सहजच- पुन्हा एकदा….

गुरुवार शुक्रवारची सुट्टी मुलांबरोबर घालवायची…. आणि फक्त अभ्यास किंवा खेळ येव्हढेच न करता, दर सुट्टीला त्यांना काहितरी नवीन शिकवायचे असा गेल्या काही दिवसात आम्ही केलेला नवा नियम….. त्यानुसार गेल्या शुक्रवारी आम्ही (मी आणि ईशानने) केलेली कलाकारी…..

स्वत:च्याच कलाकारीवर चिरंजीव खुश झाल्याने या गुरूवारी पुन्हा टुमणं लावलं माझ्यामागे, शिकव काहितरी नवे म्हणून….. नवे म्हणजे त्याला अगदीच माहित नसलेले काहितरी असा अर्थ असतो कारण आपण काहितरी सांगायला जावे आणि त्याला जराही कल्पना असली तर लगेच ,”ए हे नको मम्मा… हे मला माहितीये!!’ नावाची नवी भुणभूण सुरू होते……

जरा डोके लावल्यावर लक्षात आले, नवे, त्याला अजिबात माहित नसलेले आणि करायला सोपे असे म्हणजे ’वारली चित्रकला’ …… पेंटींगही होइल आणि महाराष्ट्राच्या या आदिवासी कलेबद्दलची माहिती सांगणेही होईल….. त्यातही वेगळेपण हवे, मग घरी असलेल्या एका जुन्या बॉक्सची चिरफाड केली त्याच्याच लेसला हाताशी धरले आणि काही बुकमार्क्स बनवले…….

हा होता पहिला प्रयत्न…… जरा सोपेच करूया म्हटलं…. उगाच लेकासमोर आपलाच पोपट नको म्हणून आधि स्वत:चा हात कितपत साथ देतोय याचा अंदाज घेण्यासाठीचा हा बुकमार्क….. मग बुकमार्कची गरज काय, हे लेकाला समजावले की  आपण काय वाचत होतो हे लक्षात ठेवायला उगाच पुस्तकाची पानं मुडपायला नकोत, पुस्तकांचा आदर  वगैरे विषय मी बोलायला लागल्यावर मात्र चिरंजीवांनी, “अच्छा म्हणजे एरवी तू मोबाईल किंवा चमचा बिमचा घालून ठेवतेस बुकमधे, त्याऐवजी आता हे बुकमार्क्स घालून ठेवायचे , म्हणजे आपण वाचत असलेले पेज सापडेल……. बाबा ही मम्मा ना मोबाईल ठेवते बुकमधे आणि मग ते बुक जाडं दिसतं जाम 🙂 ” असे मलाच कोंडीत पकडून गप्प बसवले…… मग आम्ही बुक्सबद्दलचा रिस्पेक्ट या मुद्दा तुर्तास बाजूला ठेवून मोर्चा वळवला पुढच्या बुकमार्काकडे!!!

हे झाले दुसरे बुकमार्क……

आणि हे तिसरे आणि शेवटचे (सध्यातरी)…. कारण यातले एक आणि ईशानने बनवलेले एक गेलेत शाळेतल्या टिचर्ससाठी … त्या पण बुकमधे स्केल घालून ठेवतात याचा चिरंजीवांना अचानक साक्षात्कार झाला…. 🙂

थोडक्यात काय आमचा हा गुरूवार -शुक्रवार मस्त गेला!!!

याआधिचे सहजच इथे आहे, म्हणूनच आज आहे सहजच- पुन्हा एकदा!!! 🙂

शेवटी काय ब्लॉगाचे नाव चुकलेय असे नको वाटायला!!!

Advertisements