ऋणानूबंध…..

दिड वर्षापुर्वी ’सहजच’ सुरू केलेला हा उद्योग …… आजची ही ९० वी पोस्ट….. सुरूवात चाचपडत केलेली, मग काही निबंधछाप, काही रटाळ तर काही बऱ्या पोस्टा लिहीत आजवर पार पडलेला हा प्रवास!!! रोजच्या जीवनातले साधेसे प्रसंग, कधी वाचलेल्या पुस्तकांबद्दलचे मत, कधी काही मतं काही आठवणी या लहानश्या भांडवलावर आजवर केलेले लिखाण…. गृहिणीचा जॉब पार पाडताना कूठून आणणार लिखाणात वैविध्य असा एक प्रश्न खूप सुरूवातीला पडला होता…… तरीही लिहीत गेले…. जे जसे वाटले तसे, सुचले तसे!!!

महेंद्रजी, नचिकेत, अनिकेत, श्रीताई अश्या एक एक ओळखी होऊ लागल्या …… मग रोहन, शिनू, गौरी, सुहास, देवेंद्र, रविंद्रजी,पेठेकाका, हेरंब, बाबा, योगेश, माऊ, आनंद,विशाल,सोनल, दीपक अशी ही ओळखीची यादी वाढत गेली. तरिही या जुनपर्यंत यापैकी प्रत्यक्ष कोणाशी बोलण्याचे, भेटण्याचे योग काही जूळलेले नव्हते….हे तर झाले ब्लॉगर्स पण प्रतिक्रीयांची आत्तापर्यंत असलेली संख्या जवळपास २००० आहे…. त्यातल्या काही माझ्या वगळल्या तरी निदान १५०० पेक्षा जास्त अपरिचितांनी असा स्नेह नक्कीच व्यक्त केलेला आहे!!!

यावेळेसची सुट्टी मात्र अगदी आगळी वेगळी झाली….. सुखद अनुभव सगळे एक से एक!!! आत्तापर्यंत जे जे मित्रमंडळी भेटत होते ते सगळे आधिपासून ओळखीचे, प्रत्यक्ष पाहिलेले भेटलेले होते…… यावेळी मात्र तसे नव्हते….. ज्यांना भारतभेटीत भेटायचे ठरवत होते त्यांची ओळख अप्रत्यक्ष होती……

भारतात गेल्यावर दुसऱ्याच दिवशी विशालचा, माऊचा, श्रीताईचा फोन आला….. आणि सुरू झाले माहेराचे गाणे आणि ब्लॉ्गर्स ऋणानूबंधाची सुरूवात!! विशालच्या फोनने प्रत्यक्ष एकमेकांशी बोलायला सुरूवात झाली तरी भेट मात्र अजुन कोणाशी झालेली नव्हती.

पहिली भेट झाली ती श्रीताईच्या आईबाबांशी, लेकाच्या मुंजीसाठीचे निमंत्रण द्यायला येते असे काकुंना कळवले पण वेळेअभावी जाणे झालेच नाही…. तरिही काका- काकू मुंजीला आलेच आणि केवळ आलेच नाहीत तर घरचे एक होऊन सगळ्या कार्यक्रमात उपस्थित राहिले!!! मुंजीनंतर काका-काकुंना भेटायला निवांत गेलो आणि जाणवले की श्रीताई आणि आपल्यात असलेले हजारो मैलांचे भौगोलिक अंतर प्रत्यक्ष नात्यातल्या जिव्हाळ्यात कणाचाही अडसर करत नाहीये…… प्रेमाचा, आपुलकीचा, आशिर्वादाचा मोठा साठा काका-काकुंकडून घेऊन निघालो यावेळेस भारतातून…. मुलांनाही हे आजी-आजोबा खूप आवडले!!!पोहे, पन्हे आणि अतिशय मेहेनतीने सायीत केलेल्या वड्या काकूंकडे खाल्या आणि श्रीताईच्या चविष्ट ब्लॉगचे रहस्य समजले!!!

