माहेराच्या गाण्याचे पुढचे कडवे…
रिक्षाने खूप खूप भटकेन मग मी….. कधी शेअर रिक्षा ,कधी फक्त आपल्यासाठी असलेली रिक्षा!!!! शेअर रिक्षा मला आवडते….. मजा असते ती पण एक…. आजुबाजूचे लोक मुलांशी गप्पा मारतात , त्यांच्या गप्पा ऐकतात…. तेव्हा उगाच आपल्या माहेरी मुलांचे कौतूक होतेय असे वाटत असते मला…. पण या रिक्षाचा एक तोटा आहे रिक्षावाला मनमोकळ्या गप्पा मारण्याच्या मुडमधे नसतो इथे….
कधितरी रिक्षा माझ्या कॉलेजवरून जाईल मग…. मग मी लेकाला म्हणेन, “पिल्लू हे मम्माचे कॉलेज बरं!!!!” त्या वास्तूकडे काही ओळखीच्या आणि काही अनोळखी नजरेने बघत राहीन मी!!! रस्त्यारस्त्यावरच्या मंदिरांना मी आणि रिक्षावाल्यासहित बाकीचेही सगळे नमस्कार करत राहू आम्ही….. “दोघे पुढे व्हा दोघे मागे…. जरा ऍडजस्ट करा” या रिक्षावाल्याच्या हुकूमावरून झालेल्या कोंबाकोंबीत मागे बसलेल्या दोघांचा नमस्कार देवाला दिसला असेल का हा पुराणकालीन प्रश्न माझा मलाच पुन्हा पडेल… खूदकन हसेन मीच माझ्याशी!!!! 🙂
मेनरोडला, दहीपूलावर गल्ली- बोळात उगाच भटकत राहीन मी….. फुटाण्याच्या, खारेदाण्याच्या गाड्यांवर थांबून खरेदीही करेन मग….
’नासिक किती बदललय ना !!!’ या विषयावर अनेक चर्चासत्र होतील…. अंगणात ओट्यावर बसून पेपर वाचत असताना आई कॉलनीचा गेल्या वर्षाचा आढावा देत राहील… मग एखाद्या नऊवार काकू पायरीवर येऊन बसतील…. “काय म्हणतेय गं तुझी दुबई???” त्या काळजीने विचारतील….. काकू अहो दुबई नाही मस्कत हे अनेकदा दिलेले स्पष्टीकरण मी यावेळेस देणार नाही पण 🙂 “मस्त मजेत” सांगून मोकळी होईन मग!!!
अंगणात माझी दोन मुलं आणि त्यांच्याबरोबर ’मुलं’ झालेले आई-बाबा एकमेकांशी खेळण्यात मग्न असतील…. मी मात्र कुठलेतरी पुस्तक वाचत पायऱ्यांवर बसून राहीन…. डोळे, चित्त मात्र त्या बाळगोपाळांकडे असेल माझे…… या दोन पिढ्यांमधला दुवा मी आहे या विचाराशी मनाची गाडी थांबेल आणि एका अनामिक आनंदाची मी धनी होईन…. “बुढ्ढा बुढ्ढी जपून… वय झालेय आता …. 🙂 ” मी आई-बाबांना चिडवेन…. त्या कोणाच्या कानावरही माझे बोलणे जाणार नाही….. 😉
“हं!! हं!!” म्हणत मी पेंगत असले तरी आईच्या गप्पा संपायच्या नाहीत….. वर्षभराचा बॅकलॉग तिला भरून काढायचा असेल आणि हीच कथा ही कितव्यांदा सांगतेय याचा हिशोब मी हसत मनात मांडत राहीन….. बाबा केव्हा तरी घोरायला लागतील………… दिवसभर नातवंडांशी धमाल खेळून दमलेले बाबा शांत झोपलेले असतील….. गोष्टी ऐकत ऐकत त्यांच्या दोन्ही बाजूला त्यांची ’गुणी’ नातवंड झोपलेली असतील….. येव्हढा वेळ मला बॅन असलेल्या खोलीत मी चादरी टाकायच्या निमित्ताने उगा डोकावून येईन….. !!!! समोरचे चित्र मला माझ्या मनात साठवायचे असेल…..
