कोष……

सकाळचे नऊ वाजायला आलेत, आत्ता ही कामवाली बाई येईल…. उद्या शुक्रवार तिची हक्काची सुट्टी म्हणजे निदान आजची तरी सगळी भांडी तिला पडली पाहिजेत. या विचाराने मी भराभर कामे उरकत होते… येव्हढी घाई करूनही ऐन भाजी फोडणीला टाकायची वेळ गाठत बाई हजर झाली. मग माझी किचनमधली लूडबूड थांबेपर्यंत तिने झाडझूड उरकली.  किचनचा ताबा तिला देऊन मी बाजूला झाले… जरा गप्पा मारून हॉलमधे पळाले…. AC आणि पंखा सुरू होता तिथे… त्या थंडाव्यात विसावले आणि मुलांशी बोलत एकीकडे अभ्यासाचा फार्स सुरू झाला आमचा. 🙂 …………..

मेड जेव्हा घर पुसायला आली तेव्हा सहज तिच्याकडे लक्ष गेलं तर चेहेरा थकलेला आणि एकूणातच उदास वाटत होती ती…… “काय झाले गं???” म्हणून विचारल्यावर तिने बरीच कहाणी सांगितली. तिच्या बोलण्यातून समजलं, ज्या अरब माणसाने तिचा व्हिसा स्पॉन्सर केला होता, ज्याच्या कृपेने तिला लेबर कार्ड मिळालेले होते तो आता तिचा पासपोर्ट परत द्यायला नकार देत होता.  बाकि सगळ्या कागदपत्रांची पुर्तता होऊनही पासपोर्ट लवकर न मिळाल्यामूळे तिने जाणे लांबत होते. आता समजले मला तिच्या घालमेलीचे कारणं!!!!

गेले सहा महिने तिची धावपळ मी पहाते आहे….. ५/६ वर्षानंतर एकदाचे आतातरी आईला पहायला मिळणार म्हणून लहान मुलासारखी आनंदी होणारी…… बहेन के बच्चे अभी बडे हो गये है मॅडम, अभी तो फोन पे बात करते है म्हणून सुखावणारी मावशी….. भाई की शादी करनी है म्हणणारी ही बाई स्वत:च लग्न हा विषयही काढत नाही हे मला अनेकदा जाणवलं होतं. ….. कशाला अप्रिय विषय काढा म्हणुन मी देखील कधी तिच्याशी त्याबद्दल बोलले नाही पण एक दिवस स्वत:हुनच ती सांगत होती की मेरा शादी नही हूआ गम नही मॅडम , मेरे तो भाई-बहेन मेरे बच्चे है!! बस एक बार सब अच्छा हो जाएगा तो वो लोग मेरा खयाल रखेंगे!!! ………….. आता घरच्या सगळ्यांना भेटायचे म्हणून उन्हातान्हात ही बाई फिरत होती, एरवी निरक्षर असणारी बाई आज वेळोवेळी दुतावासात जाऊन आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करत होती….. तिची घरी आपल्या माणसात परतण्याची ओढ आम्हालाही जाणवत होती.

पुढच्या महिन्यात आम्हिही भारतात जाणार, माझी मुलंही आता नानी-बाबू, मावशीला भेटायचे म्हणुन रोज त्याच गप्पा मारताहेत……….. परवा गौराने तिच्या या आंटीला सांगितले ’आंटी मैने तो बॅग पॅक भी कर दी 🙂 ’ तेव्हा हसून तिची ही आंटी म्हणाली, “हाँ गौरी मैने भी!!!! :)”  दोघीही हसत होत्या, गप्पा मारत होत्या… दुरून पहाणाऱ्या मला मात्र त्या सारख्याच निरागस वाटत होत्या!!!

“मॅडम मै तो ना आजकल उपरसे कोई प्लेन जाता है तो सोचती हूँ कब जाऊँगी मै ईसमे बैठकर 🙂  ” वगैरे तिची वाक्य दिवसभर मनात घोळत होती माझ्या….काम संपवून घरी जाताना ती म्हणाली “मॅडम दुवा करना मेरे लिये… 🙂 “….. तिला म्हटलं, ” देखो अल्ला से तो तुम्हारी बात हो चुकी है अब मै थोडा भगवान को बोलती हूँ!!!! जल्दी से चली जाना अपने घर…. ” पाणावलेले डॊळे लपवण्यासाठी ती झरकन वळली आणि निघून गेली.

