एक जिवंत सत्य…..आणि अम्मा…..

’मृत्यू’ ……..व्यक्ती जन्माला आल्या आल्या लिहीले जाणारे एक शाश्वत अटळ भविष्य!!!तरिही त्याबद्दल बोलणे, त्याचा विचार करणे नेहेमीच टाळले जाते….. जन्म नावाच्या नाण्याची झाकलेली , अंधारातली लपवलेली , नावडती दुसरी बाजू……..एक ना एक दिवस तो येणार, कधी कळत कधी नकळत, कधी अचानक कधी तिष्ठत ठेवून कसाही तो येणार त्याच्या ईच्छेने!!!! अनेक स्वप्नांना , भविष्याच्या विचारांना ठरावांना टुकटूक करून अर्ध्यावर डाव मोडायला लावणारा तर कधी ,” ने रे बाबा आता सुटका कर!!” अशी आर्जव करायला लावणारा…..

सर्वपरिचित असे हे कटू सत्य पण माणसाच्या ’अहं’ ला त्याची पर्वा कुठे!!! स्वत:च्याच विश्वात रममाण माणुस ईतरांच्या मरणाकडेही अलिप्तपणे बघू शकतो!!! तसा विचार करता हीच रचना योग्यही असावी कारण जीवन म्हणजे ईच्छा, अपेक्षा, स्वप्नं आणि त्यांची पुर्तता, आनंद, प्रकाशाची बाजू…………. मृत्यूबाबत मात्र नेहेमी सावटाची भाषा!!! माणूस खरचं मृत्य़ूला घाबरतो की माझ्या नसण्याने जगाचे काहिही अडत नाही या जाणिवेला घाबरतो हा ही एक प्रश्न आहे…… ’जन पळभर म्हणतील हाय हाय’ हे आपल्या मरणापर्यंतच्या अनुभवातून अगदी पुरेपुर उमगलेले असते आणि हीच खंत उरात दाटत असावी!!!

मृ्त्यूच्या छायेत, सानिध्यात रहाणाऱ्या माणसांविषयी, त्यांच्या धैर्याविषयी किंबहूना शेवट ईतका जवळून पहाणाऱ्या या माणसांच्या जगण्यात तितकीच सहजता उरत असेल का याविषयी मला नेहेमीच कुतूहल वाटते!!! डॉक्टर्स, नर्सेस, खूनाचा शोध घेणारे पोलीस, फाशी देणारे माणसं आणि स्मशानात कामं करणारी माणसं कायम कुतुहलाचा विषय असतो माझ्यासाठी………..

’अमरधाम’ किंवा सोप्या भाषेतलं स्मशान हा शब्द नुसता उच्चारतानाही एक बोच मनाला स्पर्शून जाते….. गाडीतून जाताना नदीकिनारी असलेले त्याचे अस्तित्व कधी त्यातल्या गुढगंभीर शांततेने तर कधी धगधगत्या चितेच्या प्रकाशाने जाणवल्याबिगर रहात नाही!!! पटकन नजर वळवून त्याच्याकडे दुर्लक्षही केले जाते….

खरं तर भरभरुन जगण्याकडे माझा कल असला तरी जीवनाच्या झळाळत्या रंगीबेरंगी साडीला ही एक हवी/नकोशी किनार आहे हे भान शक्यतो विसरू नये असेही नेहेमी वाटते!! आज अचानक हा विषय घ्यायचे कारण म्हणजे यावेळेस मायदेशातून आणलेल्या पुस्तकांपैकी एक लहानसे पुस्तक….. 116 पानांचे लहानसे पुस्तक त्याच्या वेगळ्या नावामुळे उचलले मी….. मंगला आठलेकरांचे ’गार्गी अजून जिवंत आहे…’ हे ते पुस्तक. पुस्तक परिचयाच्या काही ओळी वाचून ते पुस्तक घेतले आणि मग निवांत वेळ मिळाल्यावर वाचायला घेतले…………स्मशानात काम करणाऱ्यांबद्दल उत्सूकता होतीच पण हे काम करणारी एक स्त्री हा विषय मी टाळणे शक्यच नव्हते……

