रात्र वैऱ्याचीच आहे..(अजुनही :) )…..

इथे एक मुख्य पात्र (ज्याचा उल्लेख ’मुपा’ असा करणार आहे मी पोस्टेत… ) आणि तीन साईड पात्र आहेत…. सगळीच मंडळी एकसे एक ’पात्र’ असल्यामुळे ’पात्रं’ हे नाव हा नाटकाचा अंक बिंक असला कुठलाही विचार मनात न ठेवता पात्रतेनुसार ते पात्र या नावास पात्र आहेत….. मुपा म्हणगे गौराई हे आमचे साडेतीन वर्षाचे ’पात्र’ असुन बाकि पात्र इथे नाममात्र आहेत J

उल्लेखानुसार :

मोठी चादर- मुपाचे आई-बाबा (कोणिही एक , प्रसंगानुसार)

छोटी चादर- ईशान

——————————————–

—गुडनाईट मम्मा…

—गुडनाईट बाबा…

—गुडनाईट ईशान…

(’गुडनाईट गं बये!!! किती वेळा गुडनाईट म्हणशील , झोप ना आता…’ गेल्या निदान अर्ध्या तासाची मुपाची चुळबूळ सहन करणाऱ्या ईतर तीन पात्रांपैकी कोणितरी एक वैतागून म्हणेल!!!)

—गुडनाईट गौई sss ….

(आता सदर मुपा स्वत;लाच रोज गुडनाईट म्हणतं हे माहित असले तरी उर्वरीत तीन पात्रांपैकी कोणितरी एकजण अजाणतेपणे खुदकन हसेल…… संसर्गजन्य रोग हा, त्वरीत लागण होऊन उरलेले दोन पात्रही दबक्या आवाजात हसतात….. त्या पिकलेल्या खसखशीचा वास मुपाच्या जाणत्या नाकाला लगेच लागतो…. आणि मग सुरू होते तीन नॉट सो फ्रेश [जवळपास अर्धझोपे {अर्धमेले तसे अर्धझोपे} ] मेंबर्स Vs एक ताजातवाना मेंबर अशी बॅटिंग!!! )

— हा कोणाचा हात आहे ????

(चढ्या आवाजात एक निरर्थक प्रश्न!! मुपाचा अंधारातला तीर….. )

—माझा !!! (तिघांपैकी एक!!)

— माझा म्हणजे कोणाचा ???

(एरवी अगदी चाहुलीवरून माणूस  नक्की ओळखणारं मुपा आता वेड पांघरून बसलेय…. परिस्थितीची गरज ओळखणे म्हणतात याला!! J )

–’बाब’ चा!!!!

(इथे ’बाब’ म्हणजे मुपाचा बाबा {मुपीचा ’बाबा’ नाही… सुज्ञ ओळखतीलच तसे 😉 } असे असते…. कारण शाळेतल्या मित्रमंडळींमधे कोणा एका डॅडी नावाच्या प्राण्याचा डॅड झालेला मुपाला नुकतेच समजलेले असते त्यामुळे त्याच जातीच्या आपल्या घरातल्या प्राण्याचे नुकतेच ’बाबा’ वरून ’बाब’ असे बारसे झालेले असते!! हे कमी की काय म्हणून कहर म्हणजे ’ईंकी पिंकी पॉंकी – फादर हॅज अ डॉंकी ’ ह्या गाण्याचा अपभ्रंश होऊन ते , ’ ’ईंकी पिंकी पॉंकी – फादर ईज अ डॉंकी’ असे नुकतेच आमच्या कानावर पडलेले असते. बाबाची ढोर मेहेनत अक्षरश: सार्थ ठरवण्याकडे मुपाचा कल असावा…. मुलांचे कल शाळेत दिसतात हेच खरे!! 😉 )

— अरे पण ’बाब’ म्हणजे कोण??

What is your name, BABY???

