नॉट विद आऊट माय चाईल्ड…..

ती बेट्टी आणि तो मुडी….. त्यांचा देश वेगळा, धर्म भाषा सगळेच वेगळे….. ती अमेरिकेची तर तो ईराणचा….. तिच्या आजारपणात त्यांची ओळख झाली तिचे पर्यवसान प्रेमात आणि पुढे लग्नात झाले….. सगळे सुरळित…. सुखात चालले होते.

लग्नानंतर काही वर्षानी काही दिवसांसाठी म्हणुन तो तीला घेऊन ईराणला जातो… सोबत असते त्यांची चार वर्षाची चिमुरडी ’माहतोब’ …..  तिथे पोहोचल्यावर बेट्टीला जाणवतो तो दोन वेगळ्या देशांच्या संस्कृतीतला जमीन अस्मानाचा फरक…. मुक्त आयुष्य जगलेल्या बेट्टीला ईराणमधल्या बंधनांमधे जगणे शक्यच नसते…… तरिही काहीच दिवसाचा तर प्रश्न आहे असे स्वत:ला समजावत ती कसेबसे दिवस मोजायला सुरूवात करते….. ’माहतोब’ साठीही परिस्थिती खूपशी आवडणारी नसतेच… ती बिचारी तिच्या परीने स्वत:ला सावरून आपल्या आईच्या आधारात तिथे रहाते….

आणि अचानक एक दिवस बेट्टीसमोर एक कटु सत्य येते …. तिची आणि तिच्या लेकीची फसवणुक झालेली असुन आता आपल्याला इथून कधिही परत जाता येणार नाहीये….. तिच्या मनात सतत भेडसावणारी शंका सत्याच्या रुपात बेट्टीसमोर येते….. मग सुरू होतो तो तिचा लढा ….. देश परका, लोक परके, नातेवाईकांचा कडा पहारा….. भाषा अगदीच अनोळखी…….. या सगळ्यातून तिला बाहेर निघायचेय, एकटीला नव्हे चिमुरड्या ’माहतोब’ सह…..

अकस्मात आलेल्या या संकटातला बेट्टीचा एकमेव आधार ’माहतोब’….. जिला नक्की कुठे काय बिनसलेय हे ही समजत नाहीये अजुन….. काही काळच्या चिवट संघर्षानंतर मुडी बेट्टीला अमेरिकेत जायची परवानगी देतो पण अट एकच की ’माहतोब’ ला नेता येणार नाही…. ही अट मान्य करणे बेट्टीला कदापी शक्य नसते आणि मग लढा तोच पण आता ध्येय अजुनच स्पष्ट झालेले…. हा देश सोडुन मी माझ्या देशात परतेनच पण ’नॉट विद आऊट माय डॉटर….’

बेट्टी महमुदीचे ’नॉट विद आऊट माय डॉटर….’ वाचताना आपण कधी तिच्या या लढ्यात तिच्याबरोबर सामिल होतो कळतही नाही…… जाणवते सतत तिची आपल्या लेकीसाठीची तगमग…. त्यासाठी प्रसंगानुसार अधिकाधिक खंबीर होत गेलेली तिच्यातली ’आई’ ….. मुडीचा , त्याने केलेल्या फवणुकीचा, त्याने बेट्टीच्या मातृत्त्वाच्या केलेल्या अपमानाचा राग येत रहातो मग…… कशीबशी मदत मिळवत , लढत, काहीवेळा खचत बेट्टी मग टर्कीमार्गे अमेरिकेत पोहोचण्यात यशस्वी होते…. अर्थातच एकटी नाही… तर ’विथ हर डॉटर….’

पुस्तक वाचून बाजूला ठेवले तरी बेट्टी आणि तिचा संघर्ष दिर्घकाळ मनात रेंगाळतो….. कधितरी अचानक वर येतो असेच कोणी पुन्हा दिसले की…..याहीवेळेस तेच झाले….

तिला स्वत:चे ब्युटीपार्लर  सुरू करायचे आहे…. एकीकडे ऑफिसमधे जॉबही करतेय ती….. ऑफिसमधून आल्यावर उरलेल्या वेळात पार्लरच्या कामात ती झोकून देते स्वत:ला वगैरे जुजबी माहिती मिळाली होती तिच्याबद्दल….. दुसऱ्या दिवशी ती येणार याहून जास्त उत्सुकता वाटण्याची गरजही नव्हती आणि तशी ती वाटलीही नाही…… ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी दुपारी आली ती……  भर दुपार हातातल्या मोठ्या पिशवीचे ओझे सावरत, एकीकडे ओढणीने घाम टिपत….. दारातून आत आली नी प्रसन्न हसली…. तिचा दमलेला चेहेरा विलक्षण मोहक वाटला तेव्हा, नाही म्हटले तरी पहिल्या भेटीतच आवडून गेली ती……

