अनुत्तरीत…..

सिग्नलला गाडीच्या खिडकीच्या काचेवर तिने बाहेरून टकटक केले……… पावसाचे पाणी आत येणार म्हणून वैतागत मी काच खाली केली तर ती म्हणाली, “ताई गजरे घ्या ना!!!”

म्हटलं, “नकोत गं मला आणि भर पावसात तू तरी कुठे गं बसलीयेस गजरे विकत….. जा घरी सरळ!! ” ….

तेव्हढ्यात बाजूला बसलेली माझी आई म्हणाली, “कसे दिलेस गं???”

“दहाला तीन बाई….” ती म्हणाली.

“दहाला पाच दे…” आई म्हणाली…

“आई अगं पाऊस येतोय गाडीत आवरा लवकर …” मी मधेच ओरडले..

“ठीक आहे घ्या…” ती म्हणाली……

तिने गजऱ्यांच्या गर्दीतून गजरे मोजायला सुरूवात केली आणि मी पर्समधे सुट्टे पैसे शोधायला सुरूवात केली……तेव्हढ्यात सिग्नल सुटला आणि ड्रायव्हरने गाडी काढली….. बाहेरून ती जोरात ओरडली, “भाऊ पुढे थांब मी येते!!!! “………….

काहिही कळायच्या आत ती आमच्या गाडीच्या मागे धाऊ लागली…. गाडी अर्थात पुढे गेली… पण काच खाली करून मी मागे पाहिले तर ती जिवाच्या आकांताने धावत येत होती….चर्रर्र झालं मनात… ड्रायव्हरने गाडी थांबवली….. ती धापा टाकत आली…… येव्हढा वेळ तिच्याकडे साफ दुर्लक्ष करणारी मी पहिल्यांदा तिला नीट पहात होते….. माझ्या मुलापेक्षा फार फार तर २-३ वर्षानी मोठी होते ती………….सुन्न झालो आम्ही….. “उगाच बोलावले गं ताई हिला.. ” आई म्हणाली….

ती गाडीजवळ आली….. तिच्या हातातले गजरे घेतले… ठरल्यापेक्षा जास्त पैसे तिच्या हातात कोंबले आणि मनातले अपराधीपण कमी करण्याचा एक फोल प्रयत्न केला. गजरे आता कोणिही माळणार नव्हतेच….. ते तसेच पर्समधे ठेवले…… त्या फुलांच्या येणाऱ्या सुगंधापाठोपाठ मात्र मन एका अनामिक विषण्णतेने भरून येत राहिले….. एकच प्रश्न वारंवार येत होता मनात असे १० ऐवजी ५० रुपये दिल्याने तिचे प्रश्न सुटणार होते का??? आज माझ्या गाडीमागे धावणारी ही मुलगी उद्या ईतर कोणाच्या गाडीमागे धावणार आहेच की!!!! प्रश्न, प्रश्न आणि प्रश्नच फक्त….. उत्तरे खरच नाहीत की आम्हाला ती शोधायची नाहीत????

लेकाच्या मुंजीच्या खरेदीसाठी बाहेर पडलेलो आम्ही…..वेळ अगदी दुपारी १२- १२:३० ची……. एक म्हातारीशी बाई पैसे मागत होती रस्त्याने……तिच्या शेजारून पुढे गेलो आम्ही…..तोच नवऱ्याने गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली…. मी हसतच त्याला विचारले ,” आजींसाठी ना!!” तो ही हसला….. लेकाच्या हातात काही पैसे दिले आणि त्याला सांगितले त्या आजींकडे जा आणि त्यांना पैसे देऊन सांग की उन्हात फिरू नका, जेवून घ्या!!! त्याने तसे पैसे दिलेही…..आणि अचानक भररस्त्यात त्या आजीने वाकून त्याच्या पायांना हात लावला….. तो गांगरून मागे सरकला आणि पळून आला आमच्याकडे…….आम्हिही आजींच्या अश्या अनपेक्षित कृतीने भांबावलेलो, काय करावे सुचेना….. क्षणभर थांबलो तिथेच, ” मम्मा आपण पैसे नको होते द्यायला! ” लेक बोलला…..म्हटलं ,” हो बेटा पैसे नकोत द्यायला ..अजुनही बरेच काही करायला हवेय!!!”

काळाराम मंदिरात समाधानाने मन तुडूंब भरेपर्यंत दर्शन घेतले आणि निघालो…… चपला घातल्या ..आता निघणार तेव्हढ्यात कोणितरी ओरडले….”अरे बाबांनो पैसे द्या की, मी काय उगाच बसलेय का इथे??? ”

बाजूच्या गाड्यावर अंधाराच्या बाजूने बसलेल्या काकू/ आजी आम्हाला दिसल्याच नव्हत्या…. हसतच म्हटले, “अहो काकू दिसलाच नाहीत हो तुम्ही, आलेच हं!!… पर्समधून दहाची नोट दिल्यावर पुन्हा ओरडल्या, “सुट्टे द्यायला काय होते आता सुट्टे कुठून आणु बाई???? ” म्हटलं,” काकु नका आणु सुट्टे, उठू नका बघू ,बसा स्वस्थ…….” तशा अस्पष्ट हसल्या, डोक्यावर हात ठेवत पुटपूटल्या, “सुखी रहा बाई!!!”