(अच्छा म्हणजे प्रस्तूत ’हात कोणाचा’ ह्या प्रश्नाचे उत्तर ’या व्यक्तीचे मुपाशी नाते काय’ असे द्यायचे नसुन ’सदर व्यक्तीने आपले नाव सांगावे’ असे आहे होय!! हे बहुतेक आपल्या बापाला समजले नसावे असे मुपाला वाटल्यामुळे प्रश्नात स्पष्टीकरणरूपी भर हा ईंग्लिश उपप्रश्न असावा…. बरं या उपप्रश्नाच्या शेपटाला ’BABY’ नावाचा झुपकाही होता… )

— यांच्या या नर्सरीतल्या बाया ते उगाच पन्नासवेळा लाडं लाडं बेबी बेबी करतात कशाला??? मला ना अजिबात आवडत नाही हा प्रकार!!!! ( ’बाब’ आता नावं न सांगता भलतचं बोलत होता पण सुर चढा लागल्यामुळे मी ’कुल ईट baby’  हा माझ्या मनात आलेला डायलॉग मनातल्या मनातच बोलते …. उरलेल्या दोन चादरी [ म्हणजे दोन पात्रं] चादरीत तोंड खुपसून सौम्य आवाजात जरा खि-खि करतात.. )

—तुम्हारा नाम क्या है BABY ??? (मुपा अजून प्रश्नावर ठाम J )

— अss मि ss त ssss….. झोपतेस का आता, का मारू दोन रट्टे??? (आवाजात वाढीव राग!!! )

—ऐसे क्यूँ करते हो BABY??? मै तुम्हारी बहन हूँ ना!!!

(मुपा आता फुल्ल फॉर्मात येतयं हळूहळू… हिंदी रूळतयं नुकतच जिभेवर त्यामूळे ’बेटी’ ला ’बहेन बिहेन’ घोळ मनापासून अगदी….. उरलेल्या दोन चादरींमधली खसखस वाढतेय….. “मम्मा ती बेटीला बहेन म्हणतेय…. ती काही सिस्टर आहे का बाबाची, डॉटर आहे ना!!!” लहान चादर मोठीला [चादरीतल्या चादरीत—बाहेर तोंड काढायची सोय नाही ] “गप बस!! लहान आहे ती…. चालू दे त्यांचे…. तू झोप सकाळी शाळा आहे ना!!! “ मोठी चादर लहानीला कुजबुजत… )

—अंगात येतं का गं रोज रात्री तुझ्या??? गौरे झोपतेस आता का बोलावू पालीला??? येss गं पालं sss

( बाब भडकलाय आता…. डायरेक्ट पालीची धमकी…. भात्यातले साधे बाण कामाचे नाहीत हे उमगलेय त्याला… ब्रम्हास्त्र बाहेर….)

— पाsssलं गुडनाईट!!! (मुपा ऐकायला तयार नाही….. आज पालीलाच झोपायला सांगितलेय….. उरलेल्या दोन चादरी जरा जोरात ख्या-ख्या!!! )

— और ये लगा सिक्सर.. नटराज फिर चॅंपियन!!! ( मोठी चादर अर्थात अस्मादिक न रहावून बोलून गेलेले…. )

— हो का!!! मग शिस्त लाव ना जरा कार्टीला तुझ्या….आईची जबाबदारी असते ही!! ( बाबाला थर्ड स्टेजमधली झोप आल्याचे चिन्ह …. मुपा काहितरी बडबडतेय् यावरही…)

—पर्र्फेक्ट!!!! शिस्त ’आईची जबाबदारी’ बद्दलच्या विधानाची ग्राह्यता गृहीत धरता तुमच्या बेशिस्तपणाचे खापर कुठे जाते याचा विचार करून उपरोक्त स्टेटमेंटात अमेंडमेंट करायची असेल तर तुझ्या त्या वर्तनाला मी बेजबाबदार म्हणणार नाही… गो अहेड!! ( सोडते की काय मी…… मी का ऐकून घेऊ???)

— झोपा रे सगळे….डिस्टर्ब नका करू!!! (लहान चादर… पेंगुळलेला आवाज )

— हो ना , हा बाब नुसती ’जागमोड’ करतोय माझी!!! (मुपा कधी कधी चुकून बरोबर बोलते ते असे…. तिची ’जागमोड’च होत असते कारण ती ९९.९९% जागी असते )

— मम्मा आपण पालीला दगडाने मारू ना!!! मी तर आता बिग होणारे… टॉल होणारे…. ( आयला ’बाब ’ सुटला…. आता गाडी माझ्यावर वळलीये….चौफेर हल्ला, नव्या दमाने आता!!! पहिल्यांदा पस्तावा गप्प न बसल्याचा…. छे छे!!! सबुरी सहनशक्ती कश्याशी खातात तो पदार्थ बनवायला हवाय आता!!!