एकीकडे काम सुरू झाले तिचे आणि एकीकडे बडबड….. पार्लरवाल्या बायांची बडबड तरी काय तर तुम्ही आधि ज्या कुठल्या पार्लरमधे गेलात त्यांनी कसे तुमचे आयब्रो, फेशियल चुकवलेत वगैरे….. मनात वाटलं हीची गाडी त्याच रस्त्यावर धावणार हळूहळु….. डॉक्टरकडे आणि पार्लरमधे तुम्हाला आधिच्या ट्रीटमेंटमधे कसे फसवले गेले आहे हे समजावून सांगणे जणु आद्य कर्तव्य असल्यासारखे ते पार पाडले जाते, हे माझे कायम मत होते. पण ती बोलायला लागली आणि लक्षात येत गेले इथे प्रकार तो नाहीये…..

कथा नाही पण व्यथा साधारण तशीच बेट्टीसारखी…… ती सांगत होती आणि बेट्टी पुन्हा पुन्हा डोकावत होती मनात….. जणू म्हणत होती ऐक ऐक अशीच रडायचे मी पण….. बेट्टीचा देश वेगळा होता हिच्याबाबत देश तोच भाषा तीच … फसवणुक करणाराही नवरा नाही…. फसवणूकीला सुरूवात केली होती ती देवाने….तीचे लग्न झाले एका सधन कुटूंबात… माहेरी परिस्थिती ठीक होती तशी…. लग्न झाल्यावर तिला समजले की दिसते तसे नसते, वरवर सुखवस्तू असणाऱ्या कुटूंबातला जाच सहन करणे दिवसेंदिवस अवघड होत जात होते. अश्यातच तिच्या पहिल्या मुलाचा जन्म झाला…. नवऱ्याने मात्र   तिची साथ कधिही सोडली नाही.

रोजच्या कटकटींना, तिच्यावरच्या अन्यायाला तो ही कंटाळला मग….. सामंजस्याने प्रश्न सुटणार नाहियेत हे लक्षात आल्यावर त्याने वेगळे घर घेतले….. आधिच्या घरापासून दुर तरिही अडीअडचणीला जाता येईल असे………. सुखाचा संसार पुन्हा सुरू झाला ….. आणि जन्म झाला दुसऱ्या मुलाचा….. दृष्ट लागू नये कोणाची असे तिला कायम वाटत असे….. पण व्हायचे ते झालेच……….. काही कामाच्या निमित्ताने घराबाहेर पडलेला नवरा घरी आलाच नाही….. अपघातात त्याचा मृत्यू झाल्याची बातमी तेव्हढी आली.

हिचे वय २६ किंवा २७ … शिक्षण कमीच….. आता करायचे काय? ह्या प्रश्नाने भेडसावले तिला….. माहेरची परिस्थिती माहित होतीच तिला…. शेवटी नाईलाजाने ती परतली ती तिच्या सासरी….. आता तर आरोप वाढले होते, नवऱ्याचा घास घेणारी हे नवे बिरूद लावून सासूबाई मोकळ्या झाल्या होत्या….. सासऱ्यांना वाटणारी कणव पुरेशी नव्हती…. तरिही ते हिला शक्य तेव्हढा धीर देत होते…… दिवस काढणे अधिकाधिक कठीण होत गेले तेव्हा निर्णय झाला तो माहेरी परतण्याचा आणि शिक्षण पुढे सुरू करण्याचा…………. तशी ती परतलीही पण मोठ्या मुलाला तिथेच ठेवून!!!

आतापर्यंत शांतपणे ऐकत असताना आता मात्र मी चमकले होते…. तिला म्हटलं अगं मुलाला का नाही आणलेस बरोबर???

ताई अगं कमावत कुठे होते मी तेव्हा…. आणि आजही इतके नाही गं मिळत की त्यालाही शिकवू….. समजेनासे झाले होते गं मला काहीच….चांगले शिकवायचे असेल तर त्याला तिथेच सासरच्या घरी ठेवावे लागणार होते मला….. धाकटा मुलगा आहे माझ्याजवळ!!! मोठ्याला सासरी सांभाळताहेत…. मी माहेरी आल्यावर ब्युटीपार्लरचे शिक्षण घेतले…. आत्ता कुठे जम बसतोय, कष्ट खूप आहेत गं पण!!! मोठ्या मुलाला भेटता यावे रोज म्हणून नौकरी करतेय गं….. त्याच्या शाळेच्याच इथे जॉब मिळालाय , खूप दुर पडते गं…. जवळपास १०० किमी रोज जावे यावे लागते पण तो दिसतो गं रोज…. धावत येतो सकाळी सकाळी माझ्याकडे…… रोज विचारतो, “आई मी तुझ्याकडे कधी येणार?” …..झालयं गं आता माझा जम बसतोय… स्वत:ची जागा घेतलीये…….. आणि फक्त सहा आठ महिने मग मी माझ्या मुलांबरोबर राहीन!!!”

