक करण्यात या दोघांना सहज यश मिळालेले होते!!!! पुढच्या वेळेला येऊ तेव्हा सहा तासाचा कार्यक्रम करू असे सलील-संदीप म्हणाले तेव्हा ही सुरेल मैफल आपल्याला पुन्हा अनुभवायला मिळणार याचा सगळ्यांनाच आनंद झाला होता!!!!!

मराठी साहित्य मुळातच अतिशय श्रीमंत आहे त्यात या दोघांसारखे सातत्याने उत्कृष्ट योगदान करणारे कवी-संगीतकार पाहिले की मराठी पाऊल नक्की पुढे पडतेय याची खात्री पटते!!!

या दोघांची मी मोठी चाहती आहे हे तर एव्हाना तुम्हाला समजले असेल 😉 पण त्यांच्या संपुर्ण काव्यमय प्रवासाला एका लेखात बांधण्याची क्षमता माझ्या प्रतिभेत नाही याची मला पुरेपुर जाणिव आहे……. म्हणून लेखाचे नावच दिलेय ’हे भलते अवघड असते!!!!! ’ 🙂

संदीप-सलील तुम्हा दोघांना अनेक अनेक शुभेच्छा आणि मनापासून सलाम!!!  गेले अनेक वर्ष तुम्ही आम्हाला नव्या नव्या गाण्यांची ओळख करून देत आहात , यापुढेही द्याल….. आम्ही अदृष्य असलो तरी सहप्रवासी आहोत हे निश्चित 🙂

44 thoughts on “हे भलते अवघडं असते……

 1. [आयुष्यावर बोलू काही च्या उत्तरार्धाची सुरुवात अनेकदा या कवितेने होते.]

  एवढंच ना? एकटे जगू.. एवढंच ना?

  आमचं हसं, आमचं रडं, घेऊन समोर एकटेच बघू,
  एवढंच ना?

  रात्रीला कोण? दुपारला कोण? जन्माला अवघ्या या पुरलंय कोण?
  श्वासाला श्वास, क्षणाला क्षण, दिवसाला दिवस जोडत जगू!
  एवढंच ना?

  अंगणाला कुंपण होतंच कधी, घराला अंगण होतच कधी,
  घराचे भास , अंगणाचे भास, कुंपणाचे भासच भोगत जगू,
  एवढंच ना?

  आलात तर आलात, तुमचेच पाय, गेलात तर गेलात कुणाला काय?
  स्वतःचं पाय, स्वतःचं वाट, स्वतःचं सोबत होऊन जगू
  एवढंच ना?

  मातीचं घर, मातीचं दार, मातीच घर, मातीच दार
  मातीचं घर, मातीचं दार, मातीच्या देहाला मातीचे वार
  मातीचं खरी, मातीचं बरी, मातीत माती मिसळत जगू
  एवढंच ना?

  ——- अप्रतिम 🙂

 2. व्वा क्या बात है…सलिल आणि संदिप बद्दल तर काय बोलावे…शब्द न शब्द मनाला भिडणारे….परवा मुंबई ला जाताना train मध्ये एकटी cell वर गाणी ऐकत होते…एका मागोमाग एक गाणी चालु होती..नविन-जुनी हिंदी ….अशातच दमलेल्या बाबांची कहाणी चे सुर कानावर पडले…अक्षरश: डोळे अश्रुंनी भरुन आले…..कधिही ऐका..कंठ दाटुन येतो….जास्त लिहित नाही…:(……खुप लकी आहेस तन्वी तु..प्रत्यक्षात सलिल संदिप ना भेटायला मिळाले…

  • खरयं गं माऊ त्यांचे शब्द न शब्द मनाला भावणारे, भिडणारे असतात …..

   लकीच म्हणावे लागेल गं…कारणं नुसते भेटणेच नाही तर गप्पाही मारता आल्या 🙂

 3. लोकसत्ता मधे लिहिणारा सलिल पण हाच ?? धक्काच दिला आश्चर्याचा. मला माहिती नव्हतं. मला हा सलिल डॉक्टर आहे एवढंच माहिती होतं, लेखक पण?? ग्रेट.
  आणि गौरी- इशान.. मस्त मजा आली असेल नां?

