नॉट विद आऊट माय चाईल्ड…..

ती बेट्टी आणि तो मुडी….. त्यांचा देश वेगळा, धर्म भाषा सगळेच वेगळे….. ती अमेरिकेची तर तो ईराणचा….. तिच्या आजारपणात त्यांची ओळख झाली तिचे पर्यवसान प्रेमात आणि पुढे लग्नात झाले….. सगळे सुरळित…. सुखात चालले होते.

लग्नानंतर काही वर्षानी काही दिवसांसाठी म्हणुन तो तीला घेऊन ईराणला जातो… सोबत असते त्यांची चार वर्षाची चिमुरडी ’माहतोब’ …..  तिथे पोहोचल्यावर बेट्टीला जाणवतो तो दोन वेगळ्या देशांच्या संस्कृतीतला जमीन अस्मानाचा फरक…. मुक्त आयुष्य जगलेल्या बेट्टीला ईराणमधल्या बंधनांमधे जगणे शक्यच नसते…… तरिही काहीच दिवसाचा तर प्रश्न आहे असे स्वत:ला समजावत ती कसेबसे दिवस मोजायला सुरूवात करते….. ’माहतोब’ साठीही परिस्थिती खूपशी आवडणारी नसतेच… ती बिचारी तिच्या परीने स्वत:ला सावरून आपल्या आईच्या आधारात तिथे रहाते….

आणि अचानक एक दिवस बेट्टीसमोर एक कटु सत्य येते …. तिची आणि तिच्या लेकीची फसवणुक झालेली असुन आता आपल्याला इथून कधिही परत जाता येणार नाहीये….. तिच्या मनात सतत भेडसावणारी शंका सत्याच्या रुपात बेट्टीसमोर येते….. मग सुरू होतो तो तिचा लढा ….. देश परका, लोक परके, नातेवाईकांचा कडा पहारा….. भाषा अगदीच अनोळखी…….. या सगळ्यातून तिला बाहेर निघायचेय, एकटीला नव्हे चिमुरड्या ’माहतोब’ सह…..

अकस्मात आलेल्या या संकटातला बेट्टीचा एकमेव आधार ’माहतोब’….. जिला नक्की कुठे काय बिनसलेय हे ही समजत नाहीये अजुन….. काही काळच्या चिवट संघर्षानंतर मुडी बेट्टीला अमेरिकेत जायची परवानगी देतो पण अट एकच की ’माहतोब’ ला नेता येणार नाही…. ही अट मान्य करणे बेट्टीला कदापी शक्य नसते आणि मग लढा तोच पण आता ध्येय अजुनच स्पष्ट झालेले…. हा देश सोडुन मी माझ्या देशात परतेनच पण ’नॉट विद आऊट माय डॉटर….’

बेट्टी महमुदीचे ’नॉट विद आऊट माय डॉटर….’ वाचताना आपण कधी तिच्या या लढ्यात तिच्याबरोबर सामिल होतो कळतही नाही…… जाणवते सतत तिची आपल्या लेकीसाठीची तगमग…. त्यासाठी प्रसंगानुसार अधिकाधिक खंबीर होत गेलेली तिच्यातली ’आई’ ….. मुडीचा , त्याने केलेल्या फवणुकीचा, त्याने बेट्टीच्या मातृत्त्वाच्या केलेल्या अपमानाचा राग येत रहातो मग…… कशीबशी मदत मिळवत , लढत, काहीवेळा खचत बेट्टी मग टर्कीमार्गे अमेरिकेत पोहोचण्यात यशस्वी होते…. अर्थातच एकटी नाही… तर ’विथ हर डॉटर….’

पुस्तक वाचून बाजूला ठेवले तरी बेट्टी आणि तिचा संघर्ष दिर्घकाळ मनात रेंगाळतो….. कधितरी अचानक वर येतो असेच कोणी पुन्हा दिसले की…..याहीवेळेस तेच झाले….