तिची स्वप्न , कळकळ… लेकरांसाठी आसुसलेली तिच्यातली आई…. तरिही खंबीरपणे उभी रहाणारी स्त्री तिच्या बोलण्यातून जाणवत राहिली मग…… नवऱ्याच्या माघारी त्याच्या कुटूंबाशी लढणारी , त्यांनी केलेल्या अनेक आरोपांना धिटाने नेटाने सामोरी जाणारी, आर्थिक व्यवहारातही सासरी आपली फसवणुक होतीये याचे भान हळूहळु येणारी, व्यवहार म्हणजे काय हे माहित नसलेली पण आता मुलांसाठी पै अन पै साठवणारी ती बेट्टीसारखीच मनात जागा मिळवत होती……माहेरी रहाणेही सोपे नसते ताई म्हणणारी ती अचानक वयापेक्षा १० वर्षानी मोठी वाटत होती… तर सांग बरं गेल्या महिन्यात माझे किती पैसे साठले असतील असे लहान मुलासारखे विचारताना तितकीच खोडकर अल्लडही वाटत होती……

एरवी हे वय संसारात स्थिरावण्याचे पण तिशीही न गाठलेली ती मात्र सासरच्यांनी केलेल्या आर्थिक फसवणुकीविरुद्ध कोर्टकचेऱ्या करून दमून जात होती…. तरिही जिद्द हिम्मत बाळगुन होती …. सासू नियमितपणे मोठ्या मुलाला माझ्याविरुद्ध उभा करायचा प्रयत्न करतेय पण तिचे प्रयत्न हाणुन पाडुन मला स्वत:ला आणि मुलांना उभे करायचेय हे सांगत असताना तिच्या चेहेऱ्यावरचा निश्चय अगदी स्पष्ट दिसत होता…..

स्त्रीत्व…. शक्ती … समानार्थी वाटाव्या अशा संज्ञा खरं तर!!! बहुतेक सगळ्यांमधेच असावी ही स्वत्त्वासाठी लढण्याची ताकद…. पण जोवर परिस्थिती प्रतिकुल होत नाही या विलक्षण हिम्मतीची आपल्याला कल्पनाही नसते!!! करु शकते ती- शक्ती…. पुन्हा विचार येतो मग की या स्त्रीयांवरही कधी परिस्थितीने घाला घातला नसता तर यांनी ओळखली असती का त्यांच्यातच दडलेली ती खंबीर स्त्री-माता!! आपल्यातले सामर्थ्य असे आपल्यालाच अनोळखी असते!!!

बेट्टी असो किंवा मला भेटलेली ’ती’ असो….. साम्य जागेचे, घटनांचे कालावधीचे नसेलही… साम्य आहे वृत्तीचे… हिरकणीची वृती….. नॉट विद आऊट माय चाईल्ड…. आमच्या मुलांशिवाय नाही- आणि आमच्या मुलांसाठी काहिही असा दुर्दम्य विश्वास, आशा असणाऱ्या या स्त्रीया पाहिल्या की अभिमान वाटतो त्यांचा!!! डोळ्यातले पाणी कणवेचे सहानूभुतीचे नाही उरत मग, ते असते केवळ कौतूकाचे!!!

Advertisements

मैत्र…. (भाग २)

मैत्र भाग १…

” आज ना मला  माझ्या लेकाबद्दल बोलायचेय रे…. ” ती सांगत होती…

“असली सुरूवात….एकदम मुद्दाच ….. म्हणजे आजचा एपिसोड हा सामाजिक नसून पारिवारीक आहे असे दिसतेय… त्यातही लेकाबद्दल,  त्याशिवाय झाशीची राणी हत्यारं म्यान करून अंगाई गीत गायच्या नाहीत….. अगं मला वाटलं इथे एव्हाना कोणितरी प्रचंड रागावलेले असेल… मी तर त्यादृष्टीने तयारी पण करून आलो होतो… तुझी लाडकी भेळ आणि मोगऱ्याचे गजरे आणलेत बघ ” तो हसतच बोलला….