— अनन्याssss….. अनिश ssss sit properly!!! (मुपा मधेच जोरदार…. स्वत:च्याच तंद्रीत…. पुन्हा एक मोठी आणि एक लहान चादर नाटकातल्या नव्या अनोळखी पात्रांच्या एंट्रीने गोंधळलेले….. या प्रकाराची मला दिवसात सवय असल्यामूळे, ही दोन पात्र आणि असे अनेक ही मुपाची शाळासोबती असून मुपा सध्या त्यांच्या टीचरच्या भुमिकेत आहे या माझ्या खुलाश्यावर दोन्ही चादरी गुडूप!!)

(ईकडे मुपा हवेत हातवारे करत गम्य-अगम्यच्या सीमारेषेवर ईंग्लिशमधल्या हिंदीमधल्या मराठीत काहितरी सुचना देतेय!!! ’कौन बनेगा करोडपतीच्या’ नव्या जाहिरातीतला पाय हवेत उंचावून, “पापा अकबर का बाप कौन था??” विचारणारा मुलगा आठवतोय आता मला… आणि मग ’कोई भी सवाल छोटा नही होता’ असे सांगणाऱ्या अमिताभला मुपा सांभाळायला द्यावी एक दिवस असा विचारही मनात येतो!!)

— आता ’दिन’ नाहिये ’रात’ आहे…. रातला अंधार असतो पण मला सगळे दिसतेय… (मुपा आवर आता!!!)

—हंम्प्टी डंम्प्टी फॅट ऑन अ फॉल …. (मुपा रंगलेय आता कवितेत… सॉरी पोएमांमधे….. कोणिही कुठल्याही दुरुस्त्या सुचवत नाहीये… हंम्प्टी डंम्प्टी फॅट तर फॅट, मरो मेला!!! अचानक माझ्या गळ्यात दोन नाजुक हात… मुपाचे मातृप्रेम जागृत!!! )

— आजा मेरी बेटी!! (पुन्हा हिंदीत चमत्कार…. माँला बेटी केलेले होते!!!! ’हं’ यावर माझी मजल नाही… कुठे तोंड उघडून अवलक्षण करू पुन्हा!!)

—हॉलमधलं भुत झोपलं आता!!! (अचानक भलतचं चॅनल आता हे….. बरं रिमोट मुपाकडे….  )

—अरे पिल्लू आपल्याकडे भुतं नाहिये बेटा… आपल्याकडे देवबाप्पा आहे किनई!! (बोलल्याशिवाय अगदीच रहावलं नाही मला!!!)

—अगं मम्मा!!! ते देवाचेच भुतं आहे!!! ( देवा रे वाचव रे मला….. हॉलमधलं भुतं झोपवलसं मग बेडरूममधलही झोपवं रे… रेहेम खुदा रेहेम!!)

——————————————-

(शांतता….. झोपली की काय???)

— माँ पाणी दे…. (आता ईतकी वटवट केल्यावर घसा कोरडा न पडता तर नवल!!!)

(मुपा आणि मी जागे…. उरलेल्या दोन्ही चादरी एव्हाना स्वप्नांच्या राज्यात!!! मुपाचा एकपात्री प्रयोग सुरूच!!)

पाणी—- शू— बडबड— प्रश्न— पोएमा—हातवारे— ईत्यादी ते इत्यादी….. (म्हणजे कॅपिटल ईत्यादी ते स्मॉल इत्यादी…)…….

————————————————–

(शांतता… पुन्हा एकवार …… मी गोंधळात मुपा झोपलं बहूतेक!!!)

वळून पाहिल्याशिवाय रहावत नाहिये…. मुपा गाढं झोपलयं!!!! प्रचंड प्रचंड गोड दिसतयं!!!! देवाच्या भुतासारखं!!!! लंबे लंबे बाल फेसवर आलेत…. मुपाला आवडत नाहीत ते तसे आलेले….. मी हलक्या हाताने ते मागे सारतेय….. उघड्या चिमुकल्या हातावर हळूवार गाल टेकवतेय….. पिल्लू जागरण होते रे!! तूझाही आराम होत नाही, बाकिच्यांचीही ’झोपमोड’ वगैरे काहीबाही मनात येतेही…… पुन्हा जाणवते ती शांतता…. देवाचे ते भुतं, शाळेतले ते सवंगडी सगळेच गायब एकदम होतात मग!!! नको वाटतेय ही शांतता….. पिल्लू तू अशीच रहाशील ना… अशीच रहा गं!! मोठेपणी ना ’रात’ झाली की नाही दिसत सगळं…. देवाचे भुतं पण सोडून जाते मग…. चिवचिवणारी चिमणी आहे तोवर घरटे जागे आहे माझे….. रात म्हणं दिन म्हणं, बाब म्हण, बहेन म्हण काहिही म्हणं…. आणि हो बच्चू कुठलीही पाल बाबा कधीही येऊ नाही देणार तुझ्याजवळ!! घाबरू नकोस कधिही!!! मी आहे ना तुझी ’बेटी’ तूला जपायला…. डोळे पाणावतात बघ तुझ्यापायी नेहेमी…