मग येईल सासरी जायचा दिवस….. पोहोचे पोहोचे पर्यंत नवऱ्याशी कटकट करणारी मी तिथे पोहोचले की त्याच्यापेक्षा जास्त गप्पा मारत राहीन…. जेवायला बसल्यावर ” आई पुडचटणी नाही केली तुम्ही???? ” मी सासुबाईंना विचारेन…..मोठ्ठा डबा माझ्यासमोर ठेवत त्या म्हणतील, “सासऱ्याची सुन गं ती… पंचपक्वान्न ठेवा समोर तरी पुडचटणी मागतील…. 🙂 “….. मला खरचं त्यांचाकडे लक्ष द्यायला वेळ नसेल…. त्यांच्या हातचे गोड आंबट वरण, भात आणि पुडचटणी… “मुरलीये ती पक्की आता घरात…” हसत मावससासूबाई म्हणतील…. त्यांच्या वाक्यापेक्षाही त्यांचा पाठीवरचा हात हटुच नये वाटत राहील…..तृप्त होत राहीन मी……..
सगळी पुरूष मंडळी झोपलीये असे वाटले की आई माझ्या शेजारी बसतील…. “तूला म्हणुन सांगते..” या पालूपदाने मग खूप काही बोलत रहातील…… कानातले मशिन काढून ठेवलेल्या मावशी खाणाखूणांनी काय बोलाताय तूम्ही म्हणून विचारत रहातील… पण यावेळेस आम्ही मात्र “देवड्यांच्या सुना” असू दोघी…. घरातल्या बाबी अश्या थोडीच सांगू कोणाला…. आम्ही खूणेनेच ’काही नाही’ म्हणु त्यांना!!!! “सगळे देवडे सारखेच गं बाई!!! ” या घोषवाक्याशी येऊन आमची गाडी थांबली की नवरा ओरडेल ,”आवरा.. चहा ठेवा आता दुपारचा 🙂 ” आईच उठतील मग ,”वर्षभर एकटीच तर करतेस तू सगळं!!! ” सारख्या म्हणत रहातील……. चहा पिताना अण्णाही सामिल होतील…. खूप काही बोलत रहातील, सांगत रहातील….. ’माहेराच्या गाण्यात’ कोणे एके काळचे सासरही अलगद सामावले जाईल मग!!! 🙂
एक दिवस बाबा आईला म्हणतील मग….. बॅगा भरा आता तिच्या नाहीतर नंतर घाई होते मग!!!! आपण अगदी तटस्थ असल्याचा क्षणिक आव आणलेले बाबा खाकरल्यासारखे करून खिडकीबाहेर नजर वळवतील….. मी पुढे होऊन त्यांच्या मांडीत डोके ठेवीन….. ते पाठीवर मायेने हात फिरवत रहातील…. आईही मग बाजूला उभी राहील आमच्या….. त्या क्षणी मी त्यांची ’ताई’ आणि ते माझे ’आई-बाबा’ असतील फक्त….. आमच्यापुरताच असेल तो क्षण… गोठलेला…. मनात खोल खोल साठवलेला!!!!!!
बाबा म्हणतील मग ,” मिसेस देवडे कढी खिचडी होऊन जाऊ द्या एकदा तुमच्या हातची 🙂 “…………
निघताना आजी सकाळी लवकरच येईल….. मी तिला म्हणेल , ” अगं तू का आलीस मी येतच होते ना!!!! “…. पाठीवर पुन्हा पुन्हा हात फिरवेल ती… मुलांना जवळ ओढून घेईल….. अनेकदा विचारलेला प्रश्न विचारत राहील, “ताई पुन्हा कधी येशील गं!!” …………… “जप स्वत:ला!!!” आम्ही एकदमच म्हणु ……
एक काठोकाठ भरलेलं .. म्हणुनच जडावलेलं मन आणि पाय घेऊन मी पाठ वळवेन….. समोरच्या बिल्डिंगमधल्या कुठल्यातरी काकू आईला म्हणतील…” दिवस किती भराभर गेले हो!!!!” आई मान हलवत राहील फक्त….. बोलत नाही ती आम्ही निघताना…. पहात राहील फक्त……………………… गाडी वळताना मागे वळेन मी……. आई तिथेच उभी असेल गुलमोहोराखाली…………..