वाचाळ…..

वाचाळ म्हणजे अतिशय बडबडे किंवा वाचनाचा नाद असलेले असे जर दोन्ही अर्थ घेतले तर ते दोन्हिही मला १००% लागू होतात…. वाचायला आवडायला कधीपासून लागलं हे माहित नाही पण नुकतीच अक्षरओळख झाल्यावर शाळेतल्या पुस्तकांबरोबरच दुकानांच्या पाट्या वाचायला सुरुवात केली होती…. काना मात्रा, वेलांट्या, उकार हे ज्ञान जसजसे वाढत गेले तसे वाचनही वाढत गेले, आवडायला लागले किंबहूना समजायला लागले!!

बाबांबरोबर कायम लायब्ररीत जाणे व्हायचे…. लोकांना वाचताना बघणं व्हायचं…. लायब्ररी वरच्या मजल्यावर होती आणि खालच्या मजल्यावर अनेक पेपर्स टेबलवर ठेवलेले असायचे आणि अत्यंत तन्मयतेने ते वाचणारे लोक पाहिले की कुतूहल वाटायचं नेहेमी!!! आई- बाबा, आजी- आजोबा पेपर नूसते वाचायचे नाहीत तर अग्रलेख हा बरेचदा चर्चेचा मुद्दा असायचा जो मला तेव्हा अत्यंत रटाळ वाटायचा पण कानावर पडायचे त्यांचे बोलणे!! असाच मग कधितरी पेपर हातात आला, आधि मटा मग लोकसत्ता तो आजतागायत…..

तिसरी/ चौथी पर्यंत गोष्टीची पुस्तकं आली खजिन्यात…. आमचे आजोबा रेल्वेच्या शाळेत मुख्याध्यापक होते, शाळेच्या लायब्ररीतली पुस्तकांनी खचाखच भरलेली अनेक कपाटं हा सुट्टीचा मुख्य अजेंडा असायचा…. मजा होती एकदम… ही गोष्टींची पुस्तकं म्हणजे गम्माडी गम्मत…. एक राज्य असतं… राजाची राजकन्या अतिशय सुस्वरूप असते… ती सहसा नवसानेच झालेली असते, आणि दिसामाजी तिचे सौंदर्य वाढत गेलेले असते…. ती तिच्या मैत्रीणींबरोबर राजवाड्याच्या गच्चीत खेळत असते मग हवेत उडणारा दुष्ट राक्षस येतो आणि तिला पळवून नेतो….राजा कितीही शुर, पराक्रमी ईत्यादी असला तरी तो आणि त्याचे सैन्य राजकन्येला शोधून आणण्यासाठी दवंडी पिटण्याचा सोपा मार्ग स्विकारतात….त्या राज्यात एक हुशार, धाडसी मुलगा आपल्या म्हाताऱ्या आईसोबत गावच्या टोकाला किंवा गावाबाहेर आणि झोपडीतच रहात असतो…..या मुलाला वडील असल्याचा उल्लेख कधीच नसतो….मग दवंडी ऐकल्यावर आई मुलाला शिदोरी बांधून देते…. हा मुलगा निघतो , वाटेत त्याला साधू, परी, ऋषी कोणितरी भेटून त्या राक्षसाचा प्राण अमुकढमूक मधे आहे हे तरी सांगतात किंवा काहितरी जादूची वस्तू तरी देतात 🙂 …. हाच आशय असलेल्या कथा किती वाचल्यात माहित नाही….

दिड किंवा दोन रूपये ईतकीच किंमत असलेली ही पुस्तकं स्वत:च एक जादू होती….. रामायण, महाभारत, असेच ओळखीचे झाले . मग कळलं अश्या कथांना mythological  कथा म्हणतात 🙂  … मग चंपक, चांदोबा, ठकठक , पंचतंत्र, अकबर-बिरबल, ईसापनिती, तेनालीरामन, जातक कथांचे दिवस आले आणि कोल्हा, मगर, सिंह, वाघ, बगळे, ससे वगैरे यच्चयावत प्राणीसृष्टी बोलू लागली…. अरेबियन नाईट्स, सिंदबादच्या सफरी, हिमगौरी, अलीबाबा सगळ्यांशी ओळख होत गेली…. Moral stories /बोधकथा किती सहज आपल्याला एखादे नितीतत्त्व शिकवू शकते हे आता मुलांना गोष्टी सांगताना जाणवते…. चलरे भोपळ्या असो, की लाकूडतोड्या असो, कावळा चिमणी असो की माकड-मगर असो मुलांची झटकन मैत्री होते या सगळ्यांशी!!

कॉमिक्स तर अतिशय आवडते… एकिकडे ढगासारख्या आकारात काहितरी लिहीलेले तर त्याच चौकटीत बोलणाऱ्याचे चित्र…. कुठल्याही खेळण्यांपेक्षा यांचे मोल निश्चितच जास्त होते!!! चाचा चौधरी आणि साबूने तर एक काळ गाजवला होता, कितीही मारा धोपटा, समुद्रात टाका तो राका परत यायचाच….. आम्ही सुट्टीत आजीकडे म्हणून जाण्यासाठी म्हणून रेल्वे स्टेशनला गेलो की मी आमच्या आजोबांना पैसे मागायचे पुस्तक घ्यायला, आणि ते दर सुट्टीत मला रागावायचे की तुला ५० पैसे देतो, तिथेच स्टॉलसमोर उभी राहून वाच, तसेही घेतलेले पुस्तक खूप काळ पुरत नाही तूला , मग बडबड सुरू करतेस पुन्हा 🙂 …. असे म्हणायचे तरीही पैसे द्यायचेच ते आणि मग ते पुस्तक अजूनच आवडायचे…. माझ्या दुसऱ्या आजोबांनी मला चौथीत दिलेले ’श्यामची आई’ माझ्याकडे अजूनही आहे, अगदी मस्कतलाही….. पिवळी पानं झालेलं ते पुस्तक मधेच नजरेस पडतं आणि सुखावतं….