एकीकडे सगळ्या भावंडांशी फोनाफोनी सुरू होती तशीच ब्लॉगर्सशीही बोलणी सुरूच होती….. वेध लागले होते सगळ्यांना प्रत्यक्ष भेटण्याचे…… आणि आली सिंहगड वारी…… आनंद काळे (याचे नाव सगळ्यात आधि … सिंहगडाच्या पायथ्याशी या मावळ्याची लढाई पाहिलीये मी 🙂 ), देवेंद्र, सुहास, सचिन, आनंद, भारत, अभिजी्त, विद्याधर, अनुजाताई आणि पेठेकाका आणि अस्मादिक सगळ्यांची अतिशय अनौपचारिक भेट….. सगळेच एकमेकांना पहिल्यांदा भेटत होते…… मुंबई-पुण्याच्या ब्लॉगर्स भेटीत यायला न जमलेले आमच्यातले काही आणि त्या भेटीत असलेले काहीजण….. मजा , धमाल आली एकदम!!! सिंहगड वारीबद्दल मुलांनी पोस्टा टाकलेल्या आहेतच….. २/३ तासांची उणिपुरी भेट ती, पण नाते हे ओळखींच्या कालावधीवर, भेटींच्या संख्येवर अवलंबून नसते हे जाणवून देणारी!!

ताई….. माझा अत्यंत आवडता शब्द….. आई शब्दाशी साम्य असणारा….. आम्हा भावंडांमधे सगळी माझ्यापेक्षा जास्तीत जास्त २/३ वर्षाने लहान असली तरी मी सगळ्यांची ताई आहे….. नव्या दम्याच्या ब्लॉगर्सच्या फळीबाबतही मला तेच नाते पुन्हा मिळालेय….. याचा अर्थ मी खूप जुनी आहे ब्लॉगिंगमधे असे नाही तरिही जरा का होईना सिनियर म्हणजे सिनीयरच असतो!! 🙂

सिंहगडावर भेटल्यानंतर ८ दिवसाने विद्याधर पुन्हा मिलानला परतला, तारखेचा घोळ झाल्याने त्याला फोन केला तोवर हे महाशय मिलानात पोहोचलेले होते!! पण फोनवर गप्पा मारायला मिळाल्या काका-काकुंशी ….. मनमोकळ्या गप्पा मारल्या काकूंशी आणि समाधानाने फोन ठेवला!!! महेंद्रजी, रोहन यांना भेटायला मिळणार नाहीये ही रुखरूख मनात होती ….. त्यातच महेंद्रजी ना्सिकला येताहेत असे समजले… लगेच त्यांना फोन केला आणि भेटायला गेलो…… इथेही अपेक्षेपेक्षा जास्त मिळणार होते…… गप्पा केवळ महेंद्रजींशीच नाहीत तर संध्याताईंशीही (महेंद्रजींच्या बहिणाबाई) मारायल्या मिळाल्या!! “तुझा ब्लॉग मला आवडतो, पण जरा रेग्युलर लिहीत जा” असे संध्याताई म्हणाला आणि माझ्या एक-दोन लेखांबद्दल बोलल्या….. खरचं “और क्या चाहिये” अशी गप्पांची मैफिल होती ती!!!! गौरी आणि ईशानला जसे सिंहगडावरचे मामा खूप आवडले तसे खिशामधे शेंगादाणे भरून खेळायला पाठवणारे महेंद्रकाका देखील मित्रच वाटले!!!

६ जूलै, माझा ३२वा  वाढ्दिवस !!! वाढ्दिवसाच्या ४/५ दिवस आधि माहेरच्या गाण्यावर एक कमेंट आली होती, कमेंट होती ’सुमन ओक’ या नावाने…. लगेच हेरंबला मेल टाकले आणि त्याचे उत्तर आले की ” हो ते कमेंट आईनेच टाकलेय…. तिला तुझा ब्लॉग आवडतो!!” ….. हेरंबकडूनच काकूंचा नंबर घेतला आणि त्यांच्याशी बोलले, भरभरून बोलणारा काकूंचा आवाज अजुनही आठवतो मला!!!! माझ्या वाढ्दिवसाला यावेळेस मला भेट नव्हे तर या अनेक ’भेटी’ मिळाल्या…… त्यांच्यामूळे आज श्रीमंती वाढलीये माझी!!! 🙂