मग मुपाच्या कपाळावर ओठ टेकवत मी हलकेच म्हणते….

—–गुडनाईट बच्चा!!!

—-गुडनाईट तन्वी!!!

( याआधिची वैऱ्याची रात्र इथे आहे….)

39 thoughts on “रात्र वैऱ्याचीच आहे..(अजुनही :) )…..

  1. एकदम सॉलीड ग लेख.खुप धमाल आली वाचतांना.मुपा एकटी काय खिंड लढवते ग, तिला आमचा साष्टांग नमस्कार…शेवटी तुझा हळवेपणाही भावला….
    ’कोई भी सवाल छोटा नही होता’ असे सांगणाऱ्या अमिताभला मुपा सांभाळायला द्यावी एक दिवस असा विचारही मनात येता….. 🙂

    • हो रे देव… ती एकटीच खिंड लढवते आणि आमचे पानिपत होत असते रोज….
      विचारू नकोस रे…. शाळा म्हणजे वैताग झालाय एक….. घरी आली की एकटी येत नाही ती, निम्मी शाळा तिच्याबरोबर आलेली असते… कोणि सोफ्यावर बसलेले असते कोणी रस्त्यात उभे असते…… मग त्यांना आपला धक्का लागतो, आता जे लोक आपल्याला दिसतच नाहियेत त्यांना चुकवणार कसं???? 🙂

      मनात साठवतेय रे तिचे प्रत्येक रुप….

      देवमामाचा नमस्कार पोहोचता करतेच तिला!!!

  2. शेवटच्या त्या क्लोजिंग लाईन्स खूप भिडल्या. कारण त्या लाईन्स माझ्याही मनात रोज येतात. मी बाप, पुरुष असूनही माझं तीन वर्षाचं पोर झोपल्यावर त्याच्याकडे बघताना याच फीलींग्ज येत राहतात. माझं पोरही असंच असंच असंच जागवतं. जागण्याची आणि बाबाला जागं ठेवण्याची त्याची निमित्तं अर्धी रात्र संपली तरी संपत नाहीत. सकाळी उठून कामावर जाताना डोळे चुरचुरतात..झोप अपुरी म्हणून..आणि झोपण्यापूर्वी रात्री चुरचुरतात असंच पोराकडे बघत असताना. झोपलेली किती गोड दिसतात. झोपून उठली की मात्र सैतानशिंगे उभी राहतात डोक्यावर लगेच.

    लेख मनापासून लिहिला आहेत म्हणून खूप आवडला.. एकात एक कंस फार झाले पण..जाउदे.. मलाही सुरुवातीला लिहिताना ही सवय लागली होती..हल्ली टाळतोय जमेल तितकं..

  3. ता.क. सरळ वाचनात तो “कंस सोडवा” चा अडसर येतो काही काही वेळा. काहीतरी शाळेतलं गणितामधलं उदाहरण सोडवतोय असं वाटतं. 🙂

    Just kidding..

    X= (a*[a-b*(a+b)])

    • 🙂 अगदी अगदी रे नचिकेत…. आपल्या धमक्या कमी पडतील एकवेळ पण आपल्याला जागे ठेवण्याची मुलांची निमित्त संपत नाहीत…..

      >>> झोपून उठली की मात्र सैतानशिंगे उभी राहतात डोक्यावर लगेच…. 🙂
      हे जाम आवडलं!!! गोड गोड शिंग …..

      पिल्लं मोठी व्हावी असंही वाटतं पण बाल्य संपू नये रे ह्यांचे!!!