” अरे वा भेळ आणि गजरे… एक मला आणि एक बायकोला ना!!! 🙂 पण बोलू देत आज मला आधि…..अगदी बरोबर आहे रे तुझे…  हळवी झालेयं मी हे खरयं….. तूला माहितीये ना माझा नवरा कसा आहे??? ” …..ती

“न–व–रा sssssss!!!! अगं बाई माझी त्याचं काय??? त्याने काय केलय आता??? ” तो जवळपास ओरडलाच…..

दोन वर्षापुर्वीची त्यांची भेट आठवली त्याला अचानक… दुसऱ्या दिवशी ती एका वकिलांकडे जाणार होती… तिच्या एका जवळच्या नातेवाईकांनी आपल्या मुलाच्या मानसिक आजाराबाबत माहिती लपवून त्याचे लग्न लावून दिले होते…. लग्नानंतर झाला प्रकार उघडकीस आल्यावर त्या मुलीने घटस्फोटाचा अर्ज दिला होता…. आम्ही मुलीला पुर्ण कल्पना देणार आहोत असे हिलाही त्या नातेवाईकांनी कबूल केलेले होते पण प्रत्यक्षात मात्र त्या निरागस मुलीची फसवणूक झाली होती….. त्यावेळी आपल्या दिर-जावेच्या विरोधात जाऊन हिने त्या मुलीला पुर्ण मदत केली होती….. नंतर पुतण्यालाही त्याची ट्रीटमेंट घेण्यात मदत केली होती… पण आधिच सासरी नावडती असणारी ही मात्र या प्रसंगानंतर अजुनच मनातून उतरली होती…..

आपण तिला भेटून सांगितलेही की उगाच लोकांच्या भानगडीत पडू नकोस…. काहिही झाले तरी खरं वागणे बोलणे सगळ्यांनाच नसते पटत हे त्याचे मत होते!! पण नेहेमीप्रमाणे ही आपला मुद्दा पटवून गेली होती….. पण यावेळेस एकदम नवऱ्यावरच हल्ला आहे म्हटल्यावर तो गोंधळला…..

“चूप!!!  ओरडतोयेस काय??? नवऱ्याबद्दल असे की एरवी तो ढीग चांगला असला तरी त्याची काही मतं जाचक वाटतात आम्हाला…. त्याच्या काही समजूती आम्हाला पटत नाहीत… एरवीचे त्यांच्या घरचे देव देव करणे वगैरे, जाती पातींबद्दल बोलणे मला पटत नसले तरी मी ऐकते बरेचदा पण आता माझ्या मुलाचा प्रश्न आहे तेव्हा मी काहिही ऐकणार नाहीये….. त्याविषयावर आहे आजची आपली चर्चा!!! “……

“बोला आता.. ऐकतोय मी…..” …. तो म्हणाला…

“तरं बघ झालयं असं की माझा लेक प्रेमात पडलाय 🙂 आणि आता ही बातमी त्याच्या बाबाला सांगून बाबाचे या विषयावरचे मतं मला जाणून घ्यायचे आहे…. आधि तूझ्याशी बोलूयात म्हणून तुला बोलावले आहे….. ” ती

” अगं मोजून साडेबावीस वर्षाचा आहे ना तुझा लेक…. नुकताच हापिसात जातोय… त्याला सांग करियर कर ना जरा आधि!! कसली घाई आहे एव्हढी??? …..बरं मुलगी कोण आहे? तू भेटलीयेस का तिला??? डोळे उघडे ठेवलेस की चिरंजीव दाखवताहेत आणि तुम्ही त्यांच्यासाठी म्हणून जपलेला हळवेपणा उधळलात??? तिचं शिक्षण काय? आई-वडिल कसे आहेत? काय आहेत? अगं खूप मुद्दे असतात गं…..  आणि तुझ्या त्या कार्ट्याला बापाला सांगता येत नाही का डायरेक्ट काही… बाप काही अगदी हिटलरच आहे का त्याचा….” तो बोलतच राहिला ..

“अरे जरा दम घे… आणि माझ्या नवऱ्यासारखे बोलणे बंद कर आधि!!! हे बघ मुलगी सुंदर आहे… माझ्या लेकाईतकीच शिकलेली आहे….. ते दोघे एकमेकांना गेली २ वर्ष ओळखताहेत आणि मी तिला गेले सहा महिने ओळखतेय….फक्त…. ” ती सांगत होती,

“सगळं ठरलयं म्हणजे मायलेकाचं मग बापाची गरज काय तुम्हाला??? आणि ’फक्त..’ काय आहे?” तो

“फक्त असं की मुलगी एकुलती एक आहे आणि तीचे आई-वडील तिच्यावर अवंलबून आहे्त….. आणि ’जात-पात’ या आघाडीवर थोडा घोळ आहे… त्यांची जात वेगळी आहे…. आता हे सगळ्ं मला नवऱ्याशी बोलायचं आहे….. म्हणजे बघ तसं ८०% ठरलयं सगळं पण उरलेले २० % संमती मिळाली की झालं!!!” तीने सांगितले….

