अनुत्तरीत…..

सिग्नलला गाडीच्या खिडकीच्या काचेवर तिने बाहेरून टकटक केले……… पावसाचे पाणी आत येणार म्हणून वैतागत मी काच खाली केली तर ती म्हणाली, “ताई गजरे घ्या ना!!!”

म्हटलं, “नकोत गं मला आणि भर पावसात तू तरी कुठे गं बसलीयेस गजरे विकत….. जा घरी सरळ!! ” ….

तेव्हढ्यात बाजूला बसलेली माझी आई म्हणाली, “कसे दिलेस गं???”

“दहाला तीन बाई….” ती म्हणाली.

“दहाला पाच दे…” आई म्हणाली…

“आई अगं पाऊस येतोय गाडीत आवरा लवकर …” मी मधेच ओरडले..

“ठीक आहे घ्या…” ती म्हणाली……

तिने गजऱ्यांच्या गर्दीतून गजरे मोजायला सुरूवात केली आणि मी पर्समधे सुट्टे पैसे शोधायला सुरूवात केली……तेव्हढ्यात सिग्नल सुटला आणि ड्रायव्हरने गाडी काढली….. बाहेरून ती जोरात ओरडली, “भाऊ पुढे थांब मी येते!!!! “………….

काहिही कळायच्या आत ती आमच्या गाडीच्या मागे धाऊ लागली…. गाडी अर्थात पुढे गेली… पण काच खाली करून मी मागे पाहिले तर ती जिवाच्या आकांताने धावत येत होती….चर्रर्र झालं मनात… ड्रायव्हरने गाडी थांबवली….. ती धापा टाकत आली…… येव्हढा वेळ तिच्याकडे साफ दुर्लक्ष करणारी मी पहिल्यांदा तिला नीट पहात होते….. माझ्या मुलापेक्षा फार फार तर २-३ वर्षानी मोठी होते ती………….सुन्न झालो आम्ही….. “उगाच बोलावले गं ताई हिला.. ” आई म्हणाली….

ती गाडीजवळ आली….. तिच्या हातातले गजरे घेतले… ठरल्यापेक्षा जास्त पैसे तिच्या हातात कोंबले आणि मनातले अपराधीपण कमी करण्याचा एक फोल प्रयत्न केला. गजरे आता कोणिही माळणार नव्हतेच….. ते तसेच पर्समधे ठेवले…… त्या फुलांच्या येणाऱ्या सुगंधापाठोपाठ मात्र मन एका अनामिक विषण्णतेने भरून येत राहिले….. एकच प्रश्न वारंवार येत होता मनात असे १० ऐवजी ५० रुपये दिल्याने तिचे प्रश्न सुटणार होते का??? आज माझ्या गाडीमागे धावणारी ही मुलगी उद्या ईतर कोणाच्या गाडीमागे धावणार आहेच की!!!! प्रश्न, प्रश्न आणि प्रश्नच फक्त….. उत्तरे खरच नाहीत की आम्हाला ती शोधायची नाहीत????

लेकाच्या मुंजीच्या खरेदीसाठी बाहेर पडलेलो आम्ही…..वेळ अगदी दुपारी १२- १२:३० ची……. एक म्हातारीशी बाई पैसे मागत होती रस्त्याने……तिच्या शेजारून पुढे गेलो आम्ही…..तोच नवऱ्याने गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली…. मी हसतच त्याला विचारले ,” आजींसाठी ना!!” तो ही हसला….. लेकाच्या हातात काही पैसे दिले आणि त्याला सांगितले त्या आजींकडे जा आणि त्यांना पैसे देऊन सांग की उन्हात फिरू नका, जेवून घ्या!!! त्याने तसे पैसे दिलेही…..आणि अचानक भररस्त्यात त्या आजीने वाकून त्याच्या पायांना हात लावला….. तो गांगरून मागे सरकला आणि पळून आला आमच्याकडे…….आम्हिही आजींच्या अश्या अनपेक्षित कृतीने भांबावलेलो, काय करावे सुचेना….. क्षणभर थांबलो तिथेच, ” मम्मा आपण पैसे नको होते द्यायला! ” लेक बोलला…..म्हटलं ,” हो बेटा पैसे नकोत द्यायला ..अजुनही बरेच काही करायला हवेय!!!”