      अरे रोज बाबाला ’तुमच्या ऑफिसात ABCD शिकवतात का?’ असे विचारायची… त्याने चुकून ’नाही’ असे उत्तर दिले त्यामूळे आता या बाईंच्या शाळेत एक नवा ३२ वर्षाचा विद्यार्थी दाखल झालाय…..

      प्रश्न प्रश्न तर ईतके की बोलणे नको…..

      आभार रे!!!

      आता कंसांबद्दल… त्याला सर्वस्वी जबाबदार हेरंब 😉 … त्याच्या पोस्टा वाचून वाचून कंस वापरायची सवय लागलीये….. न्येश्ट टायमाला लक्षात ठेवेन रे!!! 🙂

  4. गौराई अगदी अशीच चिवचिवत रहा ग….. 🙂

    हेहेहे गौराई ला आम्हा मामा लोकांकडे पाठव तसेही आम्ही मामा लोक रात्री तीन तीन वाजेपर्यत टक्क जागे असतो. तेवढीच आमच्या ज्ञानात भर पडेल ना … जागेमोड,
    हॉलमधलं भुत ….. (नाहीतर तिच्यापुढे हात टेकून झोप तरी येईल लवकर आम्हाला).

    शेवट मस्त.

    • सचिन आभार रे….. कमेंटबद्दल नव्हे तर त्या मातेला पाठव म्हणाल्याबद्दल 🙂

      हॉलमधलं देवाने पाठवलेले भुत…. जरा विचार केल्यावर जाणवलं बघ ’देवदुत’ आणि ’देवभुत’ सारखेच शब्द…. देवाने पाठवलेलं भुत म्हणजे ’देवदुत’ ’एंजल’….. मग पटलं बघ तिचं म्हणणं…..

      देवदुतच तर असतात हे चिमणे…. 🙂

      (बाकि सिंहगडावर तुझे भाचरांवरचे प्रेम पाहिलेय आणि नुकताच तुझा भाचीबरोबरचा फोटो पाहिलाय… तू नक्की सांभाळशील रे भाचरांना …. शंका नाही 🙂 )

  5. खुसखुशित झालाय लेख.
    अगदी सहज पणे लिहिलेला. कुठेही कृत्रिम पणा वाटत नाही वाचतांना.
    मुपा म्हणजे खरंच ग्रेट आहे. पण मुलांच लहानपण फार लवकर संपतं हल्ली. एकदा शाळा सुरु झाली की लगेच मोठे होतात.
    गौराचे लहानपण असेच खूप खूप दिवस टिको, आणि ती लहानच राहो हिच सदिच्छा..

    • महेंद्रजी उत्तर द्यायला उशीर होतोय…. काल दिवसभर नेट बंद होते माझे……

      मुपा खरचं ग्रेट आहे…. आमचेच नाही तर सगळ्या घरांमधले मुपा ग्रेटच असतात नाही का 🙂 आणि हल्ली तर ग्रेटनेस वाढत चाललाय…..

      >>>> पण मुलांच लहानपण फार लवकर संपतं हल्ली. एकदा शाळा सुरु झाली की लगेच मोठे होतात…. अगदी अगदी खरं!!!

      आजुबाजुचे चौथी पाचवीतले मुलं पाहिले की टीन एज चे वय नवव्या वर्षापासून आहे की काय असे वाटते…. अश्या वेळी या मुलांचे बाल्य हरवू नये…. ते निरागस रहावे म्हणून फार जपावे लागतेय!!

      खूप खूप आभार!!!!

  6. तन्वी,
    मस्त मस्त मस्त.
    ही आपली बाळ जेव्हा असं बडबड करुन, मम्मा मम्मा करुन त्रास देतात, नकोसं करतात तेव्हा वाटतं ही लवकर मोठी होवु देत. पण ती गप्प बसलेली, झोपलेली बघीतली की वाटत, अशीच राहु देत.
    खूप सही दिवस आहेत हे.

    • सोनाली आभार गं!!!

      खरयं तुझं अगदी जाम सही दिवस आहेत हे…. त्यांना फुलवण्याचे आणि सगळी दु:ख त्यांच्या संगतीत विसरून आपण फुलण्याचे….