गार्गी, मैत्रेयी यांच्याबद्दलची माहिती ही बरिचशी ऐकीव, किंवा कुठल्यातरी लेखांमधे त्यांच्याबद्दल आलेल्या काही माहितीतली….. पण स्वत:हून हा विषय अजून अभ्यासला गेला नाही खरं तर कधी….. प्रस्थापितांना विरोध करणारे, प्रवाहाविरुद्ध पोहायचे धाडस दाखवणारे असामान्य व्यक्तिमत्त्व कायमच समाजासाठी चर्चेचा विषय ठरतात, कधी कौतूकाचा तर बरेचदा उपहासाचा!!! या लढ्यात त्यांचे वैयक्तिक आयूष्य मात्र होरपळते अनेकदा…..

अश्याच एका ’गुलाबबाई अमृतलाल त्रिपाठी’ उर्फ अम्मा ची कहाणी मंगलाताईंनी मांडलीये या पुस्तकात…… धर्ममार्तंड, धर्मकल्पना यांना वयाच्या अकराव्या वर्षी प्रश्न विचारण्याची ,त्यांच्या विरोधात उभे रहाण्याची हिम्मत असणारी ही गुलाबबाई!!! स्त्रीयांनी घरातल्या कोणाच्या मृत्यूनंतरही स्मशानात जायचे नाही असे मानणारा आपला समाज….. तिथे एखाद्या स्त्रीने स्मशानपौरोहित्य करायचे ठरवल्यावर ते ही  वयाच्या अकराव्या वर्षी तीला विरोध झाला नसता तर नवल…..

अशी एक स्त्री उत्तर प्रदेशात आहे या माहितीवर मंगलाताईंनी स्वत: तिथे जाऊन अम्माला शोधून काढले आणि तिच्याचकडुन जाणून घेतली तीची कहाणी…… हे पुस्तक पहिल्यांदा प्रकाशित झालेय २००१ मधे , अम्माचे तेव्हाचे वय ८४-८५ म्हणजे आता अम्मा हयात आहे की नाही हे देखील माहित नाही पण तिच्या कार्यामुळे ती स्मरणात राहील हे नक्की…..पुस्तकातून उलगडत जाते अम्माची कहाणी……

मुलीच्या जन्माला आलेल्या अभ्रकाला मारण्यासाठी एका मडक्यात घालून ते मडके वरून मातीने लिंपून जिथे टाकले जायचे अश्या एका गावात गुलाबबाईचा जन्म झाला…. जन्म झाल्याझाल्या प्रथेनुसार तिलाही अश्याच एका मडक्यात ठेवण्यात आले …..पण काही वेळाने जेव्हा तिला बाहेर काढले गेले तेव्हा तिचे श्वास सुरूच होते….. मला वाटते रुढी परंपरांशी ही तिची पहिली यशस्वी लढाई असावी!!!

वयाच्या सातव्या वर्षी लग्न…. कामधंदा न करणारा नवरा…. सासर माहेरची हलाखीची परिस्थिती…. वडिलांचा मृत्यू…..सगळ्याला उपाय म्हणून अकरा वर्षाच्या गुलाबने ठरवले आपल्या वडिलांसारखे ’महापात्र’  व्हायचे….. ’धर्म बुडाला’ म्हणणाऱ्यांच्या विरोधात सुरू झाला तिचा प्रवास…..वडिलांबरोबर स्मशान पौरोहित्याच्या कामाला जाणे आणि स्वत: ते काम स्वतंत्रपणे करणे यातला फरक तिला उमगत गेला मग!!! पहिल्यांदा रचलेल्या चितेबद्दल अम्मा सांगते की ती चिता नीट रचली न गेल्याने मृतदेह अर्धवट जळाला असतानाच चिता कोसळली  व अर्धवट जळालेला मृतदेह चितेबाहेर आला…..पेटती लाकडं नीट रचून तिनं मृतदेह पुन्हा चितेवर ठेवला. हे करताना तिचे हात कोपरापर्यंत होरपळले…..

