गाते माहेराचे गाणे….(पुढचे कडवे… :) )

माहेराच्या गाण्याचे पुढचे कडवे…

रिक्षाने खूप खूप भटकेन मग मी….. कधी शेअर रिक्षा ,कधी  फक्त आपल्यासाठी असलेली रिक्षा!!!! शेअर रिक्षा मला आवडते….. मजा असते ती पण एक….  आजुबाजूचे लोक मुलांशी गप्पा मारतात , त्यांच्या गप्पा ऐकतात…. तेव्हा उगाच आपल्या माहेरी मुलांचे कौतूक होतेय असे वाटत असते मला…. पण या रिक्षाचा एक तोटा आहे रिक्षावाला मनमोकळ्या गप्पा मारण्याच्या मुडमधे नसतो इथे….

कधितरी रिक्षा माझ्या कॉलेजवरून जाईल मग…. मग मी लेकाला म्हणेन, “पिल्लू हे मम्माचे कॉलेज बरं!!!!” त्या वास्तूकडे काही ओळखीच्या आणि काही अनोळखी नजरेने बघत राहीन मी!!!  रस्त्यारस्त्यावरच्या मंदिरांना मी आणि रिक्षावाल्यासहित बाकीचेही सगळे नमस्कार करत राहू आम्ही….. “दोघे पुढे व्हा दोघे मागे…. जरा ऍडजस्ट करा” या रिक्षावाल्याच्या हुकूमावरून झालेल्या कोंबाकोंबीत मागे बसलेल्या दोघांचा नमस्कार देवाला दिसला असेल का हा पुराणकालीन प्रश्न माझा मलाच पुन्हा पडेल… खूदकन हसेन मीच माझ्याशी!!!! 🙂

मेनरोडला, दहीपूलावर गल्ली- बोळात उगाच भटकत राहीन मी….. फुटाण्याच्या, खारेदाण्याच्या गाड्यांवर थांबून खरेदीही करेन मग….

’नासिक किती बदललय ना !!!’ या विषयावर अनेक चर्चासत्र होतील…. अंगणात ओट्यावर बसून पेपर वाचत असताना आई कॉलनीचा गेल्या वर्षाचा आढावा देत राहील… मग एखाद्या नऊवार काकू पायरीवर येऊन बसतील…. “काय म्हणतेय गं तुझी दुबई???” त्या काळजीने विचारतील….. काकू अहो दुबई नाही मस्कत हे  अनेकदा दिलेले स्पष्टीकरण मी यावेळेस देणार नाही पण  🙂  “मस्त मजेत” सांगून मोकळी होईन मग!!!

अंगणात माझी दोन मुलं आणि त्यांच्याबरोबर ’मुलं’ झालेले आई-बाबा एकमेकांशी खेळण्यात मग्न असतील…. मी मात्र कुठलेतरी पुस्तक वाचत पायऱ्यांवर बसून राहीन…. डोळे, चित्त मात्र त्या बाळगोपाळांकडे असेल माझे…… या दोन पिढ्यांमधला दुवा मी आहे या विचाराशी मनाची गाडी थांबेल आणि एका अनामिक आनंदाची मी धनी होईन….  “बुढ्ढा बुढ्ढी जपून… वय झालेय आता …. 🙂 ” मी आई-बाबांना चिडवेन…. त्या कोणाच्या कानावरही माझे बोलणे जाणार नाही….. 😉

“हं!! हं!!” म्हणत मी पेंगत असले तरी आईच्या गप्पा संपायच्या नाहीत….. वर्षभराचा बॅकलॉग तिला भरून काढायचा असेल आणि हीच कथा ही कितव्यांदा सांगतेय याचा हिशोब मी हसत मनात मांडत राहीन….. बाबा केव्हा तरी घोरायला लागतील………… दिवसभर नातवंडांशी धमाल खेळून दमलेले बाबा शांत झोपलेले असतील….. गोष्टी ऐकत ऐकत त्यांच्या दोन्ही बाजूला त्यांची ’गुणी’ नातवंड झोपलेली असतील….. येव्हढा वेळ मला बॅन असलेल्या खोलीत मी चादरी टाकायच्या निमित्ताने उगा डोकावून येईन….. !!!! समोरचे चित्र मला माझ्या मनात साठवायचे असेल…..