  7. ताई,
    आधी तुझ्या कोट्या आणि गौराचे प्रताप वाचून हसून हसून डोळ्यांत पाणी येत होतं..आणि लेख संपता संपता डोळे पाणावले!
    गौरा आणि ईशानसकट एकदा याच गं तुम्ही घरी!
    ता.क. – ती मुपीच्या ‘बाबा’ सारखीच होणार आहे…हे मी तुला लिहून देतो…बाळाचे पाय पाळण्यात दिसतात! 😀

    • >>>> गौरा आणि ईशानसकट एकदा याच गं तुम्ही घरी!

      याला ’आ बैल मुझे मार’ म्हणतात… 🙂 बरं इथे तर अख्खी फौज आहे….

      ता.क. सही…. तुला आधिच म्हटलेय ना ’यथा मामा तथा भाचे’

      मुपा- मुपी जिंदाबाद!!!!

  8. खूपच छान तन्वीताई, माझा दीड वर्षाचा मुलगा पण असाच जागवतो…… 😀 रात्री खरंच अंगात येतं कि काय ह्या पोरांच्या असा प्रश्न पडतो !!!!!!! दिवसा नाही करणार तेव्हडी मस्ती रात्री सुचते… 🙂

    • सुहासा आभार रे…..

      गौराईची बडबड थांबू नये असेच खरचं मलाही वाटतेय रे…पण एक सत्य असेही आहे की ईशानही लहानपणी असाच माझ्या अवतीभोवती पिंगा घालायचा…. आता हळूहळू जरा सुट्टा होतोय … हे होणारच हे माहित असुनही मनात जरा बोच असतेच रे….

      बाकि तुम्ही सगळे मामा लोक आहात मुलांना जपायला!!

  9. “आजा मेरी बेटी!!” , “ते देवाचेच भुतं आहे!!”

    हा हा हा हा… काय एकेक षटकार ठोकलेत गौराईने !! म्हणजे रोजच ठोकत असेल म्हणा. फिल्डिंग करताना तीन चादरींची नक्कीच वाट लागत असणार.. 😉

    पण शेवट कुठून कुठे नेलास ग !! छान हलकं फुलकं वाचता वाचता अचानक पाणी तरारलं डोळ्यात.. झोपल्यावर ही कार्टी (माझ्या लेकाविषयी म्हणतोय 😉 ) खरंच खूपच निरागस, गोड दिसतात ग आणि मग आपल्याला आठवत राहतं ते आपलं त्यांच्यावरचं रागावणं, चिडणं आणि त्यातून येणारा अपराधीपणा. उगाचंच 😦

    • हेरंब,

      मी ही केवळ माझ्या थकव्यामुळे, इतर सा-या जगाच्या चीड आणणा-या शंभर कारणांमुळे माझ्या पोरावर छोट्या छोट्या कारणावरून वसावसा ओरडत असतो. दूर ही ढकलत असतो.

      मग तो झोपला की त्याला बघून मनात जे होतं त्याला नुसतीच साधी गिल्ट म्हणता येणार नाही. अपराधीपणाची ढगफुटी होते डोक्यावर एकदम..जीवघेणे सेन्सेशन.

      • नचिकेत ….
        >>> मग तो झोपला की त्याला बघून मनात जे होतं त्याला नुसतीच साधी गिल्ट म्हणता येणार नाही. अपराधीपणाची ढगफुटी होते डोक्यावर एकदम..जीवघेणे सेन्सेशन…

        १००% मान्य….. भयंकर हतबल होतो आपण त्यावेळी…. चूक तर करून बसलेलो असतो आणि उपायही नसतो किंवा तसेच काहिसे….. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ही चूक पुन्हा कधीच करणार नाही हे स्वत:शीच केलेले प्रॉमिस पुन्हा कधीतरी स्वत:च मोडतो….

        मोठेपणी आपण देवाची भुतं न रहाता नुसतेच भुतासारखे वागतो कधीकधी!!!

      • नचिकेत, अगदी अगदी चपखल शब्द आहे.. गिल्ट नाहीच.. अपराधीपणाची ढगफुटीच असते ती !!!

        याच ढगफुटीबद्दल मागे लिहिलं होतं.
        http://www.harkatnay.com/2010/03/blog-post_07.html

        (स्वतःच्या ब्लॉगच्या लिंका देण्याची जित्याची खोड …..)

    • हेरंबा….