  • होय महेंद्रजी लोकसत्तामधे लिहीणारा ’सलील कुलकर्णी’ हाच!!! 🙂

   (कुलकर्णी ना तो ’ग्रेट’ असायचाच 😉 )

   ईशान-गौरी अजुनही त्यांची आठवण काढताहेत….. खरच पण मस्त अनुभव होता.

 4. तुझ्या तोंडून आधीच सगळे वर्णन व फोटूही पाहून झालेले होतेच… आता पोस्ट वाचून अजूनच सही वाटले गं. वा! सलिल आणि संदीप दोघेही माझे आवडते त्यामुळे अजूनच आवडले. एक नं एक शब्द मनात घर करून जातो हेच खरं.
  व्याप नको मज कुठलाही अन ताप नको आहे
  उत्तर कुठले मुळात मजला प्रश्न नको आहे……. अगदी असेच भाव कधी कधी मनात येत असतात… वर सुहासने दिलेली कविताही माझी अतिशय आवडती आहे. अजून यांचा कार्यक्रम प्रत्यक्ष पाहण्याचा योग आलेला नाही…. लवकरच येवू देत…. बाकी गौरा आणि ईशान खुशीत आहेत नं…:)

 5. सुंदर, अप्रतिम, सहीच.. संदीप, सलीलबरोबर जेवण, फोटो, गप्पाटप्पा.. सॉलिडच.. एके काळी “दिवस असे की” ची सगळी गाणी तोंडपाठ होती मला. अर्थात अजूनही बरीच आहेत लक्षात. सगळी एकसेएकच आहेत. माझं ATF म्हणजे ‘कसे सरतील सये’ !! असंख्य वेळा ऐकलं/म्हटलं आहे ते आत्तापर्यंत…

 6. खूप सुंदर अतिशय तन्मयतेने लिहीलेला! वाचता वाचता मी तर भारावून हरवलो व मस्कतला येऊन पोहोचलो सुध्दा ! तुला झालेला हा मनापासूनचा आनंद तुझ्या प्रत्येक वाक्या वाक्यातून , नव्हे शब्दा शब्दातून ओसंडून वहात होता.
  .
  .
  छोट्यांना तर ही पर्वणीच . त्याचे महत्व त्यांना आत्ता समजणारही नाही.
  .
  .
  चला इतके दिवसाची आलेली मरगळ…कंटाळा…गांजलेपणा सारे काही झटकले गेलेले असेल !! आणि आता ताजी तवानी तन्वी तरी दृष्टीस पडॆल, जिची बरेच दिवस प्रतिक्षा आहे !!

  • होय काका इतके दिवसाची आलेली मरगळ…कंटाळा…गांजलेपणा सारे काही झटकले गेलेले आहे…. मस्त ताजेतवाने वाटतेय… 🙂

   खरयं छोट्यांना महत्व नाही समजत आता पण सलील काका आणि संदीपकाका मात्र आवडलेत त्यांना मनापासून…

 7. सुंदर लेख लिहिला आहे. आणि हो आयुष्यावर फक्त जे बोलु शकतात त्यांना भेटायचे म्हणजे खर्या अर्थाने आयुष्य जगणे होय. त्यामुळे आनंद होणारच!!!

 8. तू (ताई म्हणलं तर चालेल ना? कारण मी येथील बहुतेकींना ताईच म्हणतो, आणि तू तर औरंगाबदचीच!) ऑर्कुटवर चिकटवलेला तुम्हालोकांसोबतचा फोटो पाहूनच मी आश्चर्यचकित झालो होतो… आणि आता ही पोस्ट वाचतांना तर मलाच, मीसुद्धा संदीप-सलील समवेत बसून जोर-जोरात गप्पा ठोकतोय की काय असा भास झाला! असो… या कार्यक्रमाच्या वेळी, “वेड लागले मला वेड लागले” आणि “मेघ नसता, वीज नसता, मोर नाचू लागले” अशीच तुम्हा लोकांची अवस्था झाली असेल! यु आर सो लकी! माझ्या मोबाईल फोनमध्येही आयुष्यावर बोलू काही, दिवस असे की, सांग सख्या रे, नामंजूर आणि इतर गायकांच्या अल्बम्समधील मराठी गाणी मिळून ८० टक्के भाग व्यापलेला आहे! बसमध्ये, लेक्चर ऑफ असतांना, घरी लाइट गेल्यावर हे गाणे ऐकल्याने मन ऊफाळून निघते, व एक वेगळाच भाव कामामध्ये जाणवू लागतो… विलक्षण माधूर्य आहे, संदीप-सलीलच्या मंत्रमुग्ध करून टाकणार्‍या या कवितांमध्ये!!!