मग येईल सासरी जायचा दिवस….. पोहोचे पोहोचे पर्यंत नवऱ्याशी कटकट करणारी मी तिथे पोहोचले की त्याच्यापेक्षा जास्त गप्पा मारत राहीन…. जेवायला बसल्यावर  ” आई पुडचटणी नाही केली तुम्ही???? ” मी सासुबाईंना विचारेन…..मोठ्ठा डबा माझ्यासमोर ठेवत त्या म्हणतील, “सासऱ्याची सुन गं ती… पंचपक्वान्न ठेवा समोर तरी पुडचटणी मागतील…. 🙂 “….. मला खरचं त्यांचाकडे लक्ष द्यायला वेळ नसेल…. त्यांच्या हातचे गोड आंबट वरण, भात आणि पुडचटणी…   “मुरलीये ती पक्की आता घरात…” हसत मावससासूबाई म्हणतील…. त्यांच्या वाक्यापेक्षाही त्यांचा पाठीवरचा हात हटुच नये वाटत राहील…..तृप्त होत राहीन मी……..

सगळी पुरूष मंडळी झोपलीये असे वाटले की आई माझ्या शेजारी बसतील…. “तूला म्हणुन सांगते..” या पालूपदाने मग खूप काही बोलत रहातील…… कानातले मशिन काढून ठेवलेल्या मावशी खाणाखूणांनी काय बोलाताय तूम्ही म्हणून विचारत रहातील… पण यावेळेस आम्ही मात्र “देवड्यांच्या सुना” असू दोघी…. घरातल्या बाबी अश्या थोडीच सांगू कोणाला…. आम्ही खूणेनेच ’काही नाही’ म्हणु त्यांना!!!! “सगळे देवडे सारखेच गं बाई!!! ” या घोषवाक्याशी येऊन आमची गाडी थांबली की नवरा ओरडेल ,”आवरा.. चहा ठेवा आता दुपारचा 🙂 ” आईच उठतील मग ,”वर्षभर एकटीच तर करतेस तू सगळं!!! ” सारख्या म्हणत रहातील……. चहा पिताना अण्णाही सामिल होतील…. खूप काही बोलत रहातील, सांगत रहातील….. ’माहेराच्या गाण्यात’ कोणे एके काळचे सासरही अलगद सामावले जाईल मग!!! 🙂

एक दिवस बाबा आईला म्हणतील मग….. बॅगा भरा आता तिच्या नाहीतर नंतर घाई होते मग!!!! आपण अगदी तटस्थ असल्याचा क्षणिक आव आणलेले बाबा खाकरल्यासारखे करून खिडकीबाहेर नजर वळवतील….. मी पुढे होऊन त्यांच्या मांडीत डोके ठेवीन….. ते पाठीवर मायेने हात फिरवत रहातील…. आईही मग बाजूला उभी राहील आमच्या….. त्या क्षणी मी त्यांची ’ताई’ आणि ते माझे ’आई-बाबा’ असतील फक्त….. आमच्यापुरताच असेल तो क्षण… गोठलेला…. मनात खोल खोल साठवलेला!!!!!!

बाबा म्हणतील मग ,” मिसेस देवडे कढी खिचडी होऊन जाऊ द्या एकदा तुमच्या हातची 🙂 “…………

निघताना आजी सकाळी लवकरच येईल….. मी तिला म्हणेल , ” अगं तू का आलीस मी येतच होते ना!!!! “…. पाठीवर पुन्हा पुन्हा हात फिरवेल ती… मुलांना जवळ ओढून घेईल….. अनेकदा विचारलेला प्रश्न विचारत राहील, “ताई पुन्हा कधी येशील गं!!” …………… “जप स्वत:ला!!!” आम्ही एकदमच म्हणु ……

एक काठोकाठ भरलेलं .. म्हणुनच जडावलेलं मन आणि पाय घेऊन मी पाठ वळवेन….. समोरच्या बिल्डिंगमधल्या कुठल्यातरी काकू आईला म्हणतील…” दिवस किती भराभर गेले हो!!!!” आई मान हलवत राहील फक्त….. बोलत नाही ती आम्ही निघताना…. पहात राहील फक्त……………………… गाडी वळताना मागे वळेन मी……. आई तिथेच उभी असेल गुलमोहोराखाली…………..