काळाराम मंदिरात समाधानाने मन तुडूंब भरेपर्यंत दर्शन घेतले आणि निघालो…… चपला घातल्या ..आता निघणार तेव्हढ्यात कोणितरी ओरडले….”अरे बाबांनो पैसे द्या की, मी काय उगाच बसलेय का इथे??? ”

बाजूच्या गाड्यावर अंधाराच्या बाजूने बसलेल्या काकू/ आजी आम्हाला दिसल्याच नव्हत्या…. हसतच म्हटले, “अहो काकू दिसलाच नाहीत हो तुम्ही, आलेच हं!!… पर्समधून दहाची नोट दिल्यावर पुन्हा ओरडल्या, “सुट्टे द्यायला काय होते आता सुट्टे कुठून आणु बाई???? ” म्हटलं,” काकु नका आणु सुट्टे, उठू नका बघू ,बसा स्वस्थ…….” तशा अस्पष्ट हसल्या, डोक्यावर हात ठेवत पुटपूटल्या, “सुखी रहा बाई!!!”

मैत्रीण आली मला भेटायला….. तिच्याशी बोलत होते सगळं…. म्हटलं बदलायला हवय ना गं हे चित्र….. थांबायला हवय हे असं केविलवाणेपण!! अस्वस्थ वाटतं मग जेव्हा आपण दागदागिने, साड्या घालून मिरवतो तेव्हा…. अपराधी ओझे मनावर असल्यासारखं वाटतं कधितरी बघ!!!

ती म्हणाली, “अगं हे आजचे आहे का… आपल्या लहानपणापासून हेच प्रसंग थोड्याफार फरकाने बघतोय की आपण?? आज काय विशेष?? आणि कसले ते मोठे शब्द ’मनावर अपराधी ओझे’ म्हणे…… देणार आहेस का तुझे दागिने कुठल्या संस्थेला???? ” हसायला लागली ती……

तिला म्हटलं, “अगं मुद्दा दागिन्यांचा नाहिये गं , पण एक लहान जाणिव सगळ्यांना असली की फरक पडेल गं!”

काहिवेळाने ती तर गेली पण  एक अनुत्तरीत प्रश्न मागे ठेवून……काय करू शकतो आपण? की नेहेमीप्रमाणे वांझोटी सहानूभूती, संताप, तगमग आणि पुढे काहीच नाही???

मागे एकदा हेरंबला म्हटले होते, ’आशूतोषचा ’ स्वदेस’ मला पुर्णत: पटत नाही म्हणुन….’ अजुनतरी पुर्ण समजलाय पटलाय का राम जाणे……. यावेळेस मात्र निघताना मनात कुठेतरी मोहन भार्गव पुन्हा डोकावत होता…. मलाच वाकोल्या दाखवत होता….. त्याने त्याच्या पुरते काही प्रश्न सोडवले होते….. माझे प्रश्न आहेत अजुनतरी ’अनुत्तरीत’………….

34 thoughts on “अनुत्तरीत…..

 1. lekh avadala. Pan with apologies..he prashn anuttaritach rahnar.
  Kayam.

  Mohan bhargav cinemaatach parat yenaar.

  Bakiche NRI anuttarit prashn gheun aapalyaa jagaat parat janar.

  Anuttarit rahanach soyicha ahe nahi ka asha veli?

  • नचिकेत आभार…

   …पण तीच तर गोम आहे की ’मोहन भार्गव ’ सिनेमातच येणार… म्हणून तर आणि त्रास होतो की आपण पहाणार, आपल्याला वाईट वाटणार मग आपण आपल्या उबदार कुटुंबात परत येणार ..अर्थात यात गैर काही नाहीये अजिबात…. मध्यमवर्ग आपला… कष्टाने मेहेनतीने मिळतेय जे काही आहे ते…. तरिही काहितरी बदल व्हावा असे वाटते आणि वाटतच रहाते रे!!!

   एका अर्थाने तू जे म्हणतोय की हे प्रश्न अनुत्तरीत रहाणे ’सोयीचे’ आहे ते अगदी बरोबर आहे रे….. कारण तेव्हढा त्यागबिग झेपणारच नाहीये आणि आज जर तो आपण केला तर आपल्या कुटुंबाचे काय???( बघ झाले पुन्हा प्रश्नावली सुरू….)

