ये दिल मांगे मोरया……

हे आमचं पहिलचं वर्ष गणपतीचं… म्हणजे आमच्या घरी गणपती बसवण्याचं…… आखाती देशात रहायला येताना अनेक शंका मनात होत्या, खरं तर शंका न म्हणता कुशंका हा शब्द जास्त योग्य होईल इथे!! आपले देव सोबत आणता येता येतील का? पुजा करता येईल का? स्तोत्र म्हणता येईल का? एक ना अनेक……. मस्कतला आल्यावर मात्र गेल्या साडे तीन वर्षात यातले एकूण एक प्रश्न सुटले….. ईथल्या दोन्ही मंदिरांमधले प्रसन्न वातावरण पाहिल्यावर तर आपण भारताबाहेर आहोत असेही वाटत नाही. एक आदर वाटत आलाय कायम ईथल्या राजवटीबद्दल…. शिव मंदिराबाहेर असलेल्या ओमानी फुलवाल्याबद्दल तर नेहेमीच कुतूहल वाटत आलेय मला!!!

तसे आता जग लहान झालेय सगळीकडे सगळे सामान मिळते, सणसमारंभ साजरे करणे तितकेसे अवघड राहिलेले नाही वगैरे विचार मनात आणत यावर्षी पासून गणपतीचा श्रीगणेशा करावा हे निश्चित केले…… 🙂 आजची पोस्ट मुळी या गणपतीच्या निमित्ताने आलेल्या अनेक सुखद अनुभवांची उजळणी करण्यासाठीच आहे……

माझ्या माहेरी आणि नवऱ्याच्याही माहेरी गौरी गणपती आहे…… पण दोन्ही घरच्या रिती अगदीच वेगळ्या…… माझ्या माहेरी गणपती पाच दिवसाचा तर सासरी दिड  दिवसाचा…… मग आता या आमच्या नव्या घरात तो किती दिवसाचा हा कळीचा मुद्दा आला आणि गणपती हॅपनिंग होऊन फटाकेबाजीसह होणार याची खात्री पटली….. 😉 अश्यावेळी मी नेहेमी माझ्या आजेसासुबाईंच नाव पुढे करते……… माझ्या लेकाच्या जावळाच्या वेळेस “जावळ रितीनुसारच झालं पाहिजे ” म्हणणाऱ्या सगळ्यांना आजीने उत्तर दिले होते, “रीत तरी काय असते, कोणितरी एकाने बनवलेली असते…..त्याच्याआधि नसतेच ना ती, मग ती न पाळल्याने नुकसान होणार हे कसे मानायचे?? एखाद्यात जर बदल करण्याची ईच्छा आणि कुवत असेल तर ते आपण स्विकारलेच पाहिजेत….. सणवार करणारच नाही असे नाही ना म्हणत ती, पद्धतच बदलतेय ना, बदलू दे!!! ” आजीला शरण गेल्यावर मराठवाडा Vs प.महाराष्ट्र या मुद्द्यात अर्थातच प.महाराष्ट्र जिंकला!!! 🙂 आणि गणपती पाच दिवस येणार हे नक्की झाले!!!

गणपतीची मुर्ती पहायला म्हणुन चार दिवस आधि गेलो ते परतलो मुर्ती घेऊनच….. ईद आणि गणपती हातात हात घालून येत होते त्यामूळे दुकानं बंद असण्याची शक्यता आणि गणपती बाप्पाच्या मोजक्याच मुर्त्या असणार हा धोक्याचा मित्रमंडळींनी दिलेला ईशारा!!! गाडीतून परत येताना ’गणपती बाप्पा’…. मोरsssssयाsssss  🙂 ….. असे मस्तपैकी म्हणत म्हणत मुर्ती घरी आली. आणि घरचं नव्हे तर मनंही अमाप उत्साहाने भरून गेली….. कोणितरी वडिलधारं आलय घरी असेच वाटत होते सारखे!! मंगलमुर्ती हे नावं किती सार्थ आहे याची प्रचिती येण्याचे ते क्षण!!! 🙂