तिला स्वत:चे ब्युटीपार्लर  सुरू करायचे आहे…. एकीकडे ऑफिसमधे जॉबही करतेय ती….. ऑफिसमधून आल्यावर उरलेल्या वेळात पार्लरच्या कामात ती झोकून देते स्वत:ला वगैरे जुजबी माहिती मिळाली होती तिच्याबद्दल….. दुसऱ्या दिवशी ती येणार याहून जास्त उत्सुकता वाटण्याची गरजही नव्हती आणि तशी ती वाटलीही नाही…… ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी दुपारी आली ती……  भर दुपार हातातल्या मोठ्या पिशवीचे ओझे सावरत, एकीकडे ओढणीने घाम टिपत….. दारातून आत आली नी प्रसन्न हसली…. तिचा दमलेला चेहेरा विलक्षण मोहक वाटला तेव्हा, नाही म्हटले तरी पहिल्या भेटीतच आवडून गेली ती……

एकीकडे काम सुरू झाले तिचे आणि एकीकडे बडबड….. पार्लरवाल्या बायांची बडबड तरी काय तर तुम्ही आधि ज्या कुठल्या पार्लरमधे गेलात त्यांनी कसे तुमचे आयब्रो, फेशियल चुकवलेत वगैरे….. मनात वाटलं हीची गाडी त्याच रस्त्यावर धावणार हळूहळु….. डॉक्टरकडे आणि पार्लरमधे तुम्हाला आधिच्या ट्रीटमेंटमधे कसे फसवले गेले आहे हे समजावून सांगणे जणु आद्य कर्तव्य असल्यासारखे ते पार पाडले जाते, हे माझे कायम मत होते. पण ती बोलायला लागली आणि लक्षात येत गेले इथे प्रकार तो नाहीये…..

कथा नाही पण व्यथा साधारण तशीच बेट्टीसारखी…… ती सांगत होती आणि बेट्टी पुन्हा पुन्हा डोकावत होती मनात….. जणू म्हणत होती ऐक ऐक अशीच रडायचे मी पण….. बेट्टीचा देश वेगळा होता हिच्याबाबत देश तोच भाषा तीच … फसवणुक करणाराही नवरा नाही…. फसवणूकीला सुरूवात केली होती ती देवाने….तीचे लग्न झाले एका सधन कुटूंबात… माहेरी परिस्थिती ठीक होती तशी…. लग्न झाल्यावर तिला समजले की दिसते तसे नसते, वरवर सुखवस्तू असणाऱ्या कुटूंबातला जाच सहन करणे दिवसेंदिवस अवघड होत जात होते. अश्यातच तिच्या पहिल्या मुलाचा जन्म झाला…. नवऱ्याने मात्र   तिची साथ कधिही सोडली नाही.

रोजच्या कटकटींना, तिच्यावरच्या अन्यायाला तो ही कंटाळला मग….. सामंजस्याने प्रश्न सुटणार नाहियेत हे लक्षात आल्यावर त्याने वेगळे घर घेतले….. आधिच्या घरापासून दुर तरिही अडीअडचणीला जाता येईल असे………. सुखाचा संसार पुन्हा सुरू झाला ….. आणि जन्म झाला दुसऱ्या मुलाचा….. दृष्ट लागू नये कोणाची असे तिला कायम वाटत असे….. पण व्हायचे ते झालेच……….. काही कामाच्या निमित्ताने घराबाहेर पडलेला नवरा घरी आलाच नाही….. अपघातात त्याचा मृत्यू झाल्याची बातमी तेव्हढी आली.