      अरे कार्टी हा सर्वत्र लागू होणारा शब्द आहे… उगाच एकट्या आदिला गोवू नकोस त्यात सगळे एकाच माळेचे मणी आहेत …. 🙂

      गौराईचे षटकार विचारू नकोस रे…. आपली कल्पनाशक्ती अगदी ओढून ताणुन नेल्यावरही जिथे संपते तिथे मुलांची सुरू होते….. बरं मतांवर असले ठाम असतात ना की विचारता सोय नाही!!!

      आभार रे!!!

    • हो रे हो बाजीप्रभुच… 🙂

      मुपा डेंजर आहे… तू वाचलास या भारतभेटीत तिची भेट राहिली तुझी…. सिंहगडावरच्या मंडळींना विचार तो तोरा… 🙂

      ’सहजच’ झालीये ना.. मग ठीक आहे ब्लॉगचे नाव राखले बघ…

      आभार रे!!!

  10. गौराई तुम लगे रहो, 🙂 तन्वे, मुपारानी की जयहो! जयहो!!

    मस्तच गं. लेख एकदम इस्टाईल मैं…. हलकाफुलका, मध्येच रुसका, काहीसा लटके चिडका अन खूपसारा हळवा…. बाकी कुठल्याही वयाच्या पोरांच्या आयांची रात्र वैर्‍याचीच असते… फक्त वैर्‍याचे रुप बदलत राहते…. आगे आगे देखो होता है क्या!! 😀

    • >>>> बाकी कुठल्याही वयाच्या पोरांच्या आयांची रात्र वैर्‍याचीच असते… फक्त वैर्‍याचे रुप बदलत राहते…. आगे आगे देखो होता है क्या!! 😀

      अगं माते नको गं नको….. 🙂

      तुझ्यासारख्या मावश्या आहेत ना बाजू घ्यायला मुलांची.. जरा कुठे मी त्यांना दमात घेऊ म्हटलं की तू डॊळे वटार अजुन मला.. बघ ती कार्टी कसली षटकार ठोकतेय….:)
      पुन्हा श्रीमावशीला नाव सांगेन ची धमकी मलाच वर!! निषेध!!!

  11. hey tanvi ..lekh ekdam takataka …mala maze balpan athavale .. mi baba n maza bhau asach dhammal n tp karaycho … pan amchya kade ulta asaycha … aai dhara dhur .. pan baba always amchya shi masti karun .. damvun damvun .. amhi patkan zopi jaycho …masti mhanje actual masti .. hahahahahah

    • स्मिता आभार…. 🙂

      >>>> just curious: what does the ‘rooster
      ‘logo on your blog indicate? ( does it indicate anything at all?)

      🙂

      The logo is made by one of our blogger friend , it’s one of my old drawings which I drew in my schooldays, so very dear to me!!! Bhunga (Deepak) has modified the same and made this logo for the blog…… Coming to the next question ,”does it indicate anything at all?”

      I would say this blog has brought a new ray of hope in my life…… a new ‘me’ , many good friends, readers and what not!!!! So now I consider that कोंबडा to be a messenger indicating the dawn!!!

      BTW तू पहिली आहेस जिने हा प्रश्न विचारला आणि मी त्या लोगो कडे पुन्हा एकदा पाहिले…. त्याबद्दल अजून आभार!!! 🙂

      • most welcome. nice to know about the logo history, significance and the other talent that you possess too. And may we always have sunshine 🙂

        ‘dil maange moraya puN vachalee’ aNee hit ahe , ghree sagaLyana puN tuzya writing baddal sangeetala, kharach chaan, prasanna lihites tu… no wonder gauree has such a sunshine sensecof humor:-)
        hope to read more on this blog.

  12. हाहाहा… कसलं भारी लिहिलं आहे. भेटायला हवं या मुपाला एकदा. सध्या तिला माझ्यातर्फे एखादं खेळणं गिफ्ट द्या. आपली भेट होईल तेव्हा पैसे दे‍ईन… 😉

    • संकेत अरे तूझ्या कमेंटला उत्तर द्यायचे राहिले असले तरी मुपाने या मधल्या काळात बऱ्याच गिफ्ट्स उकळलेल्या आहेत आणि त्यांच बिल मी सांभाळून ठेवलेले आहे 🙂

      आभार रे!!

    • रूपा आभार आणि ब्लॉगवर स्वागत 🙂

      तूझ्या/ तुमच्या वतीने मुपाला साष्टांग घालते मी, तसा आम्हाला रोज काही न काही कारणाने घालावा लागतोच 🙂

Leave a reply to sahajach उत्तर रद्द करा.