शिवाजीमहाराज, ज्ञानेश्वर आदि संत शाळेच्या ईतिहासाबरोबरच या गोष्टींच्या पुस्तकांतून जास्त ओळखीचे झाले….. बाबासाहेब पुरंदऱ्यांचे शिवचरित्र वाचून महाराज आदरस्थान होत होते !!

पेपरमधल्या रंगीबेरंगी चित्र असलेल्या पुरवण्या पहात आणि त्यातलं लहान मुलांचं सदर वाचता वाचता हळूच कधीतरी ललीतही यादीत आलं, मग ते आपल्याला झेपतयं असंही वाटायला लागलं….. लोकप्रभा, चित्रलेखा, जी वगैरे मासिकं चाळता चाळता वाचलीही जाऊ लागली…. मागे एकदा मी बाबांना विचारलही होतं की तुम्ही पुस्तकं बदलायला आम्हाला पाठवायचे ते सहज की वाचनाची गोडी लागावी म्हणून?? त्यावर ते हसले नुसते नेहेमीप्रमाणे, पण दर आठवड्याला होणाऱ्या या लायब्ररी वारीने मला वाचाळ बनवण्यात मोठा वाटा उचललाय 🙂

बारावी संपल्यावर कादंबरी वाचनाची ऑफीशियल परवानगी मिळाली 😉 त्याआधि पु.लं. की वपू हे चर्चेचे मुख्य कारण असायचे…. नंतर पु.लं.चे खुसखूशीत गुदगूल्या केल्यासारखे हलकेफूलके लिखाण तर व.पुंचे मोजक्या शब्दातले अत्यंत नेटके विचार, यांच्यात आपल्याला तूलना नकोय तर  ते दोन्ही अतिशय आवडते हे ही समजले!! एकदा सुहास शिरवळकर वाचले आणि मग झपाटल्यासारखे शिरवळकरांची पुस्तकं वाचली….. व.पुं ची पार्टनर, तप्तपदी, आपण सारे अर्जून, ठिकरी, ही वाट एकटीची किती नावं घ्यायची , निदान एकदा तरी वाचली गेलीच पाहिजेत ही पुस्तकं!! एकदा वाचली की आपोआपच ती पुन्हा पुन्हा वाचली जातात, दरवेळेस नवे काही गवसते आणि त्यातून…. दासबोध जसे कधिही बदलत नाही तसेच व.पुं.ची वाक्य , अगदी मनाच्या प्रत्येक अवस्थेवर नेमके भाष्य करणारी!!!

आमच्या हॉस्टेलवाचनाची मात्र गंमत होती , मुली जेव्हा वेगळ्या कथांमधली , त्यातही काही मोजकीच पानं वाचायला लागल्या तेव्हा मी nancy drew वाचायला घेतले, ईंग्लिश वाचनाचा तो पहिला अनूभव आणि तोच मला जास्त आवडायचा…. मग मोठी पुस्तकं वाचणाऱ्या मैत्रीणी आम्हाला ’बच्चे’ 🙂 असं चिडवायच्या….. पण तिथेही मी बरेचदा मराठी पुस्तकं घेऊनच जायचे, ईंजिनीयरिंगची पुस्तकं जड आणि जाड आहेत यावर आम्हा मैत्रीणींचं एकमत व्हायचं आणि आम्ही कथा/ कादंबऱ्या वाचायचो!! 😉

आज खरं तर यादी करत होते, साधारणपणे आजवर वाचलेल्या पुस्तकांची आणि पुढे कुठली पुस्तकं वाचायची आहेत याची…. रणजीत देसाईंचे श्रीमान योगी,स्वामी, राऊ, राधेय असोत की शिवाजी सावंतांचे मृत्यंजय, छावा असो, विश्वास पाटलांचे संभाजी, पानिपत, झाडाझडती असोत,  गोनीदांचे पडघवली, शितू, दास डोंगरी रहातो, दुर्गभ्रमण असो की सावरकरांचे माझी जन्मठेप असो, ना.सं. ईनामदारांचे शहेनशहा , रविंद्र भटांचे भेदीले शुन्यमंडळा, भगीरथ, असो, श्री.ना. पेंडसेंचे गारंबीचा बापू असो, अनिल अवचटांची पुस्तकं असोत, हेच का कमलाबाई ओगलेंचे रुचिरा असो, हवेच नाही आपल्याकडे!!! त्याचबरोबर नव्या पुस्तकांमधले अभय बंगांचे माझा साक्षात्कारी हृदयरोग, अलका मांडकेंचे हृदयस्थ हे ही हवेच…… यादी प्रचंड मोठी आहे ही, आज आठवू म्हटले तरी भराभर आठवलेली ही काही वाचलेली पण संग्रही ठेवायची पुस्तकं!!!