पुन्हा आला कळीचा पुढचा मुद्दा …. ’आरास’… आताचे युद्ध मराठवाडाVs प .महाराष्ट्र असे नसून बामू Vs पुणे युनिवर्सिटी असे रंगले….. आमच्याकडे होणाऱ्या प्रत्येक भांडणात हा मुद्दा आल्याशिवाय वादाला रंग येत नाही….. ’हो हो माहितीये तुम्ही ग्रेट पुणे युनिवर्सिटी वाले” …. ’आहोतच हं !! तुमच्यासारखे नाही बामू…. आमचे नावं बघ कसे मस्त!!!” वगैरे मुद्द्यांची आजकाल मुलं पण उजळणी करतात 🙂 नशीब दोघेही BE अशीच डिग्री लावतो नाहितर वादाचा तोही एक महत्त्वाचा मुद्दा असता….. तर शेवटी एकमत होत आरास झाली….. पण शेवटी पुणे आणि बामू ने हे मान्य केले की only together च we can आणि भांडण मिटले!! 🙂

गणपती बाप्पा विराजमान झाले… घरं भरल्यासारखे वाटत होते अगदी….. पण ईद आल्यामूळे खरी अडचण झाली फुलांची… फुलेच मिळेनात… दुर्वा मिळवण्यात यश आले होते… मग फुलांच्या दुकानात खेटे घालून फुलं मिळवली…. गाडं अडलं ते जास्वंदाच्या फुलावर…. ते काही केल्या मिळेनात…… शेवटी लाल गुलाबाचे फुलं वाहून समाधान करून घेतले!! मुलं तर मनसोक्त गप्पा मारत होती बाप्पाशी… त्यांच्यासाठी माय फ्रेंड गणेशा हीच गणपतीची जवळची ओळख!!! खरं तर त्यांच्याचसाठी कशाला आपल्यालाही तर गणपती मित्रच वाटतो!! गौराबाईंनी मात्र धमाल केली, बाप्पाला नाच करून दाखव, गाणी म्हणून दाखव…… मोदकासाठी असलेल्या देवाच्या हातावर जेव्हा ती टाळी द्यायला लागली तेव्हा मात्र मी घाबरले….. असे करू नको म्हटल्यावर म्हणे की बाप्पानेच हात पुढे केलाय म्हणून टाळी देतेय 🙂 …. त्या हातावर एक मोदक ठेवून हा प्रश्न मिटवला पण काही वेळाने मोदक काढून ठेवून तीने टाळी देणे सुरूच ठेवले…. या मुद्द्यावर रागावल्यावर ,” त्याला नकोय तुझा मोदक, केव्हाचा दिलास खाल्ला तरी का त्याने ? ? ” असा प्रश्न विचारून तिने मलाच गप्प केले!!!

रोज येणारे मित्रमंडळ, गप्पा, आमच्याच बरोबरचे ईतरही अनेकांकडचे गणपती…. आहाहा!! धमाल आली खरचं!!! गेल्यावर्षीच्या गणपतीच्या पोस्टवरून मला आमच्याच घराजवळ रहाणाऱ्या करंदीकर दादांचा फोन आला होता…. ब्लॉगमूळे झालेल्या अनेक उत्तम ओळखींपैकी दादांची एक… त्यांच्याकड्चे सहस्त्रावर्तन आणि महाप्रसाद यावेळेस मिळाले… गेले दहा वर्ष इथे त्यांनी हा स्तुत्य उपक्रम चालवलेला आहे!!! ब्लॉग नसता तर ही ओळख व्हायला उशीर झाला असता किंवा कदाचित झालीही नसती!!!  मराठी माणूस गणपती म्हटलं की हळवा होतोच याची प्रचिती तर येतच होती पण माझ्या बिल्डिंगमधल्या आणि आजूबाजूच्या बऱ्याच साऊथ ईंडियन मैत्रिणींनी आम्हीही अपवाद नाही हे या ४/५ दिवसात दाखवून दिले!!