  (तसा तुझा फारच हेवा वाटतोय आता, हे सांगायलाचन नको! :P)

  • अरे हे काय विचारणे झाले…’ताईच’ म्हण मला खूप आवडेल…फक्त तेव्हढे भाऊबीज आणि राखीपौर्णिमा विसरू नकोस :)…..
   मला वाटलचं होतं की ही पोस्ट तूला आवडेल म्हणुन स्वत:हून कळवले 🙂 … खरं सांगू का आम्ही असे सेलिब्रीटींना भेटलो वगैरे सांगायला मला मुळीच आवडत नाही….. पण यानिमित्ताने मला माझ्या (किंबहूना आपल्या सगळ्यांच्या लाडक्या) कवी- संगितकाराबद्दल बोलायला हक्काची जागा मिळाली. काही क्षण का होईना माझा ब्लॉगही या मैफीलीत रमलाय 🙂

   (आणि एक महत्त्वाचे आता औरंगाबादला आल्यावर क्रांती चौकातली पावभाजी आणि मग लकीमधे ज्य़ुस प्यायला न्यावे लागेल मला …… 🙂 )

 9. सलिल संदिपची गाणी मस्तच. ’नसतेस घरी..’ ’दिवस असे…’ ही गाणी ATF. सलिलची पर्सनॅलिटी पण किती छान आहे. एकदम डाउन टु अर्थ.
  गौरी आणि ईशान जाम खुश झालेत, फोटो मस्त आलाय.

  • होय गं अगदी डाउन टु अर्थ आहेत ते दोघेही…..

   गौरी आणि ईशान खूपच खुश आहेत आणि आम्हीसुद्धा… 🙂

 10. khup chaan. saglyanchya manatale lihiles. Shabdanwar itak prabhutwa asan hi daiwi denagi aahe. kuthalehi jad shabd n waaprata itakya sahaj pane itaka khol arth maandane sope nahi. mi suddha ya dwayichi khup mothi fan aahe.
  mi khup diwas jhale doghanchehi email ID shodhate aahe. pan net war kuthech milale nahit. Sandip kharencha postal address shodhun mi tyanna majhya kavita pathawalya hotya. abhiprayasathi. pan 3 mahine jhale ajun kahi pratisad aala nahi.
  tujhyakade email ID asel tar mala pathawashil ka?

 11. कसे सरतील सये…..या गाण्यापासून मी ह्या दोघांचा भक्त झालोय…..माझ्या कडे कधीही आलीस अन् पाहील तर हीच गाणी चालू असतात…प्रत्येक वेळी एक नव्याने अनुभूती देऊन जातात ….संदीपच्या शब्दांमधील जादू फक्त अनुभवयाची….त्यांना फक्त मूक भावनेनं व्यक्त करायच…..कितीक हळवे….या गाण्याचे शब्द तर निव्वळ अप्रतिम आहेत….. एक छोटा किस्सा सांगतो तुला…..मागील आठवड्यात मी नेहमी प्रमाणे घरी चाललो होतो….बस मध्ये माझ्या पुढील सीटवर एक कपल अन् त्यांच साधारण २-३ वर्षाच पिल्लू बसले होते….बस सुरू झाल्यावर साधारण १० -१५ मिनिटांनी पिल्लानी जे काही भोकाड पसरल…बाप रे…काही केल्या शांत होई ना….सगळे प्रयत्न करून झाले तरी उपयोग शून्य…शेवटी त्याच्या बाबाच्या लक्षात आल अन् त्याने लागलीच मोबाईल मधील अग्गो बाई गाण सुरू केल….ते गाण सुरू झाल्याबरोबर पिल्लू एकदम शांत….गाण ऐकत तसच झोपी गेल….अशी काही जादू आहे ह्या दोघांच्या गाण्यात. मला त्यावेळी प्रश्न पडला …अरे त्या कोवळ्या जिवाला नक्की काय मिळाल असेल या गाण्यातून….त्याला नक्की अस काय समजल असेल????