साधारण ऐंशी वर्ष पार केलेल्या , गुडघ्यात खूप त्रास होणाऱ्या आमच्या एक काकू बिल्डिंगचे जीने उतरून , “छान लिहीतेस गं!!! अशीच व्यक्त होत रहा!!” सांगायला आल्या….. आशिर्वादाचे मोल होत नाही वगैरे वाक्य आणि त्यांचा अर्थ उलगडणारे हे क्षण!!!भारतातून ऐन निघताना रोहन- शमिका मला भेटायला नासिकला आले….. दिवसभर गप्पा मारल्या सगळ्यांनी!!! योगेशशीही यावेळेस नुसते फोनाफोनी करणे झालेय ….

प्रमोद देवकाकांनी काढलेला ’जालनिशी’चा अंक….. आपली मुळात प्रत्यक्ष ओळख नाही , उगाच मधेमधे कसे करायचे असा विचार करत मी आधि काही अभिवाचन पाठवलेले नव्हते, आणि ऐन वेळेस तर सर्दी-तापाने हैराण झाल्यामूळे ईच्छा असली तरी अभिवाचन पाठवणे शक्यच नव्हते….. तेव्हढ्यात विद्याधराचे मेल आले, ताई तुझ्या एका लेखाचे अभिवाचन पाठवलेय मी!!! आभार वगैरे मानायचे नाहीत अश्या बाबाच्या कडक सुचना असल्यामूळॆ ,”खूप आनंद झालाय रे मला!!” ईतकच बोलले त्याच्याशी!! तर त्यावर “तायडे सगळ्यांची नावं असतील ना तिथे, मला तुझंही नाव पहायचे होते तिथे!!! ” असे सांगून बाबा राखीपौर्णिमेला सार्थ करून गेला!!!

नेटभेटद्वारे सलीलनेही अनेक वाचकांशी निस्वार्थपणे माझी ओळख करून दिली!!! तसा्च अमोल कपोले, पुणे ब्लॉगर्सच्या केलेल्या बातमीत त्याने सहजच माझाही उल्लेख केला….. भुंग्याने केलेले ब्लॉगचे चिन्ह, हा कोंबडा, नवी पहाट रोज आणतो!!!

स्टार माझाची ’ब्लॉग माझा’ स्पर्धा आल्याचे हेरंबने कळवले….. सगळ्यांनी मेल्स पाठवले आहेत की नाहीत याचा पाठपूरावा सगळेच करत होते….  निकोप स्पर्धा हा देखील निकष इथे लागू होत नाही कारण मूळात कोणाची कोणाशी स्पर्धाच नाहीये!! खेळीमेळी यालाच म्हणतात  नाही का!! माझ्या लॅपटॉपचे साधे एक सॉफ्टवेअर बंद पडले तर आनंद आणि बाबा दिवसभर पाठपुरावा करत होते…. नवरा हसून म्हणालाही ” तुझे भाऊ आहेत समर्थ तुला मदत करायला!! 🙂 मी निघतो हापिसात!!”

किती लिहू 🙂 …. पोस्ट भलती मोठी आहे ही!! ब्लॉगची वाचकसंख्या ५०,००० ओलांडून पुढे चाललीये….. नवी ओळख, नवे अस्तित्त्व, आणि जगण्याकडे पहाण्याच्या दृष्टिकोनाची ओ्ळख आणि पडताळणी करता आली इथे!!!अनेक सुहृद आपली मतं कमेंट्सच्या रूपात मांडताहेत…. प्रत्येक पोस्टला निदान ३/४ नव्या मंडळींशी ओळख होते….

मागे माझा एक मित्र म्हणाला होता की कायम स्वत:बद्दल, घराबद्दल, नात्यांबद्दल तर लिहितेसच आता जरा विषयांचा आवाका वाढव….. करेनच तो ही प्रयत्न नक्की करेनच…. तोवर इतकेच म्हणेन….

I should talk not so much

about myself if there were

anybody else whom I knew as well.

Unfortunately, I am confined to

this theme by the narrowness

of my experience.

– Henry David Thoreau, From WALDEN

जाता जाता इतकेच म्हणेन की ’आज मै खुश हुँ!!! 🙂 ’

Advertisements