पुढे शिव खेरांच्या You Can Win, पासून सुरू झालेली प्रेरणादायक, यशाचा मंत्र देणारी अनेक पुस्तकं…. यात विठ्ठल कामतांच्या ईडली ऑर्किडचाही समावेश होतो…. रॉबिन शर्माने तर अनेक दिवस पुरणारे वैचारिक खाद्य दिले…. चेतन भगतनेही सोप्या भाषेतली पुस्तकं आणली…. हेरंबने पाठवलेले white tiger ही असेच, आधि रटाळ वाटलेले पण पकड घेणारे पुस्तकं!!!हेरंबनेच अनेक ई-पुस्तकांचा खजिना पाठवलेला आहे, पण वाचन म्हणजे निवांत उशीला टेकून करायचे काम, ते मला लॅपटॉपवर एक दोन पानांच्या वर वाचायला अजूनही आवडलेले नाही, त्यामूळे त्याचा मुहुर्त काही अजून लागलेला नाही!!!

कित्येक पुस्तकांमधल्या अधोरेखीत करून ठेवलेल्या, किंवा डायरीमधे लिहून ठेवलेल्या ओळी कधीतरी उदास असताना सोबत करतात, आणि जगण्याची उर्मी पुन्हा देतात….. कधी हसवतात, कधी चटका लावतात पण मोहवतात हे खरे!! 🙂 यावेळेस मायदेशातून आणलेल्या पुस्तकांवर २ पोस्ट लिहून झाल्यात तरी बरीच पुस्तकं बाकी आहेत अजून…. डॉ. आनंद नाडकर्णी, आणि अल्बर्ट ईलीसची विवेकनिष्ठ मानसोपचार हे विषय सध्या टारगेट आहेत माझे!!

वाचनाला निवांत वेळ मिळणं हे ही खरं तर भाग्याचे लक्षणं आहे, हे भाग्य ज्याच्या नशीबात त्याचा मला नेहेमी हेवा वाटतो!! मधे एकदा मला कधीतरी लायब्ररीयनच व्हावे असा विचार आला होता…. कितीही अधाशासारखे वाचले तरी वाचन उरणारच आहे हे माहिती आणि मान्य असले तरी, कोणाच्या घरी गेले आणि व्यवस्थीत मांडलेली पुस्तकं दिसली की त्या पुस्तकांच्या कपाटाकडेच लक्ष जाते!! शाळेत निबंधाला विषय असायचा ’वाचाल तर वाचाल’ तेव्हा मी कधीही नाही लिहायची या विषयावर निबंध, त्यापेक्षा मी अमुक ढमूक झाले तर, किंवा अमकेतमके बोलू लागले तर हे माझे आवडते विषय होते…… पण मुळातच वाचाळ असल्यामूळे तो निबंध आज लिहून काढतेय असे वाटतेय कारण पुन्हा मायदेशात जायचे आहे आणि पुन्हा नवी पुस्तकं आणायची आहेत….. स्वत:ला वाचनाचे वेड असले तरी हा साठा पुढे मुलांपर्यंतही न्यायचा आहे…. टि.व्ही., लॅपटॉपमधे रमलेल्या मुलाला पुस्तकं वाचायला लावायची आहेत….

कामं फार आहेत नाही…. थांबावे का इथेच…. कित्येक पुस्तकांचे, लेखकांचे नावही आलेले नसावे पोस्टमधे, हरकत नाही, अचानक नाव आठवले नसले तरी मनात कुठेतरी नोंद असेलच…आज ना उद्या आठवतील नावं!!

कितीही लिहीले तरी ’अपुर्ण’ अशी एक पोस्ट टाकतेय याची जाणीव मनात ठेवून आज थांबतेय इथेच……

 

Advertisements

देवीयों और सज्जनों……

’देवीयों और सज्जनो…..’  अनेक वर्षांनी हीच हाक पुन्हा एकदा ऐकायला मिळणार आहे आजपासून…. ११ ऑक्टोबर , अमिताभचा वाढ्दिवस … ह्याच  दिवसाचे औचित्य साधून यावेळेस सोनीवर KBC पुन्हा एकदा सुरू होतेय!!! गेला दिड महिना सोनीवर ’कोई भी सवाल छोटा नही होता’ सांगणाऱ्या अमिताभच्या मस्त जाहिराती पहायला मिळाल्या……. नंतरच्या दिवसात अमिताभ स्वत: या कार्यक्रमासाठी तयार असल्याचे सांगत , प्रेक्षकांना तुम्ही तयार आहात का विचारत होता……. आणि आता तर तास- मिनिट- सेकंद असे काऊंटडाऊनच सुरू आहे……