कोणाचिही मदत नाही, साथ नाही….. घरच्यांनी तिला वाळीत टाकलेले असले तरी तिचा पैसा त्यांना चालत असे!!! एक एक प्रसंग समजतात आणि समोर येत रहाते एक कणखर व्यक्तिमत्त्व!!!! घाटावरचे पंडे एकजूट होऊन या अम्माला विरोध करत होते, तिला घालून पाडून बोलणे, तिच्यावर मारेकरी घालणे वगैरे प्रकाराला कंटाळून अम्माने शेवटी तो घाट सोडला आणि पोहोचली दुरवरच्या ’रसुलाबाद’ घाटावर…. साप, विंचू, झाडा झुडपांचे रान असलेल्या जागेचे रुपांतर अम्माने एका सुंदर स्वच्छ घाटात केले…. हळूहळू नावलौकिक, मान, पैसा, आदर मिळत गेला…..मिळालेल्या पैश्यातला मोठा हिस्सा अम्मा समाजकार्य, घाटाचे बांधकाम यासाठी वापरत गेली…… आयूष्याच्या एका मोठ्या सत्याला सतत सामोरी जाणारी अम्मा विरक्त झाली नसती तर नवल!!!

साध्याश्या लिखाणातून अम्माचा संघर्ष समर्थपणे समोर येतो….. सगळी माहिती हातचं न राखता सांगणारी अम्मा स्वत:च्या वैयक्तिक आयुष्याबद्दल तितकेसे बोलत नाही….. तिच्या मुलांना तिचा हा व्यवसाय आवडत नाही… मोठ्या प्रतिष्ठीत पदांवर काम करणारी ही मुलं अम्माशी संबंध ठेवायला तयार नाहीत….. अम्माला मात्र दु:ख करायला वेळ नाही….. आपली व्यथा मनात साठवत अम्मा आपले कार्य करत आहे!!!

मरणं, सरणं, अंत्येष्टी मंत्र, स्मशान याबद्दल अम्मा अत्यंत सहजतेने आपली परखड मत मांडत रहाते आणि आपल्याला मिळतो एक वेगळा दृष्टिकोण …. ’समशान की मलिका’ हे बिरूद मिरवणारी अम्मा परकी नाही वाटत…. यात यश जितके अम्माचे तितकेच मंगलाताईंचे!!!

हे पुस्तक वाचून बाजूला ठेवले तरी अम्मा मनात घर करून असते!!! एक खंबीर तेजस्वी स्त्री म्हणून अम्मा आवडते….आणि कधी नव्हे ते मरणाचा विचार ईतक्या निडरपणे केला जातो….. कशाला हवाय तो अप्रिय विषय असे वाटत नाही …..

मृत्य़ूबद्दलचे विचार बदलले की जीवनाचा देखील अजून खोलात विचार केला जातो नाही….. एक अंतिम सत्य असे जे टळत नाही पण त्या वाटेवर राग, मोह, मत्सर वगैरे अनेक गोष्टी टाळता येतील असा विचार मनात चमकून जातो!!!

मृत्यू हे एक जिवंत सत्य….. आणि एका दिवसात १७५ प्रेतांना अग्नी देण्याचा विक्रम करणारी अम्मा ….. मंगलाताई ….. आणि मी…..किंबहूना आपण सगळेच….. सगळ्यांचा, सगळ्यांसाठीचा विचार मनात येतो आणि वाटते खूप जगायला हवेय नाही मरण्याआधि!!!

45 thoughts on “एक जिवंत सत्य…..आणि अम्मा…..

 1. >>माणूस खरचं मृत्य़ूला घाबरतो की माझ्या नसण्याने जगाचे काहिही अडत नाही या जाणिवेला घाबरतो हा ही एक प्रश्न आहे…
  अगदी शंभर टक्के खरं गं ताई!

  >>खूप जगायला हवेय नाही मरण्याआधि!!!
  पूर्ण सहमत…

  खूप छान प्रवास मांडलायस विचारांचा… मला वाचावं लागेल हे पुस्तक… (तुझ्याकडूनच घेऊन वाचेन :P)

  • होय महेंद्रजी, वाचन सुरू आहे सध्या…… मायदेशातून भरपुर पुस्तक आणलीत आणि वाचनाची आवड असणाऱ्या २ नव्या मैत्रिणी मिळाल्या आहेत… मग काय सध्या पुस्तक श्रीमंती वाढलीये आमची….