मैत्रीण आली मला भेटायला….. तिच्याशी बोलत होते सगळं…. म्हटलं बदलायला हवय ना गं हे चित्र….. थांबायला हवय हे असं केविलवाणेपण!! अस्वस्थ वाटतं मग जेव्हा आपण दागदागिने, साड्या घालून मिरवतो तेव्हा…. अपराधी ओझे मनावर असल्यासारखं वाटतं कधितरी बघ!!!

ती म्हणाली, “अगं हे आजचे आहे का… आपल्या लहानपणापासून हेच प्रसंग थोड्याफार फरकाने बघतोय की आपण?? आज काय विशेष?? आणि कसले ते मोठे शब्द ’मनावर अपराधी ओझे’ म्हणे…… देणार आहेस का तुझे दागिने कुठल्या संस्थेला???? ” हसायला लागली ती……

तिला म्हटलं, “अगं मुद्दा दागिन्यांचा नाहिये गं , पण एक लहान जाणिव सगळ्यांना असली की फरक पडेल गं!”

काहिवेळाने ती तर गेली पण  एक अनुत्तरीत प्रश्न मागे ठेवून……काय करू शकतो आपण? की नेहेमीप्रमाणे वांझोटी सहानूभूती, संताप, तगमग आणि पुढे काहीच नाही???

मागे एकदा हेरंबला म्हटले होते, ’आशूतोषचा ’ स्वदेस’ मला पुर्णत: पटत नाही म्हणुन….’ अजुनतरी पुर्ण समजलाय पटलाय का राम जाणे……. यावेळेस मात्र निघताना मनात कुठेतरी मोहन भार्गव पुन्हा डोकावत होता…. मलाच वाकोल्या दाखवत होता….. त्याने त्याच्या पुरते काही प्रश्न सोडवले होते….. माझे प्रश्न आहेत अजुनतरी ’अनुत्तरीत’………….

Advertisements

खोप्यामधी खोपा……….

सुगरण पक्ष्याचे नुसते नाव घेतले तरी बहिणाबाई आठवल्याशिवाय रहात नाही…….

बहिणाबाई म्हणते……..

अरे खोप्यामधी खोपा
सुगरणीचा चांगला……
देखा पिल्लांसाठी तिने
जीव झाडाले टांगला……

सध्या मुक्काम पोस्ट नासिक असल्यामुळे आईच्या घरामागच्या नारळाच्या झाडावर सुगरण पक्षी बांधत असलेले घरटे पहायची संधी मिळाली. तसा दरवर्षी मी हे घरटे पहाते. पुर्ण झालेली घरटी, न पटलेली अपुर्ण राहिलेली (सोडलेली) घरटी……त्यासाठीची त्या ईवल्याश्या पक्ष्याची लगबग ….. एक एक काडी, कापुस आणून त्या घरट्याचे सुरू असलेले बांधकाम सगळेच खिळवणारे असते……

यावेळेस त्या घरट्याचे आणि त्या सुगरणीचे फोटो काढायचा विचार आला पण माझा हा विचार सौ. सुगरण बाईंना फारसा पसंत आला नसावा कारण मी कॅमेरा सरसावावा आणि त्यांनी पानाआड लपावे हे सत्र बराच वेळ चालले……पण मी हार मानते कशाला काही फोटु मिळवलेच………:)

लपाछूपीचा खेळ …..

शेवटी या सुगरणीच्या नकळत तिचे फोटो काढण्यात मला यश मिळाले…. 🙂

 

तिची उलुशीच चोच…
तेच हात तेच बोटं…..
तुले दिले रे देवाने…
दोन हात दहा बोटं…..

बहिणाईने माणसाला विचारलेला हा प्रश्न किती योग्य आहे हे या सुगरणीच नीटसपणा समजावत होता.

 एव्हाना माझे अस्तित्व तिला जाणवायला लागले होते…..पण घरट्यात दोन पिल्ले आहेत हे मलाही समजले होते…… मी तिथून कधी हटते याची वाट ती पहात होती, आणि जमल्यास पिल्लांचे फोटो काढता आले तर पहावे याची मी 🙂

 तास दोन तास तो पक्षी आणि मी रमलो एका वेगळ्याच विश्वात …..वेळोवेळी तो ईवलासा अगदी आपल्या हाताच्या तळव्यापेक्षा लहान पक्षी मला जाणीव करून देत राहिला माझ्या खुज़ेपणाची,ती चिकाटी,ते कलाकुसर, ते नेटकेपण आपल्यात नाही ही खंत वाटत राहिली मग मनात …..