जवळच असलेल्या एका रेस्टॉरंट मधल्या मॅनेजर आणि बाकिच्या ७/८ जणांनी आम्ही दर्शनाला येतो असा निरोप पाठवला….. भर उन्हात ती सगळी मंडळी चालत आली….. देवाचे दर्शन सहज होते का? असा त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला काय उत्तर द्यावे हेच कळेना….मुलांशी गप्पा मारणारे, मराठी म्हणुन त्यातल्या एकाची ओळख, पण आज वेगळ्या रुपातले हे सगळे जण अजुनच आवडून गेले!!!मिठाईचा मोठा बॉक्स देवासमोर ठेवल्यावर मात्र माझ्या चेहेऱ्यावरचे प्रश्नचिन्ह त्यांना दिसले असावे कारण “ताई अहो बिल केलेय या बॉक्सचे, तसाच नाही आणलाय काही!!! ” असे उत्तर त्यांनी हसत दिले!!!

आमच्याकडे येणारे दुधवाले आपल्या कोकणातले पण गणपतीच्या दिवसात नेमके आजारी….. मला सारखी मनात रुखरुख की दादांना आता काही गणपतीचे दर्शन होत नाही….. चौथ्या दिवशी ते आले आणि देवासमोर हात जोडून १० मिनीट डोळे मिटून बसून राहीले….. गणपतीला जास्वंद मिळत नाहीये ही माझी रोजची कुरकूर अर्थातच त्यांच्यासमोरही झालीच….. ते गेले आणि अर्ध्या तासाने पुन्हा आले ते पिशवीभर जास्वंदाची फुलं/कळ्या घेऊनच…. 🙂 मस्तपैकी मोठा हार घातला देवाला…..

आले गेले सगळे विचारत होते जास्वंद कूठे गं मिळाला… म्हटलं देवाने पाठवला 🙂

शेवटी आला पाचवा दिवस, विसर्जनाचा दिवस…… अजिबात करमत नव्हतं….. गौराची भोकाडारती सुरू होती… गणपतीबाप्पाला मी पाण्यात टाकू देणार नाही या मतावर ती ठाम होती….. शेवटी बाप्पाला स्विमिंग येतं हा मुद्दा जरासा पटला असावा तिला, पण आम्हाला परवानगी मिळाली!!! नाही म्हटले तरी विसर्जन कसे पार पडते याबद्दल जरा धाकधूक होतीच….. म्हणून घरीच आरती केली, म्हटलं समुद्रकिनारी पटकन विसर्जन करायचे !!! किना्ऱ्याला पोहोचलो….. बाप्पाला बॉक्स मधे घे हा नवऱ्याचा सल्ला मी ऐन वेळेस विसरल्यामूळे मी अगदी भारतीय पद्ध्तीने मुर्ती हातात घेतली होती.

गाडी थांबल्यावर एक  ओमानी नावाडी बोटीत बसायचे आहे का म्हणून विचारायला आला…… हातातली मुर्ती पाहून म्हणाला, “God, Ok come!!!”… त्याच्या मागे बोटीत जाऊन बसलो, एकीकडे रुखरुख एकीकडे जरा काळजी असा प्रवास होता….. समुद्रात बरेच पुढे गेल्यावर बोट थांबली आणि आम्ही मुर्तीचे विसर्जन करायला सुरूवात केली आणि अचानक त्या अरेबिक नावाड्याने विचारले, “No prayers, say some prayers!!!” आम्ही घरीच आरती केल्याचे त्याला सांगितले , पण मुर्ती विसर्जन करताना तो अचानक म्हणाला, “ला ईलाह ईल्लिल्लाह…..” आधि खरचं समजेना हा काय करतोय तर तो हसून म्हणाला, “God blessings to all of us!!! 🙂 “…….

न विसरण्याजोगे बरेच काही अनुभवले या पाच दिवसात….. मन तृप्त झाले अगदी…… माणसातला ’माणुस’ किंवा माणुसकी असलेली अनेक माणसं भेटली की जीवन समृद्ध होतं याचा पुन्हा एकवार प्रत्यय आला!!!