आज  आमची शेलिना काम करून गेली पण मला चिंतनाला विषय देऊन गेली….. तिचीच काळजी मलाही आता वाटत होती… “मॅडम बस अब जाना है!!” ची लामण मी गेले सहा महिने ऐकते आहे….. आज मात्र तिची अगतिकता, हतबलता मला उदास करत होती….मनात विचार आला हिला भांडी पडावी म्हणून खटाटोप करणारी सकाळची मीच होते….. क्षणभर माझाच मला राग आला……छे काय हा आपल्या मनाचा कोतेपणा………

मग मी मात्र मनातल्या मनात खरच देवाला हाक घातली ……..

संध्याकाळी फिरायला घराबाहेर पडलो…. सहज एका मॉलमधे शिरलो , तिथे   upto 50% off चा फसवा सेल  सुरू होता. पेंगुळलेली, किरकिरणारी बाळं प्राम मधे  ठेवून आया कपड्यांच्या ढिगात रमलेल्या होत्या….. भपकेबाज कपड्यांचा, अत्तरांचा संमिश्र वास दरवळत होता…..घरात चपलांचे रॅक भरून वहात असले तरी नवनव्या चपलांकडे गर्दी होतीच………… एकूणातच आर्थिक सुबत्ता असणारे अनेक भरकटलेले जीव तिथे वावरत होते…… मी कोणती वेगळी होते….. बिलाच्या रांगेत उभी होते, भलीमोठी रांग……. माझ्याकडच्या ट्रॉलीत अनावश्यक या सदरात मोडणारी दिड-दोन हजाराची खरेदी होती…………. मनाचा एक कोपरा ’सकाळी वळून भराभर जाणाऱ्या शेलिनाच्या ’ काळजीने व्यापलेला होता. स्वत:च्या विचारात हरवलेली असताना २/४ दिवसापुर्वी केव्हातरी लेकाला म्हटलेले वाक्य आठवले ,” ईशान ४ रियाल म्हणजे साधारण ५०० रुपये, एखाद्या गरीब कुटूंबाचा महिन्याचा किराणा येतो त्यात!!!!!!”………..

अचानक कुठल्यातरी उर्मीने त्या ट्रॉलीकडे, त्यातल्या सामानाकडे पाहिले तर ते सगळ्ं पार पार परकं वाटलं मला…..माझा, लेकीचा ड्रेस, चपला कसलीच गरज नाहिये हे जाणवलं…. ट्रॉली  बाजूला केली…बिलाच्या रांगेतून बाजूला झाले… माझ्या मागच्याने भरकन माझी जागा घेतली. कपाटं कपड्यांनी तुडूंब भरलीयेत आता वेळ आहे मनाने भरण्याची……. युरेका ssssssss….

टाळलेल्या खरेदीचे पैसे ठेवलेत बाजूला…. ते कोणाला देईन, कधी देईन आज मला माहित नाही पण माझ्या पर्समधे असणारे ते पैसे आज माझे नाहियेत हे नक्की…….

आपला कोष…… सुरक्षित, सुंदर कोष…. आपणच विणतो आपल्याभोवती ……. मग कोळ्याच्या जाळ्यासारखे आपणच त्यात गुंतत जातो!!!!! आपल्या भावना, संवेदना सगळं हळूहळु या कोषाभोवती मर्यादित होत असतं!!!! जगात खूप काही घडतयं, घडो… मी मात्र आपल्याच कोषात…… कोणा एकाचे तरी निदान अश्रू पुसण्याची क्षमता आहे माझ्यात….. कोणा एकाच्या तरी खांद्यावर आधाराचा हात ठेवला जाऊ शकतो हे विचार या कोषात नाहीत!!!!!! हा कोष तेव्हढा पार करायचाय पुन्हा एकदा….. खूप काही अवघड नाही त्यात…. आपणच उभारलेल्या भिंती आपणच पाडाव्या लागतील……

खरं तर पहिल्या घटनेचा दुसरीशी संबंध काय हा विचार मलाच येत होता सारखा….. पुन्हा वाटलं कदाचित या दोन्ही प्रसंगांनी मला या कोषाची जाणिव करून दिली त्यामूळे त्या एकत्र मांडाव्या वाटल्या… की अजून काही राम जाणे….. पण आज मात्र मुक्त वाटतयं!!!!!! काही हरवलेलं गवसतय…. तेच मन तेच विचार पण आता मोकळ्या हवेत… मुक्तपणे…………….