   तरिही पुन्हा वाटतंच रे काहितरी करावे…. NRI असू दे वा नसू दे प्रयत्न अल्पसा तरी करावा असे अजुनही खरच वाटतेय….

   >>>> Pan with apologies…. ह्याची गरज नाहीये…. तुझे मत माझ्या प्रत्येक खरडण्यावर येऊ देत आणि ते ही अगदी मनमोकळे….

 2. तन्वीताई, त्या कष्टाळू मुलीबद्दल आलेले तुझ्या मनातले विचार अगदी योग्य आहेत, आपण जास्त काही करू शकत नाही हेही १००% खरं, पण भिकार्‍यांबाबतीत मात्र मला अजिबात किव येत नाही. मान्य, ५% अगदी जेन्युईन लोकं असतिल ज्यांना खरंच गरजेपाई, शारिरिक दुर्बल्यापाई भिक मागावी लागत असेल, पण उरलेले ९५%… त्यात हक्क असल्याप्रमाणे देवळाबाहेर भिक मागणारे तर निलाजरे आहेत.

  असाही भिक हा व्यवसाय झाला आहे…

  • आनंद तुझे मत शब्दश: पटतेय रे…. धडधाकट लोक जेव्हा विनाकारण हात पसरतात तेव्हा संतापच येतो…
   तुला ’पुष्पक’ सिनेमा आठवतोय का कमल हसन एका भिकाऱ्याला आपल्याकडचे ५० पैसे दाखवतो त्यावर तो भिकारी त्याच्याकडची लपवलेली संपत्ती दाखवतो… व्यवसायच आहे हा!!! त्याचा राग संताप आहेच …

   पण हा संताप मात्र आपण जितका मनापासून करतो तितक्याच मनापासून खऱ्याखुऱ्या गरजवंतासाठी जेव्हा नुसते हळहळतो आणि प्रत्यक्ष कृती करताना ती टाळायची पटणारी कारणे शोधतो तेव्हा तगमग होते…..

 3. तन्वी ताई….नजीकच्या काळात तरी ही परिस्थिती बदलण खूप अवघड वाटते.
  .अशीच काही गर्दी प्रत्येक मंदीराजवळ असते…भुकेले जीव बाहेर तळमळत असतात अन् आपण मात्र दगडात देव शोधत असतो.

 4. अश्या वेळी काय करावे हे समजत नव्हते…
  कधी कधी दया म्हणून जादा पैसे दिल्यावर ते पैसे योग्य मार्गाने खर्च करतील ह्याची खात्री वाटत नाही.
  म्हणून मी कधी असे वाटलेच तर सरळ जेवण विकत घेऊन येतो अथवा त्या क्षणी जे उपलब्ध असेल ते घेऊन देतो. काही जागी गरज पैश्याचीच असते… तेव्हा जेवण घेताना त्यांची अनिच्छा दिसली तर सरळ चार पैसे हात ठेऊन ते जेवण योग्य त्या व्यक्तीला देण्यास सुचना देतो व शक्य असेल तर मीच तसा व्यक्ती शोधून त्यास ते अन्न देतो.

  • राज प्रतिक्रीयेबद्दल आभार आणि स्वागत…

   सगळ्यांचेच विचार वाचतेय…. तगमग सगळ्यांचीच आहे दिसतेय… एका अर्थी खरच बरे वाटतेय…. आणि या सगळ्या चर्चेतून पुढच्यावेळेस काय बदल करता येतील की ज्यामूळे या ’अनुत्तरीत’ प्रश्नांना जरा वेगळे वळण देता येइल ते बघायचे आता!!!

 5. ताई,
  अगं इथली प्रत्येक सोय-सुविधा पाहून पहिला विचार येतो तो आपल्याकडे असं असतं तर. आपल्याकडे कधी होईल हे सर्व…आणि मग स्वतःच्याच विचारपद्धतीवर हसू येतं. रोजच्या गैरव्यवहारांच्या बातम्या पाहून हतबलता येते. पण कुठेतरी काहीतरी करायची क्षमता आपल्यात असेल अशी आशा वाटते. पाहू काय काय होतं ते..तोवर वांझोटा संताप आणि तगमगच. आपली सदसद्विवेकबुद्धी शाबूत आहे ह्यातच समाधान मानायचं तोवर!
  मस्त व्यक्त केलंस!