“८०% —- २०% हे काय? आणि तुझा नवरा जात मानतो…ही माहिती नवी आहे बुवा… ” तो मिश्किलपणे म्हणाला…. त्याला आता आजच्या तिच्या हळवेपणाची गंमतही वाटायला लागली होती…. एरवी कितीही धिटुकली असणारी आपली मैत्रीण मुलाचा मुद्दा आला की टिपीकल आईच असते हे माहित असलेले सत्य तो पुन्हा अनुभवत होता…..

“म्हणजे मी, माझा लेक आणि अबोली हे तयार आहेत तेव्हा ८०% आणि माझा नवरा आणि तिचे आईवडिल हे उरलेले २०%…. म्हणजे मेजॉरिटी विन्स हा न्याय आहे इथे…. तिच्या आई-वडिलांची जरा कुरकुर आहे….. तेव्हा माझ्या नवऱ्याने त्यांना समजवायचे अशी आमची अपेक्षा…. सगळे हवेत ना रे आणि ते ही मनापासून…. नाहितर त्रास होतो रे …..” ती म्हणाली…

” 🙂 मला आवडली ही ८०%-२०% ची थेअरी….. माझा रोल काय आहे आता यात?? ”

“हे बघ मी काही इथे प्रश्नपत्रिका सोडवायला आलेले नाहीये… तू ठरव ना काहीतरी….. ” हळवेपणाचा त्रागा होत होता आता….

“वेडाबाई अग्ं ईतका का कठीण करते आहेस हा पेपर…. मी आधि तुमच्या त्या ’अबोली’ ला भेटतो मग ठरवतो पुढचे काय ते…. आणि तुझ्या नवऱ्याची काळजी करू नकोस ते माझ्याकडे लागलं….. लव्ह मॅरेज असलं तरी ते शक्यतो एका जातीतच असावं हे त्याचं मत मलाही पटतयं कारण त्यामूळे ’आमच्यात असं तुमच्यात तसं’ असले लहानसहान मुद्दे वादाचे कारण कमी होतात…. तरिही आपली मतं मुलांवर सगळीकडेच तो लादणार नाही गं!!! तो कडक वागतो कारण घराची घडी बिघडू नये… तुम्ही तर त्या बिचाऱ्याला अगदीच वाईट ठरवायला निघालात 😦 ……. तूला एक सांगू का आज तू डिट्टो माझ्या बायकोसारखी वागते-बोलतेयेस… वो मेरी ’मैत्रीण’  आज दिखाई नही दे रही है!! तुझा फोन आला तेव्हा मनात धाकधूकच होती माझ्या पण आज तर इथे एकदम घरगुती प्रश्न होता….  ” तो बोलता बोलता हसत होता आता….

त्याच्या हसण्यात ती ही सामिल झाली मग… “मला नक्की कसलं ओझं वाटतं होतं ते कळतं नव्हतं रे….. म्हणजे हे सगळं नवऱ्याला सांगायचं की आता लेकाचे लग्न होणार, तो थोडा दुरावणार…. समजत नाहिये पण चलबिचल होतीये बघ मनात… म्हणजे सतत संमिश्र भावना…. खूप आनंद होतो मग काहितरी हुरहूर…. आता छान वाटतयं …. तुझ्याशी बोलायचं होतं मला आज……” ती मग बोलतच राहिली खूप खूप काही…. मुलाचं बालपण, त्याचं शिक्षण, नवी सुनं, तिच्यासाठीचे दागदागिने….. विषयाला वाट फूटेल तसे ते वहात होते…. मधेच ती अचानक ओरडली, ” ए मी बेटातल्या अरूणा ईराणीसारखी सासू होईन की डोली सजाके रखनातल्या मौशमी सारखी…. मला दोघी आवडतात!!! 🙂 ”

आता हिची गाडी आलीये रूळावर त्याच्या लक्षात आले… “भेळ खाऊया का की बडबडीवरच पोट भरायचेय..” तो तिला थांबवत म्हणाला….. भरपेट गप्पा मारून ते निघाले… निघताना तो म्हणाला, ” तुझं पण वय झालयं आता!!! 😉 ” ती चक्क न चिडता नुसती हसली.