Advertisements

36 thoughts on “गाते माहेराचे गाणे….(पुढचे कडवे… :) )

 1. खूपच सुंदर आणि सहज झालीये post … सध्या शब्दात बरोबर मनातल्या भावना…
  आपल्या माणसांना सोडून दूर जाताना सगळ्यांना असाच वाटत का,
  प्रत्येक पावलागणिक वाटत मी आत्ता परत जाऊ का? पण प्रत्येक पाउल आपल्याला अजूनच दूर नेत राहत…
  मन मागे मागे धावत तर पाय पुढे पुढे…

  मग त्या मनाला बांधून ठेवाव लागत घट्ट, कारण ते मागेच सुटल तर पुढचा रस्ता खूप अवघड होतो..
  पण तरीही ते धडपडत राहत परत जाण्यासाठी, अन पहिली संधी मिळाली कि टुणकन उडी मारून पसार होत आपल्या माणसांकडे…..

  • अमृता पुन्हा एकदा आभार 🙂

   >>>>>मग त्या मनाला बांधून ठेवाव लागत घट्ट, कारण ते मागेच सुटल तर पुढचा रस्ता खूप अवघड होतो..
   पण तरीही ते धडपडत राहत परत जाण्यासाठी, अन पहिली संधी मिळाली कि टुणकन उडी मारून पसार होत आपल्या माणसांकडे…..

   अगदी अगदी…..

 2. जाऊन जरा कुठे आजुबाजुला पाहतोयं, मधल्या सुटलेल्या अनेक गोष्टी-खाणाखुणा सांधतोय तोच ही निघायची वेळ समोर येऊन ठाकते बघ. खरे तर निघाल्यापासूनच हा नकोसा क्षण मनात दबा धरून बसलेला असतोच. कितीही लक्ष द्यायचे नाही म्हटले तरी अनेकदा मनी येते…. पुन्हा या ठिकाणी कधी येईन मी…. बाबांचा आवराचा धोशा अन त्यामागचा स्वत:च्या भावना न दिसू देण्याचा प्रयत्न आणि आईचे एकटक मनात उतरत राहणे… वाटते द्यावी फेकून ती बॅग अन…
  अगं, दहीपूल, मेनरोड, सरकार वाडा, गंगेचा घाट-पंचवटी किती बदललेयं गं सगळेच.कालिका तर अगदी बिचारी भासते आजकाल… एकेकाळी काय शान होती गं. गाव चक्क संपायचे की, कालिकेला जायचे म्हणजे एक मोठ्ठा कार्यक्रमच. मज्जा करा गं.
  पोस्ट सहीच. 🙂

  • हो गं ताई… तो नकोसा क्षण खरचं मनात असतो… दिवसांचा हिशोब किती नाही म्हटलं तरी मनात लागतच असतो सारखा….

   >>>>अगं, दहीपूल, मेनरोड, सरकार वाडा, गंगेचा घाट-पंचवटी किती बदललेयं गं सगळेच.कालिका तर अगदी बिचारी भासते आजकाल… एकेकाळी काय शान होती गं. गाव चक्क संपायचे की, कालिकेला जायचे म्हणजे एक मोठ्ठा कार्यक्रमच.

   हो गं त्या बदलांमूळे बरेचदा हेच का आपले नासिक असे वाटते आणि उगाच हरवल्यासारखे होते क्षणभर….

 3. >> ’माहेराच्या गाण्यात’ कोणे एके काळचे सासरही अलगद सामावले जाईल मग!!!

  ‘कोणे एके काळचे’ हे सुरेखच ग.. अप्रतिम !!!

  शेवटच्या काही ओळी वाचताच आल्या नाहीत. अक्षरं एकमेकांत कधी मिसळून गेली कळलंच नाही !!!!!

  आणि बास आता.. पुढचं कडवं टाकलंस ना तरी मी वाचणार नाही.. 😦

  • थोडक्यात पुढच्या कडव्याला सत्यवानाची ’हरकत हाय!!!’ …

   ओके, आपली आज्ञा शिरसावंद्य…. 🙂

   खरं सांगू पुढचं कडवं माझ्याकडेच नाहीये….
   आभार रे!!!

 4. काय लिहू सुचतंच नाहीये. तू तर गावाबाहेर, देशाबाहेर असतेस त्यामुळे वर्षभराचं माहेरपण एकदम भोगून घेतेस. तेवढ्याने कसं पोट भरणार?