काल चॅनल्स बदलता बदलता सोनीवर अमिताभ कौन बनेगा मधे एका स्पर्धक महिलेशी संवाद साधत होता, “आप सबको डाँट देतीहै….. हमको डाँट दिया…. कंप्यूटरको डाँट दिया……” असे म्हणत मग तो प्रेक्षकांमधे बसलेल्या त्या महिलेच्या नवऱ्याला म्हणाला, “आप अभी बचे हुए है!!! 🙂 ” अत्यंत मिश्किल भाव चेहेऱ्यावर, आवाजाची नेहेमीची राखलेली विनम्र पट्टी, आश्वासक अस्तित्व……नकळत ती जाहिरात पहाणाऱ्या माझ्याही चेह्ऱ्यावर हसू आले….. चॅनल्स फिरताना पुढचे चॅनल आले तिथे देखील एका रिऍलिटी शोची जाहिरात होती….. दस्तूरखुद्द राखीताई सावंत त्यांच्या अदालतीत बोलत होत्या….. त्याही नेमक्या अमिताभच्याच आवाजात बोलल्या पण अगदी व्यक्तीमत्त्वाला साजेसे, अमिताभची नक्कल करत त्या म्हणत होत्या, “मेरा नाम विजय दीनानाथ चौहान है….हाय….. तो फिर बाप का नाम क्या…. चौहान????” असा अतिशय गहन प्रश्न त्यांनी कॅमेऱ्याला विचारला 🙂 …………. पहिल्या ठिकाणी खुद्द अमिताभ असून त्याचा एकेरी उल्लेख करूनही आदर वाटतो तर दुसऱ्या ठिकाणी बाईंना आदरार्थी बहूवचन वापरले तरी कीवही करावी वाटत नाही!!! खोल अथांग डोहाची धीरगंभीरता आणि उथळ पाण्याचा खळखळाट  यातला फरक त्या १० मिनिटात जाणवून गेला!!!

मनात आधिच्या कौन बनेगाच्या आठवणी येत होत्या, “कंप्युटरजी लॉक किया जाए!!!” ,”गुडनाईट, शब्बा खैर, शुभरात्री, अँड डू टेक व्हेरी गूड केअर यूरसेल्फ” वगैरे अमिताभची वाक्य त्याच्या ईतर अनेक डायलॉग्ससारखेच हिट झाले आणि वेळोवेळी वापरले गेले!!! आपण लोकप्रियतेच्या उच्चतम शिखरासमोर बसलो आहे याचं कणभरही दडपण स्पर्धकांना येऊ न देता अत्यंत हलकंफूलकं , विनोदी तर कधी गंभीर बोलत हा कार्यक्रम रंगतो!! पण उच्चारलेला प्रत्येक शब्द ऐकला की अमिताभमधल्या प्रतिभेची, विद्वत्तेची जाणीव होते!! त्याचा सुसंस्कृत वावर कार्यक्रमाची उंची वाक्यागणिक वाढवत असतो!!

अमिताभ अभिनेता म्हणून मला ’अँग्री यंग मॅन’ पेक्षा शांत, गंभीर भुमिकांमधला जास्त आवडतो नेहेमी!!! जुन्या चित्रपटांपैकी आनंद, अभिमान, मिली, शोले, चुपके-चूपके, आखरी रास्ता, ….. वगैरे कितीही वेळा पाहिले तरी पुन्हा पहायला आणि ते ही अर्ध्यातून वगैरे कसेही पहायला आवडतात!!! तर जंजीर, कालीया, मुकद्दर का सिकंदर, डॉन, खुदा गवाह, नमकहराम,मर्द……  वगैरे नवऱ्याचे आवडते…… शोले बद्दल तर प्रत्येक ब्लॉगरनी एक एक स्वतंत्र पोस्ट लिहीली तरीही अजून लिहीले जाऊ शकते असे वाटावे!!

गेल्यावेळेस कौन बनेगा आले तेव्हा अमिताभ नुकताच सावरत होता, त्याआधिचे त्याचे सुर्यवंशम, आज का अर्जून वगैरे मी पहाण्याच्याही फंदात आजतागायत पडलेले नाहीये….. कितीही असले तरी मावळत्या सुर्याला पाहिले की रुखरुख वाटते तसले काहिसे वाटायचे तेव्हा मला!! पण अस्ताकडे जाणारा सुर्य़ हा सुर्यच असतो हे या माणसाने दाखवून दिले…. तळपणे हाच ज्याचा गुणधर्म तो लख्ख प्रकाशात, झगमगाटात पुन्हा येणार हे सत्यच!!! बडे मियाँ छोटे मियाँ च्या ’मखना’ मधे अमिताभकडे दुर्लक्ष होऊन जेव्हा गोविंदा आणि माधूरीच फ्रेममधे दिसत होते तेव्हा स्वत:चेच काहितरी चुकतेय असे वाटत होते…… पण ही चूक आपल्याला फार काळ करू न देण्याची जबाबदारी होती अमिताभची….. पुनरागमन, सेकंड ईनिंग वगैरे शब्द आपल्यासाठी हा असा वावरला जसा कधी बाजूला झालाच नव्हता…. आणि ते खरेही आहे तो नव्हता तेव्हा त्याचे स्थान रिकामे होते!!!!

आताचे चित्रपट आठवायचे तर मोहोब्बते … हा पाहिला तेव्हा शाहरूखला पहायचा नुकताच कंटाळा यायला लागल्याची जाणीव होती आणि अमिताभला तर पहायचेच होते, आँखे…. अमिताभ-सुश्मिता एकत्र , किती वेळा पाहिलाय तरिही आवडतोच, खाँकी…. अमिताभ-अजय एकत्र , चूकवूच नये असा अनुभव, चिनी कम….. अमिताभ- तब्बू एकत्र, न पटणारे काही असेल तर दुर्लक्ष करूनही अनेकदा पाहिला जाणारा सिनेमा, भुतनाथ…. पारायण चालते याचे, कारण हा मुलांचाही अत्यंत लाडका….. “यार मैं भूत हुँ की नही??? ” असो की “ए चार फूट दो ईंच” असो अमिताभचे डायलॉग्स तोंडपाठ असणारी पुढची पिढी आमच्या घरातच नव्हे तर सगळीकडेच तयार आहे…..