गाडीपाशी पोहोचताना तिने पटकन मोबाईल काढून ’Done 🙂 ‘ असा एक sms पाठवला….. गाडीत त्याने टेप लावलेला होता, किशोर गात होता… “फिर वही रात है!!!” तिचे अत्यंत आवडते गाणे…. ती त्याला नेहेमी म्हणायची कायम माझी लाडकी गाणी लावतोस तूला आवडी निवडी नाहीत का रे…. तो म्हणायचा, “मला तू आवडतेस!!! :)”

घरी पोहोचले ते….. तिचे मस्त आल्याचा चहा केला… त्याच्या हातात कप देऊन ती काही कामाने किचनमधे गेली…तेव्हढ्यात दार उघडून तिचा लाडका लेक आला दारातूनच ओरडला, “माँ मी आलोय….” …. टीपॉयवर वाफाळत्या चहाचा कप पहाताच लेकाने आनंदाने तो उचलला…..

आत्तापर्य़ंत शांत बसलेला तो ओरडला, ” कप खाली ठेव तो चहा माझ्यासाठी आहे!!!”

तीदेखील आतून ओरडली, ” पिल्लू आधि हात-पाय धूवून ये मग चहा देतेय!!”

“This is not fair aai….. बाबासाठी वेगळे नियम आणि आम्हाला वेगळे असे का ??? तो पण ऑफिसमधून आल्यापासून इथेच बसलाय ना!!!”

लेकाला अडवत तो म्हणाला, ” ’अबोल’ पणे कप देतोस की ८५% चे पुन्हा ८०% करू???? 🙂 ”

आपल्या बाबाच्या डोळ्यातले मिश्किल भाव पहाता त्याला मगाशी आईने पाठवलेला sms आठवला….. बाबा आपल्याकडे मायेने पहातोय की चिडवतोय समजत नाहीये पण डोळे भरलेले दिसताहेत त्याचे….. लहानपणी आपण कधी खोटं बोललो, गृहपाठ केला नाही की बाबा चिडायचा पण आई नेहेमीच काहितरी जादू करायची मग बाबा असाच पहायचा आपल्याकडे….. लेक चटकन मिठीत शिरला बाबाच्या… लहानपणी शिरायचा तसा……

एव्हाना ती किचनमधून बाहेर येऊन उभी राहिली होती… तिच्याकडे पहात ते दोघेही म्हणाले, “Love u!!!”

ती हसतच म्हणाली, “Love u ‘two’ !!!”

मोगऱ्याचे दोनही गजरे तिने माळले होते तेव्हा……

मैत्र…..

त्याची मिटिंगला जायची तयारी जवळपास पुर्ण झाली होती…. सगळ्या फाईल्स वगैरे पुन्हा तपासत असतानाच त्याचा फोन वाजला….. कपाळाला जरा आठ्या पाडतच त्याने फोनवर नंबर पाहिला….. नंबर त्याच्या ओळखीचाच होता….. तरिही त्याला आश्चर्य वाटले, हिचा फोन आत्ता… हे कसे काय बुवा??? जवळपास २ वर्षानी तिने त्याला फोन केला होता…..

गेल्या जवळपास पंचवीस वर्षांची मैत्री होती त्यांची…… लग्नापुर्वीची!!! लग्न, बदललेल्या नौकऱ्या, मुलंबाळं , त्यांची शिक्षण सगळे अडथळे पार करतही तशीच टिकलेली!!! तो मात्र तिला अगदी क्वचित फोन करायचा….. तिचे तसे नव्हते…..अधुनमधून फोन करून ती त्याला भेटायला बोलावून घ्यायची!!!

त्याची बायको मात्र त्याला शक्यतो ऑफिसमधे फोन करत नसे….ती स्वत: जॉब करत असतानाही तिला घरून विनाकारण कोणी फोन केलेला आवडत नसे….. एथिक्स वगैरे मुद्दे ठाम असायचे तिचे… पण  ही मैत्रीण म्हणजे एक वेगळेच रसायन होते…..  मी वाटेल तेव्हा फोन करणार हा मैत्रीचा हक्क तिने राखून ठेवला होता….

विचारातच त्याने फोन उचलला………. “बोला मॅडम आज अचानक पामराची आठवण केलीत….. काही विशेष ??? ” तो म्हणाला…

“हो रे , मला भेटायचयं तूला…. बोलायचयं महत्त्वाचं… ” ती म्हणाली.

“ठीक आहे मला आत्ता एक मिटिंग आहे , ती आटोपतो आणि तूला बागेत गाठतो… चालेल ना!!”…. त्याने विचारले.