  • विद्याधर अगदी मनातले बोललास… शब्द वेगळे भावना तीच असे वाटतेय बघ सारखे….

   एकीकडे शिर्डी, तिरूपती सारखी देवस्थान, तिथल्या देणग्यांच्या बातम्या,एकुणातच भ्रष्टाचार आणि एकीकडे कमालीचा बकालपणा यातून सुवर्नमध्य केवळ सिनेमातच
   निघणार असे दिसतेय रे!!!

   >>>आपली सदसद्विवेकबुद्धी शाबूत आहे ह्यातच समाधान मानायचं तोवर!

   हं!!!

 6. तन्वे, हे प्रश्न कोणीही सोडवू शकत नाही व कधीच कमीही होणार नाहीत. एकाची नड भागवली, पैसे देऊन, खायला देऊन, प्रसंगी काही काळापुरता आसरा देऊन तरी त्यांचाही प्रश्न अनुत्तरीतच राहणार ना गं….. कारण आपण आयुष्यभर तर त्यांना पुरे पडू शकत नाही. इच्छा असली तरीही नाही. फार फार त्रास होतो पण उत्तर मिळणारच नाही यावर. काही मोहन भार्गव प्रत्यक्षात येतीलही परत. पण म्हणून ते काही एखाद्या गावाचा कायापालट करू शकतील का? नाही नं…. काही गोष्टी मात्र कोणीही व कुठेही राहणारे करू शकतातच. मुल दत्तक घेणे, शिक्षणाचा खर्च दोघातिघांनी मिळून उचलणे, किमान काही तास कम्युनिटीची सेवा करणे. जे जमेल ते करावे. त्यावेळी मात्र मागेपुढे पाहू नये.

  बाकी, हे प्रश्न न सुटणारेच आहेत.
  पोस्ट आवडली गं.

  • >>>> काही गोष्टी मात्र कोणीही व कुठेही राहणारे करू शकतातच. मुल दत्तक घेणे, शिक्षणाचा खर्च दोघातिघांनी मिळून उचलणे, किमान काही तास कम्युनिटीची सेवा करणे. जे जमेल ते करावे. त्यावेळी मात्र मागेपुढे पाहू नये.

   तायडे हेच गं… मला त्या मैत्रीणीला हेच सांगायचे असावे बहुतेक…. आभार गं!!!

 7. तन्वी,no doubt असे वाटणे अगदी स्वाभावेकच आहे..गरीबी उपासमार दिसली की आपल्या पोटात कालवाकालव होते …जीव तुटतो ….हे सगळ व्हायलाच पाहिजे…अशा वेळेस मदत वगैरे करावी हे ही विचार मनात येतात गं..पण लगेच हा ही मनात विचार डोकावतो की खरच हा needy आहे का???का सोंग आहे..कारण आनंद्च्या म्हणण्यानुसार असे बरेच गरजवंत आज मंदिरा बाहेर निर्लज्ज पणे उभे असतात..भीक हा एक व्यवसाय बनवुन..ह्याची पुसट जेव्हा कल्पना [मी मुद्दाम जाणिव म्हणत नाही आहे]..कल्पना येते तेंव्हा atomatically आपला हात मागे सरतो..अशा वेळेस खराखुरा गरजु मदतीला मुकतो..राज ने म्हटल्या प्रमाणे मी सुद्धा एका व्यक्तीला भाजी पोळी बांधुन दिली की बाबा रे खा दोन घास…५ पाउले पुढे गेल्यावर पाठी वळुन पाहीले..त्याने ते जेवणाचे पुडके माझ्या डोळ्या देखत रस्त्यावर उद्दाम पणे फेकताना पाहिले….हा एक अनुभव ..आणि एक अनुभव..वय वर्ष ७५ असलेले म्हातारे आजोबा दर गुरुवारी डोळ्यात प्राण आणुन माझीच वाट बघत असलेलेही पाहीलेत….त्यांमुळे बरेचदा..माणुस ओळ्खण्याची गफलत होते…सो… मोहन भार्गव हा सिनेमातच बरा…तेवढ्यापुरते प्रश्न सोड्वणारा….हे असेच चालयचे…..परिस्थीती बदलणे कठीण !!
  लेख उत्तम !!!