म्हणूनच म्हणतेय ,” ये दिल मांगे मोरया!!! 🙂 “

Advertisements

41 thoughts on “ये दिल मांगे मोरया……

 1. गणपती बाप्पा मोरया …….
  “God blessings to all of us!!!

  देव कोणताही / कोणाचाही (दुर्दैव अस लिहाव लागतंय) असो फक्त देवावर श्रद्धा हवी.

  बाकी गौराबाई रॉक्स …………..
  गणपतीला टाळी …… 🙂

  • सचिन खरयं रे…. देव कोणताही/कोणाचाही असो हे भारतात मात्र न विसरता लिहावे लागते याचे दु:ख आहे…..

   गौराबाई तर फुल्ल फॉर्मात रे…गणपतीलाच टेन्शन असावे या बयेचे…बरं दिवसभर पोएम्स ऐकाव्या लागायच्या त्याला हे वेगळे!!! 🙂

 2. छान झाल आहे हे गणेशपुराण…..सुरुवातीला छोट्या-मोठ्या वादाच्या मुद्द्यांना बगल देत एकुणच छान साजरा झाला तुमचा गणेशोत्सव…गौराबाईंना पटवायचा सीन डोळ्यासमोर तरळुन हसवुन गेला…बाप्पांना निरोपही अगदी सर्वधर्मसमभाव तत्वावर झाला…शिर्षक तर वाचल्यावरच आवडल होत…ये दिल मांगे मोरया…खरच..

  • देव अरे त्या सुरुवातीच्या लहानसहान वादांशिवाय सणाला मजा येत नाही ना 🙂

   आभार रे….. शिर्षक आवडले म्हटल्याबद्द्ल स्पेशल आभार 🙂

   गौराला पटवणे अवघड आहे रे तसे, पण जमवावे लागतेय कसेतरी!!!

 3. गौराची गणपतीला टाळी…
  गणपतीचा हात कपाळी! 🙂
  “ला ईलाह ईल्लिल्लाह.. मुहंमद रसूलल्लाह!”
  हे त्यांच्यात मनुष्य मरताना पण म्हणतात बहुतेक! छान अनुभव!
  मस्त झालीये पोस्ट!

  • म्हणजे, ‘परमेश्वर दयाळू आहे आणि मुहंमद हा परमेश्वराने पाठवलेला प्रेषित आहे’
   असा काहीसा अर्थ आहे!
   गणपतीचं विसर्जन केलं ना…त्यासाठी तो म्हणाला असेल…ऑफकोर्स त्यानं मुहंमदाचा पार्ट गाळला असेल! 🙂

  • >>>>>> गौराची गणपतीला टाळी…
   गणपतीचा हात कपाळी! 🙂

   हे सहीये!!!!

   बरं झालं तू स्पष्टीकरण दिलेस नाहीतर मी निघालेच होते त्या नावाड्याला गाठायला, म्हटलं इथे मी मारे त्याचे कौतूक करायचे आणि हे काय भलतेच…. 😉

  • अनिकेत आभार रे!!!

   बऱ्याच दिवसानी आलास ब्लॉगवर….

   खरयं जरा हटके होते काही अनुभव आणि नोंद घेण्याजोगेही, मग काय आहे ब्लॉगाचे माध्यम म्हणून घेतली नोंद!! 🙂

  • >>>> आरास सुंदर आणि लाईटच्या वायरचा ओम सहीच…

   आभार 🙂 ती कल्पना प. महाराष्ट्राची 😉

   गौराई तर भन्नाट रे….. अरे गणेशोत्सव सगळ्यात जास्त साजरा ईशान-गौराने केला!!

 4. बाप्पानेच हात पुढे केलाय म्हणून टाळी देतेय >>
  बप्पा थोडक्यात वाचला म्हणायचा… 😉

  मस्त पोस्ट..
  मला वाचतानाच धमाल आली..मग तुम्ही तर खुप मजा केली असणार..

  • अरे हो रे, बिनतोड होता तो मुद्दा की बाप्पानेच हात पुढे केलाय ना!!!