   नक्की वाचा हे पुस्तक….

 2. >>>>> खरं तर भरभरुन जगण्याकडे माझा कल असला तरी जीवनाच्या झळाळत्या रंगीबेरंगी साडीला ही एक हवी/नकोशी किनार आहे हे भान शक्यतो विसरू नये असेही नेहेमी वाटते!!

  —–
  ही गोष्ट लक्षात ठेवूनच भरपूर जगुन घ्यायला हव.

 3. खर सांगतो, मी तरी मरणाचा विचार कधी करत नाही,पण कधी विचार मनात आलाच तर घरी काय परिस्थीती/वातावरण असेल त्या दृश्याचा विचार घाबरवुन टाकतो.मला एखाद्या माणसाच्या मृत्यपेक्षा त्यानंतर त्याच्या घरी जे वातावरण पाहिल कि कसतरीच होते.असो हया अम्माला खरच सलाम…वाचायला हव हे पुस्तक…(वाचन कमी झाल आहे आणि वाचायच्या पुस्तकांची लिस्ट वाढत चालली आहे.)

  • मरणाचा विचार मी ही सहसा करत नाही रे…. पण मनात कुठेतरी ती जाणिव ठेवते प्रत्येक क्षण जगताना…..

   तू हे आत्ता करायची गरज नाहीये देवा अजिबात….. मला वाटतं तिशी ओलांडली की विचारांमधे काही बदल आपोआप होतात किंवा व्हावेत…..

   जामच सिरियस होतयं ना सगळं!!! जगा रे भरभरून!!!

 4. ताई
  काही दिवसापूर्वी एक अतिशय विचित्र सवय लागली होती …
  जर मी मेलो तर काय होईल याची….
  पुस्तक वाचव लागेल….चांगल लिहील आहेस तू…..

 5. बापरे !! या पुस्तकाचं नाव ऐकलं होतं पण हे अशा विषयावर आहे हे माहित नव्हतं. खरंच या अम्मा ग्रेट वगैरे म्हणायच्याही पलिकडच्या आहेत !!

  एका वेगळ्याच पुस्तकाची छान ओळख करून दिलीस. विश-लिस्टवर दाखल केलंय.. लवकरच योग यावा..

  • मनोहर ब्लॉगवर स्वागत आणि आभार!!!

   >>>> कुठल्याही अभिनिवेशाच्या आहारी न गेल्याने अम्मा सातत्याने हे काम करू शकल्या.

   अगदी खरयं!!!

 6. खुपच छान पोष्ट. …
  जुन्या रुढी आणि परंपरांना कुरवाळत बसणाऱ्या समाजात असली लोकं खरच बदल घडवायला समर्थ ठरतात हे प्रशंसनीय आहे.
  तुमचा ब्लोग वाचतो अधून मधून. बराच उशिरा शोध लागला त्यामुळे जुन्या बऱ्याच पोष्टि वाचायच्या आहेत ….. पण तुम्ही ज्या सहजतेने (नाव सार्थ आहे ब्लोग च) आपले विचार मांडता ते खूप आवडलं …

  -सौरभ

 7. नमस्कारहो,

  तुम्हाला काय हाच एक विषय मिळाला का लिहायला? कशाला राव दुस-याची झोपेची वाट लावताय? … हे असलं काहीबाही मनात भरवून …. कोण घाबरत नाही मरणाला? बोलायला आणि लिहायला काय जातंय तुमचं …. इथे नुसती एक ओळ वाचली तरी अंग थरथरायला होते …. कोणतं पुस्तक वाचलंत तुम्ही? त्याचा संदर्भ द्या ज़रा …. हों मी घाबरतो या विषयाला …. माझ्यानंतर काय? हा प्रश्न कुठेतरी खोलवर टोचून जातो …. मी प्रेम करीत असलेल्या माझ्या तमाम मित्रावळींवर …. माझ्या portable कुटुंबाचा विचाराने काळीज ओलं होउन जातं ….. मी नसण्याने काय? होय! याचे उत्तर माहीत असुनही … तुम्ही या विषयावर वाचलेले हे पुस्तक एकांतात बसून कधी एकदा वाचतोय … याची अगतिकता लागलेली आहे ….. पाहू तरी द्या या पुस्तकात काय प्रकाश पाडलाय तो … होय! उत्तर माहीत असुनही ….