हिचे वय २६ किंवा २७ … शिक्षण कमीच….. आता करायचे काय? ह्या प्रश्नाने भेडसावले तिला….. माहेरची परिस्थिती माहित होतीच तिला…. शेवटी नाईलाजाने ती परतली ती तिच्या सासरी….. आता तर आरोप वाढले होते, नवऱ्याचा घास घेणारी हे नवे बिरूद लावून सासूबाई मोकळ्या झाल्या होत्या….. सासऱ्यांना वाटणारी कणव पुरेशी नव्हती…. तरिही ते हिला शक्य तेव्हढा धीर देत होते…… दिवस काढणे अधिकाधिक कठीण होत गेले तेव्हा निर्णय झाला तो माहेरी परतण्याचा आणि शिक्षण पुढे सुरू करण्याचा…………. तशी ती परतलीही पण मोठ्या मुलाला तिथेच ठेवून!!!

आतापर्यंत शांतपणे ऐकत असताना आता मात्र मी चमकले होते…. तिला म्हटलं अगं मुलाला का नाही आणलेस बरोबर???

ताई अगं कमावत कुठे होते मी तेव्हा…. आणि आजही इतके नाही गं मिळत की त्यालाही शिकवू….. समजेनासे झाले होते गं मला काहीच….चांगले शिकवायचे असेल तर त्याला तिथेच सासरच्या घरी ठेवावे लागणार होते मला….. धाकटा मुलगा आहे माझ्याजवळ!!! मोठ्याला सासरी सांभाळताहेत…. मी माहेरी आल्यावर ब्युटीपार्लरचे शिक्षण घेतले…. आत्ता कुठे जम बसतोय, कष्ट खूप आहेत गं पण!!! मोठ्या मुलाला भेटता यावे रोज म्हणून नौकरी करतेय गं….. त्याच्या शाळेच्याच इथे जॉब मिळालाय , खूप दुर पडते गं…. जवळपास १०० किमी रोज जावे यावे लागते पण तो दिसतो गं रोज…. धावत येतो सकाळी सकाळी माझ्याकडे…… रोज विचारतो, “आई मी तुझ्याकडे कधी येणार?” …..झालयं गं आता माझा जम बसतोय… स्वत:ची जागा घेतलीये…….. आणि फक्त सहा आठ महिने मग मी माझ्या मुलांबरोबर राहीन!!!”

तिची स्वप्न , कळकळ… लेकरांसाठी आसुसलेली तिच्यातली आई…. तरिही खंबीरपणे उभी रहाणारी स्त्री तिच्या बोलण्यातून जाणवत राहिली मग…… नवऱ्याच्या माघारी त्याच्या कुटूंबाशी लढणारी , त्यांनी केलेल्या अनेक आरोपांना धिटाने नेटाने सामोरी जाणारी, आर्थिक व्यवहारातही सासरी आपली फसवणुक होतीये याचे भान हळूहळु येणारी, व्यवहार म्हणजे काय हे माहित नसलेली पण आता मुलांसाठी पै अन पै साठवणारी ती बेट्टीसारखीच मनात जागा मिळवत होती……माहेरी रहाणेही सोपे नसते ताई म्हणणारी ती अचानक वयापेक्षा १० वर्षानी मोठी वाटत होती… तर सांग बरं गेल्या महिन्यात माझे किती पैसे साठले असतील असे लहान मुलासारखे विचारताना तितकीच खोडकर अल्लडही वाटत होती……

एरवी हे वय संसारात स्थिरावण्याचे पण तिशीही न गाठलेली ती मात्र सासरच्यांनी केलेल्या आर्थिक फसवणुकीविरुद्ध कोर्टकचेऱ्या करून दमून जात होती…. तरिही जिद्द हिम्मत बाळगुन होती …. सासू नियमितपणे मोठ्या मुलाला माझ्याविरुद्ध उभा करायचा प्रयत्न करतेय पण तिचे प्रयत्न हाणुन पाडुन मला स्वत:ला आणि मुलांना उभे करायचेय हे सांगत असताना तिच्या चेहेऱ्यावरचा निश्चय अगदी स्पष्ट दिसत होता…..