क्यूं हो गया ना, अक्स, कभी खुशी टाईप सिनीमे, निशब्द वगैरे प्रकारांच्या वाटेला मी शक्यतो जात नाही…… हे म्हणजे अमिताभला सिनीमात घेणे आणि वाया घालवणे…..मागे एकदा श्रीकांत बोजेवारांनी असल्या प्रकाराला एक मस्त उपमा दिली होती ,” सोन्याच्या सुरीने बटाटा कापणे” ….. अमिताभसारखी लखलखती सुरी घेऊन त्याला गुळचट डायलॉग्स देणे वगैरे प्रकल्प करण जोहर हातात घेत असतो!!!

कौन बनेगा बाबतच बोलायचे तर त्याच धर्तीवर आलेल्या ईतर अनेक कार्यक्रमांपैकी एक ’छप्पर फाड के’ सोडले तर ईतर कोणाचे नावही आत्ता आठवत नाही….. कौन बनेगाच जेव्हा शाहरुखरावांनी हातात घेतले तेव्हा त्या कल्पनेनीच मी फ्रीझ झाले होते त्यामूळे त्यांनी कंप्युटर कसा फ्रीज केला ते पहायला मात्र कधी गेले नाही, तेच ’पाँचवी पास’ च्या बाबत,  शाहरुख एक आगाऊ आणि  मुलं सात आगाऊ, हा प्रकार पहाणे हे न पटणारे होते!!!

अमिताभ, माधूरी, नसिरुद्दीन शहा, अनुपम खेर ….. या प्रत्येक नावावर खरं तर एक एक संपुर्ण पोस्ट (निदान) होऊ शकते!!! टीकाकारांना उत्तरं ही टीका न करता शांततेने देता येतात, आपल्यातल्या गुणांची स्वत:लाच पारख असेल तर जग काहिही बोलू देत आपली शांतता ढळू द्यायची नसते, लोकांना काय चांगले काय वाईट हे अचूक समजत असते वगैरे अनेक गोष्टी या सगळ्यांकडून शिकता येतात!!! थोडेफार अपयश आले तरी आपला तोल ढळता कामा नये , always be graceful  हे शिकवणारी ही विद्यापीठं!!! माधूरीचे मृत्युदंड, देवदास (माधूरीसाठी, बाकि आनंद ) असो की ईतर सिनीमे असो तिचे माधुर्य आणि गोडवा कुठेही तसुभर कमी होत नाही…… अनुपमचे सारांश, डॅडी असो की खोसला का घोसला, वेडनेसडे असो, वेगळेपण दिसतेच….. नसिरुद्दीन बद्दल बोलणे म्हणजे स्वत:चा मान वाटतो मला….. ईक्बाल, वेडनेसडे, सरफरोश वगैरे काही फक्त उदाहरणे बाकि मगा म्हटल्याप्रमाणे निदान एक संपुर्ण पोस्ट होईल येव्हढे लिहीले/ बोलले जाऊ शकते!!!

लोकांना हवा तो गोंधळ घालू देत, आपण शांततेने आपल्यातल्या प्रतिभेला जपायचे , समंजसपणे कठीण परिस्थितही धीराने सामोरे जायचे…. आपल्या मनातली आपली प्रतिमा जपली की लोकांच्या मनात त्या प्रतिमेची स्थापना होतेच वगैरे धडे आपल्या वागणूकीतून देणारी ही व्यक्तिमत्त्व!!! दस्तूरखुद्द ’यश’ हा शब्द प्रत्यक्ष जगणारा , आयुष्य म्हणजेच या शब्दाची व्याख्या असणारा तरिही अत्यंत विनम्र, सहज वागणे बोलणे असणारा अमिताभ ’पा’ मधे सुद्धा आवडला होता…. वयाचे बंधन कलेच्या, मेहेनतीच्या आड येऊ न देणे म्हणजे काय याचे हे एक उदाहरण!!!

बरचं लिहीलं नाही….बरचं अजूनही लिहीले जाऊ शकते, कित्येक चित्रपटांचे तर नावही आले नाहीये तरिही थांबतेय आता 🙂 ……. काल अमिताभला पाहिले आणि पाठोपाठ राखीताईंनी गोंधळ घातला मग सुरू झालेले हे विचारचक्र!!! शेवटचे महत्त्वाचे काम , अमिताभला वाढ्दिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा!!! 🙂

आणि आता माझे पलायन किचनमधे कारण व्यस्त रहाणाऱ्या अमिताभचे कौतूक करायचे आणि स्वत:चे काम चालढकल या तत्त्वावर करायचे हे मला तत्त्वत: मान्य नाही!!! 😉

तर काय बाय बाय, अपना खयाल रखियेगा, हम बस यूँ गये और यूँ आये!!! 🙂

(पंधरा दिवसानी पुढची पोस्ट घेऊन :))

 

 

ऋणानूबंध…..