  मी इथे रोज फोनवर बोलते आईशी, आठवड्याला उभ्याउभ्या दोन-चार चकराही होतात. आणि तरीही कधी पोटभर बोलणं होतंच नाही … तिला टेकडीवर घेऊन जायचं राहूनच जातं, “तू निवांत बस” म्हणून काही खाऊ – पिऊ घालायचं राहूनच जातं, बाबांशी बोलणंच होत नाही … कधी कधी वाटतं, यापेक्षा कुठे दूर असते, तर दोन आठवडे हक्काचे त्यांच्यासाठी राखून ठेवले गेले असते …

  • गौरी हो गं…. मी होते २ वर्षे नासिकला तेव्हा असेच व्हायचे…. साधे ’नवश्या गणपती’ ला जायचे मला आणि आईला तर जमले नाही तेव्हा… आता मात्र तो महिना हक्काने आमचा असतो….

   आई-बाबांच्या ,आपल्या आजारपणात वाटतं तिथेच जवळ असावे आपण…पण मग हे हक्काचे दिवस मिळत नाहीत ….

 5. माहेर असो वा सासरं..८ दिवस रहा किंवा महिनाभर..दिवस भुरकन उडुन जातात…खुप वेळ कमी पडतो..किती गोष्टी करायच्या असतात..त्या मनातल्या मनातच राहुन जातात….निघताना नेहमी मला वाटतं..सगळ सोडुन पुन्हा आई-बाबांच्या कुशीत शिरावं..लहानांनहुन लहान व्हावे…..पुन्हा एकदा बालपण त्यांच्या छायेत उपभोगावे..मस्त…पण….ह पण काही केल्या सुटत नाही नां…:(

  • खरयं गं माऊ…..

   >>>>८ दिवस रहा किंवा महिनाभर..दिवस भुरकन उडुन जातात…

   अगदी बरोबर…. “पण’ हे पण सुटत नाही… 😦

 6. काय चालवलंय तू आणि हेरंबनी…
  अवघड परिस्थितीत टाकलंय…मी ऑफिसातून वाचतो सहसा…डोळ्यांतून पाणी कसं येऊ देऊ…तरी मी आज निघणार म्हणून थोडा दिलासा आहे, नाहीतर अवघड होतं….

  >>आई मान हलवत राहील फक्त….. बोलत नाही ती आम्ही निघताना…. पहात राहील फक्त
  आई तिथेच उभी असेल गुलमोहोराखाली…………..

  निघायच्या आधीच मला टेन्शन आलं. फक्त मी तिला एअरपोर्टच्या काचेच्या दरवाजामागे उभी असलेली बघतो…:(

  • विद्याधरा असे कर्क रास माझी आणि हेरंबची हळवेपणा स्थायी भाव…. 🙂

   पोहोचलास ना तू नीट घरी…. आता भरपुर वेळ घालव आई बरोबर, मी पण तेच करणार आहे यावेळेस….

  • हंसराज आभार …. शब्दात पकडते कसे??? माहित नाही खरं तर खरचं पकडते का याची पण खात्री नाही 🙂 जे जसे मनात येते तसे लिहीत जाते येव्हढेच….

 7. “त्या क्षणी मी त्यांची ’ताई’ आणि ते माझे ’आई-बाबा’ असतील फक्त….. आमच्यापुरताच असेल तो क्षण… गोठलेला…. मनात खोल खोल साठवलेला!!!!!!”
  अतिशय सुंदर..
  खरच असे क्षण पुन्हा पुन्हा अनुभवावेसे वाटतात ……
  आणि
  “स्त्यारस्त्यावरच्या मंदिरांना मी आणि रिक्षावाल्यासहित बाकीचेही सगळे नमस्कार करत राहू आम्ही…..”
  टिपिकल नाशिककर….एकदम झक्कास ……..

  • सागर पुन्हा एकदा आभार 🙂

   तू नासिकचा ना त्यामुळे रिक्षा , रिक्षावाले आणि कोंबलेले लोक हे आपल्या जिव्हाळ्याचे विषय!!

 8. पिंगबॅक गाते माहेराचे गाणे….(पुढचे कडवे… :) ) | indiarrs.net Featured blogs from INDIA.