स्त्रीत्व…. शक्ती … समानार्थी वाटाव्या अशा संज्ञा खरं तर!!! बहुतेक सगळ्यांमधेच असावी ही स्वत्त्वासाठी लढण्याची ताकद…. पण जोवर परिस्थिती प्रतिकुल होत नाही या विलक्षण हिम्मतीची आपल्याला कल्पनाही नसते!!! करु शकते ती- शक्ती…. पुन्हा विचार येतो मग की या स्त्रीयांवरही कधी परिस्थितीने घाला घातला नसता तर यांनी ओळखली असती का त्यांच्यातच दडलेली ती खंबीर स्त्री-माता!! आपल्यातले सामर्थ्य असे आपल्यालाच अनोळखी असते!!!

बेट्टी असो किंवा मला भेटलेली ’ती’ असो….. साम्य जागेचे, घटनांचे कालावधीचे नसेलही… साम्य आहे वृत्तीचे… हिरकणीची वृती….. नॉट विद आऊट माय चाईल्ड…. आमच्या मुलांशिवाय नाही- आणि आमच्या मुलांसाठी काहिही असा दुर्दम्य विश्वास, आशा असणाऱ्या या स्त्रीया पाहिल्या की अभिमान वाटतो त्यांचा!!! डोळ्यातले पाणी कणवेचे सहानूभुतीचे नाही उरत मग, ते असते केवळ कौतूकाचे!!!

23 thoughts on “नॉट विद आऊट माय चाईल्ड…..

 1. तन्वी,अग्ग not without my Daughter वाचताना मी सुध्दा दंग झालेली…किती चित्तथरारक पुस्तक आहे नं…तीच्या लढ्याचा प्रत्येक क्षण तीच्याबरोबर आपण ही लढत आहोत असे वाटते..एक आई मुलाकरता किती संघर्ष करु शकते ह्याची पुर्ण कल्पना येते…तुला माहिते हे पुस्तक मी ३ दिवसात अगदी आधाशासारखे वाचुन काढलेले..आणि योगायोग असा की ज्या दिवशी बेट्टी ईराणहुन सुखरुप अमेरीकेला पोचते तो ६ फेब्रुवारी दिवस आणि माझे पुस्तक संपवण्याचा दिवस एकच होता… ..आणि वेळ ही भारतीय वेळेनुसार तीच होती..हा निव्वळ योगायोगच होता..पण पुस्तक संपल्यावर थोड्यावेळ मला काही सुचलेच नव्हते..डोके आणि मन अगदी सुन्न !!
  असो !!!
  आशा असणाऱ्या या स्त्रीया पाहिल्या की अभिमान वाटतो त्यांचा!!! डोळ्यातले पाणी कणवेचे सहानूभुतीचे नाही उरत मग, ते असते केवळ कौतूकाचे!!!अगदी खरे लिहीलेस बघ …मस्त झालीये पोस्ट…

  • हो गं माऊ अतिशय विलक्षण आहे बेट्टीचा लढा… ती विमानातून ईराणला उतरल्यापासून ते पुन्हा अमेरिकेत पोहोचेपर्यंत आपल्यालाही रुखरुख लागते…

   आभार गं!!

 2. ताई,
  एकदम अंगावर काटा आला गं वाचताना! खरंच किती मोठा लढा दिलाय ह्या दोघींनी आणि ह्यांच्यासारख्या कित्येकींनी!
  आणि खरंच, ती आंतरिक शक्ती तेव्हाच आपलं रूप दाखवते जेव्हा बाह्य परिस्थिती प्रतिकूल होते. ते म्हणतात ना, माणसाची खरी किंमत प्रतिकूल परिस्थितीतच समजते.
  अशा सर्व मातांना माझा सलाम!
  माऊताई पण वाचायला सांगत होतीच…आता शोधतोच हे पुस्तक!

  • शोध नक्की हे पुस्तक…..

   खरयं तुझं अश्या कित्येक असतील ज्यांनी हा लढा दिलाय…. मुद्दा उरतोच रे जोवर जिवाशी बेतत नाही माणूस स्वत:तल्या शक्तीचा शोध घेत नाही…. म्हणतात ना
   When the going gets tough, the tough gets going…!!