तिची परवानगी घेऊन फोन ठेवताना त्याच्या मनात पुन्हा विचार आले, आता या बयेने काय नवा पराक्रम केलाय राम जाणे!!! ’बिन्धास्त’ हे एकमेव विशेषण त्याने आणि त्यांच्या ग्रूपने तिला दिलेले होते…. मनात येईल ते बोलणे…. तूफान चांगले वागणे…. रागावली की तोंडाचा पट्टा सोडणे…. खरेदी तर जीव की प्राण होता तिचा….. उत्स्फुर्त असे तिचे वागणे त्याला कायम आवडायचे….. अश्याच कुठल्यातरी तिच्या बडबडीनंतर त्याने तिला वचन दिले होते की मी आयुष्यभर मित्र राहिन तुझा… तू हाक मारलीस की मी येणारच…. 🙂 …… आपली बायकोही तर अशीच होती नाही लग्नाआधि, प्रपंचातल्या अनेक जबाबदाऱ्या , मुलं , आपल्या घरच्यांच्या वेळोवेळच्या टोमण्यांमधे ती कुठेतरी हरवत गेली असे वाटते कधी कधी….. पुन्हा एकदा दोघिंची तुलना मनात झाली त्याच्या…..  त्या दोघिंचीही  रूपं त्याला अतिशय आवडती होती एकीचे मनमोकळेपणं आणि एकीचे समंजसपणं….. .

एका मागोमाग एक येणारे विचार त्याने मागे सारले आणि मिटिंग गाठली….. मिटिंग आटोपून तो लगेच बाहेर पडला….. ट्रॅफिकच्या भाउगर्दीतून तिच्यापर्यंत बागेत पोहोचताना त्याला उशीरच होणार होता….. ती आपल्याआधि पोहोचली असणार आणि आपल्याला जसजसा उशीर होईल तसतसा पारा चढत असणार तेव्हा बचावासाठी त्याने वाटेत थांबून तिच्यासाठी तिची आवडती भेळ पार्सल करून घेतली….. बागेपाशी पोहोचला तर मोगऱ्याचे गजरे विकणारी बाई दिसली त्याला….. त्याने पटकन दोन गजरे घेतले…. आता तिचा राग आवरणे सोपे काम होते त्याच्यासाठी अगदी!!!

एका डेरेदार झाडाखाली ती बसलेली दुरूनच दिसली त्याला…. समोरच्या झाडाकडे आणि तिथे खेळणाऱ्या मुलांकडे तन्मयतेने पहात असलेली ती!!! अजिबात बदलली नाहिये ही असा मनात विचार करतच तो तिच्या बाजूला जाऊन उभा राहिला आणि तिच्या कानात जोरात तिचे नाव ओरडला…..

दचकून तिने पाहिले आणि ओरडली, ” शोभतेय का रे गधड्या असले उद्योग… अरे गेल्या महिन्यात वयाची पंचेचाळिशी ओलांडलीस ना!!! लहान आहेस का ८-१० वर्षाचा उगा बालिशपणा आपला….”

तो हसला, तिच्याशेजारी बसत म्हणाला, “बोल आता बये काय झालयं , कशाला बोलावलेस असे अचानक…. ठीक आहे ना सगळे… की आपणच वाढवा केलात काही ??? ”

“चूप रे , बोलायचेय महत्त्वाचे जरा…. ”  आणि ती सांगू लागली…..

क्रमश:

(तळटीप: ब्लॉगवर पहिल्यांदाच कथा टाकतेय… मला स्वत:लाच क्रमश: प्रकार आवडत नाही … तेव्हा निषेधाला सुरूवात माझ्यापासूनच… 🙂 …. कंटाळाही आलाय टायपायचा आणि पाल्हाळ न लावेन तर मी कसली… मग वाचकांच्या सहनशक्तीच्या मर्यादा लक्षात घेता आज ईतकेच वाचन पुरे… बाकि उद्या!!! )

खो…..