  • मनमौजी आभार रे… अगदी खरयं तुझ ही गाणी प्रत्येक वेळी एक नव्याने अनुभूती देऊन जातात ….संदीपच्या शब्दांमधील जादू फक्त अनुभवयाची…….

   लहान मुलांना ताल समजतो ना रे…. आणि कदाचित उत्तम काय ते लहान मुलांना सगळ्यात आधि समजत , ते उगाच कशालाही दाद देत नाहीत. छानच किस्सा आहे. आमच्याही घरी मुलांना ’अगोबाई’ ’डिपाडी डिपांग’ आवडतात 🙂

 12. Lekh nehamiprmanae agadi chan zala aahe. Ishaan aani Gauri doghehi phtot chan chan aani khushahi disat aahet.
  Baki Salil – Sandipchi sagalich gani mastach aahet.
  Kharach sagalyani chan enjoy kele ase disatey.

  “चला इतके दिवसाची आलेली मरगळ…कंटाळा…गांजलेपणा सारे काही झटकले गेलेले असेल !! आणि आता ताजी तवानी तन्वी तरी दृष्टीस पडॆल, जिची बरेच दिवस प्रतिक्षा आहे !!”
  Pethe kakanchya matashi mihi ekadam sahamat.
  Keep writing.

 13. खरच सुंदर अनुभव … माझ्यादृष्टीने तर कलाकार पेक्षा माणूस म्हणून ते समोर कसे येतात याला जास्त महत्त्व… तो अनुभव तूला छान आला हे ऐकून बरे वाटते… दिलीप प्रभावळकर सारख्या माणसाला सहज भेटायचा योग आला तेंव्हा किती साधेपणाने वागले ते. वाटते नाही इतक्या उंचीचा कलाकार आपल्या सोबत बोलतोय. आपलेसे करून घेतात एकदम. सलिल-संदीप तसेच… अशी माणसे मनाला भिडतात… 🙂

  पुढच्या वेळी मराठी ब्लोगर्ससाठी करून टाकुया एक कार्यक्रम… 🙂 काय??? हेहे

  • एकदम बरोबर बोललास बघ रोहणा… प्रत्यक्ष भेटीत ही माणसं एकतर खूप आवडू लागतात नाहीतर अजिबात आवडेनाशी होतात…. तू दिलीप प्रभावळकरांना भेटलायेस…सही!!

   नक्की…कार्यक्रमाची कल्पना मस्तच 🙂

  • अरे वा… छे रे मला अजिबात माहित नाही, कसे माहित असणार? पण सहीये!!! 🙂

 14. अरे वा…मस्तच…
  मी तर संदीपचा खूप मोठा पंख आहे…
  त्यामुळे त्याच्या कविता-गाणी कधीही केव्हाही ऐकत बसतो…कंटाळाच येत नाही
  संदीपच्या कवितांचे कलेक्शन माझ्या या ब्लॉगवर सापडेल…
  http://sandeepkharekavitangaani.blogspot.com/

  • सागर आभार… 🙂

   संदीपची मी देखील मोठी फॅन आहे आणि त्याला भेटल्यावरही ती आवड कमी झालेली नाही हे देखील महत्त्वाचे…

 15. खुपच छान….
  आता संदीप सलिल म्हटल्यावर बोलणार तरी काय???
  शब्दच पुरत नाही…
  पण तुमचा लेख खुपच अप्रतिम आहे न तुम्ही संदीप सलिल ला भेटला आहात म्हटल्यावर काही बोलान्यासारख रहिलच नाही… नशीबवान आहात…
  न असेच सुन्दर लेख लिहित जा…

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s