   ब्लॉगचं रुपडं… अरे उगाच बदल थोडा!! 🙂

 3. आई, मुलं वगैरे विषयावर लिहिताना तुम्हा बायकांच्या लेखणीत काय शक्ती येते देव जाणे.. वाचणाऱ्याचे डोळे पाणवल्याशिवाय तुम्ही थांबत नाही… तुझी ही पोस्ट आणि माऊचीही आजची अशीच पोस्ट.. तिथे तर मला काही प्रतिक्रियाही देता आली नाही… का करता असं??

  • हेरंबा .. … अरे हळवेपणात तू काय कमी आहेस होय!!

   जिथे जिथे सामर्थ्य, झुंझ … सकारात्मक शक्ती दिसते तिथे त्यांचे कौतूक होतेच रे आपोआप….

   बाकि डोळे पाणावण्याबद्दल म्हणशील तर ती तुझी संवेदनशीलता म्हणेन मी….. तुझ्या अनेक पोस्ट्स मधून वेळोवेळी प्रकट होतच असते ती!!! आणि अश्या प्रसंगी तर सहवेदनेबरोबरच कौतूकानेही डोळे पाणावतात….

 4. पुस्तक मी पूर्वी वाचलं आहे, आवडलही आहे मला ते. अशा कितीतरी स्त्रिया मलाही अवतीभवती भेटतात आणि त्यांचा लढा पाहताना आपण किती छोटया गोष्टींवरून आपले आणि दुस-यांचे जगणेही कधीकधी खराब करतो हे लक्षात येते.

  • अगदी खरयं…. अश्या कितीतरी अनामिक आपल्या आजुबाजूला असतात…..

   बरेचदा अगतिक असहाय,हतबल होतात, तर बरेचदा अश्या खंबीरपणे लढतात!!

   प्रतिक्रीयेबद्दल आभार!!

 5. बेट्टी काय, ’ती ’ काय… अन ईशान – गौराईत रमलेली तन्वीबाय काय मला तर सगळ्यांचे मूळ एकातच दिसत आहे !

 6. खुप एकुन आहे त्या पुस्तकाबद्दल पण अजुन वाचलेले नाही.आता नक्कीच वाचावे लागेल.तुला भेटलेल्या तीची कहाणीही मनाला चटका लावुन गेली.अश्या सगळ्याच स्त्रियांना सलाम ग….

 7. शिर्षकावरूनच पुढे काय होणार…. म्हणजे डोळे पाण्याने भरणार, हृदयात कालवाकालव होणार हे समजले होतेच. आणि झालेही तसेच. 🙂 तन्वे, मी हे पुस्तक वाचलेय आणि हा सिनेमा दोन वेळा पाहीलाय. मुलांसाठी आई कुठल्याही दिव्यातून जावू शकते हेच खरं.

  तुझ्या त्या मैत्रिणीला लवकरच लेकाबरोबर राहता येऊ देत, हीच प्रार्थना. खूप छान लिहीलंस गं. पोस्ट पडल्यापडल्याच वाचली होती. पण त्यावेळी मन इतके गलबलून आलेले की….. म्हणून थोडा उशीर झाला गं. सॉरी.

  • तायडे अगं उशिरा आली कमेंट तर सॉरी गं काय म्हणतेयेस…. तू नाही कमेंटलीस तरिही तुझी भावना पोहोचू शकतेच ना गं!!

   होय गं… तिला लवकर तिच्या मुलाबरोबर राहू देत हीच प्रार्थना….

 8. खुपच सुंदर लिहले आहे…..
  खुप ऐकल आहे ’नॉट विद आऊट माय डॉटर….’ विषयी..

  आठवद्यपुर्वी हे पुस्तक घ्यायचे म्हणुन हातत घेतले आणि नंतर तसेच ठेवले कि परत घेत येइल म्हणुन पण आता नक्की विकत घ्यावेच लागणार …

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s