छळ मांडलाय या खो प्रकरणाने गेले काही दिवस……. म्हणजे ’मला झोप येत नाही माझे चैन गायब झाले ssssss’ अशी अवस्था झाली होती…. (वरील ओळी ’मुझे निंद ना आये मुझे चैन ना आये’ या गाण्याचे भाषांतर आहे….. 🙂

थोडक्यात पुढे वाचायचे की नाही ते इथेच ठरवा… 😉  नंतर डोके दुखायला लागल्यास , चिडचिड झाल्यास, आपला वेळ वाया गेला असली काही भावना आल्यास माझा अजिबात दोष नाही…. ईथवर आला असाल तर स्वत:च्या जबाबदारीवर पुढे वाचा!!!! शक्यतो भिंतीजवळ बसा नंतर डोके आपटावे वाटल्यास सोयीचे होईल …. 🙂

तर सुरूवात झाली ती गाणे निवडण्यावरून…. जाम सुचत नव्हते….. न्युनगंड कशाला म्हणतात ते समजले अक्षरश: ……तरी घाईघाईने श्रीताईच्या आधि उरकतेय हा प्रकार म्हणजे तिने केलेला सुंदर अनुवाद वाचून लोक इथला मानसिक छळ विसरतील 🙂

भाषांतर या शब्दाचा अर्थ निवडलेल्या गाण्यासाठी आपली ’भाषा’ आणि मुळ अर्थापासून जरासे (लक्ष द्या खूप नाही) ’अंतर’ असा सोयिस्कर लावून घेतल्यावर जरा हुश्श केले आणि म्हटलं ,”आने दो!!”   🙂

निवडलेल्या गाण्याची गायिका कू/सौ. (माहित नाही) शनाया ट्वेन आहे…. मला साहेबाच्या भाषेतली बरीच गाणी आवडतात आणि समजतात (असा माझाच समज आहे…. स्वत:बाबतीत मला कुठलाही समज असू शकतो …लोकशाही आहे!!! ) …

गाणी हा प्रकारच तूफान फ्येव्हरेट असणाऱ्या माझ्यासारख्या गद्य व्यक्तीने (मला आमच्या थेअरी सबजेक्टमधे नेहेमी बरे मार्क असायचे 🙂 ) ही असली तोडमोड करू नये खरं तर पण कभी कभी मेरे भी दिल मे खयाल येतो की ’का नाही करायचे?  करून बघू एकदा ….’

मुळ गाणे, (मुद्दाम लिरिक्स वाले गाणे टाकलेय… सगळेच माझ्यासारखे हुशार नसले मग!!! आणि खर्राखुर्रा विडिओ टाकला तर या गाण्यांमधे मधेच केव्हा काय येइल भरवसा नाय बा.. तेव्हा लिरिक्सच बरे!!!! )

आठवणींच्या राज्यातल्या त्या,

ओळखीच्या वळणावर…..

नेहेमीच मग पुन्हा विचार येतो…..

अजुनही तूच आहेस,

ज्याच्यात गुंतलाय श्वास……

सुख् दू:ख रागलोभाच्या पलीकडल्या या ,

नात्याचीच आपल्याला आस…..

आठवतं तूला ,

प्रवाहात मन मारून धारा न होता……..

प्रवाहाविरूद्ध पोहून राधा व्हायचा,

निर्णय मी घेतला जेव्हा…….

निरूद्योगी अनेक सरसावले ,

सोपं नाहिये बरं का!!

येता जाता म्हणु लागले…..

सोपे नसतात बघ सारे रस्ते,

ओळखीच्या रस्त्यांवरही तर असतातच खड्डे……

अनोळखी रस्त्यांची खुमारी नवी,

निदान नव्या ठेचा लागतात पायी……

नियतीचे निर्णय नी प्राक्तनाची मर्जी,

यावर का ठरायचे सारे….

फसव्या कल्पना नी खुळचट भावना,

यापलीकडले आयूष्यच न्यारे!!!

आठवणींच्या राज्यातल्या त्या,

ओळखीच्या वळणावर…..

नेहेमीच मग पुन्हा विचार येतो…..

कधितरी पुन्हा घ्यावा हातात हात,

सांगावे तूला मनापासून आज…..

माझ्यातल्या मी ला,

तुझ्यातल्या तू ने जपले…..

तुझ्यातल्या तू साठी,

मी जगाशी भांडले…..

खरयं रे अगदी खरयं,

अजुनही तूच आहेस,

ज्याच्यात गुंतलाय श्वास……

सुख् दू:ख रागलोभाच्या पलीकडल्या या ,

नात्याचीच आपल्याला आस….. 🙂

हुश्श!!! संपले … सुटले एकदाचे…….

(नेहेमी हा ब्लॉग आणि पोस्टा वाचणाऱ्यांनो ..नवे जर कोणी आले तर त्यांचा विचार करा रे!!! तुम्हाला हा अत्याचार सहन करायची सवय आहे… 😉 )

आवरा आवरा हे ’खो आवरा!!!! 🙂

(तळटीप:  अमित (अस्मादिकांचे मंगळसुत्र) बाबा रे ईतर कोणाला समजो न समजो तूला नक्की समजेल रे मला काय म्हणायचेय!!!)

माझा खो शिनूला ….