  सस्नेह ….

  अनिरुद्ध

  • अनिरुद्ध प्रतिक्रीयेबद्दल आभार आणि ब्लॉगवर स्वागत…..

   तुमची प्रतिक्रीया प्रकाशित करावी की नाही हा मनात संभ्रम होता खरं तर….

   >>>>नमस्कारहो,

   तुम्हाला काय हाच एक विषय मिळाला का लिहायला? कशाला राव दुस-याची झोपेची वाट लावताय?

   तुम्ही माझा ब्लॉग पहिल्यांदा पहात/वाचत असावे हा माझा अंदाज आहे कारण ही माझी ८८ वी पोस्ट असून याआधि मी लिहीलेले विषय तुम्ही वाचलेले दिसत नाहीत, नाहितर हा प्रश्न तुम्ही मला विचारला नसता!!! हा ही एक महत्त्वाचा विषय आहे असेच माझे मत आहे….

   >>>>कोणतं पुस्तक वाचलंत तुम्ही? त्याचा संदर्भ द्या ज़रा …

   हे वाचून मात्र मला हसू आलं….. अहो संपुर्ण पोस्ट तर नीट वाचा प्रतिक्रीया छापण्याआधि….
   खरचं सांगते पुस्तकाचा संदर्भ वगैरे इथे पुन्हा देण्याचा मी प्रश्नच येत नाही पण तुमच्या संदर्भ सुटत असलेल्या प्रतिक्रीयेची मात्र गंमत वाटली!!!

   पोस्ट लिहीणारी मी स्वत: आणि तुमच्याआधि प्रतिक्रीया देणारे ईतर यांना काय कुटूंब नाहीत होय????

   तरिही तुमच्या भावनांचा आदर करत ईतकेच म्हणेन की ही पोस्ट लिहीताना मी अजिबात घाबरले/थरथरले नाही….. हे एक सत्य आहे जे मला मान्य आहे आणि माझ्या कुटूंबावर माझ्या असलेल्या आणि माझ्या कुटूंबाच्या माझ्यावर असलेल्या प्रेमासाठीच भरपुर जगायचं आहे असे मी शेवटच्या ओळीत लिहील्याचेही तुम्ही वाचलेले दिसत नाही…….

   >>>.तुम्ही या विषयावर वाचलेले हे पुस्तक एकांतात बसून कधी एकदा वाचतोय … याची अगतिकता लागलेली आहे ….. पाहू तरी द्या या पुस्तकात काय प्रकाश पाडलाय तो …

   काय लिहू यावर??? अहो एकांतात वाचा की सामुहिक अभिवाचन करा तुमचा प्रश्न आहे!!!

   एक स्त्री आज डॉक्टर, ईंजिनीयर , संशोधकच नव्हे तर ईंजिन ड्रायव्हर, बसमधे कंडक्टर सगळीच कामं करतेय… पण स्मशान पौरोहित्याचे काम करणारी अम्मा मंगलाताईंना जितकी वेगळी कुतूहलाची वाटली तितकीच ती मलाही!!!

   आहे मला कौतूक अम्माचे , मंगलाताईंचे आणि हो वास्तवाकडे सकारात्मक दृष्टिने पाहू शकणाऱ्या स्वत:चेही!!!

 8. Wow!! Solid post . I do agree with you that, we should look at this fact in a positive manner & should live fullllllllllllll life till we are alive…..

  Anyways as you said correctly we should accept another fact that, “Nobody will get disturbed with your presence or absence…not even your friends or parents or kids….according to a very famous song in Marathi, “Jan pal bhar mhantil hai hai…..”

  Great post…..keep blogging!!