 9. हे चांगले आहे तुझे… माहेरची गाणी गाता गाता माझ्या आठवणी पण चोरल्यास कि गं तूं !
  मेनरोड, दहिपूल, पगडबंद लेन, सरकार वाडा, सोन्या मारूती चौक , कापड बाजार मधे पेठे वाडा.. बालाजी… अन्‌ पुढे गंगेवर …. नारोशंकर …दुतोंड्या, यशवंतराव महाराज पटांगण/ मंदिर, धनुष्य कुंड, सीता कुंड अन्‌ राम कुंड अन्‌ त्यातील त्या डुबक्या…..माझे बालपण पण ह्याच भागात गेले !
  कालिका मंदिराचा काय रूबाब होता … विशेषत: नवरात्रातला… सीमोलंघनाला सगळ्यांचे पाय तिकडेच वळलेले असत. माझ्या साठी तर कालिकेचे महत्व अधिकच होते… कित्येक वर्षे माझा पहाटे तिथपर्यंत पळत जाण्याचा परिपाठ होता…. दादा( माझे वडील ) मला त्यासाठी रोज दोन आणे द्यायचे खुराक म्हणून …येतांना चांदवडकर गल्लीच्या कोपऱ्यावरील हनुमान जिलबीवाल्या कडून जिलबी खाऊनच घरी परतायचे, एकदा जिलबी ऐवजी चमचमीत मिसळ खाल्ली होती तर घरी मार बसला होता.दादांचे खबरे असायचे ना गल्लोगल्ली. खोटं बोलायचीही चोरी !
  पुढे तरूण (?) पणी सुटीत आलो की मेनरोड वरून पुढे सरकून….तो हत्तीखाना रोड, आग्रा रोड, तेथिल कोपऱ्यावरील मेहेर बेकरी ह्या इराणी हॉटेल मधील चहा व मटणाचे पॅटीस…. CBS, त्यामागिल त्र्यंबकरॊड वरील तो भयाण ईदगाह त्याही मागे जावून आठदहा जणात एकच ’पासींग शो’ फिरवित चोरून मारलेले झुरके ! पुढे हळू हळू मीच पुणेकर बनत गेलो…जुने मित्र मात्र दुरावत गेले… आणि नासिकही धूसर होत चाललं, राहिल्यात त्या आठवणी, अश्या कधी काळी उफाळून वर यायला आणि आता किती प्रचंड बदल झालेत. नाशकात गेलो तर कोणी बरोबर असेल तरच बाहेर पडायला शक्य होते ! नाहीतर गांगरायला होते.

  तन्वी… लेख अत्यंत जिव्हाळ्याचा झालाय ! एकेका शब्दा मागे शेकडो आठवणी आहेत. किती आठवू व काय काय सांगू.गोंधळून जायला होत्येय. म्हणूनच म्हटलं,…माझ्या आठवणी पण चोरल्यास …. काही इथेच पेरल्यात … विस्तार भयाची तमा न बाळगता !

 10. सुरेखच गं….पूर्वी सांगलिला गेलं की सासरच्या माहेरच्यांच्याअत वाद व्हायचे आमच्यावरून. दोघा घरच्यांना वाटायचं “यांना तिकडे करमतं, आमच्याकडे रहायलाच नको” त्यावेळेस अगदी वात यायचा. लग्न मुरलं आणि त्या वादामागची माया समजली. आता सगळेजण स्थिरावलेत पण मजा आहेच अजूनी. कोणे एक्र काळचं सासर या वाक्यासाी तर तुझी अला बलाच घ्यावी काय? किती

  • काकू तुमच्याशी बोलणे झालेच आहे….खरचं मनापासुन आनंद झालाय मला तुमची प्रतिक्रीया पाहुन 🙂

  • प्रतिक्रीयेसाठी आभार अनूजा आणी ब्लॉगवर मन:पुर्वक स्वागत!! 🙂

   जुन्या पोस्टवर आलेल्या कमेंट्स जरा वेगळा मस्त अनूभव देतात….

 11. नेहमीसारखेच सुपर्ब
  मागच्या 12 वर्षांपासून घराच्या बाहेर राहतो मी आता. खर तर एकटेपणाची सवय व्हायला हवी. तरीही परत जायचा दिवस उजाडला ना की आजही पोटात गोळा येतो. कुठल्याही लहान -सहान गोष्टीवरुन चिडचिड होते. आईला सगळे समजते, पण ती काहीच बोलत नाही. घरातून बाहेर पडल्यावर जितके मागे वळून बघता येईल तितक्या वेळा मी बघत असतो, आणि आई तिथेच उभी असते.चेहरा हसरा ठेवण्याचा प्रयत्न करत मला हात उंचावून निरोप देत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s