Advertisements

34 thoughts on “कोष……

  • आभार माधूरी…. खरयं माणुसकीची जाणिव सुप्तपणे मनात असतेच आपल्या…त्यासाठीची किमान कृती करण्याचे भान आले की मिळवले….

 1. खूपच सही. ही भावना तुझ्या मनात आली आणि तू त्यावर छोटी का होईना कृती केलीस हे खूपच महत्वाचं आहे. दोन्ही प्रसंगांचा संबंध आहे, तो तुझ्या सद्सद्विवेकबुद्धिशी. तुझी सद्सद्विवेकबुद्धी आणि तुझी संवेदनशीलता ह्या दोन्ही प्रसंगांतून दिसून येते.
  खरंच आपण सगळे कोषात कसे आणि कधी गुरफटतो, कळतच नाही. तू पहिलं पाऊल टाकलंयस, हेही टाकायला कित्येकांना जमत नाही, त्यामुळे अभिनंदन!

  • मानले ’बाबा’ तुला 🙂 ….. अरे या दोन्ही घटना रिलेटेड आहेत हे जाणवत होते पण नक्की काय हे समजत नव्हते… तू तो गुंता चटकन सोडवलास….

   आभार रे…. अरे मी या कोषात अडकणारी नव्हतेच कधी, कदाचित त्यामूळेच घुसमट होत होती……’ सगळं आहे पण समाधान नाही’ ही एक नवी जमात जन्माला आलीये त्यादिशेने प्रवास होतोय का हे मी नेहेमी तपासत असते…..

   असो, नव्या दमाने कोषाबाहेर पडलीये खरी आता पुढची मजल करायची आहे!!!

 2. विद्याधरशी अगदी सहमत !! दोन्ही प्रसंग तसं म्हटलं तर वेगळे आहेत पण दोन्हीच्या मुळाशी तुझी जागृत असलेली सद्सदविवेक आहे हे दोघांमधलं साम्य !!

  त्या बाईला लवकरात लवकर तिच्या देशी, तिच्या घरी जायला मिळो आणि (माझ्यासकट) अधिकाधिक लोकांना अनावश्यक सामानाने भरलेल्या आपल्या ट्रॉल्या रिकाम्या करण्याची आणि आपल्या कोषातून बाहेर येण्याची सद् बुद्धी लाभो हीच प्रार्थना !!!

  • हेरंबा आभार रे…माझ्याकडूनही आणि आमच्या मेडकडुनही…. तिला आत्ता सांगितले तर तिने तूला ’बहूत बहूत शुक्रिया ’सांगितले आहे….

   या पोस्टला तुमच्या प्रतिक्रियांना जे मी आभार म्हणतेय ते केवळ त्या कमेंटसाठीच नाहिये…. मनात आलेले इथे मांडले त्याची दखल शब्दांपलिकडेही तुम्ही घेतली त्याबद्दलही आहे ’आभार्स :)’

 3. तन्वे, ही भावना मनात आली तिथेच तू तुझ्या कोषातून बाहेर पडलीस गं.अभिनंदन!:) अनावश्यक कपडे व वस्तूंनी आपले घरच नाही तर मनेही व्यापलीत. आमचे बाबा नेहमी म्हणतात, काहिही घेतांना नेहमी विचार करा की खरेच का मला याची गरज आहे. अगदी खातांनाही… जगण्यासाठी फक्त खा असे अगदी नको पण निदान खाण्यासाठी जगू नका… अनेक लोक उपाशी आहेत. तुझ्या बाईला लवकर तिच्या माणसांमध्ये जायला मिळू दे.