दिड वर्षापुर्वी ’सहजच’ सुरू केलेला हा उद्योग …… आजची ही ९० वी पोस्ट….. सुरूवात चाचपडत केलेली, मग काही निबंधछाप, काही रटाळ तर काही बऱ्या पोस्टा लिहीत आजवर पार पडलेला हा प्रवास!!! रोजच्या जीवनातले साधेसे प्रसंग, कधी वाचलेल्या पुस्तकांबद्दलचे मत, कधी काही मतं काही आठवणी या लहानश्या भांडवलावर आजवर केलेले लिखाण…. गृहिणीचा जॉब पार पाडताना कूठून आणणार लिखाणात वैविध्य असा एक प्रश्न खूप सुरूवातीला पडला होता…… तरीही लिहीत गेले…. जे जसे वाटले तसे, सुचले तसे!!!

महेंद्रजी, नचिकेत, अनिकेत, श्रीताई अश्या एक एक ओळखी होऊ लागल्या …… मग रोहन, शिनू, गौरी, सुहास, देवेंद्र, रविंद्रजी,पेठेकाका, हेरंब, बाबा, योगेश, माऊ, आनंद,विशाल,सोनल, दीपक अशी ही ओळखीची यादी वाढत गेली. तरिही या जुनपर्यंत यापैकी प्रत्यक्ष कोणाशी बोलण्याचे, भेटण्याचे योग काही जूळलेले नव्हते….हे तर झाले ब्लॉगर्स पण प्रतिक्रीयांची आत्तापर्यंत असलेली संख्या जवळपास २००० आहे…. त्यातल्या काही माझ्या वगळल्या तरी निदान १५०० पेक्षा जास्त अपरिचितांनी असा स्नेह नक्कीच व्यक्त केलेला आहे!!!

यावेळेसची सुट्टी मात्र अगदी आगळी वेगळी झाली….. सुखद अनुभव सगळे एक से एक!!! आत्तापर्यंत जे जे मित्रमंडळी भेटत होते ते सगळे आधिपासून ओळखीचे, प्रत्यक्ष पाहिलेले भेटलेले होते…… यावेळी मात्र तसे नव्हते….. ज्यांना भारतभेटीत भेटायचे ठरवत होते त्यांची ओळख अप्रत्यक्ष होती……

भारतात गेल्यावर दुसऱ्याच दिवशी विशालचा, माऊचा, श्रीताईचा फोन आला….. आणि सुरू झाले माहेराचे गाणे आणि ब्लॉ्गर्स ऋणानूबंधाची सुरूवात!! विशालच्या फोनने प्रत्यक्ष एकमेकांशी बोलायला सुरूवात झाली तरी भेट मात्र अजुन कोणाशी झालेली नव्हती.

पहिली भेट झाली ती श्रीताईच्या आईबाबांशी, लेकाच्या मुंजीसाठीचे निमंत्रण द्यायला येते असे काकुंना कळवले पण वेळेअभावी जाणे झालेच नाही…. तरिही काका- काकू मुंजीला आलेच आणि केवळ आलेच नाहीत तर घरचे एक होऊन सगळ्या कार्यक्रमात उपस्थित राहिले!!! मुंजीनंतर काका-काकुंना भेटायला निवांत गेलो आणि जाणवले की श्रीताई आणि आपल्यात असलेले हजारो मैलांचे भौगोलिक अंतर प्रत्यक्ष नात्यातल्या जिव्हाळ्यात कणाचाही अडसर करत नाहीये…… प्रेमाचा, आपुलकीचा, आशिर्वादाचा मोठा साठा काका-काकुंकडून घेऊन निघालो यावेळेस भारतातून…. मुलांनाही हे आजी-आजोबा खूप आवडले!!!पोहे, पन्हे आणि अतिशय मेहेनतीने सायीत केलेल्या वड्या काकूंकडे खाल्या आणि श्रीताईच्या चविष्ट ब्लॉगचे रहस्य समजले!!!

एकीकडे सगळ्या भावंडांशी फोनाफोनी सुरू होती तशीच ब्लॉगर्सशीही बोलणी सुरूच होती….. वेध लागले होते सगळ्यांना प्रत्यक्ष भेटण्याचे…… आणि आली सिंहगड वारी…… आनंद काळे (याचे नाव सगळ्यात आधि … सिंहगडाच्या पायथ्याशी या मावळ्याची लढाई पाहिलीये मी 🙂 ), देवेंद्र, सुहास, सचिन, आनंद, भारत, अभिजी्त, विद्याधर, अनुजाताई आणि पेठेकाका आणि अस्मादिक सगळ्यांची अतिशय अनौपचारिक भेट….. सगळेच एकमेकांना पहिल्यांदा भेटत होते…… मुंबई-पुण्याच्या ब्लॉगर्स भेटीत यायला न जमलेले आमच्यातले काही आणि त्या भेटीत असलेले काहीजण….. मजा , धमाल आली एकदम!!! सिंहगड वारीबद्दल मुलांनी पोस्टा टाकलेल्या आहेतच….. २/३ तासांची उणिपुरी भेट ती, पण नाते हे ओळखींच्या कालावधीवर, भेटींच्या संख्येवर अवलंबून नसते हे जाणवून देणारी!!