  • माऊ काय बोलू गं!!! कटू असले तरी तुझे मुद्दे बरोबर आहेत….

   माणूस ओळखण्याची गफलत हा तर कळीचा मुद्दा आहेच गं!!!

 8. आपल्यासारख्या हळव्या मनाच्या मध्यमवर्गातील लोकांना नेहमीच हा अनुत्तरीत प्रश्न पडत आलेला आहे…आणि तो नेहमी अनुत्तरीतच राहिला आहे ….उद्या समजा त्या मुलीला कोणी दत्तक घेतले तरी तशीच एखादी दुसरी मुलगी तिथे लगेच दिसेल तुम्हाला…कधी कधी कार्ल मार्क्सची साम्यवादाची संकल्पना पटते मला….

  • अरे जाम त्रास झाला रे यावेळेस……
   आणि आपल्याला काय म्हणायचे ते ईतराना समजत नाही की समजून घ्यायचे नाही समजत नाही रे….

   पण मायदेशात धावताहेत सगळे नुसते तरिही स्थैर्य नाही ….. अनेक कारणं पण उपाय नकोय कोणाला,
   आपणही त्यातलेच… चिडचिड होते अश्यावेळी….
   परिस्थिती बदलता येत नाही आणि सहन होत नाही…..

 9. माझा सध्याचा अनुत्तरीत प्रश्न “मी आधी टाकलेली कमेंट इथे का दिसत नाहीये” हा आहे.. असो.. जोक्स अपार्ट..

  खूपच हळवी झालीये पोस्ट.. कर्केचा ट्रेडमार्क.. काही काही छोटेसेच पण कठीण प्रसंग फार परीक्षा बघून जातात क्षणार्धात.. आतमध्ये कुठेतरी टोचल्यासारखं होतं उगाचंच.. मोहन भार्गव आणि स्वदेस मला अजिबात पटले नाहीत रुचले नाहीत याचं कारण म्हणजे त्याचं बाळबोध चित्रीकरण आणि सरधोपट दिग्दर्शन.. सगळं कृत्रिम.. खोटं.. फसवं सादरीकरण. हे गोवारीकरचं अपयश होतं. पण अर्थातच त्यात दाखवलेल्या समस्या दुर्दैवाने अजूनही खऱ्या आहेत आणि जास्त भीषण आहेत. आणि त्यांची भीषणता अशी आसपासच्या साध्याछोट्या घटनांतूनही आपल्यापर्यंत येऊन पोचते… फार हेल्पलेस वाटतं.. ‘दो बिघा जमीन’ बघून झाल्यावर माझी अशी अवस्था झाली होती. काहीतरी ४००-५०० रुपयांसाठी एक संपूर्ण कुटुंब उध्वस्त होतं ही कल्पनाच मला पचायला जड गेली होती त्यावेळी.. !!! असो.. भरकटलो.. पण मला काय म्हणायचंय हे तुला कळलं असेल कदाचित. नसेल कळलं तरी हरकत नाय..

  • कर्केचा ट्रेडमार्क….. अगदी खरं बोललास बघ!!!

   हेरंब अरे स्वदेस आणि मोहन भार्गव हे त्यावेळी मनात आलेले नावं म्हणून पोस्टमधे टाकले होते…. तिथे शाहरुखचे NRI असणे माझ्या मनात नव्हते…… ही पोस्ट लिहिताना खूप गोंधळ होता मनात त्यामूळे बरेच गुंतागुंतीचे मुद्दे मीच मांडलेत…… पण स्वदेस म्हण्शील तर आपले मत अजुनही सेमच आहे…. मला म्हणायचे होते ते मोहन भार्गवच्या निर्णयाबद्दल की तो भारतात परतण्याचा निर्णय घेऊ शकला जे आपल्याला शक्य आहे का??

   >>>>पण मला काय म्हणायचंय हे तुला कळलं असेल कदाचित. नसेल कळलं तरी हरकत नाय…… कळलं रे तूला काय म्हणायचय ते खेकडा कोणिकडचा!!!