 9. हंऽऽ… छान आहे. वाचायला हवं एकदा हे पुस्तक. हा लेख नेट-भेटच्या ऑक्टोबरच्या अंकात वाचूनच तुमच्या ब्लॉगला भेट दिली आणि आता सगळे लेख वाचतोय पहिल्यापासून…

  • वाचून बघ पुस्तक आवडेल असं वाटतय…. आवडेल म्हणण्यापेक्षा वेगळा अनुभव असे नक्कीच म्हणेन …. नेटभेट मुळे तू इथे आलास हे ऐकून छान वाटले, सलील-प्रणवचा उत्तम उपक्रम आणि हेरंबाचे संपादन ,यावेळेसचा अंक छानच होता.

 10. खुपच मस्त लेख आहे…विषयच मला प्रचंड आवडला आणि खूप चं छान लिहलय…पुस्तकं नक्कीच वाचेन..
  मला अगदी सहजच तुमचा ब्लॉग सापडला आणि हि पोस्त वाचल्यानंतर मला जाणवलेलं इथे मांडतिये
  मला मृत्युचि कधीच भीती वाटली नाही किंवा वाटत नाही..म्हणजे माझ्या मरणाची बर का… पन मला इतरांच्या जाण्याची फार भीती वाटते..नको वाटत त्या गोष्टीला समोर जायला..जसा तुम्ही म्हन्त्लात रस्त्यावर जरी कधी काही दिसल तर मी नजर चुकवते आणि त्या एका क्षणात हि मन सुन्न होत..आपण गेलो तर आपल्याला काहीच होत नाही पन इतर जाताना खूप त्रास होतो..मी कधीच स्मशानभूमीत गेले नव्हते पन अनपेक्षितपणे एकदा जाण्याचा योग आला आणि ते जळत प्रेत बघून मी वेड्यासारखी रडायला लागले माहित नाही पन माझ्या नकळत माझ्या डोळ्यातून पाणी येत राहील किती तरी वेळ..त्या ठिकाणी अम्मा सारखीच एक व्यक्ती होती हे सगळ पाहणारी..ती म्हणाली कशाला ग आणल हिला नाही सहन होत तिला तिच्या बापाचा जाण..( खर तर मी माझ्या मैत्रिणीच्या वडिलांच्या अंत्यविधीला तिथे गेले होते..पन ज्या प्रकारे मी रडत होते त्यावरून त्यांना वाटल ते माझेच बाबा होते …..तीच इथे कोणीच नवत आणि प्रेत जळेपर्यंत तिला तिथे थांबायचं होत…) मी ज्यावेळी ते जळताना पाह्यल त्यावेळी मला काहीच सुचत नवत एवढंच मनात येत होत कि मला माझ्या बाबांच्या आधी मरायचं…. मी नाही बघू शकत हे सगळ.. पर्याय नसतात आपल्याकडे हतबल असतो आपण , घडायचं ते घडतच असत..आणि मग आपल्या समोर पर्याय उभे ठाकतात…हसण्याचे….रडण्याचे….क्षमेचे….यातनेचे…वेदनेचे…..आणि यातल काही ना काही तरी निवडाव लागताच…कशा करत असतील ना अम्मा हे सगळ अगदी दररोज न चुकता, न थकता….hatts off to her!!!! किती प्रचंड ताकदीच्या आहेत त्या हे कळत यावरून..खुपच मस्त character आहे अम्माच आणि खरखुर…आणि हे तुमच्यामुळे आमच्या पर्यंत पोचल्…खूप खूप धन्यवाद..तुमचे सगळेच लेख खूप छान आहेत जे थेट हृदयापर्यंत जात…मी माझ्या ब्लॉग चि लिंक जोडली आहे तुम्हला वेळ मिळाला तर नक्की एक नजर टाका..मला खूप आवडेल तुमच्याकडून प्रतिक्रिया ऐकायला…पुन्हा एकदा धन्यवाद..

  • सोनाली मन:पुर्वक आभार आणि ब्लॉगवर स्वागत!!

   मनापासून लिहीलेली तुझी मतं आवडली… ब्लॉग वाचून त्याबद्दल मत कळवतेच!!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s