ताई….. माझा अत्यंत आवडता शब्द….. आई शब्दाशी साम्य असणारा….. आम्हा भावंडांमधे सगळी माझ्यापेक्षा जास्तीत जास्त २/३ वर्षाने लहान असली तरी मी सगळ्यांची ताई आहे….. नव्या दम्याच्या ब्लॉगर्सच्या फळीबाबतही मला तेच नाते पुन्हा मिळालेय….. याचा अर्थ मी खूप जुनी आहे ब्लॉगिंगमधे असे नाही तरिही जरा का होईना सिनियर म्हणजे सिनीयरच असतो!! 🙂

सिंहगडावर भेटल्यानंतर ८ दिवसाने विद्याधर पुन्हा मिलानला परतला, तारखेचा घोळ झाल्याने त्याला फोन केला तोवर हे महाशय मिलानात पोहोचलेले होते!! पण फोनवर गप्पा मारायला मिळाल्या काका-काकुंशी ….. मनमोकळ्या गप्पा मारल्या काकूंशी आणि समाधानाने फोन ठेवला!!! महेंद्रजी, रोहन यांना भेटायला मिळणार नाहीये ही रुखरूख मनात होती ….. त्यातच महेंद्रजी ना्सिकला येताहेत असे समजले… लगेच त्यांना फोन केला आणि भेटायला गेलो…… इथेही अपेक्षेपेक्षा जास्त मिळणार होते…… गप्पा केवळ महेंद्रजींशीच नाहीत तर संध्याताईंशीही (महेंद्रजींच्या बहिणाबाई) मारायल्या मिळाल्या!! “तुझा ब्लॉग मला आवडतो, पण जरा रेग्युलर लिहीत जा” असे संध्याताई म्हणाला आणि माझ्या एक-दोन लेखांबद्दल बोलल्या….. खरचं “और क्या चाहिये” अशी गप्पांची मैफिल होती ती!!!! गौरी आणि ईशानला जसे सिंहगडावरचे मामा खूप आवडले तसे खिशामधे शेंगादाणे भरून खेळायला पाठवणारे महेंद्रकाका देखील मित्रच वाटले!!!

६ जूलै, माझा ३२वा  वाढ्दिवस !!! वाढ्दिवसाच्या ४/५ दिवस आधि माहेरच्या गाण्यावर एक कमेंट आली होती, कमेंट होती ’सुमन ओक’ या नावाने…. लगेच हेरंबला मेल टाकले आणि त्याचे उत्तर आले की ” हो ते कमेंट आईनेच टाकलेय…. तिला तुझा ब्लॉग आवडतो!!” ….. हेरंबकडूनच काकूंचा नंबर घेतला आणि त्यांच्याशी बोलले, भरभरून बोलणारा काकूंचा आवाज अजुनही आठवतो मला!!!! माझ्या वाढ्दिवसाला यावेळेस मला भेट नव्हे तर या अनेक ’भेटी’ मिळाल्या…… त्यांच्यामूळे आज श्रीमंती वाढलीये माझी!!! 🙂

साधारण ऐंशी वर्ष पार केलेल्या , गुडघ्यात खूप त्रास होणाऱ्या आमच्या एक काकू बिल्डिंगचे जीने उतरून , “छान लिहीतेस गं!!! अशीच व्यक्त होत रहा!!” सांगायला आल्या….. आशिर्वादाचे मोल होत नाही वगैरे वाक्य आणि त्यांचा अर्थ उलगडणारे हे क्षण!!!भारतातून ऐन निघताना रोहन- शमिका मला भेटायला नासिकला आले….. दिवसभर गप्पा मारल्या सगळ्यांनी!!! योगेशशीही यावेळेस नुसते फोनाफोनी करणे झालेय ….

प्रमोद देवकाकांनी काढलेला ’जालनिशी’चा अंक….. आपली मुळात प्रत्यक्ष ओळख नाही , उगाच मधेमधे कसे करायचे असा विचार करत मी आधि काही अभिवाचन पाठवलेले नव्हते, आणि ऐन वेळेस तर सर्दी-तापाने हैराण झाल्यामूळे ईच्छा असली तरी अभिवाचन पाठवणे शक्यच नव्हते….. तेव्हढ्यात विद्याधराचे मेल आले, ताई तुझ्या एका लेखाचे अभिवाचन पाठवलेय मी!!! आभार वगैरे मानायचे नाहीत अश्या बाबाच्या कडक सुचना असल्यामूळॆ ,”खूप आनंद झालाय रे मला!!” ईतकच बोलले त्याच्याशी!! तर त्यावर “तायडे सगळ्यांची नावं असतील ना तिथे, मला तुझंही नाव पहायचे होते तिथे!!! ” असे सांगून बाबा राखीपौर्णिमेला सार्थ करून गेला!!!

नेटभेटद्वारे सलीलनेही अनेक वाचकांशी निस्वार्थपणे माझी ओळख करून दिली!!! तसा्च अमोल कपोले, पुणे ब्लॉगर्सच्या केलेल्या बातमीत त्याने सहजच माझाही उल्लेख केला….. भुंग्याने केलेले ब्लॉगचे चिन्ह, हा कोंबडा, नवी पहाट रोज आणतो!!!