 10. काही प्रश्न हे अनुत्तरित रहाण्यासाठीच असतात. पिढ्यांपिढ्यांनी उत्तरे शोधण्याची आपली हौस भागवून घ्यावी हवी तर ! मात्र हे प्रश्न सिनेमा नाटकवाल्यां साठींचे नाहीतच !
  आपल्या सभोवतीचा आसमंत हा खाचखळग्यांनी भरलेला असतो व तेव्हाच त्यातील शिखरे आपल्याला दिसतात. एखादाच कष्टाने पार करीत शिखरावर पोहोचतो व अर्थात त्याचे कौतुक होतेच.
  आपले जीवनही अश्याच खाचखळग्यांनी भरलेले असते व ते पार करायचा प्रयत्न ज्याचे त्यालाच करावा लागतॊ.
  हे ईश्वरी सूत्र आहे ! आम्ही करीत असलेली मदत पण ह्या ईश्वरीय सूत्रातच ओवलेली आहे. आम्हाला टिमकी वाजवायचा म्हणूनच काय अधिकार ?

  • काका काय बोलू….मीच संभ्रमावस्थेत होते आणि हेरंब म्हणालाय तसा लहान लहान घटना पण मनात बराच गोंधळ घालतात……

  • बाई ते चांगलेच लक्षात आहे गं!!! 🙂 …. आणि मी आता जे काही माझ्या काव्यप्रतिभेला 😉 अनुसरून लिहीणार आहे त्याला जबाबदार तुच असे मी पोस्टच्या सुरूवातीला लिहीणार आहे…

 11. hi tai,
  chhan post, avadli karan prasang lahan pan prashna motha. mala kay vatat ki kahi prashna unuttarit aahet ch kahi vad nahi pan manachi kalmal dur hou shakate aani te fakkt ‘karm’ karun. aashe prasang aaikun vatat ki kahi karave aani tya velet kharach kahi tari, kona hi sathi, jo aapalya la needy vatel techya sathi. ya kelelya karma tun ch kahi marg nighato aani santosh hi hoto. aani aasa vichar karnarya pratyeka ni ekda tari react kela tar kharach tya prashna kade pahnya cha drushtikon nakki ch badalto…
  tula kay vatat?

  • उदय तू ब्लॉगवर!!! मस्त वाटतेय तूला इथे पाहून….तुझी बायको असते नेहेमी 🙂

   तुझी कमेंट वाचतेय ना तर तू समोर उभा आहेस आणि हे विचार मांडतो आहेस असा भास होतोय बघ!! :)…

   बरोबर आहे अगदी तुझे!!! आणि मला तू कायम बरोबरच वाटतोस कारण तू तो असतोस!!
   उपचार म्हणून नाही म्हणत पण this comment is really special ..thanks a lot!!

 12. विषमता वाढतच चालली आहे ….म्हणजे बघ ना, एकासाठी एका रात्रीचे डिनर किवा मित्रा बरोबर सहजच घेतलेले काही ड्रिंक्स असतात तर दुसर्या कोणासाठी तो महिन्याभराचा खर्च असतो किवा त्याही पेक्षा जास्त ….तरीही we say , we belong to most cultured and civilized society on planet earth

 13. lekh aawadala. he chehare, anubhav sunna karatat.. tyanna kahi madat keli tar tyanna upyog hoil ka mahit nahi, pan aaplyala samadhan milate 3 kshan tari. mhanun madat karayachi baki kahi nahi.. tyanchyasathi nahi tar aaplyasathi. nahitar te chehre kayam dokyat basatat an aaplayla apradhi watayala lagate.

 14. nachiket Aani tanvi Di

  NRI HI ETHE YEUN KAM KARTAT SAMAJASATHI ANIL AVCHAT YANCH EK PUSTAK AAHE KARYARAT MHANUN TYAT EKA NRI CHA ULLEKH AAHE TYANI KARNATAK MADHE BIRLA UDYOG SMAUHASHI KELELYA SANGHARSHACHA JARUR VACHA (KINVA AAPNA VACHL HI ASLE)

  NRI KINVA BHARTIY AASNYACHA KAHI SAMBANDH NAHIYE SAMAJASATHI KARNYACHA ASA MALA VATAT

  LEKH ANTARMUKH KARNARA AAHE

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s