   >>> बप्पा थोडक्यात वाचला म्हणायचा… 😉 अक्षरश: आणि शब्दश: 🙂

   आनंदा ब्लॉगवर स्वागत आणि आभार रे!!!

 5. मस्तच… छान लिहलं आहे.
  भारतात राहून देखील पुरेशी सुट्टी न मिळाल्याने गेली काही वर्षे पूर्ण पाच दिवस गणपतीला कोकणात जाता आले नाही. वीकांताला जोडुन आगमन किंवा गौरी विसर्जन जे येईल तेंव्हा जातो. यंदा पण विसर्जनाला नव्हतो त्यामुळे असेल कदाचित पण शेवटचा परिच्छेद वाचून का कुणास ठाऊक पण नकळत डोळे भरून आले.
  बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या…

  • सिद्धार्थ ब्लॉगवर स्वागत आणि आभार!! 🙂

   होय रे खूप मस्त साजरा झाला गणेशोत्सव…..यावेळेस गणपती आणि ईद एकत्र, इथे ईदला सुट्टी असते आठवडाभर!!! मग काय आणि मजा!!!मुलं तर बागडली नुसती…..

   बाप्पा मोरया!!!

 6. हा हा हा.. एक से एक भन्नाट.. बाप्पाला टाळी काय, त्याला मोदक नकोय काय, त्याला स्वीमिंग येतंय काय.. गौराक्कांची तुफ्फान ब्याटिंग !!

  शेवटचा ओमानी नावाड्याचा किस्सा जाम आवडला……..

  …… आणि हो शीर्षकही… (हम विसरभोळे नही हय) 😉

  • हेरंबा, अरे बरं तिच्या ब्याटिंगला आवरा म्हणावेसे नाही वाटत… उलट हे असले सिक्सर पहायला आणि ऐकायला जास्त मजा येते 🙂 ….

   गणपतीला दिवसभर ईंटरटेनम्येंट होती तिची 🙂

   आणि महाराज ते विसरभोळे आरास छान म्हणायला विसरले होते….

   पण शिर्षकाबद्दल मंडळ आपले आभारी आहे 🙂

  • सोनाली आभार गं!!! जरा उशीराचेच उत्तर देतेय…….

   अगं गणपतीला गौरीने सांगितले होते की पटकन खा मोदक म्हणजे मोठ्ठा टॉल होशील… 🙂
   काय सुख असते लहानपण नाही!!!

  • होय रे एकदम पक्के फ्रेंडस झाले होते ते दोघे!!!

   अजुनही गौरा ’गणपती बाप्पा sssssss’ असे केव्हाही जोरदार ओरडते आणि आम्ही सगळे ’मोरयाsssss’ 🙂

   आभार यवगेशा!!!

  • सोनल आभार आणि ब्लॉगवर स्वागत!!! 🙂

   होय गं, नवीन देशातले जरा हटके अनुभव….. गौरा तर काय अगं अवघे साडेतीन वयमान पण कठीण आहे प्रकार 🙂

 7. Dear Tanvi..

  2 diwsa poorvi tuza blog sapadla.. ani eka nantar ek adhasha sarkha sagla blog vachun sampvla….
  Tuzya pratyek post la reply denya evdhe visheshanaam mazya shabd bhandaarat nahit.. mhanun consolidated comment detey..
  Atishay apratim lihites tu… khoop manatun ani sahaj -sopya shabdat… je manala sparshun jata… “Pankha [FAN] zaliye me tuzi… :)”
  Gauri ani Maher baddal tuzya post khoop khoop sundar ahet….
  Being a girl.. i can say… those are the exact feelings..
  Many thanks for sharing all this …

 8. ते , “ला ईलाह ईल्लिल्लाह…..” आठवलं की अजूनही भारावून जायला होते. ..आणि गौरीचे ” त्याला नकोय तुझा मोदक, केव्हाचा दिलास खाल्ला तरी का त्याने ? ? ” म्हणतानाचे रूप आठवले की हसू आवरत नाही 😁😁

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s