स्टार माझाची ’ब्लॉग माझा’ स्पर्धा आल्याचे हेरंबने कळवले….. सगळ्यांनी मेल्स पाठवले आहेत की नाहीत याचा पाठपूरावा सगळेच करत होते….  निकोप स्पर्धा हा देखील निकष इथे लागू होत नाही कारण मूळात कोणाची कोणाशी स्पर्धाच नाहीये!! खेळीमेळी यालाच म्हणतात  नाही का!! माझ्या लॅपटॉपचे साधे एक सॉफ्टवेअर बंद पडले तर आनंद आणि बाबा दिवसभर पाठपुरावा करत होते…. नवरा हसून म्हणालाही ” तुझे भाऊ आहेत समर्थ तुला मदत करायला!! 🙂 मी निघतो हापिसात!!”

किती लिहू 🙂 …. पोस्ट भलती मोठी आहे ही!! ब्लॉगची वाचकसंख्या ५०,००० ओलांडून पुढे चाललीये….. नवी ओळख, नवे अस्तित्त्व, आणि जगण्याकडे पहाण्याच्या दृष्टिकोनाची ओ्ळख आणि पडताळणी करता आली इथे!!!अनेक सुहृद आपली मतं कमेंट्सच्या रूपात मांडताहेत…. प्रत्येक पोस्टला निदान ३/४ नव्या मंडळींशी ओळख होते….

मागे माझा एक मित्र म्हणाला होता की कायम स्वत:बद्दल, घराबद्दल, नात्यांबद्दल तर लिहितेसच आता जरा विषयांचा आवाका वाढव….. करेनच तो ही प्रयत्न नक्की करेनच…. तोवर इतकेच म्हणेन….

I should talk not so much

about myself if there were

anybody else whom I knew as well.

Unfortunately, I am confined to

this theme by the narrowness

of my experience.

– Henry David Thoreau, From WALDEN

जाता जाता इतकेच म्हणेन की ’आज मै खुश हुँ!!! 🙂 ’

सहजच- पुन्हा एकदा….

गुरुवार शुक्रवारची सुट्टी मुलांबरोबर घालवायची…. आणि फक्त अभ्यास किंवा खेळ येव्हढेच न करता, दर सुट्टीला त्यांना काहितरी नवीन शिकवायचे असा गेल्या काही दिवसात आम्ही केलेला नवा नियम….. त्यानुसार गेल्या शुक्रवारी आम्ही (मी आणि ईशानने) केलेली कलाकारी…..

स्वत:च्याच कलाकारीवर चिरंजीव खुश झाल्याने या गुरूवारी पुन्हा टुमणं लावलं माझ्यामागे, शिकव काहितरी नवे म्हणून….. नवे म्हणजे त्याला अगदीच माहित नसलेले काहितरी असा अर्थ असतो कारण आपण काहितरी सांगायला जावे आणि त्याला जराही कल्पना असली तर लगेच ,”ए हे नको मम्मा… हे मला माहितीये!!’ नावाची नवी भुणभूण सुरू होते……

जरा डोके लावल्यावर लक्षात आले, नवे, त्याला अजिबात माहित नसलेले आणि करायला सोपे असे म्हणजे ’वारली चित्रकला’ …… पेंटींगही होइल आणि महाराष्ट्राच्या या आदिवासी कलेबद्दलची माहिती सांगणेही होईल….. त्यातही वेगळेपण हवे, मग घरी असलेल्या एका जुन्या बॉक्सची चिरफाड केली त्याच्याच लेसला हाताशी धरले आणि काही बुकमार्क्स बनवले…….

हा होता पहिला प्रयत्न…… जरा सोपेच करूया म्हटलं…. उगाच लेकासमोर आपलाच पोपट नको म्हणून आधि स्वत:चा हात कितपत साथ देतोय याचा अंदाज घेण्यासाठीचा हा बुकमार्क….. मग बुकमार्कची गरज काय, हे लेकाला समजावले की  आपण काय वाचत होतो हे लक्षात ठेवायला उगाच पुस्तकाची पानं मुडपायला नकोत, पुस्तकांचा आदर  वगैरे विषय मी बोलायला लागल्यावर मात्र चिरंजीवांनी, “अच्छा म्हणजे एरवी तू मोबाईल किंवा चमचा बिमचा घालून ठेवतेस बुकमधे, त्याऐवजी आता हे बुकमार्क्स घालून ठेवायचे , म्हणजे आपण वाचत असलेले पेज सापडेल……. बाबा ही मम्मा ना मोबाईल ठेवते बुकमधे आणि मग ते बुक जाडं दिसतं जाम 🙂 ” असे मलाच कोंडीत पकडून गप्प बसवले…… मग आम्ही बुक्सबद्दलचा रिस्पेक्ट या मुद्दा तुर्तास बाजूला ठेवून मोर्चा वळवला पुढच्या बुकमार्काकडे!!!

हे झाले दुसरे बुकमार्क……

आणि हे तिसरे आणि शेवटचे (सध्यातरी)…. कारण यातले एक आणि ईशानने बनवलेले एक गेलेत शाळेतल्या टिचर्ससाठी … त्या पण बुकमधे स्केल घालून ठेवतात याचा चिरंजीवांना अचानक साक्षात्कार झाला…. 🙂

थोडक्यात काय आमचा हा गुरूवार -शुक्रवार मस्त गेला!!!

याआधिचे सहजच इथे आहे, म्हणूनच आज आहे सहजच- पुन्हा एकदा!!! 🙂

शेवटी काय ब्लॉगाचे नाव चुकलेय असे नको वाटायला!!!