  • ताई अगदी खरय गं ..अनावश्यक वस्तू, विचार वेळीच मागे टाकायला शिकायला हवेय… किंवा याचे आठवण तरी कायम ठेवायला हवी 🙂

 4. Sundar!!!!!!!We must be able to differentiate between “Need” and “Want” . Once this is done, then our life will become very simple.
  Jevha apan “Need” pramane vichr karun kruti karato , tevha man bharnyas surwat hote.

 5. तन्वी अगं यावेळी बॅग पॅक करताना खरंच काहीच घेतलं नाही…फ़क्त चॉकोलेट्स…..अपेक्षांना एखाद्या ट्रॉलीत बंद करुन टाकुन देता आलं तर किती बरं होईल नाही???
  आपणच उभारलेल्या भिंती आपणच पाडाव्या लागतील हे जास्त पटतंय………

  • >>>>>अपेक्षांना एखाद्या ट्रॉलीत बंद करुन टाकुन देता आलं तर किती बरं होईल नाही???

   अगदी खरयं गं!!!
   छान वाटतयं तुला परत ब्लॉगवर पाहून 🙂

 6. पिंगबॅक कोष…… | indiarrs.net Featured blogs from INDIA.

 7. मस्त..
  खूप दिवसांनी आलोय त्याबद्दल क्षमस्व..
  खरतर संगणकापासून जरा दूर होतो…
  नवीन माणूस ठेवलाय न कामासाठी.. सो मला काम कमी असत तसं संगणकावर..
  तर सांगायचा मुद्दा असा कि खूप छान विचार आहे..
  १ रियाल म्हणजे ५०० रुपये खरच इथला एख्द्याचा किरण मालाचा खर्च निघतो..
  हल्ली आपण सगळ्यांनी गेल्या पाच ते सहा वर्षात मोबाईल चा खर्च सहज पाने मिसळलाय आपल्या दैनंदिन खर्चात..
  कधी तो खर्च वाढला आणि मिसळून गेला कळलाच नाही..
  आपण समाजच काही देन लागतो या कृतज्ञतेच्या भावनेतून जर सर्वांनी विचार केला तर
  समाजसेवा फार कठीण गोष्ट नाही.. आणि सर्वानीच जर समाजसेवा केली तर मग
  राजकारणी लोकांनाही तो खोटा बुरखा म्हणून सहज सहजी घालता येणार नाही..
  अनेक गरजू माणसे आहेत इथे..
  लहान मुले तर शिक्षणापासून किती वंचित असतात..
  आणि त्यांच्या शैक्षणिक वार्षिक खर्च कितीसा असतो तर फारफार ३६०/- नगरपालिका शाळांसाठी..
  महानगरपालिका असेल तर थोडा जास्ती असतो.. पण ते हि खर्च परवडत नाहीत एखाद्या कुटुंबाला …
  अशा ठिकाणी केलेली मदतही खूप जनानाचा भविष्य उज्ज्वल घडवेल
  आणि मग त्यांच्या आयुष्यातील प्रकाशालाच आपण ख-या अर्थाने दिवाळी म्हणू शकतो..

 8. ही जाणीव तुझ्या मनात आली तीच खरी माणूसकी. आपल्याला नेमकी कशाची गरज आहे, ते शोधून नाही सापडत. असंच एखाद्या अचानक क्षणी कोडं सुटतं. त्या ट्रॉलीतल्या सामानासारखं मनातून सुद्धा अनावश्यक इच्छा, विचारांची गर्दी आपल्याला कमी करता आली पाहिजे.

 9. तन्वीताई एक सहजसुंदर लेखन.. दिवसात असे किती तरी प्रसंग येतात आणि मनातल्या एका कोपऱ्यात लुप्त होतात आणि नेमके तू तेच प्रसंग छान टिपले आहेस..

 10. असे विचार मनात येणं आणि त्यावर कृती करणं दोन्ही महत्त्वाचं आहे. अभिनंदन तुमचं ती अनावश्यक खरेदी बाजूला सारल्याबद्दल. अश्याच छोट्या छोट्या विचारांतून आणि आचारांतून एक सशक्त, सज्ञान आणि सुजाण समाज घडत जातो.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s